Sunday, October 31, 2021

 

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक त्रेसष्ठ ते सदुसष्ठ

 

६३).       “ओम् शुभांग: शान्तिद: स्त्रष्टा कुमुद: कुवलेशय :        ।
               गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय :             ॥६३॥” 

सर्वांगसुंदर आणि शुभलक्षणी असा ‘शुभान्गो’ भगवान् श्रीमहाविष्णु आहे. (मानवी शरीर हे शुभ आणि अशुभ असे दोन्ही लक्षणांचे असते. खरेतर सर्वच प्राण्यांच्या बाबतींत ते लागू पडते, कारण अजूनही , विशेषत: खेडोपाडीं जनावरांचा सौदा करताना शुभाशुभ लक्षणे पडताळून पाहतात. फार पूर्वी वधुपरिक्षेच्या वेळी एखाद्या चाणाक्ष वृध्देचा सल्ला आवर्जून घेतला जाई. या शुभाशुभ लक्षणांचेही एक शास्त्र आहे जे पूर्वापार चालत आले आहे.) असो. 
परमेश्वर ‘शान्तिद:’ आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही, कारण अशांत ईश्वराकडे कुणी ढुंकूनही पाहिले नसते. तो स्वत: शांतचित्त असल्यानेच तो आपल्याला शांती प्रदान करू शकतो ! 
पंचमहाभूतांपासून सृष्टी रचणारा हा ‘स्त्रष्टा’ आहे, तर ‘कुमुद:’ म्हणजे पूर्ण विकसित कमळाप्रमाणे आल्हादक, आनंददायक. 
‘कुवलेशय :’ म्हणजे शेषनागाच्या वेटोळ्यांवर अथांग जलाशयांत शयन करणारा - श्रीविष्णु ! 
‘गो’ या शब्दावर आपण आधी वाचले आहेच. गाय, इंद्रियें, पृथ्वी आदि सर्वांचे हित करणारा नि त्यांचा स्वामी असा ‘गोहितो गोपति ‘, तर ‘गोप्ता’ म्हणजे विश्वनिर्मिती, तिचे लालनपालन नि लय ही स्वत: गुप्त, अदृष्य राहून करणारा ! (खरेतर मायेने स्वत: ला वेढून घेतलेला ! ) 
‘वृष’ म्हणजे धर्म हेही आपण या आधी पाहिले आहेच. धर्म, नीती, न्याय याच दृष्टिकोणामुळे तो वृषभाक्षो आहे, तर अत्यंत धर्मप्रिय असल्याने ‘वृषप्रिय:’ ! 

६४).       “ओम् अनिवर्ती निवृत्त्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिव :     ।
              श्रीवत्सवक्षा : श्रीवास : श्रीपति : श्रीमतांवर :        ॥६४॥” 

‘अनिवर्ती’ म्हणजे   दुष्टदमनार्थ  होणाऱ्या संग्रामातून  कधीही  माघर न घेणारा आणि धर्माला (सदाचरणाला ) कधीही विन्मुख न होणारा ! 
‘निवृत्तात्मा’ म्हणजे सर्वकाही करूनसावरूनही स्वत: नामानिराळा राहणारा अलिप्त, निवृत्त ! 
‘संक्षेपात्मा’ हा शब्द खरोखर गूढ आहे, कारण विश्वनिर्मिती ते प्रलय हे सर्व तो अतिसूक्ष्म रूपात राहून करतो, एखाद्या लहानशा बीजाप्रमाणे. मात्र तोच ‘अणूरणियन् महतोमहीयान्’    या उक्तीचा वारंवार प्रत्यय देत राहतो ! तो चैतन्याने कायम परिपूर्ण असल्याने स्वस्थ राहूच शकत नाही. 
‘क्षेमकृच्छिव :’ म्हणजे कायम क्षेम नि कल्याण इच्छिणारा नि करणारा मंगलमय शिव !  भगवंताच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, कारण तो भक्तवत्सल आहे. 
‘श्रीवास :’ नि ‘श्रीपती’ म्हणजे लक्ष्मींचा पति , कायम ऐश्वरंयांत लोळणारा असे नसून लक्ष्मी ज्याचेपाशी  नित्य वास करते असा ! असो. 
‘श्रीमतांवर :’ म्हणजे पराकोटीचा श्रीमान, ज्ञान नि ऐश्वर्यांत सर्वश्रेठ असा. 

६५).        “ओम् श्रीद : श्रीश : श्रीनिवास : श्रीनिधि : श्रीविभावन :     ।
                श्रीधर : श्रीकर : श्रेय :  श्रीमान् लोकत्रयाश्रय :            ॥६५॥” 

( हा एक अतिशय सुंदर नि मला खूप आवडणारा श्लोक आहे ! )
हा विश्वेश्वर विश्वाला धनधान्य, समृध्दी, संपत्ती पुरवणारा, साक्षात लक्ष्मींचा भर्ता, ज्ञानवंत, कृपावंत, ऐश्वर्यवान नव्हे ऐश्वर्याचे भांडार, सुख शांती समाधान देणारा, तीनही लोकांचे आश्रयस्थान असा हा श्रीमहाविष्णु आहे ! 

६६).        “ओम् स्वक्ष : स्वंSग : शतानन्दो नन्दिर् ज्योतिर् गणेशवर :     । 
                विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर् च्छिन्नसंशय :             ॥६६॥” 

विश्वंभर श्रीमहाविष्णु हा स्वयंभू, विश्वात्मा, ब्रह्मांडावर आत्मप्रभेने नजर ठेवणारा असा ‘स्वक्ष :’ आहे. (त्याचे नेत्र आत्मज्योतिस्वरूप आहेत ) खरेतर अखिल ब्रह्मांड हेच मुळी त्याचे तेजोमय अंग आहे ! असा हा ‘स्वंग :’ आहे. तो स्वत: केवळ आनंदरूप असल्याने त्या दिव्य आनंदाचा आस्वाद तो कायम घेत असतो. ‘नन्दिर्ज्योतिगणेश्वर’ म्हणजे सर्व ग्रह तारे नक्षत्रे इत्यादि गणांना प्रकाशमान करणारा. ‘विजितात्मा’ म्हणजे मनासकट सर्व चराचरावर नियंत्रण असलेला . ‘अविधेयात्मा’ म्हणजे ज्याला सिध्द करायला कोणतेही प्रमाण लागत नाही असा. 
षड्गुणैश्वर्यसंपन्न   असल्याने त्याची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमत राहते असा हा ‘सत्कीर्ति :’ होय. दृढनिश्चयी आणि कोणतीही शंका न येणारा हा ‘च्छिन्नसंशय :’ आहे. 

६७).        “ओम् उदीर्ण : सर्वतश्चक्षुर् अनीश : शाश्वत: स्थिर :          । 
                 भूशयो भूषणो भूतिर्विशोक : शोकनाशन :                 ॥६७॥” 

‘उदीर्ण’ म्हणजे सर्वश्रेठ. पुरूषसूक्तांत वर्णन केल्याप्रमाणे सर्व शिरें, हातपाय, नेत्र वगैरे सर्व त्या एकाच ‘पुरूषाचे’ असल्याने सर्वतचक्षु : असे म्हटले. ‘अनीश : ‘ म्हणजे स्वत: सर्वसत्ताधीश असल्याने इतर कुणाचीही त्याचेवर सत्ता नाही. हा शाश्वत नि स्थिर कसा हे आपण पूर्वी पाहिले आहेच. 
श्रीरामचंद्र वनवासात असताना आणि सीतेचा शोध घेताना सागरकिनारीं भूमीवर शयन केले म्हणून ‘भूशयो’, तर अखिल भरतखंडाचे दैदिप्यवान् ‘भूषण’ ! सीतेचे अपहरण झाल्यावर ‘सीते सीते’ असा शोक केला असला तरी मुळांत तीही केवळ ‘माया’ आहे हे तो जाणून होता, मात्र मानव देहात वास्तव्य असल्याने त्या ‘भूतिर्शोकनाशना’ला शोक करण्याचे सोंग करावे लागले ! 
वास्तविक केवळ स्मरण केल्याने, नाम घेतल्याने सर्व भय, चिंता, शोक, उद्वेग वगैरे नाहीशा होतात असा अनेकांचा अनुभव असेल ! 

क्रमश: 



Friday, October 29, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक साठ ते बासष्ट

 



६०).        “ओम् भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध:        ।
                 आदित्यो ज्योतिरादित्य: सहिष्णुर् गतिसत्तम:   ॥६०॥” 

संपूर्ण ऐश्वर्य, यश, कीर्ती, वैराग्य, औदार्य आणि धर्म या सहा गुणांना ‘भग’ असे म्हणतात आणि हे ज्याचेपाशीं त्याला ‘भगवान्’ ! मात्र प्रलयकाळीं हाच भगवंत  सर्व गुण टाकून गुणातीत होतो आणि सर्व ऐश्वर्यासकट चराचराचा नाश करतो. अशा वेळीं तो ‘भगहा’ असतो. तथापि, आपले परमानन्द स्वरूप तो सोडत नाही आणि त्या आनंदांत मश्गूल राहतो, म्हणून तो ‘भगवान् भगहानन्दी’ आहे ! 
याला ‘वनमाली’ हे नाव दिले कारण अनेकानेक सूर्यमालिकांची नि अनंत जीवयोनींच्या माळा तो आपल्या गळ्यात मिरवतो ! 
मात्र श्रीमद् शंकराचार्यांनी ‘वनमाली’ ची व्याख्या खूपच सुंदर नि मनोवेधक केली आहे. ते सांगतात की शब्द, स्पर्ष, रस, रूप, गंध या पाच तन्मात्रांत सत्वगुणांची भर घालून त्या भावपुष्पांची माळ भक्तमंडळी ईश्वराच्या गळ्यात घालतात, म्हणून तो ‘वनमाली’ ! ! 
श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम यांचे हत्त्यार होते ‘हल’ म्हणजे नांगर. खरेतर तेही ईश्वराचेच अंशावतार असल्याने ‘हलायुध:’ हे नाव श्रीमहाविष्णुंना लागू पडते. 

महातेजस्वी, कोटिसूर्यांचे तेज असलेला भगवंत सर्व चराचराला चैतन्यप्रकाश देतो म्हणून त्याला ‘आदित्यो’ म्हटले आहे. 

आपल्या देवघरातील समयीची किंवा निरांजनाची मंद ज्योत कितीतरी शांती प्रदान करते नाही ? असा हा ‘ज्योतिरादित्य’ अखिल चराचराला ज्ञानप्रकाश देत विलक्षण शांती प्रदान करतो. 
विश्वातील सर्व व्यवहार नि शीतोष्णादि द्वंद्वें याचे ‘सहिष्णुते’ मुळे - सहनशक्तीमुळे- गतिशील राहतात.  ‘गतिसत्तम:’ म्हणजे विश्वव्यापार गतिमान ठेवणारा उत्तम पुरूष आहे असे मला वाटते. (सहज एक ओळ आठवली - ‘बहती नदियाहि साफ कहलाई’ !)


६१).       “ओम् सुधन्वा खण्डपरशुर् दारूणो द्रविणप्रद:        ।
               दिवि स्पृकसर्व दृग्व्यासो वाचस्पतिर् अयोनिज:   ॥६१॥”

‘सुधन्वा’ म्हणजे एक अतिसुंदर ‘शांर्गधनु’ नावाचे भगवंताचे धनुष्य धारण करणारा. परशुराम अवतारांत क्षत्रियांचे एकवीस वेळा खण्डण केले म्हणून याला ‘खण्डपरशु’ असे म्हटले. 
‘दुष्टांचे  निर्दालन    करताना तो अति कठोर म्हणजे ‘दारूण’ असतो, तर भक्तांसाठी तो लोण्यासारखा सहज पिघळणारा, द्रवणारा असा   द्रविणप्रद:’ आहे ! 
‘दिव’ म्हणजे स्वर्ग नि त्याचा निर्माता असा हा ‘दिवस्पृक’ होय. 
‘सर्वदृक्’ म्हणजे निर्मिलेल्या विश्वावर ‘कडी नजर’ ठेवणारा आणि ‘व्यासो’ ही परमोच्च ज्ञानाची मुद्रा किंवा पदवी आहे. (वेदव्यास किंवा बादरायण यांना विष्णुचा अवतार मानले जाते. त्यांनी वेदांना सुसूत्रपणे विभागले, अठरा पुराणे लिहिली आणि महाभरतासारख्या  सर्वंकश ग्रंथाची निर्मिती केली ) 
‘वाचस्पती’ म्हणजे चारही प्रकारच्या वाचेचा अधिपती. ‘वाक्’ म्हणजे वाचा. 
‘अयोनिज:’ म्हणजे गर्भवास न सोसता स्वयंभू प्रकट झालेला ! 

६२).      “ओम् त्रिसामा सामग: साम निर्वाणं भेषजं भिषक्.        ।
               संन्यसकृच्छम: शान्तो निष्ठा शान्ति: परायणम्.       ॥६२॥” 

खरोखर, ‘त्रिसामा सामग: साम’ हे पद या संपूर्ण श्लोकाचे हृदय म्हणता येईल, कारण त्रिसाम म्हणजे सामवेदातील तीन श्रुतींनी श्रीमहाविष्णुची स्तुती केली जाते. ‘सत्, चित्, आनंद हे श्रीविष्णुचे खरे स्वरूप आहे आणि म्हणून त्याचे वर्णन ‘सत्यं शिवं सुंदरम् असे गुणवर्णन आहे. हे शाश्वत परब्रह्म अंतिम सत्य आणि शिव म्हणजे कल्याणकारी, मंगलमय म्हणून सुंदर आहे ! वास्तविक कोणतेही सौंदर्य, मग ते निसर्गरम्य असो, संगीतातले सूर असोत, चित्रांमधली किमया असो वा शिल्पातली मोहकता , मनाला केवळ    निखळ  आनंदाची अनुभूती देत असते , आत्मसुखाचा विलक्षण प्रत्यय ! ‘वेदानां सामवेदोSहं’ असे भगवंत म्हणाले आहेतच की ! खरेतर श्रीमहाविष्णु हेच सामगायन करणारा ओंकार - ‘सामग:’ आहेत ! 
दु:खरहित, परमानंदस्वरूप ब्रह्म असा हा ‘निर्वाण’ आहे. इतकेच नव्हे तर संसारातील सर्व जीवांना  दु:खरहित, शांत, समाधानी करून मोक्षप्राप्ती करून देणारा ‘निर्वाण’ आहे ! 
जीवांना आपल्या स्व-स्वरूपात विलीन करून घेण्यासाठी त्याने गीतारूपी ज्ञान औषध म्हणून जगाला दिले, भवरोगावरील ते जालीम औषध ठरले ! असा हा ‘भेषज: भिषक्’ .   म्हणजे वैद्य - डॉक्टर आहे ! ! 

मोक्षप्राप्ती म्हणजे खरे तर सर्व संसार- प्रपंचा पासून सुटका. ती साधायला आधी वृत्तीने संन्यस्त व्हायला हवे ! आणि म्हणून भगवंताने संन्यासाश्रमाची योजना केली आणि कृतींत आणली. असा हा ‘संन्यासकृत्’ होय. 
प्रपंचातील त्रितापांनी पोळलेल्या जीवांना त्यांपासून शांत करणारा, त्रितापांचे शमन करणारा हा दयाळू ईश्वर ‘शांतो  निष्ठा शांति परायणम्’ आहे, प्रत्यक्ष शांतिस्वरूप आहे. अशा या प्रशांत परमेश्वराला शतश: वंदन ! 

क्रमश:


Thursday, October 28, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक पंचावन्न ते एकोणसाठ

 


५५).      “ओम् जीवो विनयितासाक्षी मुकुन्दोSमितविक्रम:        ।
              अम्भोनिधिर् अनन्तात्मा महोदधिशयोSन्कक:       ॥५५॥” 

परमतत्व ओंकार श्रीमहाविष्णु जसा सर्व विश्वात ‘विश्वात्मा’ म्हणून भरलेला आहे तसाच तो प्रत्येक शरीरांत ‘जीवात्मा’ म्हणून उपस्थित आहे, म्हणून ‘जीवो’ म्हटले आहे. सर्व जीवांत साक्षीरूपाने वास करणारा हा परमात्मा त्यांचे व्यवहार तपासून त्यांना परमपदाकडो अग्रेसर करणारा ‘विनयितासाक्षी’ होय. हा ईश्वर मुक्तिदाता असा ‘मुकुन्दो’ आहे. 
विश्वाची उत्पत्ती, स्थिती नि लय करणारा हा ईश्वर  असीमित पराक्रमी ‘अमितविक्रम:’ आहे. (वामन अवतारांत तीन पाऊलांत त्रिभुवन व्यापणारा ‘अमितविक्रम:) 
देवता, मानव, पितर नि असुर या चार प्रकारच्या योनींना ‘अम्भ’ अशी संज्ञा आहे. या चारही योनी श्रीमहाविष्णुच्या ठिकाणी नांदत असल्याने त्याला ‘अम्भोनिधी’ म्हटले आहे. 
संपूर्ण चराचरांत आत्मरूपाने वास करणारा हा ‘अनन्तात्मा’ आहे. 
प्रलयकालीं सर्व विश्वाला जलमय करून त्या महान जलाशयांत पिंपळपानावर शयन करणारा हा ‘महादधिशयो’ आहे ! 
वृक्षाची पाने, फुलें, फळें पिकल्यावर ती आपोआप गळून पडतात, तसे भूतमात्रांचा अंत करणारा हा ‘अन्तक’ आहे.

५६).       “ओम् अजो महार्ह स्वाभाव्यो जितमित्र: प्रमोदन:        ।
                आनन्दो नन्दनोनन्द: सत्यधर्मा त्रिविक्रम:           ॥५६॥”

 स्वत: अजन्मा असलेला श्रीमहाविष्णु विश्वाला जन्म देतो ! निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये अतिशय आनंदाने नि स्वाभाविकपणे प्रगटणारा हा ‘अजो स्वाभाव्यो’ आहे. 
‘महार्ह’ म्हणजे महान्, पूजनीय, वंदनीय.   आंतरिक षड्रिपु नि बाह्य अमित्र शत्रूंना जिंकणारा तो ‘जितामित्र:’ आहे ! 
‘प्रमोदन:’ म्हणजे साधुसज्जन, भक्त नि योगियांना प्रमुदित करणारा - आनंद आणि समाधान देणारा. 
छान्दोग्य उपनिषदांत याचे वर्णन ‘आनंदरूप’ असे आहे तर श्रुतिवचनांनुसार तो ‘आनंदमय’ आहे. खरेतर प्रत्येक जीव आनंदप्राप्ती साठी धडपडत असतो, मात्र ‘माये’च्या  कचाट्यांत   बिचारे नाशवंत संसारात गुरफटून राहतात ! वास्तविक प्रत्येकाचे मूळ स्वरूप केवळ आनंदमय असते, जे या आनंदरूप ईश्वराच्या प्रेरणेने पुन:साध्य आहे ! तो आनंदोनंद  सर्वांना ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग’ अनुभवण्यास उद्युक्त करो हीच मनोमन प्रार्थना ! 
‘सत्यधर्मा’ म्हणजे सत्याला धरून केलेला न्याय, तर ‘त्रिविक्रमा’ म्हणजे तीन पाऊलांत त्रिभुवन काबीज करणारा वामन अवतार. 

५७).        “ओम् महर्षी: कपिलाचार्य: कृतज्ञो मेदिनीपति:          ।
                त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाश्रुंग: कृतान्तकृत्.        ॥५७॥” 

सांख्यशास्त्र प्रणेते कपिलमुनी हे माझीच विभूती असल्याचे भगवंताने गीतेंत सांगितल्याचे आपल्याला माहीत आहे. विशुद्ध आत्मतत्वाचे ज्ञान म्हणजेच सांख्य हेही आपण जाणतो. 
आतां, कृत् म्हणजे हे विश्व नि ‘ज्ञ’ म्हणजे ते जाणणारा. भगवंताला या विश्वाची नसन् नस माहीत असल्याने त्याला ‘कृतज्ञो’ म्हटले, तर ‘मेदिनीपती’ म्हणजे पृथ्वीचा मालक-चालक-संपादक वगैरे सर्व काही ! 
‘त्रिपद’ म्हणजे तीन पाऊलांत त्रिभुवन सर करणारा आणि ‘त्रिदशाध्यक्षो’ म्हणजे साधकाच्या जागृती, निद्रा नि सुषुप्ती या तीनही अवस्थांचा साक्षी. (संसारात रममाण होणे ही निद्रा, त्यातील सुखदु:खांचा अनुभव ही स्वप्नावस्था, तर संसारांत खरा ‘राम’ नाही हे अंतर्मुख होत झालेले ज्ञान ती जागृती ! ! ) 
परमेश्वराच्या प्रथम अवताराला मत्स्यावतार म्हणतात, ज्याचे मस्तकावर विशाल शिंग असावे, म्हणून कदाचित् ‘महाशृंग:’ ! 
‘कृत्’ म्हणजे जगत हे मघां आपण पाहिले. कृतान्त: म्हणजे प्रलयकालीं होणारा त्याचा अंत ! ‘कृतांतकृत्’ म्हणजे जगाची निर्मिती नि लय देखील करणारा. दुसऱ्या अर्थाने काळाचाही कर्दनकाळ असेही म्हणता येईल ! 

५८).      “ओम् महावराहो गोविन्द: सुषेण: कनकांगदी         ।
              गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधर:           ॥५८॥” 

या श्लोकात ईश्वराच्या दशावतारातील वराह अवताराचा उल्लेख आहे. या ठिकाणी ‘गोविन्दो’ तील ‘गो’ हा शब्द वाणीवाचक घ्यावा - वेदान्तवाणीने जो जाणला जातो असा ! 
‘सुषेण:’ म्हणजे इंद्र, अग्नीदेव, वायुदेव इत्यादि शूर देवतांची भक्कम सेना उभारणारा ! 
‘कनकांगदी’ म्हणजे सुवर्णकांतीचा तेजस्वी. 
ब्रह्मांडाचे सर्व व्यवहार सूक्ष्म नि गुप्त स्वरूपात राहून चालविणारा हा ‘गुह्यो’ आहे. तो आपले कार्य गांभिर्याने पार पाडतो म्हणून ‘गंभीरो’. समर्थ म्हणतात - महाधीर गंभीर पुण्यप्रतापी - वगैरे ! 
मात्र त्याला ‘जाणणे’ हा गहन विषय आहे , म्हणून ‘गहनो’ ! 
‘गुप्तश्चक्र:’ म्हणजे प्रपंचाचे रहाटगाडगे गुप्तपणे व्यवस्थित फिरवणारा ‘गदाधर:’ श्रीविष्णु ! 

५९).       “ओम् वेधा: स्वांगोSजित: कृष्णो दृढसंकर्षणोSच्युत:      ।
                वरूणो वारूणो वृक्ष: पुष्कराक्षो महामना:                 ॥५९॥” 

‘वेधा:’ म्हणजे वेदज्ञानानुसार विश्वनिर्मिती आणि तिचे संचलन नि नियमन करणारा, तसेच जीवांच्या कर्मांनुसार त्यांना गती देणारा विधाता. 
विश्वातील कणाकणांत व्यापून  असल्याने विश्व हे त्याचेच अंग होते , म्हणून ‘स्वांSगो’ ! असे पहा, एखादी मुंगी अंगावर चढली तरी आपल्याला ते चटकन जाणवते. तसे विश्वांत जरासे खुट्ट वाजले तरी या विश्वात्म्याला तात्काळ कळते, विश्व त्याचे अंग असल्याने ! (म्हणूनच ईश्वरापासून काहीही लपविता येत नाही ! ! ) 
‘अजित;’ म्हणजे अजिंक्य.
‘कृष्णो’ नि ‘दृढ:’ यांचे अर्थ ेवेगळ्याने सांगणे आवश्यक नाही.
‘संकर्षणो’ म्हणजे स्वत:कडे आकर्षित करणारा, ओढून घेणारा आणि ‘अच्युत’ म्हणजे आपल्या सत्य-संकल्पा पासून कधीही च्युत किंवा न ढळणारा ! 
संध्यासमयीं आपल्या किरणांना आवरून घेणाऱ्या सूर्याला ‘वरूण’ म्हणतात (पहांटेच्याला ‘अरूण’ ! ) 
वरूण देवाचे सुपुत्र वसिष्ठ, म्हणून वारूणो, तर वृक्षाप्रमाणे अचल म्हणून वृक्ष:. (पहा - उर्ध्वमूल: अध:शाखा ! ) 
‘पुष्कराक्षो’ म्हणजे कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेला, तर ‘महामन:’ म्हणजे विश्वमन ! 

क्रमश:



 

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक चोपन्न

 

५४).        “ओम् सोमपोSमृतप: सोम: पुरूजित् पुरूसत्तम:             ।
                विनयो जय: सत्यसंधो दाशार्ह: सात्वतां पति:           ॥५४॥” 

सहसा सोमरसाचा उल्लेख एका विशिष्ट मद्याचे नाव म्हणून केला जातो. मात्र या श्लोकांत सोम-अमृत-पान अशी शब्दफोड करून ‘चंद्राच्या शीतल अमृतवर्षावाचे रसपान ‘ असा  अर्थ  करायला हवा. एऱ्हवीं “मांसाहारं सुरापानं” वर्ज्य असेल तर सोमरसपान म्हणजे मद्यपान कसे काय ग्राह्य धरता येईल ? खरेतर स्वत: नित्य परमानंदांत स्थिर असलेल्याला सोमरसाची आवश्यकताच कुठून असणार ? (सोमवल्लींचा रस वगैरे मला अजिबात पटत नाही कारण ही ‘विद्वान’ मंडळींची मखलाशी आहे असे माझे स्पष्ट मत आहे ! )
‘सोम:’ म्हणजे चंद्र. या आल्हादक विभूतीचे रूपाने पृथ्वीला शीतल किरणांनी तृप्त करणारा हा श्रीमहाविष्णु होय. याच्या विशिष्ट किरणांमुळे अनेक औषधी वनस्पतींचे पोषण होते हे मात्र सत्यवचन आहे. 
दुष्ट शक्ती नि प्रवृत्तींना जिंकणारा हा ‘पुरूजित पुरूसत्तम’ म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरूष आहे. 
‘विनयो’ हे नाव की विशेषण या बाबतींत मला थोडा संभ्रम आहे. मात्र एक बाब निश्चित की या विराट पुरूषाला अहंगंड नाही. तथापि, ‘अहं ब्रह्मास्मि’ असे म्हणणारा जगदीश्वर अगदीच अहंकारशून्य आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठरेल (खरेतर हे विधानच मुळांत धार्ट्याचे आहे ! ) 
(मंडळी ! एव्हाना आपण अर्धे अंतर चालून आले आहोत ; वास्तविक हा दुर्गम चढ चढण्याचे तुम्ही मला आजपर्यंत बळ दिलेत ! म्हणून अधूनमधून श्रमपरिहारार्थ अशी काही बाष्कळ बडबड करीत असलों तरी बालबुध्गी म्हणून तिकडे अवश्य दुर्लक्ष करावे ही विनंती ! ! असो. 
‘संधा’ म्हणजे संकल्प. नेहमीच ‘जय’ मिळवणाऱ्या भगवंताचे सर्व संकल्प सत्य असतात, शुद्ध असतात, कल्याणकारी नि मंगल असतात म्हणून त्याला ‘सत्यसंधो’ म्हटले. 
‘दाशार्ह’ कुळाचा वंशज दाशरथी श्रीराम ! तसेच   ‘सात्वत्’ ही वैष्णव आणि यादवांची एक शाखा (जातकुळी) होय असे कुठेतरी वाचलेले आठवले. मात्र अधिक पटणारे म्हणजे सात्विक जनांचे श्रद्धास्थान आणि त्यांना विशेषरूपाने सांभाळणारा स्वामी, असा हा ‘सात्वतांपति:’ आहे ! 

रहाळकर
पुणे 
२८ ऑक्टोबर २०२१








 

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक बावन त्रेपन

 


५२).       “ओम् गभस्तिनेमि: सत्वस्थ: सिंहो भूतमहेश्वर:          ।
                आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद् गुरू:            ॥५२॥” 

‘गभस्तिनेमि:’ हे केन्द्रस्थानी असलेल्या भगवंताचे सुंदर नाम आहे. गभस्ती म्हणजे सूर्य.   फुलांच्या पाकळ्यांचे मधोमध परागकणांचा गोल असतो तसा अनेक सूर्यमालिकांचे मध्यभागीं ओंकारस्वरूप भगवान श्रीमहाविष्णु नामक महातेजस्वी सूर्य आहे ज्याचे भोंवती सर्व ग्रह तारे नक्षत्रें फिरत असतात. हाच महातेजस्वी महाविष्णु आपली चैतन्यकिरणे पृथ्वीसह समग्र खगोलांवर पसरवीत असतो आणि ब्रह्मांडाचा कारभार नियमित नि गतिशीलतेने चालवतो ! मात्र ती चैतन्यकिरणे केवळ सात्विक अशी असल्याने ‘सत्वस्थ:’ असे म्हटले आहे. 
सिंह जसा पराक्रमी, शूर आणि राजलक्षणी असतो तसा हा महाविष्णु असल्याने त्याला ‘सिंहो’ असे म्हटले आहे.
पंचमहाभूतांपासून सगळ्या प्राणिमात्रांना निर्माण करून त्यांचा प्रतिपाळ करणारा हा ‘भूतमहेश्वर:’ आहे. 
सकल ब्रह्मांडाला सुव्यवस्थित चालविण्यासाठी त्याने अनेक देवीदेवतांची निर्मिती आणि योजना केली म्हणून तो ‘आदिदेवो महादेवो’ आहे ! आणि साहाजिकच त्यांचाही देव असा ‘देवेशो’ आहे, जो त्यांनाही ज्ञान नि ऐश्वर्याने परिपूर्ण करतो म्हणून त्याला ‘देवभृदगुरू:’ म्हटले. 

५३).      “ओम् उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य: पुरातन:         ।
               शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिण:       ॥५३॥” 

भगवन्त हा संसार-बंधनांच्या ‘परे’ म्हणजे पलीकडचा असा ‘उत्तरो’ आहे. आपण मागे पाहिले तसे ‘गो’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत - गाय, इंद्रियें यांचा स्वामी म्हणून ‘गोपती’, जो पृथ्वीला चैतन्य देत समृध्द करत असतो. मात्र विश्वकल्याणाचे कार्य तो बेमालूम असे गुप्तपणे -सट्ली- करत असल्याने हा परमेश्वर ‘गोप्तो’ होय. ज्ञानाने थोडाफार जाणता येणारा तो ‘ज्ञानगम्य’ आहे. 
तो अति पुरातन आहे, आदिदेव ! आणि प्राणिमात्रांच्या शरीरांत आत्मरूपाने राहून विश्वाचा उपभोग घेणारा हा ‘शरीरभूत भृद् भोक्ता’ आहे ! 
श्रीराम अवतारांत हनुमंताला विशेष दर्जा देणारा हा ‘कपीन्द्रो’ आहे आणि यज्ञांत दक्षिणारूपी भूमी प्रदान करणारा ‘भूरिदक्षिण:’ आहे ! 

क्रमश

Wednesday, October 27, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकोणपन्नास पन्नास एक्कावन

 


४९).       “ओम् सुव्रत सुमुख: सूक्ष्म: सुघोष: सुखद: सुहृत.      ।
                मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर् विदारण:              ॥४९॥” 

विश्वनाथ भगवंताने शरणांगतांना, भक्तांना, साधूसंतांना अभयदान देण्याचे म्हणजेच भयमुक्त करण्याचे (जरा-व्याधी-मृत्यूभय) जणू व्रत घेतले आहे आणि ते दक्षतेने पालन करणारा हा ‘सुव्रत:’ आहे. त्याचे ‘मुखदर्शन’ देखील अतीव सुख नि आनंदायक असल्याने तो ‘सुमुख:’ होय. तो सूक्ष्मांतला सूक्ष्म असल्याने ‘सूक्ष्म:’ आहे, तर ओंकारस्वरूपच असल्याने मेघगर्जनेसारखा ‘सुघोष:’ आहे ! खरेतर ओंकारांत संगीताचे सातही सूर अनुस्यूत आहेत म्हणून ते कायम कर्णमधुर असतात यांत शंका नाही. सर्व वेदऋचा गेय असल्याने त्यांतील आरोह-अवरोह जाणत्या कानांना अतिशय सुखकर असावेत. (सुखद: सुहृद म्हणजे हृदयाला आनंद देणारे ) असो. 
सुमुख: ,सुघोष: , सुहृद असे मोहून टाकणारे असल्याने   तो ‘मनोहर’ आहे यांत नवल ते काय ? 
‘जितक्रोधो’ म्हणजे क्रोधावर नियंत्रण असलेला. क्रोध आला तरी तो संयमित करता आला पाहिजे, तो तात्पुरता - त्या क्षणाच्या गरजेनुरूपच असावा, अनियंत्रित नसावा. 
अत्यंत सामर्थ्यवान् असल्याने त्याला ‘वीरबाहू’ म्हटले तर दुष्ट दुर्जनांच नायनाट करणारा तो ‘वीरबाहु विदारण:’ आहे ! 

५०).      “ओम् स्वापन: स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत्.        ।
              वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भ: धनेश्वर:                   ॥५०॥” 

श्री महाविष्णु हा सर्व प्राणिमात्रांना मायेंत गुंतविणारा, अज्ञान-निद्रेंत झोपविणारा असा ‘स्वापन:’ आहे. (स्वाप् म्हणजे निद्रा, सुषुप्ती, ग्लानी किंवा मरगळ ! ) 
‘स्ववशो’ म्हणजे स्वत:वर पूर्ण नियंत्रण असलेला नि सर्वव्यापक असल्याने ‘व्यापी’. ‘नैकात्मा’ म्हणजे अनेक रूपें धारण करणारा - विभूतियोग पहावा. (वास्तविक त्याला अनेक रूपें ‘धारण’ करावी लागतच नाहीत कारण तो सगळीकडे आत्मरूपाने आहेच आहे) 
‘नैककर्मकृत्’ म्हणजे त्या त्या ‘अविष्कारांनुरूप’ कर्में करणारा. 
अवघें विश्व त्याचेच ठिकाणी नांदत असल्याने, वसत असल्याने त्याला ‘वत्सरो’ म्हटले आणि सर्व जीवसृष्टीवर माय-पित्याप्रमाणे वात्सल्याची पांखर घालणारा हा ‘वत्सलो’ आहे. शिवाय हे विश्व त्याचेच बालक म्हणजे वत्स असल्याने ‘वत्सी’ म्हटले ! 
ब्रह्मांडातील सर्व ऐश्वर्य, संपत्तीवर केवळ त्याचा मालकीहक्क असल्याने तो ‘रत्नगर्भो धनेश्वर:’ आहे ! 

५१).       “ओम् धर्मगुप्    धर्मकृद् धर्मी सत् असत् अक्षरम्  क्षरम्.     ।
              अविज्ञाता सहस्त्रांशु विधाता कृतलक्षणम्.                ॥५१॥” 

‘’धर्मगुप्” म्हणजे धर्माचे रक्षण करणारा, तर नीतिनियमांची बंधने घालून देणाऱ्या धर्माला निर्माण करणारा तो ‘धर्मकृत्’ आहे. शिवाय सर्व धर्मांचा मूलाधार  असा हा ‘धर्मी’ आहे. (धर्म या संकल्पनेचे पुनःश्च एकदा सिंहावलोकन करूंया. सर्वसाधारण निरनिराळ्या उपासना पध्दतींना हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई, ज्यू वगैरे धर्म हे नाव असले तरी धर्म हा शब्द अतिशय व्यापक आहे हे ध्यानांत ठेवणे गरजेचे आहे. धर्म म्हणजे सदाचरण. धर्म म्हणजे कर्तव्यनिष्ठा. धर्म म्हणजे केवळ मानवजातच नव्हे तर सर्व सृष्टीचे प्रेमादर पूर्वक संगोपन, सृजन, सांभाळ करणे होय. म्हणूनच राजधर्म, राष्ट्रधर्म, पुत्रधर्म, पतिधर्म (नि पतिव्रताधर्म), मैत्रधर्म, वगैरे अनेक पैलू सांगता येतात. मुळांत ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या हे विधान किंवा हे विश्वचि माझे घर ही उक्ती धर्माचे द्योतक आहे. धर्म या शब्दावर स्वामी विवेकानंद यांचे उद्बोधन फार मौलिक आहे, ते मुळापासून आत्मसात केले पाहिजे. असो ! 
सत् असत्, क्षर अक्षर यांवर माझ्यापेक्षा तुम्ही अधिक जाणतां याची मला नम्र जाणीव आहे ! 
मायेने, अविद्येने झाकोळलेला जीव विज्ञाता असून आत्मरूपाने राहणारा विधाता हा अविज्ञाता होय हे विधान कदाचित् शब्दांचा खेळ असेल. 
‘सहस्त्रांशु’ म्हणजे अनेकानेक सूर्यमालिकांनाही प्रकाशमान करणारा अंशुमान महातेजस्वी सूर्य हे श्रीमहाविष्णुचे नाम आहे. 
‘कृतलक्षण’ म्हणजे नित्यसिध्द केवळ चैतन्यरूप, किंवा आपल्या वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह मिरविणारा असाही करता येईल. 
अशा त्या ज्योतिर्मय महातेजाला साष्टांग दंडवत् ! 

क्रमश

Tuesday, October 26, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस

 


४५).       “ओम् ऋतु: सुदर्शन: काल: परमेष्ठी परिग्रह:          ।
                उग्र: संवत्सरो दक्षो विश्राम: विश्वदक्षिण:        ॥४५॥”

ऋतूंचा निर्माता श्रीविष्णु ‘सुदर्शनीय’ म्हणजे ज्याचे दर्शनाने निखळ आनंद मिळतो असा. ‘काल:’ म्हणजे काळाची निर्मिती आणि त्यावर पूर्ण हुकुमत असलेला. ‘परमेष्ठी’ म्हणजे पुनरपि जननम् पुनरपि मरणम् हे दुष्ट चक्र थोपविण्यासाठी ज्याची आराधना करावी असा परमश्रेष्ठ ईश्वर ! 
‘परिग्रह’ या शब्दाचा दान घेणे असा अर्थ असला तरी खरेतर ‘पत्रं पुष्पं फलं तोयं’ आनंदाने स्वीकारणारा, नव्हे त्याची भक्तांकडून चातकासारखी वाट पाहणारा ! 
विश्वनिर्मिती बरोबरच तिचा कठोरपणे लय करणारा म्हणून ‘उग्र:’ म्हटले असले तरी नवनिर्मितीसाठी जीर्ण वस्तु टाकून दिल्याशिवाय ते कसे घडावे ? अखेर जुन्या वृक्षातूनच तर नवीन बीज मिळते ना. 
युगांमागून युगें अत्यंत काटेकोरपणे नि दक्षतेने ब्रह्मांडाचा कारभार पाहणारा हा ‘संवत्सरो दक्षो’ आहे, तर प्रत्येकाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमानंददायक विश्रांतिस्थान देखील तोच एकमेव आहे. 
(विश्वदक्षिण:’ चा अर्थ मला उमगला नाही - क्षमस्व ! ) 

४६).       “ओम् विस्तार: स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम्          ।
                अर्थोSनर्थो महाकोशो महाभोगो महाधन:             ॥४६॥” 

ओंकार-स्वरूप श्रीमहाविष्णुने हे स्थावर विश्वकमळ फुलवले नि त्याचा विस्तारही केला ; शिवाय अखिल चराचराचा तो स्थिर आधार म्हणजे ‘स्थाणु:’  आहे. 
परमेश्वराच्या ‘अस्तित्वाचे’ वेगळ्याने प्रमाण देण्याची आवश्यकता नाही कारण तो स्वत:च त्याचे प्रमाण आहे, जे आपल्याला विश्वदर्शनाने सहज दृग्गोचर होते. 
या विश्ववृक्षाचे ओंकाररूप ‘बीज’ अव्यय म्हणजे कधीच नष्ट न होणारे आहे. 
संतसज्जनांच्या सुयोग्य कामना पूर्ण करणारा हा पूर्णकाम ‘अर्थो’ आहे, तर स्वत: अनासक्त , संतुष्ट असल्याने बहुधा ‘अनर्थो’ म्हटले असावे ! 
‘महाकोशो’ म्हणजे मानवाच्या पंचकोशांच्याबी पलीकडचा परमानंदरूप महाकोशो. 
अगदी साध्या साध्या गोष्टी घडल्यावर आपण अनंदाने हुरळून जात असतो नि तो आनंद पुन:पुन्हा उपभोगत राहतो. इथे तर वारंवार केलेल्या विश्वनिर्मितीचा आनंद आहे आणि तो भोगणारा महाविष्णु ‘महाभोगो’ आहे ! आणि त्या विश्वाच्या संपूर्ण ऐश्वर्याचा तो एकुलता एक ‘महाधन:’ आहे ! 

४७).       “ओम् अनिर्विण्ण: स्थविष्ठोSभूर् धर्मयूपो महामख:        । 
                नक्षत्रनेमिर् नक्षत्री क्षम: क्षाम: समीहन:                    ॥४७॥” 

अनिर्विण्ण म्हणजे कधीही विचलित न होणारा, उद्विग्न नसणारा निर्मळ मनाचा. स्थविष्ट म्हणजे स्थूल, अति विशाल, विराट आणि भूर् म्हणजे भूमी. खरेतर ‘अभू’ चा अर्थ होतो ‘स्वयंभू’ -स्वत:हून उद्भवलेला. 
विश्वनिर्मिती हाच एक मोठा यज्ञ असल्याने त्याला ‘महामख:’ म्हटले, तर ‘धर्मयूप’ म्हणजे धर्मरूपी यज्ञातील आधारस्तंभ होय. 
नक्षत्रनेमी म्हणजे सर्व खगोलांवर नियंत्रण ठेवणारा आणि त्यांतही आत्मरूपाने निवास करणारा ‘नक्षत्री’ आहे. 
‘क्षम:’ म्हणजे क्षमता असलेला. विश्वाचा कारभार व्यवस्थित चालवण्याती क्षमता असलेला, तर ‘क्षाम:’ म्हणजे विश्वाचा लय केल्यावरही स्वत: शांत, क्षेम आणि स्वस्थ राहणारा असा क्षाम: ! 
‘समीहन:’ म्हणजे जीवांच्या कर्मांनुसार त्यांना ईप्सित फल देणारा, सदगती देऊन मोक्षाप्रत नेणारा. 

४८).       “ओम् यज्ञ इज्यो महेज्यश्च: क्रतु: स्त्री सतांगति:            ।
              सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्.            ॥४८॥” 

विश्वनिर्मिती हा जर एक यज्ञ असेल तर श्रीमहाविष्णुच सर्वेसर्वा असल्याने तेही यज्ञच होत. ‘इज्यो’ म्हणजे इष्टदैवत आणि स्वत:च सर्वकाही असल्याने इष्टदैवत देखील तोच ! ‘महेज्य’ म्हणजे  सर्वश्रेष्ठ, परमइष्ट, म्हणजेही पुन्हा तोच की ! ! 
‘क्रतु:’ म्हणजे यज्ञ करणारा नि ‘सत्रं’ म्हणजे रक्षण करणारा. ‘सतांगति’ म्हणजे संतसज्जनांना उत्कृष्ट अशी परमगती प्रदान करणारा. सर्वांतर्यामी असल्याने तो ‘सर्वदर्शी’ आहे, तर यंत्र तत्र सर्वत्र असूनही पद्मपत्राप्रमाणे अलिप्त राहणारा  तो ‘विमुक्तात्मा’ आहे ! 
स्वत: विश्वात्मा असल्याने तो सर्वज्ञ आहे, त्याचप्रमाणे पूर्ण ब्रह्मज्ञानी असल्याने ‘ज्ञानमुत्तमम्’ तर आहेच आहे ! 

क्रमश: 


Monday, October 25, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक त्रेचाळीस चव्वेचाळीस

 


४३).     “ओम् रामो विराजो विरतो मार्गो नेयो नयोSनय:       ।
              वीर: शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तम:           ॥४३॥” 

योगी ज्याचे ठिकाणी रममाण होतात तो ‘राम’ होय अशी राम या शब्दाची व्याख्या आहे. -“रमन्ते यत्र: योगिन: सह: राम: विराम:” ॥ तसेच ‘राम’ या शब्दात ओंकाराच्या तीनही मात्रा येतात. ‘र’ म्हणजे रममाण, म्हणजेच परब्रह्माशी संलग्न - एकरूप ! संपूर्ण विश्व नि त्यातील सर्व जीवांचे आनंदमय विश्रांतिस्थान असा हा ‘रामो’ होय. 

सर्वसामान्य जीव आनंदप्राप्ती साठी नेहमीच आसुसलेले असतात, मात्र आनंदाचा मूळ स्त्रोत शोधून काढायची त्यांना सवड नसते. केवळ संत सत्पुरूष, योगी, भक्त नि ज्ञानी त्याचे ठिकाणी रममाण होऊन विश्रांतीचा अनुभव घेतात, विराम पावतात. 
आपल्या परमानंदांत मग्न राहिल्याने त्याला मोहमाया किंवा विषयवासना छळत नाहीत, कारण तो निर्विकार, अलिप्त असतो - असा हा ‘विरतो’ (विषयांत ‘रत’ न होणारा म्हणून विरतो) ! 
श्रीकृष्णाने बंदीवान असलेल्या सोळा हजार कन्यांशी विवाह केला तो त्यांना बंदिवासातून सोडविण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतेही लांच्छन लागू नये म्हणून आणि गोपगोपींशी रासक्रिडा देखील विषयवासनेतून नव्हे तर निखळ परमानंदाचा अनुभव देण्यासाठी होती- हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. विषयवासना विसरून भक्तिमार्गावर अग्रेसर करणारा म्हणून श्रीमहाविष्णुला ‘विरजो’ किंवा ‘विरतो’ असे म्हटले आहे. 
परमार्थ मार्गावर अग्रेसर करणारा हा ‘मार्गो’ आहे, तर ‘नेयो’ म्हणजे नेता आहे. मात्र याला स्वत:ला कोणी नेता नसल्याने हा ‘अनय’ आहे ! ‘नय’ या शब्दाचा नेणे असाही अर्थ होतो. तो नेतो पण नेला जात नाही म्हणून ‘अनय:’ होय ! 
हा श्रेष्ठतम नेता ‘धर्मो’ म्हणजेच नीतिमत्तेचा खंदा पुरस्कर्ता आहे आणि विदुत्तम: म्हणजे ज्ञानियांत सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ ! ! 

४४).      “ओम् वैकुंठ: पुरूष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु:         ।
               हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुर् अधोक्षज:     ॥४४॥” 

‘वैकुंठ’ म्हणजे विविध प्रकारच्या गतींचा अवरोध. असे पहा, सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवंताने पंचमहाभूतें, तिन्ही गुण वगैरे एकत्र केले असले तरी त्यांतील प्रत्येकाचा गुणधर्म एकमेकांहून भिन्न आहेत, खरेतर विरोधी आहेत - पृथ्वीला अग्नी जाळतो, अग्नीला पाणी विझवते, पाण्याला वायू सुकवतो आणि वायू आकाशांत लुप्त होतो. त्रिगुणांचेही तसेच आहे.
मात्र यांतील प्रत्येकाच्या गुणांना कुंठित करून, योग्य त्या प्रमाणात एकमेकात मिसळून आणि त्या सर्वांवर कडक नियंत्रण ठेवून भगवंताने हे विश्व निर्माण केले आहे. म्हणून त्यालाच ‘वैकुंठ’ असे म्हटले जाते ! या सर्व निर्मितीच्या आधीपासूनच ‘तो’ अस्तित्वात होता आदिपुरूष म्हणून , सबब ‘पुरूष:’ अर्थात विश्वात्मा ! तो सर्वव्यापक तर आहेच. 
सर्व चराचराला चैतन्यतेज देत जीवंत ठेवणारा हा सर्वांचा ‘प्राण:’ आहे, ‘प्राणद:’ आहे. खरेतर ओंकार स्वरूपात तो यत्र तत्र सर्वत्र आहे - सागराच्या तळा शी नि पर्वतमाथ्यावर देखील ! म्हणूनच त्याला ‘प्रणव:’ असे म्हटले. 
प्रपंचरूपाने विस्तार पावणारा हा ‘पृथु’ घनदाट आहे. 
‘हिरण्यगर्भ’ चा अर्थ आपण आधी पाहिला आहेच.
‘अधोक्षज:’ म्हणजे अर्धेन्मिलित नेत्र असलेला तो योगियांचा योगी होय. 

क्रमश

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एक्केचाळीस बेचाळीस

 



४१).      “ओम् उद्भवो क्षोभणोदेव: श्रीगर्भ: परमेश्वर:         ।
               करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह:         ॥४१॥” 

निर्गुण निराकार परब्रह्मातून श्रीमहाविष्णु  स्वयंभू रित्या विश्वनिर्मितीचे निमित्ताने ‘उद्भवला’ ! प्रकृती-पुरूषातील अद्वैत मोडून गुणक्षोभिणी मायेला पुरूषाहून अलग करून तो विश्वनिर्मिती घडवून आणतो, म्हणून त्याला ‘क्षोभणो’ हे नामाभिधान ! खरेतर श्रीमहाविष्णु असा एकच एक देवाघिदेव असून त्याचे उदरातून अष्टधा प्रकृती - पंचमहाभूतें नि त्रिगुण- उत्पन्न झाले म्हणून त्याला ‘श्रीगर्भ:’ म्हटले.
विश्वनिर्मितीचे ‘कारण’, ‘करणारा’ नि ‘कार्य’ हे सर्व काही तोच आहे.
‘विकर्ता’ या शब्दाचे मी दोन प्रकारांनी विश्लेषण करीन . एकतर आपल्याला दिसत असलेली सृष्टिनिर्मिती आणि दुसरे न दिसणारी अतिसूक्ष्म अशी गहन सृष्टी. दुसऱ्या अर्थाने भातुकली प्रमाणे मांडलेला सर्व पसारा विस्कटून तिचा लय करणारा ! (पहा पटतंय् का ! ) 
त्याला खरेतर कोणीच यथार्थपणे जाणलेले नसल्याने ‘गहनो’, ‘गुह:’ वगैरे विशेषणें तंतोतंत लागू पडतात ! 

४२).        “ओम् व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रृव:        ।
                 परर्धि: परम: स्पष्ट: तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण:              ॥४२॥” 

शुध्द वेदज्ञानाचे आधारें हे विश्व ‘सुचारुपणे’ चालविणे हा या महाविष्णुचा ‘व्यवसाय’ आहे ! या विश्वातील प्राण्यांना चार प्रकारें निर्माण करणे (अण्डज, स्वेदज, उद्भिज, जारज) , मनुष्य योनीला चार वर्णांत विभाजन करणे (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) आणि माणसाला जीवनात चार प्रकारचे आश्रम वाटून देणे -(ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास) अशी समाज व्यवस्था लावून देणारा श्रीमहाविष्णु हा उत्तम ‘व्यवस्थापक, म्यानेजर असा ‘व्यवस्थापन:’ आहे ! 
त्याला ‘संस्खान:’ म्हटले कारण तो खरोखरच एक ‘इन्स्टिट्यूशन’ आहे, जी सर्व सृष्टी निर्माण करते नि आपल्यातच पुन्हा सूक्ष्मरूपांत सामावून घेते ! 
प्रत्येकाला त्याचे कर्मानुसार ‘स्थान’ देणारा (किंवा दाखवणारा !) हा ‘स्थानदो’ आहे तर ‘धृव’ म्हणजे स्वत: सुस्थिर आहे. वास्तविक सर्व सूर्यमालिका नि अंतरिक्षातील सर्व खगोल आपापल्या ठिकाणी स्थिर ठेवणारा हा ‘स्थानदो धृव:’ आहे. (जे लहानपणा पासून आकाशांत सप्तर्षी पाहात आलेत त्यांना त्या सप्तर्षींचा क्रम बदललेला कधी जाणवलाय का, किंवा सूर्य कधी पश्चिमेस ‘उगवलाय’ काय ? ! ) 
श्रीमहाविष्णुचे ऐश्वर्य, कीर्ती, समृध्दी आणि श्रेष्ठत्व सतत   वृध्दिंगत होत असल्याने ‘परर्धि:’ म्हटले, तर परमज्ञानी अत्युच्च असा हा ‘परमस्पष्ट:’ आहे - सेल्फ एव्हिडंट ! 
‘तुष्ट, पुष्ट नि शुभेक्षण अर्थात मंगलमय कल्याणकारी अमृतमय अक्ष म्हणजे नेत्र असलेला. 

क्रमश

Friday, October 22, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकोणचाळीस व चाळीस

 


३९).      “ओम् अतुल: शरभोभीम: समयज्ञो हरिर्हरि:           ।
               सर्वलक्षणलक्षणौ लक्ष्मीवान् समितिंजय :       ॥३९॥” 

‘अतुल: म्हणजे ज्याशी कुणाशी तुलना करता येत नाही असा. समर्थ रामदासांना प्रभु श्रीराम हे  महाधीर, पुण्यप्रतापी, गंभीर नि अतुलनीय वाटत. ‘शरभो’ म्हणजे मानवी शरीरात आत्मरूपाने वास करीत त्याला चैतन्यरूप ठेवणारा. केवळ मानवी शरीरच नव्हे तर अखिल चराचराला चैतन्यप्रकाश देणारा हा अतिविशाल, भीमकाय, सर्वव्यापक असा श्रीमहाविष्णु आहे. 
विश्वनिर्मितीचा अव्याहत यज्ञ चालवणारा तो ‘समयज्ञो’ आहे , जो सर्व चराचरावर समभावाने प्रेम करतो, त्यांचे कल्याण करतो. 
मनुष्यप्राण्यांच्या सर्व कर्मांचा हविर्द्रव्य म्हणून स्वीकार करणारा हा ईश्वर ‘हविर्हरि:’ आहे. भगवंताची सर्वच लक्षणें शुभंकर असल्याने तो ‘सर्वलक्षणलक्षणौ’ होय. 
असे पहा, आपण एखादी वास्तू, वाहन, इतकेच नव्हे तर गाय, कुत्रा वगैरे त्यांची शुभ लक्षणे पाहूनच खरेदी करतो ना, तसा हा परमेश्वर सर्व शुभ लक्षणांनी परिपूर्ण असतो. 
‘समिती’ या शब्दाचा अर्थ कुणीतरी युध्द असा सांगितला होता. सबब ‘समितिंजय:’ म्हणजे प्रत्येक युध्दांत केवळ जयच मिळवणारा असे म्हणायला हरकत नसावी ! 

४०).     “ओम् विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर: सह:            ।
              महीधरो महाभागो वेगवान अमिताशन:               ॥४०॥” 

अविनाशी असा श्रीमहाविष्णु ‘विक्षरो’ म्हणजे क्षररहित, कधीही न झिजणारा न तुटणारा केवळ चैतन्यस्वरूप आहे. तो पेटत्या अग्नीप्रमाणे तांबूस वर्णाचा, तप्त लोखंडासारखा (रोहितो-लोहितो) असा आहे. जीवमात्रांना परमानंद प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर करणारा हा ‘मार्गो’ आहे, तर अविरत विश्वनिर्मिती, स्थिती नि लय करणे हाच त्याचे खेळाचा मूळ ‘हेतु’ आहे ! 
‘दामोदर:’ चा अर्थ तिन्ही लोक आपल्या उदरात सामावून घेणारा असे म्हणता येईल ! (मला ‘लंबोदर’चा अर्थ माहीत आहे, कारण माझे तें टोपणनांव आहे ! ! ‘) क्षमस्व. 
‘सह:’ म्हणजे अति-सहनशील - तुमच्यासारखा ! 

क्रमश

 

श्री विष्णुसहस्त्रनाम श्लोक सदोतीस व अडोतीस

 



३७).      “ओम् अशोकस्तारण स्तार: शूर: शौरिर्जनेश्वर:       ।
               अनुकूल: शतावर्त: पद्मी पद्मनिभेक्षण:              ॥३७॥” 

क्षुधा, तृषा, जरा (वार्धक्य), शोक आणि मोह अशा शारीरिक ऊर्मिविरहित असा हा महाविष्णु ‘अशोक:’ आहे. संसार-सागर तारून नेणारा आणि जन्म-मृत्यूच्या भयापासून सोडविणारा ‘तारण’ नि तार: आहे ! (ज्या मंत्राला ओंकाराचे संपुट लावून उच्चारले जाते तो अधिक परिणामकारक नि शक्तिशाली ठरतो आणि त्याला तारक-मंत्र असे म्हणतात).  बाय द वे, ‘राम’ या शब्दांत ओंकार अनुस्यूत असल्याने त्रयोदशाक्षरी मंत्राला ओम् हे संपुट लावण्याची खरे तर आवश्यकता नाही ! 
श्रीमहाविष्णु महापराक्रमी असल्याने शूर तर आहेतच, पण रामकृष्णादि शूर कुळांत अवतार घेतल्याने ‘शूरजनेश्वर’ही आहेत. भक्त-साधू-साधकांसाठी तो कायम ‘अनुकूल’ तर असतोच, शिवाय धर्मरक्षणार्थ अनेकानेक अवतार धारण करणारा तो ‘शतावर्त’ही आहे. 
पद्म म्हणजे कमळ नि ते धारण करणारा तो पद्मी. (या शिवाय हे विश्वकमळ फुलवणारा म्हणूनही पद्मी ! ) पद्मनिभेक्षण म्हणजे कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेला हा महाविष्णु विश्वावर आपली अमृतमय दृष्टी ठेवून असतो ! 

३८).    “ओम् पद्मनाभो अरविन्दाक्ष: पद्मगर्भ: शरीरभृत.            ।
              महध्दिर्ऋध्दो वृध्दात्मा महाक्षो गरूडध्वज:        ॥३८॥” 

ज्याची नाभी कमळाप्रमाणे आहे तो पद्मनाभ असे ढोबळमानाने म्हणता येईल. वास्तविक तो   प्रत्येक जीवाचे  हृदय-कमळाच्या मध्यभागीं आत्मरूपाने वास करणारा आहे, म्हणून पद्मनाभ म्हटला पाहिजे ! त्याचे ‘अक्ष’ म्हणजे डोळे हे ‘अरविंदासारखे’ म्हणजे   सुंदर  कमळाप्रमाणे आहेत. 
प्रत्येकाच्या अंत:करणांत आत्मस्वरूपें वसत असल्याने तो ‘पद्मगर्भ:’ असून तेथेच त्याचे ध्यान केले जाते . 
वेळोवेळी वारंवार मनुष्य देहात अवतार धारण करणारा तो ‘शरीरभृत्’ आहे. त्याचे ऐश्वर्य कायम वृध्दिंगत  होणारे म्हणून ‘महर्ध्दिर् ऋध्दो’. 
सर्वांत वडील, आदिपुरूष असल्याने याला वृध्दात्मा म्हटले आहे. (वृध्द या शब्दाचा अर्थ आत्ताच नव्याने ध्यानी आला. वया बरोबरच ज्ञान, समत्व, अनुभव, क्षमाशीलता, फिलॅन्थ्रोपी किंवा लोक कल्याणासाठी काहीना काही उदात्त करत राहण्याची प्रेरणा किंवा इच्छाशक्ती या सर्व गुणांची आपोआप होत असलेली वृध्दी म्हणजेच वृध्दत्व ! आपल्यातील अनेक मंडळी याचा नित्य अनुभव घेत असतील अशी माझी श्रध्दा आहे. मात्र यांत ‘वय’ दुय्यम ठरते हे निर्विवाद ! ) 
‘महाक्षो’ नि ‘गरूडध्वज’ यांचे अर्थ सोपे आहेत - मसलन्, अखिल ब्रह्मांडावर ‘नजर’ ठेवणाऱ्याचे नेत्र किती मोठे असतील याची कल्पनाच केलेली बरी. पुन्हा, नेत्रांचे मोठेपण महत्वाचे नाही कारण आपण नाही का अर्धा इंची डोळ्यांनी दूरदूरवर पाहात ? ते मोठे म्हणण्यापेक्षा अतिविशाल म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल ! 
गरूडध्वज म्हणजे ज्याचे रथध्वजावर   गरूडाचे चिन्ह आहे असा. एकतर गरूड हे महाविष्णूचे वाहन आहे, नि दुसरे म्हणजे गरूडाचे दोन भक्कम पंख कर्म नि ज्ञान यांचे द्योतक आहेत. 
अशा या ज्ञानी कर्मयोग्याला शतश: वंदन ! 

क्रमश

Thursday, October 21, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक पस्तीस छत्तीस

 

Subject: श्री विष्णुसहस्रनाम श्लोक पस्तीस छत्तीस



३५).      “ओम् अच्युत: प्रथित: प्राण: प्राणदो वासवानुज:          ।
               अपांनिधिर् अनुष्ठानं अप्रमत्त: प्रतिष्ठेचा:           ॥३५॥” 

आपल्या परब्रह्मरूप स्वरूपा पासून कधीही न ढळणारा, स्वस्वरूपाहून च्युत न होणारा विकाररहित ‘अच्युत’ , शाश्वत आहेत श्रीमहाविष्णु. त्यांची कीर्ती ‘प्रथित:’ म्हणजे सुप्रसिध्द आहे. सर्व प्राणिमात्रांत आत्मरूपाने राहणारे ते ‘प्राण:’ असून त्यांना जीवंत ठेवणारे ‘प्राणदो’ आहेत. कश्यप आणि आदितीपुत्र वासवाचा बंधू असा हा वासवानुज आहे (? कथा ज्ञात नाही ! ) 
‘अपांनिधी’ म्हणजे जलभांडार, समुद्र !  जलचरांचे समुद्र जसे आश्रयस्थान तसे अखिल ब्रह्मांडाचे श्रीविष्णु अधिष्ठान होत.
‘अप्रमत्त:’ म्हणजे कधीही प्रमाद किंवा घोडचुका न करणारा, जसे जीवाला अचुक कर्मफल देण्यांत गफलत न करणारा ! आपल्या अशा न्यायप्रियतेमुळे आणि एकंदर गुणसमुच्चयांमुळे तो ‘प्रतिष्ठित’ आहे यांत नवल ते काय ! 

३६).       “ओम् स्कन्द: स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहन:         ।
                वासुदेवो ब्रुहद्भानुर् आदिदेव: पुरंदर:               ॥३६॥” 

‘स्कंद:’ चा   डिक्शनरी  अर्थ   आहे उडी घेणे, गमन करणे. मात्र एका विद्वान मित्राने सांगितलेला अर्ष होतो -   जल नि वायूचा पुरवठा करणारा. सर्वच प्राणिमात्रांना या दोहींची नितांत गरज असते. वास्तविक या दोन्हीविना जीवन अशक्य ठरते. पाणी आणि वायू अमृतरूपाने वहन करणारा म्हणूनही ‘स्कन्द:’ म्हणता येईल. ‘स्कन्दधर’ हा शब्दप्रयोग आपसूक समजण्यासारखा आहे ! 
‘धुर्यो’ म्हणजे धुरा वाहणारा आणि ‘वरदो वायुवाहन:’ म्हणजे सात प्रकारच्या वायूंचे वहन करीत प्राणदान करणारा. 
बृहदभानु म्हणजे महासूर्य आणि म्हणून त्याला ‘आदिदेव’ म्हटले आहे, तर पुरंदर म्हणजे एखाद्या भक्कम किल्लेतटाप्रमाणे संरक्षक. 
(बरीच बंडलबाजी केलीय् आज ! कृपया दुर्लक्ष करावे ! ! ) 
रहाळकर


 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक तेहेतीस चौतीस

 


३३).      “ओम् युगादिकृद् युगावर्तो नैकमायो महाशन:         ।
               अदृष्यो व्यक्तरूपश्च सहस्त्रजित् अनन्तजित्      ॥३३॥” 

श्री महाविष्णु युगप्रवर्तक, म्हणजे एकापाठोपाठ युगें निर्मिणारा युगादिकृद् आहे , तर त्या निर्मितीतही अनेकानेक आवर्तनें आहेत. आपल्या मायाशक्तीने अनेक रूपें धारण करणारा हा ‘नैकमायो’ आहे. प्रचंड भूक असल्याने त्याला महाशन: म्हटले, कारण प्रलयकालीं तो सर्व काही गिळंकृत करून टाकतो ! 
विश्वनिर्मिती, स्थिती नि लय करणारा तो कायम अदृष्य असतो तर अखिल ब्रह्मांड मूर्त स्वरूपात दाखवतांना तो ‘व्यक्त’ होत असतो ! सर्व चराचर त्याचेच व्यक्त रूप होय. 
युध्दांत सहस्त्रावधी शत्रूंना ठार करणारा तो सहस्त्रजित् आहे, तर अनन्त असुरांना जिं    कणारा अनन्तजित् आहे. 

३४).      “ओम् इष्टोSविशिष्ट:  शिष्टेष्ट: शिखंडी नहुषोवृष:       ।
               क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधर:                 ॥३४॥” 
परमानंद प्रदान करणारे श्रीमहाविष्णु सर्व मुमुक्षूंची इष्ट देवता आहेत, मात्र प्रत्येकाच्या अंत:करणांत आत्मरूपाने वसत असल्याने त्यांना ‘अविशिष्ट’ देखील म्हटले असावे. 
वास्तविक ‘शिष्ट’ म्हणजे ज्ञानी आणि भगवंताला शिष्टेष्ट म्हटले कारण तो शिष्टांचा म्हणजे पर्यायाने ज्ञानी मंडळींचे इष्ट होय ! 

‘शिखण्डी’ या शब्दाचा अर्थही मजेशीर आहे. ‘शिखंडी कलाप’ म्हणजे मस्तकावर मोरपीस मिरवणारा -जसे श्रीकृष्ण. (मोरपिसाचे वैशिष्ट्य असे की त्याचे स्पंदनांनी दुष्ट नि पैशाच्य शक्ती दूर जातात. तांत्रिक मांत्रिक  किंवा मुसलमान फकीर मोरपिसाचा कुंचा वापरतात हे आपण पाहिले असेल ! ) असो. 

‘नहू’ म्हणजे बांधणे - नहूष म्हणजे सर्व प्राणिमात्रांना मायेंत गुंतवून ठेवणारा, बांधून ठेवणारा. ‘वृष’ म्हणजे धर्म - अर्थात सदाचरण हे आपण या आधी पाहिले आहेच. वास्तविक धर्म म्हणजे वेगवेगळ्या उपासनी पध्दती आहेत त्या एकाच परमेश्वराकडे नेणाऱ्या, म्हणून धर्म हा शब्द संकुचित प्रवृत्त्ती न दर्शवितां एक व्यापक तत्व मानतो हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. 
‘क्रोधहा’ म्हणजे साधकाच्या अंत:करणातील क्रोधाचा नायनाट करणारा, तर ‘क्रोधकृतकर्का’ म्हणजे क्रोध उत्पन्न करणारा ! असे पहा, अन्यायाविरूध्द किंवा स्वैराचाराविरूध्द सात्विक संताप वा  क्रोध उत्पन्न होणे अपरिहार्य, नव्हे अनिवार्य असायला हवेच. अशावेळी क्रोध हा दुर्गुण न राहता सद्गुण मानला पाहिजे !  (खरेतर माणसातील षडरिपु एका अर्थीं माणसांसाठी आवश्यक आहेत प्रपंच चालविण्यासाठी. त्यांचा अतिरेक नसावा, मात्र ते नसतील तर माणूस भाजीपाल्यासारखा होऊन जाईल ना ! ) तेही असो . 
पुढे ‘विश्वबाहुर् महीधर:’ म्हटले. पुरूषसूक्तांत या महान भगवंताचे वर्णन येते नि त्यात सर्व मस्तकें, सर्व हातपाय वगैरे त्या एकाच विराट पुरूषाचे आहेत असे म्हटले. खरोखर सूर्यमालिकांसह सर्व चराचर या महाप्रभूच्या अनंत हस्तांनी पेलून धरले आहे, धारण केले आहे. महीधर मधील मही म्हणजे केवळ पृथ्वी नसून अंतराळांतील अख्खे खगोल, एवढे लक्षांत ठेवले की झाले ! (याला विंग्रजींत planetary harmony असे म्हणतात ! ) 
अशा या अदृष्य नि अचंभित करणाऱ्या प्रचंड शक्तिस्त्रोताला लाख लाख सलाम ! 

क्रमश: 



Wednesday, October 20, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक तीस एकतीस बत्तीस

 

३०).       “ओम् ओजस्तेजो द्युतिधर: प्रकाशात्मा प्रतापन:     ।
                 ऋध्द: स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर् भास्कर द्युति:    ॥३०॥”

‘ओजस्तेजो’ म्हणजे तेज, ज्ञान, बल ,शौर्य आणि चैतन्य हा   गुण-समुच्चय.  श्री महाविष्णूंत हे सर्व गुण प्रामुख्याने आढळतात. आपण सहज बोलतानाही एखाद्या वक्त्याला ओजस्वी भाषण करणारा असे वाखाणतो. ‘द्युतिधर’ म्हणजे दैदिप्यमान, सुवर्ण-कांती असलेला असा हा ‘ओजस्तेजो द्युतिधर’ आहे. बलवंताचें बळ, तेजस्व्यांचें तेज, वेदांतील ज्ञान, शूरांचे शौर्य हे सर्व मीच आहे असे भगवंताने नि:संदिग्धपणे सांगितले आहे. 
अखिल ब्रह्मांडाला चैतन्यप्रकाश, ऊर्जा देणारा हा ‘प्रकाशात्मा आहे, तर अगणित सूर्यमालिकांना तप्त करणारा हा ‘प्रतापन:’ आहे ! षडैश्वर्यांचा धनी असा हा समृध्द  असल्याने त्याला ‘ऋध्द’ म्हटले आहे. 
निर्गुण, निराकार, शाश्वत, सर्वव्यापी श्रीमहाविष्णुचे प्रथम साकार अक्षररूप ओंकार हा चैतन्यमय स्पष्टाक्षर मंत्र असून तेच विश्वनिर्मितीचेही बीज आहे. 
सूर्य, चंद्र, नक्षत्रें, ग्रह इत्यादि सर्वांना तेजप्रकाश देणारा हा ‘मंत्रांश्चंद्राशुभास्कर द्युति:’ होय. त्यांचे तेज वृध्दिंगत करणारा ! 

३१).      “ओम् अमृतांशुद्भवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर:        ।
              औषधं जगत: सेतु: सत्य धर्मपराक्रम;             ॥३१॥” 

समुद्रमंथनाचे वेळीं अमृतासह चंद्राला उत्पन्न करणारा श्रीमहाविष्णु अतिशय तेज:पुंज, प्रकाशमान परमेश्वर आहे. सुरेश्वर म्हणजे देवांचाही देव आणि संसारातील सर्व व्याधी-उपाधी मिटवणारा औषधरूपी ईश्वर आहे. भवसागर निर्वेधपणे तरून जाण्यासाठी लागणारे सेतु म्हणजे सेवाव्रत, नामस्मरण, शरणागती इत्यादि साधने होत. (शशबिंदु म्हणजे चंद्रमा)

३२).    ओम् भूतभव्य भवन्नाथ: पवन: पावनोनल:         ।
           कामहा कामकृत् कान्त: काम: कामप्रद: प्रभु:    ॥३२॥” 

चराचरातील सर्न जीवमात्रांचे भूत, वर्तमान नि भविष्य यांचा स्वामी असल्याने ‘भूतभव्य भवन्नाथ:’ म्हटले आहे. पवन: म्हणजे वायूप्रमाणे चालना देणारा नि पावनो म्हणजे शुध्द करणारा ‘अनल:’ - अग्निरूप ! 
साधकाच्या मनातील कामना, आसक्ती, विषयवासना नाहीशा करणारा हा ‘कामहा’ आहे, तर त्यांच्या सात्विक इच्छा पुरवून त्यांना सदाचरणास प्रवृत्त करणारा हा ‘कामकृत्’ आहे. कांकिमान् म्हणजे अत्यंत तेजस्वी, सुंदर, विलोभनीय ईश्वर आहे. ज्याची प्राप्त व्हावी म्हणून ऋषिमुनी, साधक, इतकेच नव्हे तर देवही वांच्छा करतात असा हा ‘काम:’ नि कामप्रद: आहे ! 

क्रमश: 


 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक अठ्ठावीस एकोणतीस

 

२८).      ओम् वृषाही वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदर:      ।
             वर्धनो वर्धमानश्च विविक्त: श्रृतिसागर:      ॥२८॥

‘वृष’ म्हणजे धर्म नि ‘अह’ म्हणजे दिवस (पहा - अहर्निश=दिवसरात्र ! ) .
द्बादश म्हणजे बारा  दिवस चालणाऱ्या यज्ञाला ‘वृषाह’ म्हणतात आणि यज्ञपुरूष असलेल्या भगवंताला ‘वृषाही’ म्हणतात ! 
याज्ञ्काच्या मनोवाच्छित कामना पुरवणारा हा ‘वृषभो’ होय. साधकांसाठी तो धर्मरूपी शिडी अर्थात ‘पर्व’ आहे म्हणून त्याला ‘वृषपर्वा’ म्हटले आहे. अखिल चराचराला आपल्या उदरांत सामावून घेणारा हा ‘वृशोदर’ आहे, किंवा सर्व विश्वच याचे उदरातून प्रसवले असल्याने ही याला वृषोदर म्हटले असेल. 
‘धर्म’ या शब्दाचा मुळांत अर्थ आहे नीतिपूर्वक सदाचरण आणि त्याचीच सदोदित वृध्दी करण्याची शिकवण देणारा म्हणून ‘वर्धनो’ म्हटले. ‘वर्धमान’ या शब्दाचा अर्थही वृध्दिंगत करणे असाच आहे. 
‘विविक्त:’ म्हणजे कमलपत्राप्रमाणे पाण्यांत राहूनही अलिप्त असणारा असा हा श्रीमहाविष्णु प्रपंचाच्या रामरगाड्या पासून स्वत: अलिप्त असतो ! 
‘श्रुतिसागर’ या शब्दाचा अर्थ सांगण्याती आवश्यकता नाही, श्रुती म्हणजेच वेद एवढे ध्यानीं ठेवणे पुरेसे आहे ! 

२९).    “ओम् सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुधोवसु:          ।
             नैकरूपो बृहद्रूप: शिपिविष्ट: प्रकाशन:            ॥२९॥” 

भगवंताच्या कर्म-ज्ञानरूपी भुजा अतिशय बलवान नि सुंदर आहेत म्हणून त्याला ‘सुभुज:’ म्हटले. ‘दुर्धरो’ म्हणजे सहजासहजी हातीं न येणारा ! किंवा, सर्व चराचराला धारण करीत असूनही स्वत:साठी कोणताही आधार न लागणारा असेही म्हणता येईल ! ‘वाग्मी’ म्हणजे उत्तम वक्ता. अर्जुनासारख्या हताश निराश झालेल्यांना आपल्या उत्कृष्ठ वक्तृत्वाने पुनःश्च कार्यप्रवण करणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे ! ‘महेन्द्रो’ म्हणजे इंद्रासकट सर्व देवांचाही देव !
‘वसु’ म्हणजे धन. पृथ्वीला वसुधा म्हणतात कारण धनधान्य,फलफूवें, खनिजें, हिरेमाणकें वगैरे धनानी ती परिपूर्ण असते आणि तिला तसे प्रदान करणाऱ्या भगवंताला ‘वसुदो’ म्हटले. 
‘नैकरूपो’ म्हणजे अनेकानेक रूपें धारण करणारा. विभूतियोगांत जरी मोजक्या पंचाहत्तर विभूती भगवंताने उधृत केल्या असल्या तरी सर्व रूपें नि नामें त्याचीच होत. All Names and Forms are His only ! असो . 
‘बृहद्रूप’ म्हणजे नामरूपें धारण करूनही त्या पलीकडचा, केवळ सूक्ष्म ब्रह्मरूप ! 
(बृहद् म्हणजे पलीकडचा) 
‘शिपि’ म्हणजे किरणें - ज्ञानप्रकाश, चैतन्यप्रकाशाची ‘विशिष्ट’ किरणें प्रकाशित करणारा ! (शिपिविष्ट: प्रकाशन: ! ) 

क्रमश 



Monday, October 18, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक सव्वीस व सत्तावीस

 

२६).     “ओम् सुप्रसाद: प्रसन्नात्मा विश्व धृक् विश्वभुग्विभु:    ।
              सत्कर्ता सत्कृत: साधुर्जन्हुर्नारायणो नर:                ॥२६॥” 
सर्वांवर कृपेचा नि प्रेमाचा वर्षाव करणारा हा ‘सुप्रसाद’ असून कायम प्रसन्न असणारा ‘प्रसन्नात्मा’ देखील आहे. अखिल ब्रह्मांडाला धारण करणारा तो ‘विश्वधृक्’ आहे तर पित्याप्रमाणे विश्वाचे संगोपन करणारा ‘विश्वभुग्’ आहे. पृथ्वीतलावर अनेकानेक अवतार घेऊन धर्मरक्षणार्थ नि साधूसज्जनांचे उध्दरणासाठी येणारा ‘विभु:’ आहे. केवळ ‘सत्कर्ता’च असल्याने त्याची सर्वत्र पूजा केली जाते, सत्कार केला जातो - असा हा ‘सत्कृत:’ आहे ! 
साधूप्रमाणे सर्वांचे कल्याण इच्छिणारा महाप्रलय काळीं सर्व विश्वाला आपल्यांत सामावून घेणारा हा ‘जन्हु:’ आहे तर मानव रूपांत अवतार घेणारा ‘नर-नारायण’ आहे ! 

२७).     “ओम् असंख्येयोS प्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि:      ।
               सिध्दार्थ: सिध्दसंकल्प: सिध्दिद: सिध्दिसाधन:         ॥२७॥” 
या विश्वरूपाचे ज्ञान आणि व्यापकत्व कोणत्याही फूटपट्टीने वा संख्येने मोजता येत नसल्याने त्याला ‘असंख्येयो’ म्हटले. त्याचे कोणतेही प्रमाण किंवा उपमेने वर्णन करता येत नाही - असा ‘अप्रमेयो’ नामरूपाच्या   पलीकडचा चिन्मय आहे ! आणि म्हणून ‘विशिष्ट’ आहे. 
शिष म्हणजे शासन आणि पंचमहाभूतांसह सर्व चराचरावर शासन करणारा ‘शिष्टकृत्’ आहे. अत्यंत पवित्र नि तेज:पुंज असल्याने ‘शुचि:’ तर आहेच पण जगत् कल्याणार्थ केलेले सर्व संकल्प ‘सत्यसंकल्प’ ठरतात ! आणि म्हणून ते सिध्दीस पोहोचतात. 
साधकाच्या अधिकारानुरूप फल देणारा हा ‘सिध्दिद:’ आहे. 
खरेतर सिध्दी आणि साधन वगैरे सर्व काही तोच तो तर आहे ! ! 

क्रमश:




 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक तेवीस चोवीस पंचवीस



२३).      “ओम् गुरूर्गुरूत्तमो धाम-सत्य: सत्यपराक्रम:      ।
               निमिषोS निमिष: स्त्रग्वी वाचस्पतिर् उदारधी:  ॥२३॥” 

श्री महाविष्णु हे सर्व विद्यांचे अधिपती, ब्रह्मादिकांना देखील ब्रह्मविद्या प्रदान करणारे, स्वत:च वेदनिर्माते असल्याने सर्वांचे परात्पर गुरू , नव्हे सर्वोत्तम गुरू असून सर्व विद्यांचे धाम, म्हणजे आश्रयस्थान आहेत.  वेदज्ञान हे शाश्वत नि अंतिम असल्याने ‘सत्य’ आहे. 
स्वत: योगज्ञान -संपन्न असल्याने योग्याप्रमाणे त्यांचे नेत्र अर्धोन्मिलित असतात, म्हणून ‘निमिषोSनिमिष’ म्हटले. मात्र ‘अनिमिष’ म्हणजे डोळ्यांची उघडझाप न करतां आपण निर्मिलेल्या विश्वावर बारीक नजर ठेवणारा असे म्हणता येईल ! 
अनेकानेक सूर्यमालिकांना वैजयंतीप्रमाणे गळ्यात मिरवणारा हा ‘स्त्रग्वी’ आहे .
‘वाक्’ म्हणजे वाचा नि विद्या देखील आणि दोन्हींचा अधिपती म्हणून ‘वाचस्पती’ म्हटले. ‘उदारधी’ म्हणजे औदार्य, प्रेम, करूणा, दयाशीलता आणि क्षमाशीलता यांचा हा सागर होय ! 

२४).     “ओम् अग्रणीर्ग्रामणी: श्रीमान् न्यायो नेता समीरण:        ।
              सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्ष: सहस्त्रपात्.            ॥२४॥” 

मुमुक्षु साधकांना अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षाप्रत अग्रेसर करणारा हा अग्रणी, तर सर्व जीवमात्रांचे नेतृत्व करून त्यांना सदगती देणारा ग्रामणी होय. हे कार्य केवळ त्याचेच चैतन्यशक्तीने घडत असल्याने त्याला ‘अग्रणीर्ग्रामणी’ असे म्हटले नि ज्ञानैश्वर्यामुळे तो श्रीमान् तर आहेच आहे ! 
‘समीर’ म्हणजे वायू ; सर्व भूतमात्रें प्राणवायू शिवाय जगू शकत नसल्याने त्यांना यथेच्छ ऑक्सीजन पुरवणारा हा ‘समीरण:’ आहे ! तो न्याय आणि नीतिला सर्वोच्च प्राधान्याने देत असल्याने ‘न्यायो नेता’ आहे. 
तो सबस्त्रमूर्धा, सहस्त्राक्ष, सहस्त्रपात् आहे कारण सर्व प्राणिमात्रें त्याचीच आहेत - ‘पुरूषसूक्ता’च्या ऋचा याचे समर्थन करतील ! 

२५).     “ओम् आवर्तनो निवृतात्मा संवृत: संप्रमर्दन:      ।      
             अह: संवर्तको वन्हिर् अनिलो धरणीधर:      ॥२५॥” 

श्रीमहाविष्णुंचे महातेज  या चराचराची निर्मिती, स्थिती नि लय यांची दर चार युगांनी सतत आवर्तनें घडवून आणतो म्हणून ‘आवर्तनो’ म्हटले आहे. हे महातेज प्रचंड ऊर्जावान् असल्याने स्वस्थ किंवा स्तब्ध राहूच शकत नाही. मात्र या चैतन्यशाली महातेजाचा धनी असूनही स्वत: त्यांत गुंतत नाही, लिप्त होत नाही, तर साक्षीरूपाने तटस्थपणे हा सर्व खेळ खेळत खेळवत राहतो ! - असा हा ‘निवृतात्मा’ आहे ! आपल्याच योगमायेने स्वत:ला झाकून घेतल्यामुळे त्याला ‘संवृत:’ म्हटले आहे. 
सर्वसत्ताधीश असलेला हा महाविष्णु प्रलयकालीं अत्यंत रौद्र रूप धारण करून अखिल ब्रह्मांडाचा लय करणारा म्हणजे मर्दन करणारा हा ‘संप्रमर्दन:’ होतो. 
हे सर्व कार्य केवळ अचंभित करणारे, म्हणून ‘अह:’ म्हटले असावे ! ‘अह: संवर्तको’ . 
हा सर्वच काही असल्याने तोच अग्नी, तोच वायू, तोच धरणीधर, तोच हविर्द्रव्य, तोच यज्ञ, तोच आहुती, तोच पुरोडाश, सब कुछ केवल वही वह ! ! ! 

क्रमश: 





 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक बावीस

 

२२).     “ओम् अमृत्यु: सर्वदृक् सिंह: संधाता संधिमान् स्थिर:     ।
              अजो दुर्मर्षण: शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा.             ॥२२॥” 

ज्याचा कधीच मृत्यू होत नाही असा हा ‘अमृत्यु:’ आहे. वास्तविक तो विश्वनिर्मिती बरोबरच प्रलयकाळीं संपूर्ण विश्वाचा संहार करून त्याला सूक्ष्मरूपांत आपल्यात सामावून घेतो आणि कालांतराने (शून्यावकाशाने) पुन्हा नवीन विश्वाचे सृजन करतो, अशी लागोपाठ आवर्तनें   करूनही   तो स्वत: अमर्त्य राहतो ! 
सर्व विश्वाचे व्यवहार तो सूक्ष्मरूपांत राहून पाहात असतो आपल्या दिव्यदृष्टीने. याला ‘सर्वदृकसिंह:’ असे म्हणण्याचे कारण कदाचित सिंह जसा आपल्या सावजाचे शिकारीपूर्वी दुरून निरीक्षण करतो तसे असावे. किंवा सिंहाची नजर जशी तीक्ष्ण असते तसे हे नाम असावे अशी माझी अल्प धारणा आहे. मराठी साहित्यात आणि विशेष करून लोकमान्य टिळकांचे लिखाणांत ‘सिंहावलोकन’ असा शब्द बरेच वेळी वापरला गेला आहे. असो. 
‘संधाता’ चा अर्थ या ठिकाणी कर्मफल-प्रदायक असा करायला हरकत नाही. किंवा, मानव वारंवार प्रमाद करत असूनही त्याला वारंवार संधी देणारा असेही म्हणूया ! 
तो शाश्वत असल्याने कायम ‘स्थिर:’ असतो.
तो अजन्मा असल्याने ‘अजो’ होय हे आपण मागे पाहिले आहेच आणि दुष्ट प्रवृत्तींना सहन न करणारा तो ‘दुर्मर्षण’ आहे. दुष्टांना शासन करणारा तो ‘शास्ता’ आहे, तर विश्वाचा शासकही आहे ! 
‘विश्रुतात्मा’चा अर्थ ज्याचे निव्वळ स्मरण केल्याने सुख शांती समाधान मिळते असा दिव्यात्मा श्रीमहाविष्णु होय ! 
आणि ‘सुरारिहा’ म्हणजे दुष्ट दानवांचे निर्दालन करणारा . 

क्रमश: 




Sunday, October 17, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक वीस एकवीस

 


२०).     “ओम् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास: सतांगति:      ।
              अनिरूध्द: सुरानन्दो गोविन्दो गोविदां पति:       ॥२०॥” 

श्रीमहाविष्णुच्या नि:श्वासांतून वेद प्रगट झाले असे आपण मानत आलेलो आहोंत. मात्र याच वेदज्ञानाने अखिल चराचराची निर्मिती झाली. खरेतर ओंकार या नादब्रह्मातून वेद निर्माण झाले, जे भगवंताच्या श्वासांत अनुस्यूत होते. ‘महेष्वासो’ या नामाची उपपत्ती अशी असावी. 
मही म्हणजे पृथ्वी आणि तिचे भरणपोषण करणारा ‘महीभर्ता’, तर लक्ष्मीपती, ऐश्वर्यवान असा ‘श्रीनिवास:’ होय. 
‘सतांगति’ म्हणजे साधू सज्जनांना    सदगतीकडे नेणारा, त्यांचे अंतिम आश्रयस्थान विश्रांतिस्थान. मात्र त्याचे अविरत चालणाऱ्या या महान् कार्यात कुणीच अडथळा घालण्यास धजावत नाही, म्हणून ‘अनिरूध्द’ ! 
‘सुरांना’ म्हणजे आपल्यासकट सर्व देवीदेवतांना अपार आनंदाची लयलूट करणारा हा ‘सुरानन्दो’ आहे, तर ‘गो’ म्हणजे इन्द्रियें , तसेच गाय आणि वाणी देखील. म्हणून या तिन्हींचा स्वामी असा हा ‘गोविदांपती’ आहे ! 

२१).     “ओम् मरीचिर्दमनो हंस: सुपर्णो भुजगोत्तम:         ।
               हिरण्यनाभ: सुतपा: पद्मनाभ: प्रजापति:       ॥२१॥” 

येथें ‘मरीचि’ चा उल्लेख सर्व सूर्यमालिका तसेच अखिल ब्रह्मांडाला तेजस्वी करणाऱ्या चैतन्य-सूर्याचा आहे, तर दुष्ट, अहंकारी प्रवृत्तींचे दमन करणारा ‘मरीचिर्दमनो’ देखील आहे. 
‘हंस’ या शब्दाची उपपत्ती मजेशीर आहे. सहसा सरस्वतीचे वाहन, अतिशय डौलदार दिसणे नि चालणे, नीरक्षीर-विवेक करणारा पक्षी (?) असे आपण जाणतो. मात्र ‘’अहं स:’ म्हणजे ‘मी तूंच आहे ‘ असे म्हटल्यावर संसारभयाची वार्ताच नको ! आणि म्हणूनच श्रीमहाविष्णुला  ‘हंस:’ हे नामाभिधान तंतोतंत लागू पडते ! (शिवाय पृथ्वीतलावर असंख्य अवतार घेऊनही आपले निज आत्मस्वरूप कधीही दृष्टिआड होऊं न देतां नि आपल्याच मायेंत न गुरफटणारा असा हा ‘नीरक्षीर विवेकी’ हंस आहे ! ! ) 

‘सुपर्णो’ चा एक साधा सरळ अर्थ होतो एक सुंदर पान, पिंपळपान - पर्ण ! मला सांगा, प्रलयकालीं जेव्हा सर्वकाही जलमय झालेले असते तेव्हा तें परब्रह्मरूप बालक केवळ एका तरंगत्या पर्णावर कसे खेळत पहुडलेले असते ! म्हणजे प्रलयकालीं देखील ते बालक नि ते पान शिल्लक असतेच ना ! (खूप विषयांतर झालंय खरं, पण राहवले नाही म्हणून लिहिले एवढेच. भूलचूक लेनी देनी ! ) 
दुसऱ्या अर्थाने उत्तम कान असाही होऊ शकतो.  माऊ लींनी श्री गणेशाचे वर्णन करतांना दोन्ही कानांना ‘मीमांसा’ म्हटले आहे - पूर्व मीमांसा म्हणजे कर्मकांड वगैरे तर उत्तर मीमांसा अर्थात ज्ञानकांड किंवा वेदान्त ! किंवा, प्रवृत्ति-निवृत्ती या दोन भक्कम पंखांच्या साहाय्याने आकाशांत उंच उंच भरारी घेणाऱ्या गरुडासमान ! (विष्णुचे वाहन म्हणून गरूडाचेच नाव पुढे येते ! ) 
कर्म नि ज्ञान या सुदृढ भुजांनी विश्वाचे व्यवहार उत्तम प्रकारे चालविणारा हा ‘भुजगोत्तम:’ आहे. केवळ कर्म किंवा निव्वळ ज्ञानाने हा भवसागर तरून जाणे शक्य नाही. कर्म नि ज्ञानरूपी दोन्ही भुजा आवश्यक असतात. या निमित्ताने ‘भावार्थ  रामगीते’तील राम लक्ष्मण यांचा आध्यात्मिक संवाद असा वर्णिला आहे - ‘अरे लक्ष्मणा, केवळ कर्म करून जीवास मुक्ती कशी लाभेल, उलट अनंत जन्मीं कर्में करूनही ज्ञानाविना तीं सर्व व्यर्थ होत. पक्ष्याला आकाशांत भरारी घ्यायला दोन पंख साहाय्य करतात. त्यांतील एक लुळा पडला तर उडणे शक्य नसते. अरे, ज्ञान नि कर्म हे दोन पंख होत, एक उत्तर नि दुसरा पूर्व. त्यांचे साहाय्याने ब्रह्मसापेक्ष, शाश्वत अपरोक्ष सुखाची प्राप्ती होत असते. त्या ज्ञानकर्मावांचुन सुख लाभेना जीवालागुन; त्जयावाचुन आत्सेमज्ञान नाही, जसे भोजनावाचून जीवाला तृप्ती मिळत नाही,’ (स्वैर भाषांतर ! ) 

आणखी एका अर्थाने अनंतनाग आणि वासुकी हे दोन भुजंग भगवंताच्याच विभूती असल्याने श्रीमहाविष्णु ‘भुजगोत्तम’ आहेत ! 
श्री विष्णूचे नाभिस्थानापासून आधी चतुराननु म्हणजे ब्रह्मदेव उत्पन्न झाले नि नंतर त्यांनी सर्व जीवमात्रांसह सृष्टी निर्माण केली असे पुराण सांगते. तें नाभिस्थान सुवर्णाप्रमाणे तेज:पुंज असल्याने ‘हिरण्यनाभ:’ म्हटले, तर कमलदलाप्रमाणे सुंदर नाभी असलेला हा ‘पद्मनाभ:’ होय. 
विश्वकल्याणार्थ ‘नर-नारायण रूपांत याने बदरिकाश्रमांत कठोर तप केले म्हणून याला ‘सुतपा:’ म्हणतात. 

क्रमश: 



Friday, October 15, 2021

 

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक सोळावा

 १६).    “ओम् भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिज:     ।

            अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसु:              ॥१६॥” 

‘भ्राजिष्णु’ या शब्दाचे निरूपण असे की स्वयंभू ओंकार श्रीमहाविष्णु अखिल ब्रह्मांड    आपल्या चैतन्य शक्तीने अर्थात आदिमायेच्या साहाय्याने निर्माण करतात. ते  एकरस नि चैतन्यप्रकाश-स्वरूप आहे (बरेच कठीण शब्द वापरले, क्षमस्व . खरेतर माझ्या संग्रहांतील काही टिपणांवरून हे लिहिण्याचे धार्ष्ट्य केले - पुढेही करत राहणार आहे, त्याबद्दलही आधीच क्षमा मागून ठेवतो ! ) असो. 
या ब्रह्मांडाचाही याच मायेच्या साहाय्याने आस्वाद म्हणजे भोजन करतो म्हणून भोक्ता ! जरा जास्तच सोप्पं झालंय काय ? पण आपण नाही का भोजनापूर्वीं ‘हरिर् दाता, हरिर् भोक्ता, हरिर् अन्नम् प्रजापति:’ अशी प्रार्थना करीत ? ) तेही असो ! 
भगवन्त स्वत:च अतिशय दयाळू, सहनशील आहे असे म्हटले जाते, म्हणून ‘सहिष्णु:’ आहे, तर अखिल विश्व त्या ओंकाररूप आदिबीजांतून निर्माण झाले म्हणून ‘जगदादिज:’ असे म्हटले. 
‘अनघो’ म्हणजे निष्पाप, शुध्द  असून सदासर्वदा कायम ‘विजयी’ असतो म्हणून ‘जेता’, तर विश्वउत्पत्तीचे स्थान म्हणून ‘विश्वयोनि:’ होय. 
वारंवार निरनिराळ्या स्वरूपांत पुन्हा पुन्हा जन्म घेउन त्यांत निवास करणारा हा ‘पुनर्वसु:’ असे म्हणता येईल काय ?अथवा, विश्वनिर्मिती बरोबरच तिचा प्रलयकाळी संहार करीत पुन:पुन्हा निर्मिती करणारा म्हणूनही ‘पुनर्वसु:’ म्हणता येईल. 
(आजचे रटाळ निरूपण सहन करून घ्यावे ही विनंती ! ) 

रहाळकर
१३/१०/२०२१

Best wishes, 
Dr. Rahalkar
 
Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक सतरा अठरा एकोणीस

 

१७).     “ओम् उपेन्द्रो वामन: प्रांशुर् अमोघ: शुचिरुर्जित:      ।
             अतीन्द्र संग्रह: सर्गो घृतात्मा नियमो यम:             ॥१७॥” 

उपेन्द्रो म्हणजे देवांचाही देव, अगदी इंद्राहून देखील ज्येष्ठ नि श्रेष्ठ ( इंद्राला महाविष्णुनेच नाही का निर्माण केले ?) याच विष्णुने ‘वामन’ अवतार घेतलाआणि बलियज्ञाचे वेळी तीन पाउलें मोजण्यासाठी विराट रूप धारण केले. ‘प्रांशु’ म्हणजे उंच आणि इतका उंच झाला की पाय पृथ्वीवर नि मस्तक आकाशांत ! तो ‘अमोघ’ आहे, म्हणजे infallible, ज्याची कोणतीही कृती निरर्थक नसते असा. 
‘शुचि’ म्हणजे पवित्र आणि उर्जित:  म्हणजे भव्य, मोठा, शक्तिशाली आणि अतीन्द्र: म्हणजे जो इंद्रियांद्वारा जाणतां न येणारा अतिसूक्ष्म आणि तेज:पुंज. ‘संग्रह:’ म्हणजे संग्रह करणारा - जसे बीजांत आख्खा वृक्ष साठवलेला असतो तसा. 
ज्याप्रमाणे बीजाला अंकुर फुटून घुमारे तयार होतात तसे श्रीमहाविष्णु पासून विश्व निर्माण होते, म्हणून ‘सर्ग:’ असेही नामकरण झाले. 
‘घृतात्मा’ म्हणजे स्वत: अलिप्त, साक्षीरूप, तटस्थ राहून विश्वव्यापार नियंत्रित ठेवणारा. सूर्यबिंब जसे पाण्यात प्रतिबिंबित होऊनही भिजत नाही तसा हा मायेने लिप्त होत नाही. 
चराचराचे सर्व व्यवहार याचेमुळेच नियंत्रित राहतात आणि सृजना बरोबरच सृष्टीचा लयही करतो म्हणून ‘यम:’ म्हटले आहे याला ! 

१८).    “ओम् वेद्यो वैद्य:  सदायोगी वीरहा माधवो मधु:        ।
            अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल:           ॥१८॥” 

ओंकारस्वरूप विश्वनिर्माता श्री विष्णुच्या नि:श्वासांतून वेदज्ञान आसमंतांत पसरले आणि ब्रह्मज्ञानी ऋषिमुनींनी आपल्या ब्राह्मी अवस्थेंत ते आत्मसात केले, मुखोद्गत केले आणि पुढे शिष्य-परंपरेनुसार ते प्रजेला उपलब्ध झाले. आणि म्हणून या वेदांचे निर्माते     एक वा अनेक   ऋषी नसून प्रत्यक्ष श्रीमहाविष्णु होय.  तो स्वत:च खरा वेदनिर्माता म्हटला पाहिजे नि म्हणून वेदांना ‘अपौरूषेय’ म्हणतात. 
वेदांच्या साहाय्यानेच श्रीमहाविष्णुला जाणता येते म्हणून ‘वेद्यो’ ! 
मात्र स्वत:च विश्वनिर्माण केल्यामुळे तो विश्वाची नसन् नस जाणतो म्हणून बहुधा त्याला ‘वैद्य:’ अशी संज्ञा मिळाली असावी ! 
संपूर्ण विश्व नि चराचराला आत्मरूपाने ‘जोडणारा’ हा ‘सदायोगी’ होय. 
अतिशय सामर्थ्यवान असा हा ‘वीर’ असून विश्वकल्याणार्थ आणि धर्मरक्षण तसेंच साधू-सज्जनांचे रक्षणार्थ दुष्ट असुरांचा नायनाट करणारा आहे. 
‘माधवो’ म्हणजे विद्या व लक्ष्मीचा पती आणि सर्वांना प्रिय असा ‘मधु:’ आहे ! तसेच स्वत:च्या मायेचा अधिपति असा ‘महामायो’ आहे !
विश्वनिर्मिती, तिचे भरणपोषण नि संहार ही तिन्ही कार्यें प्रचंड उत्साहाने वारंवार करीत राहणारा तो ‘महोत्साहो’ आहे आणि ‘महाबली’ तर आहेच आहे ! ! 

१९).    “ओम् महाबुध्दिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्यति:        ।
             अनिर्देश्य वपु: श्रीमान् अमेयात्मा महाद्रि धृक.     ॥१९॥” 

अखिल ब्रह्मांड निर्माता श्रीमहाविष्णु ‘बुध्दिमतांवरिष्ठं’ आहे.  संसारोत्पत्तीचे कारण असलेली वासना किंवा इच्छा हीच मुळांत अविद्या म्हणजे भगवंताचे वीर्य होय, म्हणून तो महावीर्यो आणि जगत्पिता आहे. विश्वसंचालनाची महान् शक्ती त्याचेपाशी असल्याने ‘महाशक्ती’ आणि अंतरबाह्य तेज:पुंज आणि प्रभावान् असल्याने ‘महाद्युति:’ आहे. 
खरेतर श्रीमहाविष्णुच्या विश्वरूपाचे वर्णन करणे अशक्य आहे इतके ते व्यापक नि गहन आहे, म्हणून ‘अनिर्देश्यवपु:’ असे म्हटले आहे ! 
या ब्रह्मज्ञानी, ऐश्वर्यसंपन्न  अशा ‘श्रीमानाचे’ व्यक्तिमत्व आणि प्रज्ञेचे अनुमानही करता येत नाही असा तो ‘अमेयात्मा’ आहे. 
‘महाद्रिधृक’ म्हणजे अमृतमंथनाचे वेळी मंदार पर्वत किंवा गो-रक्षणार्थ उचललेला गोवर्धन पर्वत लीलया उचलणारा ! 

क्रमश: 



Tuesday, October 12, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक चौदा व पंधरा

 १४).    “ओम् सर्वग: सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दन:       । 

            वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित्कवि:                ॥१४॥” 
‘सर्वग:’ म्हणजे सर्वव्यापी. सर्व सूर्यमालिकांसह अखिल ब्रह्मांड व्यापून सर्वत्र संचार करू शकणारा सर्वगामी. अर्थातच सर्व विश्वाला जाणणारा असा ‘सर्वविद्’ आणि‘भानु’ म्हणजे सूर्याप्रमाणे सर्व ब्रह्मांडाला चैतन्यप्रकाश देणारा. 
पुढे ‘विश्वक्सेनो’ असे म्हटले. अखिल विश्वाचा सेनापती, ज्याचा दुष्ट शक्ती आणि शत्रू दरारा बाळगून असतात ! तथापि, भक्तांचे आश्रयस्थान, आशास्थान असणारा भक्त-कैवारी ‘जनार्दन’ ही आहे. आपल्या नि:श्वासांतून वेद निर्माण करणारा हा ‘वेदो’ आहे, तर ते वेदज्ञान जाणणारा ‘वेदविद्’ आहे. वेदज्ञानांत परिपूर्ण असल्याने अव्यंग आहे आणि याचे नि:श्वास म्हणजे प्रत्यक्ष वेद असल्याने ‘वेदांगो’ होय. वेदांच्या ऋचांना छंद, लय नि ताल असतात म्हणून हा ‘वेदविद् कवी’ आहे ! 

१५).    “ओम् लोकाध्यक्ष: सुराध्यक्षो धर्माध्यक्ष: कृताकृत:       । 
            चतुरात्मा चतुर्व्यूह:  चतुर्द्रष्ट: चतुर्भुज:                       ॥१५॥” 

विश्वेश्वर श्रीमहाविष्णु हा स्वर्ग, पाताळ, मृत्युलोकादि तिन्ही लोकांचा स्वामी, नियामक, ॲडमिनिस्ट्रेटर असा ‘लोकाध्यक्ष’ आहे, तसेच सुरांचा म्हणजे देवतांचाही अधिपती आहे. शिवाय धर्म-अधर्म यांचा विवेक करून आचरण करणाऱ्या प्रजेला योग्य ते फल देणारा असा ‘धर्माध्यक्ष’ देखील आहे ! 
विश्वसंचलन करणारा ‘कृत’ तर आहेच, पण विश्वनिर्मितीचे कारण म्हणून ‘अकृत’ असा ‘कृताकृत’ आहे ! 
जीवांचे चार प्रकार सांगितले आहेत, जसे अण्डज जारज स्वेदज नि उद्भिज. या चारही योनींत हा महाविष्णु आत्मरूपाने वास करतो म्हणून याला ‘चतुरात्मा’ म्हटले आहे. 
‘चतुर्व्यूह’ म्हणजे चारही दिशांचे व्यूह रचून हा विश्वनिर्मिती साधतो. वास्तविक वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरूध्द तसेच मन बुध्दी अहंकार व प्रकृती म्हणजेच स्वभावगुणधर्म यांना व्यूह असे म्हटले आहे. 
व्यूह या संज्ञेची दुसरीही एक बाजू सांगतां येईल - जागृती, स्वप्न, सुषुप्ती नि तुरिया या साधकाच्या एकाहून एक वरचढ अवस्थांचा व्यूह रचून साधकाला आपल्याकडे ओढून घेणारा असा श्री महाविष्णु आहे ! 
मात्र विश्वाचा लयही चार प्रकारचे व्यूह रचून तो साधत असतो, सर्वप्रथम पृथ्वीला संपूर्ण जलमय करतो, नंतर सूर्यासह संपूर्ण वातावरण प्रचंड ऊष्णता वाढवून जाळून टाकतो आणि मग शुध्द वायुरूप देऊन सर्व चराचराला सूक्ष्मांत आणत स्वत:त सामावून घेतो ! (हे सर्व वर्णन श्री दासबोधांत समर्थांनी केले आहे ). 
शेवटी, नृसिंह अवतारांत अत्यंत विक्राळ दाढा नि सुळे दाखवीत चतुर्द्ंष्ट आणि चतुर्भुजा धारण केल्या आहेत या श्रीमहाविष्णुने ! 

क्रमश:



This page is powered by Blogger. Isn't yours?