Thursday, July 12, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग तीस


ज्ञनेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तीस

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सहाव्या अध्यायातील खालील श्लोकाचे बहारदार निरूपण करीत आहेत

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मन:
नात्युच्छ्रितं नातिनींच चैलाजिनकुशोत्तरम् /११॥” 

(साधकाने पवित्र स्थान पाहून, फार उंच किंवा फार सखल नसेल अशा ठिकाणी प्रथम दर्भ, नंतर मृगाजिन आणि त्यावर शुभ्र धूतवस्त्र अंथरून आसन स्थिर करावे.) 

भगवंत म्हणतात की या योगमार्गाचे सविस्तर वर्णन मी करीन, मात्र केवळ ते ऐकून काही उपयोगाचे नाही. त्याचे आचरण करून अनुभव घेतला तरच ते उपयोगी ठरेल. म्हणून योगाभ्यास व्यवस्थित साधेल अशीच जागा निवडावी
ज्या स्थानावर बसतांच मनाला समाधान आणि प्रसन्नता लाभेल, जेथून उठावेसेच वाटणार नाही आणि वैराग्य दुप्पट होऊन स्थिरावेल.
जिथे संत, सत्पुरूष नि साधक राहून गेले असतील आणि संतोष नि धैर्य वाढायला तेथील वातावरण पोषक असेल ; जिथे योगाभ्यास आपसूक नि सहजपणे घडेल, अनुभव स्वत:हून चालत येतील आणि रमणीयता विशेषत्वाने जाणवेल
अर्जुना, ज्या ठिकाणी येतांच साधकालाच काय, पण नास्तिकाला देखील वाटावे की इथे बसून चिंतन किंवा तपश्चर्या करावी. त्या ठिकाणी सहज म्हणून गेलेल्या प्रापंचिक माणसालाही तेथून परत फिरावेसे वाटणार नाही.
शिवाय, ज्याला अजिबात थांबण्याची इच्छा नाही त्यालासुध्दा तिथे राहण्याची उत्कट इच्छा होईल ; भटकंती करणाऱ्याला एकाच ठिकाणी खिळवून ठेवेल नि विरक्तीला थापटून जागी करेल, अशी जागा निवडावी
तें स्थान पाहून विलासी राजाला देखील आपले राजपाट सोडून तिथेच निवांतपणे बसावेसे वाटावे

जें येणेंमानें बरवंट आणि तैसेंचि अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळां दिसे (तें स्थान इतके सुंदर आणि पवित्र असावे की तिथे ध्येय साकार होऊन साक्षात ब्रह्म स्पष्टपणे दिसावे). 

आणिकही एक पहावें जे साधकीं वसते होआवें आणि जनाचेनि पायरवें रूळेचिना (त्या जागेंत आणखी एक गुण असावा, तो असा की तिथे साधकांनी वस्ती केलेली असावी आणि सर्वसामान्यपणे इतर लोकांची वर्दळ तिथे नसावी). 

तिथें अमृतासमान गोड अशा फळांनी लगडलेली दाट झाडें असावीत आणि पावला पावलागणिक, पाउसा विनाही अतिशय शुध्द नि निर्मळ पाण्याचे झरे निरंतर वाहात असावे

हा आतपुही अळुमाळु जाणिजे तरी शीतळु पवनु अति निश्चळु मंदु झुळके (आतपु=तापदायक सूर्य, प्रखर ऊन. अळुमाळु=किंचित.) (तिथे ऊनदेखील कोंवळे आणि शीतल भासावे आणि वारा शांतपणे वाहात असून त्याच्या मंद झुळका येत राहाव्यात). 

बहुत करूनि नि:शब्द दाट रिगे श्वापद शुक हन षट्पद तेउतें नाही  
पाणिलगें हंसें दोनी चारी सारसें कवणें एकें वेळे बैसे तरी कोकिळही हो (असे स्थान सहसा नि:शब्द, शांत असावे ; जिथे श्वापदांचा उपद्रव नि भीती  नसावी, तसेच पोपट किंवा भुंग्यांची किरकिर नसावी. तिथे पाण्याजवळ असणारे हंस, दोन चार सारस किंवा चक्रवाक पक्षी आणि एखादवेळेस कोकिळ असले तरी चालतील). 

निरंतर नाहीं तरी आलीं गेलीं कांही होतु काय मयूरें ही आम्ही ना म्हणों (तिथे नेहमी नाही, पण जाऊन येऊन असणारे काही सुंदर मोर असतील तर त्यास आमची ना नाही !) 

(किती किती सुंदर वर्णन आहे हे, नाही?)  असो !! 
पुढे म्हणतात

हे पांडवा (अर्जुना), असे रमणीय स्थान तर अवश्य शोधून ठेवावेच, पण तिथे वास्तव्यासाठी एखादी गुहा किंवा शिवालय देखील असावे. या दोन्हीपैकी जे आवडेल ते निवडावे, पण तपश्चर्येसाठी बहुतेक वेळीं एकान्तांत राहावे

अशा ठिकाणी मन स्थिरावेल याची खातरजमा झाल्यावर तेथे आसन मांडावे

वरी चोखट मृगसेवडी माजीं धूतवस्त्राची घडी तळवटीं अमोडी कुशांकुर (खालीं अखंड दर्भ अंथरून त्यावर कृष्णाजिन किंवा काळ्या हरिणाचे कातडे घालून त्याला शुभ्र धूतवस्त्राने आच्छादावे ). 

सकोमल सरिसें सुबध्द राहती आपैसें एकपाडें तैसें वोजा घाली (ते दर्भ कोमल आणि एकसारखे असावे आणि ते व्यवस्थित समतल राहतील असे अंथरावे. ते फार उंच किंवा सखलही नसावे). 
जर आसन उंच झाले तर शरीर डोलेल आणि सखल झाले तर भूमिदोष (गारवा, ओल वगैरे) लागतील

म्हणौनि तैसें करावे समभावें धरावे हें बहु असो होआवें आसन ऐसें  
अशा प्रकारेंआसनव्यवस्था झाल्यावरध्यानकसे लावावे त्याचेटेकनिकसांगतात श्री ज्ञानदेव

तनैकाग्रं मन: कृत्वा यत् चित्तेन्द्रिय क्रिय:  
उपविश्यासने युन्ज्याद् योगमात्म विशुध्दये /१२/” 
(अशा आसनावर बसून चित्त आणि इन्द्रियांच्या क्रिया नियमित कराव्या. त्या योगें मन एकाग्र होईल आणि चित्तशुध्दिसाठी योगाभ्यास साधतां येईल). 

मग तेथ आपण एकाग्र अंत:करण करूनि सद्गुरूस्मरण अनुभविजे  


(क्रमश

This page is powered by Blogger. Isn't yours?