Friday, April 26, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकसष्ट

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकसष्ठ 

हे अवतार जे सकळ ते जिया समुद्रीचे कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे (भगवंताचे विविध अवतार ज्या सागरांत लाटांप्रमाणे भासतात ते विश्वरूपी मृगजळ सूर्यामुळे भासमान होते
जिये अनादि भूमिके निटे (नटतें) चराचर हे चित्र उमटे आपणपें श्रीवैकुंठें दाविलें तया  

मागे एकदा बालपणी श्रीहरीने माती खाल्ली म्हणून यशोदामाईने रागावून त्याचे मनगट धरले आणि त्याचे मुखांत काय आहे ते पाहण्यासाठी त्याला तोंड उघडायला लावले. त्या वेळी तिला अवकाशासह सर्व चौदा लोक, नव्हे अखिल ब्रह्मांड बालकृष्णाचे मुखांत आढळले. इतकेच नव्हे तर ध्रूवबाळ मधुवनांत तप करीत असतांना त्याचे गालावर शंखाचा स्पर्ष करतांच वेदांनाही जे जाणतां येत नाही ते सर्व तो भरभरून बोलूं लागला

(या पुढील ओव्यांत विश्वरूपाची नुसती झलक मिळतांच अर्जुनाच्या एकंदर मन:स्थितीचे बहारदार वर्णन करतात श्री ज्ञानदेव). 

तैसा अनुग्रहो पैं राया श्रीहरी केला धनंजया आतां कवणेकडेही माया ऐसी भाष नेणेंचि तो (हे राजन्, भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेमायात्याला कुठेच जाणवली नाही). 

त्याला ईश्वरी सामर्थ्य सर्व बाजूंनी उजळलेले दिसले आणि तो अतीव आश्चर्याच्या सागरांत जणू बुडूं लागला

जैसा आब्रह्म पूर्णोदकीं पव्हे मार्कंडेय एकाकीं तैसा विश्वरूप कौतुकीं पार्थु लोळे (प्रलयकालीं केवळ पाणीच पाणी असतांना ज्या प्रमाणे चिरंजीव असलेला मार्कंडेय एकटाच त्या जलाशयांत पोहत राहिला, तसा तो अर्जुन विश्वरूपाच्या किमयेवर जणूं लोळूं लागला). 
म्हणें केवढें गगन एथ होतें तें कवणें नेलें पां केउतें ती चराचरें महाभूतें काय जाहालीं ?  
दिशांचे ठावही हारपलें अधोर्ध्व (खालीवर) काय नेणों जाहले चेईलिया (जाग आल्यावर) स्वप्न जैसे गेले लोकाकार  
नाना सूर्यतेज प्रतापें सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळिली विश्वरूपें प्रपंचरचना (ज्या प्रमाणे सूर्यप्रकाशांत चंद्र तारे दिसेनासे होतात, त्याप्रमाणे भगवंताच्या विश्वरूपाने सर्व सृष्टिरचना झाकोळलेली दिसते). 
तेव्हा मनासी मनपण स्फुरे बुध्दी आपणपें सांवरे (आवरत नाही) इंद्रियांचे रश्मी (वृत्ती) माघारे हृदयवरी भरले (तेव्हां अर्जुनाचे मनपण हरपले ; संकल्प-विकल्प थांबले ; बुध्दीवरील नियंत्रण सुटले नि वृत्ती परत हृदयापर्यंत मागे फिरल्या). 
तेथ ताटस्था ताटस्थ्य पडिलें टकासी टक लागले जैसें मोहनास्त्र घातले विचारजातां (त्या विश्वरूप दर्शनाने स्तब्धतेला स्तब्धता आली ; एकाग्रतेचे ध्यान लागले जणूं सर्व प्रकारच्या विचारांवर कुणी मोहनास्त्र टाकले !) 

वाहवा
तैसा विस्मितु पाहे कोडें (कौतुकाने, चकित होत्साता) तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें तेंचि नानारूप चहूंकडे मांडोनि ठेले  
जैसे वर्षाकाळींचे मेघोडे (मेघ) कां महाप्रळयींचे तेज वाढे तैसे आपणावीण कवणीकडे नेदीचि उरों  
प्रथम स्वरूप- समाधान पावोनि ठेला अर्जुन सवेंचि उघडी लोचन तंव विश्वरूप देखे  
इहींची दोहीं डोळां पाहावे विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्णें सोहळा पुरविला ऐसा (या आपल्या दोन डोळ्यांनी विश्वरूप पाहावे ही अर्जुनाची इच्छा श्रीकृष्णाने अशा प्रकारे पुरविली). 

अनेकवक्त्रनयनम् अनेकाद्भुत दर्शनम्
अनेकदिव्याभरणमं दिव्यानेकोद्यतायुधम्  ११/१०॥” 
(अनेक मुखे, अनेक डोळे, अनेक आश्चर्यकारक सौंदर्यलक्ष्मीची भांडारें, आनंदवनें, लावण्यसाम्राज्यें, अनेक आयुधें अर्जुनाने पाहिली.) 

त्या विश्वरूपाची अनेक मुखें, जणूं सौंदर्यलक्ष्मीची भांडारें, अतिशय प्रसन्न नि सुंदर आनंदवनें, लावण्याची साम्राज्यें अशी भगवंताची अति मनोहर देखणी रूपें अर्जुनाने पाहिली
मात्र या सुंदर आणि मोहक मुखांबरोबरच त्याने महाभयंकर अशी मुखेंही पाहिली, जणूं काळरात्रीचे सैन्यच खवळून चढाई करण्यासाठी सज्ज केले आहे. किंवा, प्रत्यक्ष मृत्यूलाच मुखें फुटली असावीत. अथवा भीतीचे किल्ले विस्तारले आहेत किंवा प्रलयाग्नीची धगधगती कुंडें जणूं पेटविली आहेत

अशी ती आश्चर्यजनक, भयानक मुखें वीर अर्जुनाने विश्वरूपांत पाहिलीं. त्या मूर्तीला श्रुंगारलेली अलौकिक, असंख्य मुखें होती. ज्ञानदृष्टीमुळे अर्जुनाला ती तोंडें पाहता आली, मात्र त्यांचा शेवट कुठे होतो ते त्याला कळेना
त्या विश्वरूप भगवंताला किती डोळे आहेत हे तो सहज म्हणून पाहू लागला
तंव नानावर्णें कमळवनें विकासिलीं तैसें अर्जुनें नेत्र देखिले पालिंगनें (पंक्ती) आदित्यांची (सूर्यांची)  
तेथेंचि कृष्णमेघांचिये दाटीमाजीं कल्पांत विजूंचिया स्फुटीं (विजांचा लखलखाट) तैसिया वन्हि पिंगळा (पिंगट) दिठी (दृष्टी) भ्रूभंगातळीं (भुवयांखालीं)  

त्या एकाच रूपांत असे एकेक आश्चर्य पाहतांना अर्जुनाची अनेक दर्शनांची लालसा पूर्ण झाली

मग म्हणें चरण ते कवणेकडे केउतें मुकुट के दोर्दंडे (बाहुदंड) ऐसी वाढविताहे कोडें चाड (इच्छा) देखावयाची  
तेथ भाग्यनिधि पार्था कां विफलत्व होईल मनोरथा काय पिनाकपाणींचिया (शंकराच्या) भातां (भात्यांत) वायकांडी (निरर्थक बाण) आहाती
नातरी चतुराननाचिये वाचे (ब्रह्मदेवाच्या वाणींत) काय आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे (ठसे) ? म्हणौनि साद्यंतपण (नखशिखांतअपारांचे देखिले तेणें  

जे विश्वरूप चारही वेदांना कळले नाही त्याची सर्व अंगें अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणें पाहिली. चरणांपासून डोईवरील मुकुटांपर्यंत अर्जुन विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहात होता, जे रत्नें नि अलंकारांनी मढलेले होते

परब्रह्म आपुलेनि आंगें ल्यावया आपणचि जाहला अनेगें (अनेक प्रकारें) तेणे लेणीं मी सांगें काइसया सारिखीं (ते रत्नालंकार कशासारखे आहेत म्हणून सांगूं

जिये प्रभेचिये झळाळा उजाळाु चंद्रादित्यमंडळा जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे (त्या अलंकारांच्या चकचकितपणामुळें  चंद्र-सूर्य मंडळांना झळाळी प्राप्त झाली आणि या विश्वाची निर्मिती झाली). 
तो दिव्यतेज श्रूंगारू कोणाचिये मतीसी होय गोचरू देव आपणपेंचि लेइले ऐसे वीरू देखत असे (ते दिव्य तेजाचे अलौकिक सौंदर्य कुणाला समजू शकेल ? ते सर्व भगवंताचे ऐश्वर्य अर्जुन न्याहाळत होता). 

नंतर ज्ञानचक्षूचे साहाय्याने जेव्हा तो विश्वरूपाच्या करकमलांकडे पाहू लागला तेव्हा त्याला त्या हातांत अतिप्रखर अशी शस्त्रें दिसली, जी कल्पांताचे वेळी दाहकपणे उठणाऱ्या ज्वालांनाही सहज तोडून टाकणारी अशी होती

आपण आंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदलें देवें  
ज्याचे किरणांच्या प्रखरतेने नक्षत्रांचे फुटाणे होतात आणि अग्नी देखील पोळला जातो नि समुद्राकडे धांव घेतो. नंतर जणू कालकूट या अतिविषारी लाटांनी किंवा विजांच्या प्रचंड कडकडाटाप्रमाणे शस्त्रप्रहार करणारे देवाचे हात त्याने पाहिले


क्रमश:......

This page is powered by Blogger. Isn't yours?