Friday, July 26, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अडुसष्ट

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अडूसष्ट 

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते   ११/४६॥

(मुकुट धारण करणारा आणि हातांत गदा-चक्र धारण करणाऱ्या अशा तुला पाहूं इच्छितो. विश्वरूपाच्या हजार बाहूंपैकी त्याच चतुर्भुज रूपांत प्रगट हो !) 

कैसे नीलोत्पलातें (नीलकमळाला) रांवीत (रंगवून) आकाशाही रंग लावित तेजाची वोज (शोभा) दावित इन्द्रनीळा  
जैसा परिमळ जाहला मरगजा (पांचूला) कां आनंदासि निघाल्या भुजा ज्याचे जानूवरि (मांडीवर) मकरध्वजा (मदन) जोडली बरव (उत्कृष्ठ) (पांचू या रत्नाला सुगंध प्राप्त व्हावा किंवा आनंदाला हात फुटावे तसे देवाचे शरीर शोभून दिसत आहे. ज्याचा मुलगा म्हणून मांडीवर बसतां आल्यामुळे मदनाला प्रतिष्ठा लाभली ).
मस्तकीं मुगुटातें ठेविले कीं मुगुटा मुकुट मस्तक झालें शृंगार लेणें लाधलें (मिळाले) आंगाचेनि जया (देवाने मुगुटाला मस्तकावर ठेवल्यामुळे मुगुटाला महत्व आले आणि ज्याचे अंगामुळे अलंकारांना अलंकारित्व लाभले). 
इंद्रधनुष्याचिया आडणीं (मध्यभागीं) माजीं मेघ गगनरंगणीं तैसें आवरिलें शारंगपाणी वैजयंतिया (इंद्रधनुष्याचे मध्यभागी, मेघांचे रंगावळींत वीज चमकून जावी तशी वैजयंती माळ भगवंताच्या निळ्या देहावर शोभून दिसते). 

शिवाय ती उदार गदा जणू असुरांना मोक्ष प्रदान करते आहे आणि ते सौम्य तेजाचे सुदर्शन चक्र कसे मिरवीत आहे हे श्री गोविंदा

किंबहुना स्वामी तें देखावया उत्कंठित पां मी म्हणौनि आतां तुम्ही तैसया होआवें
हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनि निवाले जी डोळे आतां होताति आधले (भुकेले) कृष्णमूर्ती लागीं डण
तें साकार कृष्णरूपडें वांचुनि पाहों नावडे ते देखतां थोडें मानिताति हे (सगुण कृष्णरूपावांचून दुसरे काही पाहणे माझ्या डोळ्यांना आवडत नाही. ते पाहता दिसल्यास माझे डोळे इतर रूपें क्षुद्र मानतात). 
आम्हां भोगमोक्षाचिये ठायीं श्रीमूर्तीवांचूनि नाही म्हणौनि तैसाचि साकारू होई हें सांवरीं आतां  

अर्जुनाच्या अशा बोलण्याचे विश्वरूपी  श्रीकृष्णाला  नवल वाटले आणि ते म्हणाले, असा दुसरा कोणी अविचारी माणूस मी पाहिला नाही. इतकी महत्वाची गोष्ट लाभलेली असूनही हा  भीतीपोटी अडाण्याासारखा बोलत सुटलाय् ! मी आत्यंतिक प्रेमामुळे जगापासून लपवून ठेवलेले माझे विश्वरूप, ज्यापाासून कृष्णादिक अवतार  होतात, याला प्रसन्न होऊन दाखवले

हे ज्ञानतेजाचे निखिळ (केवळ) विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळां  
हें तुजवांचुनि अर्जुना पूर्वी श्रुत (ऐकलेले) दृष्ट (पाहिलेले) नाही आना (इतर जें जोगें (योग्य) नव्हे साधनां म्हणोनिया  

अर्जुना, हे विश्वरूप आधी पाहिल्यामुळे तूं भयभीत आहेस. पण ती भीती बाळगतां तुझे चित्त श्थिर कर आणि पूर्वीसारखाच स्नेह ठेव ! असे म्हणत असतानाच त्या विश्वात्मक रूपाने आपले मूळ स्वरूप धारण केले

तैसे शिष्याचिये प्रीति जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना नयेचि मग आणिले कृष्णपण मागुतें  

संजय म्हणतो, इतका अमर्याद त्रास शिष्यासाठी घेणारे गुरू खरोखर विरळाच
मग विश्व व्यापुनी भोंवतें जें दिव्य तेज प्रगटले होते तेंचि सामावलें मागुतें कृष्णरूपीं तये (त्यावेळीं)  

ज्या प्रमाणे सर्व जीवसृष्टी पुनःश्च परमात्मस्वरूपांत विलीन होते, किंवा भला मोठा वृक्ष लहानशा बीजांत सामावलेला असतो, अथवा जागृति येतांच स्वप्न भंगते, तसेंच भगवान श्रीकृष्णाने योगमायेने निर्मिलेले आपले विश्वरूप आवरून घेतले
हे राजन् (धृतराष्ट्र), ज्याप्रमाणें सूर्यतेज सूर्यबिंबांतच सामावते, किंवा पाण्याने भरलेले मेघ आकाशांत विलीन होतात अथवा सागराची भरती सागरात गडप होते, तसे श्रीकृष्णाने आपल्या कृष्णरूपी वस्त्राची घडी मोडून ती अर्जुनाला दाखवली आणि त्याला आवडल्याने पुन्हा घडी घातली आणि आपले सौम्य रूप प्रगट केले
जो स्वप्नीं स्वर्गा गेला तो अवसांत (अकस्मात) जैसा चेइला (जागा झाला) तैसा विस्मयो जाहला किरीटीसी
नातरी गुरूकृपेसवें वोसरलेया (नाहीसे) प्रपंचज्ञान आघवें स्फुरे तत्व (ब्रह्मा ) तेवीं पांडवें श्रीमूर्ति देखिली  

त्या अर्जुनाच्या मनांत विश्वरूपाचा जो पडदा श्रीकृष्ण रूपाचे आड येत होता ते बरे झाले ! जणू काळाशी झुंज देत, महाप्रलयाला मागे टाकीत किंवा बाहुबलावर सप्त सागर तरून गेल्या सारखा, पुनश्च कृष्णरूप पाहून अर्जुनाला परमानंद झाला

मग सूर्याचिया अस्तमानीं मागुती तारा उगवती गगनीं तैसा देखे लागला  अवनी (पृथ्वी) लोकांसहित  
पाहे तंव तेंचि कुरूक्षेत्र  तैसेचि देखे दोहीं भागीं गोत्र वीर वर्षताति शस्त्रास्त्र संघाटवरी (एकमेकांच्या सैन्यावर)  
तया बाणांचिया मांडवाआंतु तैसाचि रथु देखे निवांतु धुरे बैसला लक्ष्मीकांतु  आापण तळीं  

याप्रमाणे अर्जुनाने भगवंताचे समग्र स्वरूप पाहिले आणि त्याने सुटकेचा निःश्वास टाकला. तो म्हणाला की हे देवा, बुद्धीला सोडून माझे ज्ञान भटकत होते नि अहंकारी मन अक्षरश: देशोधडीला लागले होते. इंद्रियें आपला धर्म विसरली होती नि वाचा मूक ! अशा प्रकारे शरीराची दुर्दशा ओढवली होती. मात्र आतां ती सर्व आपल्या मूळ धर्मावर आली आहेत हे श्रीमूर्ती ! हे द्वारकानाथा श्रीकृष्णा, तुम्ही मला केवळ दर्शन दिलेत एवढेच नसून वठलेल्या वृक्षावर मेघांचा वर्षावच केला आहे

जी सावियाचि (प्रस्तुत) तृषा फुटला तया मज हा अमृतसिंधु भेटला आतां जिणयाचा (जगण्याचा) जाहला भरंवसा मज  

श्रीभगवान् उवाच
सुदुर्दर्शमिदं रूपं द्रष्ट्रवानसि यन् मम  
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिण: ११/५२॥” 
(तूं जे माझे हे अतिशय अवघड स्वरूप पाहिलेस ते पाहण्यासाठी देवही नित्यदर्शनासाठी लालायित असतात). 

यया पार्थाचिया बोलासवें हे काय म्हणितलें देवें तुवां प्रेम ठेवुनी यावें विश्वरूपीं कीं (या विश्वरूपावरच तुझे प्रेम राहू दे !) 
तरि विश्वात्मक रूपडें जें दाविलें आम्ही तुजपुढे तेच शंभूही परि जोडे तपें करितां  

शिवाय, अष्टांगयोगासारख्या कठीण अभ्यासातून योगी शिणतात, पण त्यांनाही अशा विश्वरूप दर्शनाचा लाभ मिळत नाही. याचे किंचित तरी दर्शन व्हावे म्हणून देवांना कितीतरी वाट पाहावी लागते.

आशेचिया अंजुळी ठेउनि हृदयाच्या निडळीं (कपाळावर) चातक निराळीं (आकाशाकडे) लागले जैसे  
तैसे उत्कंठानिर्भर होऊनियां सुरवर (देवतागण) घोकतील आठही प्रहर भेटी जयाची  
परि विश्वरूपासारिखे स्वप्नीही कोण्ही देखे तें प्रत्यक्ष तुवां सुखें देखिले हे  

(क्रमश:...... 

This page is powered by Blogger. Isn't yours?