Tuesday, June 29, 2021

 

चिंतन आणि चिंता……!

 चिंतन आणि चिंता …….! 


आपण ज्या वेळीं काही चिंतन-मनन करीत असतो तेव्हा खरेंतर तोच विषय मनांत घोळत राहायला हवा. मात्र तेच चिंतन बरेच वेळी आपल्याला भरकटवूं लागते मूळ विषयापासून. चिंतनाची जागा चिंतेंत केव्हा परिणत होते ते आपल्यालाही कळत नाही


आतां हेच पहा ना. मला चिंतनावर अधिक भर द्यायचा विचार होता, पण आपले चिंतन योग्य दिशेने वाटचाल करते आहे की नाही अशी व्यर्थ कल्पना आपल्याला उगीचच चिंताग्रस्त करते. कुणाला आवडेल किंवा निदान पटेल तरी काय हा विचारच आपले चिंतन रोखीत नको त्या प्रतिक्रियेचा बागूलबुवा उभा करीत असतो. खरंतर मला आज काहीमौलिकसांगायचा विचार होता - अर्थात्चिंतनावरच’. पण लिहिता लिहितां लक्षात आले की चिंता या शब्दावर अनुस्वार लिहायचे राहून गेले होते आणि अर्थाचा खरोखर अनर्थ झाला असता


आणि मग चिंतन प्रक्रिया सुरू झाली त्या एका अनुस्वारावर ! आमच्या कोंकणींत अनुनासिक हेल काढून बोलण्याचा प्रघात आहे. प्रत्येक वाक्यातले बहुतांश शब्द अनुस्वाराने ओथंबलेले. वास्तविक या अनुस्वाराला आध्यात्मिक भाषेंत अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी ओंकार म्हटला तरी , , यांचेबरोबर अर्धमात्रा स्वरूप बिंदू नसेल तर तो ओंकार अपूर्ण राहतो. प्रार्थनाच आहे तशी - ‘ओंकार बिन्दु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिन: ‘ …..वगैरे. योगीजन त्या एका बिंदूवर पूर्ण लक्ष एकवटतात. असो


माझे ज्येष्ठ स्नेही नेहमी म्हणत - चिंतनावर भर द्यावा, चिंतेवर नव्हे -.! अर्थात एखादा विरळा समर्थ म्हणतो - चिंता करितो विश्वाची ! (तथापि हे ऐकतां वाचतांना मला नेहमीच प्रश्न पडत असे की समर्थ रामदासांना विश्वाची चिंता कां लागावी. सर्वांतर्यामी श्रीरामच भरलेले असतांना विश्वाची चिंता काय म्हणून ? मात्र ती चिंता केवळ लोक-कल्याणार्थ, लोक-संग्रहार्थ होती हे जाणवतांच माझा मूळ प्रश्न आपोआप गळून पडत असे. ) 


चिंतन खरंतर आपोआप घडत असते, त्यासाठी ठाण मांडून बसायची गरज नाही - ‘आतां मी जरा चिंतन करतो’ ! तथापि, भरपूर धूम्रपान करणारा माझा एक मित्र आरामखुर्चींवर रेलून सिगारेटचा धूर आसमंतांत पसरवीत, ‘सिटिंग फ़ॉर आयडियाज्असे म्हणत चक्क चिंतनांत गढून जात असे. बाय वे, तो अतिशय तल्लख बुध्दीचा असून त्याने अमाप ग्रंथ लिहिले होते. म्हणजेच त्याच्या सिटिंग फ़ॉर आयडियाज् मधून काही भरीव चिंतन करण्याजोगे साहित्य निर्माण होत असे. (आतां तो कुठे असतो ते मात्र विचारूं नका, तो आतां हयात नाही ) . असो


मूळ मुद्दा असा की चिंतनांतून सहसा अशी निर्मिती घडावी जी इतरांनाही चिंतन-प्रवृत्त करू शकेल. या उलट चिंताक्रांत माणूस स्वत:बरोबर इतरांनाही चिंतेच्या खाईंत ओढत असतो. बरं, चिंता तरी कसली तर जे प्रत्यक्ष घडणे केवळ अशक्य असेल अशा विषयांची किंवा भविष्यांत काहीतरी अघटित घडेल अशा कल्पनेची. विनाकारण चिंता करणारा कोणीच सुखी झालेला ऐकीवांत नाही, उलट अधिकाधिक चिंता त्याचे पदरीं पडत राहतात


चिंतनावरील चिंतन जरा भरकटले आहे याचे मला पुसटसे भान होते आहे. तरीही चार शब्द अजून उच्चारीन म्हणतो


चिंतन कशाचे करावे किंवा व्हावें ? अर्थातच समोर दिसत असलेल्या दृष्याचे नव्हे तर अदृष्य अशा त्या शक्तीचे, जी हा सर्व फापटपसारा आपल्या समोर ठेवून आपल्याला त्यांत अडकवूं पाहते नि तिथेच आपण फसतो ! वास्तविक प्रत्येकाचा आत्मा किंवा चैतन्य स्वतंत्र आहे, परिपूर्ण आहे - ज्याला संकुचित शब्दातजीवात्माअसे नामकरण केले गेले. खरेतर हा जीवात्मा त्या एकुलत्या एक चैतन्याचा - ज्याला परब्रह्म वस्तु म्हटले गेले - एक अविच्छिन्न अंश आहे असे म्हणतात. ज्या प्रमाणें प्रत्येक अणुरेणूंत आकाशासकट सर्व चैतन्य ठासून भरले आहे, अगदी तसेच या सो-कॉल्ड जीवात्म्यांतही तेच चैतन्य ओतप्रोत आहेच आहे. मग मीच जर सर्व परब्रह्म असेन तर मला चिंता कशाची ? अनुस्वार विरहित चिंतेचीही नाहीच नाही काय ? ! ! 


पुन्हा घसरली आमची चिंतन एक्स्प्रेस ! याचा अर्थ असा की चिंतन म्हणजे कल्पना किंवा विचार करणे नसून मनाला एकाग्र करणे होय. मला त्या एकाच बिंदूवर, अनुस्वारावर लक्ष केन्द्रित करता येईल का आणि ते कसे करावे याचे चिंतन कदाचित् मोलाचे असेल. मात्र तेटेकनिक्माहीत नसल्याने मी आत्तां या क्षणीं कन्फ्यूज्ड वाटत असलों तरी तोही मार्ग मला नक्की सापडेल अशी उमेद बाळगून आहे. (आतां मागील काही उगाळत बसण्यापेक्षा हा नवीन मार्ग शोधून काढणेच बेहत्तर ! ) 


इति चिंतनसीमा - तात्पुरती ! ! 


रहाळकर

२९ जून २०२१



This page is powered by Blogger. Isn't yours?