Thursday, September 27, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पस्तीस

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पस्तीस 

भगवंताचे बोलणे ऐकत राहावे अशी अर्जुनाची इच्छा तीव्र झाली असल्याचे  श्रीकृष्णाचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना मनस्वी आनंद झाला कारण त्यांचे बोलणे यथार्थपणे ग्रहण करणारा अर्जुन श्रोता म्हणून लाभला होता. म्हणून ते आता पुढील निरूपण करतील. त्या प्रसंगीं शांतरस स्पष्टपणे मनाला भावेल. ज्ञानरूप बीजांचा रांजण आता उघडेल, सत्वगुणांची वृष्टी होईल, त्रितापां मधला आध्यात्मिक ताप वाहून जाईल नि चतुर श्रोत्यांच्या चित्तांचें अवधानरूपी सुंदर वाफे तयार होतील  सोन्यासारखा उत्तम वाफसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना बीं पेरण्याची इच्छा झाली
श्री ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंनी मोठ्या प्रेमाने माझे मस्तकावर हात ठेवून मला ज्ञानबीज प्रदान केले आणि म्हणून माझ्या मुखातून जे काही निघेल ते संतांना निश्चितपणे आवडेल
तेव्हा सद्गुरूंनी आज्ञा केली की ते सर्व आता राहू देत, भगवान् श्रीरंग पुढे काय बोलले ते सांग
ज्ञानदेव म्हणतात की आता मी जें सांगेन ते मनाच्या कानाने ऐकावे, बुध्दीच्या डोळ्यांनी शब्द पाहावें नि चित्त लावून त्यांतील गर्भितार्थ ग्रहण करावा. अवधानरूपी हातांनी ते हृदयांत साठवावेत. सज्जनांच्या मनाला हे शब्द रिझवतील, नित्य आत्मप्राप्ती होईल, संकटांतून मुक्तता होईल आणि जीवाला सुखप्राप्ती होईल.
आतां श्री मुकुंद जे काही बोलतील ते मी छंदरूपांत सांगीन असे श्री ज्ञानदेव मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले
(आतां गीतेच्या सातव्या अध्यायाला प्रारंभ होतो, विज्ञान-योगाचा.) 

श्री भगवान् उवाच
मय्यासक्तमना: पार्थ योगं युन्जन्मदाश्रय:
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु /१॥
ज्ञानं तेsहं सविज्ञानमिदम् वक्षा्म्यशेषत:  
यज्ज्ञात्वा नेह भूयोsन्यज्न्यातव्यमवशिष्यते /२॥
(माझे ठायीं मन आसक्त ठेवून आणि माझ्याच आश्रयाखालीं योगमार्ग चोखाळणाऱ्याला माझे संशयरहित यथार्थ ज्ञान होईल. मी तुला विज्ञानासह आत्मज्ञानाविषयीं देखील उपदेश करीन. असे सम्यक ज्ञान-विज्ञान प्राप्त झालेवर इतर अन्य ज्ञान मिळवण्याती गरज राहणार नाही.) 

ज्ञानदेव यांवर भाष्य करताना सांगतात की हे पार्थ, मला यथार्थपणे जाणू शकणारे गुह्य ज्ञान तर मी तुला देइनच, पण त्याचबरोबर विज्ञानाचीही महती देखील सांगेन. तुला साहजिकच प्रश्न पडेल की इथे विज्ञान कशासाठी. तर त्याचे कारण असे की विज्ञानाशिवाय मूळ ज्ञान होणे शक्य नाही. एकदा तीराला टेकलेली नाव जशी हलत नाही तसेच स्वरूपा झाल्यावर बुध्दीची धडपढ थांबते.
तैसी जाणीव (बुध्दी) जेथ रिघे (पोहचत नाही) विचार मागुता पाउलीं निघे तर्कु आयणीं नेघे (तर्काचे चातुर्य निष्फळ ठरते) आंगी जयाच्या  
अर्जुना तया नांव ज्ञान येर (इतर) प्रपंचु हे विज्ञान तेथ सत्यबुध्दी हे अज्ञान (संसार सत्य भासणे) हेंही जाण

अर्जुना, अरे हजारों माणसांत एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीची इच्छा होते आणि अशा अनेकां मधून क्वचित कुणाला माझे स्वरूप कळते. असे पहा, त्रिभुवनातून एकेक चांगला सैनिक निवडून लाखोंचे सैन्य तयार करतात. अशा मोठ्या सैन्यातून एखादाच शस्त्रप्रहार झेलत विजयश्री मिळवतो

तैसें आस्थेच्या महापुरीं रिघताती (निघतात) कोटिवरी (कोट्यावधी) परि प्राप्तीच्या (मोक्ष) पैलतीरीं विपाइला (विरळा) निगे  
म्हणून हे ज्ञान समजून घेणे सोपे नाही, त्याचे महत्व असामान्य आहे. तेच मी तुला सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐक
भूमिरापोsनलो वायु: खं मनो बुध्दिरेव
अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्ठधा /४॥” 
(हीमाझीमाया पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुध्दी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली आहे.) 

तरी अवधारीं गा धनंजया हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची आणि इयेतें प्रकृती म्हणिजे जे अष्टधा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजें इयेस्तव  
आप तेज गगन मही (पृथ्वी) मारूत (वायु) मन बुध्दि अहंकार हे भिन्न आठै भाग  
या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था तिये नाम व्यवस्था जीवु ऐसी (जीवात्मा) जे जडातें जीववी (जीवन देते) चेतनेतें चेतवी (चैतन्य आणते) मनाकरवीं करवी शोक मोहो  
पैं बुध्दिच्या अंगीं जाणणें ते जिये जवळिकेचें करणें (सान्निध्याने) जिये अहंकाराचे विंदाणें (कौशल्याने) जगचि धरिजे  

एतद्योनीनि भूतानि सर्वाणित्युपधारय
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा /६॥” 
(सर्व प्रणिमात्र या दोन प्रकृतींपासून निर्माण झाले आहेत. म्हणून सर्व जगाचा आदि आणि अंत मी आहे असे समज.) 

अर्जुना, या आठ भिन्न महाभूतांची साम्यावस्था (पंचमहाभूतें, मन, बुध्दी नि अहंकार) म्हणजे माझीपरा-प्रकृतीहोय आणि तिलाचजीवभूता-प्रकृतीअसेही म्हणतात. ती जड वस्तूंत चेतना निर्माण करते नि चेतनेंत चैतन्य. हिच्यामुळें मनांत शोक किंवा मोह असे विकार निर्माण होतात. हिच्याच सान्निध्यामुळे बुध्दीला ज्ञान प्राप्त होते आणि ती बुध्दी अहंकाराच्या बळावर जग निर्माण करते
तीच सूक्ष्म पराप्रकृती जेव्हा स्थूलांत शिरते तेव्हा जणू प्राणिमात्र निर्माण करण्याची टांकसाळ उघडली जाते. मग स्वेदज, अंडज, जरायुज नि उद्भिज अशा चार प्रकारच्या आकृती तयार होतात. (मनुष्य, प्राणी, पक्षी, जलचर नि वनस्पतीं) . त्यांची घडण सारखी असली तरी जातकुळी वेगवेगळ्या असतात
अशा चौऱ्यांऐंशी लक्ष जाती निर्माण होतात आणि आणखीही कितीतरी, पण त्यांची मोजणी झालेली नाही
या प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो आणि त्यांची गणती केवळ प्रकृतीच करते. यानाण्यांचीप्रतवारी प्रकृती करते, त्यांचा प्रसार करते आणि त्यांची आटणीही तीच करते
मात्र दरम्यानच्या काळांत प्राणिमात्रांकडून कर्म-अकर्मांचा व्यवहार करवून घेते

अर्जुना, टांकसाळीचे हे रूपक असले तरीनाम-रूपाचा गलबलाप्रकृतिजन्य आहे हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. तरीही, हे सर्व परा-प्रकृतीचे व्यवहार माझ्या अधिपत्याखाली होत असल्याने जगाचा आदि, मध्य नि अंत मीच आहे

हें रोहिणीचें (मृगजळ) जळ तयाचें येइजे मूळ तें रश्मि नव्हती केवळ होय तें भानु (मृगजळाचें मूळ पाहू गेले तर ते सूर्यकिरण नसून केवळ सूर्याच्या आहे
तयाचिपरि किरीटी इया प्रकृति जालिये सृष्टी जैं उपसंहारोनि कीजेल ठी (निश्चय) तैं मीचि आहे (अगदी तसाच अर्जुना, जेव्हा प्रकृतीचा पर्दाफाश होतो तेव्हा तिथे मीच मी केवळ असतो.) 
या प्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्याच ठिकाणी होतात. दोरा जसा मण्यांना धारण करतो तसा मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी सोन्याच्याच तारेंत गुंफावेत तसा मी जगाला अंतर्बाह्य व्यापलेले आहे

मला खूप खूप आवडणारे पुढील दोन श्लोक आहेत हे

रसोsहम् अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो:
प्रणव: सर्व वेदेषु शब्द: खे पौरूषं नृषु    /८॥
पुण्यो गंध: पृथिव्यां तेजश्चास्मि विभावसौ  
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु   /९॥ 

म्हणौनि उदकीं रसु कां पवनी जो स्पर्शु शशिसूर्यो जो प्रकाशु तो मीचि जाण  
तैसाचि नैसर्गिकु शुध्दु मी पृथ्वीच्या ठायीं गंधु गगनीं मी शब्दु वेदांग प्रणवु  
नराच्या ठायीं नरत्व जें अहंभाविये सत्व ते पौरूषं मी हें तत्व बोलिजत असे  
अग्नि ऐसें आहाच (वरवर) तेज नामाचे आहे कवच तें परतें केलिया साच निजतेज तें मी (तेजाला अग्नि नावाचे वरवर दिसणारे जे कवच आहे ते दूर केले की खरे तेज मीच आहे.) 
आणि नानाविध योनी जन्मोनि भूतें त्रिभुवनीं वर्तत आहाति जीवनीं आपुलाल्या (त्रैलोक्यात अनेक प्रकारचे प्राणी उत्पन्न होऊन आपापलें आहार सेवन करून राहतात.) 
एकें पवनेचि पिती एकें तृणास्तव जितीं एकें अन्नाधारें राहती जळें एकें  
ऐसें भूतप्रति आनान (वेगवेगळे) जे प्रकृतिवशें दिसे जीवन ते आघवाठायीं अभिन्न मीचि एक  

बीजं मां सर्वभूतानां विध्दि पार्थ सनातनम्
बुध्दिर्बुध्दिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्   /१०॥
बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितम्   
धर्माविरूध्दो भूतेषु कामोsस्मि भरतर्षभ. /११॥” 
(क्रमश:..........




This page is powered by Blogger. Isn't yours?