Sunday, October 28, 2018

 

आरोग्य धाम खंड अकरा

आरोग्य धाम खंड अकरा 

गतकाळातील आठवणींनी जीवनचे अंतरंग ढवळून निघाले होते. संवईप्रमाणे म्हातारे जीवन महाशय आपली लांबलचक दाढी कुरवाळत होते. कालानुरूप बरीचशी खरखरीत झालीय् त्यांची दाढी, पुरेशी निगा राखल्यामुळे नि तंबाखूच्या प्रकोपामुळे. तरूणाईच्या वाह्यातपणा बरोबरच त्यांना स्वत: केलेले वाह्यातपण आठवून हंसू फुटले
एक विलक्षण धुंदी असते तरूण वयात. एखादा विकार मनांत बळावला की वाहत्या पाण्यासारखा त्याला कुठलाच धरबंध राहात नाही. बरे-वाईटाची, सामाजिक चौकटीची किंवा शास्त्रांची तमा नसते. वाळूच्या बंधाऱ्यासारखे वडीलधाऱ्यांचे शहाणपणाचे बोल विकारांच्या तडाख्यात नेस्तनाबूद होतात. बंधारा फुटेपर्यंत किंवा विचारांचा ओघ आटल्यावरच ते थांबतात

इतक्या वर्षांनंतर त्यांना आतां जाणवतेंय त्यातील फोलपण. त्या स्त्री रूग्णाकडून परततांना त्यांनी दैवाचे आभार मानले मंजरीशी लग्न लागले नसल्याबद्दल. तिचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला होता. मात्र आषाढाच्या सुरूवातीलाच दोघांचे लग्न लावून देण्याच्या वडिलांच्या फर्मानामुळे तो आपला निश्चय विसरला. त्या क्षणीं तरी त्याला स्वर्ग ठेंगणा झाला होता. आषाढ उगवता उगवतां तो आणि त्याचे ईप्सित यांमधली दरी नक्कीच कमी होईल.
होऊ घातलेल्या समारंभाच्या जाणिवेने सगळीकडे आनंदी आनंद पसरला आहे असे त्याला वाटू लागले. जवळपासची प्रत्येक गोष्ट त्याला प्रिय वाटू लागली. घरदार, निसर्ग, हवापाणी सगळे जणूं अमृतात न्हाऊन निघालेले

दरम्यान, जगत् बंधू आणि नवकृष्ण यांच्यात पत्रांची देवाणघेवाण सुरू होतीजगत बंधूंना लिहिलेल्या आपल्या दुसऱ्या पत्रांत नवकृष्ण यांनी लिहिले होते की त्या प्रसंगानंतर दु: नि लाजेमुळे मंजरीने अंथरूण धरले होते. पण तुमचे पत्र मिळाल्यानंतर तिने स्वत:ला बऱ्यापैकी सावरले असून ती आता पूर्ववत हसूखेळूं लागली आहे. हा सर्व शिवभक्तीचा प्रताप असल्याचे तिने आईला सांगितलेंय्
पत्रातील मजकूर जीवनने वडिलांच्या तोंडून ऐकला. हृदयभंग झालेली मंजरी पुन्हा उठून बसलीय. जीवनशीं होणाऱ्या प्रस्तावित लग्नाच्या बातमीने तिच्या मुखावर पुन्हा स्मितहास्य झळकू लागलेय. ती आपल्या एकांतवासातून बाहेर पडत असतांना त्याच्या नजरेसमोर जणू चंपक वृक्ष अचानक फुलांनी  डवरून  उठल्यासारखा त्याला भास झाला
त्याने ते पत्र चोरून आपल्या तीन जिवलग मित्रांना दाखवले, सिताब, सुरेन्द्र नि नेपाल. सुरेन्द्र त्याच्याच गांवचा तर इतर दोघे होते नवग्रामचे. सुरेन्द्र आणि नेपालने कधीच सुरूवात केली होती मद्यप्राशन करायला. दारू पिणे हा तांत्रिक नि धार्मिक परंपरेचा एक अनिवार्य भाग समजला जाई त्या काळीं. या भागांत तर तांत्रिक पूजेचा सुळसुळाट झाला होता, विशेषत: तत्कालीन पूजा सांगणाऱ्या ब्राह्मण मंडळींत. अगदीं किशोरवयीन देखील सर्रास दारचे सेवन करीत. मुंज झाल्यावर तर त्यांना धर्माचीही आडकाठी नसे
केवळ सिताब याला अपवाद होता. शक्तिपूजक ब्राह्मण कुटुंबातला असूनही त्याला दारूची भीती बसली होती. तांत्रिक पूजेसाठी तो पितळी पात्रात साठवलेल्या नारळ पाण्याचा वापर करत असे
सर्वात चलाख असलेला सुरेन हा ठाकुरदास मिश्रचा मुलगा. जमीनदाराच्या कार्यालयांत हिशेब तपासनिसाचे काम तो शिकला होता. त्याचा आग्रह होता कीमेजवानीव्हायलाच हवी. “सैल कर आपले पाकीट”,  त्याने फर्मावले, “खाऊपिऊ, दारू नि मौजमज्जा करू !” 
नेपाल एक बिघडलेला मुलगा होता सबरजिस्ट्रार ऑफिस मधल्या कारकुनाचा, जो खूप वर-कमाई करत असेनेपालच्या वडिलांबद्दल गावांत  एक म्हण रूढ झाली होती, “ म्हातारा बिनोद लांब डगला घालतो, त्याचे खिसे पैशांनी खुळखुळत असतात !” खरोखर, ते जेव्हा घरीं जात त्यावेळेस त्यांचे खिसे नाण्यांनी गच्च भरलेले असत
नेपाल खूप मोठ्याने बोलत असे, मोठ्यांदा हसे नि चालतांनाही पाय आपटत चालण्याची त्याची लकब होती. तो कुपटी किंवा विश्वासघातकी नव्हता. एकदा ब्राह्मण-भोजनाच्या निमित्त तो रघुबीरपुर ला जायला निघाला. मात्र अर्ध्या वाटेत त्याच्या लक्षांत आले की गळ्यात जानवे नाही. त्याला पहिलाच इसम दिसला तो होता बावरी समाजातला. “काय करू मी आतांकालीशरण , तुझे जानवे मला तात्पुरते उसने देशील ?”  आणि जरासा उदार होत त्याने जेवणाचे निमंत्रणही देऊन टाकले होते त्याला ! “चिंता करू नकोस, जेवणाचा खर्च मी करीन.” नि ठरल्याप्रमाणे त्याने तसे केले देखील. मस्तपैकी मटण-पुरी, मिठाई नि दारूपण यथेच्छ हाणली त्या दोघांनी. सर्व मिळून चक्क तीन रुपये उधळले दोघांमध्यें
त्यानंतर गाण्या-बजावण्याचा कार्यक्रम करीत चौघे मित्र. जीवन नि नेपाल गाणी म्हणत, सुरेन तबल्यासारखा ठेका धरी आणि सिताब उरलेल्या रसिक प्रेक्षकांचा रोल आदा करी
चंडीदास नि विद्यापतीची प्रेमगीतें ते मोठ्या आवडीने गात राहात, सिताबने दिलेली रसिक दाद मिळवत

नाही, तसे नव्हते नेहमीच. ते आतांशा विसरू लागलेत बरेचसे म्हातारपणामुळे. या सर्व आनंदोत्सवा दरम्यान ते गुलबकावली च्या फुलांचे चार हार गुंफत नि चौघेजण ते गळ्यांत घालून जल्लोष करीत
नेपाल नि सुरेन खूप आग्रह करीत त्यांना एखादा तरी दारूचा घोट घेण्याचा. मस्त आनंदोत्सव करूया, ते म्हणत. मात्र जीवन त्यांना कधीच बधला नाही. वैष्णव कुळांत जन्म घेऊन नि त्यातमहाशयबिरूद लावणाऱ्या कुटुंबातला असल्याने दारूचा स्पर्षही वर्ज्य होता. “माफ करा मला. तुम्ही माझ्या वडिलांना तर ओळखताच. शिवाय मंजरीचे कुटुंब सुध्दा आमच्या सारखे वैष्णव आहे.” 

लग्नाची तयारी जोरात सुरू होती. जगत् बंधूंच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह थाटामाटातच व्हायला हवा. ब्राह्मण, नातेवाईक नि खालच्या नऊ जातीतील प्रतिनिधींना पण निमंत्रण जाईल मेजवानीचे. शिवाय शेजारच्या गावातील मुसलमान नागरिकांना टाळून चालणार नव्हते. जगत् बंधूंनी सर्वांचा विचार केला होता. नाचगाण्याचा कार्यक्रम, आतिषबाजी नि दोन दिवस आणि रात्री चालणाऱ्या जत्रेचाही विचार सुरू होता. जीवनचे मित्र, तसेच ठाकुरदास मिश्र यांसारख्या सुप्रतिष्ठित व्यक्तींचा या दोन दिवसीय जत्रेला पूर्ण पाठिंबा होता

आषाढांत पाऊस पडण्याची दाट शक्यता महाशयांना भेडसावत होती. जोरात पाऊस आला तर निव्वळ अंगणाचे छत पुरणार नव्हते. त्या ऐवजी समाजगृहाची डागडुजी करून घेतली तर ? खर्च जवळजवळ तेवढाच येईल

मात्र मुहूर्ताच्या दिवसाची वाट पाहणे खरोखर अवघड जात होते. एकंदर उत्साह शिगेला पोहोचला होता, पण दिवस जणूं महिन्यांप्रमाणे संथगतीने जात आहेत असे वाटत होते. तरी पण तो दिवस जवळ येऊन ठेपलाच. आषाढातील एकादशीचा मुहूर्त काढला गेला होता. कालीदासाने लिहिलेल्या मेघदूतम या खंडकाव्याच्या पहिल्याच ओळींत वर्णन असलेल्या आषाढातील पहिल्या दिवशीं आकाशांत काळेकुट्ट मेघ जमून आले. मात्र ते सुप्रसिध्दपुश्करढगांसारखे विजांच्या कडकडाटा प्रमाणे नव्हते

पाऊस बदाबदा कोसळला नि नंतर वज्राघात झाला. मंजरीचा मृत्यू झाला होता. दुपारनंतर निरोप आला पत्रातून, ज्यांत लिहिले होते, ‘परवा रात्री माझी मुलगी कॉलऱ्याने दगावली आहे’. 
सगळी सोनेरी स्वप्नें क्षणार्धांत चक्काचूर झाली. त्या काळी पुरूषांनी आपले दु: जाहीरपणे व्यक्त करणे अयोग्य मानले जाई, प्रत्यक्ष पत्नी कालवश झाली तरी. आणि मंजरी तर केवळ होऊ घातलेली पत्नी होती
दु:खाने व्याकूळ झालेला जीवन माळ्यावरच्या खोलीकडे झेपावला. नाही, तो एकही अश्रू बाहेर पडू देणार नाही
तेवढ्यांत त्याने एक मोठी आरोळी ऐकली. ठाकुरदास मिश्र यांचा आवाज होता तो. “त्यांना वाटत असेल की ते आम्हाला सहज मूर्ख बनवू शकतात. ठाकुरदास मिश्र आहे मी. फांद्यांवर कुठेही लपून बसलात तरी पानापानांतून शोधून काढीन तुम्हा लोकांना. उगीचच नाही मी गावचा मुखिया. मला सर्व काही लगेच समजतं. मी त्या पत्र आणणाऱ्या इसमाला पाहिलंय संपत छपत गाशा गुंडाळतांना. मी जेव्हा त्याला हटकले तेव्हा म्हणाला घाईने परसाकडे जातोय. आता कॉलराग्रस्त गावाकडून आलेल्या माणसाला तातडीने शौच्यास जाणे समजू शकतो. पण त्याने गावाकडची वाट धरलेली पाहिली. मला पाहताच तो पळायला लागला. तेव्हा शेतात काम करत असलेल्या सुलेमान, करीम नि अब्बासला हाक मारून त्याला पकडा असे ओरडून सांगितले. त्यांनी त्याला पकडून माझ्यासमोर उभे केले. सुलेमानच्या हातांतला दंडा घेऊन जेव्हा त्या इसमाच्या पाठीत रट्टा हाणला आणि खरे खरे सांग, नाहीतर तुझी जीभ हासडून काढीन असा त्याला दम दिला. तेव्हा तो चुरूचुरू बोलू लागला पोपटासारखा आणि  सगळा उलगडा झाला

वास्तविक मंजरी ठणठणीत होती. तिचे लग्न भप्पी बोसशी लावले गेले होते ज्येष्ठातल्या एकोणतीस तारखेलाच
जीवनला जाणवले की अखेर मंजरीने जीवनच्या तोंडाला काळे फासलेच, जे ती त्या होळीच्या दिवशी करू शकली नव्हती. त्याला ती या क्षणी खिदळत असल्याचा भास झाला, भप्पी बोस सोबत

जगत् बंधू शांत होते. आपल्या मुलाकडे पाहात ते म्हणाले, “ईश्वराची मोठीच कृपा आहे तुझ्यावर जीवन. आयुष्यभर सांभाळाव्या लागणाऱ्या पापा पासून वाचवलेय त्याने तुला. तू तिच्याबरोबर कधीच सुखी झाला नसतास. तुला क्षणाचीही शांती मिळू दिली नसती तिने. खरंतर लग्नें स्वर्गातच ठरवलेली असतात, आपल्या इच्छेनुरूप नव्हेत. तुला वाईट वाटण्याचे कारण नाही. खचून जाऊ नकोस. शिवाय, तुला यांत लाज वाटण्यासारखे काही नाही.” ते स्नेहपूर्वक बोलत राहिले
वडिलांचे शेवटचे शब्द त्याच्या जिव्हारीं लागले होते. तो खोलीबाहेर जाऊ लागताच वडिलांनी त्याला अडवले. “एवढ्यांत जाऊ नकोस जीवन. सुरेन, याला घेऊन शेजारच्या खोलींत थांब. मला बोलायचंय याच्याशीं.”

ठाकुरदास त्या पत्र आणणाऱ्या इसमाची झाडाझडती घेत असल्याचे जीवनच्या कानांवर पडत होते आणि लवकरच तो इसम खरे काय ते ओकूं लागला
खरंतर नवकृष्णचा यांत कुठलाच संबंध नव्हता. मंजरी, तिची आई नि बंकिमने सर्व बनाव घडवून आणला होता. भप्पीला ठोसा मारणेयाचे भांडवल करीत त्या तिघांनी मोठे कुभांड रचले होते. “समजतो काय जीवन स्वत:ला ! त्याला त्याची जागा दाखवून दिली तर नांव नाही सांगणार बंकिम सिन्हा म्हणून.” बंकिम गरजला होता
पण नवकृष्ण सिन्हाला हे सर्व आवडले नव्हते. त्यांनी बंकिमच्या थोबाडींत लगावून फटकारले होते, “तूं आणलंस् त्या दोघांना इथे गाढवा !” फउ बंकिम बधला नाही. तो वल्गना करतच राहिला. “बदला घेईन मी त्याचा. मारून टाकीन त्याला !” 
कुणाला मारशील ?” 
बंकिमपाशीं उत्तर नव्हते याचे
दरम्यान भप्पीसुध्दा तिखटमीठ लावून वावड्या उठवत होताच आणि म्हणून नवकृष्णला दुसरा पर्यायच नव्हता जगत् महाशयांना पत्र लिहिण्यावांचून. त्या पत्राचें उत्तर देखील अनपेक्षित होते. मंजरीने आपला एकान्तवास सोडला. भप्पी बोसने केलेले घाणेरडे आरोप तिला असह्य होते कारण ते गावभर फिरत होते. मात्र जगत् महाशयांच्या उत्तरानंतर तिला बराच धीर आला. नवकृष्ण ते पत्र सगळ्यांना अभिमानाने दाखवत होते, ज्यांत जगत् बंधूंना लिहिले होते की मंजरीचे आम्ही असे स्वागत करू जणूं ती प्रत्यक्ष लक्ष्मी असावी. भप्पी बोस पिंजऱ्यातल्या डिवचलेल्या वाघासारखा तडफडत होता. पण तो काहीच कर शकत नव्हता. तरी पण नवकृष्णने सावधगिरी बाळगत आपल्या मूळ गांवी सहकुटुंब जाऊन राहणे श्रेयस्कर मानलें. कांदी मध्यें विवाह सोहळा करायचा त्यांना धीर झाला नाही. उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा पुन्हा सुरू झाल्यावरच्या काही दिवसांनंतरचा मुहूर्त पक्का केला गेला. वडिलांच्या रजेचा अर्ज घेऊन बंकिम कांदीला गेला आणि नकळे काय घडले, पण त्याची नि भप्पीची पुन्हा दिलजमाई झाली. दोस्ती अधिकच घट्ट झाली होती आतां
बंकिम परत घरीं आला आणि कटकटी सुरू झाल्या

त्या पत्र वाहकाने सिन्हा कुटुंबियांची मानसिकता सांगितली. ते सर्व या भरंवशावर होते की जीवन डॉक्टर होणार आहे ते. पण जगत् महाशयांच्या पत्राप्रमाणे तो आता पारंपरिककविराजीशिकणार होता नि ते स्वत: त्याला तसे धडे देत होते. मंजरीच्या आईला हा विचार अजिबात पटला नाही नि मंजरी देखील खूप खिन्न आणि अस्वस्थ झाली
नवकृष्ण सिन्हाने ही नाराजी दृष्टिआड ठेवणे पसंत केले. “काय फरक पडतो त्या मुळे ?” ते म्णाले.
एक कविराज ! असं कसं म्हणता तुम्ही काय फरक पडतो ते ? आतांशा कविराजांची काय किंमत राहिलीय् समाजांत ? आणि किती कमाई होत असेल त्यांची ! लिहून कळवा त्यांना की नियमित डॉक्टरी डिग्री मिळवायलाच पाहिजे तुमच्या मुलाने.” 
नवकृष्ण ताडकन् म्हणाले, “जीवन त्यांचा मुलगा आहे, माझा नव्हे. मला काही कर्तव्य नाही त्या बाबतींत.” 

एकंदरच घडामोडींमुळे मंजरी खूप रडली होती ते माहीत होते तिच्या आईला. “कसला रानटी दिसतो तो,”आईची कुरकुर, “शिवाय कविराज तर सदरा सुध्दां घालत नाहीत म्हणें. कसा दिसेल तो बनियान नि तोकड्या धोतरांत !” 
ताकीद आहे तुला. हे कार्य झाले नाही तर तुझी मुलगी बिनलग्नाची राहील आयुष्यभर ! भप्पी बोस विषारी सापासारखा आहे. त्याचे विष भिनलेय् मंजरीच्या चारित्र्यावर. तरी पण जगत् महाशय तयार झालेत तिला आपल्या कुटुंबात सामावून घ्यायला. कविराज असले तरी त्यांच्या थोरपणाबद्दल संशय घेऊ नकोस.” 
त्यावेळीं हा विषय थांबला. पण तो विराम तात्पुरता होता
कारण बंकिम परत आला होता भप्पीशी पुन्हा घट्ट मैत्री जुळवून. वादविवाद वाढत गेला नि अखेर नवकृष्ण गाढ झोपेत असतांना ते तिघे घराबाहेर पडले आणि एक बैलगाडी भाड्याने घेऊन सरळ कांदीला पोहोचले. लग्नासाठी दुसराच दिवस उपयुक्त होता
मात्र नवकृष्ण सिन्हा तिथे पोहोचेस्तोवर खूपच उशीर झाला होता. लग्न कधींच लागले होते. मंजरीने भप्पीच्या पुश्तैनी घरात प्रवेश केला होता नववधूच्या वेषांत
मंजरीच्या आईचा आनंद गगनांत मावेनासा झाला होता. “पहा कसा लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्,” ती उद्गारली

कोर्टात बनवेगिरीचा खटला लावायला हवास तूं, केलेच पाहिजे तुला,” ठाकुरदास आग्रहाने बोलले. पण जगत् ब्धूंनी तिकडे लक्षच दिले नव्हते. “चांगल्या कुटुंबातली सुंदर मुलगी पाहू आपण वधु म्हणून, आणि लग्नाची बार उडवून देवूंया याच महिन्याच्या एकादशीला. आधी लग्न नि मग खटला बिटला ! लग्नातली मौज-मजा आवरल्यावर कोर्टाची पायरी चढू. त्यांनी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही फसलेले नाही असे कोर्टाला ठणकावून सांगू आपण. दरम्यान, तू कायदेशीर कलमांची चाचपणी करून ठेव निवान्तपणे.” या विचाराने तेच चकित झाले होते
इतक्या मोठ्या अपमानानंतरही कसे प्रसन्न राहू शकतात जगत् बंधू याचे अख्ख्या गावाला नवल वाटत राहिले
अर्थात् नववधू शोधण्याचा त्यांचा इरादा पक्का होता, नि लग्नही एकादशीलाच होणार हेही निश्चीत होते. “सुरेन्द्र, तू येणार आहेस माझ्याबरोबर आणि सिताब, तूं सुध्दा. तुम्ही दोघांनी पसंत केली मुलगी तरच मी मान्यता देईन. लगेच शोध मोहीम सुरू करा. मुलगी गरीब कुटुंबातली असली तरी चालेल, मात्र ती सुस्वरूप नि निरोगी हवी आणि सुसंकृत घरातील.” 
सिताब, सुरेन्द्र आणि नेपाल या तिन्ही मित्रांनी जीवाचे रान करून चांगली मुलगी शोधून काढायचा चंग बांधला
नेपालने आपल्या काकांना पत्र धाडून  कायस्थ जातीच्या चांगल्या मुलीबद्दल तातडीने माहिती कळवण्याची विनंती केली. “हुंड्याची काळजी करू नका, कारण मुलाचे वडील आहेत धनाढ्य नि सुसंकृत जगत् बंधू कविराज ;आणि वर सुध्दा कविराजी शिकतोय्.
सुरेन्द्रनेही पक्का निर्धार केला नि जगत् बंधूंच्या आर्थिक बळावर त्याने मोहीम सुरू केली. तालुक्याच्या त्या गावांत अनेक होतकरू पण विशेष कामधाम नसलेले वकील त्याला माहीत होते. त्यांतील कित्येक कायस्थ जमातीतले असून अनेकांना लग्न झालेल्या थोराड मुली असण्याची शक्यता होती
नेपाल जरा विचित्र स्वभावाचा होता नि त्याचे मार्गसुध्दा तितकेच हास्यास्पद ! त्याचे वडील कारकून होते पंचायत ऑफिसांत. नेपाल तिथे जाऊन लोकांवर रुबाब गाजवत असे. तो त्यांची बारकाईने चौकशी करून स्वत: सर्टिफिकेट देऊन मोकळा होई. ते दाखले काहीसे असे असत, “मी नबगाराम निवासी  नेपालचंद्र मूखोपाध्याय, श्री बिनोदलाल मुखोपाध्याय यांचा मुलगा, या गृहस्थाला ओळखत असून माझ्या माहितीप्रमाणे त्याचे नांव, वडिलांचे नांव नि गावाचे नांव बरोबर आहे.” आपली सही करून तो दोन आणे फी म्हणून उकळत असे
ऑफिस समोरच्या झाडाखाली बसून तो प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या इसमाला विचारी, “मी काय म्हणतो चॅटर्जी, तुझ्या माहितींत लग्नालायक चांगली मुलगी आहे काय ?” “शुक शुक, तुमचे नाव कायगोबिद पॉल ? तुम्ही मला एका चांगल्या कायस्थ वधूची माहिती सांगू शकाल ?” “कुठले तुम्ही शेखसाहेब ? तुमच्या जवळपास कुणी चांगल्या घरातील सुंदर मुलगी आहे तुमचे पाहण्यात ?” 
वाटेंत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो असे प्रश्न विचारत सुटे. त्यांच्या शेतावर मजूर काम करणाऱा नबिन बागडी त्याच्या गावातून, कटोआतून, गंगाजळ आणायला निघाला तेव्हा  त्यालाही हीच विनंती केली त्याने, “खूप दूर जातो आहेस तूं नबीन ; पहा सुयोग्य मुलगी लग्नालायक.” 

जीवन तेव्हा तरूण होता नि अजूनमहाशयहे आदरार्थी बिरूद लागले नव्हते तिच्या नावापुढें. तो अजून नुसताच जीवन होता, जीवन दत्त. जबरदस्त आघात झाला होता जीवनवर, पण तो खचून गेला नव्हता. कदाचित् दुर्दम्य ईर्षेने तो होऊ घातलेल्या विवाहासाठी आतुर झाला होता तेव्हां. जीवनने त्याच्या पाठीवर चाललेल्या कुजबुजीची फिकर केली नाही. आपले नैराश्य लपविण्यासाठी उसनी प्रसन्नता मात्र तो दाखवत राहिला

आतां म्हातारपणीं त्याला तारूण्यांत केलेल्या धाडसांचे कौतुक वाटतेंय . दरम्यानच्या वर्षांत तो बराच परिपक्व झालाय्, प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीवर. आणि म्हणून तो आतां त्रयस्थ नजरेने पाहू शकतोय् मागील सर्व मूर्खपणावर. म्हटलेच आहे ना की सर्पदंश झालेल्या माणसाला कडू देखील गोड लागते नि गोड कडवट
नाही नाही ! ही तुलना बरोबर नाही. मंजरीने केलेली प्रतारणा त्याच्या प्रेमाशीं कुठेच मेळ खाणारी नाही. प्रेमाची तुलना विषाशीं कशी करता येईल ? खरं तर त्यानेच विषाचा अख्खा प्याला रिचवला होता नैराश्यापोटीं
त्याने दोन गोष्टी पक्क्या ठरवल्या होत्या तेव्हा. एक तर तो लग्न करेल एका अतिशय सुंदर मुलीशी, नि तिच्यावर प्राणापलीकडे प्रेम करेल रामायणांतल्या अजा राजा सारखा, जो पत्नी इंदुमतीवर बेहद प्रेम करायचा. दुसरे, तो डॉक्टर होणार कुठल्याही परिस्थितींत. मेडिकल कॉलेज किंवा स्कूल मध्ये प्रवेश मिळाला नाही तरी तो घरीच अभ्यास करेल डॉक्टरकीचा. त्याच्या डोळ्यांसमोर अशा एका डॉक्टरचे ज्वलंत उदाहरण होते जो स्वत: स्वत: शिकला होता एक प्रख्यात डॉक्टर म्हणून. ते होते त्या प्रदेशातले नामांकित डॉक्टर रंगलाल मुखर्जी . जीवनसाठी डॉक्टर रंगलाल उगवत्या सूर्याप्रमाणे होते त्याचे प्रेरणास्त्रोत म्हणून
उंचेपुरे, गोरेपान, तेजस्वी नि तीक्ष्ण नजर असलेले रंगलाल कोणत्याही समुदायात उठून दिसत. त्यांची बोलकी नि चाणाक्ष नजर त्यांच्या असामान्य विद्वत्तेची द्योतक होती. एक धडाडीचा कर्तबगार माणूस म्हणून इतरांहून वेगळेच होते रंगलाल. ते तसे कमी बोलत पण एरव्हीं त्यांचे रोखठोक बोलणे  त्यांच्यातील अहंकाराबद्दल विनाकारण गैरसमज पसरविणारे असत. हुगळी जिल्ह्यातील एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले रंगलाल कॉलेज च्या दुसऱ्या वर्षापर्यंत छान शिकले, मात्र त्यांना घर सोडावे लागले ख्रिश्चन मिशनरीज बरोबरच्या त्यांच्या मैत्रीमुळे. त्यांच्या वडिलांना हे अजिबात पसंत नव्हते, विशेषकरून त्या मंडळी समवेत अभक्ष्यही खात म्हणून.  
रंगलाल भयंकर स्पष्टवक्ते होते. ते म्हणत, “जातपात नि धर्मबिर्म मी नाही मानत. म्हणून साहजिकच त्या लोकांबरोबर जेवाखायला मला काहीच संकोच वाटत नाही. हा काही गुन्हा नाही आणि मी धर्मच मानत नसल्याने धर्मांतराचा प्रश्न येतोच कुठे ?” 
खिशांत दमडीही ठेवतां त्यांनी घर सोडले. सरळ चालत चालत ते या जिल्ह्यात येऊन पोचले आणि एका खेड्यातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले. तिकडच्या राजाने सुरू केलेल्या हायस्कूल मधें शिक्षकाची जागा रिकामी होती. त्यांनी अर्ज केला नि मिळाली तिथे नोकरी. याच सुमारास त्यांना  वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची लालसा उत्पन्न झाली. त्याचे कारण होते तिथल्याच हॉस्पिटल मध्यें काम करणाऱ्या डॉक्टरशी झालेली ओळख नि नंतर दोस्ती. ते त्याच्या बरोबर जात रूग्णांच्या व्हिजिटवर. हळूहळूं त्यांनी मेडिकलचेी पुस्तके वाचायला सुरूवात केली. रात्ररात्र चर्चा करीत ते या डॉक्टरशी. मात्र ती चर्चा कधीकधी हमरीतुमरी वर येई
अशाच एका भांडणानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. भांडण कशावरून झाले ते कुणालाच कधी कळले नाही. दोघेही या विषयावर मूग गिळून बसलेले
काही दिवसांनी रंगलालांनी नोकरीचा अचानक राजीनामा दिला आणि या गावांत आले गाडीभर सामान नि कित्येक पुस्तकांच्या गठ्ठ्यासमवेत. सुरूवातीला ते गावापासून सहा मैल लांब मयूराक्षी नदी जिथे नागमोडी वळण घेते तिथे एका टपरींत राहिले. बिरभूम जिल्ह्यातील लाल मातीचा तो भाग विशेषत: मुसलमान वस्तीचा होता. नंतर ते नदीकांठच्या स्वत: बाधलेल्या एका बंगल्यात राहायला आले. आपल्या बंगल्याच्या वऱ्हांड्यांत बसून समोर वाहणाऱ्या मयूराक्षी कडे पाहात आपल्याच विचारांत गढून जायचे, त्यांनी केलेल्या आजवरच्या वैद्यकीय अभ्यासाबाबत. कधीकधी मध्यरात्री ते कुदळ-फावडे घेऊन कबरस्थानांत जात नि नुकतेच गाडलेले प्रेत उकरून आणीत. घराच्या पिछाडीस मुद्दाम तयार करून घेतलेल्या कांचेच्या दारांच्या खोलींत नंतर ते स्वत:ला पुढचे काही दिवस जणूं कोंडून घेत. त्या खोलीकडे फिरकण्याची कुणालाच इजाजत नसे
त्या प्रेताचे डिसेक्शन करून पुस्तकातील वर्णन ते पडताळून पाहात. अशा रीतीने त्यानी ॲनॅटॉमी (शरीर विज्ञान) आत्मसात केले. दरम्यानच्या काळात त्यांनी एक साहाय्यक मिळवला होता नदीपलीकडच्या गांवातला. मनोहारी नांवाचा हा युवक एरव्हीं नावाडी म्हणून काम करायचा, पण स्मशानांत अंत्यविधिसाठी आलेल्या मंडळींची मदतही करायचा. तसा तो दारूड्या नि अतिखादाड म्हणूनही कुप्रसिध्द होता. तो कायमच भुकेला असे. अशी एक वदन्ता होती की एकदा वाट चुकलेल्या एका बोकडावर त्याने झडप घालून  मारले, चितेवरच्या आगींत खरपूस भाजले नि एकट्याने त्या बोकडाला फस्त केले होते. खरे खोटे तो बोकडच जाणे
हा मनोहारी रंगलालांचा पहिला प्रशंसक ठरला. काही वर्षांनी त्याला रंगलालचा आचारी म्हणून बढती मिळाली.त्याने शिजवलेले अन्न खाण्यांत रंगलालना कधीच संकोच वाटला नाही. शिवाय नदीत वाहून जाणारे प्रेत ओढून काढायला त्याची मोठीच मदत होई. शिवाय स्मशानांत टाकून दिलेले प्रेतही तो सहज उचलून आणत असे
काही वर्षें अशी गेल्यावर रंगलालने एक दिवस घोषणा केली की तो आता एक निष्णात डॉक्टर झालाय्. “कोणताही जुनाट किंवा कठीण रोगी आणा, मी त्याला बरा करीन”, तो म्हणें
त्याने आपला शब्द खरा करून दाखवला. लोकांना त्याचेबद्दल कुतुहल नि आदर वाटू लागला. लोक त्यांना चक्क धन्वन्तरी म्हणून संबोधूं लागले. डॉक्टर रंगलालने लवकरच एक पालखी विकत घेतली. मनोहारीला मात्र ते पटले नव्हते. खरं तर तुम्ही एक घोडा घ्यायला हवा, तो म्हणाला होता. तेव्हां, “मूर्ख आहेस तूं ! घोड्यापेक्षां माणसांनी वाहून नेणे जास्त मजेशीर असते !” 
तरी पण कां बापा ?” 
तुला नाही कळणार तें ! मला माझी हाडं मोडून घ्यायची नाहीत म्हणून !!” 


जीवन दत्तची खऱ्या आदर्श पुरूषाच्या मोठेपणा बद्दल अशी स्वप्नं होतीं. तो स्वत:ही तसाच मानसन्मान नि नांव कमवेल डॉक्टर रंगलाल सारखे, एक निष्णात डॉक्टर म्हणून. त्याची अशीही उत्कट इच्छा होती की एक दिवस आपल्या पत्नीला घेऊन जाईल कान्दी ला, तो स्वत: एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर नि ती वेल्व्हेटचे पडदे असलेल्या पालखींत, सोन्यामोत्यांच्या दागिन्यांनी नखशिखान्त नटलेली
मुर्शिदाबादला जाण्याच्या बहाण्याने तो कान्दीला जाईल भप्पी बोसच्या मोडके दार असलेल्या घरासमोरून. घोड्याचे लगाम सावरीत तो विचारणा करेल एक रात्र तिथे काढण्याची. रात्र बरीच झाली असेल नि त्याची पत्नी मंजरीच्या खोलीकडे जाईल
आम्हाला आजची रात्र इथे काढतां येईल काय ?” ती भाबडेपणाने विचारेल. “शेवटीं तुम्ही दूरचे का असेना, रक्ताचे नातेवाईक आहांत. नि पाण्यापेक्षां रक्त घट्ट असतेच ना !” 
मग नियतीप्रमाणे घडेल सर्व काही

मात्र कुणास ठाऊक कां, लग्नानंतर सगळे अनाकलनीय घडत गेले. जीवनला कळलेच नाही काय चुकले तें !

(क्रमश: ......


This page is powered by Blogger. Isn't yours?