Thursday, January 30, 2020

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग श्याहांशी

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग शाहांशी (eighty six) 

ज्ञानदेव ज्ञानियांची लक्षणे सांगत आहते

अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम्  
एतत् ज्ञानम् इति प्रोक्तम् अज्ञानं यदतोsन्यथा १३/११ 
(अध्यात्मज्ञानांत नित्य स्थिर असणे आणि तत्वज्ञानाचे मू़ल तत्व  असलेल्या परमात्म्याचे दर्शन यालाच ज्ञान म्हणतात. या उलट जे काही असेल त्याला अज्ञान असे म्हटले जाते

परमात्मा म्हणून जी एक वस्तू (ब्रह्म) आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवता येते ते ज्ञान वगळतां इतर सर्व प्रकारचे प्रापंचिक ज्ञान हे अज्ञान होय असा ज्याचा निश्चय झाला आहे त्यालाच खरा ज्ञानी म्हणणे रास्त ठरेल
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावी तेतुली ही वस्तुचि आघवी तें देखे ऐसी व्हावी बुध्दि चोख  
यालागीं ज्ञाने निर्दोखें (निर्दोष) दाविलें ज्ञेय देखे तैसेनि उन्मेखें (ज्ञानाने) आथिला जो (परिपूर्ण)  
जेवढी ज्ञानाची वृध्दी तेवढीच जयाची बुध्दी तो ज्ञान हे शब्दीं करणें लगे  
(असे पहा, ज्ञान जे काही दाखवील ते सर्व ज्ञेय  वस्तूच असते ; मात्र ती ज्ञेय वस्तु पाहण्यासाठी बुध्दी शुध्द असली पाहिजे. त्या ज्ञाना एवढी ज्याची बुध्दी प्रगल्भ आहे तोच ज्ञानी हे वेगळ्याने शब्दांत सांगायलाच हवे काय ? ) 

अशा प्रकारे अर्जुना, मी तुला ही अठरा ज्ञान-लक्षणें सांगितली. आतां ज्यालाअज्ञानअसे म्हटले जाते, तेही स्पष्ट करून सांगतो. खरं तर जे ज्ञान नाही ते अज्ञान होय असे आपोआप कळेल. असे पहा, दिवस संपला की केवळ रात्र तेवढी राहते हे सांगायला हवे काय ? अगदी तसेच, जे ज्ञान नव्हे ते अज्ञान होय
तथापि, अज्ञानाचीही काही लक्षणे सांगतो.

तरी संभावनें  (प्रतिष्ठेसाठी) जिये (ज्याने) जो मानाची वाट पाहे सत्कारें होये तोषु जया
गर्वें पर्वताची शिखरें तैसा महत्वावरूनि नुतरे (उतरत नाही) तयाचिया ठायीं पुरे अज्ञान आहे  


शिवाय, आपल्या विद्येचा डांगोरा पिटून पुण्यकर्मे करत असल्याचा बडेजाव करतो आणि आपले नांव नि कीर्ती प्रत्येकाच्या तोंडात राहील  या साठी आटापिटा करतो. स्वत:चा थाटमाट मिरवून सामान्य लोकांना नादीं लावतो आणि शेवटी त्यांची फसगत करतो, असा माणूस अज्ञानाची खाण होय असे समजावे. त्याच्या विचित्र वागणुकीने इतरांना कष्ट होते हे त्याचे खिजगणतीतही नसते. त्याचे साधे बोलणेही विषाप्रमाणे मारक ठरते. असा माणूस स्तुतिने फुगून जातो, मात्र जराशीही निंदा ऐकताच कपाळ बडवत राहतो

तैसा मानापमानीं होये जो कोण्हीची उर्मी साहे तयाच्या ठायीं आहे अज्ञान पुरें  
आणि जयाचिया मनीं गांठी (आतल्या गांठीचा) वरिवरी मोकळी वाचा दिठी (बोलणे पाहणे) आंगे मिळे जीवें पाठी (मनांत ) भलतया दे (भलतेच काहीतरी)  
व्याधाचे चारा घालणे तैसें प्रांजळ जोगावणे (वागणे) चांगाची (सज्जनांची) अंत:करणें विरू करी (जिंकून घेतो)  

गार शेवाळें गुंडाळली कां निंबोळी जैसी पिकली तैसी जयाची भली बाह्य क्रिया

अज्ञान तयाचिये ठायीं ठेविले असे पाहीं या बोला आन नाही सत्य मानीं  
आणि गुरूकुळीं लाजे जो गुरूभक्ती उभजे (त्रासतो) विद्या घेऊनि माजे गुरूसींचि जो  

 अशा पाप्याचे नांव घेणे म्हणजे तोंड विटाळण्यासारखे आहे. परंतु अज्ञान-लक्षणे सांगताना तसे बोलणे भाग पडले ! म्हणून आता गुरूभक्तांचे स्मरण करूंया म्हणजे आपोआप प्रायश्चित्त केल्यासारखे होईल

अर्जुना, तुला आणखी काही अज्ञान-लक्षणे सांगतो
असा अज्ञानी शरीराने सत्कर्म करण्याच्या बाबतींत आळशी तर असतोच नि त्याचे मनांत विकल्पाचे रान माजलेले असते, जसे आडवाटेवर कचरा नि घाणीने भरलेला आड असावा तसे ! त्या आडांत काटेकुटे नि हाडकें भरलेली असतात. अगदी तसाच अज्ञानी माणूस अंतर्बाह्य अशुध्द आणि अपवित्र असतो
ग्रामसिंह” (कुत्रा) जसे उघडें-झांकलेले पाहात नाही तसा द्रव्याच्या बाबतींतआपले-दुसऱ्याचेअसा भेद करीत नाही. स्त्री संबंधांतही तो त्या ग्रामसिंहा सारखाच वागतो, केव्हाही कुठेही
आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म चुकले किंवा नित्यनैमित्तिक कर्में करायची राहिली तरी त्याला त्याची खंत नसते. तथापि, पापाचरण करायला तो तत्पर असतो. जो संशय आणि विकल्पांनी पछाडलेला असतो असा पुरूष शुध्द अज्ञानाचा पुतळा होय

आणि स्वार्थें अळुमाळें जो धैऱ्यापासुनि चळे जैसें तृणबीज ढळे मुंगियेचेनि

पाऊल डबक्यांत ठेवतांच त्यातील पाणी गढूळ होते, तसा भीतीचे नाव काढताच तो गडबडून जातो. तो अतिशय अस्थिर मनोवृत्तीचा असल्याने तो कुठेच धड स्थिरावत नाही. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत सतत येरझार करतो तसा कायम भटकंती करत राहतो. ज्याप्रमाणे रांजणाला मातींत रोंवल्याशिवाय तो स्थिर राहात नाही तसा गाढ झोप किंवा मरणच त्याला स्वस्थ करू शकते ! चंचलपणांत तो माकडाचे भावंड असतो

आणि पैं गा धनुर्धरा जयाचिया अंतरा नाही वोढवारा (धरबंध) संयमाचा  
नाही पापाचा कंटाळा नेणें पुण्याचा जिव्हाळा लाजेचा पेंडवळा (मर्यादा) खाणोनि घाली (खणून काढतो)  
वसू (वळू) जैसा मोकाटु वारा जैसा अफाटु फुटला जैसा पाटु (पाण्याचा लोंढा) निरंजनीं (रानांत)  
आंधळें हातिरू (हत्ती) मातले (पिसाळले) कां डोंगरीं जैसे पेटलें तैसें विषयीं सुटले चित्त जयाचें  
आणि विषयांची गोडी जो जीतु मेला संडीं स्वर्गींही खावया जोडी एथूनीचि  

जशी गाढवीण गाढवाला जवळ फिरकूं देत नाही नि तरीही तो जवळ आलाच तर लाथेने त्याचे नाकाड फोडते, तसा विषयलंपट माणूस विषय-भोगासाठी जळत्या आगीतही उडी मारायला मागेपुढे पाहात नाही. किंवा मृगजळाच्या मागे धावून हरिण आपली छाती फोडून घेतो, तसा लंपट माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत विषयांपासून कितीही त्रास झाला तरी त्यांचे विषयीं आसक्त राहतो
बालपणीं केवळ आईच त्याचे सर्वस्व असते मात्र तारूण्यात येतांच स्त्रीच्या अंगसंगासाठी तो वेडापिसा होऊन जातो. आणि म्हातारपणीं मुलाबाळांसाठी तो कासावीस होतो
अशा माणसांत अज्ञानाला कांही सीमाच नसते

अर्जुना, अज्ञानाचे आणखीही काही दाखले मी तुला सांगतो ते नीट ऐकून ठेव

क्रमश:........



This page is powered by Blogger. Isn't yours?