Wednesday, February 01, 2017

 

श्री ज्ञानदेवांची गुरूवंदना

श्री ज्ञानदेवांची गुरूवंदना
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीचे निरूपण करताना पहिल्या अध्यायांत ओंकार स्वरूप श्री गणेशाचे आणि चौथ्या अध्यायात संतांचे अशी काही नमनें सोडलीं, तर इतर अनेक अध्यायांत आपले आध्यात्मिक गुरू निवृत्तिनाथांना नमन करूनच निरूपणाचा प्रारंभ करतात, कारण ज्ञानदेव आपल्या सद्गुरूंना परमात्मस्वरूपाचे प्रतीक मानतात.
श्री ज्ञानेश्वर मूलत: नाथपंथी असून या पंथांत गुरूचे स्थान सर्वोच्च मानले जाते. नात्याने वडील बंधू असलेले निवृत्तिनाथ आध्यात्मिक अधिकाराने ज्ञानेश्वरांचें सर्वस्व असे सद्गुरू आहेत. त्यामुळे सद्गुरूस्तवन हाच सर्व प्रास्तविकांचा कणा बनला आहे. हे गुरूस्तवन करताना स्वत:चा उल्लेख ‘निवृत्तिदास’, ‘निवृत्तिसुत’ अशा शब्दांनी त्यांनी केला आहे. “अहो मी तयांचा केला “ (म्हणजे मी जे काही आहे तो ‘त्यां’नीच घडविला आहे) असा कृतज्ञ उद्गार त्यांनी अन्यत्र काढला आहे. मात्र गुरूंच्या सामर्थ्याने काय घडूं शकते याचे तात्विक निरूपण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.

गुरू म्हणजे ज्येष्ठ ; गुरू म्हणजे श्रेष्ठ. वयाने, ज्ञानाने, कर्तृत्वाने आणि अधिकाराने गुरूचे स्थान अत्युच्च असते. (यांतील वयाच्या ज्येष्ठतेला फारसे महत्व नाही, कारण चांगदेवांची गुरू मुक्ताबाई केवळ बालयोगिनी होती ) !
आध्यात्मिक अधिकारामुळे गुरूचा जीवनानुभव समृध्द असतो आणि त्याला जीवनरहस्याचे पूर्ण आकलन झालेले असते. साहाजिकच इतरांना मार्ग दाखवण्याचे आणि त्यांच्या जीवनाला दिशा आणि अर्थ देण्याचे कार्य तेच करू शकतात. अशा सद्गुरूंची प्राप्ती होणे हे केवळ पूर्वपुण्याईमुळे किंवा महद्भाग्यानेच शक्य होते.
कृपा करायला गुरू सिध्द असले तरी ती कृपा मिळवण्यासाठी शिष्यही तत्पर असावा लागतो. मुख्य म्हणजे तो सुपात्र असावा लागतो. (ज्ञानेश्वर जेव्हा सद्गुरूंचे परोपरीने वर्णन करतात तेव्हा ते सत्-शिष्याच्या कसोट्याही सुचवीत असतात.) ‘मी उत्तम शिष्य आहे’ असे शिष्याने बोलून दाखवणे ही आत्मप्रौढी ठरते आणि ती टाळण्यासाठीच शिष्य स्वत:कडे जास्तीतजास्त कमीपणा घेत असतो ; एक प्रकारें तो गुरूरूपी परमेश्वराची दास्यभक्ती करत असतो. प्रसन्न वृत्तीचा अधिकारी गुरू आणि विनम्र वृत्तीचा जिज्ञासू शिष्य अशी जोडी जमली की तिथे मूर्तिमंत ज्ञान प्रकट होते.
“गुरू: साक्षात् परब्रम्ह” हे वचन शब्दश: प्रमाण मानून श्री ज्ञानदेवांनी “निवृत्ती” हे ‘तत्व म्हणून स्वीकारले ; निवृत्ती हे साक्षात “चित्सूर्य” आहेत म्हणून ते “स्व-प्रभ” आहेत ; त्यांचे ठायीं असीम आनंद उसळत असतो ; ते “केलिप्रिय” असल्याने “जगत्-उन्मीलनाची” त्यांची “क्रीडा” सतत चालू असते !!
पृथ्वीची क्षमाशीलता, चंद्राची अमृतशीलता, सूर्याचे तेज, जलातील माधुर्य, वायूचे सामर्थ्य, आकाशाचे व्यापकत्व, वेदांचे शब्दसामर्थ्य, आनंदातील उल्हास- थोडक्यात एकूणच सर्व विश्वरूप या ‘निवृत्ती-तत्वामुळेच’ आहे अशी त्यांची दृढ भावना आहे.
श्री ज्ञानदेव म्हणतात, “असे हे पूर्णब्रम्ह निवृत्ती-तत्व माझ्यांत पूर्णपणे शिरलेले असल्यामुळेच हे ‘ग्रंथ-कर्तृत्व’ “त्यांचे” आहे; ही ग्रंथाची दुजीसृष्टी “त्यांची” आहे. “येथ माझे जी उरलें पाईकपण” अशी ज्ञानदेवांची अतिशय विनम्र भूमिका आहे.

ज्ञानदेवांच्या संपूर्ण विवेचनात सद्गुरूंवरील अनन्य निष्ठा तर दिसतेच, पण त्यांचा ‘अहंशून्यभाव’ सतत जाणवत राहतो. ते म्हणतात, “वांचुनी, मी पढे ना वाची । ना सेवाही जाणे स्वामींची । ऐसिया मज, ग्रंथाची । योग्यता कें असे ? ।।”
परंतु, “साचचि गुरूनाथें । निमित्त करून मातें । प्रबंध व्याजे जगातें । रक्षिले जाणा ।। ‘मी’ बोलत नसतोच ! “माते दावीत बोले । स्वामी तो माझा !”
गुरूकृपेचे सामर्थ्य अपरंपार असते.
“म्हणौनि माझे नीच नवे । श्वासोच्छ्वासही प्रबंध होआवें । श्री गुरूकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणें ।।(१८/१७३४)
अशा रीतीने ज्ञानदेवांनी आपले हे “धर्मकीर्तन” “तुमचे केले”(१८/१७९२) असे मानले आहे ; त्यांनी सारे श्रेय निवृत्तीनाथांकडे दिले आहे.

आजच्या भरकटलेल्या काळात तर “ज्ञानेश्वरी” ही ‘माऊली’ आहे ; ती आपल्या मनांत आयुष्याचा नवा अर्थ देणारी आहे. जीवनात सहजतेने जगण्यासाठी ज्ञानदेवांनी भक्तियोग दिला; स्वाभाविकपणे वावरण्यासाठी ज्ञानयोग दिला; कृतीशील जाणिवेसाठी कर्मयोग विस्तारला, आणि या त्रयीतून जीवन सुंदर रित्या कसे जगावे याचा आदर्श घालून दिला !

भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायावर निरूपण करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “आत्मज्ञान प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर संतांना सर्वभावें शरण जावे ; संत हे ज्ञानाचे घर आहे ; संतसेवा ही त्या घराची दारें आहेत ; ती संतसेवा स्वाधीन करून घ्यावी. सेवेने संतुष्ट झालेल्या संतांना जिज्ञासापूर्तीसाठी प्रश्न विचारावे ; त्यांच्या बोधाने अंत:करण ज्ञानसम्पन्न होते ; ज्ञानासारखे पवित्र काही नाही.
अर्जुन त्याच अध्यायांत ज्ञानप्राप्तीचे उपाय कोणते असे श्रीकृष्णाला विचारतो. त्यांवर श्रीकृष्ण उत्तर देतात, “श्रध्दावान आणि संशयरहित मनुष्याला ज्ञानयोग प्राप्त होतो. संतांच्या उपदेशामुळे मनुष्य संशयरहित होतो, निर्भय होतो ; ज्ञानप्राप्तीमुळे त्याला ब्रम्हभाव प्राप्त होतो. हृदयांत ज्ञान स्थिर झाले की परम शांती मिळते.”
तेराव्या अध्यायात ‘क्षेत्र-क्षेत्रज्ञ’ विचार आला आहे ; यांत ज्ञानदेव ज्ञानयोगाचा विषय अधिक विस्ताराने मांडतात. हृदयात ज्ञान उत्पन्न झाले की इंद्रियांच्या क्रिया पालटतात;  ज्ञानी व्यक्तिजवळ असलेले “अमानित्व” इत्यादी गुणविशेष अतिशय उत्कृष्टपणे सांगितले आहेत, त्याचे विवेचन मुळातून  वाचणे उपयुक्त ठरेल !
त्याच अध्यायातील ‘आचार्योपासना’ वरील त्यांचें निरूपण ज्ञानदेवांच्या आदर्श गुरूभक्तीची साक्ष पटवते.

पूर्ण अद्वैतप्रिय, चिद्विलासवादी, अपार विनयशील श्रीज्ञानदेव म्हणतात, “ हे गुरूदेव ! जिथे सर्व द्वैतच संपते, परा-पश्यंतीसह वैखरीही हरपते तेथे आपले वर्णन करावे तरी कसे ? यासाठी स्तुतीचा खटाटोप सोडून नम्रपणे गुरूचरणी माथा टेकावा हेच भलें !!”

ज्ञानदेवांच्या काव्यस्फूर्तिचा बहर गुरूसापेक्ष आहे , तर त्यांच्या वक्तृत्व शैलीचा बहर श्रोतृसापेक्ष आहे. आपल्या भावार्थदीपिकेत वक्ता-श्रोता संवादाचे नवे नवे प्रसंग निर्माण करून ज्ञानेश्वर या संपूर्ण काव्यग्रंथात आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा ओलावा निर्माण करतात. या संवादांनी हा अध्यात्मग्रंथ अतिशय विलोभनीय असा नाट्यमय बनतो !

पंधराव्या अध्यायात श्री गुरूंची पाद्यपूजा का येते ? या आधीच्या अध्यायांत भक्तियोग, क्षेत्र-क्षेत्रज्ञ योग, गुणातीत योगानंतर ‘जाणत्याच्या’ भक्तीला गुरूचरणांशिवाय आणखी काय दिसणार ? ज्ञान-कर्म-भक्तीने ज्याच्यावर उभे राहून आपला देह विसर्जित करून पुन्हा चरणांच्या निर्गुण निरामय रूपात असणे हा पुरुषोत्तम योग आहे असे ज्ञानदेवांना यातून सांगायचे आहे. द्वैताच्या जाणिवेतून अद्वैताकडे जाणारा हा पुरूषोत्तमाचा प्रवास म्हणजे श्रेष्ठ प्रतीचा मानवधर्म आहे.

पसायदान ! ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने ‘निवृत्ती’ हेच परतत्त्व आहे; तोच ‘विश्वात्मक देव’ आहे. म्हणून आत्मा परमात्म्याशी ‘विश्वकल्याणार्थ’ प्रसादाची मागणी करीत आहे. विश्वव्यापक नियमांना ‘रित’ म्हणतात ; ‘दुरित’ म्हणजे विश्वव्यापक नियमांविरूध्द वर्तन ! हीच पापें !! हाच भयानक ‘तिमिर’ !!! आणि हीच जीवनसमस्या . यांवर ‘स्वधर्मसूर्याचा’ उदय हाच उपाय आहे. संतांच्या सहवासात याची जाणीव होते. व्यक्ती निरहंकार, निष्काम नि स्वधर्माचरण करणारी हवी. अशी व्यक्ती ‘ईश्वरनिष्ठ’ ! ईश्वरनिष्ठांची ‘मांदियाळी’ ‘भूमंडळीं’ अनवरत भेटली तर ती ‘सकल मंगलाचा वर्षाव’ करील !
हेच पसायदान प्राप्त होआवें !!

जय साईराम.

(संकलक)
प्र.शं.रहाळकर
पुणे ३१ जानेवारी २०१७


This page is powered by Blogger. Isn't yours?