Thursday, March 23, 2017

 

मार्गाधारें वर्तावें.....



मार्गाधारें वर्तावें......!

गेले अनेक दिवसांपासून एक ओंवी मनांत रूंजी घालत्येय. – “ मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रती ।। “ (ज्ञा. ३/१७१) 

या ओंवीचा सरळ भावार्थ असा की आपल्या समाजाच्या परंपरेप्रमाणे वागावे आणि सर्वांना धर्मांचरण म्हणजेच सदाचरणास, सत्कर्मांस उद्युक्त करावे. मात्र स्वत: अलौकिक असूनही आपले अलौकिकत्व सामान्य जनांना भासूं देऊं नये ( त्यासाठी स्वत: लोकबाह्य वर्तन करू नये !!) त्याचप्रमाणे कर्म आणि त्याचे फळ यांत आसक्त असलेल्या अज्ञानीजनांचा बुध्दिभेद करू नये ; त्यांची कर्मावरील निष्ठा नि श्रध्दा ढळवूं नये. ज्ञानी पुरुषाने जाणीवपूर्वक कार्यरत राहून आणि स्वत: निष्काम राहून अज्ञानी लोकांकडून सत्कर्में करवून घ्यावीत. 

या भावार्थाचा मागोवा घेताना इतर कित्येक ओव्या झरझर नजरेपुढे तरळल्या ; त्याचाही थोडक्यात परामर्ष घेवूंया. 
प्रथम आठवलीं ती तेराव्या अध्यायात वर्णन केलेली ज्ञानलक्षणें ! ‘अमानित्वम्’ चे इतके बहारदार वर्णन इतरत्र मिळणे खरोखर कठीण आहे. खरा ज्ञानी पुरूष किती कमालीचा विनम्र असायला हवा याचे उत्कृष्ट वर्णन माऊली करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ हे वचन आपल्याला तोंडपाठ आहे; पण खराखुरा विनम्रपणा एखाद्याच ए.पी.जें. अब्दुल कलामांत कां प्रकर्षांने जाणवतो ? 
लोकांना सत्कर्माकडे प्रवृत्त करण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे स्वत: तसे आचरण करणे. स्वत: कायम कार्यरत राहणे ; निष्काम, निरहंकारपणे - फलापेक्षा न बाळगतां - सतत लोकसंग्रह करीत जाणे - म्हणजेच जनसामान्यांचे लोकशिक्षण करीत त्यांना सत्कर्म, सदाचरणाच्या मार्गावर अग्रेसर करणे ! “लीडींग पीपल् थ्रू प्रिसेप्ट   अँड  एक्झाम्पल !” 
मात्र हे सर्व करीत असतांना आपण स्वत: इतरांपेक्षा वरिष्ठ अथवा श्रेष्ठ आहोत याची यत्किंचितही जाणीव इतरांना होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी कारण त्यायोगे नकळत घुसणारा सूक्ष्म अहंकार टाळतां येईल. ‘ओव्हर्ट’ असो वा सूक्ष्म, अहंकारच सर्व दुर्गुणांचे मूळ होय हे तर आपण सर्वच जाणतो ; तथापि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि अगणित जन्मांनंतरही त्याचा खात्मा करता येत नाही. तरीपण ज्ञानदेवी अतिशय कनवाळूपणे नि हळुवारपणे सर्व प्रकारचा अहंकार नष्ट करण्याचे बळ देते. 

खरे तर अमानित्व (egoless ness) आणि अदंभित्व (non-hypocrisy) सर करता आले तर त्यापुढील अहिंसा, क्षमा, आर्जव, अपैशून्य, दया, शांती   इत्यादी अठरा ज्ञानलक्षणे काबीज करणे अशक्य नाहीत !! 

तूर्तास एव्हढे पुरे !!!

पुणे २३ मार्च २०१७


This page is powered by Blogger. Isn't yours?