Friday, May 22, 2020

 

पसायदान Corrected version

पसायदान 

गेली अनेक दशकें कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता सुरेल, सुमधुर स्वरांत गाइलेल्यापसायदानानेहोत असल्याचे मी पाहात आलो आहे. वास्तविक ज्ञानेश्वरी सारख्या काव्यमय, रसाळ आणि अमृतमधुर प्रवचनाची सांगता माऊलींनी पसायदानाचे निमित्ताने आपल्या सद् गुरूंजवळ विश्वकल्याणार्थ विनंतीवजा प्रार्थनेने केली आहे. यापसायदानाचेअंतरंग उलगडून पाहण्याचा हा एक प्रयत्न

मुळांत ज्ञानेश्वरी हे धर्मकीर्तन असून यांत सर्व नवरसांचे मनोहारी मिश्रण पाहायला मिळते. तथापि प्रामुख्याने शांतरस असलेल्या या काव्यांत अद्भुतरस जणू पाहुणा आलेला आहे. ज्ञानेश्वरी ही खरीखुरीभावार्थ दीपिकाआहे. या दीपिकेच्या शांत, सौम्य नि शीतल प्रकाशांत वाचन श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत अमृत वर्षावाने चिंब चिंब करून टाकले आहे. खरं तर या नऊ हजार ओव्यांतून माऊलींनी श्रोत्यांशी हृदयसंवाद साधला आहे
तथापि, हे पसायदान केवळ नऊ ओव्यांत मांडतांना जणू नऊ हजार ओव्यांचा सारांश सांगितला आहे माऊलींनी

मंदिराच्या कळसाचे जरी दर्शन घडले तरी प्रत्यक्ष दर्शन झाल्याची भक्त-भाविकांची श्रध्दा असते. ज्ञानेश्वरीचे समग्र पारायण नि आकलन झाले नाही, मात्र केवळ पसायदान नीट समजून घेतले तरीएक तरी ओंवी अनुभवावीया नामदेवरायांच्या उक्तीचे मर्म कळून येईल

प्रसाद देणारा प्रसन्न मनाने देतो आणि प्रसाद घेणारा त्या पासून संतोष पावतो (प्रसादस्तु प्रसन्नता) असे म्हटले जाते
श्री ज्ञानदेवांचे हें पसायदान वैदिक प्रार्थनेशी मिळते जुळते आहे - “सर्वेsत्र सुखिन: संतु सर्वे संतु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात् ” (जगांतील सर्वजण सुखी असावेत, सर्वजण आरोग्यसंपन्न असावेत, सर्वांना हितकारक आणि मंगलमय प्रसंग पाहायला नि अनुभवायला मिळावेत आणि दु: कुणाच्याही वाट्याला येवूं नये) . 
पसायदानाचेआणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीज्ञानदेव कोणत्याही पारंपारिक देवी-देवतेचा उल्लेख करतांविश्वात्मक देवाला आवाहन करतात, जो सर्वांच्या अंतर्यामी सुप्रतिष्ठित असतो ! शिवाय हेमागणेकुठल्याच विशिष्ठ धर्मातील, जातीतील, देशांतील किंवा समाजासाठी नाही नि त्याला काळाचीही मर्यादा नाही ; ही प्रार्थना स्थल-कालातीत आहे. या प्रार्थनेंतून ज्ञानदेवांनी लोककल्याणाचा भव्य आदर्श उभा केला आहे. त्यांची ही अपेक्षा कधी ना कधी तरी सफल संपूर्ण होईलच आणि त्या साठी प्रत्येकाने हा पसायदान रूपी ध्रुवतारा आपल्या दृष्टिआड होऊ देऊं नये
तसे केले तर आजचे अनेक प्रश्न सहज सुटतील, परस्परांत मैत्र जडले तर हिंसाचार नि प्रदूषणाला आळा बसेल आणि विश्वालास्वधर्म-सूर्याचा साक्षात्कार घडेल
आणि म्हणून आपण सर्वांनी जाणीवपूर्वक, समजून-उमजून या विश्वगीताचे गायन करूंया

)    “आतां विश्वात्मकें देवें येणें वाग्यज्ञें तोषावें  
तोषोनि मज द्यावें पसायदान हें  
(शब्दरूपांत केलेल्या या यज्ञामुळें विश्वरूप अशा परमात्म्याने संतुष्ट होऊन मला पुढील प्रमाणे प्रसादाचे दान द्यावे - ) 

).  जे खळांची व्यंकटी सांडो तयां सत्कर्मीं रति वाढो  
      भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचें  
    (दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होवो, सत्कर्मांविषयीं त्यांचे मनांत आवड निर्माण होवो आणि सर्व प्राणीमात्रांत परस्परांविषयीं जीवाभावाची मैत्री जडावी

).  दुरितांचें तिमिर जावो विश्व स्वधर्मसूर्यें पाहो  
     जो जे वांछील तें तो लाहो प्राणिजात  
    (पातकाचा, म्हणजे दुष्ट कर्मांचा अंध:कार दूर होवो, ‘स्वधर्म रूपी सूर्याने विश्व उजळून जावो, भूतमात्र ज्याची इच्छा करतील तें त्यांना प्राप्त होवो

).  वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
     अनवरत भू-मंडळीं भेटतु भूतां  
    (सकल मंगलाचा, म्हणजे संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, म्हणजे समुदाय या पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्रांना अनवरत, म्हणजे निरंतर भेटत राहो

).  चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गांव
     बोलते जे अर्णव पीयूषांचे  
   (सज्जन हे चालत्याबोलत्या (चलां) कल्पतरूंची उद्यानेच (आरव) असतात ; कल्पिलेल्या किंवा इच्छिलेल्या वस्तू देणारे वृक्ष - असे सज्जनांचे बाबतींत म्हणता येते. ते चैतन्ययुक्त अशा चिंतामणींचे गांवचे गांवच असतात. सज्जन म्हणजे अमृताने भरलेले जणू बोलके समुद्र (अर्णव) असतात

).  चंद्रमें जे अलांछन मार्तंड ते तापहीन  
     ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु  
   (सज्जन हे कलंकरहित असे चंद्र असतात ; ते तीव्र ऊष्णता देणारे सूर्य असतात ; असे हे सज्जन सर्वांचे आप्त-स्वकीय होवोत

).  किंबहुना सर्व सुखीं पूर्ण होवोनि तिन्ही लोकीं  
     भजिजो आदि पुरूखीं अखंडित  
   (फार काय सांगावे, समाजातल्या सर्व लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण व्हावे. सर्व जणांना त्रैलोक्यांतली सर्व सुखें लाभावीं. आदिपुरूषाच्या, म्हणजेच विश्वाच्या आरंभस्थानीं असलेल्या परमेश्वराचे ठिकाणी त्रैलोक्याने अखंड भक्ती करावी

) आणि ग्रंथोपजीविये विशेषें लोकीं इये  
   दृष्टादृष्ट विजयें होआवें जी  
   (आणि अहो, या जगांत ज्यांचेसाठी हा ग्रंथ जीवनसर्वस्व होऊन राहिला आहे अशा व्यक्तींना इहलोकीं आणि परलोकींच्या सर्व भोगांवर विजय प्राप्त होवो

).  येथ म्हणें श्रीविश्वेश्वरावो हा होईल दानपसावो  
   येणें वरें ज्ञानदेवो सुखिया झाला  
   (तेव्हा विश्वाचे प्रभुराय (म्हणजे ज्ञानदेवांचे वडील बंधू नि गुरू श्री निवृत्तिनाथ) म्हणाले, “ज्ञानदेवा, हा दानप्रसाद सफल संपूर्ण होईलतूं  मागितलेल्या प्रसादाचे देणे तुला लाभेल.” या आशीर्वादाने ज्ञानदेव मनोमन सुखावले

हरि: ओम् तत्सत् “ 


(प्रभु रहाळकर, पुणे २१ मे २०२०

This page is powered by Blogger. Isn't yours?