Monday, May 30, 2022

 

आनंदाचे डोहीं आनंद तरंग…..!

 आनंदाचे डोहीं आनंद तरंग !

आज पेपरमधे एक झकास व्यंगचित्र पाहिले नि मनापासून दाद द्यावीशी वाटली. त्यांत एक माणूस दुसऱ्या एकाला पोलिस ठाण्यांत आणतो आणि महागाई, भ्रष्टाचार, अठराविश्वें दारिद्र्यांत राहूनही हा कायम हंसतमुख आणि आनंदी असतो म्हणून त्याचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद करतो ! खूप आवडली मला ती थीम


खरंच, इतकाले संत सत्पुरूष आणि सर्व ग्रंथ तुम्ही केवळ आनंदस्वरूप आहांत असे घसा खरवडून सांगत आलेत. त्यातील क्वचित् काही कायम प्रसन्न, आनंदी असलेले देखील पाहिले ऐकले आहेत, पण खरंच अत्यंत विरळा, दुर्मीळ

जरा हट् के बोलीन म्हणतो ! आम्ही मेडिकलला असतांना प्रत्येक प्रोफेसर आम्हाला सांगे की पेशंटला हात लावण्या आधीवॉच हिम इंटेंटली’ - काळजीपूर्वक त्याला आधींन्याहाळा’ , तो कसा आत आलाय कसा बसलाय त्याची चेहेरेपट्टी काय म्हणते वगैरे नीट पहा. खरेतर तुमचे निदान करण्या आधीच नीट न्याहाळणे तुम्हाला निश्चित अशी दिशा देतील.

मला ते कौशल्य कितपत जमले ते माहीत नाही, पण मूळव्याधीने ग्रस्त पेशंट कायम स्टूल किंवा खुर्चीवर पुढे सरकून बसेल, बद्धकोष्ट किंवा कॉन्स्टिपेशन असलेला कायम दुर्मुखलेला असेल असे काही जुजबी ठोकताळे मला उपयोगी पडलेत

बद्धकोष्टावरून एकटिपद्यावीशी वाटते - ज्याचा कोठा वेळचेवेळी साफ नि रिकामा असेल तोच आनंदयात्री होऊ शकेल ! तस्मात्, अधूनमधून रेचक घेत राहावे ! ! 

आता पाचकळपणा जरा बाजूला ठेऊन मूळ मुद्यावर येतो. खरंतर या विखानाला किंवा बखानाला दुसरेही एक कारण घडले. पहाटे पहांटे लताजींचेआनंदाचे डोहींकर्णसंपुष्टावर आदळले आणि त्या व्यंगचित्राचे नि या स्वरांचे औचित्य मनांत ठसले


आपण खरंच कायम आनंदी, हंसतमुख राहू शकतो काय - राहावेच हे खरे असले तरी ? मग त्यासाठी मला काय करायला हवे हा विचार मनांत येतांच श्रीसमर्थांचा दासबोध पुन्हा हातीं घेतला आणि सहाव्या  सातव्या पानावरच्या सगळ्या एकोणसाठ ओंव्या नजरेखालून घातल्या. त्यातील काही मोजक्याच आत्तां तरी अवश्य पाहाव्या अशी विनवणी करितो सलगीची


समर्थ म्हणतात

जन्मदु:खे जरा दु:खे नित्य दु:खे पुन: पुन:

संसार त्यागणे जाणे आनंदवनभूवनीं.      

(जन्मत: पदरीं पडलेले नि आधिव्याधींचे पुन्हापुन्हा दु: टाळण्यासाठी संसाराचा त्याग करून सरळ आनंदवनभूवनांत प्रविष्ट व्हावे. मला माहीत आहे की हा अनुवाद बरोबर नाही, तथापि संसार त्यागणे म्हणजे मनाने त्यापासून अलिप्त राहून आपल्यातच विराजमान आनंदाच्या घनदाट अरण्यांतल्या राजभुवनांत वस्तीला जावे - असा सरळ सोपा अन्वयार्थ करता येईल ! ) 

प्रत्यक्षांत संसाराचे गाडे हांकत असतांना त्यातील दु:खांची जाणीव ज्याची त्यालाच ठाऊक असते, तरी पण समर्थ सांगतातपरंतु येकदा जावे आनंदवनभूवनीं  

पुढे म्हटलेय

कष्टलो, कष्टलो देवा पुरे संसार जाहला देहत्यागास येणे हो आनंदवनभूवनीं

अजून पुढे म्हणाले

स्वर्गींची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थांसि तुळणा नाही आनंदवनभूवनीं  

ग्रंथीं जे वर्णिले मागे गुप्तगंगा महानदी जळात रोकडे प्राणी आनंदवनभुवनीं  

नंतर,

निर्मळ जाहली पृथ्वी आनंदवनभूवनीं

उदंड जाहले पाणी ।स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठानें आनंदवनभूवनी नाना तपें पुरश्चरणे नाना धर्म परोपरी गाजली भक्ति हे मोठी आनंदवनभूवनीं

बंड पाषांड उडाले शुध्द अध्यात्म वाढले रामकर्ता, रामभोक्ता आनंदवनभूवनीं  


अखेर रामकर्ता रामभोक्ता हीच खूण मनांत ठसली तरमलाकाहीच करणे नाही, निवान्तपणे त्या आनंदवनभूवनांत वस्ती करावी


(कित्ती कित्ती सोप्पं आहे नै बोला-ऐकायला ? तरी पण ते पोट साफ ठेवण्याचे पाहा बुवा ! ! ) 

रहाळकर

३० मई २०२२


Saturday, May 28, 2022

 

क्या पाया, क्या खोया …..!

 क्या पाया, क्या खोया……!

 या जिन्दगानींत मी काय मिळवलं नि काय काय हरवून बसलो याचा लेखाजोखा घेताना खूप मझा येतो आणि आपण आपल्यांत गुम होऊन  जातो. कधीमधी बरा असतो असा विरंगुळा कारण आला दिवस मागे ढकलण्याच्या नादांत बऱ्यापैकी थकावट जाणवते आतांशा. या आधी असे क्वचित घडत असे ; उद्याचेच नव्हे तर पुढचे दोनतीन तास मला काय करायचंय याचे प्लॅनिंग मनांत तयार असे नि बहुतेक वेळी त्याचे कार्यान्वयन होत असे. हल्ली हल्ली मात्र खूप काही करत राहावे असे वाटेनासे झाले असले तरी स्वत:च्या मनांत दडलेला मनोवैज्ञानिक म्हणतो की असे वागणे बरे नव्हे. यू मस्ट कीप युवरसेल्फ बेटर ऑक्युपाईड


तर लेखाजोखा ! या जिन्दगींत तर खूप काही कमावलं भैय्या आपण . मुळात उत्तम कुटुंब, आईवडील, सगेसोयरे, मित्र परिवार, पत्नी, मुलें, जांवई नि नातवंडें अगदी छानच गावली. नशीब देखील छानच म्हटले पाहिजे. कर्तृत्व थोडेफार जमले असले तरी दैव साथ देत गेले, संधी मिळत गेल्या, बहुतांश वेळी त्यांना योग्य तो सन्मानही मिळाला. यशापयश एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने मूळ नाणें कायम हातीं राहिले

उत्तम संस्कारांबरोबरच उत्तमातले उत्तम असे वैद्यकीय शिक्षण तर मिळालेच पण त्या वैद्यकीय शिक्षणाने माणसाच्या अगतिकतेचे, वेदनेचे, आशा-निराशेचे द्वंद्व तसेच विलक्षण इच्छाशक्तीचे मनोज्ञ दर्शन घडत गेले. कित्येक प्रसंगीं अशक्य वाटणारे शक्य झालेले पाहून कृतार्थ वाटले तर सहजसाध्य भासणारे नकळत हुलकावणी देणारे विदारक सत्य देखील अनेक वेळी  प्रत्ययास आले

बालपणी अत्यंत आळशी, कामचुकार, गुळाचा गणपती असलेला पाहता पाहतां पौगंडावस्थेत चक्क शारीरिक नि बौध्दिक कसरतीच्या मागे लागलों ! होय, आता माझाच विश्वास बसणार नाही इतका व्यायाम केला, भरपूर वाचन घडले नि ते सुध्दाहट् केकॅटेगरीतले, जसे निबंध, उत्कृष्ठ काव्य, राजकीय नि सामाजिक तत्वज्ञान वगैरे. अर्थात थोड्याफार प्रमाणात कथा कादंबरी, रहस्यकथा आणिपिवळ्यापुस्तिका पण

आध्यात्मिक ग्रंथांची नि साहित्याची गोडी खूप खूप उशीरा लागली, जवळ जवळ सत्तरी नंतर ! ! तथापि आता या घडीला तेच माझे सर्वोत्कृष्ठ मित्र नि सांगाती आहेत एवढे मात्र खरे

वाडवडिलांची पुण्याई नि परमेश्वर कृपेने आता सर्व बाबतींत स्थैर्य आले आहे, मी कृतार्थ आहे - कृतज्ञ आहे. म्हणूनच माझे कोणाकडे, अगदी ईश्वराकडेही, काहीच मागणे नाही. जे काही मिळाले नि मिळतेंय त्यात मी पूर्ण समाधानी आहे, संतुष्ट आहे


काय काय गमावले विचारतांय् ? कशाला हवा आता तो विचार, रात गई सो बात गई हेच खरे, इतका छान सूर जुळून आल्यावर आता बेसूर काय म्हणून व्हावे ? सबब पूर्ण विश्राम

रहाळकर

२८ मई २०२२


This page is powered by Blogger. Isn't yours?