Thursday, June 28, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सव्वीस)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सव्वीस
श्री भगवान् उवाच
अनाश्रित: कर्मफलं कार्य कर्म करोति :  
संन्यास योगी निरग्निर्न चाक्रिय: /१॥” 
(कर्मफलाची आसक्ती ठेवतां जो विहित कर्में करतो, तोच खरा संन्याशी आणि तोच योगी होय. जो अग्निहोत्र आणि विहित कर्में करतां निष्क्रिय असतो तो संन्याशी आणि योगीही नसतो). 

अर्जुना, योगी आणि संन्याशी हे वेगवेगळे असल्याचे तुला वाटत असेल तर इतके पक्के ध्यानांत ठेव की तात्विक दृष्ट्या ते दोन्ही एकच आहेत. कारण ज्ञानप्राप्ती नंतर ते दोन्ही ब्रह्मरूपच होतात, जरी त्यांच्यांत नामभेद असला तरीही. जसे एकाच पुरूषाला विविध नावांनी बोलावतां येते किंवा एकाच ठिकाणी जायला अनेक मार्ग असू शकतात. अथवा, एकच पाणी अनेक भांड्यांमधें भरतां येते, तसेच आहे योग नि संन्यासांतले अंतर
अरे, शास्त्र-संमत आणि संतमंडळींना मान्य असा सिध्दांत म्हणजे, जो कर्में करूनही कर्मफलाची आसक्ती बाळगत नाही तोच योगी नि तोच संन्याशी होय
असे पहा, पृथ्वी वृक्ष इत्यादींना पाळते पोसते, पण कर्तृत्वाच्या अहंकारापोटीं   त्यांचेकडून फळांची किंवा धान्याची अपेक्षा करीत नाही

तैसा अन्वयाचेनि आधारें (कुलाचाराप्रमाणे) जातीचेनि अनुकारें (अनुरूप) जें जेणे अवसरें (प्रसंगीं) करणे पावे (करावे लागते) तें तैसेंचि उचित करी (योग्यप्रकारें करतो) परी साटोपु (अहंकार) नोहें शरीरीं आणि बुध्दिही फळवेरीं (फलावर) जायेचिना
ऐसा तोचि संन्यासी पार्था गा परियेसीं (समजून घे) तोचि भरंवसेनिसीं योगीश्वरू  

याशिवाय जो पुरूष स्वाभाविक विहित कर्मांना बध्दक मानून त्यांचा त्याग करीन असे म्हणतो, तो पहिले कर्म टाकून दुसरे अंगावर घेत असतो. अंगाला लावलेला एक लेप काढून दुसरा चढवावा तसा तो निव्वळ खटाटोप असून व्यर्थ ठरतो
आधीच डोक्यावर गृहस्थाश्रमाचे ओझें असतांना संन्यासाचे अतिरिक्त ओझें काय म्हणून घ्यावें ? म्हणून अग्निॅसेवा, कुलधर्म आणि धर्माधिष्ठित सत्कर्मपालन करत असतांना कर्तृत्वाभिमान आणि कर्मफलाची आसक्ती सोडली तर योगामुळे मिळणारे आत्मसुख आपल्यातच सांपडेल
अरे, योग नि संन्यास एकच असल्याचे अनेकांचे एकमत आहे आणि शास्त्रांनी दोखील याच मताला उचलून धरले आहे
जेव्हा संन्यासाश्रम स्वीकारल्याचाही अभिमान गळून पडतो तेव्हाच कर्मसंन्यास घडत असतो नि तोच खरा योग होय असे स्वानुभवावरून लक्षात येते

आरूरूक्षोर्मुनिर्योगं  कर्म कारणमुच्यते  
योगारूढस्य तस्यैव शम: कारणमुच्यते  /३॥” 
(ध्यान-योगाच्या पर्वताचे शिखर गाठण्याची ईर्षा बाळगणाऱ्या मुनीला विहित कर्माचे आचरण हेच एकमेव साधन आहे, तसेच कठोर इंद्रियनिग्रह देखील अत्त्यावश्यक आहे). 
योगरूप पर्वताचे शिखर गाठायचे असेल तर कर्ममार्गाच्या पायऱ्या चढून जाण्याला पर्याय नाही. यम-नियम, म्हणजेच अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौर्य, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांच्या पायथ्यावरून योगासनाच्या पाऊलवाटेला लागावे. नंतर प्राणायामाच्या म्हणजे रेचक, पूरक, कुंभक यांच्या आडमार्गाने वर यावे. मग प्रत्याहार, म्हणजेच  इंद्रिय निवृत्त्तिच्या (इंद्रियांना विषयांपासून काढून त्यांना चित्त्तरूपांत स्थिरावणे) अर्धवट तुटलेल्या कड्यावरील निसरड्या वाटेने, जेथे बुध्दीचा विवेक डळमळू शकतो, वर चढून जावे. या ठिकाणी कठोर साधन करणारे हटयोगीसुध्दां कडेलोट होण्याच्या आशंकेने हतबल होऊ शकतात. तरी पण प्रखर वैराग्य नि सततच्या अभ्यासाने ते क्रमाक्रमाने मार्ग चोखाळत राहतात. अशा प्रकारें प्राण-अपान या वायूंच्या पाठीवर बसून म्हणजेच त्यांचेवर पूर्ण हुकुमत गाजवीत धारणेच्या म्हणजे अखंड एकाग्र चित्ताच्या विस्तीर्ण भूमीवरून ध्यानाचा, म्हणजे अखंड चिंतनाचा परमोच्च बिंदू गाठता येतो
योगमार्गाची वाट येथें संपते, प्रवृत्त्तीची हाव, म्हणजे काहीतरी करत राहण्याती, काहीतरी मिळवण्याची धडपढ थांबते. याचे कारण म्हणजे साध्य नि साधन एकरूप होऊन जातात (अनुक्रमें आत्मदर्शन नि अष्टांगयोग साधन). अशा अवस्थेत भावी काळाची चिंता राहात नाही आणि मागील कांही आठवावेसे वाटत नाही, बाह्य जगाची पूर्ण विस्मृती होणे हीच तीसमाधीअवस्था होय

अशाप्रकारें योगसाधना करून ज्यांनी समाधीसुखाचा अनुभव आणि आनंद घेतला अशा थोर योगीपुरूषांची लक्षणें तुला आता सांगतो

असा श्रेष्ठ योगी आत्मज्ञानाच्या सुखशैय्येवर  निवांत पहुडलेला असतो, कारण त्याचे इंद्रियांत विषय वासनांची वावट़ळ उठत नसते. सुखदु:खाचे कढ आले तरी तो विचलित होत नाही, की विषय वासना जवळ आल्या तरी त्यांचेकडे लक्ष देत नाही. इंद्रिये आपापली कर्में करत असली तरी त्याचे मनांत कोणत्याही फलाची आस नसते. तो शरीराने जागा असल्यासारखावावरत असला तरी पारमार्थिक दृष्टया तो निजलेला म्हणजे वृत्त्तिशून्य असतो, म्हणजे जगंत असून नसल्या सारखा असतो. असा पुरूषयोगारूढहोय हे तू जाणून घे
हे सर्व ऐकल्यावर अर्जुन खरोखर अचंभित झाला आणि त्याने विचारले की हे अनंता, त्या योग्याला अशी योग्यता कशी प्राप्त होते

पुढचा श्लोक खूप प्रसिध्द आहे
उध्दरेदात्मनाssत्मानं नात्मानमवसादयेत्
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन:   /५॥” 
(आत्म्याच्या सहाय्याने आपला उध्दार करून घ्यावा, आत्म्याला अधोगतीस  नेऊ नये. कारण तसे केले तर आपणच आपले मित्र असतो आणि केले तर आपलेच शत्रू. ) 
(आपण आपला उध्दार किंवा अवनती कशी करून घेतो? आणि यासाठी मनुष्याला कितपत स्वातंत्र्य असते? यासाठी तीन घटक महत्वाचे ठरतात. प्रकृती, प्रवृत्त्ति आणि परिस्थिती, म्हणजेच स्वभाव, प्रयत्न नि परिस्थिती.)

तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणें तुझे नवल ना हें बोलणें कवणासि काय दीजेल कवणें अद्वैतीं इये (या अद्वैत स्थितींत कोणाला कोण काय देणार?) 

पैं व्यामोहाचिये शेजे बळिया अविद्या निद्रितु होइजे ते वेळी दु:स्वप्न हा भोगिजे जन्ममृत्यूंचा (हा जीव भ्रांतिरूप अंथरूणावर बलाढ्य अशा अज्ञानरूपी मायेने झोपी जातो, म्हणून जन्म-मरणरूपी वाईट स्वप्नें भोगत राहतो). 
नंतर जेव्हा तो अचानक जागा होतो तेव्हा सर्व स्वप्न लोपते आणि याची पण त्यालाच जाणीव होते.
म्हणून अर्जुना, मिथ्या देहाभिमानाकडे लक्ष देंऊन आपण आपला घात करतो
खरोखर, ज्याने स्वत: स्वत:ला जिंकले तो स्वत: स्वत:चा मित्र होय. मात्र ज्याचा स्वत:वर ताबा नाही तो स्वत: स्वत:चा शत्रू होतो. आपला देहाभिमान व्यर्थ आहे. सर्व जगराहाटी त्या जगन्नियंत्याच्या योजनेनुसारच चालत असते, असा विचार करून अहंकार सोडला की आपणही ब्रह्मस्वरूप आहोत अशी जाणीव होते. आणि असे झाले की आपणच आपले कल्याण केल्यासारखे होते.
एरव्हीं कोशकीटकाच्या परी तो आपणया आपण वैरी जो आत्मबुध्दी शरीरीं चारूस्थळीं (प्रिय स्थळी) (आपल्या रम्य देहालाचमीअसे समजून जो या देहाला सर्वस्व मानतो, तो कोषकीड्या प्रमाणे स्वत: स्वत:चा वैरी बनतो
कैसे प्राप्तीचिया वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे कीं असते आपुलें डोळे आपण झाकी (ऐन लाभाच्या वेळी करंट्याला आंधळेपणाचे कसे डोहाळे लागतात पहा ! तो आपणहून आपले डोळे झाकून घेतो आणि वस्तुलाभाला अंतरतो). 
किंवा एखादा भ्रमिष्ट माणूसमी चोरीला गेलोकिंवामी हरवलोंअसे भलतेच वेड पांघरून बसतो
भ्रांती टाकून पाहिले तर तो खरोखर ब्रह्मच असतो, परंतु काही केल्या त्याच्या बुध्दीला ते उमगत नाही. स्वप्नांत सोसलेल्या तलवारीच्या वाराने खरंच कुणी मरतो काय?
जैसी ते शुकाचेनि अंगभारें नळिका भोविन्नली एरी मोहरें तेणे उडावें परी पुरे मनशंका (शुकाचेनि अंगभारें=पोपटाच्या भाराने, भोविन्नली=फिरली, एरी=उलटीकडे) (ज्याप्रमाणे  पोपटाला आधारासाठी टांगलेली नळी त्याच्या वजनामुळे उलटी फिरते, तेव्हा उडून जातां आपणच फिरलो अशी शंका घेऊनती नळी सोडत नाही). 
मग तो व्यर्थच मानेला पीळ देतो आणि पयांनी ती नळी छातीजवळ घट्ट आवळून धरीत ओरडत राहतो. मी खरोखर बांधला गेलोय् असे समजून पायाच्या चवडीने नळी बळकट धरतो नि अधिकच अडकून पडतो. असा जो व्यर्थ भ्रमांत पडला त्याला इतर कुणी बांधले होते काय ? नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो नळी काही सोडत नाही
म्हणौनि आपणयां आपणचि रिपु जेणें वाढविला हा संकल्पु येर स्वयंबुध्दी म्हणें बापू (श्रीकृष्ण) जो नाथिलें नेघे (खोटा अभिमान धरत नाही).

म्हणून जो देहाभिमानी आहे तो स्वत: स्वत:चा वैरी होय. आणि जो खोट्याचा अभिमान धरत नाही तो आत्मज्ञानी समजावा, असे भगवान् श्रीकृष्ण म्हणाले

(क्रमश

This page is powered by Blogger. Isn't yours?