Wednesday, November 27, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग ब्यांशी

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग ब्यांशी 

श्री ज्ञानदेव अहिंसेवरील निरूपण करतांना आपल्या विलक्षण प्रतिभेने  मनोवेधक विवरण करीत आहेत

पुढां स्नेह पाझरे माघां चालती अक्षरें शब्द पाठीं अवतरे कृपा आधीं  
तंव बोलणेंचि नाही बोलों म्हणे जरी कांही तरी बोल कोणाही खुपेल कां (होता होईतोंवर बोलतच नाही, आणि बोललाच तर दुसरा कुणी दुखावणार नाही ना असे त्याला वाटत राहते)
बोलतां अधिकुही निघे तरी कोण्हाही वर्मीं लगे आणि कोण्हासि रिघे शंका मनीं (अधिक-उणें बोलले गेले तर कुणाच्या तें वर्मीं तर लागणार नाही ना अशी त्याचे मनांत शंका असते

शिवाय, आपण मांडलेल्या मतामुळे दुसऱा कुणी गोंधळून जाईल , भीतीपोटी मागे फिरेल किंवा तिरस्कार करेल असा त्याचा भाव असल्याने त्याला कुणालाच दुखवायचे नसते, कुणाच्याच भुंवया उंचावूं नयेत म्हणून तो गप्प राहणे पसंत करतो. तरीही कुणाचे विनंतीवरून तो काही बोललाच तर ते बोलणे ऐकणाऱ्याला माता-पित्याप्रमाणे प्रेमळ वाटते

कां नादब्रह्मचि मुसे आलें कीं गंगापय (गंगेचे पाणी) असललें (पवित्र) पतिव्रते आले वार्धक्य जैसे (मूर्तिमंत नादब्रह्म अवतरावे, किंवा जणूं पवित्र गंगोदकाचा शिडकावा व्हावा किंवा पतिव्रता ग्रेसफुली वृध्द व्हावी तसे त्याचे बोलणे मधुर असते
तैसे साच (खरे) आणि मवाळ मितलें (मोजके) आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे  

विरोधी, उपहास करणारे, क्रूर, चेष्टेखोर, मर्मभेदक, अटी लादणारे, आवेशाचे, शंकेखोर, खोटी आशा लावणारे, गंडवणारे भाषण तो कधीही करीत नाही

आतां त्याच्या दृष्टीबद्दल सांगतात श्री ज्ञानदेव

अर्जुना, त्याची दृष्टी स्थिर असते नि भुंवया सरळ असतात (कपटसूचक नव्हेत) (असेही म्हणतात की नजर चंचल तर मन चंचल) त्याला जाणीव आहे अणुरेणूंत परमात्माच भरून असल्याची, नि म्हणून त्याला त्रास व्हावा  म्हणून तो कुणाकडेही टक लावून पाहात नाही. मात्र असे असूनही अंत:करणांत रूजलेल्या प्रेमापोटी त्याने नजर वर करून पाहिलेच तर

तरी चंद्रबिंबौनि धारा निघतां नव्हती गोचरा परी एकसरें चकोरां निघती दोंदें (चंद्रबिंबापासून स्त्रवलेले अमृत डोळ्यांना दिसत नसले तरी चकोरांना त्यांचा आस्वाद चाखून संतोष मिळतो

अगदी तसेच तो जिकडे पाहील तेथील प्राणी सुखावतात, कासवीच्या नजरेहूनही अधिक वत्सल

आतां त्या  अहिंसक ज्ञान्याच्या हातांचे वर्णन येते

तरी होऊनियां कृतार्थ राहिले सिध्दांचे मनोरथ तैसे जयाचे  हात निर्व्यापार (सिध्द पुरूषांचे मनोरथ जसे कृतार्थ - म्हणजे संकल्प-विकल्प रहित- असतात तसे त्याचे  हात मोकळे असतात).      

(वास्तविक श्री ज्ञानदेवांनी अहिंसक हातांचे अतिशय हळूवार वर्णन केले आहे. मात्र त्या ओव्या वाचत असतांनाच मंगेश पाडगावकरांची एक कविता प्रकर्षांने आठवली. संदर्भ सोडून असली तरी त्यातील काही पंक्ति पुन्हा नजरेखालून घालायला तुम्हालाही आवडेल !) 

(“हात हवे मज
हात हवे मज नाजुक सुंदर
जुइपुष्पांपरि ज्यांचे मार्दव......

हात हवे मज नितांत वत्सल
क्षमाशील जे क्षमेहुनीही
पुण्यशील जे गंगेहुनीही,
साफल्याचें अन् तृप्तीचे, ब्रीद जयांचे या धरणीपरि
सदैव ज्यांची वत्सल पांखर आकाशापरि.....

हात हवे मज तसले कणखर
कर्मयोग साकार ज्यांमधें, दिव्य उद्यांच्या मानवतेचें शिल्पकार जे.......

हात हवे मज तसले अद्भुत
सृजनशील जे दिव्य कलाधर 
जे ब्रह्म्याशी स्पर्धा करती
क्षुद्र असुंदर पाषाणांतुन 
निराकार चिरसौंदर्याची घडवी मूर्ति

हात हवे मज असे शुभंकर अन् प्रलयंकर
शांतिरूप जे,
ज्यांत जळे परि विराट संगर

हात हवे मज तसले मंगल
मध्यरात्रिच्या प्रशांत प्रहरीं 
जग सारे निद्रित असतांना
असतांना नभ नक्षत्रांकित
गिरि पद्मासनिं ध्यानावस्थित
चराचराचे मैत्र दाटुनी
सहजच जे प्रार्थनेत जुळती
सहजच जे प्रार्थनेंत स्फुरती

जे चिरजागृत, जे करूणामय
जे मृत्युंजय, जे अमृतमय
आशिर्वादच मूर्तिमंत जे
उरले जे उपकारापुरते 
हात हवे मज असले मंगल
पवित्र सुंदर ! )” 

असो ! ! 

श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात
बलहीन माणसाने कर्मसंन्यास घ्यावा, किंवा इंधन संपल्यावर अग्नि विझून जावा, अथवा मुक्या माणसाने मौन धरावे त्याप्रमाणे त्या हातांना काहीच कर्तव्यकर्मे उरली नसल्याने ते त्या अकर्त्या पुरूषांचे ठिकाणी स्थिर राहतात. वाऱ्याला धक्का लागेल किंवा आकाशाला नख टोंचेल या बुध्दिपोटीं तो विनाकारण हातवारे करीत नाही. तर मग अंगावर बसलेली माशी किंवा डोळ्यांसमोर उडणाऱ्या चिलटांना झटकून टाकावे, अथवा पशुपक्ष्यांना  भीती दाखवावी अशा गोष्टींबद्दल तर बोलायलाच नको ! शिवाय हातांत दंडुकाही घेणारा शस्त्रें काय म्हणून परजेल ? कमलपुष्पांना किंवा पुष्पमाळांना झुलवावें असे त्याला वाटत नाही, कारण गोंफण फिरवल्यासारखे नाही काय होणार त्यामुळे ! अंगावरच्या रोमांना हलविले जाईल म्हणून तो आपले अंग कुरवाळत नाही. त्याचे बोटांवर नखांच्या गुंडाळ्या झालेल्या दिसतील
आणि हातांना काही कामच द्यायचे ठरवले तरी ते वंदनार्थ जोडण्यापुरते

कां (किंवा) नाभिकारा (अभय देण्यासाठी) उचलिजे (उचलले जातात) हातु पडलियां देइजे नातरी आर्तातें (पिडलेल्यास) स्पर्षिजे अळुमाळु (हलकेच)  
हेंही उपरोधें (नाइलाजाने) करणे तरी आर्तभय हरणें नेणती चंद्रकिरणें जिव्हाळा तो (हे देखील तो नाइलाजाने करतो, पण आर्त माणसाचे जेव्हा तो भय दूर करतो त्यावेळेस जो कृपेचा पाझर असतो, तितका चंद्रकिरणांतही नसतो ! ) 

तो स्पर्ष इतका आल्हाददायक असतो जणू मलयपर्वतावरून येणारा चंदनाचा मंद सुगंध ! ते हात नेहमीच रिते नि मोकळे असले तरी चंदनवृक्ष जसा सर्वांगांनी सुगंधित असतो आणि त्याला एकही फळ येत नसतांनाही जसे निष्फळ म्हणता येत नाही, तसे ते हात असतात

आतां असो हे वाग्जाळ (बोलणे) जाणे ते करतळ (हात) सज्जनांचें शीळ स्वभाव जैसें (आता हे बोलणे पुरे ; सज्जनांचा शील स्वभाव जसे असतात तसेच त्याचे हात असतात

या पुढील भागांत श्री ज्ञानदेवमनाविषयीं सांगतील (अवधान दीजे ! ) 

क्रमश:.........





This page is powered by Blogger. Isn't yours?