Friday, December 27, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग चौऱ्यांशी

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग चौऱ्यांशी 

आतां ययावरी (या नंतर) गुरूभक्तीची परी (रीत) सांगों गा अवधारीं (ऐक) चतुरनाथा (चतुरश्रेष्ठ अर्जुना)  

ही गुरूसेवा पारमार्थिक भाग्याची जननी आहे. ती जन्म-मरणाच्या क्लेशांतून बाहेर काढून ब्रह्मपदावर विराजमान करते

ते आचार्योपास्ती प्रकटिजैल तुजप्रती बैसो दे एकपांती अवधानाची (अशी ही गुरूभक्ती मी तुला सविस्तर सांगेन, तूं ती एकाग्रचित्ताने ऐक

आपली सर्व जलसंपत्त्ती घेऊन गंगा जशी सागराकडे जावी, किंवा सर्व प्रमुख सिध्दांतांसह वेदविद्या ब्रह्मपदीं स्थिर व्हावी, किंवा ज्याप्रमाणे एक पतिव्रता स्त्री आपले सर्वस्व पतीला अर्पण करते, तसे ज्याने आपले तन-मन-धन गुरूकुलास अर्पण करून स्वत:ला गुरूसेवेचे घर केले आहे असा पुरूष
गुरूगृह जिये देशीं तो देशुचि नसे मानसीं विरहिणी कां जैसी वल्लभातें (जिथे गुरूंचे वास्तव्य असते त्याच ठिकाणी त्याचे मन जडलेले असते, जशी विरहिणी पतीचे विरहाने व्याकूळ असते

तियेकडूनि येतसे वारा देखोनि धांवे सामोरा आड पडे म्हणें घरा बीजें कीजो (तिकडून आलेल्या वाऱ्यालाही तो साष्टांग दंडवत घालून म्हणतो की माझे घरीं वसती करावी ! ) 

खरोखर, गुरूप्रेमाच्या वेडापोटीं तो गुरूगृहाच्या दिशेने बोलत राहतो. दूर गेलेल्या गाईच्या वासराला दाव्याने बांधून ठेवावे तशी त्याची अवस्था  असते. या दोराची गाठ. सुटून तो स्वामींना कधी भेटेल अशी त्याला तळमळ लागते आणि म्हणून काही क्षण देखील त्याला युगांप्रमाने वाटतात
अशा वेळी कोणी  गुरूग्रामाहून आले किंवा स्वत: स्वामींनीच कुणाला धाडले, तरी त्याला पुनर्जन्म झाल्याइतका आनंद होतो. अशा वेळी सुकलेल्य् अंकुरावर अमृताचा वर्षाव व्हावा, किंवा डबक्यातल्या माशाने सागर गाठावा अथवा कंगाल माणसाला अचानक घबाड सापडावे, किंवा आंधळ्यास स्पष्ट दिसू लागावे अथवा भिकाऱ्याला अचानक इंद्रपद मिळावे इतका त्याला हर्ष होतो. गुरूकुळाचे नुसते नांव ऐकूनही त्याला आकाश ठेंगणे वाटते

पैं गुरूकुळीं ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासीं चाकरी करी !  

तो आपल्या अंत:करणांत श्रीगुरूची प्रतिमा प्रस्थापित करून तिचेच ध्यान करीत राहतो. हृदयांत अशा प्रकारे श्रीगुरूंना ध्रुवाप्रमाणे स्थिर करून तो सर्वभावानिशीं गुरूंचा सर्व परिवार स्वत: होऊन राहतो

कां चैतन्याचिये पोवळीं माजीं (आवारात) आनंदाचियां राउळीं (मंदिरांत) श्रीगुरूलिंगा ढाळी (अभिषेक करतो) ध्यानामृत (ध्यानरूप अमृत)  
उदयिजतां बोधार्का बुध्दीची डाळ (परडी) सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे (ज्ञानसूर्याचा उदय होतांच बुध्दीची परडी सात्विक भावांनी भरून त्याची लाखोली श्रीगुरूरूप शंकराला अर्पण करतो

काळशुज्दी त्रिकाळीं जीवदशाधूप जाळी ज्ञानदीप वोंवाळी निरंतर (दिवसाच्या तीनही प्रहरीं जीवभावाचा धूप जाळून, ज्ञानरूप दिव्याने श्रीगुरूला नित्य ओवाळतो

सामरस्याची रससोय अखंड अर्पितु जाय आपण भराडा होय गुरू तो लिंग (श्रीगुरूला ऐक्यभावरूप नैवेद्य निरंतर अर्पण करतो आणि आपण स्वत: पुजारी होऊन गुरूला शंकरांची पिंड मानतो

अथवा, जीवाच्या विश्रांति स्थानावर श्रीगुरूला स्थानापन्न करून तो त्यांची सेवा करतो. श्रीगुरूंच्या अमर्याद प्रेमाला तो क्षीरसागराची उपमा देतो आणि  शेषाच्या  शय्येवर तो ध्यानधारणेच्या सुखाचा आनंद लुटतो. श्रीगुरूंना भगवान विष्णुस्वरूप  मानीत देवी लक्ष्मीप्रमाणे तेथ. त्यांची चरणसेवा करतो. आपण स्वत: गरूड म्हणून त्यांचेसमोर सेवेसाठी तत्पर असतो. नाभिकमळांत उत्पन्न होऊन तोच ब्रह्मदेव होतो
थोडक्यांत, गुरूसेवा घडण्यासाठी तोच गुरूंना आवडणारी व्यक्ती किंवा वस्तु होतो

ऐसे प्रेमाचेनि थावें (बळाने) ध्यानचि ध्यानातें प्रसवे पूर्णसिंधु (सागर) हेलावे फुटती जैसे (सागरावर तरंग उठावेत तसे
किंबहुना यापरी श्रीगुरूमूर्ती अंतरीं भोगी आतां अवधारीं बाह्यसेवा  

श्रीगुरूंची इतकी सेवा करीन की गुरू प्रसन्न होऊन हवे ते माग असे म्हणतील. त्यावर मी म्हणेन की तुमचा समस्त परिवार, म्हणजे वस्तु नि व्यक्ती मीच एकटा होऊन राहीन ! खरंतर श्रीगुरू अनेकांची माय आहे, तरी पण मीच एकटा तिचे लाडके लेकरूं असेन

म्हणे गुरूचे भुवन आपण मी होईन आणि दास होउनी करीन दास्य तेथींचें  
एवं बाह्यमनोगत श्रीगुरूसेवा समस्त वेंटाळीन वस्तुजात होऊनियां  

देह असेपर्यंत तर मी त्यांची सेवा करीनच, पण देहांतानंतरही त्यांची सेवा करण्याची एक नवलाची गोष्ट मी मनांत धरीन  आणि ती म्हणजे जिथे जिथे स्वामींचे चरण पडतील ती माती माझ्याच शरीराची असावी ! इतकेच नव्हे तर ते ज्या पाण्याला स्पर्ष करतील त्या जलाशयांत मी माझे पाणी मिसळून टाकीन. त्यांना ओवाळतांना त्या दिव्यात मी माझे तेज मिसळून टाकीन

जो गुरूदास्यें कृशु जो गुरूप्रेमें सुपोषु (पुष्ट) जो गुरूआज्ञे निवासु आपणचि जो  
जो गुरूकुळें सुकुलीनु जो गुरूबंधुसौजन्यें सुजनु जो गुरूसेवा व्यसनें सव्यसनु निरंतर  
गुरूसंप्रदाय धर्म तेंचि जयाचे वर्णाश्रम गुरूपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा  
गुरू क्षेत्र गुरू देवता गुरू माता गुरू पिता जो गुरूसेवापरौता (गुरूसेवा विना) मार्गु नेणें  
श्रीगुरूचें द्वार तें जयाचें सर्वस्व सार गुरूसेवकां सहोदर प्रेमरंजन भजे  

ज्याचे मुख केवळ गुरूनामाचाच मंत्र जपते, गुरूवाक्याशिवाय अन्य शास्त्र जाणत नाही आणि गुरूचरण-स्पर्ष झालेले पाणी त्याचेसाठी त्रालोक्यांतील पवित्र तीर्थ असते

जया इये भक्तीची चाड (आवड) जया इये विषयींचे कोड (व्यसन) जो हे सेवेवांचून गोड मनीं काही (इतर काही मानत नाही)
तो तत्वज्ञानाचा ठावो (खजिना) ज्ञाना तेणेंचि आवो (शोभा) हे असो तो देवो ज्ञानभक्तु (ज्ञानी भक्त)  

अशा प्रकारें खऱ्या ज्ञानी भक्ताची अशी व्याख्या करून श्रीज्ञानदेव गुरूभक्ती नि गुरूसेवा हे महत्वाचे ज्ञानलक्षण मानतात


क्रमश:......

This page is powered by Blogger. Isn't yours?