Monday, March 29, 2021

 

स्वगत कथन भाग दोन - ‘मी आणि सत्यसाई संघटना’ !

 स्वगत कथन भाग दोन 


मी आणि सत्यसाई संघटना” 


इतर असंख्य सत्यसाई भक्तांप्रमाणे प्रारंभीं  मी सुध्दा साईबाबांना अजिबात मानत नव्हतो. खरंतर पूर्वग्रह अत्यंत दूषित असल्याने मी त्यांचा चक्क तिरस्कार करीत असे. माझी त्या वेळची आवडती नियतकालिकें, विशेषत: इलस्ट्रेटेड वीकली, ब्लिट्झ वगैरे, शिवाय काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या लिहिण्या-बोलण्यांतून माझी मतें काहीशी ठाम बनली होती. हे अजून एक बोकाळलेले बुवाबाजीचे प्रकरण असल्याचे मी मानत होतो. संघसंस्कारांमुळे असेल कदाचित्, व्यक्तिपूजा मला मान्य नव्हती, तर कर्तृत्वावर माझी तेव्हादेखील दृढ श्रध्दा होती. नवस-सायास, व्रतवैकल्यें किंवा कुठलेही स्तोम मला वर्ज्य होते

(हे सर्व लिहिण्याचे कारणअसा तो मीस्वामींच्या प्रेमांत कसा काय गुरफटून गेलों ते माझेच मला कळले नाही, अगदी सत्यसाई संघटनेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन अनेक महिने उलटून गेल्यावर देखील ! ) 


स्वामी कार्यांत, विशेषत: सेवा नि शिक्षण, मी आपसूक ओढला गेलो. एकोणीसशे चौर्याहत्तर सालीं मी नायडू रूग्णालयांत कार्यरत असतांना एका हाऊसमनच्या अति आग्रहामुळे एका शनिवारी सायंकाळीं सारस्वत कॉलोनीच्या भजन सेंटरवर सहकुटुंब हजेरी लावली. बरोबर पंचेचाळीस मिनिटे अतिशय सुश्राव्य भजनें झाली असली तरी कदाचित् मी पुन्हा तिकडे फिरकलो नसतो. मात्र आरती पूर्वी तेथील संयोजकांनी पुढील आठवड्यात घ्यावयाच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि त्याच वेळी एक आवाहन केले. त्यांत संघटनेने पंचवीस किलोमीटर दूर असलेल्यालवळेया दत्तक ग्रामी दर रविवारी नियमित चालणाऱ्या मोफत दवाखान्याची माहिती देत असतानाच उद्या नेहमीचे डॉक्टर सानाडे (वय अवघें पंच्याहत्तर ! ) येऊ शकत नसल्याने कोणी डॉक्टर मिळू शकेल काय, अशी विचारणा केली. त्या दत्तक घेतलेल्या गांवीं संघटनेमार्फत सुरू असलेली इतर कार्ये त्यांनी सांगितली होतीच, पण डॉक्टर हवा आहे हे ऐकताच माझा हात आपोआप वर गेला


दुसऱ्या दिवशीं रविवारी मी, उषा, सिध्दिश्रीश (वय वर्षे सहा नि चार) इतर दहा स्त्रीपुरूषांसमवेत रेडक्रॉस च्या व्हॅनने (सर्वांचे एकत्रित भाडें रूपये पांच एकूण) , लवळ्यास पोहोचलो. गांवातले तसेच पंचक्रोशीतले शे-सव्वाशेरूग्णवाट पाहात होते. ठीक साडेआठला सुरू झालेला दवाखाना शेवटचा रूग्ण होईपर्यंत साडेबारा वाजता आटोपता घेतला. नंतर बरोबर नेलेला अल्पोपहार आणि कॉफी तेथील काही तरूणांसोबत आम्ही ग्रहण केला. दवाखाना सुरू असतांना बरोबरच्या महिलांनी तिथल्या जवळजवळ पंचवीस तीस मुलें नि त्यांच्या आयांना बरोबर घेऊनबालविकास वर्गघेतला होता आणि त्यांत उषा नि सिध्दिश्रीश हजर राहिले. इतर पुरूषांनी तेथील तरूणांसोबत शोषखड्डे, मंदिरसफाई, शाळासफाई इत्यादि कामे केलीं. बरोबर आलेल्या रिटायर्ड ॲग्रिकल्चर हपिसरने तिथल्या खेडुतांशी संवाद साधत त्यांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या आणि दुपारी तीनचार वाजेस्तोंवर आम्ही घरी पोहोचलो

तो रविवार आम्हा चौघांसाठी अविस्मरणीय ठरला आणि हा परिपाठ नंतर अनेक वर्षें चालू राहिला


क्रमश


प्रत्येक रविवार हा आमच्यासाठी सहल ठरूं लागला असला तरी मला रूग्णसेवेचे भरपूर समाधान मिळत असे. अगदी खरें सांगायचे तर त्या शे-सव्वाशेरूग्णांमधे उपचाराची खरी निकड असलेल्या दहा-वीस व्यक्तीच असत. एऱ्हवीं फुकट औषधें नि टॉनिक्स मिळवणे हा गर्दी करण्याचा उद्देश लक्षांत आला. तथापि या उपक्रमांद्वारे मी एकूणच ग्रामीण लोकांशी बऱ्यापैकीं संवाद साधूं शकलो, जमेल तितके प्रतिबंधात्मक आरोग्यशिक्षण देऊ शकलो नि काही प्रमाणात भ्रामक कल्पना नि अंधश्रध्गांवर नरम शब्दांत प्रहारही करू शकलो. वास्तविक औषधोपचारा पेक्षा त्यांचेशी मनमोकळ्या गप्पा होत, थोडी थट्टामस्करी करीत


व्हॅन मधून जाता येतां, खरंतर येतांना, बरोबर असलेली साईबाबांची भक्तमंडळी बाबांचे अनेक चमत्कार नि लीलांवर भरपूर बोलत असत कारण जातांना गाडी स्टार्ट करण्या आधी पासून लवळ्यास पोहोचेपर्यंत सतत भजनें म्हटली जात, खरोखर सुश्राव्य नि गोड. मला त्याचमत्कारांबद्दल फारशी उत्कंठा नसे मात्र तेविलिनिलीकर्णसंपुष्टांत आदळत राहात ! (मी अजूनभक्तवगैरे झालो नव्हतो, मात्र उषा बऱ्यापैकी देवभोळी असल्याने आधी ओढली गेली हे खरे आहे


या दर रविवारच्याव्हिलेज ॲक्टिव्हिटीबरोबरच संघटने मार्फत पुणे शहरांत सुरू असलेल्या बऱ्याच सेवा कार्यांविषयीं माहिती मिळत गेली आणि आम्ही नकळत त्यांतही सहभाग घेऊं लागलो. त्यांतील काही ठळक उपक्रम म्हणजे नव्या पेठेतील वृध्दाश्रमडेव्हिड ससून अनाथालयाला नियमितपणे भेट देऊन तेथील वयोवृध्द स्त्री-पुरूषांशी संवाद साधणे, औषधोपचार करणे, त्यांच्या राहण्याच्या जागेची साफसफाई करणे (त्या वेळीं तेथे कॉट्स नव्हत्या, लांकडी फळ्यांवर -झुरळ ढेकणांनी भरलेल्या - गोधड्या टाकलेली अंथरूणं ! ) महिन्यातून एकदा सकाळी नऊ ते सायंकाळीं सहापर्यंत संघटनेची वीस बावीस मंडळी अक्षरश: खपत असत. तिथल्या दररोजच्या भात भाजी आमटी नि वातड पोळ्या खाऊन वैतागलेल्या त्या वृध्दांना त्यांचे इच्छेप्रमाणे मऊ खिचडी कढी आणि मऊसूत शिरा तिथल्याच स्वयंपाक घरांत शिजवून संघटनेचा स्त्री वर्ग ठीक बारा वाजतां वाढण्यास सज्ज असे. दरम्यान पुरूष स्वयंसेवक त्या वृध्दांची अंथरूणं उन्हात ठेवीत, फळ्यांवर डीडीटी नि ढेंकूणनाशक फवारणी करीत, सर्व खोल्या झाडून काढीत नि सर्व वृध्दांचे सामान पुन्हा जागीं लावत. वृध्दांचे भोजन आणि विश्रांती झाल्यावर त्यांचेच इच्छेनुरूप लहानसे कीर्तन, प्रवचन , भजन आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता होई. (आम्ही एकदा या उपक्रमाला हजर राहिलों नि नंतर तर तो अविभाज्य अंग बनला दर महिन्याचा


दुसरी ॲक्चिव्हिटी होतीनारायण सेवाम्हणजे अन्नदान ! दर आठवड्याला सामुहिक स्वरूपांत अक्षरश: शेकडो फूड पॅकेट्स तयार करून तीं गरजूंना बिनबोभाट पोचती करण्याचे कसब संघटनेतील तरूणाईने आत्मसात केले होते. संघकार्या प्रमाणेच या सेवेचीही कधी जाहिरात झाली नाही. इतकेच नव्हे तर कुणी दानशूर गुपचुप ब्लॅंकेट्सची गाठोडी भजन सेंटरवर आणून ठेवी नि त्यांचे वांटप रात्री थंडीने कुडकुडणाऱ्या फूटपाथवर झोपलेल्या नारायणांचे अंगावर अलगद ठेवून कुणाच्याही नकळत केले जाई


नारायण-सेवेसाठी धान्य गोळा करण्याची एक विलक्षण पध्दत मी प्रथमच अनुभवली. आपापल्या युनिट चे स्त्रीपुरूष नि मुलें एक मूठ ते एक किलो असे धान्य बरोबर आणून अखंड नामजप करीत त्या धान्याचे काही दाणे उचलून बाजूला त्यांची रास करीत आणि अशा नामोच्चारित धान्याचे अन्न शिजवून ते गरजू गोरगरीबांना फूड पॅकेट्सचे रूपांत वांटप करीत. या उपक्रमालालक्षार्चनअसे नांव होते नि त्यांत मुलाबाळांसह सर्व कुटुंब हिरिरीने भाग घेई


क्रमश


इतर अनेक कार्यांबद्दल बोलण्याआधीं आत्तां माझ्या मनांत सतत येत असलेल्या थोर व्यक्तींबद्दल सांगतो.. लवळ्याचे साधेसुधे ग्रामस्थ आणि वृध्दाश्रमातील अगतिक स्त्रीपुरूषांशी जसा आत्मीयतेने संवाद घडत असे, तसाच पुण्यातले नि बाहेरच्याही कित्येक दिग्गजांशी मला संपर्क ठेवतां आला. सर्वश्री बाळासाहेब भारदे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, लेफ्ट. जनरल बी.डी.पी. राव (कमांडंट आर्मी मेडिकल कालेज पुणे) , ब्रिगेडियर के.के.सिंह (मिलिटरी इंजिनियरिंग दापोडी पुणे) , डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. प्र.चिं.शेजवलकर, डॉ. एच्. व्ही. सरदेसाई, डॉ. अशोक कानेटकर, डॉ. भागवत (अकोला) , तसेच डॉ. ब्रह्मानंद माविनकुर्वे (एक्स डायरेक्टर रिझर्व बॅंक) , श्री दिनकर हेजमाडी (दहा देशांत भारताचे ॲम्बेसेडर राहिलेले) , कर्नल पी.के.सोमण अशी अजून डझनावारी नांवें आत्तां आठवत आहेत, ज्यांचेशी मला केवळ संभाषणच नव्हे तर चांगली जवळिक साधतां आली. प्रत्येकाबद्दल सांगणे तूर्तास टाळतो, मात्र कांहीं बद्दल आत्ताच बोलणे टाळतां येत नाही कारण उपर्निदिष्ट काही कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे


श्री दिनकर हेजमाडी दर रविवारीं सपत्नीक लवळ्यास येत. वयाची सत्तरी ओलांडलेले हेजमाडी (एक्स ॲम्बॅसेडर) औषध वाटपाचे काम हातीं घेत तर सौ. हेजमाडी बालविकास वर्गांत मदतनीस म्हणून ! इतके उच्चपदस्थ नि उच्चशिक्षित (आयसीएस) युगुल खेड्यांतले हलके काम करायला मागे पुढे पाहात नसत. अतिशय साधी राहाणी होती त्यांची. (त्यांच्या फोक्सवॅगन बीटल् ने स्वत: ड्राईव्ह करीत ते पुणे ते पुटपर्थी किंवा बंगलुरू) ! नंतर पुणे सोडल्यावर ते कायमचे पर्थीला गेले नि तिथेही सतत कार्यमग्न राहिले


डॉ. ब्रह्मानंद माविनकुर्वे माझ्या दुप्पट वयाचे, मात्र मला धाकट्या भावासारखे वागवीत. पर्थीला एकदा भजनानंतर निवासाकडे जाता जाता एकदम थबकले नि मला विचारले की तू सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आहेस काय. मी म्हटले नाही, स्वामीच सदगुरू नाहीत काय ! त्यावर ते म्हणाले की नव्हे, स्वामी इज गॉड बट् सदगुरू इज परब्रह्म ! खिशातून वॅलेट बाहेर काढून त्यांत जपून ठेवलेला त्यांच्या सद्गुरूंचा फोटो मला दाखवीत म्हणाले की गुरूंनी सांगितलेली उपासना पूर्ण झाल्याशिवाय मी बाहेरही पडत नाही. सदगुरूकृपा असणे फार फार महत्वाचे ! त्यावेळेस मी चांगलाच बुचकळ्यांत पडलो असलों तरी आता त्याची प्रचीती येते आहे खरी

असो

एकदां बाळासाहेब भारदे यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो असतांना त्यांनी चक्क दीड तास माझ्याशी गप्पा मारल्या होत्या. विषय केवळ एकच, महाराष्ट्रातले साधुसंत. मला म्हणाले होते, अहो मी विधानसभेत स्पीकर म्हणून काम केले असले तरी मुळांत मी संतांचालाऊडस्पीकरआहे ! तेवढ्यंत श्री विश्वनाथ कराड आले नि माझी ओळख करून देत म्हणाले हे डॉक्टर साईकार्यांत आकंठ बुडालेत बरे का ! (थोर व्यक्तींकडून मिळालेली दाद कुणाला नकोशी होईल ?) 


पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलचे प्रांगणात संघटनेकडून एक व्याख्यानसत्र ठेवले होते नि प्रमुख वक्ता म्हणून प्रा. शिवाजीरावांना फलटणहून आणायचे होते. आणखी एका सहकाऱ्यासोबत मी त्यांना घ्यायला कारने गेलो होतो. वेळेबाबत अतिशय जागरूक असलेले शिवाजीराव तयार बसले  होते. दहा मिनिटांत आम्ही निघालो. ते मागच्या सीटवर डोळे मिटून चिंतनांत गढून गेले होते. माझ्या अपेक्षेच्या अगदी उलट, शांत स्वस्थ ! (नंतर आठवली त्यांचीच उक्ती - ‘चिंतनासाठी एकान्त नि अभिव्यक्ती साठी लोकान्त’ ! 

पुण्यांत पोहोचल्यावर नाना पेठेतील त्यांचे नेहेमीच्या हॉटेल मधे केवळ अर्धा तास थांबून त्यांनी ग्लासभर दूध घेतले आणि मग त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आलो

तथापि अशा महापुरूषाचे सान्निध्य मला किमान तीन चार तास लाभले होते हेही नसे थोडकें


क्रमश


पुन्हा काही सेवाकार्यें ज्यांत मला अतीव समाधान मिळत गेले. आम्ही पाचजणांचा एक ग्रूप तयार केला होता, जो दर रविवापीं चुकतां ससून रूग्णालयांत ठीक पांच वाजता एकत्र येत असे. त्यांत शारीरिक अपंगत्व असलेला सुहास गोखले हा नेहमीच सर्वात आधी पोहोचणारा स्वयंसेवक असे. विविध खात्यांतील अशा रूग्णांना आम्ही भेटत असूं ज्यांना कोणीच भेटायला येत नसत. सहसा बाहेर गांवातून आलेला तो रूग्ण डिसचार्ज मिळण्याची वाट पाहणारा, शस्त्रक्रियेसाठी निमूट वाट पाहणारा किंवा रक्ता अभावीं किंवा इतर कारणांनी खोळंबलेला असे. आम्ही अशा रूग्णांना हेरून त्यांचेशीं मनमोकळा संवाद करायचे, रक्तगट पाहून रक्तदात्याची सोय करायचे, त्यांचे गांवी निरोप पाठवण्यासाठी पोस्टकार्ड लिहून पोष्टांत टाकायचे, कधी दुर्मीळ असलेली औषधें उपलब्ध करून देणे वगैरे सेवा आम्ही पाचहीजण मनापासून करीत असूं

अशा हॉस्पिटल व्हिजिटचे वेळी एक गोष्ट लवकरच ध्यानांत आली की रूग्णासोबत आलेल्या, विशेषकरून खेड्यांतून आलेल्या, त्याचे सहकाऱ्यांची भोजन-निवासाची चांगलीच अडचण असे. बरोबर आणलेली भाकरीची शिदोरी कधीच संपलेली असे नि मग चणेफुटाणे किंवा वडापाववर ते दिवस काढीत. या साठी सुहासने एक कल्पना मांडली. आपण पाचही जण किमान दर रविवारी प्रत्येकीं एक वा दोन भाजीपोळी किंवा लोणचेंपोळीची पाकिटें आणली तर ! सर्वांनाच ते पटले आणि आम्ही तो उपक्रम हातीं घेतला. विश्वास ठेवा, आम्हाला नेहमीच सुयोग्य व्यक्ती भेटत गेल्या - त्या अन्नाची कधीच नासाडी झाली नाही

एक विलक्षण अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही. एका रविवारी लवळ्याहून परत यायला चार वाजले होते नि शिरस्त्याप्रमाणे मी भाजीपोळीचे पाकीट घेऊन ससूनला जाणार होतो. मात्र मुलें लहान म्हणून उषाने घाईघाईंत भात टाकला नि मुलांना दहीभात भरवला. दहीभाताचीच दोन पाकिटें करून माझ्या बरोबर दिली. कर्मधर्मसंयोगाने सायंकाळी पाच ते सात दरम्यान एकही व्यक्ती सापडली नाही जिला ती पॅकेट्स देतां आली असतीमात्र वॉर्ड सोडून बाहेर पडताना पॅसेजमधे एक स्त्री दोन लहान बालकांना (वय वर्षें दीड नि तीन) जवळ घेऊन सचिंत बसलेली दिसली. एऱ्हवीं चांगल्या घरातली वाटली म्हणून सहज चौकशी केली तर म्हणाली की सकाळी अचानक निरोप आला की तिच्या नवऱ्याला अपघात झालाय नि ताचडीने ऑपरेशन करावे लागणार आहे. मी लगेच पोरांना उचलून इथे आले. नवऱ्याचे ऑपरेशन सुरू आहे

तिच्या मुलांकडे पाहात तिला चाचरतच विचारले की पोरांना दहीभात दिला तर चालेल काय. तर म्हणाली सकाळपासून बाळांनी काहीच खाल्लेले नाही, द्या जरूर द्या ! दोन्ही मुलें त्या दहीभातावर तुटून पडलीं नि ती माय आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाली. तें दृष्य पाहून आम्ही दिंग्मूढ झालो हे नि:संशय ! दरम्यान ऑपरेशन यशस्वी झाल्याचा निरोप आला आणि मगच त्या भगिनीचा आम्ही निरोप घेतला

(हा प्रसंग मी नंतर एका मीटींग मधे सांगितल्यावर संघटनेने त्यावर शिक्कामोर्तब करून आता सर्व भारतांत तो राबविला जातोय् ! थॅन्क्स सुहास गोखले ! ! 


क्रमश


मी या आधीही सांगितले होते की जरी अशा विविध सेवाकार्यांत मी सहभाग घेत होतो किंवा नवनवीन उपक्रम शोधून काढत होतो तरी अजून स्वत:ला बाबांचा भक्त वगैरे म्हणवून घेत नव्हतो ! तो भाव उमलायला बराच काळ जावा लागला.

तथापि, इतर सर्व भक्त मंडळींत आम्ही दोघे त्या मानाने बरेचसे तरूण होतो आणि म्हणून कदाचिततडफदारभासायचों ! कदाचित् म्हणूनच मी लवळ्यास नियमितपणे जाऊ लागताच महिन्याभरांतच माझी नेमणूक पुण्याचा सेवा कन्व्हीनर म्हणून कर्नल सोमण आणि श्री कडले यांनी केली. त्या वेळी प्रत्यक्ष काम करणारे स्वयंसेवक कमी होते आणि त्यानाही योग्य ते प्रशिक्षण गरजेचे होते कारण बाबांबद्दल दुष्प्रचार करण्यांत पुण्यातील कांही मंडळी अग्रेसर होती. त्यांचे तोंडीं लागतां हातीं घेतलेली सेवा कार्यें व्यवस्थित करण्यावर भर देणे गरजेचे होते. त्याच प्रमाणे सत्यसाई संघटनेच्या कार्याचा गवगवा नको हेही उद्दिष्ट आंखून दिले होते. खरेंतर संघकार्य नि या संघटनेच्या कार्यप्रणालींत मला विलक्षण साम्य जाणवले आणि म्हणूनच कदाचित मी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते


डिफेन्स अकाऊंट्स मधील एक ज्येष्ठ अधिकारी डॉ. साम्बशिवराव हे स्वेच्छेने स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी पुढे आले. त्यांनी दर आठवड्याला एक अशी पंधरा व्याख्याने घेतली होतीं. सत्यसाई संघटना ही मुळांत आध्यात्मिक बैठक असलेली सेवा संघटना असल्याने भारतीय संस्कृती आणि परंपरा, तसेच वेदान्त वगैरे गहन विषय त्यांनी अतिशय सोपे करून सांगितले होते. आपल्या उपासना पध्दतीतले बारकावे आणि त्यांचे महत्व त्यांनी खूपच छान समजावून सांगितले होते. अगदी साधे उदाहरण द्यायचे तर एखाद्या मंदिराच्या कळसापासून थेट पहिल्या पायरीचे महत्व त्यांनी अतिशय खुशखुसीत शब्दांत सांगितलेले अजूनही छान स्मरतें आहे


या आध्यात्मिक विषयांबरोबरच प्रत्येक स्वयंसेवकाला प्रथमोपचाराचे ट्रेनिंग पुणे रेडक्रॉस यांचे सहकार्याने घेता आले. संघातीलबौध्दिकांसारखेच सर्वांसाठी अभ्यास मंडळ किंवा स्टडी ग्रूप करून बाबांचे शिकवणुकींचा आणि निर्देशांचा उहापोह या बैठकांत केला जाई


दरम्यान मी बाबांची आणि बाबांवरील बरीच पुस्तके वाचून काढली होती, दर महिन्याला प्रसिध्द होणारेसनातन सारथीहे नियतकालिक आधाशासारखे वाचून काढत असे मी. माझ्या ज्ञानांत कितपत भर पडली ते माहीत नाही, मात्र आध्यात्माची गोडी लागली हे नि:संशय


सत्यसाई संघटनेचा गाभा म्हणजे भजन केंद्रें ! तोच प्लॅटफॉर्म होता सर्वांनी एकत्र येण्याचा. तेव्हा दोनच भजन सेंटर्स मुख्य होतीं, एक नातूबागेतील कर्नल सोमणांचे सत्यसाई निलयम नि दुसरे सोमवार पेठेतील सारस्वत हॉल केंद्र. आम्ही नकळत दोन्ही केंद्रांवर चुकतां भजनाला जाऊ लागलो, इतकेच नव्हे तर चौघेंही चक्क भजनें म्हणू लागलो

या शिवाय आठवड्याच्या कुठल्या ना कुठल्या वारीं कित्येक भक्तांच्य्या घरींफॅमिली भजनेंहोत आणि त्यांतही आमची हजेरी वाढू लागली


अजून खूप खूप सांगायचे आहे


क्रमश


तीं अतिशय सुरेल, अर्थपूर्ण नि भावपूर्ण भजनें ऐकताना खरोखर भान हरपत असे, मन अतिशय प्रसन्न होई. त्या नादब्रह्माची स्पंदने नंतरही खूप वेळ मनांत आणि वातावरणात जाणवत राहात. काहीतरी विशेष होते त्या नामावलींत एवढें मात्र निर्विवाद

नामावलींवरून आठवले, कुठल्या तरी दाक्षिणात्य भक्ताने स्वामींवर अष्टोत्तर-शत-नामावली लिहिली होती आणि ती लक्षार्चन करतांना किंवा काही ठिकाणी भजनापूर्वीं म्हटली जात. बहुधा ऐकून ऐकूनच आम्हा सर्वांना पाठ झाली होती एव्हाना. त्यातून प्रोफेसर कस्तूरींचे एक पुस्तक हातीं लागले ( गारलॅंड ऑफ हन्ड्रेड ॲंड एट रोझेस ), ज्यांत त्या प्रत्येक नामाचा अर्थ आणि विवरण दिले होते. ते वाचल्यानंतर कित्येक नामांचा गूढार्थ कळू लागला होता आणि म्हणून त्या नामावली म्हणताना विशेष आनंद मिळू लागला. (भक्त होण्याच्या वाटेवर मी चालू लागलोंय हे तुमच्या चाणाक्ष नजरेंत एव्हाना आले असेल ! ) 

असो

स्वामींच्याच निर्देशांनुरूप प्रत्येक भजन सेंटरवरनगर-संकीर्तनहा एक अविभाज्य कार्यक्रम मॅंडेटरी झाला होता. नगर-संकीर्तन म्हणजे पहांटे झुंजुमुंजु होत असताना आपापल्या क्षेत्रात मोठ्याने भजनें गात निघणारीप्रभातफेरी’ ! या प्रभातफेरीसाठी आम्ही चौघेही भल्या पहांटे उठून दूरदूरवर मोटरसायकलवरून जात असूं (इतकेच नव्हे तर आमचा पाळीव कुत्रायोगीदेखील आमचे बरोबर धांवत येई ! ) आठवड्यात एकदा नि नवरात्रात नऊही दिवस आम्ही हजेरी लावायचे, पहिल्या माळेला तांबडी जोगेश्वरी बुधवार पेठे पासून. पंधरावीस स्त्रीपुरूषांच्या या दिंडीचे काही घरांतून मन:पूर्वक स्वागत होई आणि ते पाहून उत्साह द्विगुणित होई. ( या निमित्ताने - रस्त्यावरून मोठ्याने समूहाबरोबर भजनें म्हणणे - आपला सुप्त अहंकार कमी कमी होत असल्याचे आपसूक जाणवत गेले, मुख्य म्हणजे आपलीभक्तीलपवायची गरज वाटेनाशी झाली ! ) 


निरपेक्ष बुध्दीने करत असलेली सेवा कार्यें आणि स्वाध्याय, म्हणजेच कर्मयोग नि ज्ञानयोगाची फलश्रुती म्हणून स्वामींबद्दल निर्माण होत असलेली भक्ती असे फळ मी चाखूं लागलो होतो, हे आतां ज्ञानेश्वरी वाचताना माझ्या ध्यानांत हळूहळूं येऊ लागले आहे


सॉरी, जरा ॲबस्ट्रॅक्ट व्हायला लागलंय हे निरूपण, म्हणून मूळ मुद्दयांवर येऊंया

पुणे शहरांत आम्ही अनेक मेडिकल कॅम्प आयोजित केले, विशेषत: झोपडपट्यांत. दोन मोठी शिबिरं अजून आठवतात, एक मंगळवार पेठेतील म्युनिसिपल शाळेत भरविलेले नि दुसरे गंजपेठेंत. दोन्हींत हजार हजार रूग्णांची मोफत तपासणी आणि औषधोपचार केले गेले. अर्थात या सर्व शिबिरांत माझे म्युनिसीपालिटीतील डॉक्टर्स आणि तज्ज्ञ मंडळींचा सिंहाचा वांटा होता हे मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे. (औषधांची सोय आम्ही गोळा केलेल्या मेडिकल सॅम्पल्स आणि श्री भांडारकरांचे मदतीने औषध वितरकांकडून देणगी स्वरूपात असे

साधारण चौऱ्यांशी ते सत्त्यांशी या तीन वर्षांत आम्ही खेड-शिवापुर परिसरातील एकोणीस गांवांतील सर्व प्राथमिक शाळांत वैद्यकीय तपासणी केली. तत्कालीन झेडपी चे मुख्याधिकारी यांनी विशेष परिपत्रक काढून आम्ही आधीं सादर केलेल्या कार्यक्रमानुसार सर्व मुख्याध्यापकांना त्या त्या आठवड्यांत शाळा रविवारी लावण्याचा हुकुम काढला होता. त्या त्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकांशी आधी संपर्क साधून मुलांच्या पालकांनाही हजर राहण्याची विनंती केली होती. सबब शाळा तपासणी नंतर मुलांत आढळलेले आजार आणि दोष त्या त्या पालकांना समजावून सांगता आले आणि पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाई. या लहानशामिनि ग्रामसभेंतउषाने खूप मदत केली, प्रत्यक्ष सहभाग दिला


वैद्यकीय शिबिरांबरोबरच संघटनेमार्फत आम्ही अनेक रक्तदान शिबिरें भरवलीं. सर्व साईभक्तांचा या आणि वैद्यकीय शिबिरांतही मोलाचा सहभाग असे. या रक्तदान शिबिरांतून रक्तगट रजिस्टर तयार करण्याची कल्पना सुचली आणि पाहता पाहतां जवळपास पांचशे स्वेच्छा-रक्तदात्यांची यादी त्यांचे पत्ता नि टेलिफोन नंबर्स सह तयार झाली. या रजिस्टरचा वेळोवेळी खूप उपयोग झाला


एकोणीसशे ऐंशी ते नव्वद या दशकांत पुण्याची संघटना आरोग्य आणि भजन या क्षेत्रांत महाराष्ट्रांत अग्रणी राहिली असे कौतुकोद्गार महाराष्ट्र राज्याध्यक्ष यांनी एका बैठकींत काढलेले स्मरतात


क्रमश


या सर्व उचापती करत असताना माझ्या स्वत:च्या विचारांत किंवा दैनंदिन जीवनांत कितीसा फरक पडला असे मी स्वत:लाच विचारले तर मी म्हणेन की बराचसा ! माझा उतावीळपणा आणि आळस-निद्रा खूपशा कमी झाल्या, सतत काही ना काहीउद्योगांतमी रनूं लागलो ! महत्वाचे म्हणजे पहांटे उठून दीर्घ ओंकार आणि सत्यसाई-सुप्रभातम गेली चाळीस वर्षें जवळजवळ अव्याहतपणे करत आलोंय् . वाचनाची आवड किंवा खरेतर ऑब्सेशन वाढत गेली. अनेक उत्तम ग्रंथ वाचले नि काहींच्या तर प्रेमात पडलो. गीता-ज्ञानेश्वरी ची सुरूवात वयाची पन्नाशी उलटल्यावर झाली, जरी घरींच प्रवचने असल्याने नकळत ज्ञानेश्वरी कानांवर पडत असे. पुण्याची नोकरी सोडून पुट्टपर्तीला गेल्यावर गीतेवरील पहिले मराठी पुस्तक हातीं पडले, ठाण्याच्या श्री क्षीरसागर यांनी श्लोकार्थासह विवरण केलेले. खरेतर त्यांनीच ते मला भेट म्हणून दिले होते


क्रमश




This page is powered by Blogger. Isn't yours?