Saturday, April 29, 2023

 

रंभागर्भु आकाशें / निघाला जैसा !

 रंभागर्भु आकाशें / निघाला जैसा


थांबा, लगेच स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करतो. अमृतानुभवातील पहिल्या प्रकर्णांत त्रेसष्ठ चौसष्ठाव्या ओंवीचा उत्तरार्ध आहे हा. एक सुंदर रूपक देतातरंभागर्भाचे’ .‘रंभागर्भम्हणजे केळीच्या बुंध्यातला अल्टिमेट भाग, जिथे पोकळीशिवाय काहीच नसते. केळीच्या बुंध्याचे एकएक सोपटें बाजूला करत गेले तर आंत काहीच उरलेले दिसत नाही. (काहीच नाही हे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे, कारण तिथे किमानपोकळीतर असतेच ना ! ) या पोकळीला आपण थोडा वेळरंभागर्भम्हणूंया, आपल्या सोयीसाठी

तर, ज्ञानदेव म्हणतातरंभागर्भ आकाशें निघाला जैसा’. वास्तविक पोकळी पोकळीत विलीन झाली ! ती कुठेच आली गेली नाही, ती पोकळी म्हणूनच तरअस्तित्वांतहोतीच की


ज्ञानदेव ओंवीच्या पूर्वार्धात मीठाच्या खड्याचा दृष्टांत देतात. ते म्हणतात की आपला मीठपणाचा लोभ किंवा अहंकार टाकून ते जेव्हा सागरात प्रविष्ट होते त्याच क्षणी ते सागरा इतके विशाल होऊन जाते ! अगदी तसेच शिवशंभूने शंभूपणाचा अहंभाव  सोडतांच  शंभूच शांभवी अर्थात शिवशक्ती होऊन गेले ! अशा त्या एकरूप असलेल्या शिवशक्तीला मी वंदन केले, जसे रंभागर्भ आकाशांत विरून जातो. (माझा ना मी राहिलों ! ! ) 


आज हे सर्व तुम्हाला सांगण्याचे विशिष्ट कारण आहे. खरंतर ती संपूर्ण ओंवी दोनतीन दिवसांपासून वरचेवर कानात रूंजी घालत होती आणिमला सांग, मला सांगअशी भुणभूण करत होती. म्हटले सांगावीच ती तुम्हाला. खरंतर माझ्या अभ्यासाची तीच पद्धत आहे. मला सलग एकाच दिशेने अभ्यास करता येत नाही, पुंजक्या पुंजक्यांत लहान लहान घास करून खायला आवडते मला. (रवंथ करतो म्हणा हवे तर ! ) असो

मी सांगणार होतो विशिष्ट हेतू बद्दल. त्याचे असे आहे कीआजपासून अमृतानुभवाचा अभ्यास करूंयाअसं म्हणता म्हणतां कित्येक दशकें उलटून गेलीत कारण अमृतानुभव हा मुळांत ज्ञानदेवांचाआत्मसंवादआहे. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती वडील बंधूंनी तशी आज्ञा केली म्हणून. ज्ञानेश्वरीतच असा उल्लेख आहे की कलियुगाच्या झळा सामान्य जनतेला सहन होत नाहीत, सबब त्यांना धीर देण्यासाठी सुंदर ग्रंथनिर्मिती कर ज्ञानदेवा - अशी त्यांच्या सद्गुरूंनी आज्ञा केली

आपल्यातील प्रत्येक चांगदेवासाठी पासष्ट ओंव्या सहज लिहून गेले त्याच कोऱ्या कागदावर

हरिपाठ सांगितले प्रत्येक मुमुक्षु भक्तासाठी, मात्र अमृतानुभव म्हणजे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव असल्यानेस्वान्त: सुखायया भावनेने त्यांनी आत्मसंवाद साधला


आता मला सांगा, त्यांचे अनुभव-कथन आपल्याला केवळ वाचून कळतील काय ? अमृतानुभवाचीपारायणेंहोत असल्याचे निदान माझ्या तरी माहितीत नाही. तो विषय अतिशय शांतचित्ताने, खूप मनन चिंतन करीतअनुभवायलाहवा. प्रत्येक ओंवीचा शब्दश: अर्थ काढणे शक्य असले तरी गर्भितार्थ समजून घ्यायला कदाचित अनेक जन्म अपुरे पडतील

म्हणूनच तर म्हटले, धीरे धीरे ढाळे ढाळें एकेका शब्दाचा वा ओंवीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूंया आपण !

रहाळकर

२९ एप्रिल २०२३




Thursday, April 27, 2023

 

माझी(पण) नाट्य सेवा !

 माझी(पण) नाट्य सेवा !


होय, मी सुद्धा एकेकाळी मराठी रंगभूमीची सेवा केलेली आहे ! मेडिकलची पाचही वर्षें मी या ना त्या मराठी विनोदी एकांकिकांतून छोटीमोठी का असेना, कामे केली होती आणि बहुतेक सर्वच नाटकांना प्रचंड नि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता हे आठवतांना मला आज खूप खूप समाधान आणि मज्जा वाटते आहे


वास्तविक स्टेजला अतिशय घाबरणारा मी इतर काही मित्रांसमवेत डॉक्टर नानासाहेब आणि उषाताई थत्ते यांच्या बंगल्यावर सहज म्हणून डोकावलो होतो मेडिकलच्या प्रथम वर्षांत असताना. त्यावेळीं गणेशोत्सवासाठी तीन एकांकिकांचे प्राथमिक वाचन सुरू होते आणि सर नि उषाताई त्यातील काही पात्रांची निवड करण्यात व्यस्त होते. काही वेळाने उषाताईंनी माझ्या हाताततिसरा बाजीरावहे पुस्तक दिले आणि त्यातला एक उतारा मोठ्याने वाचायला सांगितला. बरेच आढेवेढे घेतल्यावर मी (घाबरलेला असल्याने) किंचित कापऱ्या आवाजात तो कसाबसा वाचून काढला आणि माझा तो कापरा नि बसका भारी आवाज ऐकून म्हाताऱ्यासासऱ्याचारोल त्यांनी अक्षरश: माझ्या गळ्यात बांधला

मग सुरू झाली खरी धमाल. प्रयोग दीड महिन्यावर असल्याने डॉक्टर खेर यांच्या बंगल्यातील तिसरा मजला नि गच्चीवर तालमी सुरू झाल्या. कॉलेज सुटल्यावर दररोज संध्याकाळी सहा ते साडेआठ नऊ पर्यंत तालमी कसल्या, धांगडधिंगा करण्यात वेळ कसा भुर्रकन् निघून जाई. ठीक साडेसहा वाजता सरांचादेवराम’ (घरगडी) दोन मोठ्या केटल्या भरून पोलसन्ची कॉफी घेऊन येई. त्यातला खाली राहिलेला गाळ सुद्धा भाऊ टिल्लू चमच्याने ओरबाडून खात असे ! तिसरा मजला अक्षरश: दुमदुमत असे त्या दिवसांत कारण सर ब्रिज खेळायला निघून जात नि मॅडम खेर आपल्या नर्सिंग होम मधे


डॉक्टर नाना थत्ते आणि उषाताई नाटकांचे दिग्दर्शन करायला अधून मधून येत, तर इन्दौरच्या विख्यात रंगकर्मी बाबा डिके यांचा धाकटा भाऊ बंडू कधीकधी चांगल्या टिप्स देऊन जाई

(डॉ. थत्ते आणि उषाताईंनी लंडनच्या महाराष्ट्र मंडळांतही अनेक नाटके सादर केली होती. ) 


यातालमींदरम्यान काहींची प्रेमप्रकरणें सुरू झाली तर काहींची फिस्कटली देखील ! हाय दैवा ! ! 

असो


त्या पाच वर्षांत आम्ही पु. लं. चेसदू आणि दादू’, त्यांचेचविठ्ठल तो आला आला’, ‘पांडव प्रताप’, ‘तिसरा बाजीराव’, ‘दादा-भाई-नवरोजी’, ‘अधांतरांत अर्धा तास’, ‘बिचारा डायरेक्टरवगैरे अफलातून एकांकिका सादर केल्या होत्या


नंतर शाजापूरला असताना आमची नाटकाची आवड (आणि नैपुण्य !) लक्षात घेऊन तेथील महाराष्ट्र मंडळाच्या शारदोत्सवांत मला नि पत्नी उषालाअंमलदारआणिप्रेमा तुझा रंग कसाया तीन अंकी नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. मी होतो अनुक्रमेपोष्ट्यानिवखारवालानिळुभाऊ’ ! (निळुभाऊच्या पानभर लांब पॅसेजला उत्स्फूर्त पडलेल्या टाळ्या मी कधीच विसरणे शक्य नाही ! ) 

रहाळकर

२७ एप्रिल २०२३



This page is powered by Blogger. Isn't yours?