Sunday, March 31, 2024

 

विरासत, धरोहर, सियासत वगैरे !

 विरासत, धरोहर, सियासत वगैरे

आपण मराठी माणसें हिन्दी न्यूज चॅनल्स पाहात असताना वरील काही शब्द वारंवार ऐकत असतो, विशेषत: त्यांतील रटाळ चर्चा ऐकत असताना. अर्थात त्या शब्दांचा मूळ अर्थ आपण ढोबळ मानाने समजतो पण त्यावर फारसा विचार करत नाही. मला तूर्त काहीच कामधाम नसल्याने थोडी मुशाफिरी करीन म्हणतो या शुद्ध हिंदी शब्दांवर. तसेही शुद्ध हिंदी देखील हल्ली क्वचित कानांवर पडते काही सन्माननीय अपवाद वगळतां. सर्वश्री राजनाथसिंहजी, बिग बी अमिताभजी आणि एकेकाळी मंत्रमुग्ध करून टाकणारे स्व. अटलजी, सुषमा स्वराज वगैरे दिग्गज वक्ते कायम श्रवणीय असत. मी आत्तांचसर्वश्रीहा शब्दप्रयोग केला कारण प्रत्येक व्यक्तीच्या मागे श्री किंवा नंतर पुन्हा पुन्हाजीलावणे म्हणजे कंटाळवाणे किंवा अप्रस्तुत वाटते मला. या निमित्त मला आठवतात स्व. राजेंद्र माथुर, एके काळचे माझे इंग्रजीचे प्राध्यापक आणि नंतरनई दुनियानिनवभारत टाईम्सचे प्रधान संपादक. त्यांचे लिखाणपिछाला सप्ताहया सदरांत छापून यायचे आणि आम्ही (तेव्हाचे) तरूण त्यावर तुटून पडत असूं. ती सर्वच लिखाणें केवळ तत्कालीन राजकारणावर असत आणि पं. नेहरू हे केवळ नेहरू असत, इंदिरा गांधी फक्त इंदिरा, मार्शल टिटो निव्वळ टिटो नि माओ त्से तुंग फक्त माओ ! श्री, जनाब, जी, साहेब किंवा राव वगैरेंची गरजच पडत नसे त्यांना. आणखी एक गंमत म्हणजे प्रत्येकाचा केलेला एकेरी उल्लेख. खरं म्हणजे त्यामुळेच त्या त्या दिग्गजांशी सहज नाळ जोडली जायची

मी स्वत:ला भाग्यवान मानतो कारण मला कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात ऐकता वाचता आली. मुंबईत काही काळ राहिलो असतो तर कधीच धेडगुजरी होऊन गेली असती माझी वाचा. नशीब बलबत्तर म्हणून आधी इंदोर नि नंतर पुण्यपत्तनी वास्तव्य झाले (त्यातही सदाशिव पेठेत ! ) 

मी मागे केव्हातरी म्हटले होते की इन्दौरच्या भाषेंत हिंदी, मऱ्हाटी, माळवी नि उर्दूचा बराचसा वापर होतो. तथापि कोणताही खरा इन्दौरी यांत सहसा सरमिसळ खपवून घेत नाही, कोणतीही भाषा वापरली तरी ती शुद्ध असलीच पाहिजे यावर त्याचा कटाक्ष असतो. इतकेच नव्हे तर इंग्लंडांत राहूनही जर कोणी चुकीचे इंग्रजी बोलला तर आपल्या कानांना झिणझिण्या तर येतातच पण त्याच्याही कानशिलांत त्या उठवाव्या असा अतिरेकी विचार डोकावून जातो


पुण्यातली ओरिजिनल मराठी म्हणजे अतिशुद्ध, त्यातून महामहोपाध्याय वगैरे मंडळींचे मराठी म्हणजे निव्वळडोक्याला शॉट ! नव्हे, माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच की कितीही शुद्ध असली तरी ती क्लिष्ट असू नये. महा-महोपाध्यांबद्दल मलाही आदर आहे पण तोच आदर किंचित पातळ होतो क्लिष्टपणामुळे. मला सांगा, मी कितीही शुद्ध भाषा वापराण्याचा प्रयत्न करत असलो तरी तुम्हीही ती आवर्जून वाचण्याचा तेवढाच प्रयास करताच ना


मूळ मुद्दा बाजूलाच राहिला की राव. ‘विरासत, धरोहर, सियासतवगैरे म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहीत नसले तरी मज हिंदी-प्रेमी माणूस ते शब्द नीट जाणून आहे बरे का

रहाळकर

३१ मार्च २०२४ 


Wednesday, March 27, 2024

 

रोड मॅप !

 रोड मॅप

एक सुंदर वचन अनेक वर्षांपूर्वी वाचलेले अचानक पुढ्यात  आले. “ If you intend a ‘journey’, you do well to consult a ‘Map’. And if the terrain to be crossed promises forests and mountains, rivers and ravines wonderful to behold but demanding more than an afternoon’s stroll, then the ‘map’ should be detailed enough and of the right kind. With a suitable map one can always travel more hopefully and arrives sooner ! “ 


खरंतर आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपण सहसा त्या कृतीचेप्रो नि कॉन्सपाहण्याचा प्रयत्न कळत कळत करत असतोच. क्वचित काही आततायी मंडळी मागचापुढचा विचार करतां साहसी निर्णय घेतात आणि चक्क उडी घेतात. मी म्हटलेक्वचित काही’, पण खरेंतर आपल्यातीलच अनेक

विषयांतर होण्यापूर्वीरोड मॅपवरच लक्ष ठेवूंया

वास्तविक केवळ माणूसच असा प्राणी आहे जो मनातल्या मनात आपली पुढची वाटचाल ठरवीत असतो. इतर सर्व प्राणी आपापले भक्ष्य शोधण्यासाठी किंवा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धावाधाव करतात. आकाशांत पक्षी थव्याथव्याने उडतात. त्यांना दिशा असते पण वाट नसते. थवाथव्याने आपले अस्तित्व विसरतां परस्परांचे सहचर होतात, सहभागी होतात. माणसांना हे जमले पाहिजे. सतारीची प्रत्येक तार आपला स्वर आपल्याच ठायीं ठेवून योग्य त्या क्षणीं स्वरसंभारांत समर्पित करते. माणसाने आपले व्यक्तिमत्व जपावे, जोपासावे, पूर्णत्वास न्यावे. जेव्हा सामाजिक संदर्भात गरज निर्माण होईल तेव्हां सर्वस्वानिशी त्या कोंदणांत प्रगट व्हावे. गरजेशिवाय गर्दींत घोटाळत राहणे, एखाद्या कोंडाळ्यात अडकून पडणे किंवा एखाद्या जल्लोशांत भान हरवून बसणे ही समाजशीलता नव्हे. पंचतारांकित जीवनाकडे पाठ फिरवणे ध्रुवताऱ्यावर  नजर ठेवून जीवनयात्रा पुरी करणे, हा स्वधर्म झाला पाहिजे

शहरांतील माणसे सतत गर्दीत वावरत असतात ; त्यांच्या चित्त्ताची व्यग्रता वाढते ; तीं बहिर्मुख होतात ; त्यांना दिसेल ते पाहायला आवडूं लागते, मिळेल ते खाणे आवडूं लागते. आपल्या मनांत काय चालले आहे ते अभ्यासणे अवघड वाटते ; आपल्या मनोदेवतेची हाक त्यांना ऐकता येत नाही. थांबण्यापेक्षा धांवणे पोहोचण्यापेक्षा परत फिरणे आवडूं लागते. कशाची तरी हाव नि त्यापायी धावाधाव असे जीवनाचे रूप होते.


आणि म्हणूनच ‘रोड मॅप’ ची गरज अधोरेखित होते. 

हल्लीच्या युगात जीपीएस किंवा गुगल् मुळे रोडमॅप शोधणे सोपे झाले असले तरी व्यापक स्वरूपात प्रत्येकाच्या मनात आपापला रोडमॅप तयार असायला हवाच ना ? या साठीच सदग्रंथ, सत्पुरूष आणि सदगुरू आपले वाटाडे होतात, मार्गदर्शक ठरतात. अर्थात त्या मार्गांवर नेटाने चालत राहणे आपल्याच हातीं असते ना ! 


काही वर्षांपूर्वी ‘एकान्त’ आणि ‘लोकान्त’ या विषयी वाचत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे सुंदर शब्द पुन्हा आठवले. ते म्हणाले होते, स्फुर्ती-प्रतिभेसाठी एकान्त आणि अभिव्यक्तीसाठी लोकान्तहे सूत्र आहे. समर्थ रामदास म्हणत, ‘जयाला एकान्त मानवला, सर्वकाही सुचे त्याला’. तुकाराम महाराज साधकांना उपदेश करतात, ‘बैसोनी निवान्त शुध्द करी चित्त, तया सुखा अन्त पार नाही’’

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या सुंदर इंग्लिश शैलीत सांगतात, ‘Solitude of the soul is the birthplace of religion’! ‘ 


वाह, किती सुंदर. पण खरा एकांत कुठे लाभतो ? खेड्यापाड्यांत एकप्रकारचा सुखद एकान्त लाभतो ; रानामळ्यात निसर्गसहवास लाभतो. या सहलींत एकप्रकारचा गतिमान एकान्त मिळतो ; चालताचालतां वाट सोडतां येते, बाजूला होता येते, पुन्हा वाट वहिवाट होते

रोड मॅपवर लिहिता लिहितां बरेच काही छान छान मिळाले की नाही तुम्हाला आज तरी

रहाळकर

२७ मार्च २०२४  


This page is powered by Blogger. Isn't yours?