Sunday, September 29, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पंचाहत्तर

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पंचाहत्तर 

अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ:     
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्त: मे प्रिय१२/१६॥” 
( नि:स्पृह, अंतर्बाह्य पवित्र, दक्ष, उदासीन, निर्भय आणि फलाकांक्षा धरतां कर्म करणारा माझा भक्त मला अत्यंत प्रिय असतो). 

जयाचिया ठायीं पांडवा अपेक्षे नाही रिगावा (शिरणे) सुखासि चढावा (भर) जयाचे असणे  

असे पहा, काशीला गेल्यास मोक्षप्राप्ती होते हे खरे असले तरी तिथे देहत्याग घडतो. बरें, हिमालयाच्या यात्रेने पापक्षालन होत असले तरी तिथे मरणाचा धोका फार असतो. या उलट, सज्जनाचें पावित्र्य असे संकटग्रस्त नसते
गंगामाईचे पावित्र्य वादातीत आहे आणि तिथे पाप-ताप-क्षालन देखील होते, मात्र बुडण्याची भीती असतेच ना ! सज्जनरूपी तीर्थाच्या खोलीला थांग नसतो, पण भक्तांना तिथे बुडण्याची धास्ती नसते ! बुडतांही जीवंतपणींच मोक्ष ठरलेला
ज्या संतांच्या समागमाने गंगा देखील पवित्र होते, त्या संतांच्या पावित्र्या बद्दल काय सांगावेस

म्हणोनि जो ऐसा शुचित्वें तीर्था कुवासा (आश्रय) जेणें उलंघविलें दिशा मनोमळ (म्हणून ज्याचे पावित्र्याचा तीर्थांनीही आश्रय घ्यावा असा भक्त मनांतील सर्व किल्मिषें देशोधडीला लावतो). 

आंतु बाहेरी चोखाळू (शुध्द) सूर्य जैसा निर्मळु आणि तत्वार्थींचा पायाळु देखणा जो (पाहणारा) (सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य शुध्द आणि पायाळू माणसाप्रमाणे भूमीगत म्हणजेच गहन सिध्दांत सहज आकलन करू शकणारा (जो भक्त) - ) 

व्यापक आणि उदास (indifferent) जैसें कां आकाश तैसें जयाचें मानस सर्वत्र गा  
संसारव्यथें फिटला (मुक्त झाला) जो नैराश्यें (निरीच्छपणें) विनटला (शोभला) व्याधाहातोनि सुटला विहंगु जैसा (पक्षी)
तैसा सतत जो सुखें कोणतीही टवंच (टोचणी) देखे नेणिजे गतायुषें (मेलेला) लज्जा जेवीं !  
आणि कर्मारंभालागीं जया अहंकृती (अहंकार) नाही आंगीं जैसे निरिंधन (सरपणाशिवाय) आगीं विझोनि जाय  

अर्जुना, अशा भक्तांच्या प्राक्तनांत मोक्षाशी निगडित परम संतोषच लिहिलेला असतो. अशा प्रकारे ज्याची वृत्ती सदैव सोहंभावांत म्हणजेच आत्मस्वरूपांत कायम स्थिरावल्यामुळे द्वैताची भाषाच संपते. तथापि भक्तिसुख उपभोगण्यासाठी आपणच तिला सेव्य आणि सेवक अशा दोन भागांत विभागून सेवकपण स्वीकारतो. एक भाग म्हणजे मी ईश्वर नि दुसरा भक्त, जो आपल्या भक्तीने अभक्तांसमोर भक्तीचा आदर्श ठेवतो
अशा योगसंपन्न भक्तांचा मला छंद जडतो, मला त्याचेच ध्यान करावेसे वाटते ; फार काय सांगू, असा भक्त भेटल्यावरच माझे समाधान होते
तयालागीं मज रूपा येणे तयाचेनि मज येथे असणे तया लोण कीजे जीवेंप्राणें ऐसा पढिये (अर्जुना, तो माझा इतका लाडका असतो की त्याचेसाठींच मी अवतार घेतो, त्याचेसाठींच इथे राहतो. त्याचेवरून पंचप्राण ओवाळून टाकावेत इतका तो मला प्रिय असतो


क्रमश

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग शहात्तर

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग शहात्तर 

भगवन्त आपल्या लाडक्या भक्तांचे गुणविशेष सांगत आहेत नि ज्ञानदेव आपल्या रसाळ वाणीने त्याचे बहारदार निरूपण करीत आहेत

यो हृष्यति द्वेष्टि शोचति कांक्षति   
शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य: मे प्रिय:    १२/१७॥” 
(जो इष्ट वस्तूच्या लाभाने हर्षित होत नाही, ती मिळाल्याचा खेद मानत नाही, तिचा वियोग झाला तर शोक करत नाही, शिवाय ती प्राप्त करून घेण्याची लालसा धरत नाही आणि शुभ-अशुभ कर्माचा त्याग करत माझीच भक्ती करतो असा भक्त मत्प्रिय होय). 

जो आत्मलाभासारिखे गोमटें (चांगले) कांहीचि देखे म्हणौनि भोगविशेखें (भोगांविषयीं) हरिखेजेना (हर्षित होत नाही)  
आपणचि विष्व जाहला तरी भेदभावो सहजचि गेला म्हणौनि द्वेषु ठेला (मावळला) जया पुरूषा  
पैं आपुलें जें साचें (खरे) ते कल्पांतीही वचे (नाहीशी) हे जाणोनि गताचें (नष्ट वस्तूचे) शोचि जो (मात्र आपले खरे (आत्म)स्वरूप कधीच नष्ट होत नाही हे जाणून या नश्वर देहाबद्दल तो शोक करीत नाही
आणि जयापरौतें कांही नाही ते आपणपेंचि आपुल्या ठायीं जाहला या लागीं कांही आकांक्षीना (आणि ज्याहून श्रेष्ठ किंवा दुसरी अशी काहीच वस्तू नाही आणि तो स्वत: ती झाला असल्यामुळे त्याला कशाचीही आकांक्षा नसते
वोखटें (वाईट) कां गोमटें (चांगले) हे कांहीही तया नुमटे (समजत नाही) रात्री दिवस घटे (घडत नाही) सूर्यासि जेवीं  
ऐसा बोधुचि केवळ जो होऊनि असे निखळु (केवळ) त्याहीवरी भजनशीळु माझ्या ठायीं (अशा रीतीने जो स्वत: ज्ञानरूप असूनही माझे भजनांत रमतो
तरी तया ऐसें दुसरें आम्हां पढियंते (आवडते) सोयरे (जिवलग) नाही गा साचोकारें (खरोखर) तुझी आण (शप्पत)  

पुढे म्हणतात

सम: शत्रो मित्रे तथा मानापमानयो:     
शीतोष्णसुखदु:खेशु सम: संगविवर्जित:    १८॥” 
(जो शत्रू नि मित्र, मान अपमान, शीत आणि ऊष्ण तसेच सुख वा दु: यांविषयीं समान भावनेने आसक्तिरहित असतो

पार्था जयाचिया ठायीं वैषम्याची (विषमतेची) वार्ता नाही रिपुमित्रां (शत्रूमित्रां) दोहीं (दोन्ही) सरिसा पाडु (सारखा भाव)  

अथवा अर्जुना, घरच्यांना प्रकाश द्यावा नि बाहेरच्यांना अंधार असे दिवा कधी करत नाही ; किंवा ज्याने घाव घातला आणि ज्याने रुजवले  त्या दोघांनाही वृक्ष जशी सारखीच सावली देतो, किंवा ऊंस लावणाऱ्याला गोड आणि पिळणाऱ्याला कडू लागत नाही, अगदी तसेच शत्रू आणि मित्राला जो मानापमानाने सारखा मानतो. आकाश जसे तिन्ही ऋतूंना समान असते तसा थंड नि गरम दोन्ही त्याला सारखेच भासते. अर्जुना, ज्याप्रमाणे उत्तरेकडून वाहणारा किंवा दक्षिणेकडून येणारा वारा पर्वताच्या लेखीं सारखाच असतो, तसा सुखांत वा दु:खात तो मध्यस्थाप्रमाणे सम असतो

माधुर्यें चंद्रिका सरिसीं राया रंका तैसा जो सकळिकां भूतां समु (ज्याप्रमाणे चांदण्याची शीतलता गरीब वा श्रीमंत सारखीच भोगतात तसा तो सर्व प्राणिमात्रांशी समत्व राखतो). 
आघवेयां जगा एक सेव्य जैसें उदक तैसे जया तिन्ही लोक आकांक्षिती (सर्व जगासाठी पाणी जसे सर्वांना उपलब्ध आहे त्याप्रमाणे तिन्ही लोक ज्याची इच्छा धरतात

जो सबाह्यसंगु (अंतरबाह्य संग) सांडोनियां लागु (संबंध) एकाकीं  असे आंगी (एकांतांत) आंगीं सूनी (स्थिरावून) (सर्व संबंध सोडून, अंतर्बाह्य नि:संग होत्साता जो आपल्यातच आपला एकांत सेवन करतो

तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित्  
अनिकेत: स्थिरमतिर् भक्तिमान्मे प्रियो नर१९॥” 
(निंदा नि स्तुतीला समान मानणारा, मौन धारण करणारा, मिळेल त्यांत संतुष्ट राहणारा, इतर कुठल्याच आश्रयावर राहणारा, स्थिरबुध्दिचा भक्तिमान् पुरूष मला अत्यंत प्रिय असतो

अर्जुना, ज्याप्रमाणे आकाश अलिप्त असते तसे त्याच्यावर निंदा किंवा स्तुति कांहीही परिणाम करीत नाहीत. निंदा आणि स्तुतिला समान मानून जनांत असो वा वनांत, तो प्राणवायूप्रमाणे विहरत असतो. खोटे किंवा खरें काहीच बोलतां तो मौन राखणे पसंत करतो. नित्य नवा  आत्मानंद भोगण्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही
असे पहा, पाऊस पडला नाही तरी समुद्र कधी आटतो काय ? अगदी तसेच लाभ किंवा हानिमुळे त्याला हर्ष वा खेद होत नाहीत आणि मिळेल ते तो गोड मानून घेतो
वायू ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करतो तसा तो जगभर फिरूनही कोणे एके ठायीं राहात नाही. खरें तर ज्याप्रमाणे आकाशच वायूचे राहते घर असते तसे अखिल विश्वच त्याचे विश्रांतीचे स्थान असते

हें विश्वचि माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला  
मग याहीवरी पार्था माझ्या भजनीं आस्था तरी तयांते मी माथां मुगुट करीं  
उत्तमासी मस्तक खालविजे (झुकवणे) हें काय कौतुक ? परी मानु करिती तिन्ही लोक पायवणियां (पायाचें तीर्थ) (उत्तम पुरूषाला नतमस्तक व्हावें यांत काही नवल नाही ; पण त्याचें चरणतीर्थाला तिन्ही लोकांत मान असतोच ना ?)

तरी पण श्रद्धावस्तूचा आदर कसा करावा हे शिकायचे असेल तर श्री महादेवाला आापला गुरू करायला पाहिजे. तथापि ते असू देत, कारन महेशाची  स्तुति करतांना ती आत्मस्तुति केल्यासारखे होईल ! आणि म्हणूनच रमानाथ भगवान् श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना आतां तो दृष्टाटंत पुरे, मी माझ्या भक्ताला शिरावर धारण करतो

जे पुरूषार्थसिद्धि चौथी घेऊनियां आपुलें हातीं रिगाला भक्तिपंथीं जगा देतु (पुरूषार्थाची चवथी अवस्था म्हणजेच मोक्ष मिळवूनही तो विश्वाला भक्तिमार्गावर चालण्याची प्रेरणा देतो). 

कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी (देवघेव) की जळाचिये परी तळवटु घे (तो आत्मानंदाचे मोक्षसुख भोगत असूनही अत्यंत विनम्र असतो, जसे पाणी कायम तळ गाठत राहते). 

म्हणौनि गा नमस्कारूं तयातें आम्ही माथां मुकुट करूं तयाची टांच धरूं हृदयीं आम्ही (आणि म्हणूनच आम्ही त्याला वंदन करतो, त्याला मुकुटाप्रमाणे डोक्यावर घेतो, इतकेच नव्हे तर त्याच्या पाउलाची खूण वक्षस्थळावर मिरवतो !) 

तयाचिया गुणांची लेणीं लेववूं आपुलिये वाणी तयाचिये कीर्ति श्रवणीं आम्ही लेवूं (त्याचे सद्गगुणांचे वर्णन करीत त्याची कीर्ती आम्ही ऐकत राहतो

तो पहावा हे डोहळे म्हणोनि अचक्षुसी मज डोळे हातींचेनि लीलाकमळें पूजूं तयातें (त्याला पाहण्याच्या तीव्र इच्छेने मला निर्गुण निराकाराला अवतारित होऊन डोळेभरून पाहतां आले, माझे हातांतील लीलाकमळाने त्याची पूजा बांधतां आली !) 

दोंवरी दोनी भुजा आलों घेऊनि आलिंगावया लागुनि तयाचें आंग (इतकेच नव्हे तर दोन हात कमी पडूं नये म्हणून दोन भुजा अधिक धारण करून त्याला आलिंगन देण्यास धांवूम आलों
तया संगाचेनि सुरवाडें (सुखास्तव) मज विदेहा देह धरणें घडे किंबहुना आवडे निरूपमु (अनुपम) (त्याचे संगतीच्या आनंदासाठी मज निराकाराला देह धारण करावासा वाटला. फार काय सांगावे, त्याचेवर असलेल्या माझ्या प्रेमाला कसली उपमाच देतां येणार नाही

तेणेंसि आम्हां मैत्र एथ कायसें विचित्र ? परि तयाचें चरित्र ऐकती जे तेही प्राणापरौते आवडती हें निरूतें जें भक्तचरित्रांतें प्रशंसिती (त्याची आमची मैत्री असावी यांत नवल ते काय ? पण त्याचे चरित्र जे कुणी ऐकतात किंवा गुणगान करतात, ते मला प्राणापेक्षांही प्रिय असतात

अर्जुना, तुला आत्तां हा जो भक्तियोग विस्ताराने सांगितला तो नीट समजून घे. या भक्तिमार्गाची थोरवी इतकी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरूषावर मी मनापासून प्रेम करतो, त्याचे ध्यान करतो, किंवा त्याला मस्तकावर मिरवतो). 

ये तु धर्म्यामृतम् इदम् यथोक्तं पर्युपासते    
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेsतीन मे प्रिया:   २०॥” 
(माझ्यावर श्रद्धा ठेवून, मत्परायण होत्साते जे माझे भक्त आतांपर्यंत सांगितलेला धर्मयुक्त अमृतमय उपदेश आचरणांत आणतात, ते मला अतिशय प्रिय असतात

ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्यं करिती प्रतीतिगम्य आइकोनि जे (त्या या योगाच्या रमणीय, सुरस आणि धर्मास अनुकूल गोष्टी ऐकून जे त्याचा अनुभव घेतात
तैसीचि श्रध्देचेनि आदरें जयांचे ठायीं विस्तरे (विस्तारतें) जीवीं जयां थारे (टिकते) जे अनुष्ठिती (आचरतात)  
परी निरूपिली जैसी तैसीच स्थिति मानसीं मग सुक्षेत्रीं जैसी पेरणी केली  
परी मातें (मला) परम करूनि इये (या) अर्थीं प्रेम धरूनि हेंचि सर्वस्व मानूनि घेती जे पैं  
पार्था गा जगीं तेचि भक्त तेचि योगी उत्कंठा तयालागीं अखंड मज  
तें तीर्थ तें क्षेत्र जगीं तेचि पवित्र भक्तिकथेसि मैत्र जयां पुरूषां  
आम्ही तयांचें करूं ध्यान ते आमुचें देवतार्चन तें वांचूनि आन (दुसरें) गोमटें (उत्तम) नाही  
तयांचें आम्हां व्यसन (छंद) ते आमुचें निधिनिधान (परम ठेवा) किंबहुना समाधान ते मिळती तैं (तेव्हा)  
पैं प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता ते मानूं परमदेवता आपुली आम्ही (तथापि हे अर्जुना, अशा प्रेमळ भक्तांचे जे वर्णन करतात त्यांना आम्ही आमचे परम दैवत मानतो). 

ऐसें निजजनानंदें (आत्मानंदांत निमग्न) तेणे (त्या) जगदादिकंदें (विश्वाचा आदिपुरूष) बोलिले मुकुंदें संजयो म्हणे  

राया जो निर्मळु निष्कलंक लोककृपाळु शरणांगतां प्रतिपाळु शरण्यु जो (शरण येण्याजोगा)  

पैं (आणि) सुरसहायशीळु (देवांचा साहाय्यकर्ता) लोकलालनलीळु (लीलया लोकपालन करणारा) प्रणतप्रतिपाळु (शरणागताचें रक्षण करणारा) हा खेळु जयाचा  

जो धर्मकीर्ति धवळु (शोभणारा, शुभ्र) अगाध दातृत्वें सरळु अंतुळबळें (अतिसामर्थ्यवान्) प्रबळु बळिबंधनु (बलीराजाकडून बांधला जाणारा)  

जो भक्तजनवत्सलु प्रेमळजन प्रांजळु (सरळ) सत्यसेतु (सत्त्याचा तारक) सकळु कलानिधी (कलेचा ठेवा)  

तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा आइकतु असे (तो वैकुंठाधिपति, भक्तांचा सार्वभौम राजा श्रीकृष्ण वक्ता असून परम भाग्यवंत अर्जुन ती कथा ऐकत आहे)  

तीच रसाळ कहाणी आतां निवृत्तिदास ज्ञानदेव तुम्हा संतांना सांगतील, ती लक्षपूर्वक ऐकावीं

क्रमश:..... 




This page is powered by Blogger. Isn't yours?