Sunday, August 19, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग बत्तीस

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग बत्तीस)

षट्चक्रें भेदत कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्रांत स्थिरावते आणिसोsहंभावप्रगट होऊन परमात्म स्वरूपांत विलीन होते, या सर्व प्रक्रियेचे विस्तारपूर्वक वर्णन श्री ज्ञानदेवांनी केले

(षट्चक्रें, कुंडलिनी, ब्रह्मरंध्र, सोsहंभाव, पंचमहाभूतें, ब्रह्मानंद, जीवात्मा वगैरे भारी भारी शब्द पाहून काही वाचक काहीसे बावचळून जाणे शक्य आहे. प्रस्तुत लेखकाला देखील त्या सर्वांचा निश्चित बोध झालेला नाही. सबब, आधी याच शब्दांची थोडी उकल करता आली तर पाहू !) 

(*षट्चक्रें= आपल्या पाठीच्या कण्यांत सुषुम्नेच्या मार्गावर म्हणजेच इडा नि पिंगला या नाड्यांच्या पोकळीत, मूलाधार म्हणजे मणक्याच्या शेवटच्या भागापासून आज्ञाचक्र म्हणजे कपाळामागील भ्रूमध्यापर्यंत सहा चक्रें (ज्ञानतंतूंची कमळें) वर्णिलेली आहेत. कुंडलिनी शक्ती त्यांचा भेद करीत ब्रह्मरंध्रातून सहस्त्रदलांत विलीन होते. (मस्तकावरील टाळूचा प्रांत), आणि योगी ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी या चक्रांजवळ आली म्हणजे तीं कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे उमलतात, स्पष्ट होतात असे म्हणतात. (एरव्हीं तीं सुप्तावस्थेत असावीत). 
या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हा योग्याला अनेक सिध्दी आणि अतीन्द्रिय ज्ञान प्राप्त होते
ही षट्चक्रें पुढीलप्रमाणे :- 
. मूलाधार किंवा आधारचक्र - हे शिश्न आणि गुद यांच्या शिवणीजवळ मागे पाठीच्या कण्याजवळ असून त्याची देवता गणपती आहे
. स्वाधिष्ठान किंवा लिंगचक्र हे लिंगाच्या मागे पाठीच्या कण्यांत असून ब्रह्मदेव याची देवता आहे
. मणिपूर चक्र किंवा नाभिचक्र हे बेंबीच्या मागे पाठीच्या कण्यांत असून विष्णू याची देवता होय.
. अनाहतचक्र किंवा हृदयकमल हे हृदयाच्या मागे पाठीच्या कण्यांत असून शंकर याची देवता आहे
. विशुध्द चक्र हे कंठाच्या मागे पाठीच्या कण्यांत असून देवता जीवात्मा ही आहे
. आज्ञाचक्र किंवा अग्निचक्र हे दोन भुवयांमध्धल्या मागच्या पाठीच्या कण्यांत असून सदगुरू ही त्याची देवता आहे

*कुंडलिनी- शरीरातील मूलाधार चक्राच्या ठिकाणी कुंडलिनी या नावाची प्राणशक्ती सुप्तावस्थेत असते आणि योग, भक्ती इत्यादींमुळे ती सुषुम्ना मार्गातून सहस्त्रदलाकडे जाऊं लागते. त्यावेळचे योग्यांना अतीन्द्रिय ज्ञानाचे अनुभव येवूं लागतात, सिध्दी प्राप्त होतात. कुंडलिनी अनाहत चक्राच्या पुढे गेल्यावर तिलामारूतअसे नांव देतात आणि ती प्राणशक्ती सहस्त्रदलात पोहोचून परमात्म तत्वांत विलीन होते
सुप्तावस्थेत असतांना कुंडलिनी साडेतीन वेढे देऊन, खालीं तोंड करून निजलेल्या नागिणी प्रमाणे असते. कुंकवाने न्हालेले नागिणीने पिल्लू, असे जागृत कुंडलिनीचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. (कुंडलिनीचे तीन वेढे म्हणजे ओंकाराच्या साडेतीन मात्रांवर -, , नि अर्ध चंद्र असेही कोणी म्हणतात.) 

ब्रह्मरंध्र - योगसामर्थ्याने जेथून प्राण नेतां येतो असे मस्तकाच्या टाळूवरील गुप्त छिद्र, दहावें द्वार. (शरीरातील नवद्वारे माहीत आहेतच.) कुंडलिनी (प्राणशक्ती ब्रह्मरंध्रांत पोहोचली म्हणजे आत्मदर्शन होते.) 

*सोs भाव - सदगुरूंकडून मिळालेल्या कृपेमुळेसच्चिदानंद परमात्माहेच माझे मूळ रूप आहे असा निदिध्यास पूर्वक अभ्यास आणि तशी अनुभवली जाणारी जाणीव.
*सोsहं हंस:    - सोsहं भाव आपल्यांत पूर्णत: मुरला असल्याची प्रचीती

*पंच महाभूतें -पृथ्वी, आप, तेज, वायू नि आकाश यांचा समुच्चय

ब्रह्मानंद - आत्मानंदामुळें  येणारा अवीट आणि अखंड असा अनुभव

असो !) 



पुढे ते सांगतात की त्यावेळीं पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो आणि शिव-शक्तीचे ऐक्य होते नि आकाशासह सर्व काही ब्रह्मानंदांत विरून जाते
ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघ होऊन जमीनीवर वर्षाव करीत नदीरूपाने पुन्हा  सागरात  मिळते, तसे देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदीं प्रवेश करतो. अगदी  समुद्राच्या पाण्यासारखाच ! नंतरमीवेगळा, आत्मा वेगळा, किंवा दोन्ही एकच अशी भावनाच शिल्लक राहात नाही

आतां महाशून्याचिया डोहीं जेथ गगनासीचि थावो (थारा) नाही तेथ तागा (थांगपत्ता) लागेल काई बोलाचा इया

म्हणून हे ब्रह्म शब्दात सांगण्यासारखे किंवा ऐकण्यासारखे नाही. मात्र सुदैवाने ज्याला तो ब्रह्मानंदाचा अनुभव येतो तो त्यांत तद्रूप होऊन जातो

जे उन्मनियेचें लावण्य जें तुर्येचें तारूण्य अनादि जें अगण्य परमतत्व (हे ब्रह्मस्वरूप कसे आहे म्हणाल तर सहजावस्थेचे सौंदर्य नि समाधि अवस्थेचे तारूण्य होय, ज्याला आरंभ नाही की मोजता येत नाही.) 

जें विश्वाचे मूळ (आधार) जे योगद्रुमाचे (योगरूपी वृक्ष) फळ जें आनंदाचे केवळ चैतन्य गा  
जे आकाराचा प्रांतु (सीमा) जें मोक्षाचा एकांतु जेथ आदि आणि अंतु विरोनि गेले  
जें महाभूतांचें बीज जें महातेजाचें तेज एवं पार्था जें निज स्वरूप माझे  
तें हे चतुर्भुज कोंभेली (कोंभ फुटला) जयाची शोभा रूपा आली देखोनि नास्तिकीं नोकिलीं (छळ केला) भक्तवृंदें  
तें अनिर्वाच्य महासुख पैं आपणचि जाहले जे पुरूष जयांचे निष्कर्ष प्राप्तिवेरीं (अर्जुना, असे हे महासुख अवर्णनीयच. परंतु याची प्राप्ती होइपर्यंत ज्यांचे प्रयत्न अविरत चालले ते स्वत: सुखरूप होऊन गेले). 

आम्ही जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले, ते जे कोणी आचरणात आणतात ते माझ्याच योग्यतेचे होतात.

परब्रह्माचेनि रसें देहाकृतीचिये मुसें वोंतीव जाहले तैसें दिसती आंगें (त्या योग्यांची शरीरें परब्रह्माच्या मुशींत ओतल्यासारखी तेज:पुंज होतात). 

अर्जुन म्हणतो, ‘इयें अभ्यासीं जे दृढ होती ते भंरवसेनि ब्रह्मत्वा येती असे जे तुम्ही म्हणतां ते मला कळले आहे. केवळ ऐकूनच जे ज्ञान मला मिळाले आहे त्याचा अनुभव आला तर तल्लीनता का बरे येणार नाही ? मात्र हे श्रीकृष्णा, माझ्या मनांत एक शंका आहे. योग्यतेच्या अभावीं हा योग करणे कसे शक्य होईल
तेव्हा भगवंत म्हणतात
पैं योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीचे अधीन जाणिजे कां जे योग्य होउनी कीजे तें आरंभिलें फळें (पण जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या अधीन असते, कारण योग्य व्यक्तीने आरंभिलेले काम तात्काळ फलद्रूप होते). 
अर्जुना, खरें तर योग्यता ही काही सहजसाध्य नसते. शिवाय, योग्य पुरूषांची खाण असते काय ? परंतु थोडासा विरक्त होत्साता ज्याने आपल्या शारीरिक गरजा आटोक्यात ठेवल्या आहेत तोच या बाबतींत अधिकारी समजावा. एवढ्याशा युक्तीने तुलाही ती योग्यता प्राप्त होऊ शकते. अर्जुना, योग प्राप्तीची अशी सोपी व्यवस्था आहे. मात्र अनियमित माणसाला तशी योग्यता अजिबात मिळत नाही
जो रसनेन्द्रियाचा अंकिला (खादाड) कां निद्रेसी जीवें विकला (अति झोपणारा) तो नाही एथ म्हणितला अधिकारिया
अथवा आग्रहाचिये बांदोडी (बंधनांत) क्षुधा तृषा कोंडी आहारातें तोडी मारोनियां  
आणि झोपेचे नावही घेतां जो बळकट अभिमान बाळगतो त्याला त्याचे शरीर सुध्दा साथ देत नाही, तर मग योगाभ्यास कसा होणार ?
म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा तैसा विरोधु नोहावा कां सर्वथा निरोधावा हें ही नको  

युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु
युक्तस्वप्नाव बोधस्य योगो भवति दु:खहा /१७॥
(ज्यांचा आहारविहार परिमित आहे, जो सर्व कर्में योग्य प्रकारे करतो, ज्याची झोप मर्यादित आहे त्याच्या जीवनात या योगामुळे संसारदु:खांचा नाश होतो). 

मितला बोली बोलिजे मितलिया पाउलीं चालिजे निद्रेही मानु दीजे अवसरें एकें  
जागणे जरी जाहलें तरी होआवें ते मितलें येतुलेनि धातुसाम्य संचलें असेल सहजें (मितलें=मोजके) (अशा रीतीने शरीरातील सप्तरस समतोल राहतील). 
अशा निरामय आचरणाने मनाचा संतोष वृध्दिंगत होईल
योग्याचे नियंत्रित चित्त जेव्हा आत्म्याशीं एकरूप होते तेव्हा तो विषयांपासून पूर्णपणे निरीच्छ होतो ; अशा योग्याला योगसिध्द असे म्हणतात. निवाऱ्यांत ठेवलेली ज्योत ज्याप्रमाणे हलत नाही, अगदी तसेच चित्त्ताला पूर्णपणे कह्यांत ठेवणऱ्या योग्याचे मन अविचलित राहते, म्हणजेच मन क्षेत्रसंन्यास घेते


(क्रमश:

This page is powered by Blogger. Isn't yours?