Saturday, April 25, 2020

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग ब्यांणौ

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग ब्यांणौं (ninety two) 

श्री ज्ञानदेवसिध्दांत-नवनीतरूपी लोण्याचा गोळा आपले हातीं देत आहेत
यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमम्  
क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विध्दि भरतर्षभ.    १३/२६॥” 
(हे भरतश्रेष्ठ अर्जुना, या विश्वांत निर्माण होणारें प्रत्येक स्थावर जंगम हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे संयोगामुळेच घडते हे समजून घे

तरी क्षेत्रज्ञ येणे बोलें तुज आपणपें (आत्मतत्व) जें दाविलें आणि क्षेत्रही सांगितले आघवें जें  
तया येरयेरांच्या (एकमेकांच्या) मेळीं (मीलनाने) होइजे भूतीं सकळी अनिलसंगें (वाऱ्याच्या स्पर्षाने) सलिलीं (पाणी) कल्लोळ जैसे  

किंवा, प्रखर सूर्यकिरणें माळरानावर पडतांच मृगजळाचा जणूं पूर आला आहे असे भासते. अथवा, पृथ्वीवर पर्जन्य धारा पडल्यावर अगणित प्रकारचे अंकुर फुटतात, अगदी तसेच चराचरांत उत्पन्न होणारे अनेकानेकजीवया प्रकृतिपुरूषाच्या संयोगामुळे निर्माण होतात हे अर्जुना तूं जाणून घ्यावेस. आणि म्हणूनच सर्व जीव या प्रकृतिपुरूषाहून वेगळे नाहीत

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठंन्तं परमेश्वरम्
विनश्यत्स्वविनश्यन्तं : पश्यति पश्यति  २७॥” 
(सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी समरूपाने असलेला आणि नष्ट होणाऱ्या पदार्थांतही अविनाशी असलेल्या परमेश्वराला जो ज्ञानदृष्टीने पाहतो तोच खरा पाहतो

पैं पटत्व (वस्त्र) तंतु नव्हे तरि तंतूसीचि ते आहे ऐसें खोलीं डोळां पाहे ऐक्य हें गा (असे पहा, वस्त्रपण म्हणजे केवळ धागा नव्हे, खरें तर धाग्यालाच वस्त्रपण प्राप्त होते. तसे प्राणीमात्र म्हणजे परमेश्वर नव्हे पण परमेश्वराला प्रकृतीमुळे प्राणीमात्रांचा आकार प्राप्त झाला आहे. असा खोलवर विचार करून पाहिला तर सर्व प्राणीमात्रांचे परमेश्वराशी असलेले ऐक्य अनुभवास येईल
सर्व भूतमात्र एकाच पदार्थापासून निर्माण होतात नि ते सर्व एकच आहेत, असा अनुभव तू घेतला पाहिजेस अर्जुना. या सर्वांची नांवें वेगवेगळी, आचारविचार वेगळाले नि वेषभूषाही तशीच वेगळी म्हणून तुझ्या मनांत भेदभाव निर्माण झाला तर अनेक जन्म या प्रपंचातून तुझी सुटका नाही
असे पहा, भोपळ्याच्या वेलीला अनेक आकाराची फळें लगडतात ; त्यांत काही गोल, काही लांबट तर काही वाकडीतिकडी असतात. किंवा, बोराच्या झाडाला वाकडे तिकडे कांटे लागलेले असले तरी ते एका बोरीचेच असतात. अथवा निखाऱ्याचे प्रत्येक स्फुल्लिंगाची ऊष्णता सारखीच असते. अगदी तसेच, सर्व जीवांत एकच परमात्म-तत्व भरून असते

गगनभरीं धारा परी पाणी एकचि वीरा तैसा या भूताकारा सर्वांगींतो 
हे भूतग्राम (शरीर) विषम (भिन्न) परी वस्तु ते एथ सम घटमठीं (घागरींत आणि घरांत) व्योम (आकाश) जियापरी (जसें)  
हा नाशतां भूताभासु एथ आत्मा तो अविनाशु जैसा केयुरादिकीं (अलंकारांत) कसु (कस) सुवर्णाचा  

म्हणून, परमात्मा हा जीवधर्मरहित असला तरी सर्व जीवांना व्यापून असतो हे जो जाणतो, तो ज्ञानी मंडळींतला अधिक डोळस म्हणायला हवा

ज्ञानाचा डोळा डोळसां- माजीं डोळसू तो वीरेशा हे स्तुति नोहे बहुवसा भाग्याचा तो (तो आत्मज्ञानी पुरूष  ज्ञानाचाही डोळा होय, आणि हे वीर पुरूषा ही केवळ स्तुति नव्हे, तो खरोखरच खूप भाग्यवान असतो

खरें तर मानवी देह त्रिगुण नि इंद्रियें यांचे एक गाठोडे असून वात, पित्त, कफासारख्या दोषांनी बरबटलेले आणि पंचमहाभूतांनी बनलेले आहे. तथापि योगीजन आपल्या योगज्ञानाच्या सामर्थ्याने ब्रह्मस्वरूपांत निमग्न होऊन राहतात. ते परब्रह्मस्वरूप नामरूपाच्या पलीकडे असते. ज्या प्रमाणे सर्व नद्या अखेर सागरांतच लीन होतात, तसे ते योगी मोक्षाचीही अभिलाषा धरीत नाहीत. किंवा, असंख्य दिव्यांत एकच एक तेज असते, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांत ते एकाच परब्रह्म स्वरूपाला म्हणजेच ईश्वराला पाहतात, जोअसतचि असतो’ ! 

ऐसेनि समत्वें पंडुसुता जिये जो देखत साता तो मरण आणि जीविता नागवे फुडा (पुन्हा अडकत नाही)  
म्हणौनि तो दैवगळा (भाग्यवान) वानीत (स्तुति) असो वेळोंवेळा जें साम्यसेजे डोळां लागला तया (म्हणून अशा भाग्यवान पुरूषाचे आम्ही सतत गुणगान करीत असतो, जो सामरस्याच्या बाजेवर पहुडलेला असतो

आणि मनोबुध्दिप्रमुखें कर्मेंद्रिये अशेखें करी प्रकृतीच हें देखे साचें जो गा (आणि मन बुध्दी इत्यादि इंद्रियांद्वारे प्रकृतीच सर्व कर्में करवून घेते हे तो योगज्ञानी पुरूष यथार्थपणे जाणतो
असे पहा, घरांतली माणसे आपापली कर्में करत असलीं तरी घर तटस्थ असते, किंवा आकाशांत मेघ इतस्तथा धांवत असतात पण आकाश काही हलत डुलत नाही. अगदी तसेंच प्रकृती आपल्या मायेने सर्व खेळ खेळते, मात्र आत्मा केवळ खुंटा म्हणून खडा असतो. त्याला या खेळाचे काही देणेघेणे नसते ! अशा प्रकारे ज्याने हे सत्य जाणले, त्याने अकर्त्या आत्म्याला जाणले असे खुशाल समजावे

एऱ्हवीं तैंचि अर्जुना होइजे ब्रह्मसंपन्ना जैं या भूताकृती भिन्ना दिसती एकीं (एकरूपाने)  

अरे, ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग उठतात, किंवा पृथ्वीवर परमाणु कण, अथवा सूर्याबरोबरच सूर्यकिरणें असतात ; किंवा शरीरांत विविध अवयव असतात, मनांत भावभावना असतात किंवा अग्नींत ठिणग्या असतात तसे एकातूनच अनेक प्राणिमात्र निर्माण होतात हे ज्याने जाणले त्याच क्षणीं तो ब्रह्मसंपन्न झाला ! अशा वेळीं त्याला जिथेतिथे केवळ ब्रह्मच दिसते आणि त्या अनुभवातून तो अपार सुख अनुभवतो

अर्जुना, आतां तरी तुला ही प्रकृतिपुरूष व्वस्था नीट समजली ना ? अरे सहज चूळुकभर पाणी प्यायला जावे नि ते अमृत निघावे किंवा अचानक मोठ्ठे घबाड हातीं यावे असे वाटून तूं जर मनांत इमले बांधूं लागलास, तर जरा थांब ! तुला अजून एकदोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. म्हणून तूं आपले चित्त माझ्या बोलण्याकडे ओलीस ठेव (लक्षपूर्वक ऐक) , असे भगवंत अर्जुनास म्हणते झाले

ऐसें देवें म्हणितलें मग बोलों आदरिलें (प्रारंभ केला) तेथे अवधानाचेंचि केलें सर्वांग येरें (अर्जुनाने)  

तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपें जळीं जळें लिंपे सूर्यू जैसा ............
(क्रमश:



This page is powered by Blogger. Isn't yours?