Tuesday, April 30, 2024

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे त्रेचाळीस १४३

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे त्रेचाळीस १४३ 


आतां श्री ज्ञानदेव सतराव्या अध्यायातील तीन प्रकारचेदानकसे असते त्यावर निरूपण करतील


आतां बोलतां प्रसंगा / आलें म्हणौनि पें गा / करूं रूप दानलिंगा / त्रिविधा तया // 

येथ गुणाचेनि बोलें / दानही त्रिविध असे जालें / तेंचि आईक पहिलें / सात्विक ऐसे //


दातव्यमिति यद्दानं दीयतेsनुपकारिणे

 देशे काले पात्रे तद्दानं सात्विकं स्मृतम्  ॥१७/२०॥” 


(जे दान कोणावर उपकार केल्यासारखे केले जात नाहीकाळ वेळ प्रसंगोचित आणि सत्पात्रीं केले जाते ते दान सात्विक दान होय


तरी स्वधर्मा आंतौते ( अनुसरून ) / जें जें मिळे आपणयातें / ते ते दीजे बहुतें / सन्मानयोगें // 


असे पहा, जरी उत्तम बियाणे हातीं असले तरी चांगली मशागत केलेली जमीन आणि अनुकूल पाऊसपाणी ध्यानात घेऊनच पेरणी करावी, तसाच प्रकार सात्विक दानांत आहे. किंवा एखादे अनमोल रत्न आहे पण ते जडवण्यासाठी पुरेसे सोने नाही अथवा तो अलंकार मिरवण्यासाठी योग्य अवयव वा शरीर नसेल तर त्या रत्नाचे औचित्य काय


परंतु भाग्यवश जर संपत्ती, मित्र आणि समारंभ एकत्र जुळून आले तर त्या आनंदाला पारावार नाही. अगदी तसेच सात्विक दान घडून येण्यासाठी प्रसंग, सत्पात्र आणि स्वधर्माने मिळवलेले धन यांचा सुरेख संगम जुळून येत असतो. तथापि तसे घडण्यासाठी सुयोग्य स्थान, जसे कुरूक्षेत्र, काशी किंवा तत्सम पवित्र जागा मिळवली पाहिजे. त्याचप्रमाणे  पावन काळ देखील लक्षात घ्यायला हवा. दान शक्यतों सत्पात्री असावे हे ओघाने आलेच. त्यासाठीच वेदशास्त्र संपन्न सदाचरणी पुरूष प्रयत्नपूर्वक शोधला पाहिजे

सेवकाने राजाची सेवा करून जसे बाजूला व्हावे तसे निष्काम वृत्तीने त्या वेदसंपन्न पुरूषाला जमीन, द्रव्य, वस्त्र यांचे यथोचित दान करावी, मात्र  फलाची अपेक्षा ठेवू नये


आणि दान जया द्यावे / तयातें ऐसेया पाहावे / जया घेतलें नुमचवे / कायसेनही // ( दान करताना असा माणूस पाहावा जो दिलेले दान कोणत्याही प्रकारे परत करणार नाही

असे पहा, जसे मोकळ्या आकाशाला साद घातली तर ते प्रत्युत्तर देत नाही किंवा  आरशाचे  मागची बाजू प्रतिबिंब दाखवत नाही अथवा पाण्यावर आपटलेला चेंडू टप्पा खाऊन परत उसळत नाही, किंवा मोकाट सुटलेल्या बैलाला टाकलेला चारा अथवा कृतघ्न माणसाला केलेली मदत जशी निष्फळ ठरते तसे आपले दातृत्व जो मिरवत नाही ते सर्वोत्तम सात्विक दान समजावे


परी मनीं धरूनि दुभतें / चारिजे जेवीं गायीतें / कां पेंव करूनि आइतें / पेरूं जाईजे // ( मात्र दूध मिळेल या अपेक्षेने गायीला चरवावे किंवा पीकासाठी पेरणी करावी

किंवा परतफेडीच्या अपेक्षेने सोयरिकीलाआहेरकरावा किंवा आधीच भरपूर व्याज वसूल करून उसनी रक्कम द्यावी अथवा आधी आपलीफीआकारून मगच रूग्णाला औषधोपचार करावे, तेदानचक्क राजसी म्हणावें

आणखी एक झकास दृष्टांत देतात ज्ञानदेव. आपण केलेल्या आणि पूर्वजांकडून घडलेल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून एकाद्या वेदविद्यासंपन्न ब्राह्मणाकडून निव्वळ दमडी खर्चून जो विधिविधान करवून घेतो तेही तिन्ही लोकांतील राजस दान म्हणूनच ओळखावे


आतातामसिक दानकसे ते या श्लोकातून पाहूंया

अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत् तामसमुदाहृतम् ” (अयोग्य स्थळीं, अयोग्य काळीं नि अपात्र व्यक्तीला सत्काराशिवाय आणि अपमानास्पद रित्या केलेले दान निखालसपणे तामसिक होय


मग म्लेंछांचे वसौटे (वस्तींत) / दांगाणे ( अरण्यातहन (आणिकैकटे (अपवित्र) / कां शिबिरें चोहटे (चव्हाटा) / नगरींचे ते // ( यवनांच्या वस्तींत, घोर अरण्यांत, अपवित्र जागी किंवा शहराच्या चव्हाट्यावर

तेही तेही ठाईं मिळणी / समयु सांजवेळो वा रजनी / तेव्हा उदार होणे धनीं / चोरियेच्या // ( अशा अपवित्र ठिकाणी आणि सांजवेळी किंवा रात्री चोरून आणलेले धन उदार होऊन दान करण्याला तामसिक दान असे म्हणतात. ) 


एवं ऐसेनि जे जे देणे / ते तामस दान मी म्हणे / आणि घडे दैवगुणे / आणिक एक // 


खरे तर राजसिक नि तामसिक दान सर्वथैव टाळावे म्हणून हे विवेचन झाले, परन्तु सात्विक दानाचाच सदैव अंगिकार करायला हवा


सत्वेंचि येणे चोखाळें (शुध्द) / करीं यज्ञादिकें सकळें / पावसीं तैं करतळें / आपुलें निज //  


अशा प्रकारेंदानाचे त्रिविध प्रकार सांगितल्यावर भगवद्गीतेतील एका अतिशय महत्वाच्या श्लोकावर निरूपण करतील श्री ज्ञानेश्वर महाराज

(क्रमश:)  


This page is powered by Blogger. Isn't yours?