Monday, October 21, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अठ्ठ्याहत्तर

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अठ्ठ्याहत्तर 

क्षेत्र-क्षेत्रज्ञ योगावरील क्षेत्राच्या मालकीबद्दलचे विवेचन ऐन बहरांत असताना आपण जरासे थांबलो होतो. प्रत्यक्षात माऊलींनी मत-मतांतरांचे हे सर्व विवेचन अतिशय मनोरंजक स्वरूपांत मांडले असले तरी ते समजायला खूप अवघड आहे हे निर्विवाद. तथापि, आपण पुढे जायलाच हवे म्हणून जाऊंया

तंव आणिकें एकें क्षोभें म्हणितलें निकें (ठीक आहे) तरी भोगिजे एकें काळे केवीं हें ? (तेव्हा रागावून दुसरे कोणी म्हटले की तुमचे म्हणणे ठीक आहे, पण मला सांगा की हा काळ सर्व काही एकटाच कसा काय भोगतो या क्षेत्राला ? काळाची यांचेवर सत्ता काय म्हणून ?) 
पण हा कालमहिमा स्पष्ट दिसत असूनही काही अभिमानी मंडळी आपलेच म्हणणे बरोबर असल्याचा आग्रह धरतात. खरे तर ऋषिमुनींनी नैमिष्यारण्यांतत कठोर तपश्चर्या करून या विषयावर वादविवाद केल्याचे पुराणांत दाखले आहेत. इतकेच नव्हे तर ऋग्वेदातील. बृहत्सामसूत्रांतून देखील याचा बराच उहापोह झाला. पण तेथेसुध्दां या  क्षेत्राविषयी निर्णय होऊ शकलेला नाही. या शिवाय अनेक क्रांतदर्शी विद्वानांनी यांवर सखोल चर्चा केली.. मात्र  तरीही या क्षेत्राची व्याप्ती आणि मालकी कुणालाच ठरवतां आलेली नाही

तथापि हे क्षेत्र छत्तीस तत्वांनी कसे बनलेले आहे ते भगवंत आतां सविस्तर सांगत आहेत.  

महाभूतानि अहंकार: बुध्दि: अव्यक्तम् एव ।।।
इंद्रियाणि दशैकं पंचचेन्द्रिय गोचरा:    ५॥
इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतना धृति
एतत्क्षेत्रं समासेन सविकारम् उदाहृतम्    ६॥ 
(सूक्ष्म पंचमहाभूतें , अहंकार , बुध्दी , अव्यक्त ,दहा इंद्रियें आणि एक मन इंद्रियांचे पाच विषय (शब्द स्पर्षादि) ५॥
इच्छा, द्वेष, सुख, दु:, चैतन्य, धैर्य आणि संघात हे विकारांसहित क्षेत्र होय असे थोडक्यांत सांगू  ६॥


तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम (आकाश) इयें तुज सांगितलीं बुझ (समज) महाभूतें पांचें (पांचही)
आणि जागतिये दशे (जागे असतांना) स्वप्न लपाले असे नातरी अंवसें (अमावस्येला) चंद्र गूढू (गुप्त)  
नाना अप्रौढबाळकीं (लहान बालक) तारूण्य राहे थोकीं (गुप्त) कां फुलतां कळिकीं आमोदु (सुगंध) जैसा  
किंबहुना काष्ठीं (लाकडांत) वन्ही (अग्नि) जैसा किरीटी तेवीं प्रकृतीचिये पोटीं गोप्यु (गुप्त) जो असे  

अरे, ज्याप्रमाणे दडून राहिलेला आजार उफाळून येण्यासाठी कुपथ्याची वाट पाहात असतो, त्याप्रमाणे ते पंचकांचे गाठोडे (पंच महाभूतें, पांच कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रियें, तन्मात्रा इत्यादि) एकत्र येऊन जेव्हां  देह बनतो तेव्हा अहंकार त्या देहाला चोंहीकडे नाचवित राहतो

नवल अहंकाराची गोठी (गोष्ट) विशेषें लगे अज्ञानापाठीं सज्ञानाचे झोंबे कंठीं नाना संकटीं नाचवी ! ! ) 
आतां बुध्दि जे म्हणिजे ते ऐशिया चिन्हीं जाणिजे बोलिलें यदुराजें (श्रीकृष्ण) तें ऐकें सांगों  
तरी कंदर्पाचेनि (काम) बळें इंद्रियवृत्तीचेनि मेळें (साहाय्याने) विभांडुनी (उफाळून) येती पाळे (समुदाय) विषयांचे  
तो सुखदु:खांचा नागोवा (लाभ) जेथ उगाणो (हिशेब) लागे जीवा तेथ दोहींसी बरवा (उत्तम-वाईट) पाडु जे धरी (जे निवाडा करते)  
हे सुख हे दु: हे पुण्य हे दोष कां हे मैळ (अशुध्द) हे चोख (शुध्द) ऐसें जे निवडी  
जिये अधमोत्तम सुझे (समजते) जिये साने (लहान) थोर बुझे (कळते) जिया दिठी पारखिजे विषो जिवें (जिला हे उत्तम, हे कनिष्ठ, लहान थोर आणि ज्या दृष्टीने जीव विषयांची परिक्षा करतो- तिला बुध्दी असे म्हणतात

जे तेजतत्वांची आदी (ज्ञानेंद्रियांचे मूळ) जे सत्वगुणांची वृध्दी जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे जे (ही बुध्दी ज्ञानेंद्रियें, सत्कर्में, आत्मा आणि त्याचे प्रतिबिंब असलेला जीव यांना जोडणारा दुवा होय)  

अर्जुना, तुला आतांपर्यंत बुध्दिचे गुणधर्म सांगितले. आतांअव्यक्तकशाला म्हणतात ते सांगतो. ऐक.

सांख्य सिध्दांताप्रमाणे जिला प्रकृती म्हटले जाते तिलाच तूर्तास अव्यक्त असे म्हणूंया . अर्जुना, तुला मागे (सातव्या अध्यायांत) सांख्य योग मताप्रमाणे प्रकृतीचे दोन भाग विस्ताराने सांगितले होते. त्यांतील दुसरी जिला जीवदशा असे म्हटले होते तिलाच  अव्यक्त असे पर्यायाने म्हणता येईल
असे पहा, रात्र संपताच नक्षत्रें दिसेनाशी होतात, किंवा सूर्यास्त झाल्यावर जगाचे व्यवहार आपसूक मंदावतात ; किंवा, देह विसर्जन झाल्यावर तोंवर केलेली सर्व कर्मांचा लय पुढील प्राक्तनांत होतो. अथवा बीजामधें जसा वृक्ष सामावलेला असतो, किंवा कापसाच्या प्रत्येक धाग्यात कापड लपलेले असते,

तैसे सांडूनियां स्थूळधर्म महाभूतें भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊनी जेथें (त्याप्रमाणे सर्व महाभूतें आणि प्राणिमात्र आपले स्थूल स्वरूप टाकून ज्या सूक्ष्मांत विलीन होतात-) 
अर्जुना तया नांवें अव्यक्त हें जाणावें आतां आइकें आघवें इंद्रियभेद  
तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन (रसना) इयें जाणे ज्ञान - करणें पांचें (पाच ज्ञानेंद्रियें)  

अर्जुना, या पाच ज्ञानेंद्रियांकडून मिळवलेल्या पाच विषयांच्या सुखदु:खांची निवड बुध्दी करते.या नंतर तोंड, हात, पाय, गुदद्वार नि शिस्न या आणखी पाच प्रकारच्या इंद्रियांना कर्मेंद्रिये म्हणतात
प्राणांत अंतर्भूत असलेली क्रियाशक्ती या दहाही इंद्रियांतून मुक्तपणे संचार करत असते
आतांमनते काय असते ते नीट ऐक

वायां मन हें नांव एऱ्हवीं कल्पनाचि सावेव जयाचेनि संगें जीवदशा वस्तु (वास्तविक मन हे नाव अप्रस्तुत आहे कारण प्रत्यक्षांत ती कल्पना होय, जिच्यामुळे परब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली). 
जें प्रवृत्तीसी मूळ काम जयाचे बळ जे अखंड सूये छळ अहंकारासी (सर्व  प्रकारच्या  कर्मााचे मूळ इच्छा  किंवा  वासना असून ते अहंकाराला कायम गोंजारत राहते).
जे इच्छेतें वाढवी आशेतें चढवी जें पाठी  पुरवी भयासि गा  
द्वैत जेथें उठी अ्विद्या जेणें लाठी (प्रबळ) जे इंद्रियांते   लोटी विषयामाजीं

अर्जुना, हे मन आपल्या लहरीनुसार सृष्टिची जडणघडण करते आणि मनोरथाांचे  इमले बांधते किंवा उतरविते ! मन म्हणजे भ्रांतीचे भुयार, वायुतत्वाचा गाभा असून तें बुध्दिला झाकून टाकते

तर असे आहे हे मन


क्रमश:....

This page is powered by Blogger. Isn't yours?