Monday, November 28, 2016

 

एक सुखद यात्रा

एक सुखद यात्रा
आम्ही नुकतेच इंदूर-उज्जैन-तराण्यास धांवती भेट देवून पुण्यपत्तनात सुखरूप डेरेदाखल जाहलों. खरे तर दोनच दिवसांपूर्वी लंडनहून परतलो असल्याने झोपेचे तंत्र विस्कळीत झालेले, त्यातून अक्कलदाढेने गेले दोन महिने अक्षरश: छळले असल्याने ही यात्रा घडेल अशी शाश्वती नव्हती. तथापि हा प्रवास, नव्हे यात्रा, विलक्षण सुखद झाली हे नि:संशय ! 

कोणी काहीही म्हणोत (अथवा न म्हणोत ) ‘माळव्याची’ ओढ इर्रेझिस्टिबल असतेच यांत दुमत असण्याचे प्रयोजन नाही. त्यातून चार महिन्यांपूर्वीच झालेले रेल्वे रिझर्वेशन कन्फर्म्ड असल्याने कसलीच धाकधूक नव्हती त्यामुळे शाळकरी मुलासारखा (आंतरिक) प्रवासाचा आनंद यथेच्छ लुटला ! 

पहिला पडाव इंदौरला ! स्टेशनवर उतरता उतरतांच कानांवर पडतात ते अस्सल इंदौरी लहेज्यातले शब्द -अत्यंत कर्णमधुर, आर्जवी, आदरयुक्त नि आपलेपणाने ओथंबलेले ! आणि असा अनुभव इंदूर सोडून पन्नास वर्षें होऊन गेली असूनही अत्यंत उत्कट, मोहवून टाकणारा ! जरूरत है सिर्फ महसूस करनेकी ! (इन्शाल्ला वह महसूसियत तो गजबकी दी है मालिकने !)
 मला वाटतं माळव्याची माती आणि पाणी या ‘महसूस’ करण्याच्या वृत्तीला पोषक करीत असावीत. एरव्हीं शहरी हल्ल्यागुल्यात जाणिवा किती बोथट होऊन जातात नाही ? इंदौरला पोहोचताच आपल्या मूळ जाणिवा, जुन्या जुन्या आठवणी आणि प्रसंग पुन्हा नव्याने सामोरे येतात नि मन सैरभैर होते, कासावीस होते आणि डोळे नकळत पाणावतात ! खरंच, ते गतकालीन दिवस आतांच कां बरें पुन्हा हवेहवेसे वाटतात ? कां मनांत रूंजी घालतात,  काहीतरी हरवून बसल्यागत ? 
छोडो, जाने भी दो यार ! कहां उलझ रहे हो भाई !! 

तर, इंदौरला पोहोचताच आधीं समाचार घ्यावाच लागतो पोहे नि गरमागरम जलेबीचा ! उसके बादही दिमाग कुछ तरोताजा हो पाता है !! एरव्हीं बिनसाखरेचा लागणारा चहा इथें पोचतांच कडक मीठ्ट्यात तबदील होऊन जातो आणि नंतर बंगला मीठा पत्ता चबवल्यावर तर सोने पे सुहागाच (अभागा नव्हे  !! ) असो असो. 
आमच्या लहानपणी नवरात्रीपासूनच थंडी सुरू व्हायची आणि दिवाळीत तर हुडहुडी भरायची. इथें तर नोव्हेंबर अर्धा सरूनही ठंड का नामोनिशान नही था. बेवजह ढेर सारे ऊनी कपडे लाने की कवायद कर बैठे थे ! खैर !! 
वैसे मौसम काफी खुशनुमा था, इन्दौर जो ठहरा. पुन्हा असोच ! 

बापरे, किती तबदिली आलीय इंदोरच्या बाह्यस्वरूपांत. खूप रूंद रस्ते, खूप माल्स, भली मोठ्ठी डिपार्टमेंटल स्टोअर्स, वाहनांची प्रचंड गर्दी आणि पुण्याच्या वरताण ट्रॅफिक नियंमांचे तीनतेरा ! अबब !! अपुन तो भ्रमितच होऊन गेलो नै भैय्या. मात्र इथल्या रिक्शा केवळ सीएनजीच; मीटर मात्र नावापुरतेच; आधी ठरवल्याशिवाय शाहाण्याने रिक्शातून फिरण्याची जुर्रत करू नये. मी तर भय्या एकट्याने फिरावयास टांगाच पसंद केला. या बिलाकुल काबीले तब्बज्जोह इतल्ला ! खूप खूप मज्जा आली ; मस्तपैकी संथपणे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या इमारती एकएककरून मागे जाताना मीही भूतकाळात कसा रमून गेलों ते कळलेच नाही ! प्रकर्षांने आठवली बोझांकेट मार्केटमधली आमुची शाळा. तिथे शिकलेल्या मराठी कविता, उत्तम इंग्रजी शिकवणारे बुचडे मास्तर, मधल्या सुट्टीत रंगलेली ‘बंदीसाखळी’ आणि कितीकिती शाळूसोबती. बोझांकेट मार्केटच्या समोर उकडलेली अंडींविक्या मुसलमान पैलवान नि दरवेळीं किमान चार अंडीं खाणारे अस्मादिक ! तिथूनच पुढे राजवाडा चौकात रिचवलेले कढाव दूध ! शाळेकडे जाताना नि येताना ट्रकचे ट्रक भरलेल्या केळ्यांचा दर्प अजूनही नाकातून जाता जात नाहीये ! कृष्णपुरा कार्नरवरचे चंद्रकांत चातुरचे पत्रावळींचे दुकान ( डावखुरा चातुर अतिशय तल्लख बुद्धीचा, पण परिस्थितीच्या तडाख्यामुळे पुढे शिकूं शकला नाही ) . 
इंदोर जनरल लायब्ररीचे नि माझे घट्ट नाते राहिले आहे. सत्यकथा, मार्मिक, हितवाद, आर्गनायझर, पांचजन्य, न्युयार्क टाइम्स, प्रावदा, शंकर्स वीकली नि इलस्ट्रेटेड वीकली वाचायची मला इथेच चटक लागली होती. काही अप्रतिम व्याख्यानेपण इथेच ऐकलीत ! 
लायब्ररीसमोरचे पवनपुत्र हनुमान तर माझे लाडके दैवत होते ( अजूनही आहेच ) 
महाराष्ट्र साहित्य सभा ! ओह, किती किती रम्य आठवणी सांगाव्यात ! अक्षरश: अनेक वर्षें जोपासलेले सुद्रुढ नाते- घट्ट विणीचे ! एकतर माझे आजोबा दररोज संध्याकाळी काही निवडक स्नेह्यांसोबत दर्शनी भागांत असलेल्या शिवाजी वस्त्र भांडारच्या ओट्यावर साहित्यिक गप्पा मारीत दोन तीन तास घालवीत असत. त्यांचेसाठीं लोड-बैठकीची सोय आवर्जून केलेली असे. तळमजल्यावर हजारो मराठी पुस्तकांचे ग्रंथालय. तेथलाही मी नियमित बारोअर ! फडके-खांडेकर-पु.भा.भावे-पाडगावकर-बापट-विंदा करंदीकर-मर्ढेकर-नाथमाधव यांची सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. खरं तर निबंध वाचनाची गोडी मला इथेच लागली आणि गंगाधर गाडगीळ मला प्रिय झाले. असो.
साहित्य सभेच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात मी ऐकलेले दिग्गज म्हणजे प्र.गो.घाटे. ग.वा.कवीश्वर, कवी ‘अनिल’, राजकवी काळेले, डॉक्टर वा.वि.भागवत, वसुधाताई ढवळीकर, उषाताई थत्ते, शं.न.रहाळकर, ग.दि.माडगुळकर, महा महोपाध्याय दत्तो वामन पोतदार, अण्णासाहेब फडके नाट्यकर्मी बाबा डिके आणि इतरही कित्येक ! याच सभागृहात मेडिकल कालेजच्या महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही सादर केलेलं पु.लं. चे मराठी नाटक “सदु आणि दादू “ ! या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळालेला स्मरतोय. त्यांत अस्मादिकाने वठवला होता ‘रे कुडाळकरचा रोल’, प्रकाश कुराडेने बेरकी गोवन शिम्प्याचा (सार्टोरियल आर्टिस्ट) चा, बंडू देवलने सूत्रधाराचा नि अनेकांनी इतर अप्रतिम पात्रं रंगवली होतीं. याचं सभागृहात “तांबे-रहाळकर” (कविवर्य भा.रा. तांबे नि न.शं.रहाळकर) या परममित्र जोडीचा एकत्रितपणे जन्मदिन साजरा करण्याचा संकेत साहित्यसभेने अनेक वर्षें जोपासला होता. 
जरासे पुढे गेल्यावर लागतो देवी अहल्या मार्ग म्हणजेच जेलरोड. एक प्रसंग प्रकर्षांने आठवतो तो म्हणजे ऐन तारूण्यात शेकडों युवकांचे स्फूर्तिस्थान असलेल्या संसद-सदस्य काम्रेड होमीदाजींची प्रत्यक्ष भेट नि त्यांनी खांद्यावर हात ठेवत माझी केलेली विचारपूस. खरे तर त्यांना समोरून येताना पाहून मी त्यांना केवळ वंदन केले होते, पण त्यांनी थांबून माझी ओळख करून घेतली आणि माणूस जोडण्याच्या त्यांच्या हातोटीने मी चांगलाच प्रभावित झालेलों !
जेलरोडच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या खातीपुरारोड वरील एका जुन्या पडक्या घराच्या माडीवर आम्हा पाच जणांच्या उपस्थितीत सुरू झालेले इंदौर-अभ्यास-मंडळ ( हे अभ्यासमंडळ पुढें खूप नावारूपास आले नि चक्क सुवर्ण महोत्सव साजरे करून अद्यापही कार्यरत आहे !) (ते पांचजण म्हणजे मुकुन्द कुलकर्णी, बंडू अभ्यंकर, शिंत्रे, अस्मादिक नि आत्तां नाव आठवत नसलेला ) 
सिखमोहल्ला ! ओह, अस्मादिकांनी वयाची तीस वर्षें इथें अतिशय सुखात घालविलीत, त्यामुळे असंख्य आठवणींच्या मालिका सरसरून उफाळून आल्या तर नवल नाही. 
आजोबांना दररोज भेटावयास येणारी विविध स्तरांतील मंडळी अजूनही स्पष्टपणे आठवतात. सिखमोहल्ल्यातील गणेशोत्सव नेहमीच अत्यंत नेटकेपणाने, अनेकविध सांस्कृतीक कार्यक्रमांनी विनटलेला दिमाखदारपणे साजरा होई. बाल, तरूण, प्रौढ तसेच वृध्दांना आवर्जून सदभागी करून घेण्यात संयोजक मंडळ तत्पर असे. अनेक नाटके, परिसंवाद, चर्चा, स्पर्धा, खेळ आणि विलक्षण कल्पकतेने सादर केलेल्या कार्यक्रमांची रेलचेल असे. याच दरम्यान अनेकांचे प्रेमसंबंध जुळत, मोडत किंवा क्वचित विवाहांत परिणत होत ! एकूणच रम्य काळ होता तो ! Sic !! असो !!! 
सिखमोहल्ला भगिनीमंडळ म्हणजे इंदुरातील एक अत्यंत नावाजलेली प्रथितयश चळवळ म्हणायला हरकत नाही. अनेक सांस्कृतिक बाबतींत फर्स्ट किंवा लीडर म्हणतां येतील असे अनेक प्रकल्प या संस्थेने यशस्वीपणे राबविलेले मला माहीत आहेत. काकी संवत्सर, मामी बापट, अक्का जोगळेकर, बिंदुताई केतकर, कुमुदिनी फाटक, माझी आई (शैलजा रहाळकर) अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी हे मंडळ नावारूपास आणले हे निर्विवाद. 
आमच्या राहत्या घरात माझ्या वडिलांनी असंख्य साधुसंत, महात्मे, सत्पुरूष आदि दिव्य विभुतींचे चरणप्रक्षालन करून पूजन केलेले स्पष्टपणे आठवते आहे. त्यांच्या प्रेरणेने ज्ञानेश्वरीवरील प्रा. प्र. गो. घाटे यांची रसाळ प्रवचनें अनेक वर्षें आमचे घरी होत नि रसिकांची मांदियाळी अक्षरश: दुथडी भरून वाहत राही. 
जुने हायकोर्ट, मोतीबंगला आणि गांधी हाल च्या भव्य नि सुंदर इमारती म्हणजे इंदूरचे वैभव ! गांधीहालच्या मागील ग्राऊंडवर संघाची शाखा नियमितपणे लागत असे आणि तेथील उपस्थिती माझ्यासाठी लाखमोलाची ठरली हे कृतज्ञतापूर्वक नमूद करायलाच हवे. वडिलांचा आग्रह आणि त्यांचे दोन चुलत बंधू पूर्णवेळ संघकार्यांत लिप्त असल्याने आम्हा सर्वच भावंडांवर संघाबद्दलचा आदर नि प्रेम कायम स्थिरावले. 
गांधीहालच्या भव्य सभागृहात असंख्य कार्यक्रम संगीत-नाटकांचे, व्याख्यानांचे, चर्चासत्रांचे, स्पर्धांचे, कविसंमेलनांचे वरचेवर आयोजित केले जात नि मी त्या सर्व कार्यक्रमांना नेहमीच हजर असे. माझी खात्री आहे की आम्हाला मिळालेला सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमांमुळे अनेकपटींनी वाढला, जोपासला गेला. 

खरं तर इंदोर-उज्जैन-तराणा या त्रिस्थळी यात्रेचे निमित्त साधून मला हा अंतरंग प्रवास , नव्हे , यात्रा करण्याची संधी मिळाली हा निव्वळ योगायोग आहे. हे सर्व वाचत असतांना तुम्ही कदाचित कंटाळला असाल म्हणून तूर्तास थांबतो ; पण हा थांबा तात्पुरता आहे ; एक कडक मीठी चाय मारून हा आलोच !!! 

प्रभु रहाळकर
२७ नोव्हेंबर २०१६








This page is powered by Blogger. Isn't yours?