Monday, May 31, 2021

 

मन:चक्षु

 मनश्चक्षु......! 


मथळा क्लिष्ट वाटला तरी अर्थ मीच सांगायला हवा असे नाही. सोप्पं आहे ते, मन आणि डोळे असा सुटसुटीत अर्थ किंवा शब्दफोड करता येते. वास्तविक मन आणि डोळे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मनाने जग पाहता येते तर निव्वळ डोळ्यांनी अत्यंत मर्यादित अंतरावरचे दिसेल


आमच्या एका क्रमिक पुस्तकात हे विधान वरचेवर उधृत केलेले असे - “दि आय डझ नॉट सी व्हॉट दि माईंड डझ नॉट नो (केएनओडब्लू नो !) “ — म्हणजे आपल्याला माहीत असलेलेच डोळे पाहतात ! विचित्र वाटतंय् ना हे ? पाहतो मला समजावून सांगता आले तर

मीजीव-वैज्ञानिक असल्याने मायक्रोस्कोपचा खूप वापर केला आयुष्यांत. बारीकातले बारीक जीवजिवाणु पाहता आले, मात्र ज्यांची माहिती होती तेवढेच दृष्टीस पडत, इतर पाहूनही पाहिल्यासारखे होत

दुसरे एक उदाहरण - आपण डिस्कव्हरी चॅनल पाहत असतांना समुद्राच्या खोल तळातील असंख्य पदार्थ पाहतो, मात्र आपणांस ज्ञात असलेले मासे, शिंपले, सी-वीड्स वगैरे सोडले तर इतर असंख्य वस्तू दिसत असूनही पाहिल्यासारख्या झरझर बाजूला होतातच ना, अगदी तसेच आहे वरील विधान


म्हणजे मन नि चक्षुचा अत्यंत निकट संबंध लक्षात घ्यायला हवा. एक म्हण जगजाहीर आहे - जो देखे रवी, वो देखे कवी - सूर्यप्रकाशांतही जे दिसणार नाही ते कवी आपल्या मन:चक्षूंनी स्पष्टपणे पाहतो नि तें रंगवून रंगवून आळवून आळवून सांगतो


जरा अधिक खोलांत जायचे म्हटले तर आपण अव्यक्तातून व्यक्तांत येतो आणि याच व्यक्तातून अव्यक्तांत गडप होतो. व्यक्त म्हणजे हे दृष्य जग नि अव्यक्त म्हणजे काय ते समजून घ्यायला मनाचा वापर करून पाहतो. या मनाला कल्पनेची मलई खिलवल्या शिवाय ते बेटे कुठलेच चित्र रंगवत नाही. बरे, ही कल्पना तरी कुठून सुचते ? ‘पुस्तक से मस्तक’ ? ओके, पार्टली. ग्रंथ, शास्त्र, गुरू , अनुभव ? जाऊ देत - खात्री नसेल तर बोलणे शहाणपणाचे ! (माझे ज्येष्ठ स्नेही म्हणाले होते की हेव्यक्ताव्यक्तदेखील एक भ्रम आहे ! ! ) 


मी सांगत होतो मन नि दृष्याच्या विलक्षण संबंघाबद्दल. आता हेच पहा ना, मी क्षणात मद्रासला पोहोचतो, असनसोलला किंवा टिंबक्टूला ! पण तीनही आधी पाहिले नसल्याने कल्पनेनेही तिथले चित्र रंगवूं शकत नाही. मात्र इंदोर, बंगलुरू, लंडन किंवा जिनेव्हा ? यस, मी तिथे केवळ पोहोचत नाही तर तिथले चित्र प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो ! ही आहे मनश्चक्षूची किमया


पहा, तुम्हालाही सुचेल काहीतरी सांगायलामन:चक्षुसंबंधी . वाट पाहतोय, लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा हे विनवितु असे

३० मई २०२१


 

न रूचणारे काहीबाही -पुढे.....!

 पुढे.......

आज माझ्या धाकट्या बंधूंनी परम पूज्य नानामहाराज तराणेकर यांचे एक उद्बोधन सांगितले. ते म्हणाले होते, “आत्मज्ञान होण्यासाठी नास्तिक व्हावे लागते” ! 

त्याने एवढेच वाक्य कळवले असले तरी माझ्या मन:चक्षूंपुढे मी तो प्रसंग उभा करून पाहिला. कुणा साधकाने त्यांना प्रश्न केला असणारआस्तिक आणि नास्तिकयांना मिळणाऱ्या फलप्राप्तीचा

आतां, श्री नाना म्हणाले असणार की आस्तिक माणसाची फलप्राप्तीभक्तीअसेल नि नास्तिकाचेआत्मज्ञान’ ! 

खरोखर, माऊली म्हणतात तसे भक्ती हे फल आहे सर्व कर्मयोग, ध्यानयोग नि ज्ञान-साधनेचे. खरीखुरी प्रांजळ भक्ती मिळवण्यासाठी माणूस कित्येक कल्प पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो आणि मगच हातीं येते गीता, ज्ञानेश्वरी, सदगुरू आणि नि:सीम भक्ती - अविचल, असीम, ज्ञानोत्तर नि परमनंट


आत्मज्ञान होण्यासाठी म्हणजेच स्वत: स्वत:चा शोध घेण्यासाठी कोणतेही बाह्योपचार नकोत, आपल्या अंतरंगात बुडी मारता आली पाहिजे आणिमाझ्यावाचूनइतर काहीही अस्तित्वात नाही अशी जाणीव दृढ व्हायला पाहिजे. व्हाय, ती जाणीवही नष्ट व्हायला पाहिजे. (‘जाणीव नेणीव जेथ रिगे ! अशी अवस्था. ) (अशी हायपॉथेटिकल अवस्था खरोखर शक्य आहे काय याचे उत्तर कोण देणार ? गुरू, ग्रंथ, भगवंत यांना जर मी मानत नसलो तर उत्तर कसे मिळणार ? मला खरंच नास्तिक होता येईल का कधीतरी, निदान माझा माझ्यावर तर विश्वास असणारच  ना ? आणि असलाच तर मी नास्तिक कसा ? म्हणूनच केवळ नास्तिक आहे असे म्हणता येत नाही आणि म्हणूनचआत्मज्ञानवगैरे दुरापास्त, नॉट माय कप ऑफ टी ! ! 


त्यापरीस थोडे थोडे आस्तिक असणे अधिक कन्व्हीनियंट नाही काय ? तथापि, माझा आक्षेप आहे तो दिखावू आस्तिकतेला. कोणतेही स्तोम करता मनोमनीं आस्तिक राहावे अशी माझी भूमिका आहे. स्तोत्रें, जपजाप्य, पूजाअर्चा वगैरे सर्व बाह्य उपचार सोडून आपल्या इष्टाचे स्मरण करत राहावे, त्याचे दर्शन स्पर्षन संभाषण नि उद्बोधनाचा मनोमन आनंद घेत राहावा निवान्तपणे, अशी माझी आस्तिकतेची धारणा आहे.


 (नास्तिकहोण्याचाविचार मी आजच सोडला आहे ! ! ) 


२७ मई २०२१



This page is powered by Blogger. Isn't yours?