Tuesday, June 27, 2023

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे चौतीस १३४

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे चौतीस १३४


श्रीज्ञानदेव तमोगुण-प्रधान मंडळींचे आचरण सांगत असताना काही ओंव्या आपल्याही अंगावर शहारे येतील अशा रीतीने लिहून गेले आहेत. म्हणतात तसा नवरस परिपूर्ण ग्रंथ आहे हा. आत्तां बीभत्स रस वर्णन करत आहेत.


अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जना:

  दंभाहंकारसंयुक्ता: कामरागबलान्विता॥५॥॥


(दंभ आणि अहंकार यांनी ग्रस्त असे जे लोक वासना नि आसक्ती यांचे आग्रहामुळे शास्त्रांना मान्य नसलेले घोर तपाचरण करतात ——) 


शास्त्राधारें आचरण करावे असे ज्यांना कधी वाटतच नाही किंवा शास्त्रज्ञानाला आपल्या जवळ फिरकूही देत नाहीत, अथवा थोर व्यक्तींच्या कार्याची जे थट्टा करतात आणि विद्वानांचा तिरस्कार करतात ; फार काय, आपल्या श्रीमंतीचा डांगोरा पिटवीत स्वत:चा बडेजाव मिरवितात, अशांना केवळ पाखंडी म्हणायला हवे -hypocrats ! , कारण ते अशी क्रूर कामें करतात ज्यांना शास्त्रांचा काहीच आधार नाही. उदाहरणार्थ, इतरांचे तसेच आपल्याही शरीराचे लचके तोडून ते यज्ञकुंडांत आहुती म्हणून अर्पण करतात किंवा नवजात बालकांची हत्त्या करून ते रक्तमांस पिशाच्च्याला बळी म्हणून वाहातात. म्हसोबासारख्या क्षुद्र देवतांना प्रसन्न करण्यासाठी स्वत: आठ आठ दिवस उपासाची अनुष्ठाने करतात. ते स्वत: तर असे शरीराला छळतातच, इतरांनाही तसाच त्रास देत राहतात देवाधर्माच्या नावावर

अशा रीतीने तमोगुण रूपी शेतांत पेरलेल्या बीजांचे फळही त्यांना साहाजिकच त्याच स्वरूपात मिळते. त्यांचेकडे समुद्र तरून जाण्याएवढे अंगीं बळ नसते आणि नौकेचा वापरही त्यांना नको असतो, मग दुसरे काय होणार ? किंवा, वैद्याला वैरी मानून त्याने देऊ केलेले औषध जो लाथाडून टाकतो त्याला रोगाच्या यातना सोसण्यापलीकडे अन्य काही पर्याय असतो काय ? अरे, इतरांच्या दृष्टीचा हेवा वाटून जो आपलेच डोळे फोडून टाकतो अशा अंधाला चार भिंतींत कुजत राहण्यावाचून काही पर्याय असतो काय

तैसी होय तयां / आसुरांची स्थिती / मोहें जे धांवती / भवारण्यीं (संसाररूपी रानांत ) //‘

सोडोनी सन्मार्ग / वागती ते स्वैर / निंदोनी साचार / वेदशास्त्रें //‘ 

अशा वेळी, ‘कामु करवी तें करती , क्रोधु मारवी तें मारिती, किंबहुना मातें पुरिती, दु:खाचा गुंडां ! ( मनाला येईल ते करतात, ज्यावर क्रोधित होतात त्याला मारतात, इतकेच नव्हे तर कटकट नको म्हणून मला, म्हणजे माझ्या मूर्तीला- गाडून टाकतात ! ) 

तथापि, स्वत:च्या नि इतरांच्या देहाला जे असा त्रास देतात तो वास्तविक सर्वांच्या अंतर्यामी सर्वत्र असलेल्या मलाच होत असतो

खरेतर अशा पापी लोकांविषयीं बोलून आपलीच वाणी विटाळणे बरे नव्हे. पण त्या आसुरी प्रवृत्तींचा त्याग करावा म्हणून ते बोलावे लागले

प्रेत बाहिरें घालिजे / कां अंत्यजू संभाषणीं त्यजिजे / हें असो हातीं क्षाळिजे / कश्मलातें //‘ ( असे पहा, प्रेत घराबाहेर काढावे लागते, दुष्ट माणसांशी संवाद टाळायचा असतो, इतकेच नव्हे तर हातावरील घाण काढण्यासाठी ते धुवावे लागतात ना - ) 

तेथ शुद्धीचिया आशा / तो लेपु मनवे जैसा / तयांते सांडावया तैसा / अनुवादु हा //‘ ( शुद्ध हेतूने केलेले हे भाष्य केवळ त्यागावे म्हणूनच दूषणास्पद नाही ! ) 


आणि म्हणूनच केवळ सात्विक श्रद्धेचेच परिशीलन केले पाहिजे. अर्जुना, जर कधी आसुरी तमाचा संपर्क होतोय असे तुला वाटलेच तर माझे स्मरण करत राहा कारण त्याचे वांचून दुसरा तरणोपाय नाही


आता सत्वगुणांची जोपासना कशी करता येईल त्याचे गुपित सांगतील श्रीज्ञानदेव.

क्रमश



Sunday, June 25, 2023

 

मला भावलेले खेळाडू

 मला भावलेले खेळाडू


आज सकाळी माझ्या लंडननिवासी नातीशी बोलताना सहज मला आवडलेल्या खेळाडूंचा उल्लेख आला. वास्तविक मुलगी असूनही तिचे सर्व पुरूषप्रधान मैदानी खेळांवर विलक्षण प्रभुत्व आहे. क्रिकेट, हॉकी, फुटबाल, बास्केटबाल, बॅडमिन्ग्टन वगैरे खेळ केवळ खेळता तिने त्या त्या खेळात कित्येक डझन पदकें नि पारितोषिकें मिळवली आहेत. आता ऑटोमोबाईल एन्जीनियर म्हणून कोव्हेन्ट्रीच्याजेएल्आरमध्ये ती टेस्ट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. अर्थात खेळाची तिची आवड नि निवड अजिबात कमी झालेली नाही. वेळ मिळताच ती कुठेना कुठे जाऊन रॅकेट् घुमवून येतेच येते. साहाजिकच खेळ नि खेळाडू यांचेबद्दल तिला ऐकायला नि बोलायला आवडते. तिची हीच नस पकडून माझे मन की बात तिला ऐकवली, जी तुम्हीही नजरेखालून घातली तर त्याला आम्ही ना म्हणों

मी स्वत: स्थूल शरीरयष्टीमुळे मैदानी खेळ फारसे खेळले नसलो तरी ते पाहायला निरनिंग कमेन्टरीऐकायला मला नेहमीच आवडत असे. माझ्या लहानपणीचे काही सर्वोत्कृष्ठ समालोचक होते एफ एस् ऊर्फ बॉबी तल्यारखान, विजय मर्चंट, व्ही एम् चक्रपाणि, सरदेन्दु सान्याल, देवराज पुरी नि नंतर नरोत्तम पुरी, सुशील दोशी, व्ही व्ही करमरकर इत्यादि इत्यादि. (आताच्या हर्षा भोगले, रवि शास्त्री, सुनील गावसकर नि संजय मांजरेकर यांना डावलणे शहाणपणाचे नाही ! ) 

ब्लिट्झमधे नियमित येणारेनॉक् आउटहे बॉबी तल्यारखानचे सदर मी चवीने वाचत आलोंय


त्या काळी कर्नल सी. के. नायडू, सय्यद मुश्ताक अली, खंडू रांगणेकर वगैरे क्रिकेटर्सना खेळताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे, तसेच तीन विजय - विजय मर्चंट, विजय हजारे नि विजय मांजरेकर यांनाही खेळताना पाहायचे मला भाग्य लाभले आहे. राजसिंह डुंगरपूर नि हनुमंतसिंह तर माझे समकालीन होते होळकर कॉलेजांत ! पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी, एकनाथ सोलकर, नवाब ऑफ पतौडी तसेच प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारे सुभाष गुप्ते, जस्सू पटेल, चंदू बोर्डे, रमाकांत देसाई नि एकेकाळचीखतरनाक चौकडी’ - बेदी प्रसन्ना चंद्रशेखर नि वेंकट हे माझ्या गळ्याचे ताईत होते. सुनील नि सचिन, सौरव नि राहूल, व्हीव्हीएस नि नंतर रिषभ आणि रविंद्र जडेजा मला प्रिय आहेत. गुंडाप्पा विश्वनाथ, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद नि श्रीकांत हे दाक्षिणात्य खेळाडू मला नेहमीच आवडत राहिलेत. मोहिंदर अमरनाथ, डेव्हिड गॉव्हर हे त्यांचे विशिष्ट लकबीमुळे माझे आवडते होते

क्रिकेटर्स बद्दल खूप खूप लिहिता येईल मला, कारण आम्ही अशा जमान्यात वावरलो जेव्हा सर्व माहौलच मुळांत क्रिकेटमय असे. तथापि त्याच काळांत हॉकीमधे मेजर ध्यानचंद, फ्लाईंग सिख मिल्खासिंग, टेनिसमध्ये रामनाथन कृष्णन, बॅडमिंटन मध्ये नंदू नाटेकर, ग्रॅण्ड स्लॅम मास्टर विश्वनाथन आनंद, बिलियर्ड्स मधे गीत सेठी वगैरे मंडळी विश्वपटलावर आपापला ठसा प्रभावीपणे उमटवीत होती. त्या सर्वांबद्दल कायम ऐकून होतो त्यांचे कामगिरीवर अभिमान बाळगीत. मात्र ते खूप आवडते होते असे नाही पण भावणारे होते निश्चित

रहाळकर

२५ जून २०२३

मु. पो. लंडन



This page is powered by Blogger. Isn't yours?