Monday, December 31, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सत्तेचाळीस

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सत्तेचाळीस

भगवन्त आपले स्वत:चे स्वरूप समजावून सांगत आहेत अर्जुनाला

गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत्
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम्  /१८॥ 
(प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा धरतां हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती-लयीचे कारण, स्थितीला आधार असणारा, अविनाशी असलेला केवळ साक्षीरूप आणि जवळ सर्व संपत्ती असून कधीही संपणारी फळें देणारे बीज मी आहे). 

हें चराचर आघवें जिये प्रकृती आंत सांठवें ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी (हे संपूर्ण जग ज्या प्रकृतींत साठवलेले आहे ती प्रकृती शिणल्यावर माझ्याच आश्रयास येते ; तिचे अंतिम गंतव्यस्थान मीच आहे). 
शिवाय अर्जुना, ज्याचे आधाराने प्रकृती जगते आणि तदनुषंगाने विश्व निर्माण होते, आणि जो प्रकृतीच्या गुणसमुदायाचा प्रकृतींत येऊन उपभोग घेतो तो वैश्विक संपत्तीचा मालक मीच आहे स्वामी  त्रैलोक्याचा
आकाशाने सर्वत्र व्यापावें, वायूने क्षणभरही स्वस्थ नसावे, अग्नीने जाळावें नि जळाने वर्षावें ; पर्वताने आपली बैठक सोडावी, सागराने सीमा ओलांडू नये, पृथ्वीने भार वाहावा अशी माझी आज्ञा आहे.
मी बोलेन तसेच वेद सांगतील, मी चालवला म्हणून सूर्य चालेल, जगाला चालना देणारा प्राण मी चेतवला म्हणून चालना देतो.
इतकेच काय, माझ्याच नियंत्रणाखाली काळ (मृत्यू) प्राण हरतो
अशा प्रकारे सर्व चराचर माझीच आज्ञा पाळतात पंडुसुता

जो ऐसा समर्थु तो मी जगाचा नाथु (स्वामी) आणि गगनाऐसा साक्षीभूतु तोही मीचि  
इहीं नामरूपीं आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचाही वोल्हावा (जिव्हाळा) आपणचि जो  
जैसे जळाचें कल्लोळ आणि कल्लोळीं आथी (आहे) जळ ऐसेनि वसवीतसे सकळ तो निवासु मी  

जो मज होय अनन्यशरण त्याचे निवारी मी जन्ममरण यालागीं शरणागता शरण्य मीचि एकु  
मीचि एक अनेकपणें वेगळालेनि प्रकृतीगुणें जीत जगाचेनि प्राणें वर्ततु असे  

ज्याप्रमाणे समुद्र आणि क्षुल्लक डबकें यांत फरक करतां सूर्य प्रत्येक जलाशयांत बिंबतो, तसा ब्रह्म्यासह सर्व भूतमात्रांचा मी सखा होय
मीचि गा पांडवा या त्रिभुवनासी वोलावा सृष्टिक्षयप्रभवा मूळ तें मी
असे पहा, बीजांपासून फांद्या असलेले झाड तयार होते नि त्याच वृक्षांत बीं सामावते. तद्वत्, माझ्या सृष्टि-निर्मितीच्या संकल्पातून विश्व निर्माण होते नि कल्पांतसमयीं माझ्याच कृतसंकल्पाने तें लय पावते. अव्यक्तापासून व्यक्तांत येणारे नि पुन्हा अव्यक्तांत जाणारे सर्व काही माझ्यातच सामावले जाते

मी सूर्याचेनि वेषें तपें तैं हें शोषें पाठी इंद्र होऊनि वर्षें तैं पुढती भरे (मी सूर्यरूपाने तापतो, पाणी शोषून घेतो आणि पर्जन्य होऊन पुन्हा पाण्याने भरून जातो.) 
अग्नि काष्ठें खाये तें काष्ठचि अग्नि होये तैसें मरते मारते पाहें स्वरूप माझें (लाकूड अग्नीत पडले की ते अग्नी होऊन जाते. तद्वत्, मरणारे नि मारणारे माझीच रूपें होत). 
यालागीं मृत्यूचा भागीं जे जें तेंही पैं रूप माझे आणि मरतें तंव सहजें मीचि आहे  

शेवटी तुला एकदाच सांगतो कीसत्आणिअसत्हे सर्व मीच आहे
म्हणौनि अर्जुना मी नसे ऐसा कवणु ठाव असे परि प्राणियांचें दैव कैसें जे देखती मातें !  

अर्जुना, नवल असे की लाटा पाण्यावाचून सुकतात, प्रकाशकिरण दिव्याशिवाय लुप्त होतात, तसे प्राणीमात्र माझ्यामुळे आहेत पण ते माझ्याशीं एकरूप होत नाहीत

हें आंतबाहेर मियां कोंदले जग निखळ माझेचि वोतिलें (व्यापले) कीं कैसें कर्म तयां आड आले जे मीचि नाही म्हणती !  

नवल असे की अमृताच्या सागरांत असूनही ते पाण्यासाठी वणवण करतात. तद्वत्  मी त्यांच्यांत आत्मरूपाने असताना ते मला शोधत फिरतात. अशा दुर्दैवी लोकांना काय करावे ! घांसभर अन्नासाठी आंधळा धांवत सुटतो नि पायापाशीं पडलेला चिंतामणी लाथाडून जातो. त्याप्रमाणे जेव्हा ज्ञान जीवाला सोडून जाते त्यावेळेस अशी स्थिति उद्भवते. म्हणून ज्ञानावांचून जें कर्म होते ते केल्यासारखे ठरते

एक सुंदर उपमा देतात श्री ज्ञानदेव. ते म्हणतात
आंधळ्या गरुडाला पंख असले तरी त्यांचा उपयोग काय ? तद्वत् सत्कर्माचा खटाटोप ज्ञानाशिवाय व्यर्थ होय
अर्जुना, तिन्ही वेद मुखोद्गत असलेले नि शेकडोंनी यज्ञ करणारे मला विसरून केवळ स्वर्गसुखाची कामना करतात. कल्पतरूखाली बसून आपल्या फाटक्या झोळीला गांठी मारून भीक मागायला जाण्यासारखे आहे ते ! मग त्या शेकडों यज्ञांचे फलित पुण्य नसून पापच नव्हे काय ?

म्हणोनि मजविण पाविजे स्वर्गु तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ज्ञानिये तयांते उपसर्गु (विघ्न) हानि म्हणती. 

खरें तर स्वर्गसुख ही पाप केल्यानंतरच्या नरक यातनांची सापेक्ष संज्ञा आहे. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय निर्दोष, शाश्वत आनंद हे माझे खरं स्वरूप आहे. स्वर्ग नि नरक हे दोन्ही चोरांचे आडमार्ग होत

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे पापात्मके पापें नरका जाइजे मग मातें जेणे पाविजे तें शुध्द पुण्य
आणि मजचिमाजीं असतां जेणें मी दुऱ्हावे पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणतां जीभ तुटे काई ?  !!!  

ते सर्व असू देत. अशा प्रकारे यजन करणारे ते दीक्षित यज्ञ करून माझ्या प्राप्तीची आस धरतातमात्र मला प्राप्त करून घेतां केलेले ते पापरूप पुण्य त्यांना स्वर्गलोकांत नेते. तेथे अमरत्व हे सिंहासन असून ऐरावता सारखे वाहन दिमतीला असते नि राजधानी असते अमरावती. तेथील भांडारें अलौकिक वैभवाने भरलेली असतात आणि अमृताने काठोकाठ भरलेली कोठारें. कामधेनूंचे कळप तेथे लीलया वास करतात, प्रत्यक्ष देव सेवा करायला तत्पर आणि चिंतामणींचे भूमीवर सडे पडलेले असतात. करमणुकीसाठी कल्पतरूंची उद्याने, गंधर्वांचे गायन नि रंभा उर्वशी सारख्या इतर अनेक नर्तकी सेवा करतात. प्रत्यक्ष कामदेव हात जोडून सेवेस तत्पर नि चादणें सर्वत्र शिंपडलेले. तसेच आज्ञा पालनार्थ वायुवेगाने धावणारे सेवक आहेत
जेथे स्वत: बृहस्पती मुख्य असे आशीर्वचन देणारे अनेक ब्राह्मण आहेत, स्तुतिपाठक भाट आहेत. सर्व अष्टलेकपाल रक्षणासाठी नि उच्चाश्रवा हा घोडा सेवेसाठी तत्पर आहे

हे वर्णन पुरे झाले. खरे तर हे स्वर्गसुख थोडेसे पुण्य शिल्लक असेपर्यंतच टिकते. तें संपतांच त्यांना पुन्हा मर्त्यलोकांत यावेच लागते !   जवळचा पैसा संपल्यावर वेश्या अशा माणसाला दारातही उभा राहू देत नाही. अगदी तशीच स्थिति यादीक्षितांचीहोते

अगा स्वप्नीं निधान फावे परि चेइलिया हारपे आघवें तैसें स्वर्गसुख जाणावे वेदज्ञांचें (स्वप्नात पाहिलेला खजिना जाग येतांच गायब होतो ; तद्वत् या दीक्षितांचे स्वर्गसुख मानावें ). 

अर्जुना वेदविद जऱ्ही जाहला तरि मातें नेणतां वांया गेला कणा सांडुनि उपणिला कोंडा जैसा  
म्हणौनि मज एकेंविण हे त्रयीधर्म (तिन्ही वेद) अकारण आतां मातें जाणोन कांही नेण तूं सुखिया होसी  

आता पुढे भगवंताचे अनन्यभावाने चिंतन केल्याने काय होते ते विस्तारपूर्वक सांगतील ज्ञानदेव

(क्रमश:.......

This page is powered by Blogger. Isn't yours?