Friday, March 30, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सोळावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सोळावा)
अर्जुना, या काम-क्रोधांचे मूळ स्थान इंद्रियें होत. कर्म करण्याची ऊर्मि इंद्रियां पासून  होते, म्हणून सर्वप्रथम या इंद्रियांना ठेचून काढले पाहिजे. तसे झाले तर मन विषयांकडे सैरभैर धावण्याचे थांबेल. त्यामुळें बुध्दि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकेल. इंद्रिय-निग्रहामुळे त्या पापियांचे आश्रयस्थानच कोलमडून पडेल.
मात्र तें अंत:करणातून हद्दपार झाले तरच पूर्णपणे नष्ट झाले असे निश्चितपणें  समज. सूर्यकिरण नसतील तर मृगजळ संभवत नाही ; अगदीं तसेच कामक्रोध नाहीसे झाले की देह-भावाची गुलामी संपून ब्रह्माचें स्वराज्य प्राप्त होईल. आणि मग तो पुरूष आत्मानंदाचे महासुख आपणच भोगील.
अशा रीतीने आदर्श गुरूशिष्यांच्या गोष्टीप्रमाणे जीव नि ब्रह्माचे ऐक्य झाले की मग त्या जीवाला तेथून कुणीही हलवू शकत नाही.

संजय धृतराष्ट्राला म्हणाला की हे राजा, या प्रमाणें सर्व सिध्दांचा बादशहा, देवी लक्ष्मींचा भ्रतार, देवाधिदेव श्रीकृष्ण बोलत राहिला.
श्री ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की आता तो अनंत पुन्हा एक प्राचीन गोष्ट सांगणार आहे नि त्यावर पंडुसुत अर्जुन प्रश्न विचारेल. भगवंताचें ते समयोचित नि योग्य बोलणे अतिशय रसभरित असल्याने श्रोत्याना श्रवणसुखाची परमावधी लाभेल. म्हणून निवृत्तींचे दास ज्ञानदेव विनवतात की आपली ज्ञानलालसा या कृष्णार्जुन संवादाच्या निमित्ताने उत्कट करून घ्यावी.

“आजि श्रवणेंद्रिया पाहलें । जें येणे गीतानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें   ॥” (आज माझ्या कानांचे भाग्य फळफळल्या सारखे वाटते आहे कारण आज मी गीतारूपी खजिना पाहू शकलों. खरोखर स्वप्नवत असलेले आज प्रत्यक्षांत आले आहे !)

“आधीच विवेकाची गोठी (गोष्ट) । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी (जगदीश्वर) । आणि भक्तराजु किरीटी (अर्जुन) । परिसत (ऐकत) असे ॥

“जैसा पंचमालापु (पंचमस्वर) सुगंधु । कीं परिमळु (सुगंध) सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु (मौजेचा) । कथेचा इये ॥” (कोकिळेच्या स्वराप्रमाणे मधुर असा पंचमस्वर सुगंधित देखील असावा, किंवा सुगंध अति मधुर नि स्वादिष्ट असावा, तसे हे गीतारूपी काव्य बहारदार आणि मजेशीर होत चाललें आहे).

“कैसी आगळिक (थोरवी) दैवाची । जे गंगा वोळली (प्रकटली) अमृताची । हो कां (किंबहुना) जपतपें श्रोतयांची । फळा आलीं ॥”

“आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें (वस्तीला यावें) । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हे (गीतेचे आख्यान) ॥”

मात्र धृतराष्ट्राला यांत काहीच रस नसल्याने तो संजयाला खडसावतो की तुझे हे अनाठायी पाल्हाळ पुरे कर नि कृष्णार्जुन आपसात काय बोलत होते तेवढेच सांग.
“ते वेळीं संजयो रायातें म्हणें । अर्जुनु अधिष्ठिला (परिपूर्ण) दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे॥”
“जें न सांगे पितया वसुदेवासि । जे न सांगेचि माते देवकीसी । जें न सांगेचि बंधु बळिभद्रासि (बलरामाला) । तें गुह्य अर्जुनेंसि बोलत असे॥”
 “देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेहि न देखे या प्रेमाचे सुख । आजि कृपास्नेहाचे बिक (पात्र) । यातेंचि आथी (आहे) ॥” (आज केवळ अर्जुनच या कृपा नि प्रेमाचा धनी आहे).
इतकेच नव्हे तर सनकादिकांच्या आकांक्षा देखील आजपर्यंत पुरवल्या गेल्या नव्हत्या. अर्जुनाचे परम भाग्यच म्हटले पाहिजे की श्रीकृष्णप्रेमाचे इतके अनुपमेय प्रेम आज सहज दिसते आहे. माझी तर अशी खात्री आहे की केवळ अर्जुनाच्या स्नेहापोटीं हा निर्गुण निराकार परमात्मा मूर्त स्वरूपात अवतरला आहे. एरव्हीं हा योग्यांना सापडत नाही, वेदांना आकलन होत नाही आणि ध्यानाचेहि डोळे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
असा हा अनादि, निश्चल, असीम आणि निजस्वरूपात रमलेला परमात्मा कोणत्या मापदंडाने अर्जुनावर इतका कृपावंत झाला आहे नकळे ! खरं तर हा अवघ्या त्रैलोक्याला गवसणी घालणारा नि एकूणच आकाराच्या पलीकडचा ईश्वर कसा काय याच्या स्वाधीन झाला असेल बरे !

ते असो. आतां भगवंत आपले अतिशय गूढ आणि वास्तव सत्य अर्जुनाला सांगतील.

ते म्हणतात, ‘पंडुसुता, हाच योग मी पूर्वी विवस्वान सूर्याला सांगितला होता. पण त्याला बराच काळ होऊन गेला. नंतर ही योगस्थिति विवस्वानने रवीला कथन केली आणि त्याने मनूला. मनूने ती स्वत: आचरणांत आणली नि ती इक्ष्वाकुला प्रसृत केली. अशा प्रकारें ही जुनी परंपरा चालत राहिली.

पुढे परंपरेनुसार चालत आलेल्या या योगाला राजर्षी, म्हणजे क्षत्रियांतील तत्ववेत्ते जाणून होते. मात्र बराच काळ लोटल्यामुळे तो योग सांप्रत नष्टप्राय झाला. खरे तर प्राणीमात्र विषयवासना आणि शरीरसुखांच्या कचाट्यांत सापडल्यामुळे आत्मबोध विसरून गेले. आत्मनिष्ठा डळमळित झाली की विषयवासनांचा सुळसुळाट होतो, तेंच सर्वस्व वाटू लागते.

“एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं । सांगैं जात्यंधा रवी । काय आथी ?” (नाही तरी कायम नग्न फिरणाऱ्या लोकांच्या गावांत उंची वस्त्रें काय कामाची ? जन्माधाला सूर्य कसा कळणार ?)
किंवा बहिऱ्या माणसापुढे उत्तम गीत गाण्यांत काय हंशील ? कोल्हा चांदणें पसंत करेल काय ? जे कावळे संध्याकाळीं आंधळे होतात त्यांना चंद्रबिंब कसे दिसावे ?
अगदी तसेच, ज्यांना वैराग्य कशाशीं खातात ते माहीत नाही, ज्यांना विवेकाची भाषा समजत नाही असे मूर्ख लोक मला (ईश्वराला) कसे प्राप्त करून घेतील ? कुणास ठाऊक हा मोह कसा वाढत गेला नि बराच काळ व्यर्थ गेला. त्यामुळे या कलियुगात तो योग मात्र बुडाला हे खरे.

“तूं माझा भक्त आणि परम मित्र आहेस म्हणून तोच योग मी तुला पुन्हा सांगितला. हा योग म्हणजे उत्तम रहस्यमय ज्ञान आहे !” हा मी तत्वरूपांत सांगितलाय तुला ; याविषयी संदेह करू नकोस. खरोखर हे माझ्या मनांतले गूढ रहस्य आहे, पण ते माझ्या प्रिय मित्रापासून लपवून ठेवणेही शक्य नव्हतेच. तूं प्रेमाची मूर्ति आहेस नि भक्तीचा जिव्हाळा आणि मैत्रीचा तर जीवप्राण आहेस धनुर्धरा ! त्यातून तूं अतिशय विश्वासार्ह असल्याने या युध्दप्रसंगीं देखील तुझ्यापासून काहीही लपवून ठेवतां येत नाही. म्हणून क्षणभर धीर धर, गडबडून जाऊ नकोस. मात्र त्या आधीं तुझे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे.

अर्जुन अजूनही शंकासुर आहे. श्रीकृष्णाने नुकतिच सांगितलेली कथा त्याच्या मनांतून गेलेली नाही. सबब तो आपली शंका निर्भीडपणे विचारेल.
(क्रमश:…..


Tuesday, March 27, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पंधरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पंधरावा)
“अर्जुना, परम सत्याचे यथार्थ स्वरूप समजलेला तत्वज्ञानी पुरूष इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषय-सुखांत रमत नाही. इंद्रियांचे सर्व व्यवहार परस्पर घडत असल्याने कर्तेपणाची भावना त्याच्याकडे नसते.” असे ज्ञानी पुरूष आपला सर्व अहंकार सोडून त्रिगुणांच्या पलीकडचा साक्षीभाव बाळगतात.

जगातले सर्व बरे-वाईट व्यवहार सूर्यप्रकाशात घडत असतात, पण सूर्य त्यांपासून अलिप्त असतो. तसेच, ज्ञानी पुरूष देहधारी असले तरी कर्म-बंधनात गुंतत नाहीत. मात्र  अज्ञानी असणारे पुरूष प्रकृतिजन्य त्रिगुणांच्या आहारी जाऊन इंद्रियाधीन होतात. इंद्रियांचे व्यवहार त्यांच्या वृत्तिनुरूप होत असतात आणि तो अज्ञानी पुरूष जबरदस्तीने ती कर्में आपल्यावर ओढवून घेतो. साहाजिकच तो कर्मबंधनांत अडकणे क्रमप्राप्त ठरते.

म्हणून अर्जुना, तूं उचित तेवढी कर्में करून ती मला अर्पण करावीत. मात्र ते करतानाही तुझ्या चित्तवृत्ति आत्मस्वरूपात स्थिर असल्या पाहिजेत.

‘आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ आतां कोदंड घेउनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देई आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ जगीं कीर्ती रूढवीं । स्वधर्माचा मानू वाढवी । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई । एथ हें वाचुनि कांही । बोलों नये ॥’

किती सुस्पष्ट मार्गदर्शन आहे हे ! भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की त्याने सर्व उचित कर्में करून तीं भगवंताला अर्पण करावी. मात्र हे करतांना अंतस्थ ईश्वराचें सतत स्मरण ठेवावे. ( माम् अनुस्मर युध्द्य च !- Keep remembering Me and Fight !! )

हे सर्व अर्जुनाला सांगत असतानाच अश्रध्द, इंद्रियाधीन नि शंकेखोर लोकांना असे पारमार्थिक ज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडूं नये असे परखडपणे बजावतात.
स्वधर्म-पालनावर पुन्हा भर देतांना भगवंत म्हणतात की याचे पालन करणे कठिण वाटले तरी तोच आचरणे योग्य आहे. परधर्म दिसायला कितीही चांगला नि आचरण्यास सोपा भासत असला तरी स्वधर्म कधीही सोडूं नये.

जे अनुचित, अग्राह्य आहे तें मिळवण्याची मुळात इच्छाच कां करावी ? असे पहा, इतरांची मोठाली सुंदर घरें पाहून आपली राहती गवताची झोपडी पाडून टाकावी काय ? किंवा स्वत:ची बायको कुरूप असली तरी तिच्या बरोबरच प्रपंच करणे योग्य नाही काय ?
तसेच, स्वधर्माचे आचरण करताना कितीही संकटें आली किंवा आचरण करायला कष्टप्रद वाटलीं तरी परलोकात सुखावह असणारे स्वधर्माचरण योग्य आहे. अरे, दूध नि साखर गोड असली तरी कृमीदोषांत ती वर्ज्य नव्हेत काय ?
म्हणून  इतरांना योग्य असलेले आपल्यासाठी अयोग्य असू शकते याचा विचार करावा.
स्वधर्माचे आचरण करताना आयुष्य सरले तरी इह-परलोकीं ते आचरण योग्यच असते असे जेव्हा “समस्त सुरशिरोमणी श्रीशारंगधर” (श्रीकृष्ण) बोलले, तेव्हा अर्जुनाने विनवणी केली की हे देवा तुम्ही जे जे सांगितले ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकले आहे. पण माझ्या मनांत काही शंका आहेत त्या विचारू काय ?
तो विचारतो ,
“अथ केन प्रयुक्तोsयं पापं चरति पुरूष: ।
 अनिच्छन्नपि वार्ष्ण्येय बलादिव नियोजित: ॥३६॥
देवा, ज्ञानियांची देखील मती भ्रष्ट होऊन ते वाट चुकतात असे काय म्हणून घडते? जे सर्व काही जाणतात तेसुध्दा पर-धर्माकडे कोणत्या कारणांनी  आकर्षित होतात ? आंधळ्याला भुसा नि दाण्यांतला फरक कळत नसला तरी डोळस माणूस देखील कधी कधी कां फसतो ? सर्वसंग परित्याग करून रानावनांत स्थिरावलेला पुन्हा काय म्हणून प्रपंचात गुरफटतो ? पापाचरण टाळत आलेला माणूस पाप करायला कशामुळे प्रवृत्त होतो ? कोणाची जबरदस्ती असते तिथे ? हे हृषिकेशा, मला कृपाकरून समजावून सांगा !
त्यावर भगवंत उत्तरले,
“काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव: ।
 महाशनो महापाप्मा विध्द्येनमिह वैरिणम् ॥३७॥”

तेव्हां हृदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरूषोत्तमु  । सांगेन ऐक ॥
अरे, ज्यांना जरासुध्दा दयामाया नाही असे हे ‘काम नि क्रोध’ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत. ते ज्ञानरूपी खजीन्याला वेढून असणारे भुजंग आहेत. इंद्रियसुखाच्या गुहेतले वाघ आणि ईश्वरभक्तीच्या आड येणारे घातक मांग आहेत ! हे देहरूपी गडाचे दगड, इंद्रियरूपी गावांची तटबंदी असून यांच्या विवेकहीनतेचे दडपण साऱ्या विश्वावर पडले आहे. रजोगुणांनी व्यापलेले ते मुळात राक्षसी प्रवृत्तीचे आहेत आणि रजोगुणांपासून निर्माण झाले असले  तरी तमोगुणाचे ते विशेष लाडके आहेत. म्हणून तमोगुणींनी त्यांना प्रमाद आणि मोह बहाल केलेले आहेत. त्यांचे लालन-पालन अविद्या म्हणजेच अज्ञानामुळे घडते. मृत्यूच्या दरबारांत यांना विशेष मान मिळतो कारण हे कामक्रोध आयष्याचे शत्रू आहेत. त्यांची भूक इतकी प्रचंड असते की सगळे जग त्यांच्या एका घासाला अपुरे पडावे आणि भोगवृत्ती तर कधीच शमत नाही. आशा नि भ्रांति त्यांच्या जुळ्या बहिणी होत !
आतां भ्रांति कशी असते ते सांगतात.
 भातुकलीच्या खेळात जसा चट्टामट्टा करतात तशी त्रिभुवनाला ही भ्रांति खाऊन टाकते आणि हिचे दास्यत्व घेतात  इच्छा नि तृष्णा ! मोह आणि अहंकार हिचे निकटचे सवंगडी असून  ते जगाला हवे तसे नाचवतात.
धर्म आणि नीतीच्या पोटातील खरेपणा काढून त्यांत असत्याचा भुसा भरतात हे काम नि क्रोध, दंभाच्या रूपांत !
या कामक्रोधांनी सच्छील पतिव्रता शांतीला जबरीने विवस्त्र केले, तिच्याच वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगिणीला नटवले आणि तिच्याकडून साधू-संतांना भ्रष्ट करवले.
यांनी विचाराचे आश्रयस्थान नाहीसे केले, वैराग्याची कातडी सोलून काढली आणि जीवंतपणीच शम-दमाची म्हणजे निग्रहाची मुंडी मुरगळून टाकली. यांनी संतोष-वनाची नासाडी केली, धैर्याचे बुरूज नेस्तनाबूद केले नि आनंदाची कोंवळी रोपटीं उपटून टाकली. त्यांनी ज्ञानांचे वृक्ष धरासायी केले, सुखाचे शिलालेख पुसून टाकले आणि मानवाच्या हृदयांत त्रितापांचे पेटते निखारे घातले.
माणसाच्या जन्मापासूनच ते अस्तित्वात आले, अंत:करणाला चिकटून बसले ते इतके की ब्रह्मादिकांना सुध्दां त्यांचा ठावठिकाणा कळला नाही ! हे चैतन्याच्या शेजारी नि ज्ञानाच्या पंक्तीला असतात म्हणून एकदा हाहाःकार माजवायला चवताळले की आवरतां आवरत नाहीत.
हे कामक्रोध पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि जीवाला त्याच्या नकळत ग्रासून टाकतात ! ते शस्त्रांवाचून घात करतात, दोरीविना बांधतात आणि ज्ञानी माणसांना पैज लावून मारून टाकतात. हे चिखलाशिवाय रूतवतात, पाशावाचून जखडतात आणि खोलवर दडल्यामुळे कोणालाही वश होत नाहीत.
चंदनाच्या खोडाला नागीण जशी वेढे घालून बसते किंवा गर्भाला नाळ वेष्टून असते; अथवा प्रकाशाविना सूर्य, धूराशिवाय जाळ, धूलिकणांविना आरसा नसतो तसे कामक्रोधांविना निखळ ज्ञान आम्हाला दिसले नाही.

वास्तविक ज्ञान हे ब्रह्मरूप असल्याने अतिशय शुध्द नि पवित्र आहे. मात्र कामक्रोधांनी झाकोळले गेल्यामुळे ते दुर्लभ होऊन बसले आहे. सबब आधीं त्यांचा बंदोबस्त करावा नि मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे असे म्हटले तरी त्यांचा नायनाट करणे खूपच अवघड आहे. तसा प्रयत्न करूं म्हटलें तर ते आगीत तेल ओतण्यासारखे होते ! हे इतके प्रबळ असतात की हठयोग्यांना सुध्दां ते दाद देत नाहीत.

(कसली आक्रमक आणि रौद्र भाषा वापरली आहे ज्ञानदेवांनी इथे ! जस्ट अनलाइक ज्ञानदेव !! पण काम-क्रोधाचे वर्णन हलक्याफुलक्या मवाळ शब्दात करणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले असावे. ) असो.

तरी पण या ‘कामेष क्रोधेषांना’ काबूंत ठेवण्याचा एक उपाय आहे. तू तो आचरणांत आणणार असशील तर मी नक्कीच सांगीन, असे भगवंत आश्वासन देतात.
(क्रमश:…..


Sunday, March 25, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चौदावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चौदावा)
भगवान् श्रीकृष्णांनी स्वधर्मपालनाची निकड अर्जुनाला समजावून सांगितली. आतां स्व-धर्माचे आचरण म्हणजेच निष्काम बुध्दीने केलेले विहित कर्म बंधनकारक कुणा कुणाला नसते तें सांगतात.
“देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ (असे पहा, सर्व देहधर्म चालू असतांनाही जो आत्मानंदांत तल्लीन झालेला असतो त्याला कर्मफलाचें बंधन राहात नाही.)
याचे कारण आत्मबोध किंवा आत्मज्ञान झाल्यामुळें तो कृतार्थ आणि पूर्ण संतुष्ट असतो.
तथापि अर्जुना, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ति होत नाही तोंवर स्वधर्म पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तूं इंद्रियनिग्रह करून निरपेक्ष बुध्दीने तुझ्या वांट्याला आलेले (म्हणजे युध्द करणंयाचे) कर्म नि:संकोचपणें कर. ज्या कुणी निष्काम बुध्दीने आपले विहित कर्म केले ते मृत्युलोकात असूनही तत्वत: कैवल्यपदास (मोक्ष) पोहोचले. असे पहा, या आधीं जनक राजाप्रमाणें अनेक क्षत्रियांनी स्वधर्मपालन करीत मोक्षसुख मिळवलेले आहे. म्हणून अर्जुना, स्वकर्माविषयीं निरंतर आस्था बाळगावी. यामुळें इतर कार्येंसुध्दा आपसूक मार्गी लागतात. शिवाय, स्वधर्माचरण इतर लोकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरते ते वेगळेच.

“देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥”  (जे कृतकार्य होऊन नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचले आहेत अशा श्रेष्ठ व्यक्तींना देखील लोकसंग्रहार्थ, लोकांना आत्मबोध व्हावा या उद्देशाने, कर्म करावेच लागते.)
“मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥” (आंधळ्या माणसाबरोबर त्याला सांभाळून नेणारा डोळस माणूस सुध्दां सावकाश मंद गतीने चालतो. त्याचप्रमाणें ज्ञानी पुरूषाने अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन स्वधर्म आचरत स्वधर्माचाच बोध करावा.)
असे केले नाही तर अज्ञानी लोकांना कसे समजणार ? त्यांना त्यांचे कर्तव्य कसे कळणार ?

“यद् यदाचरति श्रेष्ठसतत्तदेवेतरो जन: ।
स यत् प्रमाणं कुरूते लोकस्तदनुवर्तते ॥२१॥”
(श्रेष्ठ पुरूष जसे आचरण करतो तसेच अनुकरण इतर लोक करतात. आपल्या कृतीने तो जसा आदर्श घालून देईल तसेच सामान्य लोक वागतात.

एथ वडील जे जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंच येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
शिवाय, श्रेष्ठ माणसाचे अनुकरण करणे अतिशय स्वाभाविक असल्याने ज्ञानी पुरूषांनी तर स्वधर्माचा त्याग कदापि करूं नये. जगत्कल्याणाची इच्छा धरणाऱ्या साधू, संत, सत्पुरूषांनी विशेष काळजी घेऊन धर्माचरण केले पाहिजे.
ते असो, इतरांची बात सोड. मी स्वत:च नाही का सतत कार्यमग्न असतो स्वधर्माच्याच मार्गावर ? मला कशाची तरी कमतरता आहे किंवा काही दुर्दम्य वासना शिल्लक आहेत म्हणून मी कर्म करतो असे जर तुला वाटत असेल तर नीट समजून घे की माझ्या एवढा परिपूर्ण असा जगात कोणीही नाही. तुला हे देखील माहीत आहे की माझ्याजवळ असीम सामर्थ्य एकवटलेले आहे. गुरू सांदीपनींचा मेलेला मुलगा मी यमलोकांत जाऊन प्रत्यक्ष यमाचा पराभव करून पुन्हा जीवंत करून आणला हे माझे सामर्थ्य तूं पाहिले आहेस. तरी पण मी मुकाट्याने माझे काम तत्परतेने करत असतोच.  अर्थात् हे सर्व मी निरपेक्ष बुध्दीने करतो, कारण हे सर्व जीव माझ्या आधीन असल्याने ते साहाजिकच माझे अनुकरण करतात. त्यांनी भलत्याच मार्गाने जावू नये आणि स्वधर्म पाळावा यासाठी मी स्वत: कार्यमग्न राहण्याची दक्षता घेतो.
मीच जर विरक्त होऊन अकर्तेपणाने आत्मस्थितीत स्वस्थ बसलो तर ही प्रजा कशी बरें उध्दरेल ? योग्य आचरणाचे सक्रिय उदाहरण त्यांचे समोर नसेल तर एकूणच सामाजिक सुव्यवस्थेची घडी बिघडून जाईल.
आणि म्हणूनच जो सामर्थ्यवान आणि ज्ञानसंपन्न आहे त्याने तर कर्मत्याग करूच नये !

फळाच्या लोभामुळे एखादा पुरूष साहाजिकच तत्परतेने कर्म करतो, पण तितक्याच तांतडीने अनासक्त ज्ञानी पुरूषाने ‘लोकसंग्रहार्थ’ सुयोग्य आचार पध्दतीचा शिरस्ता घालून दिला पाहिजे. समाजाची घडी विस्कटू नये म्हणून वारंवार तसा प्रयत्न करणे अत्त्यावश्यक होय.

“मार्गाधारें वर्तावें । विश्व हे मोहरें लावावें । अलौकिका नोहावें । लोकांप्रति ॥”
पुन्हा एक सुंदर नि महत्वाची ओंवी आहे ही !
संतांनी शास्त्रविहित धर्माचे म्हणजेच नीतीपूर्वक आचरण करून जगासाठी आदर्श निर्माण करावा. मात्र आपण स्वत: काही विशेष करतो आहोत असा अभिनिवेश कदापि नसावा.
असे पहा, जें बाळ आईचे दूधही सायासाने पिते त्याला पंचपक्वांनांचे जेवण कसे करता येईल ? अगदी तसेच शास्त्रसंमत कर्में करण्याची ज्या अज्ञानी माणसांची कुवत नाही, इतकेच नव्हे तर ज्यांना सामान्य कर्मेंही धड करता येत नाहीत, अशांना ज्ञान-प्राप्तीनंतर होणाऱ्या नैष्कर्म्य स्थितीबाबत अगदीं गमतीने हि सांगणे योग्य नाही. त्याला सत्कर्माकडे प्रवृत्त करावे, सत्कर्माचा गौरव करावा, मात्र त्याआधीं स्वत: सत्कर्म करून आदर्श घालून दिला पाहिजे.
लोक-कल्याणासाठीं केलेले कर्म कधीही बंधनकारक ठरत नसते. एखादा बहुरूपिया राजाराणीची सोंगें घेतो. मात्र त्याच्या मनांत स्त्रीपुरूष असा भेद सोंग घेतांना नसतो, तो केवळ ते सोंग लोकरंजनार्थ घेतो. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरूष निष्काम वृत्तीने लोककल्याणाची कर्में करत असतो : म्हणून  त्याला त्या कर्माचें बंधन राहात नाही.

असे पहा, आपण जर दुसऱ्याच्या डोक्यावरचे जड ओझे आपल्या डोईवर घेतले तर त्या भाराखालीं आपण दबून जाणार नाही काय ? प्रकृतीच्या त्रिगुणांमुळे बरी-वाईट कर्में निपजत असतात, मात्र त्या कर्मांचा आपणच कर्ता असल्याच्या अहंकारापोटीं अज्ञानी जीव त्या कर्मांच्या फळाखालीं भरडला जातो. असा अहंकारी, स्वार्थी, संकुचित वृत्तीचा माणूस मूढ असतो. अशा माणसांना गूढ परमार्थाचा बोध करू नये.

तें सर्व आता बाजूला ठेवून आतां मी तुझ्या हिताच्या चार गोष्टी सांगेन म्हणतो, त्या लक्ष देऊन ऐक !
(क्रमश:…...



Friday, March 23, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तेरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तेरा)
भगवंत अर्जुनाला सृष्टिच्या निर्मितीची कथा सांगत आहेत.
“सृष्टिकर्त्या ब्रह्म्याने सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती केली आणि त्याचवेळीं प्रत्येकाला नित्ययाग म्हणजेच काही निश्चित अशी कर्में वाटून दिली. परंतु ती सूक्ष्म किंवा आचरण्यास कठीण म्हणून माणसाने तिकडे दुर्लक्ष केले. (खरें तर स्वधर्म-पालनामुळे भविष्यांत चांगलेच घडणार याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती). त्यावेळेस सर्व मानवांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि विचारले की देवा या मृत्युलोकांत मनुष्याचा उध्दार कसा होईल ते कृपा करून सांगावे. तेव्हा तो कमल-जन्मा मानवांना बोलता जाहला कीं, ‘निरनिराळ्या वर्णातील तुम्हा मंडळींसाठी मी वेगवेगळी कर्में योजिली आहेत जीं तुमच्या प्रत्येकाचा स्वधर्म म्हणून ओळखलीं जातील. त्या स्वधर्म पालनाने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. यासाठीं तुम्हाला व्रत वैकल्यें करण्याची गरज नाही, शरीराला कष्ट देण्याची गरज नाही किंवा अंगात बळ नसेल तर दूरदूरची तीर्थाटनेही नको. हटयोगासारखी कठिण तपश्चर्या नको, फलाशेने केलेली आराधने नको किंवा कुठली मंत्रतंत्र-विधानें नकोत. देवदेवतांचं पूजन देखील नको. मात्र तुम्ही स्वधर्मयज्ञ निरंतर करणे पअत्त्यावश्यक आहे. एखादी पतिव्रता स्त्री जशी एकनिष्ठ असते तसे निरपेक्ष बुध्दीने याचे आचरण केले पाहिजे. हा स्वधर्मरूपी यज्ञ आहे हे विसरू नका. प्रजाजनांनो, या स्वधर्माला तुम्ही निष्ठापूर्वक अंगिकाराल तर हा कामधेनूप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करील आणि तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.”

या स्व-धर्म यज्ञाची फलश्रुति सांगतात ज्ञानदेव.
याच्या आचरणाने देवीदेवता संतुष्ट होऊन तुमचा योगक्षेम चालवतील कारण तुमची भक्ति आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे आपसात प्रीति वाढेल नि तुम्ही जे काही करूं म्हणाल ते आपोआप पूर्णत्वाला जाईल. शिवाय मनांतील सर्व चांगल्या इच्छा फलद्रुप होतील. तुम्हाला वाचासिध्दी प्राप्त होईल, तुम्ही आज्ञापक म्हणजे आज्ञा देणारे व्हाल आणि महाऋध्दि ‘काय आज्ञा आहे’ अशी विनंती करतील. ज्याप्रमाणे वसंत ऋतुचे आगमन होतांच सकल वनश्री सुंदर फळाफुलांनी बहरून उठते, तशी सर्व प्रकारच्या सुख-समृध्दीसह सुदैव तुम्हाला शोधत येईल.

मात्र वैभव प्राप्त झाल्यावर जो पुन्हा इंद्रियसुखांच्या नादीं लागेल, किंवा ज्या यज्ञ-देवतेने तें वैभव दिले तिचें ऋण मानणार नाही, अथवा अग्निहोत्रादि सत्कर्में करणार नाही, ब्राह्मणांना भोजनाने संतुष्ट करणार नाही, गुरूभक्ति विसरेल, अतीथिचा उपमर्द करेल आणि जातबांधवांना समाधान देणार नाही असा स्व-धर्मरहित भोगासक्त पुरूष केवळ संकटांचाच धनी होईल.

ज्याप्रमाणे मृत शरीरातून चैतन्य निघून जाते किंवा दैवहीन माणसाजवळ लक्ष्मी टिकत नाही तसे स्वधर्म न पाळणाऱा माणूस सर्व सुखांना पारखा होतो. (जसे दिवा विझतांच प्रकाश नाहीसा होतो). शिवाय स्वधर्म टाळला तर त्याचे स्वातंत्र्य हिरावले जाते ते वेगळेच.
ब्रह्मदेव असेही म्हणाले की  स्वधर्महीन माणसाला काळ मोठी शिक्षा करतो आणि चोर म्हणून त्याचे सर्वस्व हरण करतो. अशा वेळीं स्मशानातल्या भूतांसारखे अनेक दोष त्याला वेढतात. त्रिभुवनांतली सर्व दु:खें, पातकें नि दैन्य त्याच्या वांट्याला येते. कितीही रडला भेकला तरी कल्पांतापर्यंत त्या उन्मत्ताची सुटका नाही.
“म्हणौनि निजवृत्ति हे  न संडावी । इंद्रियें बरळों नेदावी । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥”
म्हणून तुम्हां सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपले विहित कर्म म्हणजेच स्व-धर्म-कर्म योग्य प्रकारें करत राहा. असे पहा, निर्हेतुक बुध्दीने केलेला आपल्या संपत्तीचा योग्य विनियोग हे विहित कर्म म्हणता येईल. त्याचप्रमाणे गुरू, गोत्र, अग्नि यांचे पूजन आणि समयोचित विप्रपूजन तसेंच पितरांना तिलोदक देऊन वाहिलेली श्रध्दांजलि विहित कर्मांत येते.
अशा प्रकारें केलेली सर्व कर्में यज्ञ म्हणून ओळखावीत. आणि या यज्ञांतील पुरोडाश म्हणजे प्रसाद कुटुंबीयांसोबत आनंदाने ग्रहण करावा.

“म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । ते स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ धर्माचरणाने मिळवलेले धर्मासाठीच वापरावे आणि उरेल तें समाधानाने उपभोगावें. (येथे धर्माचा अर्थ नीति किंवा सन्मार्गाने मिळवलेला असा अभिप्रेत आहे.)
अर्जुना, वरील प्रमाणेच आपले आचरण असायला पाहिजे अशी ही आद्य कथा मुरारी सांगत आहेत. जे स्वत:ला केवळ देह समजतात आणि विषयसुखांना सर्वस्व मानतात त्यांना अशा स्वधर्म-यज्ञाची कल्पनाही नसते. ते अहंकारापोटीं हवे तें बरळत राहतात आणि भोगासक्तीने बरबटलेले आयुष्य जगतात. अवघी संपत्ती यज्ञांत अर्पण करण्याचे हवन-साहित्य असून तें योग्य रीतीने आदिपुरूषाला अर्पण हा स्वधर्म होय. शिवाय यज्ञांत अर्पिलेले अन्नद्रव्य हे काही साधारण अन्न नसून तें ब्रह्मरूप अन्न असते. (अन्नम् ब्रह्मेति).
(उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म !!)

“अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव:  ॥१४॥
(सर्व प्राण्यांची शरीरें अन्नधान्यावर जगतात; अन्नधान्यें पावसामुळे निर्माण होतात; पाऊस यज्ञांमुळे उत्पन्न होतो; आणि यज्ञ कर्मामुळे म्हणजे स्वधर्मापासून होतात. कर्माचें कारण वेदरूप ब्रह्म होय.)

“कर्म ब्रह्मोद्भवं विध्दि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥”

मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणोनि हें चराचर । ब्रह्मबध्द ॥     प्रकृती आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो म्हणून हे संपूर्ण विश्व परमात्म्याच्या आज्ञेत आणि परमात्म-तत्वांत बांधलेले आहे. अर्जुना, कर्माचे मूर्त स्वरूप म्हणजे यज्ञ आणि यज्ञांत सर्व वेद कायम सामावले आहेत.

पार्था, स्वधर्मरूप यज्ञाची एकूणच परंपरा तुला या निमित्ताने थोडक्यात सांगितली. हा स्वधर्मरूप यज्ञ करणे अतिशय योग्य होय. मात्र अहंकाराने माजलेला जो कोणी असे यज्ञकर्म करत नाही, तो पातकांचा डोंगर असून भूमीला केवळ भारभूत होऊन जगतो. तो केवळ इंद्रियांच्या तावडींत सापडलेला असतो. अवकाळीं आलेल्या ढगाप्रमाणे त्याचे आयुष्य निष्फळ असते. किंवा शेळीच्या गळ्यावरचे स्तन जसे निरूपयोगी असतात तसे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्याचे जीवन व्यर्थ होय.
आणि म्हणून तुला सांगतो अर्जुना, कीं आपला स्वधर्म कधीही सोडू नये.

परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ (!) अरे अर्जुना (सव्यसाची) ऐक ! मानवी शरीर लाभलेला जो कोणी स्व-धर्म-पालनाचा कंटाळा करतो तो अडाणी, खेडुत, गावंढळ समजावा. (सव्यसाची म्हणजे जो दोन्ही हातांनी बाण मारूं शकतो असा).
भगवान् श्रीकृष्ण स्वधर्माविषयीं, थोडक्यात निष्काम, विहित कर्माबद्दल अर्जुनाला सविस्तरपणें सांगत आहेत. आतां घडलेल्या कर्माचे बंधन कोणाला आहे नि कुणाला नाही ते सांगतील. तो भाग पुढे येईल.
(क्रमश:…..



Thursday, March 22, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग बारावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग बारावा)
मागील भागांत स्थितप्रज्ञ अशा योग्याची लक्षणे भगवंताने सांगितली. लाभ-हानी, सुख-दु:ख, जय-पराजय वगैरे सर्व व्दंव्दांत योगी पुरूष समत्वाची भावना जोपासतो असे विविध दाखले देत श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला.
तथापि, या सर्व सांगण्याचा एकच अर्थ अर्जुनाने काढला तो  असा कीं जर कर्म, कर्ता वगैरे व्दंव्दें समबुध्दीला अभिप्रेत नसतील तर त्याला युध्दासारख्या हिंसक कर्मांत काय म्हणून प्रवृत्त केले जात आहे ! एकीकडे समबुध्दि असलेला योगी हो असे सुचवतोस नि दुसऱ्या बाजूस युध्द कर असेही शिकवतोस !! आपली ही भूमिका पटवून देण्यासाठी तो देखील अनेक दाखले देतो नि शेवटीं विनवतो की मज अज्ञानी पामराला  निश्चित असे मार्गदर्शन करा.

आतां भगवंत कर्मयोगावर अतिशय सुंदर आणि निर्णायक निरूपण करतील.
किंचित विस्मय दर्शवीत श्रीकृष्ण म्हणतात की अरे तुला जे आत्तां सांगितले तो तत्वार्थ आहे. बुध्दियोगाची, म्हणजेच निष्काम कर्मयोगाची महती सांगताना मी सांख्य-मताचा देखील सहज उल्लेख केला. तुला ते न कळल्यामुळे विनाकारण बेचैन झालास. मात्र एक लक्षांत ठेव की ही दोन्ही तत्वें माझ्याच पासून निर्माण झालेली आहेत नि तीं चिरंतन आहेत. बरें, ज्याला ज्ञानयोग म्हणतात त्याचे सांख्यमार्गी अनुसरण करतात आणि तो साध्य होताच साधकाचा सिध्द होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होतो.
दुसरा आहे कर्ममार्ग, जो चोखाळतांना थोडा अधिक वेळ लागतो. हे दोन मार्ग वेगळाले दिसत असले तरी दोन्हींचे गंतव्य एकच असते. उदाहरण देतात स्वयंपाक करण्याचे नि भोजन करण्याचे, ज्यांची फलश्रति एकच असते तृप्तीची. किंवा, पूर्व-वाहिनी नदी आणि पश्चिम-वाहिनी नदी  वेगळ्या दिसतात पण अखेर एकाच सागराला जाऊन मिळतात.
अगदी तसेच, कर्मयोग आणि ज्ञानयोग एकाच परमात्म स्वरुपाची भेट घडवतात. केवळ योग्यतेप्रमाणे त्यांचे साधन आणि उपासना मार्ग वेगळे दिसतात.

मला आवडणारी अझून एक ओवी –
“देखैं उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगैं नरू केवीं तैसा । पावे वेगां ? ॥”
(पक्षी मनांत येतांच चट्कन उडतो आणि पिकल्या फळावर चोंच मारतो. मात्र माणूस तितक्या वेगाने फळापर्यंत पोहोचू शकेल काय ?) तो हळूहळूं क्रमाक्रमाने झाडावर चढेल नि ते फळ निश्चितपणे पदरांत पाडून घेईल. अगदीं तसेच अशा विहंगम मार्गाने ज्ञानयोगी शीघ्रगतीने तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात. मात्र कर्मयोगाचा अवलंब करणारे यथोचित आचार आणि निष्काम नि विहित कर्माच्या आधाराने, ज्ञानयुक्त होत मोक्ष मिळवतात.

मात्र एक महत्वाचे तत्व लक्षात ठेव. जोपर्यंत इच्छा, वासना शिल्लक आहेत तोंवर कर्म करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आत्मतृप्ती झाली कीं कर्म आपोआप गळून पडते. म्हणून ज्याला अशा “नैष्कर्म्यपदाची” ओढ आहे त्याने स्वधर्माला साजेसे आपले विहित कर्म कधीही सोडू नये.
केवळ कर्म करणे सोडले की नैष्कर्म्य आले असे म्हणणे मूर्खपणा आहे. असे बोलणे खरोखर अर्थहीन आहे. केवळ कर्माचा त्याग केल्याने कर्मत्याग झाला असे नक्कीच म्हणता येत नाही.

मला सांग, शास्त्रविरोधी नि परमार्थाला बाधक म्हणून कर्म करायचे नाही असे म्हटले तरी इंद्रियांचे व्यापार थांबतात काय ? कान ऐकायचे थांबतील की डोळे पाहायचे आणि नाकाने सुगंध घेणे बंद होईल ? बरे, श्वासोच्छ्वास किंवा बुध्दी विचार करणे सोडेल ? तहान भूक मावळतील की निद्रा नि स्वप्न पडणे बंद पडेल ? जन्म-मृत्यू तरी थांबवतां येतील का ?
या सर्व गोष्टींपैकी काहीच बंद करता येत नसेल तर त्याग कशाचा केला?

मुळांत हे शरीर नि त्याचे सर्व गुणधर्म मायेमुळे भासतात. जोंवर या प्रकृतीचा अर्थात मायेचा संग आहे तोपर्यंत कर्मत्याग अशक्य आहे. (तरीही कर्मत्याग केला असे जे म्हणतात त्यांचा तो निव्वळ अट्टाहास असतो !) कर्मत्यागाचे वरवर ढोंग करणारे लोक खरें तर विषय-वासनेंत बरबटलेले असतात एवढे मात्र नक्की.

अर्जुना, या विषयांच्या अनुषंगाने तुला “नैराष्ये”चे लक्षण सांगतो, ते ऐक.
जो मनाने दृढनिश्चयी आणि परमात्म-स्वरूपाशीं रममाण झालेला परंतु बाह्य स्वरूपांत सामान्य प्रापंचिक माणसांसारखे वागतो ; जो आपल्या इंद्रियांना विषयभोग घेण्याचे स्वातंत्र्य तर देतो पण त्यांविषयीं आसक्तीची भीती बाळगत नाही आणि प्रसंगानुरूप शास्त्रविहित कर्म करायची वेळ आली तर ती टाळत नाही. कोणतेही कार्य सुसूत्रपणे नि कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता, निरपेक्ष बुध्दिने करतो. तो वासना किंवा मोहाला बळी पडत नाही. तो लोकांच्या संगतींत राहून देखील पद्मपत्राप्रमाणे अलिप्त असतो. पाण्यात दिसणारे सूर्यबिंब पाण्यापासून वेगळे राहते तसा लोकात सामान्य भासणारा आत्मज्ञानी पुरूष वरवर सामान्य वाटतो. वास्तविक त्याचे खरे स्वरूप समजणे अवघड आहे.
तथापि, आशापाश रहित आणि वर सांगितलेली लक्षणे असणारा पुरूषच ‘मुक्त’ असतो असे निश्चितपणे समज. अर्जुना, या जगात ज्याच्या श्रेष्ठत्वाचे विशेष वर्णन केले जाते तो कर्मयोगी होय. आणि म्हणूनच मी तुला ‘कर्मयोगी हो’ असे म्हणतोय.
“तूं मानसा नियमु करी । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियेंहीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ( तूं मनाचा निर्धार कर, अंत:करणांत स्थिर हो आणि मग कर्मेंद्रियांना खुशाल आपापलें कर्म करू देत. कारण त्यापासून तुला बाध येण्याचा धोका नाही, मनानें अलिप्त असल्यामुळें )
म्हणून प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत “नैष्कर्म्य स्थिती” प्राप्त करणे संभवतच नाही. शिवाय “निषिध्द कर्म” करणे तुला खरेच जमेल काय ?
आणि म्हणून तुला आग्रहाने सांगतो कीं जे जे उचित नि प्रसंगानुरूप कर्म तुझ्या समोर येईल ते निरपेक्ष बुध्दीने अवश्य कर.
अर्जुना, तुला माहीत नसलेले एक गुपित सांगतो नि ते म्हणजे निष्काम कर्मच कर्मबंधापासून आपोआप मुक्त करत असते !

“देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणे व्यापारें । निश्चित पावे ॥” (असे पहा, जो शास्त्रांच्या आधाराने म्हणजेच सर्वसामान्य समाजाच्या हितासाठी असलेले कार्य आपला स्वधर्म मानून योग्य असे आचरण करतो, तो त्याच कर्मांमुळे निश्चितपणे मोक्ष प्राप्त करतो. )

“स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञ जाण पां । म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारू नाही ॥” (अरे बाबा अर्जुना, जो कोणी आपले विहित कर्म स्वधर्म मानून करतो तें यज्ञकर्मच असते असे खात्रीपूर्वक समजून घे कारण तिथे पाप असण्याचे कारणच नाही. नित्य, नैमित्तिक आणि विशेष अशी कर्में म्हणजेच यज्ञ सांगितले आहेत. असो. )

मात्र आपला निजधर्मच जे कोणी आचरत नाहीत आणि वर कुकर्म म्हणजे निषिध्द कर्मांत रमतात त्यांना प्रपंचाचे बंधन म्हणजे जन्ममृत्यूंच्या पुनरावृत्तीं शिवाय दुसरा पर्याय नसतो.
“म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥”
हे सगळे विश्व कर्माचरणाला बांधील आहे, कर्म करण्यावाचून त्याला पर्याय नाही. पण प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या आवरणाखाली असल्याने लोक स्वधर्म-पालनाचे कर्तव्य विसरले म्हणून त्यांना जन्ममृत्यूच्या बंधनांत पडावे लागले.
अर्जुना, या निमित्ताने तुला एक कथा सांगतो, ज्यांत सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीची रचना कशी केली ते तुला समजेल.
(क्रमश:……


Monday, March 19, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अकरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अकरावा )
एक महत्वाचा श्लोक, जो लोकमान्य टिळकांचा विशेष आवडणारा म्हणतां येईल असा-
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।……….
(तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफलावर अजिबात नाही.)

माऊली सांगतात,
 आपण आपले विहित कर्म , म्हणजे नियतीने जें काही आपल्या ललाटावर लिहिलेले आहे ते केलेच पाहिजे. जसें क्षत्रियांसाठी युध्द, ब्राह्मणांसाठी षट्कर्में (यज्ञ, याजन, अध्ययन, अध्यापन, दान नि आदान किंवा प्रतिग्रह), वैश्यांना व्यापार आणि शूद्रांना सेवा नि स्वच्छता.
(खरें तर ही वर्णश्रम व्ववस्था त्या काळाची गरज म्हणून अस्तित्वांत आली. ती कालबाह्य नसली तरी आजच्या काळाशीं सुसंगत म्हणता येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजची व्ववस्था जन्मसापेक्ष नसून कर्मसापेक्ष आहे. खरें तर आजचा प्रत्येक माणूस वरील चारही वर्ण स्वत:मध्ये अनुस्यूत आहेत असे मानतो. कारण आपले आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो बुध्दिजीवी असल्याने प्रपंचांत ब्राह्मणाची भूमिका घेतो. अर्थार्जन आणि त्याचा विनियोग करत असल्याने वैश्यधर्म आला आणि माता-पिता, गुरुजन, वडीलधारे नि समाजांतील सर्वांची वेळप्रसंगीं करत असलेली सेवा आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेचे ब्रीद घेतल्याने शूद्र-वर्ण देखील !) असो.
माऊली आग्रहाने सांगतात की कर्मफलाची आसक्ती नको, निषिध्द कर्म करूं नकोस आणि निरपेक्ष बुध्दीने सत्कर्मेंच करत राहा.
‘तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥’ प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे ! आधीं म्हणाले, ‘तूं योगी हो,’ नि मग फलाशा न धरतां,  लक्षपूर्वक (diligently) कर्में कर.
पुढे म्हणतात, आरंभिलेले कार्य सुदैवाने यशस्वीपणे पूर्णत्वास गेले तर हुरळून जाऊं नये किंवा काही कारणाने अडून राहिले तरी त्याचा क्षोभ नसावा. कारण जे जे कार्य घडेल ते सर्व ईश्वरार्पण केले तर माणूस कर्मबंधांत अडकत नसतो.
खरें तर कर्माची फलश्रुती काहीही असली तरी जो माणूस त्याबाबत हर्षशोक मानत नाही तोच योगी होय असे नि:संदेहपणे ठणकावून सांगतात ज्ञानदेव.
“अर्जुना समत्व चित्ताचे । तेंचि सार जाणें योगाचे । जेथ मन आणि बुध्दीचें । ऐक्य आथी ॥”
याच फलनिरपेक्ष कर्माला माऊलींनी “बुध्दियोग” अशी संज्ञा दिली आहे. (निष्काम कर्मयोग म्हणजेच बुध्दियोग)
तरी पण, हे कसे घडावें ? अर्जुना, जेव्हा तूं मोहाचा त्याग करशील, म्हणजेच जेव्हा ‘मी-माझें’ हा भाव निपटून काढशील, तेव्हा तुला वैराग्य आपसूक लाभेल. वैराग्यामुळें निष्कलंक नि गहन असे आत्मज्ञान प्रकट होईल आणि तुझ्या मनांत कसलीच आसक्ती किंवा अभिलाषा राहणार नाही. मग आणखी काही जाणून घेण्याची किंवा मागचे काही उगाळत बसण्याची खोड थांबेल. इंद्रियांचे उपद्व्याप बंद पडून बुध्दि पुन्हा आत्मस्वरूपांत स्थिरावेल. अशा समाधीसुखांत मग्न झालेल्या स्थिरबुध्दीमुळें तुला खरी योगस्थिति लाभेल.

अर्जुनाने विचारलेल्या स्थितप्रज्ञा विषयींच्या प्रश्नांची भगवंताने दिलेली समर्पक स्पष्टीकरणे आपण मागील भागांत पाहिली आहेत. म्हणून पुनरावृत्ती टाळून पुढच्या ओंव्या पाहू.

स्थिरबुध्दीचा साधक कसा असतो त्याचे बहारदार वर्णन करतात.
“देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदु:खां ॥ (जेव्हा प्रसन्नता अखंडपणे चित्त व्यापून असते तिथे कोणत्याही प्रापंचिक उद्वेगाला थारा मिळत नाही). असे पहा, ज्याचे पोटात अमृताचा झरा वाहातो आहे त्याला तहान-भुकेचा त्रास संभवतच नाही. अगदी तसेच हृदयांत आनंद भरलेला असेल तर दु:ख कुणाला नि कसे होईल? अशा पुरूषाची बुध्दी साहाजिकच परमात्म स्वरूपात स्थिर असते. निवाऱ्यांत ठेवलेली दिव्याची ज्योत मुळीसुध्दां कंप पावत नाही ; तसा स्थिरबुध्दीचा पुरूष आपल्या स्व-स्वरूपात मग्न असलेला योगी समजावा.

मात्र ज्याला इंद्रियें, मन, बुध्दी स्थिर ठेवतां येत नाहीत त्याला विषयादिक गुणधर्म जखडून टाकतात. खरें तर अशा अविवेकी पुरूषांना स्थैऱ्याची इच्छाच नसते. मग त्यांना शांती कशी प्राप्त होणार? आणि जिथे शांतीचा जिव्हाळा नाही तिथें सुख कुठून असणार? मग मोक्षाची तर बातच नको! भाजलेले बियाणें शेतात पेरले आणि त्याला कोंभ फुटले असे अशक्य कधीं घडलें तरच अशांत माणूस सुखी झाला असे म्हणतां येईल !!
म्हणून, मनाची अस्थिरता हेच सर्व दु:खांचे मूळ होय. आणि म्हणूनच इंद्रियांवर ताबा मिळवणे अत्यावश्यक ठरतें.
खरोखर, इंद्रियें म्हणतील ते करणारा पुरूष विषयांचा समुद्र लंघून गेला असे वरवर भासते. पण जसे किनारा गाठलेले गलबत अचानक वादळ आले तर पुन्हा समुद्रात भरकटूं शकते तसे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुध्दां जे पुरूष क्षणिक का होईना पुन्हा इंद्रियांधीन झाले तर प्रपंचातील सर्व सुखदु:खे त्यांना घेरल्याशिवाय राहात नाहीत.

“म्हणून महाबाहो (अर्जुना), ज्याची इंद्रियें सर्व बाजूंनी विषयांपासून आवरलेली असतात त्याची बुध्दी निश्चितपणे स्थिर झालेली असते.”
पुन्हा एकदां कासवाचे उदाहरण देवून सांगतात की जसे कासव आपल्या इच्छेप्रमाणे आपले अवयव पसरते किंवा आवरून घेते, तशी स्थितप्रज्ञाची इंद्रियें त्याच्या पूर्णपणें ताब्यांत असतात.

आता ज्ञानदेव पूर्ण पुरूषाचें गहन असे चिन्ह अर्जुनाला सांगतील.
“या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनै: ॥६९॥”
(आत्म-स्वरूपाविषयीं अनभिज्ञ असलेले सर्व प्राणी अज्ञानरूपी रात्रीमध्ये झोपलेले असतात. मात्र मनावर पूर्ण ताबा मिळवलेला स्थितप्रज्ञ त्याच्या ज्ञानामुळें कायम जागृत असतो. त्याचप्रमाणें प्राणी जेव्हा दैनंदिन व्यवहारात जागे असतात तेव्हा तो व्यवहार अज्ञानमूल असल्याने स्थितप्रज्ञासाठी ती रात्रच ठरते !)
असा निरूपाधिक स्थिरबुध्दीचा पुरूष मुनिजनांचा जणूं राजाच होय.
पार्था, स्थितप्रज्ञाचे आणखी एक लक्षण तुला सांगतो. समुद्र कायम धीर गंभीर असतो. असंख्य नाले त्यांत आपले प्रवाह सतत ओतत असतात पण समुद्र आपला पाणीसांठा वाढू देत नाही, किंवा उन्हाळ्यांत सर्व नद्या कोरड्या ठणठणीत पडतात. पण समुद्राची पातळी काही कमी होत नाही. अगदीं तसेच, सिध्दपुरूषाला अनायासें ऋध्दीसिध्दि प्राप्त झाल्या तरी तो हुरळून जात नाही, किंवा नाही मिळाल्या तरी त्याला खंत नसते. मला सांग, सूर्याच्या घरात प्रकाशासाठी दिवा पेटवावा लागतो काय ? आणि दिवा लावला नाही तर तो काय अंधारांत कोंडला जातो ?
त्याचप्रमाणे, ऋध्दीसिध्दि आल्या किंवा गेल्या तरी सिध्दपुरूष तिकडे लक्षच देत नाही कारण तो आत्मानंदांत निमग्न असतो. त्याला स्वर्गसुखही क:पदार्थ असते; मग ऋध्दीसिध्दींची तो कशाला पर्वा करेल? असा आत्मज्ञानाने संतुष्ट पुरूष अहंकार नि सर्व वासनांचा त्याग करून, विश्वरूप होत्साता विश्वांत संचार करतो.

अशी ही परब्रह्म अवस्था अपरंपार आहे, जी प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. मात्र ते सर्व ऐकताना अर्जुनाच्या मनांत असलेले युध्द न करण्याचे प्रयोजन अधिकच बळकट झाले. म्हणून तो अर्जुन भगवंताला एक सुंदर प्रश्न विचारून आपली शंका मांडेल.
तो प्रसंग खरोखर खूप सुंदर, रसपूर्ण, सर्व धर्मांचे सारभूत किंवा विवेकरूपी अमृताचा अमर्याद सागर आहे. सर्वज्ञांचा राजा भगवान् श्रीकृष्ण स्वत: ती कथा सांगतील असे निवृत्तिनाथांचे सेवक श्री ज्ञानदेव म्हणतात.
(क्रमश:……..


Monday, March 12, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग दहावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग दहावा)

अर्जुनाने बाकायदा परवानगी घेतली होती श्रीकृष्णाची काही गूढ नि अनाकलनीय प्रश्नांची उत्तरें मिळवण्यासाठीं. आणि श्रीकृष्णानेही अगदी मोकळेपणाने हवे तें विचार, जेणेंकरून तुझ्या मनाचें पूर्ण समाधान होईल असे म्हटले.
खरें तर हा कृष्णार्जुन संवाद आपल्या प्रत्यक्ष नजरेसमोर घडतो आहे असे उत्कृष्ठ, बहारदार नि नाट्यमय वर्णन ज्ञानदेव अतिशय सहजपणे करतात हेच ज्ञानेश्वरीचें वैशिष्टय होय. असो.
अर्जुन विचारतो की हे देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे नि त्याला कसे ओळखावे. ज्याला स्थिर बुध्दीचा असे म्हणतात नि जो अखंड समाधीसुखात रमलेला असतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावें. तो कुठल्या अवस्थेत असतो आणि कसा दिसतो, ते लक्ष्मीपते मला सांगा.
त्यावर, प्रत्यक्ष परब्रह्म अवतार, षड्गुणैश्वर म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या सहा गुणांचे अधिपति भगवान् श्री नारायण काय बोलले ते ऐका.
भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सविस्तर सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले, अर्जुना अंत:करणांत ठाण मांडून बसलेली विषयासक्ती हीच आत्मसुखाच्या आड येते. खरे तर प्रत्येक माणसात ब्रह्मच केवळ ठासून भरलेले असल्याने तो नेहमी संतुष्ट असाच असतो. मात्र कामनेच्या संगतीमुळे तो विषयसुखांत लडबडून जातो. (तीन प्रकारच्या कामना किंवा ‘ईषणा’ सांगितल्या आहेत. दारेषणा (परस्त्रीसुख), वित्तेषणा (दुसऱ्याचे धन) आणि लोकेषणा ( मान सन्मान प्रतिष्ठा वगैरे).
मात्र जेव्हां हा “काम” पूर्णपणे नाहीसा होतो तेव्हा त्याचे चित्त आत्मानंदांत स्थिरावते. असा पुरूष स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावा. वाटेल तितकी दु:खें वाट्याला आली किंवा सुखांचाही अतिरेक झाला तरी त्याचे मन उदास होत नाही की तो हुरळून जात नाही. त्याच्यापाशी काम नि क्रोध दोन्हीही नसल्याने त्याला भीतीची बाधा होत नाही, कारण तो ब्रह्मरूपाने कायम परिपूर्ण असतो. त्याच्या ज्ञानप्राप्तीत नि चिंतनात कसलाही अडथळा येत नाही, म्हणून तो शरीर वगैरे उपाधींत अडकून पडत नाही. तोच तो स्थितप्रज्ञ असे समज.
पूर्णचंद्र कधीं उत्तम, मध्यम, कनिष्ठ असा प्रकाशाचा भेद करत  नाही, तसा स्थितप्रज्ञ सर्वांशी सर्वकाळ समबुध्दीने वागतो. चांगली गोष्ट घडली तर आनंदातिशयाने नाचत नाही किंवा दु:खद् प्रसंगीं अवसान गाळून खिन्न होत नाही. असा हर्ष-शोकापासून अलिप्त पण आत्मबोधाने परिपूर्ण असलेला पुरूष प्रज्ञायुक्त म्हणजेच स्थितप्रज्ञ म्हणून समजावा.

कासव जसे निवांतपणे आपले अवयव पसरते किंवा इच्छावशें आवरून घेते, तशी त्याची इंद्रियें त्याच्या पूर्णपणे ताब्यांत असतात.
अर्जुना, एक विसक्षण लक्षण मात्र ऐक. जे साधक निग्रहाने आपली कर्णेंद्रियें वगैरे आवरतात त्यांना रसना म्हणजे जीभेवर ताबा ठेवतां येत नाही आणि म्हणून अनेक विषय त्यांना चहूबाजूंनी वेढून टाकतात. एखाद्या झाडाची पालवी वरवर ओरबाडावी, पण मूळांना पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होईल ? उलट तो अधिकच फोफावेल ! अगदीं तसेच रसनेंद्रियामुळे विषयवासना अधिकच दृढ होतात.
इतर सर्व इंद्रियें आवरणे शक्य असते पण ही जीभ नव्हे. कारण तिच्याशिवाय माणूस जगूंच शकणार नाही ! तरी पण जे कोणी कठोर निग्रहाने तिच्यावर हुकुमत गाजवतात ते परब्रह्माचा अनुभव घेतात. त्यांचा देहभाव क्षीण होत जातो, इंद्रिये विषयांपासून अलिप्त होऊ लागतात, कारण त्यांना “सोहंभावा”ची प्रतीति येऊ लागते (म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’ हा भाव).

एरव्हीं अर्जुना, ही इंद्रियें कुठल्याच साधनांच्या प्रयत्नाने ताब्यांत येत नाहीत. जे साधक इंद्रियांना आवरण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात, डोळ्यात तेल घालून अभ्यासाची पराकाष्ठा करतात, यम-नियंमांचे कुंपण घालून मनाला मुठीत ठेवायचा प्रयत्न करतात, त्यांनाही ही इंद्रियें कासावीस करतात. चेटकिणीने मांत्रिकालाच भुरळ घालावी तशी असतात ही इंद्रियें !

साधकांना ही ग्रासणारे हे विषय ऋध्धि-सिध्दींच्या रूपांत येतात. (म्हणूनच सद्गुरू आपल्या शिष्याला या ऋध्दिसिध्दींच्या कचाट्यांत न सापडण्यासाठीं वेळोवेळीं जागृत करत असतात ).
बाह्य स्वरूपातील इंद्रियदमन साधले तरी मनाने सुध्दा विषयांचा समूळ नायनाट करणे अत्यावश्यक ठरते. एक छान उपमा देतात. विषाचा लवलेश देखील संपूर्ण शरीराला तबाह करतो.
खरे तर असाच साधक खरा योगी म्हणतां येईल जो विषयसुखां पासून गंडवला जात नाही नि आत्मबोधामुळें अंतस्थ ईश्वराला कधीही विसरत नाही.

पुढचा श्लोक तर खूपच प्रसिध्द आहे, विशेषत: त्यावरील ज्ञानदेवांचें सुंदर निरूपण. (खरें तर पु.लं.नी त्यांचे संपूर्ण नाटक ‘तुझे आहे तुजपाशीं’ याच थीमवर बेतलेले आहे. असो !)

“ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते काम: कामातक्रोधोsभिजायते ॥६२॥”
(इंद्रियविषयांचे चिंतन करणाऱ्या पुरूषाला विषय आवडतात. त्या संगामुळे आसक्ती निर्माण होते. त्यातून वासना आणि वासनेला प्रतिबंध केला की क्रोध निर्माण होतो.)
“क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद्बुध्दिनाशो बुध्दिनाशात्प्रणश्यति  ॥६३॥
( क्रोधामुळे भ्रांती, भ्रांतीमुळे संशय नि बुध्दिनाश आणि बुध्दिनाशामुळे सर्वनाश संभवतो.)

माऊली सांगतात,
विषयसुखाची नुसती आठवण झाली तरी सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरूषाला तें सुख मिळवण्याची इच्छा होते. जिथे अशी वासना निपजते तिथे क्रोध दबा धरून बसलेला असतो. क्रोध आला की कर्तव्य वगैरे मागे पडून माणूस भ्रांत होतो, म्हणजेच त्याच्याजवळ तारतम्य राहात नाही. माणूस भ्रांतिष्ट झाला की स्मृती पांगळी होते. असा माणूस साहाजिकच केविलवाणा असतो. आंधळ्या सारखा तो सैरभैर होतो. त्याची बुध्दि त्याला दगा देते.

अर्जुना, एक लहानशी ठिणगी ज्वलनशील पदार्थावर पडली तर ती त्याला भस्मसात करते. अगदी तसेच, विषयांचे नुसते चिंतन मोठा अनर्थ घडवून आणते, त्या पुरूषाच्या अध:पतनास कारणीभूत होते.

आणि म्हणून सर्व विषयवासना मनातच येवू देऊं नयेत. त्यायोगें रागद्वेष सहजच नाहीसे होतील. असे पहा, आवड किंवा नावड मनातच नसली तर इंद्रियें विषय सेवन करत असली तरी त्यांत गुंतून पडत नाहीत. आकाशातला सूर्य आपल्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीला स्पर्ष करतो, पण त्यायोगे तिला चिकटून राहतो काय ? अगदी तसाच जो कुणी विषयभोगां विषयीं उदासीन असतो, आत्मानंदांत मश्गूल आणि काम-क्रोध विरहित असतो अशा मस्तराम पुरूषाची प्रज्ञा सुस्थिर झाली असे समजावे.

ज्ञानेश्वर महाराज योगयुक्त पुरूषाची लक्षणे सांगताना खरोखर अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात. त्याचे मूळ कारण त्यांचा स्वानुभव हेच आहे. ते रंगतदार निरूपण पुढील भागांत पाहूया !
(क्रमश:……



Sunday, March 11, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग नववा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग नववा)

सद्बुध्दि आणि दुर्बुध्दि यांवर सांगताना ज्ञानदेव म्हणाले की जरी मनुष्यप्राणी शास्त्रोक्त पध्दतीने धर्मकार्यें करत असले तरी एक मोठी घोडचूक करतात ती अशी की तीं सर्व कर्में ते स्वर्गसुखाच्या लालसेपोटीं करतात. विविध उदाहरणों देतात. जसे, कापुराचा ढीग रचावा नि तो पेटवून द्यावा ; किंवा गोडधोड पक्वान्नें तयार करून त्यांत विष कालवावे. अथवा, दैवयोगाने लाभलेला अमृतकुंभ लाथेने उलथून टाकावा ! अगदीं तसेच महत्सायासाने मिळवलेले पुण्य संसाराच्या सुखोपभोगात संपवून टाकणाऱ्या अशा लोकांना काय म्हणावें ! उत्तम, सुग्रास अन्न शिजवून पैशांसाठी ते विकून टाकण्यासारखा प्रकार आहे हा. अगदी तसे हे अविवेकी लोक आपले पुण्य व्यर्थ घालवतात.
तात्पर्य असे की वेदवचनांची पोकळ चर्चा करणाऱ्या मंडळींत देखील अशी दुर्बुध्दि असतेच ! असो.

आता अधिक गहन निरूपण करतात ज्ञानदेव.
ते सांगतात, वेद हे त्रिगुणांनी युक्त असे आहेत, मात्र उपनिषदें तेवढीं सात्विक आहेत. अर्जुना, उपनिषदां व्यतिरिक्त वेदांचा जो भाग आहे त्यांत स्वर्गप्राप्ती किंवा ऐहिक सुखांसाठी सकाम उपासना सांगितली आहे. अशा कर्मांकडे तुझे मन वळवू नकोस. तिन्ही गुणांचा त्याग कर ; मी माझे म्हणण्याचा सोस सोड, मात्र अंतर्यामी दडलेल्या आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.
वेदांनी अनेक मार्ग सुचवले असले तरी आपल्या हिताचें तेवढे घ्यावे. सूर्य उगवल्यावर चौफाळ्यावर चार रस्ते दिसले तर आपण चारही वाटा चोखाळतो काय ?  सगळीकडे भरपूर पाणी साठवलेले असले तरी आपण गरजेपुरतेच घेतो ना ?
तसेंच, जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदवांग्मय अभ्यासून केवळ निष्काम कर्म, उपासना नि आत्मज्ञान यांनाच ग्रहण करतात.
म्हणून अर्जुना, प्राप्त परिस्थितींत तुला ‘स्वकर्म’ करणेच श्रेयस्कर आहे. कसेही करून आपले ‘विहित कर्म’ सोडू नकोस. शिवाय, कर्मफळाची आसक्ती नको नि वाईट अर्थात् निषिध्द कर्माची संगत तर नकोच नको.
अर्जुना, तूं समत्वरूपी योग आचरायला हवा. म्हणजेच कर्मफलाची अपेक्षा न धरतां सतत कार्यमग्न राहा. आणि तूं आरंभलेले कर्म जर सुदैवाने ज्ञानप्राप्तीचे फळ देवून गेले तरी त्याचा जल्लोष नसावा. काही कारणाने आरंभ केलेले कार्य अर्धवट राहिले तर त्याचाही क्षोभ नसावा. यालाच म्हणतात चित्ताचें समत्व. (समत्वं योगमुच्यते !)
आरंभ केलेले कार्य सुफलित झाले तर ते सार्थकीं लागले असे समजावे नि अपूर्ण राहिले तरी ते पूर्ण समजावे कारण हातीं घेतलेले कोणतेही कार्य ईश्वरार्पण  केले तर ते पूर्णच ठरते. श्रेष्ठ पुरूष अशा खंत-आनंद विरहीत कर्माची कायम वाखाणणी करतात.

काही सुंदर ओव्या पुन्हा एकदा –
“अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचे ।
जेथ मन आणि बुध्दीचें । ऐक्य आथी.  ॥
(मन नि बुध्दीचे ऐक्य होणे खरोखर विरळाच. एक स्नेही म्हणत, “योग्य कळते पण करत नाही ; अयोग्य पण कळते मात्र केल्यावाचून राहावत नाही.” किंवा, “सोचते हैं वह करते नही, लेकिन करते है बिना सोचे !”) असो.
“ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां   ॥”
( ते कर्मासक्त तर असतातच, पण कर्मफलाची अपेक्षा बाळगत नाहीत. म्हणून ते जन्म-मरणाच्या चक्रातून सुटतात आणि निरामय असे अढक्षपद मिळवतात. त्यांना आम्ही ‘बुध्दियोग युक्त’ असे संबोधतो धनुर्धरा !)

तूं जेव्हा असा होशील तेव्हा सर्व प्रकारच्या मोहबंधांतून सुटशील नि तुझ्यांत खऱ्याखुऱ्या वैराग्याचा संचार होईल. एकदा वैराग्य स्थिरावले की मग निष्कळंक आणि गहन असे ‘आत्मज्ञान’ आपोआप प्रकट होईल. यामुळे तूं साहाजिकच निरीच्छ, विरक्त होशील.
अर्जुना, अशी अवस्था आल्यावर अधिक काही जाणावें किंवा मागचे काही आठवत बसावें हा हव्यास राहणार नाही. इंद्रिय-जनित भोगांना सोकावलेली बुध्दि पुन्हा एकदां निष्काम कर्मांमुळे आपल्या मूळ आत्मस्वरूपांत स्थिर होईल. आत्मज्ञानांत स्थिरावलेली बुध्दि साहाजिकच समाधीसुखांत रमेल नि तुला आत्मानंदाचा, म्हणजेच ब्रह्मानंदाचा निरंतर प्रत्यय येत राहील. तीच खरी योगावस्था होय.

अर्जुनाला हे सर्व तत्वज्ञान ऐकून साहाजिकच अधिक जाणून घ्यायची उत्कंठा निर्माण झाली, म्हणून तो श्रीकृष्णाला विनवतो की याच अनुषंगाने मला काही विचारायचे आहे, त्याविषयीं हे कृपानिधे, तुम्ही मला सांगाल काय ? तेव्हा प्रसन्न होत्साते श्रीअच्युत त्याला म्हणतात होय अवश्य. तुला जे काही विचारायचे आहे ते खुशाल नि:संकोचपणे विचार.

आता अर्जुन भगवंताला “स्थितप्रज्ञ” म्हणजे काय, तो कसा असतो वगैरे खंडीभर प्रश्न विचारेल. तो भाग पुढे येईल.
(क्रमश:……



Saturday, March 10, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग आठवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग आठवा)
भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला आतांपर्यंत “सांख्य-स्थिति” म्हणजे आत्मज्ञानाचें स्वरूप थोडक्यांत समजावून सांगितले. सांख्यस्थिति म्हणजे सांख्यमार्ग किंवा ज्ञानमार्ग ; सांख्ययोग नव्हे.
म्हणून आतां बुध्दियोग अर्थात् सांख्ययोग किंवा ईश्वराचा ऐश्वर्ययोग सविस्तरपणें सांगतील. ज्याला हा बुध्दियोग अथवा निष्काम कर्मयोगाची बुध्दि साधली तो सर्व कर्मबंधनांतून मुक्त झाला, असे श्रीज्ञानदेव म्हणतात. उदाहरण देतात वज्रकवच म्हणजेच चिलखत धारण करून रणांगणावर उतरण्याचे, जेणेंकरून शस्त्रवर्षाव सहजपणे झेलत असतानाच तो योध्दा कोणतीही इजा न होतां यशस्वीपणे बाहेर पडतो. अशा निष्काम कर्मयोगाच्या युक्तीमुळे प्रापंचिक जीवनात तर अडचण येत नाहीच, पण पारमार्थिक मोक्षदेखील सहजसाध्य होतो.
आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य-कर्म तर करावेच, पण कर्मफलाची आसक्ती नसावी, जशी मांत्रिकाला पिशाच्चबाधा संभवत नाही. निष्काम कर्म करण्याची सद्बुध्दी झाली की विषयांचे जंजाळ जवळ असूनही त्याचा उपसर्ग होत नाही. अशा बुध्दींत सकाम पुण्य किंवा पापाला प्रवेश नाही, कारण ती अतिसूक्ष्म अशा ‘एकतत्वा’त स्थिरावलेली असते. म्हणून तिच्यावर सत्व-रज-तमादि त्रिगुणांचा लेप लागत नाही. अर्जुना, ती सद्बुध्दि आपल्या पूर्वपुण्याईने हृदयांत थोडीतरी उत्पन्न झाली तर जन्ममृत्यूरूपीं प्रपंचाची भीती नष्ट होते.

(खूपच भारी होतंय् नाही हे सर्व समजायला ? आपण निदान दिवाणखान्यात आरामात बसून हे वाचतो किंवा ऐकत आहोत. त्या बिचाऱ्या अर्जुनाचा विचार करून बघा ! तो तर डोक्याला हात लावून विमनस्क स्थितींत बसलाय् हे सर्व तत्वज्ञान ऐकत !! ) असो.
पुढे  पुन्हा एक चांगला श्लोक येतो, आपल्याला कदाचित् सहज समजेल असा. नि तो आहे,
 “व्ययसायात्मिका बुध्दिरेकेह कुरूनंदन । बहुशाखा:च अनंता: बुध्दयोsव्यवसायिनाम् ॥४१॥”
 (अर्जुना, या मोक्षमार्गावर निश्चयात्मक बुध्दी एकच आहे आणि ध्येयही एकच आहे ; परंतु अनिश्चयी वृत्तीच्या बुध्दीला अनेक भेदयुक्त फाटे फुटलेले असतात. )

समजतंय् काही ? असू देत. ज्ञानदेव यांवर काय म्हणतात ते पाहू.

‘जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सदद्बुध्दि हें थेकुटी । म्हणों नये ॥”  पणती किंवा निरांजनाची ज्योत लहानशी असली तरी बक्कळ प्रकाश देते. अगदी तसेच फलाशा न बाळगणारी सद्बुध्दि अपवादाने अनुभवास आली तरी तिचा प्रभाव थोर असतो, तिला झिडकारू नये. ती खरोखर दुर्लभ असते, जसे सगळेच दगड काही परीस नसतात, किंवा अमृताचा एखादा थेंब मिळवायला भाग्य लागते. गंगा जशी समुद्रात विलीन होते, तशी ईश्वरचरणीं लीन होणारी बुध्दीच सद्बुध्दि होय.

दुसरी जी दुर्बुध्दी, ती अनेक प्रकारे विस्तारते आणि तिच्यात अविवेकी लोक अखंडपणे रममाण होतात. आणि म्हणून असे अविचारी लोक स्वर्ग, प्रपंच नि नरकाची अवस्था यांत गुरफटून जातात. त्यांना आत्मसुखाचा आनंद नि अनुभव उपभोगता येत नाही. वेदांचे प्रमाण देऊन आपले मत मांडणारे किंवा कर्मसिध्दांत सांगणारे फलप्राप्तीची आस बाळगून असतात.
इहलोकीं जन्म घ्यावा, यज्ञ-दान इत्यादि कर्में करावीत आणि मग मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा, कारण या पृथ्वीतलावर अशा स्वर्गसुखावाचून दुसरे सुख असूच शकत नाही असे बोलतात. ते निखालस दुर्बुध्दि होत अर्जुना !
असे लोक मन मानेल तसे केवळ फळाच्या आशेनें कर्में करतात. अनेक प्रकारची व्रत वैकल्ये, धर्मग्रंथांत सांगितल्याप्रमाणे विधिपूर्वक करतात. मात्र एकच घोडचूक करतात. स्वर्गाची कामना मनांत ठेवून केल्यामुळे ते सर्व  व्यर्थ ठरते. श्रमपूर्वक मिळवलेले पुण्य केवळ प्रापंचिक सुखाची इच्छा धरल्यामुळे का वायां घालवतात ? ही तर नि:संशय दुर्बुध्दीच !

सद्बुध्दि नि दुर्बुध्दीचा अशाप्रकारें उहापोह केल्यानंतर भगवन्त आता अर्जुनाला म्हणजेच आपल्याला कसे असावे, काय करावे नि काय करूं नये याचे निश्चित असे मार्गदर्शन करतील. गीता-ज्ञानेश्वरीतला तो भाग अतिशय महत्वाचा आहे. सबब आपण ताजेतवाने होऊन ते सर्व पुढील भागांत अभ्यासूं.
(क्रमश:…….


Friday, March 09, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सातवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सातवा)

भगवंत अर्जुनाला परोपरीने युध्दाला पुन्हा सामोरे होण्यासाठीं प्रवृत्त करताहेत. क्षत्रियांना धर्मयुध्द करणे हे शास्त्रविहीत असून तो तर त्यांचा स्वधर्म असतो, आणि प्रत्येक पुरूषाने त्याच्या वाट्याला आलेले कर्म हे कर्तव्यबुध्दीने केलेच पाहिजे असे आग्रहाने ते अर्जुनाला बजावतात.

मात्र त्याचबरोबर अर्जुनाला कानपिचक्या देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित चालूं आहेच. ते ठणकावून सांगताहेत की अशा संग्राम समयीं अंत:करण द्रवीभूत होणे सर्वथा अयोग्य आहे. ते म्हणतात की नवज्वर (टायफॉइड) झालेला असतांना गोक्षीर म्हणजे दूध देखील विषाप्रमाणे होते, अगदीं तसेच भलत्या वेळीं भलतेच वागण्याने स्वहितावर गंडांतर येते. तस्मात् अजून तरी सावध हो. आपला स्वधर्म पाळला तर कधींच दोष लागत नसतो. वाट सरळ असेल तर, किंवा हातीं दिवा घेऊन अंधाऱ्या वाटेवर बिनधास्त चालता येते. त्याचप्रमाणें स्वधर्मपालन केले तर सगळी मनोवांछित कर्में सुफलितच होत असतात. तुम्हां क्षत्रियांसाठीं तर युध्दाव्यतिरिक्त अन्य काहीच उचित नाही. मनामधें कोणाविषयींही कपट न बाळगतां तूं समोरासमोर निकराने लढले पाहिजेस. सूज्ञास अधिक सांगणे नलगे, उगाच लांबण कां लावूं ?

अरे, असे युध्द खरें तर तुम्हां क्षत्रियांसाठी दैवी देणगी म्हणून उभे ठाकले आहे, अक्षरश: सर्व धर्माचा हा खजिना उघडलाय् तुमच्यासाठी. प्रत्यक्ष स्वर्ग उतरलाय् तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठीं. अथवा, तुझ्या गुणांवर आसक्त झालेली कीर्ती तुझ्याशीं स्वयंवर लावण्यासाठी आली आहे ! अगणित पुण्य असेल तरच क्षत्रियांना अशा प्रकारच्या युध्दाची संधी लाभते.

पुढे खूपच मनोरंजक उपमा देतात ज्ञानदेव !
सरळ रस्त्यांने चालताना अचानक ‘चिंतामणी’ला अडखळून पडावें नि सर्व मनोकामना सहज पूर्ण व्हाव्यात किंवा जांभई साठी तोंड पसरावें नि अचानक त्यांत अमृत पडावें, तसे हे युध्द तुम्हाला अनायासें प्राप्त झाले आहे.
आणि म्हणूनच, तूं जर आत्तां शस्त्रें टाकून शोक करत बसलास तर स्वहिताचा नाश केल्यासारखे होईल. पूर्वजांनी मिळवलेल्या कीर्तीचा बट्ट्याबोळ होईल. शिवाय तुझी अपकीर्ती होईल, जग तुला लाथाडेल नि महादोष तर तुला शोधत येतील !
जशी एखादी विधवा स्त्री सर्वांकडून अपमानित होत राहते, तशी दशा स्वधर्माचा त्याग केला तर त्या जीवाची होते. किंवा, जंगलांत पडलेल्या प्रेताला गिधाडे जशी फाडून टाकतात तसे स्वधर्मरहित माणसाला महापापें व्यापून टाकतात.

आणि म्हणून अर्जुना, स्वधर्म टाकशील तर पापाचा धनी होशील नि अपकीर्ती युगान्तापर्यंत जाणार नाही.

“”जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ती आंगा न पवे ।””
(जोंवर अपकीर्तीचा कलंक अंगाला लागत नाही तोंवरच शाहाण्यानें जगावें). लोक खूप प्रयत्न करून, कष्ट करून, प्रसंगीं जीव घालवून आपली कीर्ती वाढवतात ते उगाच काय ?

“”म्हणोनियां पार्था । हेतु सांडेनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥””
 “सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावें । मनामाजी. “
“आपणयां उचिता । स्वधर्मे राहाटतां । जें पावे ते निवांता । साहोनि जावें ॥”
“ऐसिया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावं । निभ्रांत तुवां ॥”

एषा तेsभिहिता सांख्ये बुध्दिर्योगे त्विमां शृणु । बुध्द्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥३९॥
(येथपर्यंत मी तुला आत्मज्ञान विषयक विचार सांगितला, ज्या योगें मनुष्य निष्काम कर्म करतो. त्या योगाची महती ऐक. पार्था, या बुध्दीने युक्त होऊन तू कर्में करशील तर त्यांच्या बंधनांतून मुक्त होशील.)

भगवंतांनी ही ‘सांख्यस्थिति’ अर्जुनाला थोडक्यांत सांगितली. आतां बुध्दियोग विस्तारपूर्वक सांगतील.
(क्रमश:……


 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सहावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सहावा)

“अविनाशी तु तद्विध्दि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति.  ॥१७॥”
(जें सर्व विश्व व्यापून आहे ते अविनाशी असते हे ध्यानांत असू देत. कारण अविनाशी वस्तूचा कोणीही नाश करू शकत नाही. )

वरील श्लोकाचे विवेचन आपण आधी पाहिले आहेच. याच अनुषंगाने पुढचा श्लोक महत्वाचा ठरतो.

“अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
 अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत ॥१८॥
(आत्मा अविनाशी, नित्य, अचिन्त्य आहे. त्याचे भौतिक शरीर स्वभावत: नाशवंत, अनित्य आहे. म्हणून हे भारता (अर्जुना), तूं युध्द कर. )

श्लोकार्थ सुध्दा जरा अवघड आहे याची नोंद घेत पुढे जाऊं.

अरे, हे शरीर वगैरे सर्व काही स्वभावत:च नाशवंत आहे. सबब तूं युध्दाला सामोरे जावेस हेच उचित ठरेल. खरे तर निव्वळ देहाभिमानामुळे शरीराकडे पाहण्याची तुझी दृष्टी सीमित झाल्याने “मी मारणारा नि हे मरणारे” असा तुला अहंगंड झाला आहे. मात्र तुझ्या लक्षातच आलेले नाही की तात्विक दृष्ट्या तूं यांना मारणार नाहीस किंवा हे मारले जाणार नाहीत.

स्वप्नांत पाहिलेल्या गोष्टी स्वप्नातच खऱ्या वाटतात, पण जाग आल्यावर त्यांचा मागमूसही राहात नाही. अगदी तसेच ही सगळी माया आहे हे आधी ध्यानांत घे. तूं निष्कारण भ्रमांत वावरतो आहेस. सावलीवर शस्त्राचे घाव घातले तरी मूळ शरीराला काहीच होत नाही. किंवा, पाण्याने भरलेला कुंभ कलंडून सर्व पाणी वाहून गेले की त्यांतील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते. पण म्हणून सूर्य नाहीसा होतो काय ?
अगदीं तसेच, देह नष्ट झाला तरी ‘आत्मरूपा’चा नाश होत नसतो. म्हणून अर्जुना, सत्य स्वरूपावर तुझ्या भ्रामक विचाराचा आरोप करूं नकोस. जुनेर, फाटके वस्त्र टाकून नवीन कपडे चढवावेत, तसा हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण शरीर टाकून केवळ नवीन शरीर स्वीकारतो.

पुढच्या दोन श्लोकांवर अगणित भाष्यें आपण अनगिनत वेळां ऐकली आहेत ! “वासांसि जीर्णानि….. आणि “नैनं छिन्द्न्ति” …..!

तरी पण माऊली याचे विवरण करतात एका वेगळ्याच घाटणींत. “आत्मा आत्मा” म्हणतात ती काय चीज आहे ? ते सांगतात की आत्मा हा अनादि, नित्यसिध्द नि अतीव शुध्द असून त्याचा शस्त्रादिकांनी छेद करता येत नाही. हा प्रलयकाळच्या अथांग पाण्यातसुध्दां बुडत नाही की याला आगीत जाळतां येत नाही. मारूताचा म्हणजे महाभयंकर सोसाट्याचा वारादेखील याला सुकवूं शकत नाही. अर्जुना, हा नित्य, शाश्वत, अचल आणि सगळीकडे पूर्णपणे व्यापून असलेला असा आहे.
याला तर्काच्या दृष्टीने पाहू गेले तरी तो दृष्टीपथांत काही केल्या पडत नाही. अगदी ध्यान-धारणेच्या माध्यमातूनही याचे दर्शन दुरापास्त ठरते. मनाने याची कल्पना करता येत नाही. कोणत्याही साधनेद्वारा तो प्राप्त करता येत नाही. अर्जुना, हा अनंत असीम असा उत्तम पुरूष होय. याला त्रिगुणांची बाधा नाही. तो अनादि असून अविकारी आहे. कोणत्याही आकारा पलीकडचा सर्वरूप आहे तो ! अर्जुना, या आत्म्याला केवळ अशाप्रकारें ओळखतां येईल. तो सर्वात्मक असल्याची प्रचीती घ्यावी, म्हणजे मग तुझा विषाद सहजपणे घालवतां येईल.
तथापि, तूं वर सांगितले तसे आत्म्याचा देखील नाश करता येईल असे अजूनही समजत असशील, तरी त्याची खंत बाळगण्याचे काहीच प्रयोजन नाही.

असे पहा, गंगेचा ओघ उगमापासून समुद्रापर्यंत अखंड, अस्खलित, चिरंतन चालू असतो तसाच आत्म्याची उत्पत्ती, स्थिति नि लय असा क्रमप्रवाह अविरत चालूंच असतो. आणि हा जीवनक्रम सर्व प्राणीमात्रांच्या बाबतींत कायम घडत राहतो, त्यांत कोणत्याही काळीं कुठलाच खंड पडत नाही. तुझ्या मनाला हें सर्व पटत नसले तरी प्रत्येकालाच जन्ममृत्यू अटळ आहेत हे मात्र विसरू नकोस.

‘उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमें गा ॥’ घटिकायंत्र म्हणजे वाळूचें घड्याळ. दर तासाला याला फिरवावें लागे. अगदी तसेच जे जे उद्भवते ते ते नाश पावतेच. किंवा, जसे सूर्योदय नि सूर्यास्त आपोआप अव्याहतपणे चालूं असतात, तसेच जन्ममरणाचे राहाटगाडगे या जगात अपरिहार्यपणे फिरत राहते. महाप्रळयाचे वेळीं त्रैलोक्याचा पुन:पुन्हा संहार होतो, पण हा ‘आदि अंतु’ काही केल्या टाळतां येत नाही !  म्हणून, हे सर्व जर तुला पटत असेल तर खेद करायचे काहीच कारण उरत नाही. मात्र तूं जाणूनबुजून वेड पांघरत असशील (तर मात्र माझा नाईलाज आहे )!

आतां पुन्हा एक महत्वाचा श्लोक येतो,
 “अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
 अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिवेदना.    ॥२८॥
(अर्जुना, सर्व प्राणिमात्रांची शरीरें जन्मापूर्वीं अव्यक्त असतात, जन्मानंतर व्यक्त होतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त होतात. तर मग याचा शोक करण्याची गरज आहे का ?)

सगळे प्राणी जन्म होण्यापूर्वी अमूर्त म्हणजे निराकार किंवा अव्यक्त असतात नि जन्मानंतर मूर्त रूप म्हणजे शरीर धारण करतात. मृत्यूनंतर त्यांचे शरीर नाहीसे होते आणि दुसरे रूप न घेतां ते पुन्हा आपल्या अमूर्त किंवा अव्यक्त अवस्थेंत परत जातात.
आतां, जन्म नि मृत्यूच्या मधील जी स्थिति दिसते ती निजलेल्याच्या स्वप्नासारखी असते. खरें तर मायेच्या प्रभावामुळे सत्य-स्वरूप म्हणजेच निराकार आत्म्यावर लादलेला आकाराचा तो भास आहे. यालाच अध्यास असेही म्हणतात.

“तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रूदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥”    अरे जे मुळात झालेच नाही, त्यासाठीं काय म्हणून रडत बसला आहेस ? त्या ऐवजीं नीट समजून घे की हे निर्विकार चैतन्य अवीट म्हणजे कधीही नाश न पावणारे असे आहे.
याच चैतन्याच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी संतमंडळी सर्व ऐहिक विषयांना बगल देतात, विरक्त मंडळी वनवास पत्करतात.

वरील सर्व विवरण पचायला जरा अवघड आहे याची पूर्ण जाणीव असल्याने तूर्त स्वल्पविराम देतो. मात्र पुढच्या श्लोकांत भगवंत “स्वधर्म” या अतिमहत्वाच्य् विषयाला स्पर्ष करतील आणि ज्ञानदेव त्याचे मर्म आपल्याला समजावून सांगतील. तें वर्णन पुढील भागांत ! (क्रमश:….)


Tuesday, March 06, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पाचवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पाचवा)
अर्जुन-विषाद अजून संपत नाही हे पाहून भगवंत आता अर्जुनाची कठोर शब्दांत कानउघाडणी करतील. दोन्ही सैन्यांच्या मध्ये हताशपणे बसलेल्या अर्जुनाला हसल्यासारखे करून श्रीकृष्ण म्हणतात,
“अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्व नानुशोचन्ति पंडिता: ॥” (ज्या विषयीं शोक करू नये, त्याबद्दल तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या गोष्टी करतोस ! कारण पूर्ण ज्ञानी पुरूष मेलेल्या तसेच जीवंत दोघांविषयी शोक करीत नाहीत. )

भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू या लढाईच्या धामधूमीत भलताच विषय उकरून काढलास याचे मला खरंच आश्चर्य वाटतंय् . तू स्वत:ला बुध्दिमान समजतोस पण मूळ अज्ञान झटकुन टाकणे तुला साधलेच नाही. त्यातही तुला काही शिकवूं म्हटलें तर तूंच आम्हाला शहाणपण सांगू लागतोस. एखादा आंधळा माणूस जर भ्रांतिष्ट झाला तर तो जसा सैरावैरा धावूं लागेल, तसे आहे तुझे शहाणपण ! तूं स्वत:लाच नीटपणे जाणत नाहीस नि त्या कौरवांची काळजी करत फिरतो आहेस. याचेच मला पुन:पुन्हा नवल वाटतेंय.
मला सांग, तुझ्यापासून हे त्रैलोक्य निर्माण झालेंय, की ही अनादिपासूनची विश्वरचना फोल आहे? एकाच आदिपुरूषापासून सगळे प्रणी निर्माण झाले असे जे मानले जातें या जगात, तें धादांत खोटे ठरते काय ? आत्तां जे कुणी आहेत ते आणि जे कुणी जन्मतील त्यांचा सृजनकर्ता अथवा जे मरतील त्यांचा विनाशक तू आहेस काय ? तूं भ्रमाने नि अहंकारापोटीं ज्यांना मारणार नाही असे म्हणतोस, ते कधी मरणारच नाहीत काय ? तुझा हा भ्रम आहे की कुणी एक मारणारा नि इतर मरणारे आहेत. हे येणेजाणे, जन्म-मृत्यू अव्याहत आणि स्वाभाविकपणे चालत आलेले आहेत, मग तुला त्याचें दु:ख कशापायीं ? तरी पण तूं मूर्खासारखा, समजून न घेतां चिंता करू नये त्याची चिंता करतो आहेस आणि वर मलाच नीतिमत्ता शिकवतोस ! जे विचारवंत, विवेकवंत, सारासार जाणणारे ज्ञानी असतात ते या ‘येण्या-जाण्याला’ केवळ आभास म्हणत त्याचा विचार करीत नाहीत.

जमके पिटाई हो रही है इस वक्त अर्जुन मियां की ! असो.

पुढे म्हणतात, अर्जुना, अजून ऐक ! इथें तू, मी आणि हे सगळे राजेरजवाडे
आहोत त्या स्थितींत राहूं किंवा न राहूं. ‘असणे’ किंवा ‘नसणे’ या भ्रामक कल्पनांचा नाश केला तर त्या दोन्ही कल्पना चुकीच्या असल्याचे कळून येईल.

जे काही निर्माण होते किंवा नाश पावते, ते अज्ञानापोटीं किंवा ‘माये’मुळे ‘दिसतें’ अथवा भासमान होते. खरें तर ती ‘वस्तू’ नाशरहित आहे. (“वस्तू” म्हणजे आत्मा, परब्रह्म वगैरे.) एका सोप्या उदाहरणाने स्पष्ट करतात. असे पहा, वाऱ्यामुळे पाणी हलतें नि तरंग तयार होतात. अशावेळी नवीन असे काय जन्मलें ? वाऱ्याचे वाहणे थांबले की पाणी पुन्हा सपाट होते;  तर मग, कशाचा नाश झाला?
किंवा, शरीर एकच असले तरी वयाप्रमाणे त्यात भेद जाणवतो. बाल, तरूण, वृध्द ही सगळी एकाच शरीराची स्थित्यंतरें नाहीत काय ? त्या स्थित्यंतरां दरम्यान शरीर काही नाश पावत नाही.
अगदीं तसेच, चैतन्याच्या बाबतींत घडते. शरीरें येतात-जातात पण  चैतन्याचा नाश होत नाही. आणि हे जो पूर्णपणें जाणतो त्याला व्यामोह-दु:ख म्हणजेच भ्रांती नि अज्ञानामुळे होणारे दु:ख देखील नाही.

आतां अज्ञानाचें मूळ सांगतात, नि ते आहे इंद्रियाधीनता ! खरोखर, इंद्रिय सुखांच्या ओढीपोटी मन, बुध्दी, चित्त नि अहंकार त्यांत पूर्णत: गुंतून राहतात नि उरतो केवळ भ्रम. इंद्रियें विषयसुख किंवा त्यांपोटीं येणारे दु:ख भोगतात. बरें, या विषयांमध्येही एकवाक्यता नसते ; थोडे सुख नि जास्त दु:ख हाच सर्वसाधारण अनुभव असतो.

शब्दांचीच व्याप्ती पहा. निंदा आणि स्तुति रोष अथवा लोभ निर्माण करतात. मृदुता नि काठिण्य हे स्पर्षाचे गुणधर्म, जे संतोष किंवा खेद उपजवतात. भयानक किंवा सौंदर्य हे रूपाचे गुण, ज्यांमुळे भीती अथवा प्रीतीचा उदय होतो. त्याचप्रमाणे सुगंध किंवा दुर्गंध आनंद अथवा किळस निर्माण करतो. जिभेला कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट किंवा बेचव कळते नि त्यानुसार आपण त्या रसाचा आस्वाद घेतो किंवा तिटकारा करतो !

तात्पर्य असे की माणूस इंद्रियांच्या स्वाधीन झाला की त्याला सुखदु:खाचा अनुभव येतोच येतो आणि तो आपोआप सुखदु:खाच्या आवर्तांत ओढला जातो. विषयांवाचून दुसरे काहीच सुखावह नाही असे भासवण्याचा इंद्रियांचा गुणविशेष आहे.

आणि हे विषय तरी कसे आहेत ? मृगजळ किंवा स्वप्नात पाहिलेल्या गजांतलक्ष्मी सारखे केवळ भासमान ! हे खरोखर अल्पजीवी आहेत. त्यांना झटकून टाक, त्यांचा मुळीसुध्दा संग करू नकोस. ज्यांच्यावर विषयांची सत्ता चालत नाही त्यांना सुखदु:खांचा स्पर्षही होत नाही की गर्भवासही पुन्हा घडत नाही. पार्था, जो इंद्रियसुखांपासून अलिप्त असतो तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे समज.

लई भारी होतंय् नाही ! फिर भी आगे बढें क्या ? कारण आता भगवंत जे सांगतील त्यांत अध्यात्माचे जणूं सार सांठवले आहे !

भगवंत म्हणतात, हे पार्थ ! तत्वज्ञानी पुरूष पूर्ण विचार केल्यावर एक तत्व निखालसपणे जाणून घेतात, ते असे की या जगांत एकुलते एक ‘चैतन्य’च केवळ भरलेले आहे, जे अदृष्य स्वरूपात गच्च भरून असते.
तत्वज्ञानी पुरूष ते कसे जाणून घेतात याचे बहारदार उपमांनी ज्ञानदेव वर्णन करतात. उदाहरणार्थ, दूध नि पाण्याच्या मिश्रणातून राजहंस केवळ दूध निवडून काढतो. किंवा, चाणाक्ष सुवर्णकार अग्नीमध्ये जाळून सुवर्णातील हिणकस गदळ दूर करीत शुध्द सोनें मिळवतो. अथवा, बुध्दीचा वापर करीत दही घुसळून लोणी काढतां येते, किंवा कोंडायुक्त धान्य वाऱ्यावर धरून उपणले की सारभूत असलेले वजनदार धान्य खाली उरते नि पोकळ असलेले फोलकट वाऱ्याबरोबर उडून जाते.
अगदीं तसेच, प्रपंच मिथ्या आहे असे अनुभवांतीं जाणून ज्ञानी किंवा तत्वदर्शी पुरूष त्याचा त्याग करतात आणि त्यांना ‘सत्य-वस्तू’ ची प्राप्ती घडते. याचे मुख्य कारण म्हणजे ‘उपाधी’ आणि ‘चैतन्य’ यांतील फरक त्यांना समजलेला असतो. उपाधी ही नेहमीच अनित्य, अशाश्वत तर चैतन्य म्हणजे नित्यसिध्द, शाश्वत होय. एक आहे ‘असार’ म्णजे मिथ्या तर दुसरे आहे ‘सार’ म्हणजे स्वाभाविकपणें नित्य असलेले.
खरें तर या त्रिभुवनांत जे दृष्यरूपात विनटलेले अतिसूक्ष्म चैतन्य आहे त्याला नाव, रंग, रूप वगैरे लक्षणें नाहीत. तें सर्वव्यापक, जन्ममृत्यूरहित, अविनाशी असल्याने करूं म्हटले तरी त्याचा नाश करणे शक्य नाही.

पुढच्या श्लोकांत सर्व विश्वाला व्यापून असणाऱे चैतन्य कसे अविनाशी आहे नि अविनाशी तत्वाचा नाश कसा असंभवनीय असतो हे मोठ्या खुबीने समजावून सांगतील भगवंत ज्ञानदेव ! (क्रमश:……


Saturday, March 03, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चवथा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चवथा)
त्या शोकाकुल, रूदन करणाऱ्या अर्जुनाला आता भगवंत बुध्दियोग, ऐश्वर्ययोग किंवा सांख्ययोगाची महती सांगतील. खरें तर आपण सर्व अर्जुनच आहोत हे लक्षात यायला कित्येक दशकें निघून जातात. नि मग अचानक हा ग्रंथ हातीं येतो आणि त्याचबरोबर त्यांतील वैषिष्ठ्यें समजावून सांगणाऱ्या अधिकारी व्यक्ती आपसूक सामोऱ्या येऊं लागतात. या विलक्षण योगायोगांचे खरेच नवल वाटते. असो.

संजय धृतराष्ट्राल् सांगतोय की अर्जुनाचे धैर्य त्या सर्वांना पाहून विरघळून गेले, जसे मीठ पाण्यात पडताच विरघळते किंवा वारा अभ्र पटलांना विरवून टाकतो. चिखलांत रूतलेल्या राजहंसाप्रमाणे तो अर्जुन केविलवाणा झाला. अशा जर्जर झालेल्या अर्जुनाला श्रीशारंगधर म्हणाले की अर्जुना तुझे हे आर्य संस्कृतीला न शोभणारे वर्तन स्वर्गप्राप्तीला बाधा आणणारे आणि अपकीर्ती पसरवणारे आहे. असे अयोग्य विचार या युध्दप्रसंगीं तुझ्या मनांत आलेच कसे? तू तर कधीही अनुचिताला थारा देत नाहीस आणि आपले धैर्य सोडीत नाहीस. अपयश तुझे नाव घेताच कुठल्याकुठे पळून जाते. शूरवृत्ती तुझ्या कह्यात असते नि क्षत्रियांचा तू राजराजेश्वर आहेस. तुझ्या शौर्याचा डंका तिन्ही लोकांत दुमदुमत असतो. ‘तो’ तू आज वीरवृत्तीला सोडून खालीं मान घालून रडत बसला आहेस ! आतां तरी सर्व धीर एकवटून मनाला पुन्हा उभारी येवू देत. हा मूर्खपणा सोडून हातात धनुष्यबाण घे ; युध्दप्रसंगीं असे कारूण्य अजिबात योग्य नाही. तूं जाणता म्हणजे शाहाणा आहेस. युध्दाच्या वेळी असले वागणे अयोग्य असल्याचे तुलासुध्दा माहीत आहे. यामुळे असलेला लौकिक तर जाइलच पण परलोकातही अडथळा निर्माण होईल.  म्हणून अर्जुना, हा अविचार सोड आणि पुन्हा लढाईसाठी सज्ज हो. अरे, हे सगेसोयरे आज अचानक उद्भवलेत काय ? कीं हे युध्द तुझ्यावर आजच लादले गेलेय् ?

अशा रीतीने तो दयाळू ईश्वर अर्जुनाला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतोय नि म्हणून अर्जुन प्रतिप्रश्न करीत म्हणतो की देवा, ही साधीसुधी झुंज नसून फार मोठी घोडचूक आहे. हे भीष्मद्रोण मातापित्यांसमान वंदनीय आहेत, त्यांचाच वध करूं ? ज्यांनी माझ्यावर अगणित उपकार केले, धनुर्विद्या शिकवली, त्यांनाच मारणारा मी काय भस्मासुर आहे?

असं पहा देवा, समुद्र शांत नि गंभीर असतो हे खरें असले तरी द्रोणाचार्यांना क्षोभ तर माहीतच नाही. ते कायम धीरगंभीरच असतात. एकवेळ अमृत नासेल किंवा कालांतराने वज्रही मोडेल, पण त्यांच्या मन:शांतीमध्ये तसुभरही विकार संभवत नाहीत. ते सर्व सद्गुणांचे नि विद्यांचें आश्रयस्थान आहेत नि माझ्यावर त्यांची आत्यंतिक कृपा आहे. असे असतांना मी त्यांचाच घात चिंतूं ?
अशा थोरथोर व्यक्तींना मारून आपण राज्यसुख भोगावे हे मला अजिबात पटणारे नाही. त्यापरीस हा देश सोडून रानावनांत हिंडत भिक्षा मागून जगणे मला श्रेयस्कर वाटेल !

हे सगळें श्रीकृष्णाने ऐकून न ऐकल्यासारखे केले, म्हणून अर्जुन मनातून चांगलाच भ्यायला. खरंतर मनांतील मळमळ त्याने स्पष्ट शब्दात मांडली होती देवासमक्ष. म्हणून तो पुन्हा अजीजीने बोलू लागला की देवा, उचित-अनुचित तुम्हीच योग्यप्रकारें जाणतां. मी मोहग्रस्त झालोंय् हे मला कळतेंय्, म्हणून हिताहित मला समजत नाही म्हणून श्रीकृष्णा, मला योग्य तें कृपाकरून सांगा. तूच आमचे गुरू बंधू पिता नि इष्टदेवता आहेस नि तूंच आमचे संकटकाळीं रक्षण करीत आला आहेस. गुरू शिष्याचा कधीच अव्हेर करीत नाही, किंवा समुद्र नद्यांना नाकारीत नाही. लहान बाळाला आई सोडून गेली तर त्या बाळाने कसे जगावे बरे ?

आणि म्हणून हे कृष्णा, माझे बोलणे मनावर न घेतां जे काही योग्य असेल नि ज्यायोगें धर्माचरणाला बाधा येणार नाही ते सर्व हे पुरूषोत्तमा, मला त्वरित सांगा !
हे गोत्रज पाहून जो काही मोह निर्माण झालाय् तो तुझ्या बोलण्यावांचून दूर होणार नाही. एरव्हीं पृथ्वी पाण्यात जिरली किंवा इंद्रपद लाभले तरी मनांतील हा मोह काही सुटणार नाही. भाजलेले बीं उत्तम मशागत केलेल्या शेतात पेरले तरी ते काही अंकुरित होत नाही, किंवा अंतसमयीं इतर कुठलेच औषध उपयोगी नसून केवळ परमामृतच तारूं शकते. तद्वत्, तुझे करूणाकर बोल माझ्या मनांतील खळबळ शांत करूं शकतील.

हे सगळे बोलत असतांना क्षणभर असे वाटले की त्याची भ्रान्ती मावळते आहे, पण लगेचच तो त्या उर्मीने पुन्हा झपाटला गेला. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या मतें ती साधीसुधी उर्मी नसून काळसर्पाने दंश केल्यामुळे आलेली ग्लानी असावी, महामोहाच्या रूपांत ! हृदयापर्यंत पोहोचलेल्या त्या विषामुळे अर्जुनाची ग्लानी उतरवण्यासाठी आता तो श्रीहरी नामक गारूडी, ज्याच्या केवळ दृष्टीक्षेपाने भलीभली विषबाधा सहज उतरते, आतां अर्जुनासाठी धावून येईल आणि आपल्या कृपेमुळे त्याचें रक्षण करील.

(माऊलींनी, ‘म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु। जाणोनियां ॥ मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥’ अशी ओवी वापरली आहे. ) !

उन्हाळ्यांत डोंगरचे डोंगर वणव्यामुळे होरपळून निघतात, अगदी तसाच अर्जुन दु:खामुळे जर्जर झाला होता.

पुढे अतिशय सुंदर ओव्या येतात. त्या अशा –
“म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ आतां तो उदार कैसा वर्षेल । तेथ अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणें देखा । निवृत्तिदासु ॥”

(म्हणून स्वाभाविकपणे नीलवर्णाचा नि कृपारूपी जळाने परिपूर्ण असलेला  महामेघरूपी श्रीगोपाळ त्याच्याकडे वळला. त्याचे चमचमणारे पांढरे शुभ्र दात मेघांतून वीज चमकून जावी तसे लखलखत होते नि त्याचा धीरगंभीर आवाज आसमंतांत गर्जना व्हावी तसा दुमदुमत होता. आता हा कृपामेघ उदारपणे अर्जुनावर ज्ञानरूपी कृपेचा वर्षाव करील नि त्यामुळे हा वणवाग्रस्त महामेरू कसा शांत नि तृप्त होईल आणि ज्ञानाचे नवीन कोंभ कसे फुटत राहतील ती कथा लक्षपूर्वक ऐका असे निवृत्तिदास ज्ञानदेव विनवतात. )

वाहवा ! केवळ लाजबाब !!

खरें तर अर्जुनाचा विषाद अजून संपलेला नाही. तो अजूनही काही ना काही मुद्दे काढतो आहे नि ते लक्षात घेऊन आता भगवंत त्याची आधी कानउघाडणी करणार नि मग गहन असे पारमार्थिक सिध्दांत सांगायला सुरूवात करणार. खरा गीतार्थ येथपासून सुरू होतो असे म्हणायला हरकत नसावी. आदि शंकराचार्यांनी गीतार्थ सांगायला पुढच्या श्लोकापासून आरंभ केला, तेच प्रख्यात “शांकर-भाष्य” होय. (क्रमश:……




Friday, March 02, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तिसरा)

ज्ञानेश्वरी मधील सौंदर्य स्थळें (भाग तिसरा)
अर्जुन विषादाची थोडी झलक आपण मागील भागांत पाहिली. श्री ज्ञानदेव आता अर्जुनाच्या मूलत: अतिशुध्द आणि पवित्र विचारसरणीचे चित्रण प्रभावीपणे करतात. अर्जुन म्हणतो की हे आमचे गोत्रज, गुरू इत्यादिक युध्दासाठी सज्ज होत्साते आले असले तरी माझ्या मन बुध्दीला यांना मारावे असे पटत नाही. “सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्व शरीरें मे रोमहर्शष्व जायते ।।”
“देखें देह कांपत, तोंड असे कोरडे होत, विफळता उपजत, गात्रांसीही” ! अर्जुन त्या कल्पनेनेच इतका व्याकुळ झालाय् की त्याला त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य पेलता येईना, घामेजल्य् हातातून ते केव्हा निसटून खाली पडले ते त्यालाही कळले नाही ! वास्तविक वज्राहून कठोर नि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले अर्जुनाचे हृदय करुणेने कसे व्यथित झाले पहा. ज्या अर्जुनाने प्रत्यक्ष शंकराचा युध्दांत पराभव केला आणि निवात-कवच या राक्षसांचा समूळ नायनाट केला तो मोहाने ग्रासला आहे.
इथें एक फार सुंदर उपमा देतात ज्ञानदेव. भुंगा अतिशय कठीण लाकूड सहजगत्या पोखरून काढतो. मात्र तो जेव्हा कमल-कलिकेत मधाच्या नादात अडकून पडतो तेव्हा त्याला ते मऊ मुलायम कमलदल काही प्राण गेला तरी भेदतां येत नाही ! हा मोह म्हणजे प्रत्यक्ष आदिपुरूषाची ‘माया’ होय, जी ब्रह्मदेवाच्यानेही आवरत नाही. अशाप्रकारें तो मोहग्रस्त अर्जुन युध्दापासून परावृत्त झाला. त्याला भलत्याच वेळीं सहृदयता आठवली नि तो कृष्णाला म्हणाला की आपण इथून निघून जाऊंया !
आपल्या या बदललेल्या मानसिकतेचे तो समर्थन करूं लागला. या कौरवबंधूंना जर मारायचे तर युधिष्ठिराला कां नको ? म्हणून आग लागो या लढाईला ! एवढे पाप करायची काय गरज, मला हे मान्य नाही. मला विजय बिजय काही नको. अखेर यांना मारून मिळवलेले राज्यपद व्यर्थ होय. मला तसे राज्य स्वप्नातही नको !
शिवाय पलीकडे भीष्म द्रोण वगैरे आहेत, ज्यांचे उपकार मी कधीच फेडूं शकत नाही. हे सगेसोयरे पण असे आहेत की त्यांना मारण्याची भाषासुध्दा महाभयंकर आहे. शिवाय असे पातक घडलेच तर कृष्णा, तुझे तोंड पाहण्याचे धाडस कुठून आणीन मी ! माझ्या पूर्वपुण्याने तूं मला लाभला आहेस, तो तूही दूर निघून जाशील. वनांत आग लागताच कोकीळ वगैरे सर्व पक्षी प्राणी तेथून पळ काढतात किंवा चिखलाने भरलेल्या पाण्याकडे चकोर ढुंकूनही पहात नाहीत. अगदीं तसाच, माझ्या पुण्यसाठ्याचा ओलावा  संपताच तू मला सोडून निघून जाशील.

म्हणूनच मी हातीं शस्त्र धरणार नाही, हे युध्द करणार नाही.

हे कौरव केवळ गर्वामुळे लढायला आले आहेत. पण म्हणून आपल्याला आपले हित पहायला नको काय ? कुणी जाणूनबुजून काळकूटासारखे विषप्राशन करेल का ; किंवा चालताना अचानक सिंह सामोरा आला तर त्याला चुकवणे श्रेयस्कर नाही का ? देवा, मला सांगा, हातातला पेटता दिवा विझवून अंधारात उडी घ्यावी का ? किंवा धडधडत्या अग्नीपासून दूर पळणेच योग्य नाही काय ?

अर्जुन इथेच थांबत नाही. युध्दामुळे ओढवणाऱ्या सर्व पातकांचा तो पाढा वाचतो. लाकडावर लाकूड घासून प्रज्वलित होणारा अग्नी जसा दोन्ही लाकडांना भस्म करतो, तसे आपसांत भांडून दोन्ही कुळांचा नाश अटळ असतो. अशावेळी कुलवंशाचा लोप होऊन कुळात अधर्म फोफावतो. पेटता दिवा विझवून अंधारात अडखळत राहावे तसा कुलक्षय होताच कुळाचार संपतो नि यमनियमांना डावलून इंद्रियें मोकाट सुटतात आणि स्त्रियांमधे व्यभिचार बोकाळतो. उत्तम अधमांचा संकर होऊन जातीधर्म नष्ट होतो नि चव्हाट्यावर ठेवलेल्या अन्नाप्रमाणे कावळे ताव मारतात. यामुळे नरक प्राप्तीशिवाय पर्याय राहात नाही. वंशवेलच अशी पापी झाल्यावर स्वर्गस्थ पूर्वजही पतित होतात. जिथे नित्य-नैमित्तिक कर्मेच घडत नाहीत तिथे पितरांना तिलोदक देणेसुध्दां दुरापास्त ठरते नि मग त्यांना पुन्हा मृत्यूलोकातील त्याच पतित कुळात जन्म घ्यावा लागतो. अगदी नखाग्राला जरी विषबाधा झाली तरी ते विष सर्व शरीर व्यापते ; तसेच पापाचरणामुळे अवघें कुळ विनाशाकडे वाटचाल करते. जसा अग्नी सर्व काही भस्मसात करतो त्याप्रमाणे या पापांची झळ संगतींत येणाऱ्या प्रत्येकाला लागते.

आणि म्हणून यांचेशी युध्द न करता त्यांचे बाण झेलत मरण आले तरी बेहतर. असे बोलत असतांना त्याला गंहिवर आवरेना आणि त्याने रथातून खालीं उडी घेतली. पदच्युत झालेल्या राजकुमाराप्रमाणे, किंवा राहूने ग्रासलेल्या सूर्याप्रमाणे तो निस्तेज झाला.
अशा त्या निराश नि उद्विग्न झालेल्या रडणाऱ्या अर्जुनाला वैकुंठनायक भगवान् श्रीकृष्ण कशाप्रकारें परमार्थ सांगतील ते सविस्तर पणे पुढच्या अध्यायात सांगू तें लक्षपूर्वक ऐका असे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात.
(क्रमश:……..

जय साईराम
पुणे २ मार्च २०१८


This page is powered by Blogger. Isn't yours?