Tuesday, May 14, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पासष्ट

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पासष्ट 

भीतीग्रस्त अर्जुन म्हणतोय्
आकाशांत बघता बघतां ढग विरून जावेत तशी दोन्ही दळांतील सैन्यें शस्त्रात्रांसकट तुझ्या मुखांत गडप होत आहेत. किंवा कंजूष माणसाने पुरून ठेवलेले घबाड दैव फिरल्यावर गडप व्हावे तसे जमलेले सर्व सैन्य तुझे मुखांत दिसेनासे होत आहे. नशीबाचा फेरा खरोखर विलक्षण आहे कारण तुझ्या या मुखातून कोणाचीच सुटका नाही. उंच झाडांच्या डहाळ्या ऊंट जसे लीलया चघळून टाकतो तसे तुझे मुखांत हे सर्व लोक सहजपणे चघळले जात आहेत. तुझे दाढांच्या चिमट्यांत त्यांची मस्तकें मुगुटांसकट चिरडली जात आहेत. खरे तर त्या सगळ्यांचे पीठ झाले आहे दाढांमध्यें ! त्या मुगुटांवरील हिरे-माणकें काही तीक्ष्ण दातांवर अडकलेली दिसताहेत !! 
तथापि, या विश्वरूप काळाने, ज्यांत ज्ञानतंतु असतात अशी उत्तमांगें म्हणजे मस्तकेंबहुधा त्या रगाड्यांतही राखून ठेवली असावीत. आणि म्हणून त्यांची राखरांगोळी झाली नाही

मग म्हणें हें काई जन्मलयां आन (दुसरा) मोहरचि (मार्ग) नाही जग आपैसेंचि (आपोआप) वदनडोहीं (मुखांच्या डोहांत) संचरताहे  

ही अवघी सृष्टी आपसूकच विश्वरूपाच्यामुखाकडे वाटचाल करते  आहे आणि तेंही निवांतपणे तिला सामावून घेत आहे. या उंच मुखांत ब्रह्मदेव वगैरे धावत सुटले आहेत नि अलीकडे सामान्यजन शिरत आहेत. इतरही प्राणिमात्र या मुखांत नि:संशय जात आहेत. खरोखर, कुणीच याचे तावडीतून सुटत नाहीये

यथा नदीनां बहवोsम्बुवेगा: समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति  
तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति  २८॥ 
(ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे जग सर्व बाजूंनी तुझ्या मुखांत प्रवेश करते आहे). 

दिन-रजनींची करोनि पेणीं (मुक्काम) पंथ आक्रमोनि आयुष्याचा जाहले प्रविष्ट तुझिया मुखांत वेगें भूतजात आघवें हे  

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृध्दवेगा:  
तथा नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृध्दवेगा: २९॥ 
(ज्याप्रमाणे पतंग झपाट्याने धगधगत्या आगींत स्वत:चा नाश करून घेण्यासाठी धांव घेतात, तसेंच हे सर्व लोकही तुझ्या मुखांत नाशासाठीच वेगाने प्रवेश करतात). 

परि जेतुलें (जितके) येथ प्रवेशलें तें तातलिया (त्वरित) लोहें पाणीचि पां गिळिलें वहिवटींहि पुसिलें नामरूप तयांचें (मात्र जे येथें प्रवेशले ते तापलेल्या लोखंडाने पाणी शोषून घ्यावे तसे नामशेष झाले). 

आणि इतके होऊनही याची भूक काही शमत नाही ! अशा प्रकारें विलक्षण असा तुझा जठराग्नि पेटून उठला आहे देवा ! एखाद्या आजारातून बाहेर पडताच रोग्याला जशी खा खा सुटते, किंवा एखादा भणंग दुष्काळांत दारोदार वणवण करतो, अगदी तशीच तुझी जीभ ओठांवर वळवळत चाटून काढते आहे. तुझे तोंडातून काहीच सुटत नसून हे श्रीहरी, तुझी भूक खरोखर विलक्षण आहे. एका घोटांत सागर प्यावा, किंवा पर्वताला एका घासांत गिळावे ; अथवा आपले दाढांखालीं अखिल ब्रह्मांड रगडून गिळून टाकावें ; किंवा, सर्व दिशा घशाखाली घालण्यासाठी चांदण्यांना चाटून टाकावे, तशी तुझ्या विश्वरूपाची वखवख स्पष्टपणे जाणवते आहे
विषयभोग घेतांना कामेच्छा जशी वाढत जाते, किंवा आगींत सरपण घालतांच तो अधिकच भडकतो, तशी तुझी भूक ब्रह्मांडाला खात असतांना वाढतेच आहे
तुझे हे मुख किती विराट आहे म्हणावें तर त्रैलोक्य तुझ्या जिभेच्या टोकावर आहे ! हे तर वडवाग्नींत क्षुल्लक कौठ टाकण्यासारखे आहे ! आणि एका त्रैलोक्याला अपुरी पडावीत अशी तुझी असंख्य मुखें आहेत. तर मग इतकी त्रिभुवनें कुठून आणायची तुझी भूक भागवण्यासाठी ? आणि जर पुरेसा आहार तुला मिळत नसेल तर मुळांत इतकी तोंडें कां वाढवलीस  देवराया
पर्वतावर वणवा पेटतां त्यांत अनेक पशु अडकून पडतात. तसे हे बिचारे त्रैलोक्य तुझे मुखांतून येणाऱ्या ज्वाळांनी होरपळून जाते आहे

नव्हे नव्हे ही विश्वरूपाची प्राप्ती, कशी कर्म-गती ओढवली. हे तर जणू जगरूपी माशांसाठी फेकलेले मृत्यूचे जाळेच असावे असे वाटते आहे. आतां जगाने या जाळ्यातून कशी बरें सुटका करून घ्यावी ? ही मुखें नसून लाक्षागृहें असावीत आणि आपल्या धगीचे प्राणिमात्र कसा पोळला जातो ते अग्नीला कसे कळणार ? किंवा, शस्त्राला आपले तीक्ष्णपण प्राण्यांना कसे मारते हे कसे कळणार ? अथवा विषाला आपल्या जहराची कल्पनाच नसते.
अगदीं तसेच, आपल्या उग्रतेचे तुला भान राहीलेले दिसत नाही. तुझ्या मुखांत ब्रह्मांडाची होळी होते आहे. तूं विश्वव्यापक परमात्मा आहेस. तरी पण सर्व जगाचा संहार काय म्हणून करू पाहतो आहेस ?

हे प्रभो, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. तूंही आतां संकोच करतां तुझ्या मनांत काय आहे ते स्पष्टपणे सांगून टाक

किती वाढवीसी उग्र रूप आतां प्रभो जगन्नाथा विश्व-पाळा मजवरी तरी कृपा करीं पूर्ण निज प्रभुपण आठवोनी  

(आतां अर्जुनाने केलेली भगवंताची स्तुती ज्ञानदेव रसाळपणे सांगतील). 


क्रमश:..... 

This page is powered by Blogger. Isn't yours?