Sunday, March 22, 2020

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकोणनव्वद

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग एकोणनव्वद 

ज्ञेयअथवा ब्रह्माची व्याप्ती कशी नि किती ते सांगत आहेत श्री ज्ञानेश्वर महाराज
अर्जुना, ब्रह्म हे मन या इंद्रियासारखे सत्वरजात्मक त्रिगुणांनी व्यापलेले आहे असे वाटते. पण ज्या प्रमाणे गुळाच्या ढेपीतला गोडवा कुठल्या आकाराने बांधता येत नाही, किंवा तूप जसे दुधाच्या प्रत्येक थेंबांत भरून असले तरी ते काही दूध नसते तसें ब्रह्म जरी विकारवश भासले तरी ते विकारी नसते. (जरा अवघड आहे समजायला ! तथापि, पुढे पाहूं ! ) 
किंवा, आकाराने सोन्याची अंगठी म्हटली तरी मुळांत ते केवळ सोनेच असते. साध्या सोप्या भाषेंत सांगायचे तर परब्रह्मवस्तु ही त्रिगुण नि इंद्रियांपासून वेगळी आहे असे नीट समजून घे कपिध्वजा अर्जुना

नामरूप संबंधु जातिक्रिया भेदु हा आकारासीच प्रवादु वस्तूसि नाही (नामरूपाचा गलबला, विविध कर्म-अकर्में वगैरे केवळ संज्ञा असून त्या मूळ परब्रह्मवस्तू नव्हेत
तें गुण नव्हे कहीं गुणा तया संबंधु नाही परि तयाच्याचि ठायीं आभासती (त्रिगुणांचा ब्रह्माशी काहीही संबंध नसून ते ब्रह्मांत असल्याचेभासतात’) 

खरे तर अज्ञानापोटीं असे वाटते की परब्रह्म हेही त्रिगुणात्मक असून परब्रह्म त्या गुणांना धारण करते. मात्र तेधारण करणेम्हणजे आकाशांत मेघ असावे किंवा आरशात प्रतिबिंब असावे तसे असते

नातरी सूर्य प्रतिमंडळ जैसेनि धरी सलिल (पाणी) कां रश्मिकरीं (सूर्यकिरण) मृगजळ धरिजे जेवीं (अथवा, ज्याप्रमाणे पाणी सूर्याचे प्रतिबिंबधारणकरते किंवा सूर्यकिरणांमुळे मृगजळाचा भास होतो
तैसे गा संबंधेविण यया सर्वातें धरी निर्गुण परी ते वांया जाण मिथ्यादृष्टी (त्याप्रमाणे ते निर्गुण परब्रह्म सर्वांच्या संबंधांशिवाय सर्वांना धारण करते असे म्हणणेही एक प्रकारे व्यर्थ होय
आणि यापरी निर्गुणें गुणातें भोगणें रंका राज्य करणें स्वप्नीं जैसें ! (अशा प्रकारें निर्गुणाने गुणांचा उपभोग घेणे म्हणजे भिकाऱ्याने स्वप्नात राज्य भोगण्यासारखे आहे ! ) 
म्हणौनि गुणाचा संगु अथवा गुणभोगु हा निर्गुणीं लागु (संबंध) बोलों नये  
जें चराचर भूतांमाजीं असे पंडुसुता नाना वन्हीं (अग्नींत) उष्णता अभेदें जैसी  
तैसेनि (त्याप्रमाणे) अविनाशभावें (विनाशरहित) जे सूक्ष्मदशे आघवें (संपूर्ण) व्यापून असे तें जाणावें ज्ञेय येथ  
जें एक आंतुबाहेरी जें एक जवळ दुरी जें एकवांचुनि परी दुजा (दुसरे) नाही  

जें अग्नीचें दीपन (दाहकता) जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे (ज्याच्यामुळे अग्नीला दाहकता नि प्रकाश प्राप्त होतो, चंद्राला शीतलता आणि सूर्याला दृष्टी मिळते
जयाचेनि उजियेडें तारांगण उभडे (चकाकते) महातेज सुरवाडें (सत्तेने) राहाटे जेणें (ज्याचे प्रकाशामुळे तारांगण चकाकते, ज्या महातेजाचे सत्तेमुळे विश्वांत सुखाची लयलूट होते)
जें आदीची आदी जे वृध्दीची वृध्दी बुध्दीची जे बुध्दी जीवाचा जीवु  
मनाचें मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा  
जे प्राणाचा प्राण जें गतीचें चरण क्रियेचे कर्तेपण जयाचेनि (ज्याचेमुळे)  
आकारू जेणे आकारें विस्तारू जेणे विस्तारें संहारू जेणे संहारे पंडुकुमरा  
जें मेदिनीची मेदिनी (पृथ्वी) जें पाणी पिऊनि असे पाणी तेजा दिवेलावणी जेणें तेजें  
जे वायूचा श्वासोश्वासु जे गगनाचा अवकाशु हें असो आघवाचि आभासु आभासे जेणें
किंबहुना पांडवा जे आघवेंचि असे आघवा जेथ नाही रिगावा (शिरकाव) द्वैतभावासी  
जें देखिलियाचिसवें (पाहताक्षणी) दृष्य द्रष्टा हे आघवें एकवाट कालवे (एकाएकी मिसळते) सामरस्यें (ऐक्यभावांत)  

मग तेंचि होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन (आणि) ज्ञाने गमिजे (कळते) स्थान तेंही तेचि
जैसे सरलिया लेख (हिशेब) संपताच) आंख (अंक) होती एक तैसें साध्यसाधनागिक ऐक्यासि ये  
अर्जुना जिये ठाईं सरे द्वैताची वही (संबंध) हें असो जे हृदयीं सर्वांचां असे  

अर्जुनाला याप्रमाणें भगवंताने हे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय थोडक्यात सांगितले आणि असे म्हटले की तो भक्त हे जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्यास योग्य होतो. त्याचवेळी अज्ञानाचेही विवेचन केले

हे आघवीच विवंचना बुध्दी भरोनि अर्जुना मत्सिध्दिभावना माझिया येती  
देहादि परिगृहीं संन्यासु करूनिया जिहीं (ज्यांनी) जीवू माझिया ठायीं वृत्तिकु (निश्चय) केला  
ते मातें किरीटी हेंचि जाणोनिया शेवटीं आपणपया साटोवाटीं (मोबदल्यात) मीचि होती  

अर्जुना, सर्व कांही केवळ आत्माच आहे असे तुला आधीं सांगितले असते तर कदाचित तुला ते कळले नसतो. म्हणून लेकराला घास भरवतांना माय जशी त्याचे लहान लहान भाग करून भरवते, तसे एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, तसेच अज्ञानाचे चार भागांत विवेचन केले.
तथापि, अजूनही तुला नीट कळले नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. मात्र आता ते चार भागांत सांगतां सरळसरळ सांगू, तू जीवाचे कान करून ते ऐकावेस
भगवंताच्या या बोलाने अर्जुन रोमांचित झाला आणि तें पाहून भगवंतांनी प्रकृती-पुरूषाविषयीं विवेचन करायला प्रारंभ केला. तो भाग पुढे येईल.



This page is powered by Blogger. Isn't yours?