Thursday, March 21, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अठ्ठावन्न

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग अठ्ठावन्न 

ज्ञानदेव म्हणतात की आतां या अकराव्या अध्यायांत अर्जुनाला दोन रसांद्वारें परब्रह्माचेविश्वरूप-दर्शनाचालाभ होईल. ‘शान्तरसाचे घरीं अद्भुतरस पाहुणा म्हणून येईल आणि इतरही रसांना त्यांचे पंक्तींचा मान मिळणार आहे. असे पहा, वधूवरांचे लग्नात जसे वऱ्हाडी मंडळीदेखील चांगले चुंगले कपडे नि दागिने परिधान करतात तसे मराठी भाषेच्या दरबारीं हे विविध रस शोभून दिसतील. तथापि शान्त नि अद्भुत रस यांचे मीलन म्हणजे जणू हरि आणि हर यांचे दृढ आलिंगन प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावें, इतके ते रम्य आहे
किंवा, अमावस्येचे दिवशीं ज्याप्रमाणे सूर्य नि चंद्र एकाचवेळी पाहता येतात, तसे हे शान्ताद्भुत रस एकाचवेळीं अनुभवतां येतील. प्रयाग तीर्थीं जसे गंगा-यमुनेचे प्रवाह एकवटतात तसे या दोन रसांत आपण सारे सुस्नात होऊंया ! शिवाय गीतार्थरूपी गुप्त सरस्वती या दोन्ही ओघांत मिळाली की आपल्याला इथे त्रिवेणी संगम प्राप्त होईल हे नि:संशय

एथ श्रवणाचेनि द्वारें तीर्थीं रिघतां (शिरतांना) सोपारे (सोपे) ज्ञानदेव म्हणें दातारें (निवृत्तिनाथांनी) माझेनि केले (मला केले, घडवले)  
तीरें संस्कृताची गहनें (कठीण) तोडोनि मऱ्हाठिया शब्दसोपानें (पायऱ्या) रचिलीं धर्मनिधानें श्रीनिवृत्तिदेवें  

म्हणून सर्वांनीच शुध्द भावनेने इथें स्नान करून प्रयागराज माधवाचे  विश्वरूप दर्शन घेऊन संसारमुक्त व्हावे.  (म्हणोनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें प्रयागमाधव विश्वरूप पहावें येतुलेनि संसारासि द्यावें तिलोदक
हें असो ऐसे सावयव (मूर्तिमंत) एथ सासिन्नले (भरून आले) आथी (आहेत) रसभाव तेथ श्रवणसुखाची राणीव (राज्य) जोडली जगा  
जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरां (इतर) रसां पडप जोडे (शोभा येते) हें अल्पचि परी उघडें कैवल्य (मोक्ष) जेथ  
तो हा अकरावा अध्यावो जो देवाचा आपणपें विसंवता ठावो (विश्रांतिस्थान) परि अर्जुन सदैवांचा रावो (भाग्यवंतांचा राजा) जो एथही पातला (उपस्थित झाला)  

खरें तर एकटा अर्जुनच नव्हे तर इतर कुणालाही हा सुयोग आला आहे मराठीतून गीतार्थ ऐकण्याचा. आणि म्हणूनच माझी वारंवार विनंती आहे तुम्हा सर्व संतसज्जनांना, की हे निरूपण लक्षपूर्वक ऐका. तुम्हां संतांचे सभेंत अशी सलगी करू नये म्हटले तरी मज बालकाला सांभाळून घ्या. असे पहा, पोपटाला बोलायला शिकवल्यावर त्याची वटवट ऐकून आपण मान डोलावतोस ना ? किंवा, आईने सांगितलेले काम मुलाने यशस्वीपणे केले की ती संतुष्ट होतेच ना

तद्वत्, ‘मी जे जे बोलें तें प्रभू तुमचेचि शिकविलें म्हणौनि अवधारिजो आपुलें आपण देवा  
हें सारस्वताचें (ब्रह्मविद्येचे) गोड तुम्हीचि लावले जी झाड तरी आतां अवधानामृतें (अवधानरूपी अमृताने) वाड (पुष्कळ) सिंपोनि कीजे (सिंचन करावे)  
मग हे रसभाव फुलीं फुलेल नानार्थ (विविध) फळभारें फळा येईल तुमचेनि धर्में होईल सुरवाडु (सुकाळ) जगा  

या उद्गारांनी संतमंडळींना संतोष झाला नि ते म्हणाले की आम्ही संतुष्ट आहोत ; आतां भगवंत अर्जुनाला काय म्हणाले ते सांग

तंव निवृत्तिदास म्हणें जी कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगों जाणे परि सांगवा तुम्ही  

असे पहा, प्रभू श्रीरामाने वानरांच्या कडून लंकापती रावणाचा पराभव केलाच ना ? एकटा अर्जुन, पण भगवंताच्या आश्रयाने दुर्योधनाचे अकरा अक्षौहिणी सैन्य नेस्तनाबूद केले नाही काय

म्हणौनि समर्थ जे जे करी तें हो ये चराचरीं तुम्ही संत तयापरी बोलवा मातें  
आतां बोलिजतसे आईका हा गीताभाव निका जो श्रीवैकुंठनायका- मुखौनि निघाला  
बाप बाप (धन्य धन्य) ग्रंथ गीता जो वेदीं प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जियें ग्रंथीं  
तेथींचे गौरव कैसें वानावें (वाखाणावे) जे शंभूचिये मती (श्री शंकरांचे बुध्दीला) नागवे (आकलन होत नाही) तें आतां नमस्कारिजे जीवेभावें हेंचि भलें  
मग आइका तो किरीटी घालुनि विश्वरूपीं दिठी (दृष्टी) पहिली कैसी गोठी (गोष्ट) करिता जाहला  

अर्जुनाच्या अंत:करणाला जाणवले की हे सर्व विश्व परब्रह्मानेच व्यापलेले आहे. आणि बाह्यदृष्टीने तेच परब्रह्म डोळ्यांनी पहावें अशी त्याला उत्कट इच्छा झाली, परंतु देवाला विचारण्याचे त्याला धाडस झाले नाही. पूर्वी कधीच कोणत्याही प्रिय व्यक्तीने जे विचारले नाही, अगदी लक्ष्मीमातेनेही किंवा गरूड, जो परमेश्वराच्या कायम सेवेंत मग्न असतो, त्यालाही जे धैर्य झाले नाही. मी सनकादि मुनींपेक्षां किंवा गोकुळातल्या गोपगोपींपेक्षा नक्कीच अधिक जवळचा नाही. तसेंच अंबरीष ऋषीचे शापामुळे ज्याने वेळोवेळी गर्भवास सोसले त्याला विश्वरूपाविषयीं कुणीच विचारायचे धाडस केले नाही, त्याला मी कसे काय विचारू असा प्रश्न अर्जुनास पडला. आणि विचारू नये असे जरी मन सांगत असले तरी विश्वरूप पाहिल्याबिगर माझे समाधान होणार नाही अशी त्याची धारणा पक्की होती

म्हणोनि आतां पुसों (विचारावे) अळुमाळुसे (थोडेसे) मग करू देवा आवडे तैसें येणे प्रवर्तला साध्वसें (भीतभीत) पार्थु बोलों  

मात्र अर्जुन काही बोलण्याचे आधीच त्याचे मनांतील भाव जाणून भगवंताने अचानक विश्वरूप धारण केले ! असे पहा, वांसरू जवळ येते आहे असे पाहताच गाय खडबडून उभी राहते आणि आपल्या स्तनांतून पान्हा सोडते. अगदी तसेच, ज्या पांडवांसाठी भगवान् श्रीकृष्ण रानोमाळ धावले त्या अर्जुनाच्या विचारण्याची भगवंत वाट पाहील काय

तो सहजचि स्नेहाचे अवतरण (मूर्ती) आणि येरू स्नेहा घातलें आहे माजवण ऐसिये मिळवणीं वेगळेपण उरे हेंचि बहु (मुळांत परमेश्वर म्हणजे मूर्तिमंत स्नेह ; त्यातून अर्जुन त्याचा प्रिय सखा. मग एकमेकांची भेट होतांच वेगळेपण कसे शिल्लक राहणार ?) 
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा देव विश्वरूप होईल आपैसा तोचि पहिला प्रसंगु ऐसा ऐकिजे तरी  


क्रमश:......

This page is powered by Blogger. Isn't yours?