Thursday, December 29, 2022

 

स्वामी - भाग अकरा ते पंधरा

 स्वामी - भाग अकरा

काल मीमेडिकल मिरॅकल्सकिंवा चमत्कारिक व्याधिमुक्तीचा ओझरता उल्लेख केला होता. एक डॉक्टर म्हणून मला साहाजिकच त्याबद्दल कुतुहल वाटणे आणि मनांत शंका दाटून येणे स्वाभाविक होते. तथापि, प्रत्यक्ष पाहिल्या-अनुभवल्यावर आणि वादातीत व्यक्तीं कडून त्यांची सत्त्यासत्त्यता पारखून घेतल्यावरच आज तुम्हाला काही असे प्रसंग सांगीन म्हणतो, जे वाचल्यावर तुमचे केवळ कुतुहूलच नव्हे तर त्या मागची खरी वस्तुस्थिती लक्षात येईल

मात्र त्याआधी पुन्हा एकदा आग्रहाने सांगतो की त्यांवर किती विश्वास ठेवावा हे तुमचे स्वातंत्र्य आहे. आज स्वामी प्रत्यक्ष देहधारी नसले तरी त्यांचे नाम, त्यांची कृपा आणि ती अमर्याद शक्ती सदैव आसमंतांत पसरलेली आहे, गरज आहे केवळ आपल्या इष्टदैवतांत तीच विभूती विराजमान असलेल्या श्रद्धेची. खरं तर सत्यसाई हे नाव त्याच एका परमात्म्याच्या असंख्य नामांपैकी एक आहे इतके ध्यानात घेतले तरी पुरेसे आहे. त्यांचे अस्तित्व आम्ही भक्त मंडळी त्यांचेविभूतिअर्थात अंगाऱ्यात असल्याचे मानतो. खरंतर शिरडी काय वा शेगांव असो, गाणगापूर वा गोंदवले, महाकालेश्वर किंवा अष्टविनायक, सगळीकडेच विभूति, बुक्का, कुंकू किंवा शेंदूर आपण भक्तिभावें कपाळावर लावतोच ना ! केवळ हिंदूच नव्हे तर इतरही धर्म अंगारा, बभूती, होली ॲश या स्वरूपात राख नाही का भाळीं मिरवत


ते असो. आज मी तुम्हाला अशा काही घटना सविस्तर सांगणार आहे ज्या ऐकून अंधश्रद्धा निश्चितच फोफावणार नाही मात्र थोडीफार श्रद्धा नि विश्वास हमखास निर्माण होईल. पुढे येणारे प्रसंग काल्पनिक नाहीत, ‘बनवलेलेनाहीत, खोटे तर अजिबात नाहीत हे या ब्यांशी वर्षीय म्हाताऱ्याचे खरेखुरे अनुभवाचे बोल आहेत


मी प्रशांतिनिलयम मधे डॉक्टर म्हणून कार्यरत असताना कर्नल भोसले या अजूनही सेवेत असलेल्या अधिकाऱ्याची ओळख नि नंतर गट्टी जमली. ते पंजाबमध्ये काम करीत असताना त्यांच्या मित्राच्या पत्नीला फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले. मिलिटरी रूग्णालयांत तिच्या सर्व तपासण्या नि उपचार सुरू होते, मात्र तिचे प्रकृतीत काडीमात्र फरक पडत नव्हता. कर्नल भोसल्यांनी तिला स्वामी-दर्शना बद्दल सुचवले. अतिशय अगतिक अशी ती स्त्री आपल्या मैत्रिणीसोबत तशाही अवस्थेत पुट्टपर्थीला गेली. स्वामी बॅंगलोरला गेलेत असे कळले म्हणून ती तिथे गेली. मात्र त्याच सकाळी स्वामी चेन्नईला गेले होते. तशा आजारी अवस्थेत ती धडपडत चेन्नईला पोहोचली. स्वामींचे एका मोठ्या मैदानावर प्रवचन सुरू होते आणि किमान पन्नास हजारांचा जनसमूह ! ती अतिशय हताश झाली नि रडूं लागली स्वामींवर शिव्यांची लाखोली वाहात

मात्र एवढ्यांत एक स्वयंसेवक चंडीगड चंडीगड अशी हाकाटी देत तिचेपर्यंत आला नि तुम्हीच चंडीगडहून आलांत ना, स्वामींनी तुमचेसाठी ही अंगाऱ्याची पुडी पाठवली आहे, तुमची खूप धावपळ झाली ना असे विचारत जाऊ लागला आणि पुन्हा मागे वळून अजून काही पुड्या तिच्या हातीं कोंबल्या नि म्हणालास्वामींनी या शिवाजीसाठी दिल्या आहेत’. ती स्त्री परत चंडीगडला आली नि रूग्णालयांत पोहोचली. पुन्हा उपचार सुरू करण्यापूर्वी तिच्या पुन्हा तपासण्या करण्यांत आल्या. त्यांत कुठेही कर्करोगाचे लक्षण नव्हते, नावनिशाण नव्हते ! आणि तोशिवाजीम्हणजे मी, कर्नल एस्. भोसले हसतहसत म्हणाले


दुसरी घटना माझी स्वत:ची. मला दोन्ही पायांच्या बोटांत विलक्षण त्रासदायकचिखल्याझाल्या होत्या. जवळजवळ सहा महिने सर्व प्रकारची मलमं, लोशन्स, रॉकेल नि स्पिरिट लावूनही काहीही उपयोग होत नव्हता. मात्र एका सकाळी उठलों ते दोन्ही पायांच्या बोटांदरम्यान निळ्या रंगाचे ओले कापसाचे बोळे पाहून मी चमकलोच. घरात जेन्शन वायलेट हे औषधच नव्हते, मात्र ते बोळे माझे बोटांत ? उषाला विचारले, तिनेही अनभिज्ञता दर्शवली. ते बोळे आले कुठून या प्रश्नाचे मला अजूनही उत्तर मिळवलेले नाही, मात्र त्या दिवसापासून आजतागायत मला चिखल्यांचा त्रास झालेला नाही


आम्ही प्रशांति मंदिरांत भजनाला बसलो होतो नि त्याच वेळी एका व्हीलचेअर वर बसवलेल्या एका वयस्क गृहस्थांना स्वामींच्या इंटर्व्यू रूममधे नेण्यात आले. त्यांचे दोन्ही पाय नि दोन्ही हात कित्येक वर्षांपासून पॅरॅलाईज झालेले. साधारण वीस मिनिटांनी रिकामी व्हीलचेअर बाहेर काढण्यांत आली नि मागोमाग स्वामी त्या गृहस्थांना हाताने धरून बाहेर घेऊन आले आणि कोणाच्याही मदतीशिवाय ते गृहस्थ भजनलाईन मध्ये खाली जाऊन बसले ! हा चमत्कार मी आणि उषाने प्रत्यक्ष तर पाहिलाच पण उपस्थित हजारो जणांनी देखील


अजून एकच प्रसंग सांगून हे निरूपण आवरते घेईन


माझा मुलगा श्रीश एम् बी च्या पहिल्या वर्गांत शिकत असताना (पुट्टपर्थीला) एक दिवस अचानक त्याचा डावा डोळा सुजला नि पाहतापाहतां टेबलटेनिस बॉल इतका सुजला आणि डोळ्याच्या खोबणीबाहेर येऊन त्याचा आयबॉल डावीकडे फिरला. साहाजिकच विलक्षण वेदना आणि आंधळेपणाने तो गांगरून गेला. तशाही अवस्थेत तो दर्शनासाठी आला, त्याला पहिल्या रांगेंत बसवण्यांत आले. स्वामी बाहेर येतांच प्रथम श्रीशजवळ आले, विभूती साक्षात् करून त्याच्या डोळ्यावर लावली नि थोडी जिभेवर पण


या पुढचे कथानक उद्या सांगीन कारण त्यासोबतच अनेक प्रत्यक्ष अनुभव सांगायचे तुम्हाला

रहाळकर

१७ डिसेंबर २०२२


स्वामी - भाग बारा

एकोणीसशे एक्क्याणौं सालीं आमच्या विवाहाला पंचवीसावे वर्ष लागत होते आणि मी पन्नासावें वर्षांत पदार्पण केले होते. सत्यसाई सेवा संघटनेत प्रत्यक्ष कार्य करू लागल्याला पंधरा वर्षे होऊन गेली होती आणि माझी स्वामीनिष्ठा हळूहळू बळकट होऊ लागली होती. मागील एकदोन वर्षे आम्हा दोघांचेही मनांत एकदोन विचार घर करू लागले होते. एकतर आपल्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस पुट्टपर्थीला स्वामींचे छत्रछायेंत साजरा करावा आणि दुसरा मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन तेथील रूग्णालयात कायमचे काम मागावे


पहिली इच्छा अतिशय चमत्कारिक रित्या पूर्ण झाली नि आम्ही उभयतां पाच मार्चला स्वामीदर्शनासाठी प्रशांतिनिलयम मध्ये हजर झालो. त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे स्त्रीपुरूष मिळून पन्नास हजाराचे वर भक्त मंडळी दर्शनार्थ बसली होती. प्रथम स्वामी स्त्रीयांच्या रांगांत गेले आणि उषाला त्यांचे हातून विभूती प्रसाद मिळाला. पुरूषांचे बाजूला ते आले त्यावेळेस मला पहिली रांग मिळाली होती. स्वामी माझ्याकडे चालत येत असतानाच त्यांनी हवेंत हात फिरवत विभूती साक्षात केली आणि माझ्या हातावर ठेवली. मी ती जपून ओंजळीत राहू दिली. दर्शन संपल्यावर आम्ही दोघे गणेश मंदिराशी भेटलो तेव्हा उषाने तिच्या ओंजळीत जपून आणलेली विभूती दाखवली आणि मी माझी ओंजळ दाखवली ! पाच मार्चला, आमच्या विवाहाच्या पंचविसाव्या वर्षीं, पन्नास हजार स्त्रीपुरूषांमधून आम्हा दोघांना एकाच वेळी विभूती प्रसाद मिळणे हा विलक्षण योगायोग आम्ही सहर्ष अनुभवला होता

आम्ही नेमके त्या दिवशी प्रशांतिनिलयम मध्ये कां नि कसे होतो ? वास्तविक त्यावेळीं माझ्यावर पुणे शहराचा वैद्यकीय आरोग्यप्रमुख म्हणून प्रचंड जबाबदारी होती, मला अजिबात सवड मिळत नसे. मात्र अठ्ठावीस फेब्रुवारीला बजेटच्या धामधुमींत मला अकोल्याहून डॉक्टर भागवतांचा फोन आला मात्र मी तो प्रत्यक्ष घेऊ शकल्याने त्यांनी निरोप ठेवला की ते आत्तांच पुट्टपर्थीहून अकोल्यात पोहोचलेत, श्रीशला बरे नव्हते पण स्वामींनी त्याला पाहून विभूती दिली आहे. आम्हाला चैन पडणे साहाजिक होते. मी लगेच म्युनिसिपल कमिशनरांना भेटलो आणि मला तातडीने प्रशांतिनिलयमला जाणे आवश्यक आहे म्हटल्यावर मला फक्त दोन दिवसांची सुट्टी आढेवेढे घेत दिली. दरम्यान उषाने रेल्वे स्टेशन गाठून दोघांचीवेट-लिस्टेडतिकिटें मिन्नतवारीने मिळवली - वेटिंग लिस्ट क्रमांक एक दोन ! दोन मार्चला पहाटे प्रशांतिनिलयम मधे पोहोचलो आणि सरळ श्रीशच्या होस्टेलला लागून असलेल्या इस्पितळांत. तिथे त्याची एकंदर स्थिती पाहून धक्काच बसला. डावा डोळा टेबलटेनिस बॉलइतका सुजलेला नि डोळ्याच्या खोबणीतून बाहेर पडत पूर्णपणे डावीकडे वळलेला. तरी पण श्रीशचे शांतपणे सर्व वेदना  सहन करीत स्वामी कशी काळजी घेत आहेत ते सांगणे आणि आठनऊ वाजता एक्सरे साठी जात असल्याचे ऐकून काळजी आणि उत्कंठेने शिखर गाठले होते

कसेबसे दुपारपर्यंत वेळ काढून स्वामीदर्शनाच्या रांगांत जाऊन बसलो. स्वामी आले आणि शिरस्त्याप्रमाणे काही व्यक्तींना निवडून ते इंटर्व्यू रूमकडे 

चालू लागले. पुढे बसलेल्या श्रीशने गुडघ्यांवर उभे राहातस्वामी, पेरेन्ट्स आये हैअसे म्हणताचकॉल देमअसे म्हटले आणि आम्ही दोघे श्रीश आणि त्या निवडलेल्या व्यक्तींसमवेतइंटर्व्ह्यू रूममधे शिरलो


ओह, कसली स्थिती होती ती ! एकीकडे श्रीशची विलक्षण काळजी तर दुसरीकडे साक्षात स्वामींचे इंटर्व्ह्यू रूम मध्ये प्रवेश

त्या इवल्याशा दहा बाय दहा खोलीतील वार्तालापाचे वर्णन तर मी करीनच, पण त्या साक्षात्कारांत जितके काही अद्भुत, अनाकलनीय, भूतो ना भविष्यती अशा घटनांचा साक्षी होता आले ते खरोखर अवर्णनीय आहे. (तरीही त्याचे वर्णन सांगायचा मी अट्टाहास करणार आहेच म्हणा ! ) 

टु कट् व्हेरी लॉंग स्टोरी शॉर्ट, श्रीशचे डोळे नि प्रकृती पंधरा दिवसात पूर्ण बरी झाली, आणि हा चमत्कार जेव्हा माझ्या नेत्ररोग तज्ज्ञ मित्राने ऐकला तेव्हा त्याचा त्या इतिहासावर विश्वास बसेना. ‘ऐसी केसेस शायदही कभी ठीक होती हैं और वे भी सालों बाद , तो उद्गारला


दोन मार्चच्या त्या मुलाखतीनंतर दोन दिवसाची रजा घेऊन आलेले आम्ही पंधरा दिवस स्वामींचेस्पेशल पाहुणेम्हणून स्वामींच्या निवासस्थानाचे लगेच मागच्या अपार्टमेंट मध्ये सुखेनैव राहिलो श्रीश बरोबरच, तिथल्या दिव्य वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटत लुटत


खरे तर श्रीशची परिक्षा दोन आठवड्यांवर आली होती. स्वामींनी परिक्षा देऊ नकोस असे आधी म्हटले होते पण दोनच दिवसांनीएक्झाम लिखअसे त्याला सांगितले. लिहिणे-वाचणे अशक्य असल्याने त्याचे वर्गमित्र त्याला टेक्स्टबुक्स वाचून दाखवीत आणि पंधरा दिवसांनी श्रीशने परिक्षा दिली, चांगले गुण मिळवीत तो दुसऱ्या वर्गांत सहज दाखल झाला


खरोखर, ते दिवस आता पुन्हा आठवले की अंगावर सरसरून काटा येतो. कशा कठीण प्रसंगांतून स्वामींनी आम्हाला लीलया बाहेर काढले आहे ते ध्यानात ठेवले तर त्यांचेवर अविच्छिन्न श्रद्धा कां बसली त्याचे कोडे उलगडायला हरकत नसावी

आज जरा थांबतो, कारण अत्यंत भावविभोर आहे मी आत्तां

रहाळकर

२० डिसेंबर २०२२

स्वामी - भाग तेरा

प्रारंभीच्या काळात पुट्टपर्थीला जायचो तेव्हा पांचशे हजार इतपतच भक्तमंडळी तिथे वावरताना दिसत. मात्र सत्यसाई संघटनेच्या अखिल भारतीय मेळाव्यांचे वेळी तीच संख्या पन्नास हजार ते एक लाखापर्यंत सहज फुगत असे. मला किमान पाचसहा जागतिक परिषदा पाहता आल्या ज्यांत एकशेवीस देशांतून आलेले नि भारतातले मिळून पाचसहा लक्ष भक्त नि स्वयंसेवक सहभागी असत. या परिषदा किंवा कॉन्फरन्सेस नेहमीच स्वामींच्या वाढदिवसाचे दरम्यान म्हणजे तेवीस नोव्हेंबरचे आधी भरविल्या जात. मात्र नवलाची बाब म्हणजे त्या दहा दिवसांत सर्वांसाठी, अगदी नजिकच्या खेड्यापाड्यांतून आलेल्या सर्वांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे नि रात्रीचे भोजनमोफतअसे. ही किमया, खरेतर चमत्कार मी अनेक वर्षें प्रत्यक्ष पाहिला-अनुभवला आहे

त्या मंतरलेल्या वर्षांत हजारो लाखो भक्तांच्या उपस्थितीत मला स्वत:ला स्वामींचा किती वेळा साक्षात्कार किंवा संभाषणाचा प्रसंग आला असे विचाराल तर मी अतिशय नम्रपणे सांगेन की तशा बऱ्याच संधी पदरीं पडल्या. नव्हे, स्वप्न किंवा दृष्टांत स्वरूपात नव्हे, प्रत्यक्ष

(या प्रसंगीं मला प्रो. कस्तूरींनी सांगितलेला एक किस्सा आठवला. ते एका विशिष्ट व्यक्तींबद्दल बोलताना म्हणाले होते की या गृहस्थांना स्वामी दररोज स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, सूचना किंवा आज्ञा करतात. मात्र आपल्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी पुस्ती जोडली - ‘ही वॉज प्रॉलिफिक ड्रीमर !’ ) 

खरेतर मला स्वामी स्वप्नात अनेक वेळा दिसले आहेत मात्र संभाषण ? इल्ला ! ! तथापि, प्रत्यक्ष बोलणे झाले ते श्रीशचे गंभीर आजाराचे वेळी दोनदां नि नंतर मी तेथे काही काळ सेवारत असतांना


अगदी पहिल्या वेळी मात्र मी केवळ एक स्वयंसेवक म्हणू पर्थीला सेवेसाठी गेलो होतो. आमच्या प्रत्येक ट्रिपचे वेळी रेल्वेचे रिझर्वेशन मिळेलच अशी शाश्वती नसे. मात्र त्यावेळेस माझे परतीचेस्लीपिंग कोचचे आरक्षण कन्फर्म झाले होते. त्याप्रमाणे दुपारची गाडी मिळण्यासाठी मी दहा वाजता पर्थीहून जाण्यास निघालो नि शिरस्त्याप्रमाणे गणेश मंदिराशी माझी झोळी घेऊन दुसऱ्या मित्राची वाट पाहात थांबलो. तेवढ्यात मला ओळखणाऱ्या एका भक्ताने मला हटकले आणिअरे डॉक्टर किथर जा रहा है, अभी ग्यारह बजे स्वामी डिसकोर्स देने वाले है मंदिर मे डॉक्टरों के वास्ते ! ‘ मी माझी झोळी तिथल्या एका झाडाखाली ठेवली आणि मंदिर गाठले. आत जवळजवळ शंभर डॉक्टर दाटीवाटीने बसले होते, सर्व आंध्रातले. मी कसाबसा त्यांत मावलो नि तेवढ्यांत स्वामी आले, त्यांनी तेलुगूत प्रवचन केले आणि सगळेच आंध्रातले असल्याने भाषांतर काही झाले नाही. तथापि मला व्याख्यानाचा गोषवारा लक्षात आला. त्यानंतर स्वामी त्या सर्वांना पादनमस्कार देत दारापर्यंत माझ्याकडे आले नि मला हिंदीतून विचारलेकिधरसे आया ? ‘ , ‘स्वामी पूनासेअसे मी म्हणताच ते म्हणालेअच्छा पूनासे ! देखो, सेवा करेंगे तो मेवा मिलेगा ! ‘ मी अवाक्

(माझी रिझर्वेशन वाली गाडी कधीच निघून गेली होती. मी धडपडत कसाबसा गुंटकल् ला पोहोचलो, मुंबईकडे जाणाऱ्या गाडीच्या जनरल बोगीत शिरलो आणि महदाश्चर्यम् , एक संपूर्ण बर्थ रिकामा दिसला नि मी चक्क झोपून पुणे गाठले

आता तुम्ही म्हणाल हे काय संभाषण झाले, पण मला तेवढ्या दोन शब्दांनी जे बळ दिले ते आजतागायत शाबूत आहे - ‘सेवा करेंगे तो मेवा मिलेगा’ ! असो

खरंतर दर्शनार्थ बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनांत एकच भाव असे, स्वामींनी आपल्याकडे पाहावे, एखादा तरी शब्द आपल्याशी बोलावा. विश्वास ठेवा, प्रत्येकाची ही माफक इच्छा हमखास पूर्ण होत असे कारण त्या हजारों लाखो भक्तांकडे स्वामी असे पाहात जणू ते त्या प्रत्येकाकडे प्रेमाने, दयार्द्र दृष्टीने पाहात आहेत, प्रत्येकाशी संवाद साधत आहेत, प्रत्येकाचे पूर्ण समाधान करीत, त्याला मनसोक्त आनंदाचा प्रत्यय देत

ओह, याला अंखश्रद्धा म्हणावे काय ? नव्हे, ‘भाव तसा देवही उक्ती तेथे क्षणोक्षणी मूर्त रूप घेत असे. आपण चार प्रकारच्या भक्तांबद्दल ऐकून आहोत - आर्त, अर्थार्थी, मुमुक्षु नि ज्ञानी. वास्तविक आपल्यातला प्रत्येकजण या चारही कॅटेगरींत अगदी फिट्ट बसतो कारण आपण या चारही अवस्थांत असतो, मनाने भावाने नि अनुभवाने


आता, ईश्वर आपले प्रतिबिंब आहे की आपण त्याचे प्रतिबिंब आहोत ? चर्चेसाठी विषय चांगला आहे, पण बिंब-प्रतिबिंब दोन्हीही नसावेत कदाचित, कारण ते द्वैतदर्शक आहेत. ईश्वर म्हणजे निखळ अद्वैत, तिथे बिंब नाही की प्रतिबिंबही ! कठीण आहे पचवायला, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे

रहाळकर

२७ डिसेंबर २०२२


स्वामी - भाग चौदा

मी मागे सांगितले होते की पुण्यापासून अदमासे वीस किलोमीटरवरील लवळे ग्राम सत्यसाई संघटनेने दत्तक घेतले होते आणि आरोग्य, स्वच्छता शिक्षण या बाबतींत जमेल तेवढा प्रयत्न करायचा आम्ही संकल्प केला होता, अर्थात सीमित मनुष्यबळ आणि तुटपुंज्या साधनांनी. तुटपुंज्या एवढ्यासाठी की कधीही पैशाची याचना केली नाही, स्वेच्छेने जितके स्वयंसेवक करू शकतील तेवढेच कार्यक्रम हातीं घेतले जात. साहाजिकच गावाचा दैदिप्यमान वगैरे कायापालट आम्ही करू शकलो नसलो तरी मनापासून साईकार्य करत असल्याचे विलक्षण समाधान दर वेळी हमखास मिळत असे

तिथले एकदोन प्रसंग सांगायचा मला मोह आवरत नाही, तथापि माझे पूर्ण कुटुंब म्हणजे पत्नी उषा नि सिध्दिश्री श्रीश हे दोघेही नेहमीच बरोबर येत असत. मुलांचा बालविकास वर्ग झाल्यावर उषा इतर महिलांसमवेत गावातील महिलांशी सुसंवाद करत असे, सिध्दिश्री कडले मावशींकडून नवनवीन भजनें शिकून त्यांच्या सरावांत मग्न होई आणि श्रीश माझ्या दवाखान्यांत शेजारी उभा राहून औषध वाटपात हातभार लावी ( कधीकधी एखादा जुलाब होत असल्याचा रूग्ण आला कीबाबा, फ्युरॉक्सान् देउ ?’ असे विचारत असे - वय वर्षें सात किंवा आठ ! ) असो


एकदा मला दोन खूप महागड्या ॲन्टिबायोटिकच्या बाटल्या सॅम्पल् म्हणून मिळाल्या होत्या नि माझ्या लहान मुलांना त्या कधी लागल्याच तर घरात असाव्या म्हणून मी जपून ठेवल्या होत्या. एका रविवारी त्या लवळ्यांत अधिक उपयोगी पडतील या विचाराने बॅगेत भरल्या खऱ्या, पण जाणो आपल्याच मुलांना लागल्या तर, असा विचार करून पुन्हा कपाटात ठेऊन दिल्या. मात्र कुलूप लावता लावतां माझ्या स्वार्थीपणाची मलाच लाज वाटून पुन्हा त्या बॅगेत भरल्या. खरी गंमत किंवाआय ओपनरपुढे आहे


मे महिन्याचे कडक ऊन आणि मुलांसह आम्ही दोघे  दवाखाना संपवून साडेबाराच्या सुमारास बस पकडण्यासाठी पिरंगुटकडे दीड मैल चालत निघालो. जेमतेम अर्ध्यी वाट चालतोय एवढ्यांत दहाबारा वर्षाचा एक मुलगा धांपा टाकत धावत आला नि म्हणाला की माझी आज्जी झोपडीत खूप तापाने फणफणली आहे प्लीज घरी चला ना. मी आधी वैतागलो नि म्हटले अरे चार तास मी गावात होतो तेव्हा का नाही आलास ? पण उषाने मला समजावले की आम्ही तिघे या झाडाखाली थांबतो, तुम्ही पाहून या म्हातारीला. त्या पोरासोबत मी झोपडीत शिरलो, म्हातारीला तपासले, ब्रॉन्कोन्युमोनियाने तिला घरघर लागली होती, ताप एकशेपाचचे वर ! पोराचे आईबाप रानांत गेलेले. मला काही सुचेना. थोडेसे स्पंजिंग केल्यावर ताप किंचित कमी झाला खरा, पण कोणतेही इंजेक्शन देणे त्या परिस्थितींत धोक्याचे होते. मला अचानक पुन्हा बॅगेत ठेवलेल्य् बाटल्यांची आठवण झाली. त्यांतील एक त्या मुलाच्या हाती देऊन म्हटले दोन दोन चमचे आत्तां आणि संध्याकाळीही पाज आज्जीला, पण तिचे काही खरे नाही, बहुतेक तास दोन तास काही ती जगत नाही. जड पावलांनी बाहेर पडलो ती अगतिक अवस्था पाहात

मात्र पुढच्या रविवारी तीच म्हातारी काठी टेकत टेकत आली मला आशीर्वाद द्यायला, पूर्ण बरी आहे असे सांगायला

विचार करा, स्वार्थीपणे औषधें कपाटात ठेवणारा मी, माझीच मला लाज वाटून पुन्हा ती बरोबर घेणारा, लहान मुलांसाठी मौल्यवान औषध म्हातारीला देऊन ती पूर्ण बरी होणे हा निव्वळ चमत्कार नाही का


खरं सांगूं, अशा कित्येकचमत्कारांनीमाझ्यातल्या मीपणाला सणसणीत चपराकी दिल्या आहेत आणि कुठली तरी दिव्य शक्ती आपल्याला एक साधन बनवून लोककल्याण करवून घेते आहे असा विश्वास हळूहळू बळकट होत चाललाय. स्वामी त्याच दिव्य शक्तीचा एक अविष्कार आहेत हे वेळोवेळी मी अनुभवले आहे आणि म्हणूनच त्या श्रध्देला आता कधीही तडा जाणे नाही

आज थांबतो, पण अजून खूप काही सांगायचे आहे

रहाळकर

२८ डिसेंबर २०२२


स्वामी - भाग पंधरा

पुण्यातल्या ससून रूग्णालयांत आमचा पाचसहा जणांचा चमू दर रविवारी दुपारी चार ते सहा दरम्यान रूग्णसेवेसाठी जात असे. ज्या पेशंट्सना कोणीच भेटायला आलेले नसेल अशांजवळ जाऊन त्यांची विचारपूस करत, त्यांना धीर देत नि त्यांचेशी हलकाफुलका संवाद साधत त्यांना किंचित विरंगुळा देत असू. खरंतर त्यामुळे आम्हालाच जास्त समाधान मिळत असे कारण त्यांत स्वामींच्या नावाचा किंवा लीलांचा उल्लेख सुध्दा करताही निव्वळ माणुसकीचे दिग्दर्शन आपसूक होत असे

असे काही रविवार गेल्यावर कायम सोबत येणारा नि शारीरिक व्यंग असलेल्या सुहास गोखलेने एक बाब आमच्या निदर्शनास आणली की रूग्णांचे नातेवाईक, विशेषत: खेड्यापाड्यांतून आलेले, बरेच वेळा आपला उदरनिर्वाह चणेफुटाणे किंवा भेळभत्ता खाऊन करत असतात. त्याने सुचवले की डॉक्टर, आपण या नातेवाईकांसाठी आपल्या घरी तयार केलेली फूडपॅकेट्स (अन्नपाकिटे) आणत जाऊंया काय. सर्वांनाच ती कल्पना पटली आणि नंतरच्या प्रत्येक रविवार पासून आम्ही ती अंमलात आणू लागलो. फूडपॅकेट म्हणजे दोनतीन पोळ्या, कोरडी भाजी किंवा लोणचे नि गुळाचा खडा ! दर वेळी हमखास गरजू मंडळी भेटत आणि त्यांचा अपमान होऊ देतां ती पॅकेट्स त्यांचे स्वाधीन करीत असूं


एक प्रसंग मात्र हृदय पिळवटून टाकणारा निघाला आणि तो तुम्हाला सांगितल्याशिवाय मला चैन पडणार नाही ! ती दिव्य शक्ती तुमचेमार्फत कशी गरजूंच्या साहायार्थ तत्पर असते याचे हे सुंदर उदाहरण म्हणता येईल. स्टोरी जरा मोठी आहे पण ती किंचित लघु करत सांगेन म्हणतो


त्याचे असे झाले की लवळ्याहून परत घरी पोंचायला दुपारचे चार वाजत आले होते नि अजून स्वयंपाक व्हायचा होता. सिध्दीश्रीश साछी उषाने भात टाकला तो थोडा जास्त आणि माझ्याबरोबर त्या दिवशी फक्त दहीभाताची दोन पॅकेट्स करून दिली ससून साठी ! नेहमीप्रमाणे आमची निरनिराळ्या वॉर्ड्स मधून भ्रमंती सुरू झाली. त्या दिवशी मला एकही गरजू व्यक्ती आढळली नाही. सहाचे दरम्यान परत येत असताना तिथल्या कॉरिडॉर मध्ये एक स्त्री दोन लहानग्यांबरोबर सचिंत बसलेली पाहिली. मुले दीड नि तीन वर्षांची. तिला सहज विचारले की तू इथे का थांबली आहेस, आणि ती भडभडा बोलू लागली. म्हणाली नवरा पिंपरीला कामगार आहे, त्याचा ॲक्सिडंट झालाय नि अजून त्याचे ऑपरेशन सुरू आहे. निरोप मिळताच या बछड्यांना उचलून धावत इथे आले सकाळीच. मी विचारले पोरांना काही खाऊ घातलंस काय. नकार ऐकून मी जरा चाचरतच तिला विचारले की माझ्याजवळचा दहीभात तुला दिला तर चालेल काय. तिने चालेल म्हटल्यावर दोन्ही पॅकेट्स तिला दिली अन् ती पोरं अक्षरश: तुटून पडलीं त्यांवर. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा नि आमच्याही


जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वीची घटना आहे ती. महाराष्ट्र साईसंघटनेच्या एका शिबिरात हा प्रसंग मी कथन केला. याची लगेच दखल घेत संघटनेनेगरजूंना फूड पॅकेट्स्हा उपक्रम राज्यभर सुरू केला. अर्थात यांत माझे कर्तृत्व दर्शविण्याचा अजिबात उद्देश नसून एखादा लहानसा प्रसंग किंवा अनुभव किती विशाल होऊ शकतो इतकेच मला अधोरेखित करायचे होते ! माझी खात्री आहे की तुमचेसकट अनेकांना यातून प्रेरणा मिळेल ! जय साईराम ! ! 

रहाळकर

२९ डिसेंबर २०२२


This page is powered by Blogger. Isn't yours?