Thursday, February 28, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग चौपन्न

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग चोपन्न 

अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्व प्रवर्तते  
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता८॥
(मी संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे कारण असून सर्व जग माझ्यापासून निर्माण होते हे जाणून ज्ञानी पुरूष प्रेमभावाने माझी भक्ती करतात). 

तरि मीचि एक सर्वां या जगा जन्म पांडवा आणि मजचि पासुनि आघवा निर्वाहो यांचा  
कल्लोळमाळा (लाटा) अनेगां (अनेक) जन्म जळींचि पैं गा आणि तयां जळचि आश्रयो तरंगा जीवनही जळ  
ऐसें आघवाचि ठायीं तया जळचि जेवीं पाहीं तैसा मीवांचुनी नाही विश्वीं इये  
ऐसिया व्यापका मातें मानूनि जे भजती भलतेथें (वाटेल तेव्हा, वाटेल तिथे) परि साचोकारें (खरोखर) उदितें (उत्कंठेनें) प्रेमभावें  
देश काल वर्तमान आघवें मजसी करूनि अभिन्न जैसा वायु होऊनि गगन गगनींचि विचरे (संचारतो)  

ऐसेनि जे निजज्ञानी (आत्मज्ञानी) खेळत सुखें त्रिभुवनीं जगद्रूपा मनीं साठवूनि मातें  
जें जें भेटे भूत ते तें मानिजे भगवंत हा भक्तियोगु निश्चित जाण माझा  

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम्
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति रमन्ति ९॥
(माझे ठिकाणी ज्यांचे चित्त आहे, तसेच ज्यांचे प्राण नि इन्द्रियें माझेच ठायीं निरंतर आसक्त आहेत असे ज्ञानी भक्त परस्परांत केवळ माझेच गुणसंकीर्तन करीत राहतात आणि माझ्या भक्तींत रमून संतुष्ट होतात). 

तेव्हां तया महासुखाचेनि भरें धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें मियां धाले तेणें उद्गारें लागती गाजों (त्यावेळेस अतिशय आनंदाच्या भरांत देहभान हरपूनमी धन्य आहेअसा जयजयकार करू लागतात). 
जैसी कमळकलिका जालेपणे हृदयींचिया मकरंदातें राखों नेणे दे राया रंका पारणें आमोदाचें (कमळाची कळी पूर्ण विकसित झाल्यावर आपला मधुगंध आवरून ठेवू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना मुक्तहस्तें ती मेजवानी देते). 
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें नाही राती दिवो जाणणें केलें माझें सुख अव्यंगवाणें (परिपूर्ण) आपणपेयां जिहीं  

तयां मग जें आम्ही कांही द्यावे अर्जुना पाहीं ते ठायींचीचि तिहीं घेतली सेल (उत्तम वांटा) (अर्जुना, त्यांना जे काही द्यायचे मी ठरवले असते त्यांतील उत्तम भाग त्यांनी आधीच कमावलेला असतो). 

मात्र भक्तिमार्गावर चालत असतांना त्यांचेवर कोणतेही संकट येणार नाही याची खातरजमा मी करत राहतो. जसे,
लळेयाचिया (लाडक्या) बालका किरीटी गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी (स्नेहाळ दृष्टीनं) जैसी खेळतां पाठोपाठीं माउली धांवे  

तें जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा (सोन्यासारखा) करूनि ठेवी तैसी उपास्तीची पदवी (उपासनेचा मार्ग) पोषित मी जाये (ते बालक ज्या ज्या खेळण्याचा हट्ट करेल ते ते सोन्याचे खेळणे ती माउली त्याला देते. तद्वत्, माझे भक्तांचा उपासना मार्ग मी निष्टंक करतो). 
उपासनेवर दृढपणे चालणारा साधक मला प्राप्त करून घेतो, म्हणून त्याचे पालन-पोषण करणे मला फार आवडते. अरे, भक्त माझ्यावर निर्वंयाजपणे नि निर्हेतुकपणे प्रेम करतो म्हणून मला देखील त्यांची बूज राखावी लागते, कारण असे भक्त सहसा विरळे असतात. खरे तर अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात

म्हणोनि मज आत्मयाचा भावो जिहीं जियावया केला ठावो एक मीवांचुनी वावो येर मानिलें जिहीं (म्हणून माझ्या आत्मस्वरूपाला जाणून ज्यांनी मला आपला जीवनाधार मानला त्यांनी इतर सर्व कांही तृणवत्, तुच्छ मानले आहे). 
तयां तत्वज्ञां चोखटां (शुद्ध) दिवी पोतासाची (मशालजीचे हातातील मशाल) सुभटा (अर्जुना) मग मीचि होउनी दिवटा (मशालजी) पुढां पुढां चाले  
अज्ञानाचिये राती-माजीं तमाचि (अंधार) मिळणीं दाटती (गडद होतो) तें नाशुनि घाली परौती तयां करीं नित्योदयो  

ऐसा प्रेमळाचेनि प्रियोत्तमें बोलिलें जेथ पुरूषोत्तमें तेथ अर्जुन मनोधर्में निवालों म्हणतसे !  

अहो महाराज, माझ्या आत्मस्वरूपावरचा जन्ममरणरूपी सर्व केरकचरा  तुम्ही चांगलाच झटकून टाकला आहे. हे प्रभो, माझ्या नवीन पारमार्थिक जन्माचा सोहळा मी प्रत्यक्ष पाहतो आहे आणि माझे जीवन सार्थक झाले आहे. आज मी धन्य आहे कारण सदगुरूकृपेने परमेश्वराचे बोलणे मला ऐकतां आले. त्या उपदेशाच्या तेजाने माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले आहे, आणि म्हणूनच हे प्रभो, तुमचे खरेखुरे स्वरूप मला प्रत्यक्ष पाहता येते आहे

अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्
पुरूषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम्  १२॥
(देवा, तूं परब्रह्म, पंचमहाभूतांचा आधार आणि परमपवित्र असून तूंच सर्व देवांचें आदिकारण असलेला अलौकिक, नित्य, व्यापक, उत्पत्तिरहित, दिव्य पुरूष आहेस). 

तरी होसी गा तूं परब्रह्म जें या महाभूतां विसवते धाम (विश्रांतिस्थान) पवित्र तूं परम जगन्नाथा
तूं परमदैवत तिहीं देवां (ब्रह्मा-विष्णू-महेश) तूं पुरूष जी पंचवीसावा (प्रकृतीची चोवीस तत्वें नि पंचविसावा पुरूष - अध्याय दुसरा) दिव्य तूं प्रकृतीभावा-पैलीकडील
अनादिसिध्द तू स्वामी जो नाकळिजसी (सापडत नाही) जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितलें आतां  
तूं या कालत्रयासि सूत्री (सूत्रधार) तू जीवनकळेची अधिष्ठात्री (मुख्य देवता) तूं ब्रह्मकटाह धात्री (ब्रह्मांडाची देवता) हें कळलें फुडे (स्पष्टपणे)

देवा, सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित-देवल, व्यास इत्यादि महर्षी  तुला परब्रह्म, परमधाम, पवित्र पुरूष, शाश्वत, उत्पत्तिरहित, सर्वव्यापक म्हणतात आणि तूं स्वत:देखील मला तसेच सांगतो आहेस

हे प्रभो, या वक्तव्याचा खरेपणा मला आता पटतोय् ही तुमचीच कृपा होय
तैसें शब्दजात आलोडिले (अध्ययन केले)) अथवा योगादिक जे अभ्यासिले तें तैंचि म्हणों ये आपुलें जैं सानुकूळ श्रीगुरू  
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजे (अनुभवाच्या बळावर) अर्जुन निश्चयाचि नाचतसे भोजें (आनंदाने) तेवींचि म्हणें देवा तुझे वाक्य मज मानलें  
एथ आपुलें वाडपण (थोरवी) जैसे आपणचि जाणिजे आकाशें काय मी एतुली घनवट (जड, वजनदार) ऐसे पृथ्वीचि जाणे
तैसा आपुलिया सर्वशक्ती तुज तूंच जाणसी लक्ष्मीपती येर (इतर) वेदादिक मती (बुध्दी) मिरवत वांया  

असे पहा, धावण्याच्या स्पर्धेत मनाला मागे टाकतां आले, किंवा वाऱ्याला हाताच्या वितीने मोजता आले, किंवा केवळ बाहुबलावरआदिशून्यम्हणजे मायासागर तरून जाता आला तरच तुझे यथार्थ ज्ञान झाले असे म्हणता येईल. कारण तूंच तुला खराखुरा जाणतोस. एवढेच नव्हे तर ते ज्ञान तू इतरांनाही सहज सांगण्यास समर्थ आहेस. ‘तरी आतां एक वेळ घाम पुसीं आर्तीचिया निढळींचा (इच्छारूपी कपाळावरचा) !  
खरे तर तुझी थोरवी पाहून तुझ्याजवळ उभे राहण्याचीही माझी लायकी नाही हे मी जाणून आहे श्रीकृष्णा, तरी पण तुझी विनवणी करायलाही जर मी आत्तां घाबरलो तर दुसरा कुठला उपाय मला दिसत नाही
भरले समुद्र सरिता चोंहीकडे परि ते बापियासि (चकोर पक्षी) कोरडे कां जै मेघौनि थेंबुटा पडे तैं पाणी कीं तया  
तैसे श्रीगुरू सर्वत्र आथी (आहेत) परि कृष्णा आम्हां तूंच गती हें असो मजप्रती विभूती सांगें (कारण ज्या विभूतींद्वारें तूं सर्व लोक व्यापून आहेस त्या आपल्या दिव्य विभूती सांगण्यास तूंच योग्य अधिकारी आहेस). १०/१६॥ 

क्रमश:.......




This page is powered by Blogger. Isn't yours?