Friday, November 27, 2020

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे दहा ११०

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे दहा ११० 


शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर:     

गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्    ॥१५/८॥” 


(ज्या प्रमाणे वारा फुलांतील सुगंध वाहून नेतो तसे शरीर सोडतांना जीवात्मा आपल्या बरोबर वासना, मन आणि पाचही इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द स्पर्ष रूप रस गंधादि तन्मात्रा लिंगदेह स्वरूपात घेऊन जातो


जीव जेव्हा एखाद्या शरीरांत प्रवेश करतो तेव्हाच त्याला कर्ता किंवा भोक्ता असे म्हटले जाते. असे पहा, कोणी व्यक्ती आपल्या सर्व परिवारासह एका मोठ्या राजवाड्यात राहायला जाते तेव्हा ती श्रीमंत किंवा विलासी मानली जाते. अगदी तसेच धनंजया, स्थूल देहात प्रवेश करताच विषयभोगांचा धुमाकूळ आणि कतृत्वाचा अहंकार वाढू लागतो. आणि जुना देह सोडून दुसऱ्या देहात शिरतांना तो जीव सर्व वासना आपल्या बरोबर घेऊन जातो

जसा अपमान झालेला अतीथि आपल्या बरोबर यजमानाने मिळवलेले सुकृत किंवा पुण्य घेऊन जातो. अथवा कळसुत्री बाहुल्यांचा खेळ सुरू असतांना अचानक दोरी तुटावी, अथवा सूर्यास्त होतांच अंधारात दिसेनासे होते, किंवा वाऱ्याच्या झोताबरोबर फुलांचा सुगंध घेऊन जातो -तसेदेहराजजीवात्मा जेव्हा शरीर सोडून बाहेर पडतो तेव्हा मनासकट सहाही इंद्रियें बरोबर घेऊन जातो


श्रोत्रं चक्षु: स्पर्षनं रसनं घ्राणमेव    

अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते     ॥१५/९॥


(हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मनाच्या साहाय्यानेच विषयांचा उपभोग घेतो


मग येथ अथवा स्वर्गीं जेथ जे देह आपंगीं (अंगिकारतो) तेथ तैसेचि पुढती पांगीं (विस्तारतो) मनादिक  

जैसा मालवलिया दिवा प्रभेसि जाय पांडवा मग उजळिजे तेथ तेधवां तैसाचि फांके  

(या मृत्युलोकात किंवा स्वर्गात हा आत्मा जेव्हा देह धारण करतो तेव्हा मनासह सर्व इंद्रियें पुन्हा कार्यरत होतात. असे पहा, दिवा मालवल्यावर त्याचा उजेड नाहीसा होतो नि पुन्हा प्रज्वलित करतांच प्रकाशमान होतो.) 


अविवेकी, मूढ लोकांच्या दृष्टीने जन्म-मृत्यूची राहाटी   किंवा सुखोपभोग आत्मा सोसतो असे त्यांना वाटते. खरेतर येणेजाणे किंवा सुखोपभोग घेणे हे प्रकृती, मायेमुळे देह भोगतो ज्याचा आत्म्याशी तिळमात्र संबंध नसतो


उत्क्रामन्तं स्थितं वापि भुन्जानं वा गुणान्वितम्  

विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष:    ॥१०॥” 

यतन्तो योगिनश्चैनं पश्यंत्यात्मन्यवस्थितम्

यतन्तोsप्यकृतात्मानो नैनं पश्यंत्यचेतस:    ॥११॥


(देह सोडताना किंवा देहात असताना, गुणांनुरूप भोग भोगताना अज्ञानी लोकांना जीवात्मा कळत नाही, पण ज्ञानदृष्टी असलेले त्याला जाणतात. )


असे पहा, नुकतेच जन्मलेले बाळ जेव्हा हालचाल करू लागते तेव्हा एक जीवआलाअसे मानले जाते. आणि इंद्रियांद्वारे जेव्हा तो जीव विविध भोग भोगतो तेव्हा त्याचा आत्मा ते भोग भोगतो असे वाटते

मग तेच भोग जेव्हा क्षीण होऊ लागतात आणि इंद्रियें शांत होतात तेव्हा तोगेला गेलाअशी बोंबाबोंब होते

अरे, झाडें जेव्हा हलताना दिसतात तेव्हा वाऱ्यामुळे तसे दिसते असे म्हणतात. पण जर तिथे वृक्षच नसेल तर वाराही नाही असे म्हणतां येईल का ? किंवा आरश्यांत आपले प्रतिबिंब पाहून आपणआहोतअसे वाटले तर आरसा  पालथा केल्यावर आपण नसतो काय

वास्तविकशब्दहा आकाशाचा गुणधर्म आहे, पण ढगांचा गडगडाट ढगांमुळे आरोपिला जातो ना ? किंवा, मेघांच्या पळण्यामुळे चंद्र धावतोय असे वाटते की नाही


तेसें होईजे जाइजे देहें ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहें आंधळे ते (त्याप्रमाणे शरीराचे येणे जाणे हे वास्तविक अक्रिय असलेल्या आत्म्यामुळे घडते असे ज्यांना वाटते, ते अज्ञानी आंधळे होत !) 

येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं देखिजे देहींचा धर्मु देहीं ऐसे देखणें ते पाहीं आन आहाती (वेगळेच असतात)  


ज्या प्रमाणे उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्यकिरणांना ढग अडवू शकत नाहीत, तसे ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर शरीराचे बाह्य आकार कोलमडून पडतात आणि सद्सद्विवेक बुध्दीचे साहाय्याने तो ज्ञानी केवळ आत्मतत्व अनुभवतो. अरे, आकाशातील तारांगण जरी सागरात पडलेले दिसत असले तरी ते काही तिथे तुटून पडले नसते  हे स्पष्टपणे कळतेच ना

असे पहा, जरी आकाश सागरांत प्रतिबिंब म्हणून भासत  असले तरी ते आपल्या ठिकाणी स्थिर असते. अगदी तसेचशरीरात चैतन्य सळसळताना दिसत असले तरी आत्मा शरीराहून वेगळा आहे हे ज्ञानी पुरूष जाणतात. खळाळणाऱ्या पाण्यांत चांदणेही खळाळत असल्याचे दिसते, पण वास्तविक ते आकाशात चंद्राबरोबरच मश्गूल असते ! किंवा, डबक्यांत दिसत असलेले सूर्यबिंब डबके वाळून जाताच दिसेनासे होते, तसे देह जावो अथवा राहो, ज्ञानी पुरूष केवळ आत्मरूपाने मला पाहतात


घटु मठु घडले तेचि पाठीं मोडले परि आकाश तें संचलें असतचि असे (घागर किंवा घर तयार केले आणि ते तोडून टाकले तरी त्यांतले आकाश जसे आहे तसेच राहते !) 

तैसे अखंडें आत्मसत्ते अज्ञानदृष्टी कल्पितें हे देहचि होते जाते जाणती फुडें (यथार्थपणे)  

चैतन्य चढे ना वोहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञानें चोखटें जाणती ते  


क्रमश



Wednesday, November 25, 2020

 

माझी आई !

 मम मातु: (माझी आई


माझे आईचे नांव होते सौ. शैलजा शंकर रहाळकर, पूर्वाश्रमींची कु. चंद्रानना वासुदेवराव लेले, ऊर्फ सोनी किंवा सोनुताई. जन्म २६ जुलाय १९२१ नि देहावसान ऑगस्ट १९८८

थोडक्यांत, हे तिचे जन्मशताब्दी वर्ष नाही का ? आज त्या निमित्ताने तिच्या वात्सल्यपूर्ण आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करीन म्हणतो

माझी आई अतिशय सुस्वरूप, गव्हाळ वर्णाची, तेजस्वी, मृदु स्वभावी नि गोड गळ्याची. आमचेसाठी जगांतली सर्वांत सुंदर नि सोज्वळ स्त्री. तिने कधी कधी तिच्या किनऱ्या स्वरांत म्हटलेली  गाणी किंवा भजनें माझे कानांत अजूनही गुंजारव करतात. फुलांची नि म्हणून बागकामाची तिला विलक्षण हौस.आमचे राहत्या घरातला चमेलीचा वेल बाहेरच्या अंगणापासून थेट तिसऱ्या मजल्यावरील गच्चीपर्यंत बहरलेला असे. सेगांवला तिने लावलेल्या मोगऱ्याच्या अनेक रोपट्यांना अक्षरश: टोपलीभर फुलें उमलत दररोज. मग आई आमचेसाठी फुलांचे मुगुट, धनुष्यबाण नि तलवारीही करून देई, बहिणींच्या वेण्यांत मोठाले गजरे करून घाली आणि तरीही  अण्णांच्या देवपूजेसाठी भरपूर फुलें उरत. पूजेतील देवांव्यतिरिक्त अण्णा त्यांच्या आईच्या फोटोला सुंदर रीतीने सजवीत

आईचे शिक्षण आजच्या मॅट्रिक इतक्या आठवी बोर्ड पर्यंत ग्वाल्हेर राजवटीतले. मात्र त्या नंतर बरेच वर्षांनी तिने मॉन्टेसरी आणि गृहोद्योगाचे शिक्षण स्वेच्छेने आणि यशस्वीरित्या पूर्ण केले. नवनवीन प्रयोग करण्यांत ती खरोखर पटाईत होती. घरच्या घरी साबण निर्मिती, टाकाऊ वस्तूंच्या लगद्यापासून कागद निर्मितीचा प्रयोग नि पुढे भास्कर इंजिनियर झाल्यावर मिनि-फौन्ड्री सुरू करून नॉनफेरस मेटल च्या टेबल मॅट्स कितीतरी वर्षे आम्ही वापरत होतो ! असो

असे प्रयोग स्वयंपाक घरांतही राबवणे साहाजिक होते. आतांच्यारेसिपीजसारख्या नवनवीन रेसिपीज ती तयार करी नि इतरांनाही शिकवीत असे. त्या काळींजेली किंवा कस्टर्डसारखे पदार्थ कुतुहलाचे असत, शिवाय विविध प्रकारच्या साच्यांतून काढलेल्या केक्स, बिस्किटे, नि कमळासारख्या साच्यातून  काढलेले तळलेले पदार्थ लक्षवेघक असत. तसं म्हटलं तर प्रत्येकाचीच आई सुगरण असते, पण माझी आई विशेष सुगरण होती हे निर्विवाद

रहाळकरांचा गोतावळा खूप मोठा, नातेवाईक नि मित्रपरिवार देखील. वर्षातून दोन मोठ्या कार्यक्रमांना सर्वांना निमंत्रण असे. एक म्हणजे गणपतींचे दिवसांत घरीं घातले जाणारेब्राह्मण-भोजन’, ज्यांत एकवीस ब्राह्मणांसह सर्व निमंत्रित भोजनास असत आपल्या पूर्ण परिवारासह. पाऊणशे ते शंभर पान होई तेव्हा. दुसरा प्रसंग असे माझे आजीच्या वर्षश्राद्धाचा, ज्यांत सर्व नातेवाईक हजर असत. आणि हा परिपाठ अण्णांच्या बदलीच्या गांवी, इतकेच नव्हे तर आम्ही पुण्यांत आल्यावरही काही वर्षे नेमाने पार पाडला जाई

या शिवाय दर महिन्याला लघुरूद्र नि मंत्रजागराचा कार्यक्रम होई आणि सर्व गुरूजींसकट सर्वांना आटीव दूध आग्रहाने पोटभर दिले जाई. आई स्वत:ही अनेक व्रतवैकल्यें करत असे, त्यांतसोळा सोमवारप्रामुख्याने सांगतां येतील

(पुण्यांत आल्यावर दोन वर्षांनी मला नायडू रूग्णालयांत सुंदर बंगला मिळाला होता. मात्र तो परिसर एकूणच किंचित भयावह असे हे मी मागे सांगितले आहेच. म्हणून आई-अण्णा त्या घरीं येतांच आईने आम्हा सर्वां समवेत चोवीस तास अखंड रामनामाचा जप करून घेतला होता. ) असो


माझ्या आईला गरीब, रूग्ण, विकलांग आणि अशिक्षितां बद्दल विशेष कळवळा होता आणि त्यांना मदत करायचा तिचा अट्टाहास असे. (माझे खेडोपाडीं हिंडून रूग्णसेवेच्या कामाला तिचा भरभरून आशीर्वाद असे. ) 

गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी शिकलेच पाहिजे म्हणून ती त्यांना हरसंभव प्रत्यक्ष मदत करत असे.

अण्णांच्या प्रत्येक कार्याला तिचा भक्कम पाठिंबा आणि प्रत्यक्ष हजेरी असे, त्यांची खरीखुरी सावली, सहचरी म्हणून. खरोखर, मागे वळून पाहतांना त्या दोघांचे बॉंडिंग विस्मयकारक वाटते मला. ‘एक दूजे के लियेहा वाक्प्रचार त्या दोघांनी प्रत्यक्ष आचरून दाखवला


अशा माझ्या माऊलीला शतकोटी प्रणाम

प्रभु रहाळकर

२४/११/२०२० 

भाग दोन

वास्तविकआईविषयीं लिहायला बसलो की वेळ नि तपशिलाचे भान हरपणे स्वाभाविक ठरते. गेले काही दिवस आईच्या आठवणींनी आणि तिच्या स्वभाव-वैशिष्ठ्यांनी अक्षरश: व्यापून टाकले असल्याने मनाचा हा बांध पुन्हा फोडीन म्हणतो. (माझ्या या स्वभाव-वैचित्र्यालातहे दिलसेसहन करीत राहा अशी सलगीची विनवणी करतो ! ) (स्वभाव-वैशिष्ठ्य नि स्वभाव-वैचित्र्यांत काय फरक आहे म्हणतां ? आईच्या विशिष्ट नि माझ्या विचित्र स्वभावात आहे तेव्हडा ! ! ) असो असो .

खरंच, आई अजिबात गर्विष्ढ नव्हती मात्र स्वाभिमानी अवश्य होती. भगिनी-मंडळ असो वा नातेवाईक, ती आपल्यागरीमाला कधी आंच येऊ देत नसे. चारचौघांत वावरताना तिचाखानदानीव्यवहार नेत्रदीपक असे. ती कुणाचाच सरळ सरळ अपमान करीत नसे, मात्र ज्याला त्याला आपलीजागापाहूनच वागावे लागे ही वस्तुस्थिती आहे

अत्यंत स्वाभाविकपणे तिच्या मुलांना कुणी उगाचच भलेबुरे बोलणे तिला सहन होत नसे. (या निमित्ताने एककिस्सासांगतो. होळकर कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉक्टर भागवत माझे सायन्स-मॅथ्सचे मार्क्स पाहून अण्णांना म्हणाले होते - ही इज डफ्फर इन सायन्स ॲंड मॅथ्स, रादर सेंड हिम टु आर्ट्स  ! मला काही ते फारसे कटु वाटले नव्हते -ती वस्तुस्थिती असल्याने- मात्र आईला ते शब्द चांगलेच झोंबले होते. मी डॉक्टर झालो तेव्हा हातात पेढ्याचा पुडा देत तिने मला सांगितले होते की जा त्या भागवत डॉक्टरांकडे आणि सांग त्यांना की तुमचाडफ्फरआज डॉक्टर झालाय म्हणून ! ) 


आपल्या मुलांना वाईट संवई लागू नयेत म्हणून ती कायम दक्ष असे, अर्थात हे इतर कोणी करावे हेही तिला मान्य नसे. (पुन्हा एक किस्सा ! एकदा दुपारी आई झोपलेली असतांना मी गुपचुप जिन्याखालच्या कोनाड्यातून दोन आणे उचलून बाहेर आलेल्यागंडेरी वाल्याकडून गंडेरी (उंसाचे कर्वे किंवा सोललेले काप) घेतले. मात्र तसे करताना शेजारच्या काकूंनी पाहिले होते नि चार वाजतां मुद्दाम सहज म्हणून हा प्रकार आईला सांगितला. आईने माझ्याकडे नुसते रोखून पाहिले नि माझा रडवेला चेहरा पाहून काय ते समजली. मात्र काकूंना तिने सांगितले की मीच त्याला पैसे देऊन ठेवले होते माझी झोपमोड नको म्हणून ! काकू गेल्यावर मला एवढेच म्हणाली की पुन्हा विचारतां पैसे उचलायचे नाहीत, चोरी म्हणतात त्याला. या एकाच प्रसंगानंतर मी कधीचचोरीकेली नाही - अगदी बायकोच्या पर्समधून देखील ! ) 

तथापि आमच्या चुकांवर कठोर शिक्षा असे आम्हाला. आपल्या पायांचे अंगठे धरून देवासमोर तास दोन तास ओणवे उभे राहण्याची, किंवा कोपऱ्याकडे तोंड करून उभे राहण्याची. हाताने मारझोड सहसा नसे पण आमचे दोन्ही हात हातात धरून ती आमच्या पावलांवर स्वत:चे पाय दाबून धरी चिरडल्यासारखेकाय ताकद होती तिच्यांत, बापरे


कोणतेही काम तुच्छ नाही हा पाठ तिनेच आम्हां सर्व भावंडांत रुजवला. घरीं देवराम वगैरे गडीमाणसे असूनही आपले काम आपणच करण्याची ताकीद असे. केवळदळणआणायला तिची कुणास ठाऊक का, पण मनाई असे. तथापि एकदा संडासांतले लोखंडी डबे सडले होते म्हणून नवे डब्बे  सायकलवर लादून मी आणलेले पाहून माझ्या आतेभावांनी जेव्हा माझी टर उडवायचा प्रयत्न केला तेव्हा वाघीणीसारखी चवताळून म्हणाली होती की प्रभूचा मला अभिमान आहे की तो हे ही काम करू शकतो म्हणून

आम्हा भावंडांचे शिक्षणात खंड पडू नये म्हणून अण्णा एकटेच बदलीच्या गावीं राहात, चक्क चौदा वर्षें ! त्यामुळे इंदूरचे सर्व दैनंदिन व्यवहार आईलाच पाहावे लागत, नि बरेचशी खरेदीची कामे मी करत असल्याने ती मलाबझार मास्टरम्हणे ! देपाळपूरला अण्णा असतांना तिथे म्हैस ठेवली होती आणि दररोज सकाळी सात वाजतां तीन शेर दूध पहिल्या बसने धार-नाक्याच्या स्टॅंडवर येई, ते मी सायकलवरून घरी आणत असे. म्हणून मलादूधवालाम्हणणाऱ्यात्याभावंडांवर आईलक्ष ठेऊनअसे


आईला कलाकुसरीचाही छंद होता. तिचे ड्रॉइंग उत्तम होते. मेडिकलच्या पहिल्या नि दुसऱ्या वर्षीं मला शरीराच्या विविध अंगांची (डिसेक्टेड) रंगीत चित्रें आमचे जर्नल मधे काढावी लागत. माझी ती प्रचंड पुस्तके आणि भरपूर अभ्यास पाहून आईने आपण होऊन ती किचकट चित्रें अतिशय हुबेहूब सुंदर रेखाटून दिली होती रंग भरून. मला फक्त लेबलिंग करावे लागले

माझी आई हरहुन्नरी होती यांत शंकाच नाही. माझ्यासारखे माझ्या सर्व भावंडांचे आपापले अनुभव आहेत हे मी जाणून आहे, म्हणून थोडे त्यांचेकडूनही ऐकण्यासाठी मी तूर्त थांबतो


प्रभु रहाळकर

२५/११/२०२० 




This page is powered by Blogger. Isn't yours?