Tuesday, August 27, 2019

 

आरोग्य धाम खंड बारा

आरोग्य धाम खंड बारा 

पुढील सर्व घटना त्याचे अपेक्षेच्या विपरीत घडत गेल्या. मात्र आता मागे वळून पाहतांना त्याला जाणवतंय् की त्या साहाजिकच होत्या

लग्नापूर्वीं त्याच्या भावना उचंबळून येत होत्या पौर्णिमेच्या समुद्रासारख्या. मात्र लग्नाचे दिवशीं त्या अचानक ओसरूं लागल्या अमावस्येगत ! कदाचित् त्याच्या नशिबात पौर्णिमा लिहिलेली नसावी. नि अमावस्या ? आपल्या एकुलत्या एक मुलाच्या, वनविहारीच्या, मृत्यूसमयीं देखील ते गडद अंध:कारांत बुडाले नव्हते

त्यांचा विवाह झाला आषाढातील एकादशीला. या देशांत अशा मुलींची अजिबात कमतरता नव्हती ज्या डोईजड किंवा नकोशा झालेल्या असतील. एखादा समर्थ पुरूष हे ओझे सहज उचलू शकतो पण दुर्बल माणसाला ते ओझे नकोसे होते, कधी टाकतो असे होऊन जाते. आणि या जगांत दुर्बळांची संख्याच जास्त आहे

त्याला दहा मुली सांगून आल्या होत्या. मात्र त्यांतील सहांची पार्श्वभूमी समाधानकारक नव्हती. जगत् महाशयांनी चार पोरी पाहिल्या नि त्यांतील एक निवडली, एका म्हाताऱ्या वकीलाची अनाथ पुतणी. त्यांनी हुंडा म्हणून धान्याच्या एका दाण्याचीही मागणी केली नाही. मुलीचे नांव होते कृष्णभामिनी नि ती दोनच महिन्यांनी पंधरा वर्षांची होणार होती, अविवाहित मुलीच्या मानाने बरीच मोठी ! खरंतर तिला वयस्कर दासी म्हणणे अधिक उपयुक्त ठरले असते. सुरेन्द्रने तिला शोधून काढले होते
विवाह सोहळा जगत् महाशयांच्या प्रतिष्ठेला  साजेसा  दिमाखांत पार पडला. शिवाय ते ख्यातनाम कविराजही होते. हे दुहेरी वैभव जणू  चंद्र-सूर्याचे एकाच आकाशातील तेज म्हणता येईल. जीवन एकुलता एक मुलगा असल्याने विवाह सोहळा गाजावाजांत होणे क्रमप्राप्त होते.   भप्पी आणि मंजरीच्या  लपूनछपून नि घाइघाईत केलेल्या लग्नापेक्षा कितीतरी वेगळा. बॅंडवाले कांदीहून मागवले गेले. त्या प्रांतांत मुर्शिदाबाद इथे पहिले बॅंडपथक झाले नि नंतर कांदींला तो मान मिळाला. नबग्रामपासून कांदी वीस मैलांवर होते, तिथल्या नवपरिणित जोडप्याची झोपमोड होऊ देण्याइतपत लांब ! अर्थात् विवाहाची बातमी तिथपर्यंत पोंचण्यास वेळ लागला नाही या बॅंडपथकामुळे
वधूचे घरीं पोचेस्तवर जीवन खूपच थकलेला होता. सोहळ्यानंतर वर-वधू मित्रमैत्रिणीं बरोबर रात्रभर धिंगाणा घालणार होते. मात्र थकलेल्या जीवनने त्या मस्करी करणाऱ्या मुलींची क्षमा मागून, बरे वाटत नसल्यामुळे या सर्व धिंगाण्यातून मुक्त करण्याची विनंती केली
मात्र त्या मुलींना मौजमजेवर पाणी सोडण्याची इच्छा नव्हती म्हणून जीवनला त्या म्हणतील तसे वागावेच लागले

शुध्द सोन्याप्रमाणे कृष्णभामिनी चकचकीत गोरीपान होती मात्र तिचेजवळ फक्त मोहक हावभाव असते तर तिला सौंदर्यभामिनी म्हणता आले असते. वयाच्या चौदाव्या वर्षीं जेव्हा ही नववधू सासुरवाशीण झाली त्या वेळीं सर्वांचे डोळे दिपून गेले होते. जीवनच्या आत्त्याने तिचे नामकरणअतर बहूअसे करतांना म्हटले होते, “अत्तरासारख्या सुगंधाने सर्व घरदार तुझ्या गुणांमुळे दरवळून आनंदीआनंद पसरवूं देत!” 
मीलनाची पहिली रात्र आली पण जीवन थंड होता, निरीच्छ ! मेव्हण्या नि आज्जींनी नेहमीचे विनोद नि थट्टामस्कपी केली मात्र जीवन या सर्वांतून यांत्रिकपणे वावरत होता एखाद्या कठपुतळीसारखा . प्रतिशोधाची धार कधीच बोथट झाली होती, आग विझलेली नि केवळ काजळी तेव्हढी शिल्लक. तो अतीव निराशेच्या गर्तेंत पडला होता

लग्न करून तो आपल्या विरोधकांना नामोहरम करेल हा त्याचा कयास चुकला होता. हा गोड प्रतिशोध नसून केवळ अर्थहीन विवाह ठरला !  

अपमानाची नामुष्की बदला घेतल्याशिवाय पुसून काढतां येत नाही, आणि मग ती आग समोरच्यावर परतवली जाते. मात्र तसे घडेपर्यंत ते शल्य शेवटपर्यंत उरांत बाळगावेच लागते. फक्त दिलदार माणसेंच क्षमा करू शकतात, पण असे पुरूष खरोखर विरळ असतात

आपण थोर असल्याचा आव जीवन महाशयांनी कधीच दाखवला नाही. आंतून ते नक्कीच जळत राहिले मात्र इतरांना त्यांनी तसे जाणवू दिले नाही. फक्त अतर बहूला तें माहीत होते, अगदी पहिल्या दिवसापासून
इतरांपासून काळजीपूर्वक दडवलेले त्यांचे शल्य मात्र या नववधूला जिव्हारीं लागले होते आणि लग्नाच्या पहिल्याच रात्रीं चेंडू जीवनच्या भाळीं आपटला
मध्यरात्र कधीच उलटून गेली होती. जीवनने नववधूला जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण तिने विरोध केला. ‘सोडा मला’, ती कडवटपणे धुसफुसली
कां, काय झालं ?’ 
कांही नाही. एवढंच की मला नाही आवडत असलं कांही.’ 
आवडत नाही ?’
नाहीच. कृपा करून सोडा मला.’ 
काय झालंय् ?’ 
काही नाही, शेवटी तुम्ही दया येऊन लग्न केलंय् माझ्याशी म्हणून मी ऋणी आहे तुमची. मी एक दासी म्हणून आलेंय् या घरांत आणि जेवायला दोन घास मिळावे म्हणून सेवा करून मी माझे कर्तव्य पार पाडीन. मला तुमचेकडून प्रेमाची अपेक्षा नाही. म्हणून सोडा मला !’ 

नंतर हे असे वरचेवर घडत राहिले. एखाद्या व्होल्क्यानो प्रमाणे ती उसळत असे नि एकदा सुरूवात झाली की थांबणे तिला माहीतच नव्हते. बिच्चारी

अशा कौटुंबिक वातावरणांतही त्यांची समृध्दी आणि कीर्ती वाढत गेली आणि ती तसे नेहमी बोलून दाखवीत असे. ‘तुम्ही दोन हातांनी कमवतां आणि चार हातांनी खर्च करून टाकतां. तुमचेकडे यश, कीर्ती नि दौलत आहे. एखाद्या पुरूषाला आणखी काय हवे ?’ 
एक छान कुटुंब होते ते - तीन सुंदर मुली सरोमा, सुषमा नि सुरमा. शिवाय एक मुलगा वनविहारी. चौघांनी आईचा उजळ रंग घेतला होता आणि वडिलांची तंदुरूस्ती

त्यांनी चांगला नांवलौकिक मिळवला होता पण तो त्यांचे पौगंडावस्थेतील महत्वाकांक्षेपेक्षा कितीतरी कमी तोलामोलाचा ठरला. त्यांनी सागराची अपेक्षा केली होती, मात्र मिळाले जनावरांच्या खुरांनी पडलेल्या खड्यांतले चुळुकभर पाणी ! (अशी म्हण असली तरी खरं तर  एक तळें, जे लोक-कल्याणार्थ उपयोगी ठरले. त्या तळ्यांत उतरण्यासाठी पक्या सीमेंटच्या पायऱ्या होत्या, पाणी शुध्द थंडगार नि भरपूर मासे देखील होते त्यांत! गांवकरी मंडळी तिथून पिण्यासाठी पाणी भरीत नि मालकाला भरभरून आशीर्वाद देत; त्यांत पोहणाऱ्यांना खूप डुबक्या मारतां येत. भरपूर दुवा देत ते समाधानाने निघून जात पण त्या तळ्याचे कच्चे दुवे त्यांना कुठले माहीत असायला ? ज्याचा विस्तार क्षितिजा पलीकडे असेल, ज्यावरून नावा नि मोठाल्या बोटी लीलया संचार करीत किंवा नांगर टाकत असतील, अशा मोठ्या तळ्यालाच आपल्या निराशेच्या गर्तेची जाणीव असेल

आतां या परिपक्व स्थितींत ते स्वप्नरंजन करीत नाहीत. पुरेसा भ्रमनिरास झालाय् त्यांचा. इंद्रधनष्याच्या सात रंगांपैकी त्यांना आता दोनच रंग ठाऊक आहेत, काळा नि पांढरा - उजेड आणि अंधार ! इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची त्यांनी मुळांत आसच का धरली याचे आश्चर्य वाटतेंय त्यांना आतां
असे प्रश्न मनातच येवू नयेत म्हणून बजावतात ते स्वत:ला, पण ते येतच राहतात वारंवार, त्यांना विस्मित करीत
त्यांचे आयुष्यांतले सर्व रंग कधीच उडून गेलेत, दिवस नि रात्रीचे रंगांव्यतिरिक्त ! खरें तर ते स्वत: जबाबदार आहेत याला, कारण त्यांनी आपणहून पुसून टाकलेत तसे विचार. नव्हे, कमकुवत माणसाच्या निराशेपोटी आलेल्या अश्रूंनी नव्हे तर त्यांना ते आतां महत्वाचे वाटत नाहीत म्हणून. गुरूतुल्य असलेल्या वडील जगत् महाशयांची शिकवण त्यांना कायम शिरोधार्य असे. ती शिकवण आतांशा दृष्टिआड होतेय्

जीवन महाशयांना आपली चूक उमगली होती. आपल्या लांब दाढीवर हात फिरवीत ते उद्गारले, ‘बरोबर आहे. ती माझीच चूक होती.’ 

एक प्रकाशझोत त्यांचेवर पडला.म्हणजे अंधार केव्हाच पसरलाय् तर. विचारांचे तंद्रींत वेळेचे भान विसरलेत ते. गतकाळातील आठवणींनी त्यांचे वर्तमान पूर्णपणे झाकले गेलेय्

कोणीतरी, बहुधा इन्दीर किंवा नन्दा घरातून बाहेर येतोय  हातांत कंदील घेऊन. पण कापडाच्या सळसळीवरून ती स्त्री असावी. अतर बहू असेल का ती ? जीवन महाशय लगेच सावध झाले. तिचे आत्तां यावेळीं असे येणे म्हणजे नक्कीच काहीतरी धक्कादायक असणार
होय, अतर बहूच होती ती. तिने कंदील खाली ठेवला नि जवळ आली. उंच गोरीपान नि कपाळावर आणि भांगेंत ठळक सिंदूर माखलेली अतर बहू त्यांचे पुढ्यांत उभी होती. एखाद्या चक्रवर्ती राजाप्रमाणे तिची जीभ हुकुमत गाजवी. जीवन महाशय तिची चेष्टा करतांना म्हणत की  संधी मिळाली तर ती अखिल जगावर सहज राज्य करू शकेल ! त्यावर विचित्र नजरेने त्यांचेकडे पाहात ती म्हणें, ‘अखिल राज्य ? इथे तर एक माणूस देखील माझ्या कह्यांत नाही, तर मग जगाची भाषाच नको !’ 
तिने कंदील खाली ठेवत त्यांचेकडे पाहिले. आज ती विशेष मृदु भासतेय्, नुकताच पाऊस पडून गेल्यावरच्या ओल्या मातीसारखी
तुमचा चहा झाला ?’ तिने काळजीच्या स्वरांत पृच्छा केली
ओह, मी तर विसरूनच गेलों’. 
चहा घ्यायला विसरलांत ? कोणी असे करील काय. नन्दा सांगत होता की तुम्ही चिलिमीला स्पर्षही केलेला नाही आज. त्याने तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तुमचे लक्षच नव्हते. काय झालंय् ? तुम्हाला बरं वाटतंय् ना ? की काही कारणाने उदास वाटतंय् तुम्हाला ?’ 
नाही, तसे काहीच नाही’, जरासे बावचळून ते उत्तरले. ‘जरा विचारांत गढलो होतो इतकेच. रतन मास्तरांच्या मुलाला पाहायला नबग्रामला गेलो होतो. वाटेत निशि ठकुराइन भेटली नि तिने तिच्या पुतणीला पाहून घ्यायची गळ घातली. रतनचा मुलगा खूप वाईट स्थितींत आहे. अर्थात् काही सांगणे कठीण आहे. मात्र या मुलीला पाहिले, अन्त्यांनी दु:खित होत मान हलवली, ‘केवळ पंधरा वर्षांची ही मुलगी आत्तांच दोन मुलांची आई आहे
मुलं खूप गोंडस आहेत नाही ?’ निशिने विचारले. ‘गोंडस ? मृत्यूसारखी आहेत तीं, मी मनांत म्हटलं. खरंतर तीच असणार आहेत आईच्या मरणाला जबाबदार ! आणि तेव्हापासून व्यग्र आहे मी या मुलीसाठी.’ 
तुम्ही हे सर्व त्या मुलीजवळ बोलला तर नाही ना ?’ अतर बहूने काळजीच्या स्वरांत विचारले
नाही. पण तिच्या लक्षांत आलंय् ते. मी बजावून आलोंय् तिला, की रूग्णाला पाण्याचा थेंबही पाजायचा नाही. दुसरा काहीच इलाज दिसत नाही.’ अरे, कोण आहे तिथे
कुणीतरी पुढे आलं नि अतर बहूमागे उभे राहिलं. इंदीर होता तो
अच्छा तूं आहेस तर !’ 
होय. मीच त्याला चहा बनवून आणायला सांगितलं होतं. कसे विसरभोळे आहांत हो तुम्ही ! तुम्हाला तर चहाचे व्यसन आहे नि चिलीमसुद्धा विसरतां का कधी ?’ 
इंदीरने चहाचा चिनीमातीचा कप त्यांचे हातीं दिला
प्या आतां. मी थांबते इथे तोपर्यंत. तो कप इंदीरच्या भंरवशावर सोडणार नाही मी. तीन कप फोडलेत त्याने गेल्या सहा महिन्यात ! इंदीर, आत जाऊन वेलची पावडर आण बरे, समोर फडताळावर ठेवलीय ती.’ 
तो आत गेल्यावर आपल्या पतीकडे वळून ती म्हणाली, ‘काहीतरी लपवतांय् तुम्ही माझ्यापासून. तो हॉस्पिटलचा डॉक्टर तुमचेशी उद्धटपणे बोलला असावा. या नवीन डॉक्टरांना एक प्रकारचा माज असतो. वडीलधाऱ्यांना मान द्यावा हे त्यांच्या खिजगणतींतच नसते. मला ठाऊक आहे कीं तुमचे निदान कधींच चुकत नाही. मोतीची आई तुमचे भाकितानुसार मरेल तेव्हाच त्या तरूण डॉक्टरला कळेल. तुमचेशी सकाळी मी कठोरपणे बोलल्याबद्दल क्षमा करा मला. मला राग आवरता आला नाही. तो मूर्ख शशी ! तुमचेचकडे सर्व काही शिकलेला असून म्हणतो कसा, ‘एका म्हातारीचा पाय मोडतो काय नि आमचे मोशाय महोदय तिच्या मृत्यूचे भाकीत करून मोकळे होतात ! का करतात ते असं ?’ 
मी ठणकावून म्हटलं त्याला, ‘लाज वाटली पाहिजे तुझी तुला. हे कलियुग आहे म्हणून बरे, नाहीतर तुझी जीभ गळून पडली असती एव्हाना !’ 
म्हणजे अतर बहू आज कोपलीय ती शशीवर ! जीवन महाशय अचंभित झाले, मात्र बोलले काहीच नाहीत
अतर बहू त्यांचे उत्तराची वाट पाहात राहिली. तिने वाकून पाहिले पण नवऱ्याचा चेहरा नीटसा दिसेना. श्रावणांतली ती गडद संध्याकाळ होती आणि वयपरत्वें तिची दृष्टीदेखील कमकुवत झालेली. तिने दिव्याची वात थोडी सरकावूव पुन्हा पाहिले. मात्र ते हसत असल्याचे पाहून तिचा राग पुन्हा उफाळून आला. ‘तुम्ही चक्क हसतांय् ? गेंड्याची कातडी आहे का तुमची ?’ ती तिखटपणे कडाडली
अजिबात विचलित होतां डॉक्टर उत्तरले, ‘मग काय करू मी ? मोठ्याने गळा काढू ? ‘ 
ती अधिकच भडकून म्हणाली, ‘छे छे, तुम्ही नाही तसलं काही करणार. देवाने तुम्हाला तसे बनवलेच नाहीये. तुमचेकडे अश्रूही नाहीत नि काळीज देखील. अन्यथा तुम्ही आपल्या मुलाच्या मरणाचे भविष्य इतक्या शांतपणे सांगितले नसते ! मुलगा मरतांना म्हणत होता की त्याला सहा महिनन्यांत मरण येणार हे आधीच माहीत होते नि  तुम्ही  चक्क खोलीचे बाहेर बसून होतात.’ 
अतर बहू ! कृपा करून मला एकटा राहू दे ! मी विचार करत होतो रतन बाबूच्या मुलाचा. मला तपासून पाहायचंय् त्याला काय झालंय् तें .’ 
माफ करा मला,’ धनुष्याच्या तुटलेल्या दोरीप्रमाणे ती तणतणली. ‘माफ करा मी तुम्हाला विचलित केलं म्हणून ! माझ्यासारख्या अनाथ मुलीला हुंडा घेतां पदरात घेतलंय् तुम्ही एक सेवेकरी म्हणून. मला कुठला अधिकार तुम्हाला प्रश्न विचारण्याचा ! ‘ क्षमा मार्काने मला असे म्हणत ती अंधारांत दिसेनाशी झाली
तर अशी आहे ही अतर बहू !’ ते स्वत:शीच स्मित करीत उद्गारले

मात्र ते स्मितहास्य क्षणिक ठरले. एका विचित्र आवाजाने ते दचकले. खरे तर वादविवाद चालू असतांना अतर बहूने कंदिलांची वात वर सरकवली होती नि अति ऊष्णतेमुळे कंदीलाची कांच मोठा आवाज करीत तडकली आणि कंदील विझून सर्वत्र काळोख पसरला होता
त्यांचे स्मित जितक्या लवकर आले होते तेवढेच तांतडीने गायब झाले. त्यांनी पुन्हा आपली विचार शृंखला सांधण्याचा प्रयत्न सुरू केला. ईश्वराने त्यांचेपासून अश्रू ढाळण्याचा हक्क हिरावून घेतलाय् अशी तिची तक्रार असे नि याच विचाराने त्यांचा आनंद मावळलाय्

तुला कसं कळणार अतर बहू,’ एक नि:श्वास टाकत ते उद्गारले, ‘ की ईश्वराने त्यांना समुद्र भरेल इतके अश्रू दिले होते. मात्र वैद्यकीय शिक्षणाच्या शहाणपणामुळे अगस्त्य ऋषींनी समुद्र प्यावा तसे ते कधीच सुकून गेलेत, एक रूक्ष वाळूचा पट्टा मागे ठेवीत ! आणि चुकून काही रत्ने किंवा शिंपलीं असलीच तर तीं देखील त्या अश्रूंच्या खारटपणांत लडबडलेली. तूं कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाहीस, तुला तशी इच्छाच नव्हती कधी ! तूं काय की मंजरी पण. माझ्या आंत काय दडलंय् ते समजून घ्यावेसे वाटलेच नाही तुम्हाला. जाणून घेतले असतेत तर जवळ येऊ शकला असतात माझ्या !’ जीवनने पुन्हा दीर्घ निःश्वास टाकत आपले मौन स्वगत चालू ठेवले

पण त्यांना तरी दोष का द्यावा ? त्यांनी स्वत: कधी मृत्यू पलीकडच्या शाश्वत सुखाचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का ? खरं तर दोघांनाच ते कळले होते. एक होते त्यांचे वडील, त्यांचे पहिले गुरू

त्यांचे वडिलांनी आपले अखेरचे दिवस गंगा किनारीं घालवले होते. त्यांना मुलाच्या असंतोषाची कल्पना होती. आपल्या चिरंजीवाला पवित्र आयुर्वेदाची दीक्षा दिल्यानंतरही दहा वर्षें ते हयात होते. मृत्यूसमयीं त्यांनी जीवनला बजावले होते, ‘जोंवर मृत्यूच्या संकल्पने पासून तुझी मनोधारणा वर उठत नाही तोपर्यंत तुला आयुष्यभर बेचैनी आणि नैराश्य सतावत राहील’. जीवनच्या आईचे वडिलांचे आधीच निधन झाले होते. मात्र तिला सुद्धा जीवनच्या नैराश्याची कल्पना होती, अर्थात त्याचे कारण तिला माहीत नव्हते. तिला केवळ प्रापंचिक कारण असेल असे वाटे. मात्र वडिलांनी अधिक खोलवर विचार करून मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता

विवाहानंतर जीवनने आयुर्वेदाचा अभ्यास मन लावून पूर्ण करण्याचा चंग बांधला. शालेय जीवनांतसुद्धा तो इतक्या हिरिरीने अभ्यास करीत नसे. साहाजिकच वडिलांना याचे खूप नवल वाटे नि ते त्याला उघडपणे शाबासकीही देत. ‘त्याचे शालेय शिक्षणावरून मला फारशी अपेक्षा नव्हती जीवनकडून पण आयुर्वेदाच्या बाबतींत तो नक्कीच तल्लख वाटतो, तरी पण-‘ त्याचेवर नजर खिळवीत ते म्हणाले, ‘तूं चांगलासा छंद जोपासला पाहिजेस. कदाचित संगीत ....किंवा भक्तिगीतें उपयुक्त ठरतील. त्याशिवाय या व्यवसायात टिकून राहणे अवघड आहे’. 
जीवनचे दुर्दैव म्हणायला हवे, कारण वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींचा गाभा त्याचे समजण्या पलीकडचा होता आणि तरीही आयुर्वेदाच्या त्याचे हुशारीबद्दल वडिलांनी गौरवोद्गार काढले होते

अर्थात्, रोगनिदानाबद्दलचे त्याचे नैपुण्य निर्विवाद होते. शिवाय त्या आंधळ्या नि मुक्या मृत्यूची चाहूल तो सहजपणे ओळखायचा, आजाराच्या लक्षणांपलीकडे उभी असलेली पिवळ्या केसांची स्त्री आकृती
आजच्या तुम्हा तरूण डॉक्टरांना ते पटणार नाही : तुम्ही खिल्ली उडवाल या प्राचीन कविराजीची. मात्र त्या काळी कुणाची प्राज्ञा नव्हती  चेष्टा करण्याची, दुर्लक्ष करणे तर राहिले बाजूलाच

जुन्या आठवणींनी जीवन महाशय काहीसे उल्हसित झाले. ‘नारायण, नारायणते स्वत:शी पुटपुटले
मृत्युशय्येवर गंगातीरीं पहुडलेल्य् जगत् बंधू महाशयांनी आपल्या मुलाला प्रश्न केला होता, ‘जीवन, तुला काही विचारायचे आहे ?’ जीवनला आपले रडूं आवरता आले नाही. मनांत साठलेली सर्व मळमळ अश्रूंमध्ये विरघळून गेली. त्याला काहीच बोलवेना
लाज वाटली पाहिजे तुला जीवन ! आयुर्वेदाचा परिपूर्ण अभ्यास करतांना तुला जीवन-मरणाच्या सर्व बाबी ज्ञात आहेत. आणि तरीही तू रडतोस ? मला खरंच वाईट वाटतंय् माझी सर्व शिकवणूक फुकट  गेली म्हणून ! शिवाय, मला कुठलाही मनस्ताप नाही की पश्चात्ताप. मला मरणाची खंत नाही ना भीती. विलक्षण शांतीचा अनुभव येतोय् मला. आणि म्हणून तुला दु:खाने रडण्याचे काहीच कारण नाही !’ 
जीवनने आपले अश्रू टिपले. त्याचे वडील बोलत राहिले, ‘मला ठाऊक आहे की तुझ्या अंतर्मनात नैराश्य दडून बसले आहे. मात्र ते योग्य नाही. तुझ्यापुढे एक समृध्द आणि समाधानाचे आयुष्य वाढून ठेवले आहे’. 
थोडेसे थांबून त्यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली, ‘तरीही हाच विचार घोळत राहिला तर तुझा नाईलाज असेल. मात्र मला सांग, जर तू असाच पश्चात्ताप करत राहिलास तर तुला अमर असल्याची जाणीव कशी होईल, परमानंद माधवाचा अत्युच्च ब्रह्मानंदाचा साक्षात्कार कसा घडेलमला ठाऊक आहे की तुझ्या मनाजोगती वस्तू मिळेस्तोंवर तुला समाधान मिळणार नाही. पण तुझी नक्की इच्छा काय आहे ते तर सांगशील ? कुणी ते शोधायचा प्रयत्न केला आहे काय ? ते काहीही असले तरी तुला तुझे ईप्सित मिळो, तूं कोणत्याही अवस्थेंत अविचल राहावेस आणि सर्व मर्त्य प्राणीमात्रांतील अमरत्व तुला पाहतां यावे नि त्या उत्कट सौख्यांत तुला आनंदाश्रु अनावर व्हावेत, असा माझा आशीर्वाद आहे तुला ! आयुष्यांत केवळ सुखच मिळवायचे असते काय ? ‘
शेवटीं मला एकच सुचवायचे आहे - ज्ञानप्राप्ती आणि आयुर्वेद एवढाच तुझा मार्ग असला पाहिजे. अर्थात् कठीण वाट आहे ती, खरंतर खडतर ! तथापि अडचणींना जुमानतां तुला मात केली पाहिजे, जशी अगस्त्य ऋषींनी दु:खाचे कढ गिळावे तसा अख्खा समुद्र एका घोटांत पिऊन टाकला होता, केवळ मानवाच्या कल्याणासाठी !’ 

जीवनने त्या ऋषीप्रमाणेच मार्ग चोखाळला होता, आपले आयुष्य अगस्ति ऋषींनी मागे ठेवलेल्या समुद्राच्या कोरड्या वाळूसारखे शुष्क नि नीरस. मात्र त्या वाळूच्या प्रत्येक कणांत खारटपण ओतप्रोत भरून असतो तसा ! अतर बहूने तो खारटपणा कधी अनुभवला काय ? नव्हे, ती त्याला केवळ वाळवंट म्हणत राहिली, तिचे उष्ण सुस्कारे त्याला अधिकच ऊष्ण करीत

वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी जीवनने आपले सर्वस्व पाश्चात्य वैद्यकी ज्ञानासाठी वाहून दिले. संपूर्ण देश या नव्या शास्त्राच्या आगमनाने अवाक् झाला होता. पालखीतून जेव्हा डॉक्टर रंगलाल एका खेड्यातून दुसऱ्यांत जात तेव्हा भोई मंडळींच्या हुंकारांनी रस्ते दुमदुमत. डॉक्टर नविन मुखर्जी घोड्यावरून फिरत, धुळीचे लोट उडवीत ! या दिमाखदार संवयींपासून कविराजही मागे नव्हते. जीवनला अॅलोपॅथीची नेहमीच ओढ होती आणि वडिलांच्या निधनानंतर त्याला ती संधी मिळालीही

अंधारांत बसून जीवन महाशय आपल्या दाढीवर हात फिरवीत स्वत:शीच हसत होते, तारूण्यांतील आपल्या चुकांवर ! या जगात माणूस इतरांपेक्षा शतपटींनी स्वत:लाच फसवीत असतो. आणि त्यांनी तसे शोधून काढलंय्, जसे मोठी माणसं लहानांची लबाडी ओळखून काढतात तसं ! खरोखर ती स्वत:शीच केलेली फसवणूक होती हे कळलंय् त्यांना आतां
खरंच केवळ वचनपूर्ती होती का ती ? की अंतर्मनांत दाटून राहिलेली सुप्त इच्छा, ते स्वत: घोड्यावर बसून भप्पी बोसच्या भेटीला - नि मागे पालखींत बसलेली पत्नी

खरं तर हे एकमेव कारण नव्हते त्यांच्या अॅलोपॅथीच्या अभ्यासाला झोकून देण्याचे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी साहाजिकच काही जुने पेशंट गिऱ्हाइक गमावले होते आणि त्यामुळे त्यांना काही लोकांचे  छद्मी उद्गार ऐकावे लागत, कमी होत चाललेल्या प्रॅक्टिस वरून

नवग्राम मध्ये नवीन डॉक्टर आलाय. कृष्णदास बाबूच्या आश्रयाने, डॉक्टर हरीश. मात्र धोक्याची नांदी होती ती. खरंतर जीवन स्वत: घाबरलेले होते
मात्र त्यांचे गुरू डॉक्टर रंगलाल या घडामोडींना वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहात होते. “तूं मला कां प्रिय आहेस हे माहीत आहे तुला जीवन ? कारण तूं कधीं हार मानत नाहीस. या भागातील इतर कविराजांना पहा ! ते नुसते घरांत राहून या नवीन शास्त्रावर बोटें मोडीत बसतात. त्यांना हे आव्हान पेलून आपले स्वत:चे शास्त्र समृध्द करावेसे तर वाटत नाहीच, पण या नवीन शास्त्रांत (ॲलोपॅथी) काय विशेष आहे तेही समजून घेण्याची त्यांची तयारी नाही ! ते अर्धमेले झालेत, पण तूं मूर्तिमंत चैतन्य आहेस. आणि म्हणून तू मला आवडतोस ! मला वाटतं पराभव स्वीकारण्याइतकी नामुष्कीची गोष्ट नाही. माझ्यासाठी ते मरणासारखे आहे. तुम्ही हार मानली तर मेल्यातच जमा होतां ! एक मेलेला माणूस ! कळतंय का तुला हे ?” 
अशा वेळी डॉक्टर रंगलाल सिगार पेटवून झुरके घेत. जीवनला अजूनही तो प्रसंग जशाचा तसा आठवतोय्- अर्धे धोतर गुंडाळलेले, पायांना झोके देत मयूराक्षी नदीकडे एकटक पाहात राहणारे डॉक्टर रंगलाल

पेशंट येत असत तेव्हा. त्या दिवशी एका मुसलमान तरूणाला उचलून आणले गेले होते. त्याचे पोट अचानकच भयंकर दुखत होते. “इथे झोपवा त्याला”, डॉक्टरांनी आज्ञा केली
जीवनकडे वळून ते म्हणाले होते, “याची नाडी पाहायचीय तुला ? सांग बरें हे अपचन किंवा हगवणीमुळे दुखतंय की लिव्हर मुळे”. 
डॉक्टर साहेब, मला तुम्हीच तपासा,” तो रूग्ण कळवळून ओरडला. “मी मरतोय आत्तांच. विष द्या मला. सहन होत नाहीये मला डॉक्टर ! मी सगळीकडे जाऊन आलोंय् आधीच. हकीम, पीर, वैद्य नि कविराज देखील झाले. काली सुध्दा ! पण काहीच फायदा झाला नाही”. 
गप्प बस ! इथे पीर किंवा काली काय करणार मूर्खा ! तूं इतके जास्त मांस खातोस की यांचे काहीच चालण्यासारखे नाही. किती मटण खातोस तूं एकाच वेळीं ? दीड शेर की दोन ? जंत झालेत तुझ्या पोटांत ! कळतंय् का तुला, तीन ते चार फूट लांब !” 
काही तरी द्या हो मला ; सहन होत नाहीये अजिबात !” 
ठीक आहे. पण आधी माझी फी टाक. दोन रुपये माझी फी, नि औषधाचे वेगळे. आधी पैसे मोज नाहीतर काहीच मिळणार नाही तुला !” 
माझ्याकडे एकच रूपया आहे साहेब !” 
मग उद्या देऊन टाक बाकीचे”, जीवनने मध्यस्थी केली.
मूर्ख आहेस तू ! कधीही फुकट उपचार करू नकोस. औषधांची उधारी नको, नाहीतर तुझ्यावर आफत ओढवेल. ते डॉक्टर म्हणून तुझी खरी योग्यता ओळखणार नाहीत. शेवटी जगायला तुलासुध्दा पैसे लागतातच ना ? आपले सर्व कष्ट एक चांगले जीवन जगण्यासाठीच असतात. इथें दानशूरपणाचा मुद्दा येतोच कुठे ? तुम्ही दानशूर व्हायचे म्हटले तर तो मूर्खपणा होय. शिवाय तुम्ही प्रमाद करत असतां. तुम्ही त्या इतिहासातल्या हिंदू लोकांसारखे वागतां. घनघोर युध्दानंतर हिंदू जेव्हा जिंकू लागले तेव्हा मुसलमानांनी थोडा वेळ थांबायची विनंती केली आणि आमच्या शूर हिंदू सैनिकांनी विश्रांतीसाठी ते मान्य केले. युध्द पुन्हा दुसऱ्या दिवशीं सुरू करायचे ठरले. मात्र ऐन मध्यरात्रीं मुसलमानांनी अचानक हल्ला केला आणि हिंदू बेसावध असल्याने ते लढाई हरले. तथापि, ते स्वर्गाला गेले. असे पहा, मला काही स्वर्गसुखाची लालसा नाही !”
त्यांनी पेशंटच्या मदतनिसाला म्हटले, “घरी जा आणि दुसरा रूपया घेऊन ये. पेशंटला राहू दे इथे, तो मरणार नाही, काळजी नको !” 

ते दोघे गेल्यावर जीवनकडे पुन्हा वळून ते म्हणाले, “जगण्यासाठी पैसा लागतो जीवन. आपली फी मागणे म्हणजे काही गुन्हा नव्हे. चोरी, लबाडी किंवा भीक नको पण आपले येणें मागण्यात लाज कसली ? अशा वेळी भीड नको, अन्यथा तुमचे नुकसान अटळ आहे. शिवाय मला शंका आहे की तुम्हाला स्वर्ग तरी मिळेल किंवा नाही


क्रमश:.......



This page is powered by Blogger. Isn't yours?