Wednesday, June 05, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सहासष्ट

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग सहासष्ट 

घायकुतीला आलेला अर्जुन भगवंताला विनवतोय् की देवा तुम्ही सर्व चराचराचे आदि आहांत. मी नतमस्तक आहे. मात्र हे उग्र रूप घेतलेले तुम्ही कोण आहांत ते मला माहीत नसल्याने कृपाकरून सांगावे

देवा, माझे समाधान व्हावे म्हणून तुम्हाला विश्वरूपाबद्दल विचारले तर तुम्ही एकाएकीं त्रिभुवन गिळूं लागलांत ! ही एवढी भयानक मुखें नि शस्त्रें परजणारे हात कशासाठी ? क्षणोक्षणी वाढत जाणारा तुझा क्रोध तर आकाशालाही कमीपणा आणेल ! डोळे वटारून तूं भिववीत आहेस. या वेळीं तूं यमाशी काय म्हणून स्पर्धा करीत आहेस

त्यावर भगवंत म्हणतात,
कालोsस्मि लोकक्षयकृत् प्रवृध्दो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्त:  
ऋतेsपि त्वां भविष्यन्ति सर्वे येsवस्थिता: प्रत्यनीकेषु योध्दा: ३२॥
 (सर्व लोकांचा संहार करणारा आणि त्यासाठी वाढलेला मीकाळआहे आणि त्रैलोक्याचा संहार करण्यास मी प्रवृत्त झालों आहे. तुझ्या व्यतिरिक्त या दोन्ही सैन्यात उभे असलेले सर्व योध्दे  नष्ट होतील). 

तरी मी काळु गा हें फुडें (खरोखर) लोकसंहारावयालागीं वाढें सैंघ (पुष्कळ) पसरिलीं आहाती तोंडें आतां ग्रासीन हें आघवें  
एथ अर्जुन म्हणें कटकटा (अरेरे !) उबगिलों (त्रासलों) मागिल्या संकटा म्हणोनि आळविला तंव वोखटा (उलट) उवाइला हा (खवळला) (अर्जुन म्हणाला की अरेच्चा, या आधीच्या संकटांनी मी त्रासलो म्हणून तुझी प्रार्थना केली तर तूं खवळून अधिकच विक्राळ रूपें दाखवू लागलास !) 

निराश झालेला अर्जुन अधिक कष्टी होऊ नये म्हणून भगवंत म्हणाले की अर्जुना, तुम्ही पांडव मात्र या संहारातून सुखरूप बाहेर पडाल. या मुळें अर्जुनाला धीर आला आणि तो लक्षपूर्वक पुन्हा ऐकू लागला
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले की तुम्ही पांडव तेवढे माझे आहांत हे नीट समजून घे आणि इतर सर्व जग मी गिळून टाकणार आहे. प्रलयकाळाच्या प्रखर अग्नींत लोण्याचा गोळा पडावा तसे सर्व जग माझे मुखांत पडतांना तू पाहिलेस. त्यांतील काहीच मागे उरणार नाही याची खात्री बाळग

तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यं समृध्दम्
मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्      ११/३३॥” 
(म्हणून तू युध्द करण्यासाठी सज्ज हो, यश मिळव, शत्रूला जिंकून समृध्द राज्याचा उपभोग घे कारण या सर्वांना तर मी आधीच मारलेले आहे ; हे सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्तमात्र हो !) 

द्रोणं भीष्मं जयद्रथं कर्णं तथान्यानपि योधवीरान्  
मया हंतास्त्वं जहि मा व्यतिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ३४॥” 
(द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण, तसेच इतर योध्यांना मी मारले आहे त्यांना तू पुन्हा मार. भिऊ नकोस, युध्द कर, त्यांना तू नक्कीच जिंकशील). 

द्रोणांचा पाडु (पर्वा) करी भीष्माचें भय धरीं कैसेनि कर्णावरी परजूं हें म्हण
कोण उपायो जयद्रथा कीजे हें चिंतू चित्त तुझे आणिकही आहे जे जे नावाणिगे (नामांकित) वीर  
तेही एकएक आघवें चित्रींचे सिंहाडे मानावें जैसे वोलेनि (पोतेरें) हातें घ्यावे पुसोनिया (ते सर्व भिंतीवर रेखाटलेल्या सिहाच्या चित्रांप्रमाणे असून ओल्या पोतेऱ्याने सहज पुसून टाकतां येतील). 

म्हणून हा युध्दाचा पसारा नसून तो केवळ आभास आहे, कारण मी आधीच या सर्वांना गिळंकृत केलेले आहे. त्यांना जेव्हा तू माझे मुखांत पडतांना पाहिलेस तेव्हाच यांचे आयष्य संपले नि आत्तां दिसत असलेली फक्त फोलपटें आहेत

म्हणौनि वहिला उठीं (लगेच ऊठ) मियां मारिलें तूं निवटी (निपटून टाक) रिगे शोकसंकटीं नाथिलिया (नसत्या) !  

ऐसी आघवीचि हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरूनाथा ज्ञानदेव म्हणें
मग सत्यलोकौनि गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैसी वाचा विशाळ बोलतां तया
नातरी (अथवा) महामेघांचें उमाळे (लोट) घडघडीत एके वेळे का घुमघमिला (दणाणला) मंदाराचळें क्षीराब्धी जैसा  
(सत्यलोका पासून गंगेचे पाणी जसे खळखळाट करीत खाली येते, किंवा मेघांचे समूह एकाच वेळी गडगडाट करतात, किंवा समुद्रमंथनाचे वेळी क्षीरसागर जसा दणाणतो तसे श्रीकृष्णाचे बोल होते). 

तैसें गंभीरें महानादें हे वाक्य विश्वकंदें बोलिले अगाधें अनंतरूपें  
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें आणि सुख कीं भय दुणावलें हे नेणों परि कांपिन्नलें सर्वांग तयाचें  
सखोलपणें वळली मोट आणि तैसेचि जोडिले करसंपुट वेळोवेळां ललाट चरणीं ठेवी (नम्रपणे खाली वाकून, दोन्ही हात जोडून अर्जुन पुन:पुन्हा श्रीकृष्णाचे चरणांवर मस्तक ठेवीत होता). 

अर्जुन काहीही बोलण्याच्या मन:स्थितींत नव्हता. शिवाय त्याचा गळाही दाटून आलेला. मात्र ही स्थिति सुखामुळे आली कीं भीतीपोटीं, ते तुम्ही श्रोत्यांनी ठरवावे असे ज्ञानदेव म्हणतात. तरीही तसे घडले असावे हे मी संस्कृत श्लोकाचे अनुषंगाने बोललो अशी पुस्ती जोडतात

अर्जुनाने भीतभीत भगवंताला विचारले की देवा तुम्ही आत्तांच म्हटले की मी काळ असून सर्वनाश करणे हा माझा खेळ आहे, हे तुमचे म्हणणे आम्ही खरे मानावे काय ? मला तरी ते खरे वाटत नाही.

कैसेनि आंगीचें तारूण्य काढावें ? कैचें नव्हे ते वार्धक्य आणावे ? म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे बहुतकरूनी  

असे पहा, दिवसाचे चार प्रहर संपल्याशिवाय सूर्य कधीं माध्यानीलाच मावळेल काय ? देवा, तुम्ही जर अखंडितपणे काळ असाल तर उत्पत्ती, स्थिति नि लय एकाच वेळीं व्हावयास पाहिजेत. मात्र उत्पत्तीचे वेळीं स्थिति आणि लय नसतात आणि स्थितिचे वेळी उत्पत्ती आणि लय ! आणि प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि लय लोपलेले असतात
म्हणूनच हें जग प्रापंचिक भोग भोगत असतांना तू त्यांना गिळंकृत करत आहेस हे काही मला पाहवत नाही
त्यावर भगवंताने असे सुचवले की मी या दोन्ही सैन्यांना मारले आहे हे तुला प्रत्क्ष दाखवले आणि इतरेजन त्यांची वेळ आल्यावर मरतीलच. मात्र भगवान् असे थोडक्यांत सांगत असतांनाच अर्जुनाचे लक्षांत आले की सर्व लोक पुन्हा मूळ स्थितीवर आले आहेत

मग म्हणतसे देवा तूं सूत्रीं विश्वलाघवा (अखिल विश्वाचा सूत्रधार) जग आला मा (पहा) आघवा पूर्वस्थिती पुढती (पुन्हा)  
परी पडिलिया दु:खसागरीं तूं काढिसी कां जयापरी ते कीर्ती तुझी हे श्रीहरी आठवीत असे  
कीर्ती आठवितां वेळोवेळां भोगीतसे महासुखाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळावरी लोळत असे  
देवा जियालेपणीं (जीवंतपणी) जग धरी तुझ्याठायीं अनुराग आणि दुष्टां तया भंग (द्वेष) अधिकाधिक  
पैं त्रिभुवनींच्या राक्षसां महाभय तूं ऋषीकेशा म्हणौनि पळताती दाही दिशा पैलीकडे  
एथ सुर नर सिध्द किन्नर किंबहुना चराचर ते तुज देखोनि हर्षनिर्भर नमस्कारित असती  

हे नारायणा, ही राक्षस मंडळी तुझे पायीं शरण येतां पळून चालली आहेत. याबाबत तुला विचारूं म्हटले तर मला एवढे नक्कीच कळते की सूर्योदय झाल्यावर अंधार राहातच नाही

जी तूं महाप्रकाशाचा आगरू (ठेवा) आणि जाहला आम्हासी गोचरू (प्रत्यक्ष) म्हणोनि निशाचरां (राक्षसांची) केरू (दुर्दशा) फिटला सहजें  
हें येतुले दिवस आम्हां काही नेणवेचि (कळत नव्हते) श्रीरामा आतां देखतसे महिमा गंभीर तुझा  

जेथून अनेक सृष्टींच्या रांगा आणि प्राणिमात्रांचे समुदाय उत्पन्न होत असतात, त्या महद् ब्रह्माला दैवी इच्छा झाली आहे. हे भगवंता, तूं अमर्याद, तत्वरूप आहेस ; तूं त्रिकालाबाधित असून तुला आदिअंत नाही ; तूं सत् असत्याच्या पलीकडचा समवृत्तीचा आहेस

तूं प्रकृतीपुरूषांचिया आदी (आधींचा) जी महत्तत्वां तूंचि अवधी (शेवट) स्वयें तूं अनादी पुरातनु  
तूं सकळ विश्वजीवन जीवांसि तूंचि निधान (अधिष्ठान) भूतभविष्याचे ज्ञान तुझ्याचि हातीं
जी श्रुतीचियां लोचनां स्वरूपसुख तूंचि अभिन्ना त्रिभुवनाचिया आयतना (आश्रय) आयतन तूं  
म्हणौनि जी परम तूंते म्हणिजे महाधाम (परमधाम) कल्पांतीं महद् ब्रह्म तुजमाजीं रिगे (शिरते)  
किंबहुना तुवां देवें विश्व विस्तारिलें आहे आघवें तरी अनंतरूपा वानावें (वाखाणावे) कवणें तूंतें  

हे भगवंता, या विश्वांत तूं नाहीस अशी एक तरी गोष्ट आहे ? तूं कुठे नाहीस ? ते असो, तूं जसा आहेस त्या तुला नमस्कार असो

वायु तूं अनंता यम तूं नियमिता (नियमन करणारा) प्राणिगणीं वसता अग्नि तो तूं  
वरूण तूं सोम (चंद्र) स्त्रष्टा (ब्रह्मदेव) तूं ब्रह्म पितामहाचाहि परम आदि जनक तूं !  
आणिकही जें जे कांही रूप आथि (आहे) अथवा नाही तया नमो तुज तैसयाही जगन्नाथा

अशा प्रेमयुक्त अंत:करणाने अर्जुनाने भगवान् श्रीकृष्णाला  वंदन करीत  होता नि तरीही हे प्रभो, नमस्कार असो, नमस्कार असो असे म्हणत राहिला. नमस्कार म्हणण्याखेरिज त्याला दुसरी कुठलीही स्तुती आठवेना ! त्याला शांतपणे बसणेही शक्य होत नव्हते, अशावेळीं प्रेमभावाने तो काय म्हणून गर्जत राहिला हे मी देखील सांगू शकत नाही असे ज्ञानदेव म्हणतात


क्रमश:......


This page is powered by Blogger. Isn't yours?