Wednesday, January 30, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग बावन

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग बावन्न 

प्रथमीं अर्जुनाचा विषादु दुजीं बोलिला योगु विशदु परि सांख्यबुध्दीसि भेदु दाऊनियां तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिल्ं तेचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें पंचमीं गव्हरिलें (सूचित केले) योगतत्व  
तेंचि षष्ठामाजीं प्रगट आसनालागोनि स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेणें  
तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टां जे गती ते आघवीचि उपपत्ती (साद्यंत विचार) सांगितली षष्ठीं  
तयावरी सप्तमीं प्रकृतिपरिहार (भेद आणि निरसनउपक्रमीं करूनि भजति जे पुरूषोत्तमीं ते बोलिले चारही (आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू ज्ञानी)  
पाठीं सप्तप्रश्नविधी (सात प्रश्नांचे निराकरण) बोलोनि प्रयाणसमयसिध्दी (मृत्यू समयीं बुध्दीची स्थिति) एवं सकळ वाक्यावधि  (अध्याय संपेपर्यंत) अष्टमाध्यायीं  
आतां शब्दब्रह्मीं असंख्याकें जेतुला कांही अभिप्रावो पिके तेतुला महाभारतें एके लक्षणे जोडे (असंख्य शब्द असलेल्या वेदब्रह्मामध्यें कर्म, उपासना, ज्ञान यासंबंधीं जेवढें तत्वज्ञान भरून आहे, तें सर्व एक लक्ष श्लोक असलेल्या महाभारतांत सापडते). 

आणि हे सर्व ज्ञान कृष्णार्जुनांच्या संवादरूपाने गीतेच्या सातशे श्लोकांत प्रगट झाले आहे आणि हा नववा अध्याय त्याचे सार आहे ! आतां  या अध्यायाचे मर्म सांगण्यासाठी तुमचीच कृपा मजवर झाली आहे. तर मग मी वृथा गर्व काय म्हणून करावा
असे पहा, गूळ साखर नि राब यांची गोडी सारखीच असली तरी प्रत्येकजण आपल्या रूचीप्रमाणेंच ती चाखतो ना, तसे गीतेतील प्रत्येक अध्यायाचे वेगळेपण दिसत असले तरी मूळ भाव एकच आहे
कोणी स्वत:ला ब्रह्मरूप मानून त्यांचे यथार्थ वर्णन करतात, तर कोणी ब्रह्माशीं एकरूप होत्साते ब्रह्मस्थिती दाखवून देतात
कोणी तें जाणतांच ज्ञेयांत म्हणजे जाणून घेण्यात लीन होतात नि जाणणे, जाणणारा आणि जाण ही त्रिपुटी नष्ट होते

अशा प्रकारें प्रत्येक अध्यायाचे वैशिष्ठ्य असले तरी नववा अध्याय खरोखर शब्दातीत आहे. मात्र त्याचाही अनुवाद मी करू शकलो हा सदगुरो तुमचाच कृपाप्रसाद आहे

ज्याप्रमाणे वसिष्ठ ऋषींची छाटी सूर्यप्रकाशासारखी चमकली, किंवा त्रिशंकू साठी विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली ; अथवा नल-नीलांनी पाषाणांवर राम-नाम लिहून त्यांना तारले नि आख्खे सैन्य त्यांवरून पलिकडे नेले. जन्मल्या बरोबर हनुमंताने सूर्य धरायला आकाशांत झेप घेतली तर अगस्त्य ऋषींनी संपूर्ण सागर आपल्या चुळींत घेतला, त्या प्रमाणे मज मुक्याकरवीं तुम्ही अगम्य, अनिर्वाच्य असे सिध्दान्त लीलया वदवून घेतले.
ते असू देत. राम-रावणाचे युध्द कसे झाले असे म्हणताना ते राम-रावण युध्दासारखे असेच म्हणावे लागते. अगदी तसेच, नवमाध्यायांत  श्रीकृष्णांचे बोलणे नवव्या अध्यायासारखेच म्हणता येईल ! ज्यांना गीतार्थ कळला त्यांनाच त्यांतील तत्वज्ञान कळेल !! 

म्हणूनच गीतेंतील पहिले नऊ अध्याय मी माझे बुध्दीनुरूप वर्णन केले. आतां या ग्रंथातील उर्वरित अध्यायांचे विवेचन ऐका

या भागांत भगवंत अर्जुनाला आपल्या मुख्य आणि गौण विभूती विस्ताराने सांगतील, तें रसपूर्ण विवेचन शांत चित्ताने ऐकावे

देशियेचेनि नागरपणें (मराठी भाषेतील सौंदर्य सामर्थ्यामुळे) शान्तु श्रूंगातातें जिणें (शांतरस श्रूंगारास जिंकेल) तरि ओंविया होती लेणें साहित्यासी  
मूळ ग्रंथीचिया संस्कृता वरि मऱ्हाटी नीट पढतां अभिप्राय मानलिया उचिता कवण भूमी हे चोजवे (संस्कृत भाषेतील मूळ संहितेवरील मराठी निरूपण वाचून अर्थबोध झाला तर मूळ ग्रंथ कुठला असा संभ्रम निर्माण होऊ शकतो). 

जैसें आंगाचेनि सुंदरपणे लेणिया आंगचि होय लेणे तेथ अळंकारिलें कवण कोणें हे निर्वचेना (सुंदर शरीरावर सुंदर अलंकार चढवले तर कोण कुणाचे सौंदर्य वाढवत आहे हे सांगणे अवघड ठरते),
अगदी तसेंच देशी (मराठी) आणि संस्कृत वचनें भावार्थाच्या दृष्टीने एकाच पातळींवर असतात हे तुम्ही पडताळून पहा. भावार्थ समजतांच  सर्व नवरसांचा वर्षाव तुम्हाला जाणवेल आणि चातुर्याला प्रतिष्ठा लाभेल. मराठी भाषेचे लावण्य लुटून रसांना तरूण म्हणजे टवटवीत करून अगम्य असे गीतासार शब्दांत गुंफले आहे

जो चराचर परमगुरू चतुरचित्त-चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता जाहला (त्रैलोक्याचे परम गुरू आणि चतुर जनांच्या चित्त्ताला संतोषविणारे यादवांचे राजे भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका). 

निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात, “ भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की तूं आत्मज्ञानाचे विवेचन ऐकायला मनापासून तयार आहेस ना ?” 


क्रमश:.....

This page is powered by Blogger. Isn't yours?