Tuesday, April 24, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकविसावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकविसावा)
हृदयातील सर्व संशयांचा नायनाट करून युध्दाला पुन्हा उभे राहण्याची सूचना, नव्हे, आज्ञा भगवान् गोपालकृष्णाने अर्जुनाला केली. हे सर्व वृत्त संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे नि तेच आख्यान माऊली आपल्याला अतिशय रसाळपणें सांगत आहेत. तेच व्याख्यान पुढे सांगूया.

‘तंव या पूर्वापार बोलाचा । विचारूनि कुमरू पंडूचा । कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥ ( श्रीकृष्णाच्या मागील नि आत्ताच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कशाप्रकारें हा प्रसंगोचित प्रश्न विचारणार आहे.)
ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां ॥
जयाचिया बरवेपणीं  । कीजे आठां रसांची वोवाळणी । सज्जनाचिये आयणीं (चातुर्य) । विसांवा जगीं ॥
तो शांतुचि अभिनवेल (प्रकटेल) । ते परियसा मऱ्हाटे बोल । जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडें । शब्दाची व्याप्ती तेणे पाडें । अनुभवावी ॥ (चिमटींत मावेल इतके लहान सूर्यबिंब असले तरी त्याचा प्रकाश त्रैलोक्यांत मावत नाही. तसेच हे शब्द लहान नि मराठी भाषेतले असले तरी त्यांची अर्थव्यापकता अनुभवून पाहावी !)

ना तरी कामितयाचिया इच्छा (कामना करणाऱ्या) । फळें कल्पवृक्षु जैसा । बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें । तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥
जेथ साहित्य आणि शांती । हे रेखा (पध्दत) दिसे बोलती । जैसी लावण्यगुण कुळवती । आणि पतिव्रता ॥
आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदीं जोडे (औषध म्हणून मिळाली) । तरी सेवावी ना कां कोडें (आवडीने) । नावानावा (पुन:पुन्हा) ॥

सहजें मलयानिळु मंदु सुगंधु (मलय पर्वतावरून वाहणारा मंद सुगंधित वारा) । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्त्या ॥

तरी स्पर्षें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी । तेवींचि कानांकरवीं । म्हणवी बापु माझा (वाहवा म्हणवेल) ॥

तैसें कथेचें इये ऐकणे । एथ श्रवणासि होय पारणें । आणि संसारदु:ख मूळवणे (समूळ नष्ट होणे) । विकृतीविणें ॥

जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायांच कां बांधावीं कटारें (हत्यारें) ? । रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ! ॥

तैसा मनाचा मारू न करतां । आणि इंद्रियां दु:ख न देतां । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजीं ॥

म्हणौनि आथलिया आराणुका (एकाग्र होऊन ) । गीतार्थु हा निका (उत्तम) । ज्ञानदेवो म्हणें आइका । निवृत्तिदासु ॥


भगवद्गीतेच्या पांचव्या अध्यायाच्या प्रारंभींच  अर्जुन पुन्हा आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न करतो.
अर्जुन म्हणतो,
“संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मय ब्रूहि सुनिश्चितम् ॥
(हे कृष्णा, एकीकडे कर्माचा जाणीवपूर्वक त्याग कर असे सांगतोस नि त्याचवेळी पुन्हा कर्म करण्याचेच महत्व सांगतोस. या दोन्हीपैकीं माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल तेवढेच मला सांग ! )

‘मग पार्थु म्हणें श्रीकृष्णातें । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंत:करणें । विचारूंये ॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हीच निरोपिला होता बहुवसु (परोपरीने) । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु (आग्रह) । पोखीतसां (लादत आहांत) ॥ ऐसें द्व्यर्थ (दोन अर्थाचें) हे बोलतां । आम्हां नेणतयांच्या (अज्ञानी) चित्त्ता । आपुलिये चाडें (इच्छेप्रमाणे) श्रीअनंता । उमजु नोहे (कळत नाही) ॥ ऐकें एकसारातें (एक तत्व) बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजें तुम्हांप्रति ॥

खरें तर मी तुला आधीच विनवले होते कीं गहन तत्वज्ञान अधिकच कठिण करून सांगू नका. पण ते असू देत. आतां तरी मला सांग की या दोन्ही पर्यायांपैकीं माझ्यासाठी कुठला मार्ग उपयुक्त आहे ते . असे पहा, जो आचरण करायला सोपा, हितकर नि निश्चित फळ देणारा असेल असा मार्ग मला सांगावा. आपली झोपमोड न होतां जास्त अंतर कापू शकणारे  वाहन असले तर केव्हाही चांगलेच ना ?

अर्जुनाचा हा युक्तिवाद ऐकून देव मनातून प्रसन्न झाले नि त्याला म्हणाले, ठीक आहे, तर मग ऐक. खरोखर, ज्याची आई प्रत्यक्ष कामधेनूच असेल तर खेळणे म्हणून ती चंद्रही सहज देऊ शकेल. त्या उपमन्यूसाठी भगवान् श्री शंकराने  प्रसन्न होऊन त्याचा दूधभाताचा हट्ट पुरवण्यासाठी आख्खा क्षीरसागर नाही का दिला ?
अगदी तसेच, औदार्याचे माहेरघर असलेला श्रीहरी आज पराक्रमी अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यामुळे त्याला सर्व सुखें अनायासें काय म्हणून लाभणार नाहीत ? आणि यांत आश्चर्य तें काय, कारण श्रीलक्ष्मीनाथासारखा धनी असतांना भक्ताने आपली इच्छा बोलून दाखवायला नको काय ? म्हणून अर्जुनाने जे मागितले ते प्रसन्न होऊन भगवंताने दिले.
भगवान् म्हणाले की अर्जुना तात्विक दृष्टीने कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्ष प्रदान करतात. त्यातून ज्ञानी नि अज्ञानी अशा सगळ्यांना कर्मयोगाचे आचरण करणे सोपे आहे, जसे बलहीन स्त्रिया किंवा लहान मुलांना पाण्यावरून जातांना नाव हे सोपे साधन असते.
सारासार विचार करून पाहिले तर कर्मयोग सोपा दिसतो आणि त्यामुळे कर्मसंन्यासाचे फळ सुध्दां अनायासे मिळते.
म्हणून आतां तुला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो, ज्यामुळे फलप्राप्तीच्या दृष्टीने दोन्ही मार्ग कसे एकरूप आहेत ते समजेल.

“ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति ।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते   ॥

( कोणाचाही द्वेश न करणारा, कोणत्याही विषयाची लालसा धरत नाही, तो नित्यसंन्यासी होय. कारण अर्जुना, रागद्वेश नि द्वंद्वरहित पुरूष अनायासें संसारबंधनांतून मुक्त होतो.)

आपली आवडती वस्तु नष्ट झाली तर जो त्याची खंत बाळगत नाही, कोणत्याही प्रकारच्या विषयभोगाची इच्छा करत नाही आणि मेरूपर्वताप्रमाणें सुस्थिर असतो ; ज्याच्या मनांत ‘मी’ ‘माझे’ अशी भावनाच नाही तो नित्यसंन्यासी असतो हे समजून घे. तो मनानें अहं नि ममतारहित असतो म्हणून त्याचे सर्व वासनांचे, आसक्तिचे बंध तुटून पडतात. त्याला अनायासें सतत सुखप्राप्ति होत राहते. अशा पुरूषाला मुद्दाम घरदार सोडण्याची गरज नसते, कारण ‘अहं-मम’ चा विचार करणारे त्याचे मन स्वभावत:च अनासक्त झालेले असते.

असे पहा, अग्नि विझून गेल्यावर मागे उरलेल्या राखोंडीला कापसांत सहज गुंडाळतां येते. अगदी तसेच, ज्याला विषयभोगांची इच्छाच नाही तो यिषयांच्या सान्निध्यांत असला तरी त्यांत गुंतून पडत नाही.

‘म्हणौनि कल्पना जै सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । या कारणें दोनी सांगडें (सारखे) । संन्यासयोगु ॥ (संन्यासमार्गांत प्रथम संकल्प नाहीसा होणे आवश्यक असते, तरच संन्यास घडतो. म्हणून कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलत: समानच आहेत.)

‘एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ?॥ सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती ते भिन्न । एऱ्हवीं दीपाप्रति काई अनान (वेगळाले) । प्रकाशु आहाती ? ॥ पैं सम्यक् येणे अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोहोंतही ऐक्यभावें । मानिती गा ॥

‘आणि सांख्यीं जे पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥ ( कर्मसंन्याशाला जे फळ मिळते, तेच कर्मयोग्याला ज्ञानमार्गाने मिळवतां येते . म्हणून दोघेही सहजच एकरूप आहेत )

असे पहा, जसे आकाश आणि अवकाश यांत भेद नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि कर्मसंन्यास यांत जो ऐक्य पाहतो, किंवा ज्याने संन्यास आणि योग अभिन्न असल्याचे ओळखले तोच खरा ज्ञानी होय. कारण त्याने आत्मस्वरूपाचे फळ जाणले.

‘जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा (शिखर) । वहिला पावे (त्वरित गाठतो) ॥ ( कर्तृत्वाभिमान आणि फलासक्ती टाकून ईश्वरार्पण बुध्दिने केलेले काम म्हणजेच मुक्तिपंथ होय. त्या मार्गाने मोक्षरूपी पर्वत चढून तो ब्रह्मसुखाच्या शिखरावर त्वरेने पोहोचतो.
मात्र निष्काम कर्मयोगाचें आचरण न करतांच जो कर्मच टाकून संन्यासमार्ग चोखाळतो त्याला संन्यासाची प्राप्ती काही केल्या होत नाही.

खराखुरा योगयुक्त नि विशुध्दात्मा म्हणजे काय, त्याची मीमांसा पुढील भागांत पाहूया !
(क्रमश: ……


Sunday, April 22, 2018

 

आरोग्य धाम (खंड आठवा)

आरोग्य धाम (खंड आठ)
एखादे मंगल कार्य सुरूं करण्याची स्फूर्ती येते तेव्हा वेळ वांया न घालवतां ते त्वरित प्रारंभ करावे. एक म्हण प्रसिध्दच आहे, ‘ॲन एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप’ ! याच संकेतानुरूप जगत् बंधूंनी फाल्गुन महिन्याच्या अखेरीस व्याकरणाचा पहिला धडा जीवनला दिला.
 ‘आयुर्वेदाला’ पाचवा वेद म्हणतात कारण तो प्रत्यक्ष भगवन्ताच्या मुखातून प्रसृत झाला आहे त्या आधीच्या चार वेदांनंतर. तो संस्कृत मधे सांगितला नि लिहिला गेलाय् , ईश्वराच्या भाषेंत.
म्हणून पहिली प्राथमिकता ठरली त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची. मात्र जीवनला व्याकरण शिकण्याची फारशी इच्छा नव्हती कारण त्याच्या मतें ती केवळ घोकंपट्टी असते. अर्थात् सोपी नक्कीच नव्हे. तथापि त्याला त्या भाषेच्या उपयुक्तते बद्दल आदर होता.
जगत् बंधू रूग्णांना तपासत असतांना जीवनने शेजारी बसून एकूणच प्रक्रिया अवलोकन करावी असे त्यांना वाटे. त्या नंतर प्रारंभ होई वनस्पतींपासून औषधें बनवण्याचा, ज्यांत त्यांचा मुलगा त्यांना साहाय्य करत असे.
त्यांनी आपल्या चिरंजीवाला निरनिराळे कंद नि झुडुपांची माहिती शिकवली आणि केवळ नजरेने त्यांना ओळखण्याची किमया सांगितली, ज्यांचा उपयोग औषध तयार करण्यांत व्हायचा.
मात्र जीवनला सर्वात जास्त आवडायची ‘नाडी-परिक्षा’. एका चिकित्सकाचा मुलगा असल्याने लहानपणापासूनच तो काही गोष्टी शिकत आलेला होता, जसे दररोज येणारा ताप किंवा एक नि दोन दिवसांआड येणारा. नि हे तो करायचा नाडीच्या स्पंदनांवरून. मात्र जेव्हा त्याच्या वडिलांनी नाडी परिक्षणाचा प्राथमिक धडा दिला त्यावेळेस तो अक्षरश: अचंबित झाला होता. त्याला अजूनही वडिलांचे ते शब्द स्पष्टपणे आठवतात.
आरंभीची प्रार्थना झाल्यावर जगत् बंधू म्हणाले होते – ‘रोगनिदान करण्यापूर्वी रूग्णाबद्दलची सर्व माहिती घ्यायची असते नि नंतर रूग्णाच्या खोलीत शिरतांच तिथला वास (दर्प) पडताळून पाहावा. पेशंटकडे नीट पहावें डोक्यापासून पायांपर्यंत. मग त्याला काय त्रास होतोय तें विचारावे. त्यायोगें आजारांची लक्षणे समजतील. मग सुरू होतो सर्वात महत्वाचा भाग – रूग्णाला तपासायचा. प्रथम तपासावी नाडी, मग जीभ, नंतर पोट नि आंतडी ; मात्र सर्वप्रथम नाडीच.’
जगत् बंधूंनी त्यावेळेस एक संस्कृत श्लोक म्हटला,
“आदौ सर्वेषु रोगेषु नाडी जिव्हाग्रे संभवम्
परीक्षाम् करयेत् वैद्यक पश्चाद् रोगम चिकित्सयेत्”

‘एक अतिशय अवघड परीक्षा आहे केवळ नाडीचे ठोके तपासून रोगनिदान करण्याची. अर्थात् आरोग्यसंपन्न व्यक्तींची नाडीपरिक्ष त्या मानाने बरीच सोपी असते आणि माझ्या लक्षांत आलंय् की तू सुध्दा ती सहज करूं शकशील.” जगत् बंधू कौतुकाने स्मित करीत म्हणाले.
मात्र पुढच्याच क्षणीं ते गंभीर झाले नि म्हणाले, “या परीक्षेने रोगनिदान तर होईलच पण त्याच वेळी रोगाची व्याप्ती, बरे होण्यासाठी लागणारा कालावधी, इतकेच नव्हे तर आजार जीवघेणा असेल तर मृत्यूची निश्चित वेळ देखील कळूं शकते. ही खरोखर अतिसूक्ष्म अशी अनुभूती असते ज्ञाना पलीकडील. याची पहिली पायरी आहे कमालीचे ध्यान करण्याची संवय. सर्वसाधारणपणे नाडी तपासतांना डोळे आपोआप मिटून घेतले जातात कारण नाडीचे प्रत्येक स्पंदन अतिशय एकाग्र होऊन पाहायचे असते, त्या स्पंदनांचे स्वाभाविक स्वरूप नि ते कुठल्या दिशेने चालत आहेत याचा अंदाज घेत. तुमचे चित्त्त कशाने, अगदी कशानेही आजुबाजूच्या घटनांमुळे विचलित होता कामा नये. जाणीवेच्याही पलीकडे असणारी शक्ती, जी संपूर्ण विश्वनिर्मितीच्या मुळापर्यंत पोहोचते, तिचे आकलन होण्यासाठी एखाद्या योग्याची पात्रता असावी लागते. आयुर्वेदांत प्राविण्य मिळवलेला असा हा योगी आजाराचे स्वरूप नि त्याचे कार्य प्रत्यक्ष पाहून शकतो केवळ नाडी परीक्षेवरून. त्याला समजते त्रिदोषांमघले कुणाचे प्राबल्य आहे ते. वात, पित्त्त नि कफ किंवा श्लेष्म हे ते त्रिदोष होत. त्याचप्रमाणे त्या दोषाची व्याप्तीसुध्दा कळते कोणकोणत्या अवयवांपर्यंत पोहोचलेली किंवा रक्तांत भिनलेली, अगदी गणिताच्या समीकरणा सारखी ! आणि नंतर –“

जगत् बंधू अधिकच गंभीर झाले. “तुम्ही जर आयुर्वेदाचा तात्विक अभ्यास  नि या नाडीपरीक्षेत यशस्वीपणे नैपुण्य मिळवले तर रोगाचे मुळापर्यंत पोहोचण्याचे, नव्हे रोगाचे निश्चित कारण ओळखण्याचे सामर्थ्य  तुम्हाला प्राप्त होऊं शकते.”
जगत् महाशय मुलाकडे रोखून पाहात पुढे बोलूं लागले. “माझ्या वडिलांना एका संन्याशाकडून सर्प-दंशावर एक रामबाण इलाज मिळाला होता. मात्र त्या संन्याशाने वडिलांना सांगितले होते की अशाही काही केसेस असतील ज्यांचेवर हा इलाज यशस्वी ठरणार नाही ; अशा केसेस ज्या प्रत्यक्ष मृत्यूने सर्पदंशाच्या स्वरूपात पाठविलेल्या असतील. अशांसाठी कुठलाही उपचार नक्कीच व्यर्थ ठरतो. त्यावेळेस तो दंशच अंतिम ठरतो. आणखी एक गोष्ट ध्यानात ठेव. बहुधा सर्व आजार उपचार करून बरे करता येतात ; मात्र मृत्यूची सावली आधीच पडलेले आजार बरे करता येत नाहीत. त्यांच्यासाठी सर्व उपचार व्यर्थ ठरतात. आपला पेशा वैद्यकीचा असल्याने परिणामाची तमा न करता सर्वतोपरी उपचार करणे आपले कर्तव्य ठरते. तुम्ही जर नाडीपरीक्षा चोखपणे केलीत तर तुम्हाला खात्रीपूर्वक कळेल की आजार आपल्या धोपटमार्गाने जाईल की मृत्यूच गिळंकृत करील अखेरीस.”
अवाक् होऊन जीवन ऐकत राहिला नि हे सर्व ऐकत असतांना त्याचे अंतर्विश्व जणूं कोलमडून पडले. त्याकाळीं तिथले डॉक्टर रंगलाल हे त्याचा आदर्श बनले होते, एक डॉक्टर कसा असावा या बाबतींत. एक ख्यातनाम डॉक्टर असलेले रंगलाल डॉक्टर पांढऱ्या घोड्यावर स्वार होत, रेशमी कोट घालणारे, सोन्याची चेन परिधान करणारे नि भरपूर मान सन्मान कीर्ती आणि वैभवशाली असलेले. याच डॉक्टरांमुळे त्याला पाश्चात्य मेडिसीन शिकण्याची ऊर्मी आली होती.
मात्र आज वडिलांचे भाषण ऐकताना एका वेगळ्याच ज्ञानाचे दार उघडले गेले त्याच्यासमोर. तो आपले स्वप्न विसरून गेला. “ज्ञानाचे दार उघडा नि तुम्हाला सापडेल अमरत्वाची गुरूकिल्ली !” त्याच्या वडिलांचे उद्गार होते हे. आश्चर्य म्हणजे, जीवनला जणूं त्याची झलक अनुभवतां आली त्यांच्या बोलण्यातून.
त्याचे वडील म्हणत, “एखादी गोष्ट शिकणे वेगळे नि ती समजणे वेगळे. दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या असतात.” आणि जीवन या बाबतींत पूर्ण सहमत होता. धर्मग्रंथांत काय सांगितले आहे याचा ते दाखला देत. “शिक्षण, पाठांतर वगैरे कोणी आत्मसात करेल एकवेळ, पण खरेखुरे गहन ज्ञान केवळ गुरूकृपेनेच प्राप्त करतां येते. तो त्यांचा आशीर्वाद असतो. जेव्हा तुम्ही प्राप्त करून घेतलेले शिक्षण ज्ञानात परावर्तित होते तेव्हा जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पार बदलून जातो. आणि मगच तुम्ही दृष्टी पलीकडले पाहू शकता, जाणिवेच्या पलीकडील संवेदना अनुभवू शकता नि मग नाडी-परीक्षा होते खरें ज्ञान ; तुम्ही मृत्यूची चाहूल जीवंतपणांतच ओळखू शकता.”

जीवनला उमगले होते तें सत्य ! आता जीवन दत्त्त न कचरतां जगाला सांगू शकणार होते ते सत्य वस्तुस्थिती असल्याचे. त्यांच्या प्रदीर्घ आयष्यांतले हे सत्य कधीच झाकोळले गेले नव्हते.

त्याने मोती गोळा करणाऱ्या गोताखोरांची कथा वाचली होती. समुद्राच्या तळाशी मोत्यांचा शोध घेणारे अद्यावत पोषाखांतीले गोताखोर. मात्र खोल पाण्याखालीं दडलेले विलक्षण मनोहारी दृष्य पाहताच ते देहभान विसरून निसर्गाची ती किमया पाहता पाहतां मोती शोधण्याचे विसरून जातात.
आज वडिलांचे भाषण ऐकताना जीवनची अगदी अशीच अवस्था झाली. तो आपली सर्व स्वप्नें, आशा-आकांक्षांना विसरून तो एका वेगळ्याच वातावरणांत वावरूं लागला, मोती शोधणाऱ्या गोताखोरां प्रमाणे. कीर्ती, पैसा नि वैभव यांचा जणूं विसर पडला त्याला.
याच संदर्भांत त्याने एक विचित्र कथा ऐकली वडिलांकडून रोग नि मृत्यूविषयीं आणि त्यांचा परस्पर संबंध उलगडून दाखविणारी. निश्चितपणे एक सुंदर कथा. जगत् बंधू महाशय अस्खलित वक्ता होते. त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीने मुलगा जीवन मंत्रमुग्ध झाला. ते बोलत राहिले –“अर्थात प्रत्येक रोग आपल्यासोबत मृत्यूचा स्पर्ष घेवूनच येतो. महाभारतांत सांगितलंय् की सुरूवातीला ईश्वराने जेव्हा निर्मितीचा प्रारंभ केला तेव्हा त्याला आपल्या कर्तृत्वाचा फार आनंद झाला नि तो न थांबतां निर्मिती करत सुटला. त्याने एकापेक्षा एक सुंदर वस्तू नि प्राणी बनवण्याचा धडाका लावला.
मात्र त्यावेळेस फक्त निर्मिती होत राहिली, विनाशा शिवाय. केवळ जन्म, अंता बिगर. त्याला अचानक एक अस्पष्ट हुंदका ऐकू आला नि पाठोपाठ असह्य दुर्गंध . दचकून ईश्वराने आपल्या निर्मितीकडे पाहिले. काय झाले असेल ? त्याच्या निर्मितीतला एक मोठा भाग जीर्ण, सुरकुतलेला आणि घाणेरडा झाला होता. अती झालेल्या प्रजेच्या भाराने पृथ्वी विव्हळत होती, प्राणी हताश झाले होते नि त्यांची शरीरें दुर्गंधीने व्यापलेली.
विश्व-निर्माता ब्रह्मा विचारांत गढून गेला. एरव्हीं प्रसन्न असलेल्या त्याच्या कपाळावर काळजीच्या रेषा दिसू लागल्या, जणूं स्वच्छ निळ्या आकाशांत काळे मेघ जमून यावेत. आणि अचानक त्याच्या शरीरातून एक सावली बाहेर पडली. त्या सावलीने एका स्त्रीचे रूप घेतले, भगवे वस्त्र परिधान केलेली नि कमल-कळ्यांनी श्रृंगार केलेली. तिचे केंस नि डोळे आणि शरीराचा रंगसुध्दा पिवळा होता. दोन्ही हात जोडून ती नम्रपणे विधात्यासमोर उभी राहिली. खाली वाकून तिने ईश्वराला विचारले – “देवा, कोण आहे मी ? मी काय करायला हवे आहे ? माझी निर्मिती कशास्तव?”
“तूं आहेस माझी कन्या – मृत्यू”, ईश्वर म्हणाले. “तूं निर्माण झाली आहेस विनाश करण्यासाठी – नि हेच कार्य मी तुला सोपवीत आहे.”
कापरेच भरले मृत्यूला ! ती निषेधाने किंचाळली, “एका स्त्रीला तुम्ही असे काम कसे देऊ शकतां ? हे काही स्त्रीचे काम नाही. मला तर हा विचारदेखील सहन होत नाही.”
ईश्वराने प्रेमपूर्वक स्मित केले. “दुसरा पर्याय नाहीये. आणि ज्या कारणासाठी मी तुला निर्माण केलेय् ते तुला करणे क्रमप्राप्त आहे.”
“पण नाही जमणार मला तें.”
“तुला करावेच लागेल.”
मृत्यूने कठोर तपश्चर्या सुरूं केली. अखेर परमेश्वर प्रसन्न झाला. “मी तुला एक वर देईन,” ईश्वर म्हणाला.
“तर मग मला या क्रूर कर्मातून मुक्त करा.”
ईश्वराने नकार दिला. म्हणून तिने अधिकच कठोर तप आरंभले. ईश्वराला पुन्हा प्रगट व्हावे लागले पण तिने तोच वर पुन्हा मागितला. तो देखील नाकारण्यांत आला.
मृत्यू, प्रत्यक्ष ईश्वराच्या मुलीने, क्षणभर आकाशाकडे पाहिले  नि तिने असे ऊग्र तप सुरूं केले ज्याचा कोणी कधी विचारही केला नसेल. ईश्वर जेव्हा पुनःश्च अवतरला त्यावेळेस तिचे ओठ थरथरले नि डोळ्यांतून अविरत अश्रूपात सुरू झाला. ईश्वराने ते अश्रू आपल्या ओंजळींत गोळा केले नि तो तिला म्हणाला, “हे अश्रू पृथ्वीची राखरांगोळी करतील.” त्याच क्षणीं प्रत्येक थेंब एकेका दुष्ट प्रवृत्त्तींत परिणत झाला. “हे सर्व रोग आहेत, ते तुला साहाय्य करतील.”
“पण मी एका नवऱ्याला तिच्या शेजारी झोपलेल्या पत्नीपासून कशी दूर करणार किंवा आईपासून तिचे बाळ कसे हिरावून घेणार ? कुठल्या घोर पापात ढकलताय् तुम्ही मला ?”
“तुला पाप लागणार नाही. शिवाय, तू लोकांना त्यांच्या दु:खांतून मुक्त करशील नि त्यांना नवीन जन्म घेतां येईल. आपल्याच चुकीच्या वागण्याने ओढवून घेतलेल्या रोगांपासून मुक्ती देत तूं त्यांचा उध्दार करशील.”
“पण मी त्यांच्या जवळच्यांचे शोकविव्हल दु:खी चेहेरे पाहूच शकणार नाही. असे प्रसंग मी कसे सहन करणार ?”
“ठीक आहे, मी तुला आंधळे करीन, म्हणजे तुला काहीच दिसणार नाही.”
“पण ऐकू तर येईल ना मला ?”
“छान, तर मग मी तुला बहिरी ठेवीन ! काहीच ऐकतां येणार नाही तुला.”

‘तर, मृत्यू नेहमीच आंधळा आणि बहिरा असतो.’ जगत् बंधू महाशयांनी कथेचा समारोप केला. मृत्यूला ओढून आणतात तिचीच मुलें, म्हणजे  रोगराई ! तरी पण या सर्वांवर अधिपत्य गाजवते ‘नशीब’ !! जेव्हा एखाद्याची ‘वेळ’ भरते तेव्हा त्याला जावेच लागते. अर्थात् कधीकधीं अकाली मृत्यू देखील घडतात पण तो दोष असतो त्या व्यक्तीचाच. कारण तें फळ असते त्याने केलेल्या पापांचे.
मात्र जेव्हा मृत्यूला नशीबाची साथ नसते तेव्हां आपला आयुर्वेद मदतीला धांवून येतो प्रतिकार करायला, रोगाशी झुंज द्यायला. अशा वेळीं रोग मागे सरतो, आंधळा नि बहिरा मृत्यू देखील माघारीं फिरतो.
तथापि जेव्हा एखादी व्यक्ती या पृथ्वीवरचे आपले आयुष्य पूर्णपणे जगली असेल त्यावेळेस नाडीचे स्पंदन स्पष्टपणे दर्शवते की आता मृत्यूचाच विजय अटळ आहे. याचे कारण आता तिला नशीबाची साथ आहे. हा केवळ काळाचा खेळ आहे कारण आता तुम्ही निश्चित वेळ ओळखूं शकतां मृत्यूची, अगदी मिनिट सेकंदाच्या तपशीलासह;  आणि हे शक्य आहे नाडी परीक्षेतून !!
आपल्या मुलाशी हे बोलत असतांनाच भिंतीवरील पाल चुकचुकली. जगत् बंधूंनी वर पाहिले नि जाणीवपूर्वक स्मित केले, “पाहिलंस !”
जीवनला वाटलं की त्याचे वडील पालीचे चुकचुकणे त्यांच्या बोलण्याला अनुमोदन मानत आहेत. पण नाही ! त्याच क्षणीं त्याने पाहिले की ती पाल एका किड्याकडे झेपाऊन त्याला तोंडांत धरते आहे, नि मग सुरू होते सुटायची धडपड !
“अगदी असेच,” प्राणी आणि माणसांतील साम्य दर्शवीत जगत् बंधू  म्हणाले, “जेव्हा माणूस दोन आपत्त्तींशी एकाच वेळी झुंज देत असतो सुसरीने पकडल्या सारखा, तेव्हा त्याचे विव्हळणे नाडीच्या ठोक्यांत स्पष्टपणे जाणवते. अगदीं प्रत्यक्ष पाहात असल्यासारखे” !
नाडी परीक्षेवरून त्यांनी पहिल्यांदा केलेल्या प्रसंगा बद्दल ते सांगू लागले.. “नवग्रामच्या कुण्या गिरीश बाबूची आई अडखळून पडली नि बेशुध्द झाली. त्यावेळेस माझे वडील हयात नव्हते आणि मी बराच नवशिका होतो. जराशा दोलायमान अवस्थेत मी गेलो. नाडीची तऱ्हा काळजी करण्यासारखी भासली पण खात्रीपूर्वक नव्हे. कदाचित् अचानक बसलेल्या आघातामुळे नाडी उच्छ्रुंखल झाली असेल, तरी पण माझा संशय कायम राहिला. मी त्या मंडळींना मला जे वाटले ते सांगितले. मृत्यू नजीक आहे मात्र तुम्ही वाटल्यास अधिक अनुभवी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे पुरूलिया हून संध्याकाळीं वयस्क डॉक्टर आले नि त्यांनी तिला तपासले. नंतरचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत, ते म्हणाले. तिने तोंवर तग धरला तर ठीक, मात्र वर्षाच्या आतच मृत्यू अटळ आहे त्याच सांध्याच्या अति वेदनेमुळे.
गिरीश बाबू अघटित घडण्याच्या भीतीने आईला गंगा घाटावर घेऊन गेले पालखीत घालून. त्या म्हातारीची सुध्दा मनापासून इच्छा होती त्या पवित्र नदी तीरावर प्राण सोडण्याची. मात्र तिला चौथ्या दिवशीं सकाळीच शुध्द आली नि तिला बरे वाटू लागले. एकदा गंगा घाटावर अखेरचे म्हणून गेल्यावर परत येण्याची पध्दत नसल्याने ती तिथेच राहिली. वर्ष पुरे होण्याच्या आठच दिवस आधीं त्याच व्याधीने तिच्यावर पुन्हा हल्ला चढवला, अगदी त्या डॉक्टरांच्या सांगण्या प्रमाणेच. चोवीस तास ती वेदनेने विव्हळत राहिली, नंतर बेशुध्द झाली नि बारा तासांनी मृत झाली.

माझा पहिलाच अनुभव होता तो निश्चित निदानाचा. त्यानंतर अनेक आले. तुलाही कळेल ते. याला खरं तर कुठलेही स्पष्टीकरण देतां येणार नाही. तुम्ही भाग्यशाली असाल तर तुम्हाला ती अंत:प्रेरणा येऊं शकते. तुम्ही किती भाग्यवंत आहांत त्यावर अवलंबून आहे ते, बाळा !

(क्रमश: ………




 

आरोग्य धाम (खंड सातवा)

आरोग्य धाम (खंड सातवा )
होस्टेल मधल्या सहचरांनी आणि मित्रांनी खरंतर जीवनला धोक्याचा इशारा दिला होता, पण आतां बराच उशीर झाला होता. त्यांना कसे कळणार की जीवन मंजरीत पूर्णपणे गुंतले आहेत ते, तिच्याकडून  अवहेलना झालेली असूनही. जीवनला कल्पनाही नव्हती की तो भप्पी नावाचा ढाण्या वाघ सुध्दां मंजरीवर टपून बसलाय् तें ! काही किरकोळ  गैरसमजांमुळे भप्पी त्या मुलीच्या घरी आतांशा जात नव्हता नि त्याच सुमारास आमच्या अस्वलाने त्या घरात प्रवेश केला होता !
जीवनपेक्षा वयाने बराच मोठा असला तरी खूप वेळा नापास झाल्याने एकच वर्ष पुढे होता भप्पी. मेडिकल स्कूलमधे त्याचा तोरा नि नवख्या मुलांना मोठ्या ऐटीत प्रश्न विचारून नामोहरम करण्याबद्दल त्याची ख्याती होती.
“ए पोरा, कुठून आला आहेस तू ? नाव काय तुझं भडव्या”, तो विचारत असे, विशेषत: गरीब नि खेड्याकडील मुलांना.
त्या काळीं श्रीमंतांना उलटून उत्तर द्यायला फारसे कोणी धजावत नसे. नवीन मुलें आपल्या गावाचे नाव अदबीने सांगत आणि मग सुरू होई प्रश्नांची सरबत्त्ती. “अस्सं . तर मग कोणता परगणा नि कोणते ठाणें? आमची पण जमीन आहे तिथे.” मनांत येईल तो आकडा तो सांगे जसे ७०५ किंवा ५०७.
मात्र जीवनशीं बोलताना त्याने जरा नरमपणा धरला होता, कदाचित् जीवनची तगडी शरीरयष्टी किंवा त्याचे भारी कपडे पाहून. एकट्या जीवनलाच तो ‘काय मित्रा’ असे काहीसे आदरयुक्त संबोधन करीत असे. “काय मित्रा, कुठून येणे केलेत ?” त्याने विचारले.
जीवनला ती जवळीक आवडली नव्हती पण काहीशा सावधपणे केवळ “नवग्राम” असे म्हणत त्याने काढता पाय घेतला. त्यावेळी जीवनला एक म्हण आठवली. ‘ओरबाडूं शकणारी नखें, तीक्ष्ण दात नि शिंगधारी प्राण्यांपासून दूर राहावे !’
पण भप्पी अडेलतट्टू निघाला. दोनच दिवसांनी तो जीवनच्या होस्टेल रूमवर दाखल झाला. “मला असं कळलंय् की तुझ्याकडे भारी तंबाखूचा बराच साठा आहे. बघूंया जरा”, तो हक्काने म्हणाला.
खरंतर जीवन सहसा कुणाला बधत नसे पण तो उर्मट नव्हता. जमीनदाराचा मुलगा असूनही त्याच्या रक्तांत श्रीमंतांची मग्रूरी नव्हती. शिवाय भप्पीबद्दल त्याच्या मनांत किंचित असूया सुध्दा होती, कारण तो एका नामवंत घराण्यांतला देखणा नि स्वत:चा डौल सांभाळणारा असा तरूण होता. जीवनने त्याला साजेसा आदर दाखवीत तंबाखूचे झुरके घेऊं दिले. बाहेर पडतापडतां त्याची नजर जीवनच्या डंबेल्सवर पडली. तीं हातात घेऊन तो उद्गारला, “अच्छा, तूं पैलवान पण आहेस तर !”

मात्र एक दिवस ठिणगी पडलीच. सिन्हांच्या घरासमोर तो प्रसंग घडला. जीवन त्यांच्या घरात शिरत असतानाच भप्पी विडा चघळत बाहेर पडत होता. त्याच्या मागे बंकिम नि पाठोपाठ त्याची आई पण येत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची पुन्हा दिलजमाई झाली होती. अर्थात् जीवनला त्याची कल्पना नव्हती.
जीवनने काही भेटवस्तू आणल्या होत्या. एका टोपलीत आंबे, काही फळभाज्या नि गवताच्या पेंढींत गुंडाळलेली मासळी. त्याच्या गावचा एका  इसमाने ती टोपली धरली होती. भप्पीला जीवन तिथे येईल अशी कल्पना नव्हती. त्याने फिसकारत जीवनला विचारले, “हॅलो मिस्टर पैलवान ! तुम्ही इकडे कुठे वाट चुकले ?”
आंतून मंजरीचा खणखणीत आवाज उमटला, “तो आमच्या नात्यांतला आहे; चुलत चुलत आजोबा !” “काय आणले आहे आजोबा तुम्ही आमच्यासाठीं ?” ती बाहेर येऊन आपले हंसू लपवित उद्गारली.
“पाहूंया तरी पैलवान आजोबांच्या टोपलींत काय आहे ते”, भप्पी मागे वळत म्हणाला. त्याने टोपलीत हात घालून खालपर्यंत पाहिले. एक आंबा हातात घेवून त्याने चावा घेतला नि दुसऱ्याच क्षणीं थुंकून टाकला. “हा काय आंबा आहे ? मी उद्याच तुला अस्सल आंबा काय असतो ते दाखवतो. गुलाब-खास नि किशन-भोग. प्रत्येक फळावर लेबल असेल ते कधी खाण्यालायक पिकेल ते !”
तो तरातरा निघून गेला. मंजरीच्या आईने जीवनचे स्वागत केले. “ये, घरीं सर्व मजेत आहेत ना ?”
“होय, सर्व ठीक आहे. पण मला जायला हवे, सर्व सामान बाहेर वऱ्हांड्यात टाकून मी इकडे आलोय हे सर्व द्यायला”. खरंतर भप्पीचे बोलणे त्याला चांगलेच बोंचले होते. त्याला थांबायची इच्छा नव्हती.
“काही तरी खाऊन जा.”
“क्षमा करा. आमचा गाडीवान इथे नवखा आहे. त्याच्यासाठी मला लवकर गेले पाहिजे.”
नंतर खोलीतल्या मित्रांशी बोलताना त्याने आपला संताप व्यक्त केला. मित्रांच्या अविरत प्रश्नांमुळे त्याला घडलेला सर्व प्रकार सांगावा लागला.
“तूं भलतेच साहस करतो आहेस मित्रा. दूरच राहा. मंजरी भप्पी बोसची आहे.”
“असं कसं म्हणतोस ती भप्पीचीच आहे म्हणून ?”
“सहजच. झंझट टाळायचे असेल तर तिच्यापासून चार हात दूरच राहा.”
जीवन थोडा वेळ गप्प राहिला. मग त्याने पुन्हा विचारले, “त्यांचे लग्न ठरलंय् का किंवा साखरपुडा झालाय् ?”
“नाही. तरी पण …..”
“मी जीवन दत्त आहे. तुम्हाला लवकरच कळेल कोण मिळवेल तिला ते. ती अजूनही तिच्या वडिलंचीच आहे ना ? झाले तर मग.”
जीवनने आपल्या आईला गुप्तपणे पत्र लिहून पन्नास रुपये तातडीने पाठवायला सांगितले. तेव्हाचे पन्नास रुपये म्हणजे आजचे जवळपास दोन हजार रुपये !

आणि मग खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली.
भप्पी बोसने सुरूवातीला याला फारसे महत्व दिले नाही. त्याला ठाऊक होते पहिल्याच भेटीत जीवनचे अस्वल म्हणून झालेले नामकरण. ते ऐकून त्याला आश्चर्य नि आनंद झाला होता. मंजरीने बहाल केलेले हे नाव त्याला मनापासून आवडले होते. शिवाय आंबट आंबे किंवा एखाद्या मासळीने तिला जिंकणे शक्य नव्हतेच. त्यापरीस उत्तम आंबे नि विविध भेटवस्तूंमुळे त्याचे पारडें नक्कीच जड होते. शिवाय आपल्या देखणेपणाची जाणीव असल्याने त्याने जीवनला संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून कधीच मानले नव्हते.

जीवनने मात्र पक्का निश्चय केला होता आपल्या साधारण दिसण्यावर मात करण्याचा. त्याने काही खर्चिक संवई आत्मसात केल्या. वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे त्याचे वडील चिंताक्रांत झाले पण पुत्रस्नेहापुढे ते नकार देवूं शकले नाहीत. अधिक पैशांच्या हव्यासापोटी तो आईकडून देखील पैसे उकळायचा.
आणि याची त्याला कधीच खंत वाटली नाही. काय म्हणून वाटावी ? शेवटीं तारूण्याच्या मस्तींत एका सुंदर मुलीला जिंकून घेण्यासाठी तो तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यावर मात करायला निघाला होता. अशी मस्ती फ्क्त तारूण्यातच असते असे नाही. वयाने प्रौढ पुरूष सुध्दा अशा हिकमती करतात ! एखाद्या स्त्रीला जिंकून तिला आयुष्यभर सांभाळण्याची शेखी मिरवणें हा देखील उन्माद म्हणायला हवा. जीवनने सुध्दा आपल्या जमीनदारीचा काही हिस्सा सहज खर्चीं घातला असता, मंजरीला जिंकून घेण्यासाठी. नि याबद्दल त्याला कधीच खंत वाटली नसती.
ज्याप्रकारें त्याची वाटचाल सुरू होती ती याच फलश्रूतीकडे नेणारी स्पष्टपणे दिसत होती. घराकडून आलेले पैसे संपताच त्याने उसने पैसे मागायला सुरूवात केली आणि जीवनला ते सहज मिळणे अवघड नव्हते, कारण अखेर तो एका श्रीमंत बापाचा मुलगा नव्हता काय ? त्या मुलीच्या घरीं अनेक प्रकारच्या भेटवस्तू पाठवण्याचा त्याने धडाका लावला.
रस्त्याने चालतांना दुकानदार त्याला आदरपूर्वक बोलवायचे. “कुठे निघालांत बाबूजी ?” त्याकाळी कांदी शहरात ‘बाबूजी’ हा शब्द जादा आदराचे द्योतक मानला जाई. ‘बाबू’ म्हणजे एक सद्गृहस्थ ; आणि ‘जी’ लावल्यावर तो अधिक मानाचा ! हा शब्द ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटींत रूढ झालेला.
जीवन बाबूजींनी समाधानाने मंद स्मित केले. त्याची उस्मान शेख नावाच्या सर्वात मोठे स्टेशनरीचे दुकान चालवणाऱ्या इसमाशी घनिष्ट मैत्री झाली होती. जीवन त्यांना चाचा जान या नावाने संबोधत असे नि ते त्याला प्रेमाने बाप जान म्हणत. उस्मान स्टेशनरी सामानाबरोबरच उत्तम बूट आणि तंबाखूचा ही व्यवसाय करीत होता. पक्का बनिया असलेल्या उस्मानने जीवनच्या नावावर उधारीची वही सुरू केली होती. जीवनला काही खरेदी करायची नसतानाही ते त्याला अगत्याने दुकानात बोलवून घेत.
“हॅलो बाप जान, या आंत या”.
“कशासाठी चाचा जान ?”
“अरे, मी तुझी तीन चार दिवसांपासून वाट पाहतोय. मुर्शिदाबाद हून एक खास परफ्यूम आणलंय् तुझ्यासाठी. पाहा तर खरं “. त्यांच्यातला व्यापारी उद्गारला. “अत्त्तर झक् मारेल याच्यापुढे, मुर्शिदाबादच्या व्यापाऱ्याचे चॅलेन्ज आहे हे. घेऊन जा तुमच्या राजपुत्रासाठी !” म्हणून आणलंय् ते तुझ्यासाठी. दोन बाटल्या आहेत या, एक तुझ्यासाठी नि दुसरी —-“ तो हसून बोलायचा थांबला.
त्यांनी दोन्ही बाटल्या व्वस्थित पॅक करून जीवनच्या हातांत कोंबल्या.
“किती पैसे ?”
“त्याची फिकिर नको. खरं तर भप्पी चाचाला कळलंय् यांच्याबद्दल नि त्याने मागितल्यासुध्दा. पण मी त्याला शिल्लक नाहीत म्हणून सांगितलंय्. गुपचुप घेऊन जा. वहीत रक्कम लिहून ठेवीन मी, लवकरच आदा कर म्हणजे झालं.”
त्यानंतर जीवन जाणूनबुजून भप्पीच्या आसपास राहूं लागला परफ्यूम लावलेल्या रूमालाने मुद्दाम वरचेवर चेहरा पुसत. भप्पीच्या प्रश्नार्थक नजरेने त्याला गुदगुल्या होत राहिल्या. मंजरी वापरत असलेले परफ्यूम याच्याकडे कसे हा प्रश्न भप्पीला भेडसावत राहिला.
जीवनला मात देण्यासाठी भप्पीने अगदी तसेच परफ्यूम येनकेन प्रकारेण मिळवलेच. दुसऱ्या दिवशीं जेव्हा ते परफ्यूम मिरवित भप्पी जवळून गेला तेव्हा जीवनला वाटले की त्याने ते थेट मुर्शिदाबाद हून मागवले असावे. पण त्याला कल्पनाही नव्हती की जीवनने मंजरीला दिलेली ती भेट भप्पीच्या कधीच स्वाधीन केली होती प्रत्यक्ष मंजरीनेच !!

आतां इतक्या वर्षांनंतर जीवन महाशयांना हंसू फुटतेय् ते प्रसंग आठवतांना. ते खरंच प्रेम म्हणायचं की तारूण्यसुलभ मूर्खपणा, ज्यामुळे त्यांचे आयुष्य ढवळून निघाले होते.
अखेरचा पडदा पडेपर्यंत जीवन हेच समजून होता की दोघांमध्ये तोच वरचढ आहे नि तोच जिंकणार मंजरीला. भप्पीलाही तशी कल्पना असावी अशी त्याला खात्री होती.
खरंतर भप्पीसुध्दा जरा साशंक झाला होता प्रतिस्पर्ध्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शन पाहून. अगदी क्षुल्लक कारणांवरून दोघांत वरचेवर खटके उडत नि जीवनला मजा येई त्याला अधिकाधिक चिडवण्यांत. आपल्या दंडांवरील बेटकुळ्या मुद्दाम फुगवीत तो जणूं आव्हान देई भप्पीला. त्याने आपला व्यायाम खूप वाढवला होता नि पंचवीस तीस पोळ्या तो सहज मटकावत असे एकाचवेळीं. त्याची शरीरयष्टी पाहून भप्पीला खरंच भीती वाटे नि विजिगीषु वृत्त्तीने जीवन खिदळणे राही. त्याचे पारडें नक्कीच जड होते शरीरसंपदा नि श्रीमंतीमुळे. पूर्ण विजयासाठी आणिक काय हवे ?

मात्र मानवी अहंकार नि त्यामुळे येणारा फाजील आत्मविश्वास विचित्र  म्हणायला हवा आणि त्याचबरोबर एका स्त्रीचे अंत:करण ! दोन्हीही अनाकलनीय.
पण एकें दिवशीं जीवनचे भप्पी बोसशी कडाक्याचे भांडण झाले आणि वर्चस्व मिळवण्याची त्याची सर्व स्वप्नें चक्ककाचूर झाली. वसंत ऋतूतला होळीचा दिवस होता तो, जेव्हा इतरांवर रंगांची उधळण केली जाते.
त्या दिवशी जीवन भेटवस्तूंचे भलें मोठे खोके घेऊन तिच्या घरी गेला. मंजरीला तोंवर कुणीच रंगवले नव्हते नि जीवनची तीव्र इच्छा होती तिच्या सांवळ्या मोहक चेहऱ्यावर रंग फासण्याची. तो घरात शिरताच प्रथम दिसली मंजरीची आई. त्याने खोकें खाली ठेवले.
“माझ्या आईने तुम्हाला नमस्कार सांगितलाय. तुमच्याविषयीं बरेच वेळां बोललोय् मी तिच्याशी.”
मंजरीची आई सहसा गंभीर नि अबोल असायची. जीवनला तिच्या वागण्याचे आकलन होत नसे.
“हे बरोबर नाही जीवन.” तथापि ते खोके घेऊन ती वर गेली. आतां तेथे जीवन नि मंजरी दोघेच उरले. तिच्या नजरेत एक प्रकारचा खुनशीपणा होता. ती त्याच्याशी तुसडेपणे वागत असे नि त्याची टांग ओढण्यात तिला मजा येई. मात्र त्यामुळेच ती त्याला जास्तच आवडूं लागली नि तो तिच्याकडे ओढला जाऊं लागला.
त्याने गुलालाची पुडी काढली नि म्हणाला, “ आतां मी माझ्या नातीचे तोंड लालीलाल करणार आहे.”
“जरा थांब. मी आतून माझी पुडी आणते.”
खरंतर ती अजून तिथेच उभी राहिली आपले दोन्ही हात मागे लपवित. जीवन तर अवाक् होऊन पाहातच राहिला नि त्याने तिच्या चेहऱ्यावर नि केसांत गुलाल उधळण्या आधीच ती उडी मारून पुढे आली नि काळ्याशार डांबरांत बुडवलेल्या हातांनी तिने त्याचा चेहरा माखून काढला.

निराश झालेला जीवन पुढच्या दाराकडे तीरासारखा निघाला पण त्याच वेळी ‘टायगर’ भप्पी बंकिम बरोबर आत शिरत होता.
दोघांची समोरासमोर भयानक टक्कर झाली. मजबूत बांध्याच्या जीवनच्या धडकेने भप्पी पार उताणा पडला. जीवनने त्याला आधार देत उठवले नि त्याचे कपडेसुध्दा झटकले. मात्र भप्पी संतापाने पेटून उठला. त्याने पायातील चप्पल काढून जीवनवर हाणायला सुरूवात केली. खरंतर जीवनच्या जोरदार धडकेने भप्पी पडला ही वस्तुस्थिती जीवनच्या लक्षांत आल्याने तो थोडा वरमला होता पण चपलांचा मार नि सोबत भप्पी देत असलेल्या अर्वाच्य शिव्यांमुळे जीवनची तोल सुटला. होळीच्या निमित्ताने आज त्याने थोडी भांग देखील घेतली होती त्यानुळे त्याचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि त्याने भप्पीच्या नाकावर ठोसा मारला. मात्र तो प्रहार इतका जबरदस्त होता की त्याने भप्पीचे नाकाडच फोडले. तो रक्तबंबाळ झाला, इतकेच नाही तर जीवनच्याही अंगावर रक्ताचे शिंतोडे उडले.

भप्पी त्या गावचा इनामदार होता आणि यापुढे तेथे राहाणे धोक्याची होते. सबब जीवन तेथून जो पळाला ते खेट आपल्या गावाकडे, आडवळणी नि लांबच्या वाटेने. जाताना मयूराक्षी नदीत त्याने कपड्यांवरचे रक्ताचे डाग धुतले नि कुणालाही संशय येऊं नये म्हणून त्या डागांवर मातीचा थर लावला.

अशा रीतीने मेडिकल स्कूलमधे शिकण्याचे त्याचे स्वप्न कायमचे भंगले. आणि या सर्व फलश्रुतीचे कारण ठरली मंजरी. होय, मंजरीच.

जीवनच्या आई वडिलांना त्याची ही स्थिति पाहून धक्काच बसला. “काय झालंय् जीवन, तूं परत काय आलास ?”
जीवनने उत्तर दिले नाही. तो आपल्या पायाच्या अंगठ्याकडे पाहात राहिला.
त्याच्या आग्रही वडिलांना देखील खरे काय घडले ते कळूं शकले नाही. कुठल्याही परिस्थितींत तो मंजरीचे नाव सांगणार नव्हता. अनेक दिवसांनी त्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली, मात्र अर्धवट. त्याने सांगितले की एका श्रीमंत बापाच्या मुलाने त्याला जोड्याने मारले म्हणून त्याने प्रतिकार करीत त्याला हाणले. पण त्याच्या दुर्दैवाने मार जरा जास्तच लागला. दुखापत झालेल्या त्या मुलाने कदाचित् माझा खून केला असता म्हणून मी तेथून पळालों. आता मी तिथे परत जाणार नाही. कदाचित बर्द्वान च्या सरकारी उच्च विद्यालयांत किंवा दुसऱ्या एखाद्यांत जाईन मी शिकायला.
“तूं कुठेही जाणार नाहीयेस. मी तुला आपली पारंपरिक वैद्यकी शिकवीन.” वडील म्हणाले.
ते हलक्या आवाजात बोलत पण ते खडकासारखे कठोर असायचे नि ते ऐकून जीवनच्या अंगावर काटा आला. त्याला माहीत होते की वडील आपला शब्द खरा करतात. त्याला आठवतोय तो प्रसंग जेव्हा नवग्रामच्या एका दारूड्या रूग्णावर उपचार करायला त्यांनी साफ नकार दिला होता. तो रूग्ण आपल्या ताकदीबाहेर दारू प्यायचा. जगत्बंधूंनी त्याला ताकीद देवूनही त्याने दारू सोडली नव्हती. पुढच्या वेळी ते त्याला पाहायला गेले असतांना त्यांना कळले नि ते तडक माघारीं फिरले त्याच्याकडे ढुंकूनही न पाहतां. नातेवाईकांनी खूप मनधरणी करूनही त्यांचा नकार कायम राहिला. त्यांचा नकार अंतिम असे.
आजचा त्यांचा निर्णय ऐकून तीच हुकमत त्याला प्रकर्षांने जाणवली. दचकून त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिले आणि पुन्हा नजर खाली वळवली. त्याला जाणवले की तो वडिलांचा अंतिम आदेश आहे ते.

जगत्बंधूंनी पंचांग काढले अभ्यास सुरू करण्याच्या मुहूर्तासाठी.

(क्रमश: ………




Friday, April 20, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग विसावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग विसावा)
“तत् विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शन:    ॥३४॥”
(ते ज्ञान सद्गुरूंजवळ जाऊन त्यांना दंडवत घालून केलेला नमस्कार, त्यांची सेवा म्हणजेच काटेकोर आज्ञापालन आणि आत्म्यासंबंधी विचारलेले प्रश्न या साधनांद्वारा जाणून घे. ते शब्दप्रभू, तत्वसाक्षात्कारी श्रीगुरू तुला ज्ञानाचा उपदेश करतील.)

अर्जुना, अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचे असेल, मनांत बिंबवून घ्यायचे असेल आणि त्याचा मनांत अनुभव घ्यावा असे वाटत असेल, तर या शब्दज्ञानी संतांची सर्वभावें सेवा करावी. ते संत म्हणजे ज्ञानाचें प्रत्यक्ष माहेरघर होत नि त्यांची सेवा म्हणजे त्या घराचा उंबरठा होय. अर्जुना, तूं सेवा करून संतांना आपलेसे कर. अंत:करणपूर्वक जीवाभावाने संतचरणांना नमस्कार कर आणि कुठलाही अभिमान न बाळगतां त्यांची सर्वप्रकारें सेवा कर. अशी सेवा केली असतां आपल्याला जें आत्मज्ञान मिळवणे अपेक्षित असते त्या संदर्भात प्रश्न केले तर ते संत ज्ञानोपदेश करतील. त्या ज्ञानामुळें तुझ्या मनांतील सर्व संशय कायमचे दूर होतील.
त्या उपदेशरूपी ज्ञानप्रकाशाने मन निर्भय होईल, अंत:करण ब्रह्माप्रमाणें  नि:शंक होईल नि अर्जुना, तूं स्वत:ला समस्त प्राणिमात्रांसह माझ्या स्वरूपांतच अखंडपणे पाहशील.
अरे पार्था, ज्या वेळीं गुरूकृपा होईल त्यावेळेस हे ज्ञान अद्वैत प्रकाशाने उजळून जाईल आणि अज्ञानरूपी अंध:कार सहजपणें नष्ट होईल.
 (मूळ ओव्या अधिक सुंदर आहेत. – “जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । नि:शंकु होय ॥ ते वेळी आपणपेया सहितें । इये अशेषेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥ ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल । जैं गुरूकृपा होईल । पार्था गा ॥” !!

पुढे म्हणतात,
“जरी कल्मषांचा आगरू (महापापांचे भांडार) । तूं भ्रांतीचा सागरू (भ्रमाचा समुद्र) । व्यामोहाचा डोंगरू (संशयाचा पर्वत) । होउनी अससी ॥
“तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें (तुलना केली असतां) । हें अवघेंचि गा थोकडें (क्षुल्लक) । ऐसें सामर्थ्य असे चोखडें (विलक्षण बळ) । ज्ञानी इये ॥

अरे, हे भ्रमरूप विश्व म्हणजे त्या अमूर्त, अव्यक्त परब्रह्माची पडछाया आहे आणि तो भ्रम केवळ आत्मज्ञानानेच नाहीसा होतो. तर मग अशा ज्ञानापुढे मनाचें दोष कितपत टिकतील ? खरें तर असे बोलणेच निरर्थक आहे, कारण या जगांत  ज्ञानाएवढें बलाढ्य दुसरे काहीच नाही.
असे पहा, त्रैलोक्य पेटून जो धूर आकाशात दाटेल त्या वावटळीला मेघ उडवून लावू शकतील काय ? किंवा, जो प्रलयाग्नि सोसाट्याचा वारा नि पाण्यामुळे प्रज्वलित होतो, तो तृणांकुर अथवा लाकडाच्या तुकड्याने दडपला जाईल काय ?

“न हि ज्ञानेश सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिध्द: कालेनात्मनि विंदति ॥३८॥”

(वेदांमध्ये किंवा लोकांमध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. तें ज्ञान कर्मयोग आचरणारा पुरूष कालांतरानें स्वत:च आपल्या अंत:करणांत प्राप्त करून घेतो. )

म्हणून या संबंधांत अधिक काही बोलणे पुरे झाले. त्या पवित्र ज्ञानाने दोष जातात किंवा नाही असा प्रश्नच निर्माण होत नाही कारण ज्ञानासाठी कुठलाच दृष्टांत अपुरा पडतो. एकूणच, ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही एवढे मात्र निश्चित. या जगांत चैतन्यासाठी जशी दुसरी उपमा देता येत नाही, तसे एकटे ज्ञानच उत्तम आहे. ज्ञानासारखे दुसरे काहीही नाही.
महातेजस्वी अशा सूर्याचे प्रतिबिंब जर तितकेच तेज:पुंज म्हणता आले, किंवा आकाशाला जर पुरचुंडींत बांधतां आले. अथवा पृथ्वीएवढा वजनदार पदार्थ जर मिळाला, तरच ज्ञानाला इतर उपमा देणे शक्य आहे !
म्हणून वारंवार विचार करतां असा निष्कर्ष निघतो की ज्ञानाची पवित्रता ज्ञानांतच विहित आहे. अमृताची चव अमृताप्रमाणेच म्हटली जाते तसे ज्ञानांचे उपमा ज्ञानच !
त्यावर अर्जुनाचा पुन्हा एक मार्मिक प्रश्न ! तो म्हणतो की हे देवा, तें ज्ञान कसे मिळवायचें ? खरें तर हा प्रश्न आता येणारच हे आधीच ताडून भगवंत म्हणतात,

“श्रध्दावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेंद्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा अचिरेण परां शान्तिं अधिगच्छति ॥३९॥”

(श्रध्दावान्, ज्ञान साधनेसाठी तत्पर असलेला आणि जितेन्द्रिय असा पुरूष आत्मज्ञान प्राप्त करून घेतो नि मोक्षरूप शांतीचा अनुभव घेतो.)

‘तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां । जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाही (प्रतिष्ठा) ॥
जो मनासी चाड (इच्छा) न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे (प्रकृतीने केलेले कर्म आत्म्यावर लादत नाही ) । जो श्रध्देचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥
तयासीचि गिंवसित (शोधत) । हें ज्ञान पावे निश्चित । जयामाजीं अचुंबित (अचूक) । शांति असे ॥
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे (ठसतें) । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥
मग जेउती (जिकडे) वास पाहिजे (पाहतो) । तेउती (तिकडे) शांतीचि देखिजे । तेथ आपपरू (माझेंतुझें) नेणिजे । निर्धारितां (निश्चितपणें) ॥
ऐसा हा उत्तरोत्तरू । ज्ञानबीजाचा विस्तारू । सांगतां असे अपारू । परि असो आतां ॥

“अज्ञश्चाश्रध्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोsस्ति न परो न सुखं संशयात्मन:  ॥४०॥”

(अज्ञानी, अश्रध्द आणि संशयी माणूस नाश पावतो. संशयी माणसाला इहलोक साधतां येत नाही, परलोकही साधत नाही नि सुखही लाभत नाही.)

‘ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानांची आवडी नाही । तयाचें जियालें (जगणे) म्हणों काई । वरी मरण चांग (त्यापेक्षा मरण उत्तम) ॥
शून्य (रिकामे) जैसे कां गृह । कां चैतन्येवीण देह । तैसें जीवित तें संमोह (भ्रमिष्ठ) । ज्ञानहीन ॥

अरे, आयुष्यांत काही कारणाने ज्ञान मिळाले नसले तरी ज्ञानप्राप्तीची जराशी इच्छा मनांत आली तरी तें मिळवणे शक्य असतेच ना ? मात्र ज्याला ज्ञानप्राप्तीची इच्छाच नाही तो संशयाच्या अग्नींत जळत राहतो. अरे, जेव्हा अमृतही गोड वाटेनासे होते तेव्हा त्याचे मरण जवळ आले असे समजणे क्रमप्राप्त ठरते.
अगदीं तसेच, जो विषयसुखांत रंगतो, अल्प ज्ञानानेही माजतो तो संशयाधीन होतो यांत शंका नाही.

‘मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणे नासला (वांया गेला) । तो ऐहिकपरत्रा मुकले । सुखासि गा ॥
जया काळज्वरू आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणे । सरिसेंचि मानी ॥
तैसें साच आणि लटिकें (खरे-खोटें) । विरूध्द आणि निकें (योग्य) । संशयीं तो नोळखे । हिताहित ॥
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांही । मना नये (समजत नाही) ॥
म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर (जाळे) । प्राणियांसी ॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा (जिंकावा) । जो ज्ञानाचिया अभावा - । माजि असे ॥
जैं अज्ञानाचें गडद (काळोख) पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणोनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥
हृदयीं हाचि न समाये (मावत नाही) । बुध्दीतें गिंवसूनि ठाये (सद्विचाराला व्यापून टाकतो) । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥

मात्र हा प्रबळ संशय एका जालीम उपायाने नेस्तनाबूद करता येतो, जर माणसाच्या हातांत ज्ञानरूप तळपती तलवार असेल तर !

म्हणून अर्जुना, अज्ञानापासून निर्माण झालेल्या आणि अंत:करणांत राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचें आचरण कर आणि युध्दाला सज्ज हो !!

‘याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता (ताबडतोब) । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥
ऐसें सर्वज्ञाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ (क्रमश:……



Tuesday, April 17, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकोणीस)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग एकोणीस)
या पुढचे दोन श्लोक आपण दररोज भोजनापूर्वीं म्हणत असतोच. मात्र त्यातील भावार्थ ध्यानात ठेवून म्हटले गेले तर ते अधिक चांगला परिणाम देतात ही वस्तुस्थिती अनुभवण्याजोगी आहे.

“ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना ॥२४॥
आणि
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रित: ।
प्राणापान समायुक्त: पचानन्यम् चतुर्विधम् ॥

आत्मज्ञानी पुरूषाला  हे हवन, हा हवन करणारा किंवा हा या क्रियेचा भोक्ता असे भेद त्याच्या अंतर्यामी टिकतच नाहीत. तो जे जे इष्ट यज्ञ करतो त्यांतील हवनद्रव्यें म्हणजे सर्व साहित्य, मंत्र वगैरे केवळ ब्रह्म आहे असे आत्मस्थितींत रमलेला पुरूष जाणून असतो आणि म्हणून कर्म म्हणजेच ब्रह्म असे जाणणारा पुरूष निष्कर्मी असतो अर्जुना ! (‘म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम । तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥)’
त्याचे अविवेकरूपी बाल्य संपले,  विवेकरूपी तारूण्य बहरले ,  विरक्ति रूपी वधूशीं लग्न लागले आणि त्याने योगरूप अग्निची उपासना स्वीकारली  असते !

‘जें यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसी । गुरूवाक्य हुताशनीं । हवन केलें ॥’ (त्यांनी हा योगयज्ञ अहोरात्र करून मनाबरोबरच अज्ञानाची आहुती गुरू-उपदेशाच्या मंत्राग्नींत जाळून टाकली.)

‘तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञ म्हणिजे । जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ (अर्जुना, आत्मसुख प्राप्त करून देणाऱ्या या यज्ञाला दैवयज्ञ असे नांव आहे.)
आतां मी तुला जे सांगणार आहे ते खरोखर विस्मित करणारे आहे. या यज्ञांत ब्रह्मरूप अग्नीची सेवा अग्नीनेच केली जाते, म्हणजेच तो याज्ञिक यज्ञाद्वारें यज्ञ करत असतो !
दुसरे काही याज्ञिक इंद्रियांवर कठोर संयमरूपी अग्निहोत्र धगधगत ठेवतात, म्हणजेच पराकाष्ठेचा इंद्रिय-निग्रह करून त्या पवित्र यज्ञांत विषय-वासना भस्म करून टाकतात. वैराग्यरूपी सूर्याचा उदय होतांच संयमरूपी यज्ञकुंडांत सर्व इंद्रियजन्य अविवेकी वासनांचा लोप होतो नि पांचही इंद्रियरूपी कुंडांतून आशारूपी धूर गायब होतो !
अशा प्रकारें गुरू-आज्ञेनुसार सर्व विषयवासनांच्या कित्येक आहुतींचे यजन केले जाते.
पार्था, यामुळे कित्येकजण आपले  सर्व दोष तर धुतातच पण त्यांचा विवेक खडबडून जागा होतो. विवेकपूर्ण विचाराला शांतीची समर्थ साथ मिळते आणि धैर्य अधिकच बळकट होते. या सर्वाचें पर्यवसान ज्ञानाग्नि प्रकट होण्यात असते.

अशा ज्ञानप्राप्तीच्या साधनेबरोबर योगाभ्यासही चालू असतो, त्यामुळें ऋध्दि-सिध्दिरूपी भ्रमाचा धूर केव्हाच निघून गेलेला असतो आणि मग ज्ञानाग्निची लहानशी ठिणगी निर्माण होते. यम-नियमांच्या चिंतन नि अभ्यासामुळे मन कोरडे ठणठणीत होते आणि हे शुष्क झालेले मन ज्ञानाग्नीला अधिकच प्रज्वलित करते. ब्रह्मलोकापर्यंत पोहोचणाऱ्या त्या ज्वाळांत स्त्री-पुत्रादिकांच्या  आसक्तीसह  नाना विषयवासनांच्या समिधा आहुति म्हणून जाळल्या जातात.

त्या वेळीं आत्मसाक्षात्कार आणि निकोप समाधिसुखात रमणारे ‘दीक्षित’ “सोहं-हंस:-अस्मि”  या प्रत्येक श्वासागणिक चालणाऱ्या अजपा-जपांत रंगून जातात. प्राणकर्मरूप अखेरची आहुती पडतांच त्यांना ब्रह्मसाक्षात्काराचा, समरसतेचा, थोडक्यात एकात्मभावाचा प्रत्यय येतो. तोच ब्रह्मानंद ते पुरोडाश म्हणजे प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

कित्येक साधक अशा प्रकारें यज्ञ करून मुक्त झाले आहेत. या यज्ञक्रिया वेगवेगळ्या दिसत असल्या तरी यांचे साध्य एकच असते. कांहींना द्रव्य-यज्ञ म्हणतात तर काही तपोयज्ञ या नावाने ओळखले जातात. एकाला तर योग-यज्ञ अशी संज्ञा आहे. कित्येक यज्ञांत शब्दांनी शब्दांचे हवन करतात. गुरुने उच्चारलेल्या वेदमंत्राचा शिष्याने पुनरूच्चार करणे, म्हणजेच यथाविधी वेदाध्ययन करणे याला वाग्यज्ञ म्हणतात.
अर्जुना, हे सर्व यज्ञ अवघड आहेत खरे, कारण त्यांचे अनुष्ठान करणे मुळात कठीण असते. तथापि, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला असेल अशांना त्यांच्या अधिकार नि योग्यतेनुसार हे यज्ञ करणे शक्य असते. असे यज्ञकर्ते त्या क्षेत्रांत प्रवीण असून योगसामर्थ्यामुळे ते स्वत:ला परमात्म-स्वरूपात विलीन करू शकतात.
काही योगी अपान-वायूरूपी अग्नींत प्राणवायूचे हवन करतात तर काही योगी अपान-वायूला प्राणवायूंत हवन करतात, तर काही प्राण-अपान या दोन्ही वायूंचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी असे संबोधलें जाते.

कित्येक योगी आसनाच्या हटयोगाद्वारें सर्व प्रकारच्या आहारावर नियंत्रण ठेवीत कुंडलिनीचे प्रयत्नपूर्वक हवन करतात.

असे सर्व यज्ञकर्ते मोक्षमार्गाचे प्रवासी असतात. मनोमळ धुऊन टाकल्यामुळे त्यांचे अज्ञान समूळ नाहीसे होते. अशा वेळीं अग्नि नि हवनकर्ता हे द्वैत संपून केवळ निखळ अद्वैतस्थिती शिल्लक राहते आणि यज्ञकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्याने यज्ञविधिची सांगता होते.
‘ऐसें अनादिसिध्द चोखट (शुध्द) । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहं मंत्रें ॥ (असे हे अनादिसिध्द, शुध्द नि पवित्र ज्ञानमय ब्रह्म ब्रह्मनिष्ठ मंडळी “अहं ब्रह्मास्मि” या मंत्राने सेवन करतात.)
‘ऐसे शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले । म्हणौनि ब्रह्म ते जहालें । अनायासें ॥ (असे यज्ञांतील ज्ञानरूपी शेष अमृताने ते संतोषले आणि जन्म-मरण विरहीत मोक्षाचे धनी झाले, ते सहजपणे ब्रह्म झाले.)

मात्र ज्यांना आत्मसंयम साधतां येत नाही, योग आणि यज्ञ जमत नाहीत त्यांना विरक्ती कधीच माळ घालत नाही. अर्जुना, ज्यांचें ऐहिकच धड नाही त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलूंया नको !

अर्जुना, अशा प्रकारें मी तुला अनेक यज्ञ प्रकार सांगितले आहेत, ज्यांचा वेदांमध्ये सविस्तर उहापोह झाला आहे. मात्र त्या विस्ताराशी आपला काही संबंध नाही. हे सर्व यज्ञ कायिक, वाचिक नि मानसिक कर्मांपासून होतात, आपल्यापासून नव्हेत. असे यज्ञ फलाच्या अपेक्षेने केले तर बंधनकारक होतात हे तुला समजले तर तू त्या बंधनांत अडकणार नाहीस.

“अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जयां नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ ते द्रव्यादि यागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेज संपत्ती । दिनकरापाशीं ॥ देखें परमात्म सुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥” (अर्जुना, वेद ज्यांचा आधार आहे, ढोबळमानाने जे बाह्यकर्माशीं निगडीत आहेत आणि जे स्वर्गसुख प्राप्त करून देतात असे अनेक द्रव्य-यज्ञ सांगतां येतील. मात्र ज्ञानयज्ञाची सर यांपैकी कुणालाच नाही. खरें तर परमात्म-सुख मिळवण्यासाठी साधक मंडळी डोळ्यात तेल घालून आपली साधना करत असतात.)

हे ज्ञान सांप्रत केलेल्या कर्माची अंतिम फलश्रुति असून, नैष्कर्म्याची जणूं खाण आणि पोटतिडकीने केलेल्या साधनाचे पूर्ण समाधान होय. हे ज्ञान प्राप्त होतांच प्रवृत्ती लुळी पडते, तर्क आंधळा होतो आणि इंद्रियांना विषय-वासनांचा विसर पडतो ! मनाचें मनपण संपते, बोलणे खुंटते नि ज्ञेय म्हणजेच जाणून घ्यायचे तें ब्रह्म प्रत्यक्षात  गंवसते. वैराग्याची वानवा संपते नि विवेकाचाही सोस कमी होतो. आणि प्रत्यक्ष न पाहतानाही स्वत:ला स्वत:ची भेट सहजपणें  घडून येते !

आतां येणारा श्लोक अतिशय महत्वाचा नि माझा आवडीचा आहे. त्याचा विचार पुढील भागांत !


Sunday, April 15, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अठरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अठरावा)
एकाच मानवजातीला चार प्रमुख वर्णांमध्यें त्यांच्या गुण कर्मानुसार विभागणी करून ईश्वर स्वत: त्या सर्वांपासून अलिप्त राहिला.
‘एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहलें गा चहूं वर्णीं । ऐसी गुण-कर्मीं कडसणी । केली सहजें ॥ म्हणोनि आइकें पार्था । हे वर्णभेद संस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचि लागीं ॥’
हे सर्व माझ्यापासून झाले ; पण मी केले नाही, असे ज्याला आकळले तो प्रपंचाच्या राम-रगाड्यातून सुटला (आणि मुक्त झाला) असे समजावें. या आधीं जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी देखील माझे ‘अकर्ता’ नि ‘अभोक्तापण’ जाणून यथोचित कर्में केली. ज्याप्रमाणें आधी भाजलेले बियाणे जमीनींत रुजत नाही, तसे त्यांची निष्काम कर्में त्यांना कर्मबंधनांत न लोटतां मोक्षदायी ठरतात. अजून एक गोष्ट लक्षांत ठेव अर्जुना, की कर्म-अकर्म हा विचार आपल्या लहरीप्रमाणे करून चालत नाही कारण कर्म कशाला म्हणावे नि अकर्म म्हणजे काय याचा उहापोह करतांना चांगले चांगले विद्वान देखील गोंधळून जातात. कधीकधी खोटे नाणे खऱ्यासारखे दिसून शहाणा माणूस सुध्दां फसतो. अगदी तसेच, केवळ आपल्या संकल्पाने प्रतिसृष्टि निर्माण करू शकणारे दिग्गज देखील ‘नैष्कर्म्य’ या संज्ञेबाबत अनभिज्ञ असतात. जिथे स्वत:ला ‘क्रान्तदर्शी’ म्हणवणारे शाहाणे सुध्दा मूढ ठरतात तिथे मूर्खांची काय कथा? म्हणून त्याच विषयावर काही सांगतो, ते नीट ऐक.

“कर्मणो ह्यपि बोध्दव्यं बोध्दव्यं च विकर्मण: ।
 अकर्मणश्च बोध्दव्यं गहना कर्मणो गति: ॥४/१७॥”
(कर्म म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे, तसेच विकर्म म्हणजे काय ते कळले पाहिजे. निषिध्द कर्म तर कळायलाच हवे. खरोखर कर्माची व्याप्ति दुर्बोध आहे.)

अरे, ज्यामुळे अवघें जग निर्माण होते त्या कर्माविषयीं सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातही वर्णाश्रमाप्रमाणे उचित असलेले विहित कर्म समजून घेणे तर अधिकच महत्वाचे ठरते. शिवाय शास्त्रानुसार जे काही निषिध्द कर्म सांगितले आहे तेही यथार्थपणें जाणून घ्यायला हवेच.
अशा प्रकारें या जगांत कर्माची व्याप्ति प्रचंड आहे आणि अखिल विश्व कर्माधीन आहे हे एव्हाना तुझ्या लक्षांत आले असेलच.

पण ते असू देत. आता मी तुला ‘प्राप्तांचे’ म्हणजे सिध्द पुरूषांची लक्षणे सांगतो.
“कर्मण्यकर्म य: पश्येद अकर्मणि च कर्म य: ।
स बुध्दिमान्मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ॥४/१८॥”
(कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, तो सर्व माणसांत बुध्दिवान्, योगयुक्त आणि सर्व कर्में करणारा आहे.)

‘जो सकळ कर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥’
‘आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी (चांगली) । बोधला असे (ज्ञानाने ओतप्रोत) ॥’
अशा रीतीने जो जाणीवपूर्वक निष्काम कर्म करतांना दिसतो तो ज्ञानी म्हणून ओळखावा. असे पहा, तळ्याशेजारी उभा असलेला माणूस आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब पहात असतांना स्वत: त्यापासून वेगळा आहे हे जाणून असतो. किंवा, नौकाविहार करत असतांना काठावरची झाडे झपाट्याने मागे जात असली तरी ती झाडें अचल आहेत हे जाणून असतो. अगदी तसेच, स्वत: कार्यमग्न असतांनाही ज्याला आपल्या स्व-स्वरुपाची कायम जाणीव असते तो निष्कर्मीच असतो.
किंवा, सूर्योदय वा सूर्यास्तप्रसंगीं सूर्य काही ‘चालत’ नसतो, तसाच निष्काम कर्म करणारा नैष्कर्मी म्हणून ओळखावा. तो सामान्य माणसांसारखा दिसत असला तरी त्याच्या नैष्कर्म्य स्थितिमुळे तो मनुष्यत्वाच्या पलीकडे असतो, जसे पाण्यांत सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी ते काही बुडत नाही !
असा पुरूष न पाहतांही विश्व पाहतो, काहीही न करता सर्व काही तटस्थपणे करतो आणि अवघें भोग न भोगतांही त्याने भोगलेले असतात. एकाच ठिकाणी बसून तो सर्वत्र फिरून येतो. खरे तर तो स्वत:च विश्वरूप झालेला असतो !

‘जयां पुरूषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु (तिरस्कार) नाही । परी फलापेक्षा कहीं । संचरेना ॥ (फलाची आसक्ती कधीच शिरकाव करीत नाही).
‘आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरीलें (सुरूं केलेले) सिध्दीस नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळे ना ॥
‘ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें (सर्व) । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें (मनुष्य रूपांत) । वोळख तूं (ओळखावा) ॥
‘जो शरीरीं उदासु (अलिप्त) । फळभोगीं निरासु (निरीच्छ) । नित्यता  उल्हासु (कायम प्रसन्न) । होऊनि असे ॥
‘जो संतोषाचां गाभारां (गर्भगृहांत) । आत्मबोधाचिये वोगरां (पक्वान्न) । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां (सेवन करताना) ॥

गीतेतील पुढचें दोन श्लोक महत्वाचे आहेत निष्काम-कर्मयोगाचे मूलतत्त्व समजून घेण्यासाठी…..

“निराशीर्यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह: ।
 शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥२१॥
“यदृच्छलाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर: ।
 सम: सिध्दावसिध्दौ च कृत्वाsपि न निबध्यते ॥२२॥

‘कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनियां आशा कुरोंडी (ओवाळून) । अहंभावेंसीं ॥
‘म्हणोनी अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे । जया आपुलें आणि परावें (परक्याचे) । दोन्ही नाहीं ॥
तो दिठी (दृष्टीने) जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये । आइकें तें आहे । तोचि जाहला ॥
चरणीं हन चाले । मुखें जें जे बोले । ऐसे चेष्टाजात (सर्व व्यापार) तेतुलें (तेव्हढे) । आपणचि जो ॥
हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवाचून (आपल्याशिवाय) नाहीं । आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥
म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाही ॥ (तो सर्व तऱ्हेने मुक्त, कर्म करूनही कर्मरहित नि गुणांनी वेढलेला असूनही गुणांच्या पलीकडचा असतो हे नि:संशय)

“गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस: ।
 यज्ञायाचरत: कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥

‘तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ( देहधारी असला तरी चैतन्याने सळसळणारा, परब्रह्माच्या कसोटीला पुरेपूर उतरणारा असतो)
त्याने यज्ञादि कर्में केली तरी तीं सगळी त्याच्यातच विलीन होऊन जातात. अकालीं जमून आलेले मेघ जसे न बरसतांच विरून जातात तशी त्याने केलेली सर्व शास्त्रोक्त विधिविधाने त्याच्यातील एकात्म भावामुळे त्याच्याच स्वरूपांत विलीन होतात.
(क्रमश: ….
         


Monday, April 09, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सतरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सतरावा)
श्रीकृष्णाने सांगितलेली विवस्वान सूर्याची कथा बहुधा अर्जुनाच्या पचनीं पडली नव्हती, म्हणून प्रारंभीं थोडी स्तुति केल्यानंतर तो परखडपणे प्रश्न करेल.
अर्जुन म्हणतो, ‘देवा, आई आपल्या बाळावर जिवापाड प्रेम करते यांत काही नवल नाही. त्याचप्रमाणे तूं संसारात श्रमलेल्यांसाठी सावली नि अनाथांची माउली आहेस. आमच्यासाठी तर तूं कृपेचा सागर आहेस. एखाद्या पांगळ्या मूकबधिर मुलाकडे त्याच्या आईचे विशेष लक्ष असते नि त्यासाठी ती खूप कष्ट देखील सोसते. तसाच तूंही आपल्या भक्तांसाठी कायम तत्पर असतोस.
मात्र आता मी जें विचारीन ते कृपया लक्षपूर्वक ऐक आणि त्यावर रागावू नकोस. हे अनंता, तू नुकतेच जे विवेचन केलेस ते काही मला फारसें पटलेले नाही. हा जो कुणी विवस्वान होता त्याला आमच्या वाडवडिलांनीही कधीं पाहिलेले ऐकीवात नाही. मग तू त्याला कधीं उपदेश केला ? तो असलाच तर अति पुरातन असावा नि तूं तर सांप्रतचा. म्हणून तुझे बोलणें विसंगत वाटते. खरे तर मला तुझे पूर्वायुष्य फारसे माहीत नाही, म्हणून तूं खोटे बोलतोस असे एकाएकी म्हणणे हेही अयोग्य आहे. तरी पण तूं सूर्याला कधी उपदेश केलास ते जाणून घेण्याची मला उत्कंठा आहे.

श्री भगवान् उवाच –
“बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप     ॥५॥

भगवंत म्हणतात की तुझे नि माझे अनेक जन्म होऊन गेले. त्या सर्वांना मी जाणतो; पण अर्जुना तू मात्र जाणत नाहीस. अरे, जेव्हा विवस्वान सूर्य होता तेव्हा आपण नव्हतो असे जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. आपले अनेक जन्म होऊन गेलेत पण तुला ते आठवत नाहीत.
धनुर्धरा, मी जेवढे अवतार निरनिराळ्या प्रसंगीं धारण केले ते सगळे मला स्पष्टपणे आठवतात. शिवाय, मी अजन्मा असूनही प्रकृतीच्या योगानें पुन:पुन्हा अवतार घेत असतो. मात्र त्यामुळे माझे अविनाशत्व कोणत्याही कारणाने संपत नाही. अवतार धारण करणे किंवा माझ्या स्वस्वरूपांत म्हणजेच निजस्वरूपात परत जाणे असा प्रकार मायेमुळे भासतो. यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर कधीच गदा येत नाही. मी कर्माधीन आहे असे विपरीत बुध्दीच्या भ्रांतीमुळे भासते.
असे पहा, एखाद्या वस्तूचे आरशात प्रतिबिंब दिसले तरी ती वस्तू एकच असते ना ? मी अमूर्त असलों तरी मायेमुळे निरनिराळ्या धर्मकार्यासाठी मूर्तस्वरूपात एखाद्या नटाप्रमाणे नटत असतो.

“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे    ॥८॥”

अशा वेळीं मी स्वच्छेने पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो आणि अज्ञानरूपी अंधाराला नेस्तनाबूत करून टाकतो. अधर्माचे कुंपण मोडून दोषयुक्त ग्रंथांची पानें फाडून टाकतो नि सज्जनांकडून सत्कर्मरूपी गुढ्या उभारतो. दुष्ट दुर्जनांची कुळे नष्ट करतो. साधूसंतांचा हरवलेला सन्मान त्यांना पुन्हा मिळवून देतो. अविवेकाची काजळी पुसून विवेकरूपी दिवा प्रज्वलित करतो, नि त्यामुळें योगी मंडळींना दिवाळी असल्यासारखा निरंतर प्रत्यय येत राहतो.
त्या वेळीं अखिल विश्व आत्मानंदांत निमग्न होते. अधर्माचा नाश झाल्यामुळें एकटा धर्मच जगात नांदत असतो. सगुण भक्तिमुळे भक्तमंडळी अष्टसात्विक भावाने परिपूर्ण होतात. अर्जुना, मी सगुण-साकार रूप धारण करताच पापांचे डोंगर नष्ट होतात नि पुण्यरूपी पहाट होते. अशा महत्त्वाच्या कार्यासाठीच मी प्रत्येक युगांत अवतार घेत असतो आणि ज्याने हें रहस्य जाणले तोच या जगातला विवेकी किंवा शहाणा पुरूष म्हणून ओळखावा.

“माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणे । हे अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा ना कळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥” (मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही कर्म करतो असे माझे अविकार स्वरूप ज्याला समजले तो श्रेष्ठ आणि परम मुक्त म्हणून ओळखावा. असा माणूस प्रपंचात असूनही कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही आणि देहधारी असूनही देहभावांत गुंतत नाही. त्याचा देह जेव्हा पंचमहाभूतांत विलीन होतो तेव्हा तो माझ्याच निरूपाधिक स्वरूपाशीं एकरूप होऊन जातो.)

“वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता: ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागता:  ॥१०॥”
(ज्यांची विषयासक्ति, भय, क्रोध नाहीसे होऊन जे माझ्या स्वरूपाशीं एकरूप झाले आहेत; ज्यांनी माझा आश्रय केला आहे; जे ज्ञानरूप तपानें शुध्द झाले आहेत असे अनेक मुक्त जीव माझ्या निरूपाधिक रूपाशीं एकरूप झाले आहेत. )
एरव्हीं परापर (मागील-पुढील) न शोचिती (शोक करीत नाहीत) । जे कामनाशून्य होती । वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया (क्रोधाकडे कधीही फिरकतसुध्दा नाहीत) ।। जे सदा मियांचि आथिले (कायम माझ्यामुळे संपव्न झाले) । माझिया सेवा जियाले (माझ्यावरील भक्तीवर जगले )
। कां आत्मबोधें तोषले (आत्मानंदांत निमग्न झाले) । वीतराग जे ( निर्विकार असलेले) ॥ जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन (घर) ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थासी । तीर्थरूप ॥ ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनी ठेले (राहिले) । जे मज तयां उरलें । पदर नाही ॥ ( जे माझ्या स्वरूपात सहजपणे प्राप्त झाले ते मीच म्हणून राहिले. त्यांच्या नि माझ्यात भेदाचा कुठलाही आडपडदा राहात नाही. )
असे पहा, हिणकस सोन्यातून पितळ नि गंज काढून टाकला तर दुसरे शुध्द सोने शोधण्याची गरज राहते काय ? अगदीं तसेच, जे यमनियमांत निपुण झालेत नि काया-वाचा-मनाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यामुळे जे शुध्द आणि पवित्र झालेत, ते माझ्याशीं एकरूप झाले तर त्यात नवल ते  काय ?
एरव्हीं जे साधक माझी भक्ति करतात त्यांना मी देखील त्यांच्या भक्तीचे फळ म्हणून त्यांचे ईप्सित देतो.
‘देखें मनुष्यजात सकळ । हे स्वभावत: भजनशीळ । जाहले असे केवळ । माझांचि ठायीं ॥
‘परी ज्ञानेंविण नाशिले । जे बुध्दिभेदासि आले । तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥
‘म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया ‘अनाम्या’ नामें ठेविती । देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥
‘जें सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्त्तम । मतिवशें संभ्रम । विवंचिति ॥ !’
आणि मग विविध प्रकारच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी निरनिराळ्या देवी-देवतांची उपचारपूर्वक पूजा करतात. त्यांना त्याचे यथायोग्य फळ मिळते देखील ; पण ते फळ केवळ त्यांनी केलेल्या कर्माचे असते एवढें मात्र तू नीट ध्यानांत ठेव.
म्हणून अर्जुना, या एकंदर व्यवहारांत फल देणारे कर्म आणि ते फळ भोगणाऱ्या कर्त्याशिवाय दुसरे काहीच असत नाही. खरोखर, कर्म असेल तर त्याचे फळ असणारच. परंतु अर्जुना, मी स्वत: या सर्वांचा केवळ साक्षी असतो. समस्त मानव जात आपापल्या कर्माची फळें भोगतात.

एक अतिशय महत्वाचा श्लोक आपण पाहणार आहोत,
“चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।
 तस्य कर्तारमपि मां विध्द्यकर्तारमव्ययम ॥१३॥”
(गुण आणि कर्मानुरूप चार वर्णांचे लोक मी निर्माण केले आहेत. व्यवहारिक दृष्टीने मी त्यांचा कर्ता असलों तरी पारमार्थिक दृष्टीने मी अकर्ता आणि अविनाशी आहे, हे तूं नीट समजून घ्यावेस.)

‘जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें (तारतम्याने) । कर्में तदनुसारें । विवंचिलीं (योजिली) ॥ एथ एकचि हे धनुष्यपाणी (अर्जुन) । परी जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मीं-कडसणी । केली सहजें ॥ म्हणोनी आइकें पार्था । हे वर्णभेद संस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥”

(क्रमश:…..



This page is powered by Blogger. Isn't yours?