Tuesday, October 13, 2020

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे नऊ १०९

 ज्ञानेश्वरी भाग एकशे नऊ (१०९


अर्जुनाच्या चातुर्याने प्रसन्न झालेलाशिरोमणि सर्वज्ञांचाआता काय सांगेल ते पाहू


बा महामते (अर्जुना), मला मिळवल्यावर पुन्हा परत संसारचक्रात अडकणारेही दोन प्रकारचे असतात. खरे तरमीनितेएकच आहोत पण वरवर पाहतां ते माझ्यापासून वेगळे  वाटतात. पाण्यावर तळपणारे तरंग पाण्याहून भिन्न दिसत असले तरी ते मुळांत केवळ पाणीच ना ? किंवा, अलंकार सुवर्णाहून वेगळे भासतात, पण सुवर्णच नाही का ते ?


तैसे ज्ञानाचिये दिठी (दृष्टीने) मजसीं अभिन्नचि ते किरीटी येर (एऱ्हवीं) भिन्नपण तें उठी अज्ञानास्तव  


ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन:  

मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति   १५/७॥” 


(शरीरातील जीवात्मा हा माझाच अंश असून प्रकृतिजन्य मन आणि पाच इन्द्रियांना तो आपल्याकडे आकर्षित करत असतो

अर्जुना, जीव जेव्हा स्वत:ला शरीर मानतो तेव्हा तो माझ्यापेक्षा वेगळा मानून  माझा केवळ एक अंश आहे असे समजतो. असे पहा, वाऱ्याचा संपर्क होऊन सागरावर लाटा उमटतात आणि त्या आपल्याला सागराचा लहानसा अंश मानतात. अगदी तसेच देहाभिमानामुळे तो जन्म मृत्यु इत्यादींना खरे मानतोत्याला मी जीवलोक. किंवा संसार  असे म्हणतो. चंद्रबिंब पाण्यात असूनही चंद्र जसा नामानिराळा असतो तसा विविध देहांमध्ये राहात असूनही मी देहातीत असतो

असे पहा, कुंकवावर जर कांच ठेवली तर तीही लाल दिसते, किंवा केसांच्या गुंतळ्यावर ती ठेवली तर ती भंगलेली वाटते. तसे माझे कायम असणे नि सतत कार्यमग्न राहणे हे जरी कर्ता, भोक्ता असे वाटत असले तरी तो केवळ भ्रम होय


फार काय सांगूं, निर्लेप असा आत्मा प्रकृतीशी तद्रूप होतांच जन्म-मरणादि देहधर्म आपल्यांत खरेपणाने पाहू लागतो. शिवाय मन नि पंचेन्द्रियें ही प्रकृतीचे आधीन असलेली इंद्रियें आपली मानून तसे वागूं लागतो


जैसे स्वप्नीं परिव्राजें (संन्यासी) आपणपयां आपण कुटुंब होईजे मग तयाचेनि धांविजे मोहें सैरा  

तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणचि प्रकृतिसाारिखा गमोनि (मानून) पुढती (पुन्हा) तियेसीचि भजे (त्याप्रमाणे आपले मूळ स्वरूप विसरून स्वत:ला प्रकृतिसारखा मानून पुन्हा तिच्याच तालावर नाचतो


मनोरथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाचे द्वारातून बाहेर पडून तो शब्दांच्या रानावनांत फिरू लागतो आणि तेवढ्यांत प्रकृतीचा लगाम त्याला त्वचेच्या स्पर्षसुखाचे घनघोर अरण्यांत ओढून नेतो, तर कधीं नेत्रांच्या दारातून बाहेर पडून रूपाच्या डोंगरावर सैरावैरा हिंडतो

कधीं रसनेंद्रियांच्या गुहेंत शिरतो तर कधी सुगंधाने बागेत रमतो हा जीव


ऐसेनि दैहेन्द्रिय नायकें धरूनि मन जवळिकें भोगिजती शब्दादिकें विषयभरणें (अशा प्रकारे हादेहाभिमानीजीव मनाला गळामिठी मारून शब्दादि विषयांचा उपभोग घेतो

व्वाहवा ! किती सुंदर वर्णन नाही


क्रमश:......! 




Friday, October 09, 2020

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य स्थळें भाग एकशे आठ (१०८)

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे आठ (१०८


भगवंत आपला निश्चित ठावठिकाणा कुठे नि कसा आहे ते सांगत आहेत पुढील श्लोकातून


तद् भासयते सूर्यो शशांको पावक:     

यद् गत्वा निवर्तन्ते तद् धाम परमं मम       १५/६॥” 


(ज्या स्वयंप्रकाशी तेजोमय ब्रह्मपदाला सूर्य, चंद्र किंवा अग्नीचा प्रकाश दाखवण्यास असमर्थ आहे आणि जेथे पोहोचल्यावर योगीजन परत माघारी जात नाहीत, ते अव्यय अनिनाशी तेजोमय स्थान माझे आहे


पैं दीपाचिया बंबाळीं (झगमगाटांत) कां चंद्र हन जे उजळी हे काय बोलों अंशुमाळी प्रकाशी जें  

तें आघवेंचि दिसणे जयाचें कां देखणे विश्व भासतसे जेणें लपालेनि  


( दिव्यांच्या उजेडात किंवा चंद्र-सूर्याच्या प्रकाशांत हे लपून राहिलेले परब्रह्म आपल्या अंगभूत तेजाने सूर्य, चंद्र, दीपांसह सर्व विश्व उजळून टाकते.) 


जैसे शिंपीपण हारपे तंव तंव खरे होय रूपें कां दोरी लोपतां सापें फार होईजे (प्रतीती येते) (चांदीच्या तुकड्याप्रमाणे एखादे शिंपले भासते, किंवा दोरी ऐवजी सर्प असल्याचा भास होतो


तैसी चंद्रसूर्यादि थोरें  इयें तेजें जियें फारें तिये जयाचेनि आंधारें प्रकाशती (त्या प्रमाणे ज्या परब्रह्मवस्तूचे तेज झाकूनही सूर्यचंद्राचे प्रचंड तेज फिके पडते


ती वस्तु की तेजोराशी सर्व भूतात्मक सरिसी चंद्रसूर्याच्या मानसीं प्रकाशे जें (तीवस्तुनिव्वळ तेजाची रास असून सर्व प्राणिमात्रांना व्यापून असते, शिवाय चंद्र-सूर्यांना देखील प्रकाश देते


म्हणौनि चंद्रसूर्य कवडसां पडती वस्तुच्या प्रकाशा यालागीं तेज जे तेजसां तें वस्तूचे आंग (म्हणूनच चंद्रसूर्यांचे आभास या आत्मवस्तुच्या प्रकाशांत होतात. वास्तविक सर्व तेजोमय पदार्थांचे तेज आत्मवस्तु मुळे दृग्गोचर होते


अरे, या आत्मवस्तूचे प्रकाशात चंद्रसूर्यच नव्हे तर सर्व जगाचा आभास नष्ट होतो, जसे सूर्योदय होताच चंद्रासकट सगळी नक्षत्रेंही दिसेनाशी होतात. असे पहा, जाग येताच स्वप्नांतला सर्व फापटपसारा (डिंडीमा !) गायब होतो किंवा संध्याकाळीं मृगजळ उरत नाही

अगदी तसेच, ज्या (आत्म)वस्तूचे ठिकाणी कुठलेच भास-आभास शिल्लक राहात नाहीत, तेच माझे परमधाम होय हे निश्चितपणे (पाटाचें गा ! ) जाणून घे ! ! 

शिवाय, जे कोणी माझ्या या परमधामाला येऊन पोहोचले त्यांना पुन्हा जन्म-मृत्यूचे कारणच उरत नाही, जसे पाण्याचे ओघ महासागरात मिसळल्यावर पुन्हा माघारीं फिरत नाहीत

किंवा, मीठाची बाहुली समुद्रांत पडली तर ती त्यांत विरघळून जाते अथवा आकाशांत गेलेले आगीचे लोळ परत येत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला तर तो काही परत येत नाही

तसे, जे माझेशीं शुध्द आत्मज्ञानाने एकरूप झाले त्यांचे परतीचे तिकिटकटाप्होते


आता अर्जुन एक अतिशय मार्मिक प्रश्न करेल भगवंताला


तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो (प्रज्ञारूपी पृथ्वीचा राजा) पार्थु म्हणे जी जी महा पसावो (प्रसाद) परी विनंती एकी देवो (देवा) चित्त देतु (लक्ष द्यावे)  


हे देवा, मला इतकेच सांगा की जे तुमच्याशी एकरूप होऊन परत माघारी जन्म घेत नाहीत ते मुळांत तुमचेशी अभिन्न होते की वेगळाले ? जर ते आधीपासूनच भिन्न असतील तर ते पुन्हा परतत नाहीत हे तुमचे म्हणणे जरा असंगत वाटते. मला सांगा, फुलांजवळ गेलेले भ्रमर फूल होऊन जातात काय ? किंवा धनुष्यातून सुटलेला बाण लक्ष्य भेदल्यावर पुन्हा माघारी   वळतां बाजूला पडतो ना ?

 तसे जर ते तुमचे स्वरूपाहून अभिन्न असतील तर कोण कोणांत मिळाले ? शस्त्राने शस्त्रावरच  घाव करता येईल का

म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां तुझा संयोग वियोगु देवा नये बोललों अवयवां शरीरेंसी (म्हणून तुझ्याशी अभिन्न असलेल्यांचा संयोग वियोग म्हणताच येत नाही, जसे शरीरातील अवयवांना संयोगवियोग संभवत नाही


आणि जे सदा वेगळे तुजसी तयां मिळणीं नाही कोणे दिवसीं मा (मग) येती ना येती हे कायसी वायबुध्दि (व्यर्थ बोलणे) ?  


तरीही तुझ्यांत मिळून जाणारे  कोण माघारी येत नाहीत ते हे अनंता, भगवंता, मला कृपाकरून समजावून सांगा


इये आक्षेपीं (विनंती)) अर्जुनाच्या तो शिरोमणि सर्वज्ञांचा तोषला बोध शिष्याचा देखोनियां  


क्रमश:.....



This page is powered by Blogger. Isn't yours?