Saturday, November 27, 2021

 

Conventions !

 Conventions ! 


There are certain words in English as well as vernacular languages, which denote deeper meanings than the actual  word used. Conventions is such of those. 

By convention we normally mean some set traditions that may or may not be violated. Those are not ‘rules’ as such but are frequently observed in right earnest. 

In vernacular languages we use the term संकेत, which mean ‘a sign’, indication, signal, symbol, etiquette , a notion and of course Convention ! 


Now, how are any Conventions set anyway ? We come across so many of them right from womb to tomb ! Those happen to be the so-called ‘rituals’, which somehow are religiously followed. By ‘religiously’ I mean rather orthodoxically that may not possess a convincing rationale somehow. Those are just followed as rote or routine. 


Do we feel sad or guilty if one fails to observe those ? Yes, because even though not illegal, we are somehow accustomed to obey certain conventions even if those may look odd or out of place occasionally. The reason being our getting ‘tuned’ to the notion. Our mindset becomes so rigid at times that defies reasoning and logic anyway. 

I would not venture listing out ‘Conventions’ as such since we are aware of those already. 

Why do we feel guilty or sad for not observing certain norms ! It is because our inner conscience or सद्सद्विवेक or power of discrimination is ever alert, which does not allow trespassing the set norms. Now, who has set even the ‘norms’ ? It’s the long drawn traditions borne out of personal or collective   experiences in the past.. 


It is indeed fascinating, ruminating over set conventions ! It is like a blind-folded individual lost in a crowd ! Bewildered, one just comes across thousands of conventions he was bound to thus far ! Can he overthrow those and come out with a clearer conscience ? Intriguing indeed, because as they say ‘old habits die hard’,  one becomes habituated to those. And therefore one just cannot abandon them. 


I vividly remember a phrase quite commonly used, that is, there are two ways of tackling a problem. One is the ‘conventional method’ born out of wide experience and another a quicker one, a short-cut method which may not be reliable. (I used to chose the later being always hard pressed with ‘times’ ! ) 


Pardon me for the usual diversion on my part. However, what I intend to say is that ‘Conventions’ are often acceptable, being time tested. One should follow the set conventions as far as possible, since that ensures harmony in the society at large. I very well remember the words of my Head-Master in school on our first Independence Day. He had defined the word Independence lucidly. He had said that independence means a sense of responsibility unto fellow citizens, who must always be respected because that is the age-old convention for a civilised society. 


We have been following all sorts of rituals and conventions for ages ; however, did we ever give a thought to those ? Here is the platform to share your thoughts. Please do not hesitate to broadcast them ! 


Dr. P. S. Rahalkar

27 November 2021 



Saturday, November 20, 2021

 

श्री ४२० !

 श्री ४२०

हा चारशे विसावा ब्लॉग आहे माझा, आणि म्हणून हा मथळा दिला या वटवटीला ! दोन हजार सहा सालीं अचानक एका स्नेह्याने हे दालन उघडून दिले माझ्यासाठी नि पहिला प्रयोग इंग्रजीत केल्याने तो क्षणार्धांतव्हायरल्झाला जगभर आणि अर्ध्या तासांत हवाना होनोलुलू पासून टिम्बक्टू नि आर्जेंटिना सकट कित्येक देशांतून प्रतिसाद यायला सुरूवात झाली. अगदी खरें सांगायचे तर मी चांगलाच गोंधळून गेलो, बुचकळ्यांत पडलो. नंतर कालांतराने कळले की सर्वच ब्लॉग्ज वाचायचे किंवा त्यांना प्रतिसाद देणे बंधनकारक नाही असे ! ! 

आजचा हा सगळा मजकूर पाहताही तुम्हाला दुर्लक्ष करायला भाग पाडेल म्हणूनच नांव दिले आहेश्री चारसौ बीस ‘ ! 

तसे पाहिले तर या आकड्याचे नि माझे जन्मत: सख्य आहे. आयुष्यांत खूप बंडलबाजी केलीय मी - चारसौ बीसी ! अर्थात त्यांत कुणाला फसविण्याचा कधीच इरादा नव्हता, जरी कायद्यातले हे कलम फसवणुकीचे संदर्भात रूढ असले तरी

बंडलबाजी बहुतेक वेळा वेळ मारून नेण्यासाठी असते तर फसवणुकीमागे एक निश्चित धोरण नि स्वार्थ असतो. (या विधानावर दुमत असणे शक्य आहे. कदाचित् यांवरील कोणी अधिकारी बराच प्रकाश टाकू शकेल, बरीचशी वायफळ चर्चासुध्गा करण्याचा हुंकार भरेल ! ) असो.


खरेतर इतक्या फालतू विषयावर हे लिखाण केवळ माझ्या चारशे-विसाव्या ब्लागला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आहे. (एका कवितेची पंक्ती सहज मनीं आली - “हा असत् पणा ही सत्याधिष्ठित् , म्हणून त्याचे मोल प्रतिष्ठित् “ ! व्वा, क्या बात है ! ! 

मी जेमतेम दहा वर्षाचा असताना राजकपूरचा श्री ४२० हा चित्रपट पाहिला होता. लवकरच तो भारतातच नव्हे तर विशेषकरून रशियांत खूप धुमाकूळ घालणारा ठरला. त्यांतली गाणी तर विलक्षण पाप्युलर झाली. एकोणीसशे पन्नास ते साठचे दरम्यान असंख्य शिणेमे पाहिले, मात्र श्री चार सौ बीस ने चांगलीच पकड घेतली होती. चार्ली चॅप्लिन चे अनेक मूकपट देखील पाहिले नि त्यांतील कारूण्य कुठेतरी खोलवर दडून बसले होते. (माणसाची अगतिकता, मग तो कितीही बलाढ्य का असेना, अधोरेखित करण्याची हातोटी चार्ली चॅप्लिन ला विलक्षण साधली होती. तसाच काहीसा प्रकार शेक्सपियरच्या लेखणीतून अवतरत असे. त्याच्या सर्वट्रॅजेडीजअफाट दाद नि कौतुक मिळवून गेल्या. ) 

बरेच विषयांतर होत जाणार हे ओघाने आलेच, कारण मथळ्याला पुरेसे खाद्य तर पुरवले पाहिजेच ना

अजून एक गुपित सांगून हा फापटपसारा आवरतो. मी अजून पर्यंत श्री ४२० हा चित्रपट पाहिलाच नाही कारण त्यावेळेस मला कावीळ झाली असावी नि आता  दृष्टिदोष ! ! 

(आहे ना चारसौ बीसी ! ! ! )


रहाळकर 

२० नोव्हेंबर २०२१


Wednesday, November 17, 2021

 

वर्त्कृत्व नि श्रोतृत्व !

 “वत्कृत्व आणि श्रोतृत्व “ ! 

‘आज काय नवीन चऱ्हाट वाचायला लावतोय हा बाबा’ असा विचार तुमचे मनांत येणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र आज मी तुम्हाला दाद द्यायला लावीन ‘हे प्रतिज्ञोत्तर माझे / उघड ऐका ‘ ! 
आधी वरील दोन्ही शब्दांचा भाबडा म्हणजे सोप्पा अर्थ विशद करूं - ‘बोलणे नि ऐकणे’. ( तुम्हाला माहीत नसेल म्हणून आवर्जून सांगितला ! ) असो. 

शाळा कालेजांत असल्या पासून अक्षरश: शेकडो वक्त्यांची काही अप्रतिम वत्कृत्व शैली माझे मनांत घर करून आहे. काहींचे तेच एक अवतार कार्य असावे अशी माझी पक्की धारणा आहे. खूप खूप उत्तम व्याख्याने ऐकली, तितकेच उत्तम परिसंवाद ऐकता आले, मत-मतांतरें असली तरी ते बहुधा अतिशय रोचक, खिळवून ठेवणारे आणि एखाद्या विषयावर चहूं बाजूंनी प्रकाशझोत टाकणारे असत. (त्यामुळेंच माझी प्रज्ञा अधिक प्रतिभावान् झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही ! ) तें असो. 

(हल्ली टीव्ही वर दररोज चालणारे वादंग नि शिवीगाळ पाहतांना खूप खूप वेदना होतात मला. एके काळी ‘प्रतिभा नि प्रतिमा’ सारखे उत्कृष्ट कार्यक्रम नैवेद्यापुरतेही वाढले जात नाहीत आतांशा आणि त्याचे सतत वैषम्य वाटत राहते. अनिलांची एकोणीसशे पन्नास साली लिहिलेली ‘सारेच दीप कसे मंदावले आतां ‘ ही कविता अजूनही किती समर्पक ठरते आहे पहा. ) असू देत, आज काहीही नकारात्मक लिहायचे नाही असे पक्के ठरवून आहे मी. 

तर मला असं म्हणायचंय की ‘वक्ता नि श्रोता’ या दोघांनाही समसमान मान नि स्थान दिले आहे प्रत्येक संताने. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, अविभाज्य आहेत, एकाशिवाय दुसऱ्याला काहीही किंमत नसलेले. आता हेच पहा ना, तुम्ही येथवर माझे सोबत आहांत या खात्रीनेच नाही का मी हे चऱ्हाट वळत ? जाऊ द्या झालं . 

असे म्हणतात की सृष्टी निर्माण केल्यावर परमेश्वराने सर्वात शेवटी माणूस घडवला आणि आपली बुध्दी त्याचे मस्तकांत फिट करून टाकली. मात्र हे करण्यापूर्वीं तो अगदीच एकटा होता, न कुणाशी बोलणें ना कोणाचे काही ऐकणे ! खरेतर याच कासाविसी पोटीं त्याने हा विश्वाचा डोलारा उभा केला. (चाणाक्ष मंडळींचे ध्यानात ‘डोलारा’ शब्द वाचून नक्कीच दाद द्यावीशी वाटली असणार त्यांना ! ) असो. 

तर मी असे म्हणत होतो की बोलणारा नि ऐकणारा या दोहोंत एक जरी नसला तरी जगराहाटी विस्कळीत होईल, नव्हे ठप्प होईल. तथापि, मला जरा अधिक खोलांत घेऊन जायचंय तुम्हाला. असे पहा की आपण येथवर दोन व्यक्तींबद्दलची चर्चा करत होतो. मात्र खरंच दोघांची नेहमीच गरज असते काय ? माझे मतें बोलणाऱ्या पेक्षा ऐकणारा जास्त महत्वाचा, कारण कित्येक वेळा न बोललेले देखील सहज ऐकू येते (पहा - ‘शब्दांच्या पलिकडले ‘ ! ) 
निसर्ग तर आपल्याला सतत खुणावत असतो, बोलवत असतो - न बोलतांही ! आपणच पाहून न पाहिल्या सारखे करतो, ऐकून न ऐकल्यासारखे ! ग्रंथ मंडळी तर आपली चातका सारखी वाट पाहात असतात त्यांतले शब्दभांडार, नव्हे शब्दज्ञान आपल्या कर्णसंपुष्टांत ओतण्यासाठी, केवळ आपली नजर नि अवधान त्यांचेकडे वळावी म्हणून ! प्रत्येक ग्रंथातला प्रत्येक संत सतत बजावित असतो - अवधारिजो जी,   सुनो भाई साधो, ऐका हो ऐका, लिसन् केअरफुली, आधी ऐकून तर घ्या - वगैरे. 
कुणी तरी म्हटलेय् , ‘श्रोतेविण वक्ता नव्हे, वक्त्याविण श्रोता नव्हे ‘ . पहा तुम्हाला कितपत पटतंय् ते. मात्र एखादा खरा दार्शनिक म्हणतो - ‘अंतरात्मा की आवाज सुनो ! ‘ पण त्यासाठी आपला स्वत:चा आवाज ‘म्यूट’ करता यायला हवा ना ! खरेतर आपण मोठ्यांदा जितके बोलतो त्यापेक्षा मनांतल्या मनांत कितीतरी अधिक पटींनी ! त्याच्यावर जितके नियंत्रण आणू तितका अंतर्मनाचा आवाज ‘ऐकतां’ येईल. 

खूप वर्षांपूर्वी ‘साधनेचा अंतर्मुख प्रवास ‘ हे सुंदर पुस्तक वाचले होते. त्यांतला एक शब्द खूप काही सांगून गेला होता नि तो होता ‘मौन’ ! अंतर्बाह्य मौन. (तर मग वक्ता नि श्रोता दोघेही मौन, ‘म्यूट’ ! (मग इतकं सगळं लिहिलेलं व्यर्थ म्हाणायचे की ! ) 

अगदी खरं सांगू ? मला वक्तृत्वावर नि श्रोतृत्वावर खूप काही बोलायचे होतं. कित्येक उत्तमोत्तम वक्त्यांना याद करत त्यांच्या विशिष्ट शैलीचे खुमासदार वर्णन करायचं होतं. मी ऐकलेले अनेक ‘किस्से’ नि प्रसंग त्यांचे शैलींत सांगायचे होते - मात्र आम्ही ठरलो मुखदुर्बळ ! त्यातून सक्तीचे मौनव्रत घेतलेले ‘मौनीबाबा’ ! कुणास ठाऊक पुढे कधी जमेल की नाही. तरीपण माझी खात्री आहे की मी अद्याप न बोललेले तुम्हांस कधीच कळले आहे ! ! 

रहाळकर 
१८ नोव्हेंबर २०२१



Sunday, November 14, 2021

 

नादब्रह्म !

 नादब्रह्म ! 

नुकतेच स्वरभास्कर आणि भारतरत्न पं. भीमसेनजींचे  दोन प्रसिध्द राग ‘दरबारीं कानडा’ आणि ‘आसावरी तोडी’ अक्षरश: ध्यानस्थ होऊन ऐकले आणि त्या नादब्रह्माची पुन्हा एकदा गाढ प्रचीती अंत:करणांत साठवून घेतली. 

खरेंतर हल्ली वरचेवर तसे अनुभव घेतोय मी, आणि आता हळूहळू संवय होत चाललीय प्रत्येक आवाजातून तें ‘नादब्रह्म’ शोधून काढण्याची ! एक गुपित सांगतो, कोणत्याही गाण्याचे स्वर ऐकत असताना आपण जेव्हा त्या गायकाची आपल्या आतल्या सुरातून   ‘साथ’ करू लागतो - संवादिनी सारखी - तेव्हा जाणवते की आपण सुध्दा तितक्याच ताकदीने तो राग आळवू शकतो. जस्ट कीप हम्मिंग वुईथ द सिंगर टाइट-लिप्पड् (ओठ घट्ट दाबून धरीत आपल्याच ओठांनी ! )  ! ही थाप नाही, भूलथाप तर नाहीच नाही. प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा, मी सांगत असलेला अनुभव तुम्हीसुध्गा सहज घेऊ शकाल ! 
 
आणखी थोडे खरे सांगायचे तर हाच अनुभव आपण नीरव शांततेंत घेऊ शकतो, पक्ष्यांच्या किलकिलाटांत, ट्रॅफिक जॅम मधल्या हॉर्न्स च्या कलकलाटांत नि स्वयंपाक घरातल्या भांड्यांच्या खणखणांत अन् फोडण्यांच्या चुरचुराटांत देखील ! चेष्टा नाही करत, अनुभवून तर पहा - म्हणजे कान देऊन तर पहा ! ! 

नुकतेच दासबोधाचे वाचन सुरू केलेंय् पुन्हा . (मग ते जाहीर करायलाच हवे का ? ) तसं नाही, त्यांतला काही मजकूर वरील खदखदणाऱ्या विधानांशी   किंचित मिळताजुळता    आहे म्हणून जाताजातां उल्लेख केला एवढंच ! 
आत्तां मी जी समर्थवचने सांगणार आहे ती केवळ योगायोगाने आठवली म्हणून लिहितोंय. यांतील मला कोणताही दुरान्वयानेही अनुभव नाही हे आधीच नमूद करून ठेवतो, कारण श्री समर्थांनी सांगितलेल्यावर पुढे मल्लीनाथी किंवा कोणतीही पुस्ती जोडणे म्हणजे पढतमूर्खपणाचा कळस ठरेल ! 

स्वामी ‘पारमार्थिक दृष्ट्या  सोलीव सुखाची’ व्याख्या करतात - 
“वत्सा सावध त्वरित / निजरुप पहा आपुलें // 
जागृत करोनि ते वेळीं / अजपाची दोरी देऊनी जवळीं / विहंगम डोल्हारी तयेवेळीं / अलक्ष्य लक्षीं बैसविले //
धैऱ्याचे आसन बळकट / आणि इंद्रियें ओढुनी   सघट / धरे ऊर्ध्व पंथें वाट नीट ! अढळपदीं लक्ष लावी //“ 

(फारच कठीण आहे समजायला, तरीपण पुढे जाऊंया ! ) 

“पुढे करूनिया जाणीव / मागे सारोनि नेणीव / जे जे जाणिवेल अभिनव / तें तूं नव्हेसि तत्वतां // 
“”” तैं  मार्गाची  करूं नव्हाळी / प्रथम घंटानादाची नवाळी / दुसरी किंकिणीची मोवाळी / तिसरी अनुहत कोल्हाळ //१७// 
“”””आतां अग्रीं लक्ष लावी / काय दिसेल ते न्याहाळीं / चंद्रज्योती प्रकाशली / व्यूह बांधिला बळकट / /१८// 
‘ते सुख  अंतरीं घेऊनि / पुढे चाल करीं संगमीं / तेथे विजु   ऐसा कामिनी / चमकताती सुवर्णरंग // 
‘तेही जाणोनि मागें सारीं /  पुढे सूर्यबिंब अवधारीं / ज्वाळा निघती परोपरी / डंडळूं नको कल्पान्तीं //
‘वायोमुख करोनि तेथे / गिळी वेगें सूर्यकिरणांतें / मग देखसी आनंदमार्तंडातें / तेजोमय ममपुत्रा ! ! / 

(In fact, Sri Samartha is guiding the disciple on to the Royal Road to Self-realisation, the road one must trudge within himself ! This is no commentary over whatever the great Saint said, as promised earlier !  ) (And I must have caused deep disappointment in the process, as usual ! ,) 

रहा़कर the ever confuser ! 
१३ नोव्हेंबर २०२१



Wednesday, November 10, 2021

 

मित्र आणि स्नेही

 “मित्र आणि स्नेही” !

मैत्र नि स्नेह या समानार्थी शब्दांत काही भेद आहे का, हे सहज पडताळून  पाहतांना जाणवले की होय, उन्नीस-बीस  का फर्क है  जरूर !      स्नेह एकोणीस मार्कांचा तर मैत्र पूर्ण वीस. सांगतो, धिर्धरा धिर्धरा ! 

स्नेही हा शब्द आपण बराचसा आदरयुक्त भावनेने उच्चारत असतो. तिथे प्रेम असते किंचित अंतर ठेवून. आपण सहसा अशा स्नेह्याला अरे-तुरे म्हणत नाही, त्याचेशी वादविवाद करत नाही, चेष्टा मस्करी करत नाही, पाठीवर जोरात थाप मारत नाही, त्याच्या खिशाला भोक करत नाही, त्याला सहसा दुखवत नाही ! थोडक्यांत, स्नेही हा बराचसा ‘गुडी गुडी’ असतो. चर्चा किंवा विचारविनिमय करताना आपण आपले ‘बेअरिंग’ ढळू न देण्याचा प्रयत्न करतो ; त्याचे बोलणे किंवा विचार शांतपणे ऐकून घेतो नि ते पटत नसले तरी ‘वुई ॲग्री टु डिसॲग्री, बट् क्वाइट पोलाइट्ली ! ‘ 

मित्राचे तसे नाही. वरील सर्व बाबी आपण सहज ‘नजरअंदाज’ करतो ! त्याला अचानक शिवी घालू शकतो, वाटेल तशी चेष्टामस्करी तर करू शकतोच, पण कडाक्याचे भांडण सुध्दा करू शकतो, कारण आपल्याला खात्री असते गाढ मैत्रीची ! शाळा-कॉलेज मधली मैत्री सहसा अशी असते. कालांतराने, म्हणजे समाजात थोडीफार प्रतिष्ठा मिळाल्यावर झालेले मित्र सहसा स्नेही या स्वरूपातले असतात. अशा स्नेह्याजवळ आपले अंत:करण मोकळे करता येईलच असे नाही. ते बहुतेक वेळा आपल्याहून श्रेष्ठ असल्याने त्यांचा साहाजिकच आदर राखला जातो. 

आहे ना सट्ल्, नव्हे ग्रॉस फरक ? 

पुन्हा एक शंका आहेच ! माऊलींनी पसायदानात ‘भूतां परस्परें जडो ‘मैत्र’ जीवांचे’ असेच का म्हटले, स्नेह किंवा प्रेम कां नाही ? (सम फूड फ़ॉर थॉट ! ) 

प्रभु  रहाळकर.    (ऊर्फ ‘शंकासुर’ ! ) 
१० नोव्हेंबर २०२१ 

 
Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/


Monday, November 08, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकशे सहा, सात व आठ

 


१०६).        “ओम् आत्मयोनि : स्वयंजातो वैखान:    सामगायन :       ।
                 देवकीनन्दन : स्त्रष्टा क्षितीश : पापनाशन :         ॥१०६॥” 

श्री महाविष्णु ला ‘अयोनिज:’ म्हणजेच गर्भवास न सोसतां प्रकट झालेले आपण आधी पाहिले आहे. खरोखर, प्रत्यक्ष परब्रह्म त्याचे स्वरूपात स्वयंभूरित्या प्रकटले आहे. 

पुराण कथेनुसार, वराह अवतारांत हिरण्याक्ष नामक दैत्याला शोधून मारण्यासाठी त्याने पृथ्वी खणून काढली होती असे वर्णन येते. म्हणून ‘वैखान: ‘ ! 

या ईश्वराला (देखील) संगीत फार प्रिय असल्याने तो त्या सूरतालांत निमग्न असावा म्हणून त्याला उपाधी देऊन टाकली ‘सामगायन :’ ! ! (खरे पाहतां ओंकार ध्वनीलाच साम असे म्हणतात, कारण विश्वोत्पत्तीचे वेळी अवकाशात हा भुंग्याप्रमाणे गुणगुणणारा ओंकार अंतराळात दुमदुमत असावा ) असो. 

असे म्हणतात की साधकाची आपल्या उपासनेत जसजशी प्रगती होते तसे अनेक प्रकारचे संकेत त्याला जाणवू लागतात, त्यांत ‘अनाहत नाद’ सामील आहे. (मात्र सदगुरू या संकेतांकडे दुर्लक्ष करून आपली साधना जोमाने सुरू ठेवण्याचा उपदेश करतात ! ) 
‘स्त्रष्टा’ म्हणजे सृजन करणारा, नवी सृष्टी रचणारा आहे, तर ‘क्षितीश:’ म्हणजे पृथ्वीचा स्वामी - (क्षिती म्हणजे पृथ्वी) ! 

‘पापनाशन :’ = पापांचा नाश करणारा ! (पाप नि पुण्य हे दोन्ही शब्द खरे तर हायपोथेटिकल आहेत. एखादे पाप दुसऱ्या संदर्भात पुण्य ठरू शकते किंवा पुण्य पापांत ! मला कशाचेही समर्थन करायचे नाही, मात्र एवढे खरे की जे दुसऱ्याला त्रास देते, पीडा देते ते पाप नि  जे  सुख, शांती, समाधान मिळवून देते तें पुण्य ! ) पुन्हा विषयांतर. असो. 

१०७).        “ओम् शंखभृन्नदकी चक्री शार्गंधन्वा  गदाधर :       ।
                  रथांगपाणिर् अक्षोभ्य : सर्वप्रहरणायुध :  —- ओम् नम : इति ॥१०७॥” 

विश्वातील सर्व प्राणिमात्रांचा अहंकार रूपी ‘पांचजन्य’ नामक शंख धारण करणारा श्रीमहाविष्णु ‘शंखभृत्’ होय. 
विद्येचे प्रतीक असलेली नन्दकी नामक तलवार याचे हातीं आहे.
‘मना’चे निदर्शक असे सुदर्शन  चक्र एका करंगळीवर फिरते आहे, जे संसारचक्राचेही द्योतक आहे . असा हा ‘चक्री’ आहे. ! 
इंद्रियजन्य अहंकाराचे प्रतीक असे शांड्र्ग नावाचे धनुष्य आणि बुध्दितत्व दर्शवणारी ‘कौमुदकी’ नामक गदा हातांत, असा हा ‘शार्गंधन्वा गदाधर :’ आहे ! 

अशा प्रकारें मन, बुद्धी, अहंकार, विद्या आणि पंचमहाभूतें यांची प्रतीकात्मक आयुधें तसेच विश्वरूप निदर्शक पद्म यांनी विभूषित असा हा श्री महाविष्णु होय ! हातात फिरणारे सुदर्शन चक्र गति दर्शक म्हणून हा ‘रथांगपाणी आहे ! 
‘अक्षोभ्य’ म्हणजे कधीही क्षुब्ध न होणारा हे आपण जाणतो, तर अन्याय आणि असत्य यांवर मात करण्यासाठी शस्त्रें धारण करणारा हा ‘सर्वप्रहरणायुध:’ आहे. 

१०८).         “ओम् नमोSस्तवनन्ताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादायक्षिशिरोरूबाहवे  ।
                    सहस्त्रनाम्ने पुरूषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नम :       ॥१०८॥” 

महाभारतातील वर्णनाप्रमाणे शरपंजरी पहुडलेला आणि अंतकाळासाठी उत्तरायणाची वाट पाहणाऱ्या भीष्मपितामहांनी हे स्तोत्र श्रीकृष्णावर दृष्टी ठेवत युद्धभूमिवर सांगितले, त्याची फलश्रुती सांगितली नि श्रीकृष्णाशी एकरूप झाले. 

त्यावेळीं अर्जुनाने श्रीकृष्णाला विनवले की हे स्तोत्र बरेच मोठे असल्याने या स्तोत्राचे सार असा एक श्लोक सांगावा. तेव्हा भगवंताने वरील श्लोक भक्तिपूर्वक गाइला जावा असे उत्तर दिले !  
त्या वरील श्लोकाचा भावार्थ असा —— ‘सहस्त्र रूपें धारण करणाऱ्या, सहस्त्र पाय, सहस्त्र नेत्र, सहस्त्र शिरें नि सहस्त्र बाहू असलेल्या अनंताला नमस्कार असो ! सहस्त्रकोटी युगें धारण करणाऱ्या, सहस्त्रनामाने संबोधलेल्या शाश्वत पुरूषाला नमस्कार असो ! ! 
॥ओम् नम : इति ॥ 
ओम् श्री साईराम ! 
प्रेषक - डॉ. प्र. शं. रहाळकर 
पुणे
लेखन सीमा दि. ८ नोव्हेंबर २०२१ 



 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक एकशे एक ते एकशे पाच

 



१०१).         “ओम् अनादिर् भूर्भुवो लक्ष्मी : सुवीरो रचिरान्गद :  ।
                   जननो जनजन्मादिर् भीमो भीमपराक्रम :           ॥१०१॥”

भगवान् श्री महाविष्णुने हे विश्व निर्माण केले असले तरी त्या स्वत:ला इतर कोणी निर्माण केले नाही, कारण तो स्वयंभू, अजन्मा आहे - अनादि आहे ! 
‘भूर्भुवो’ या शब्दातील ‘भू:’ म्हणजे पृथ्वीसह इतर सर्व खगोल - म्हणजे ग्रह, तारे, नक्षत्रें वगैरे तर ‘भुव :’ म्हणजे सर्व प्राणिमात्रांसह अखिल ब्रह्मांडाचा एकमेव आधार अर्थात् परमेश्वर ! सर्व ब्रह्मांड त्याचेच चैतन्यतेजामुळे समृध्द आहे म्हणून ‘भूर्भुवो लक्ष्मी :’ ! (आत्मविद्येला सुध्दा लक्ष्मी म्हटले आहे  . वेदज्ञानाने अखिल विश्व ओतप्रोत भरून टाकणारा हा ईश्वर लक्ष्मीवान् आहे ! ) तो अत्यंत पराक्रमी असल्याने त्याला ‘सुवीरो’ म्हटले.  कर्म-ज्ञानरूपी त्याचे बाहू विश्वकल्याणार्थ झटणारे म्हणून त्याला’रूचिरांगद :’ म्हटले आहे. 
विश्वनिर्मितीचे भीमकाय कार्य संपन्न करणारा नि  वारंवार  विश्व प्रसवणारा हा  ‘जननो जन्मादि,   भीमोभीमपराक्रमो आहे ! 

१०२).         “ओम् आधारनिलयो धाता पुष्पहास : प्रजागर :         ।
                 ऊर्ध्वग : सत्पथाचार : प्राणद : प्रणव : पण :       ॥१०२॥” 

पंचमहाभूतें आणि त्रिगुण अशा अष्टधा प्रकृतीने निर्मिलेल्या विश्वाचा श्रीमहाविष्णु आधार आणि निलय म्हणजे निवासस्थान आहे. 
त्याला ‘अधाता’ म्हटले कारण तो निर्गुण निराकार परब्रह्माचा अविष्कार असल्याने,        जे शाश्वत  नि सर्वव्यापक आहे, त्याला  इतर कुठल्या आधाराची गरज नाही. मात्र तोच अखिल ब्रह्मांडाला ‘धारण’ करतो म्हणून त्याला ‘धाता’ ही म्हटले आहे. 
विश्वनिर्मिती करत असताना त्याला विलक्षण आनंद होत राहिला नि ते पूर्ण झाल्यावर, विशेषकरून मानव-निर्मितीनंतर त्याचे मुखावर विलोभनीय स्मितहास्य पसरले, एखाद्या टवटवीत ताज्या सुंदर फुलाप्रमाणे, म्हणून त्याला ‘पुष्पहास :’ म्हटले ! ! 
आपणच निर्मिलेल्या प्रजेला आत्मसुख देऊन त्यांना मोक्ष दिलवण्यासाठी सदैव जागरूक असलेला हा ‘ऊर्ध्वग: प्रजागर:’ आहे. 
हा ‘प्राणद :’ तर आहेच आणि ओंकार हे त्याचे मूळ स्वरूप आहे नि तिकडेच परत आणणारा हा ‘पण:’ म्हणजे निश्चयी आहे ! 

१०३).       “ओम् प्रमाणं प्राणनिलय : प्राणभृत् प्राणजीवन :        ।
                तत्वं तत्वविदेकात्मा जन्ममृत्यु जरातिग :          ॥१०३॥” 

जगन्नियंता भगवन्त हा स्वत: च्या ‘असण्या’चे स्वत:च प्रमाण आहे, तर प्रत्येक जीवमात्रांत प्राणरूपाने  निवास करणारा तो प्राणनिलय : आहे ! 
सर्व विश्वांत आत्मरूपाने विनटलेला हा विश्वरूप विश्वाचा प्राण आहे. प्राणवायू, अन्न, पाणी इत्यादि जीवनावश्यक तातडीच्या बाबी पुरवणारा हा ‘प्राणभृतप्राणजीवन :’ आहे ! 
‘तत्व म्हणजेच तथ्य, अर्क किंवा सार, सत्य आणि अमृत ही तीनही नावें परब्रह्माला उद्देशून आहेत. श्रीमहाविष्णुला तीं साहाजिकच तंतोतंत लागू पडतात ! 
तो ‘तत्ववित्’ म्हणजे तत्व जाणणारा नि अनुभवणारा म्हणून ‘तत्वंतत्वविदेकात्मा’ तोच आहे ! तो जन्म मृत्यू जरा व्याधी या सर्वांपलीकडचा शाश्वत परमात्मा आहे ! ! 

१०४).       “ओम् भूर्भुव : स्वस्तरूस्तार : सविता प्रपितामह :         ।
                यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन :             ॥१०४॥” 

‘भू:’ म्हणजे पृथ्वी किंवा मृत्युलोक, ‘भुव :’ म्हणजे पाताळलोक आणि ‘स्व:’ म्हणजे स्वर्गलोक या तीनही लोकांना तारणहार भगवान् श्रीविष्णु होय. (भूर्भुव:स्तरूस्तार :) 
सर्व लोकांना उत्पन्न करणारा म्हणून ‘सविता’, तर प्रपिता  अर्थात पितामह ब्रह्मदेवालाही उत्पन्न करणारा, विश्वाचा ‘आजोबा’ आहे - बाप का बाप ! 
विश्वनिर्मिती हाच मुळांत एक धगधगता यज्ञ आहे आणि तो स्वत:च यज्ञही असल्याने भगवंताला ‘यज्ञो’ म्हटले ! यज्ञाचा सर्वाधिपती तसेच यज्ञ करणारा ‘यज्वा’ही तोच ! अर्थात ‘यज्ञांगो’ देखील तोच तो. शिवाय यज्ञाचे उचित कर्मफल देणारा ‘यज्ञवाहन:’ हे ओघाने आलेच की ! ! 

१०५).         “ओम् यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधन :       ।
                  यज्ञान्त कृत् यज्ञ गुह्यम् अन्नाद् अन्नम् एव  च           ॥१०५॥” 

विश्वनिर्मिती हाच एक मोठा यज्ञ असल्याचे आपण पाहिले. मात्र हा यज्ञ अर्थात विश्वाला धारण करीत त्याला सुखसमृध्दीने परिपूर्ण करणारा   म्हणून श्रीमहाविष्णुला ‘यज्ञभृद्’ म्हटले आहे, तर यज्ञ करणारा यज्ञी म्हणून यज्ञकृत्. शिवाय त्या सर्व क्रियांचा आनंद भोगणारा तो ‘यज्ञभुग्’ सुध्दा तोच आहे ! यज्ञसाधन दुसरे कुठले असणार ? वास्तविक ‘यज्ञानां जपयज्ञोsस्मि’ असे आधीच सांगितल्यावर दुसऱ्या कोणत्याही साधनाची निदान कलियुगांत तरी गरजच काय, हा प्रश्न स्वत:ला विचारून पाहावा ! मुळात या प्रकारचा यज्ञ अगदी गुप्त ठेवतां येतो ! (गुह्यम्) 
‘यज्ञान्तकृत्’ म्हणजे यज्ञ करणारा नि त्याचा शेवटही करणारा. 
‘अन्नम् अन्नाद् एव च ‘ म्हणजे आहुती स्वीकारणारा नि अन्नरूपांत फल म्हणजेच पुन्हा अन्नदाता, असा हा दयाळू भगवंत आहे. 

(अतिशय गुप्तपणे, गाजावाजा न करता केलेला नामजप आणि भुकेल्यांना अन्नदान यां सारखा सर्वोत्तम यज्ञ दुसरा नसेल असे माझे प्रांजळ मत आहे

Sunday, November 07, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक अठ्ठ्याणौ नव्व्याणौ शंभर !

 

९८).        “ओम् अक्रूर : पेशलो दक्षो दक्षिण : क्षमिणावर :         ।
              विद्वत्तमो वीतभय : पुण्यश्रवणकीर्तन :                 ॥९८॥” 

अक्रूर : म्हणजे दयावंत, क्रूर नसलेला. श्रीरामाप्रमाणे शत्रूचेही हित पाहणारा. ‘पेशलो’ म्हणजे सर्वांगसुंदर - मन, वाणी, कर्म आणि शरीराने देखील ! सर्वांना हवाहवासा वाटणारा. 
सर्वच कार्यात अतिशय सावध असणारा तो ‘दक्षो’ आहे, अत्यंत कुशल. विश्वकल्याणासाठी वायूप्रमाणे सर्वत्र संचार करणारा, त्वरित निर्णय घेणारा नि भक्तांना शांती समाधान प्रदायक असा ‘दक्षिण :’ आहे हा. , तर पृथ्वीपेक्षाही क्षमाशील असा ‘क्षमिणांवर :’ देखील आहे. 
बुध्दिमत्तेंत तो सर्वश्रेष्ठ असून कोणत्याही प्रकारचे भय त्याला माहीत नाही ! त्याचे गुणसंकीर्तन, लीलासंकीर्तन करून नि श्रवण करत असताना त्याचा निकट सहवास घडतो आणि मन:शांतीचा अनुभव घेता येतो. 

९९).       “ओम् उत्तारणो दुष्कृतीहा पुण्यो दु:खपनाशन :        ।
             वीरहा  रक्षण : सन्तो जीवन : पर्यवस्थित :        ॥९९॥” 

महाघोर संसारातल्या त्रिविध तापांपासून पोळलेल्या जीवांना तारणहार असा हा ‘उत्तारणो’ होय. साधकाच्या नकळत घडलेल्या दुष्कृत्यांचा बींमोड करणारा हा ‘दुष्कृतिहा’ असून त्यांच्या सत्कर्मांना पुण्यदान करणारा तो ‘पुण्यो’ ही आहे ! 
त्याचे निरंतर स्मरणाने दु:स्वप्नांचा नाश होतो. (देहाला ‘मी’ असे मानून मिथ्या संसारात गुरफटून राहणे हे ते ‘दु:स्वप्न’ ! ! ) 
‘ हा वीर पुरूष रक्षण तर करतोच पण संतांच्या रूपात जीवांचा उध्दार घडवून आणतो. तो संपूर्ण चराचर व्यापून असल्याने त्याला ‘पर्यवास्थित :’  म्हटले आहे. 


१००).         “ओम् अनन्तरूपो अनन्तश्रीर् जितमन्युर्भयापह:          ।
                  चतुरस्तो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिश :     ॥१००॥” 

चराचरातील सर्व जड नि चेतन व्यापून असणारा भगवंत ‘अनंतरूपो’ असून त्याची ‘श्री’ अर्थात ‘पराशक्ती’ सुध्दा अमर्याद आहे, असीम आहे, असा हा ‘अनन्तश्री’ होय ! त्याने क्रोध नि भय यांना जिंकलेले असल्याने ‘जितमन्युर्भयापह :’ असे म्हटले आहे. 
चारही दिशांकडे लक्ष ठेऊन असणारा तो ‘चतुरस्त्रो दक्ष’ असतो, तर प्रत्येक कृती अत्यंत गंभीरपणे करणारा तो ‘गंभीरात्मा’ आहे. 
‘विदिशो’ म्हणजे चारही दिशांच्या पलीकडेही नियंत्रण असणारा, ‘दिशा’ देणारा मार्गदर्शक असा हा ‘दिश :’ आहे ! 

क्रमश : 



 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक शाहांण्यौ व सत्त्यांणौ

 ९६).        “ओम् सनातसनातनतम : कपिल : कपिरव्यह :       । 

              स्वस्तिद : स्वस्तिकृत् स्वस्ति : स्वस्तिभुक् स्वस्तिदक्षिण :   ॥९६॥” 

‘सनात्’ हा चिरकालदर्शक शब्द आहे. अनंतकाळ अस्तित्व असणारा शाश्वतब्रह्म असा श्रीमहाविष्णु आहे ! जुन्यातला जुना, ब्रह्मा विष्णु महेश यांचाही निर्माता असा सनात् सनातन पुराणपुरूष ! तो अग्निरूपही असल्याने पिंगट वर्णाचा म्हणजे ‘कपिल’ आहे. 
जल शोषून घेणाऱ्या सूर्यालाही ‘कपि’ म्हणतात आणि अनेक सूर्यमालिकांना तेजप्रकाश देणारा श्रीमहाविष्णु ‘महाकपि:’ आहे. 
प्रलयकालीं सर्व काही नष्ट झाले तरी ‘अव्यय’ राहणारा हा ‘कपिलरव्य:’ आहे ! 
‘स्वस्ति’ म्हणजे शुभ, मंगल, पवित्र. स्वत: तर स्वस्ति :   आणि ‘स्वस्तिकृत्’ तर           आहेच, पण सर्व मंगल करणारा, स्वीकारणारा तो ‘स्वस्तिभुक्’ देखील आहे.  अशा त्या मंगलमय प्रभूचे केवळ मन:पूर्वक स्मरण केल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात असा हा ‘स्वस्तिदक्षिण :’ आहे ! 

९७).      “ओम् अरौद्र : कुण्डली चक्री विक्रम्यूर्जित शासन :           ।
              शब्दातिग: शब्दसह : शिशिर : शर्वरीकर :            ॥९७॥” 

प्रशांतिस्वरू श्रीमहाविष्णु हा पूर्णकाम, सदा संतुष्ट असा रागद्वेष-रहित परमात्मा असल्याने तो ‘अरौद्र :’ होय. 
वलयाकार तेज:पुंज  सूर्यमंडळरूपी कुंडलें धारण करणारा हा ‘कुण्डली’ आहे, तर सुदर्शन-चक्रधारी चक्री आहे ! (संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मर्जीनुसार फिरवणारा चक्री ! ) 
शौर्य, पराक्रम नि पुरूषार्थात विलक्षण असा ‘विक्रमी’ आहे. खरोखर आपल्या विलक्षण ऊर्जेद्वारें विश्वव्यापार चालवणारा तो ‘उर्जितशासन:’ आहे  हे नि:संशय ! 

त्याचे वर्णन करायला कितीही शब्द वापरले तरी ते अपुरे पडतात कारण तो मुळांत शब्दांनी व्यक्त करताच येत नाही, असा ‘शब्दातिग:’ आहे तो ! मात्र असे असले तरी भक्तांच्या आर्त प्रेमळ हांकेला तो प्रतिसाद देतोच देतो, म्हणून ‘शब्दसह:’ म्हटले आहे. 
विश्वातील कोणतीही ‘भाषा’ त्याला सहज कळते, कारण तो तर प्रत्येकाच्या अंतर्यामीं वसत असतो ! (वास्तविक भावना समजायला  दरवेळीं शब्दांची कुठे गरज असते ? )
‘शिशिर’ किंवा शिशिर ऋतू मुळांतच शांतवन करणारा. त्यातूनही त्रितापांनी पोळलेल्या जीवांचे विश्रांतिस्थान दुसरे कुठले असणार ? 
‘शर्वरी’ म्हणजे रात्र किंवा आपण अज्ञान म्हणूया. ज्ञानी पुरूषा साठी प्रपंच ही रात्र नि प्रापंचिकांना परमार्थाला दिवस करणारा हा मिस्किल भगवंत ‘शर्वरीकर:’ आहे ! क्रमश: 


 

श्री विष्णुसहस्रनाम श्लोक चौऱ्याणौ व पंच्च्याणौ

 ९४).       “ओम् विहायसगति्रज्योति : सुरूचिर् हुत्भुग्विभु :         ।

               रविर्विरोचन : सूर्य :  सविता रविलोचन :             ॥९४॥” 

आकाशात  विहरणारा विहाय म्हणून ज्याचे कार्यक्षेत्रच मुळात आकाश आहे असा ब्रह्मांडाला चैतन्यतेज देत गतिमान ठेवणारा श्रीमहाविष्णुरूपी महासूर्य ‘विहायसगतिर्ज्योति :’ आहे. 
‘सुरूचि म्हणजे चविष्ट, रसपूर्ण. आपण निर्मिलेल्या ब्रह्मांडाचा रसोत्कट आस्वाद घेणारा  म्हणजेच   यज्ञात अर्पण केलेल्या आहूतींचा स्वीकार करणारा हा प्रभू अर्थात परमेश्वर ‘सुरूचिर्हुत् भुग्विभु :’ होय ! 
आपल्या किरणांनी पाणी नि रस शोषून घेणाऱा  तेजस्वी सूर्य म्हणून   ‘रविर्विरोचन ;’ म्हटले, तर सर्व जगाची उत्पत्ती करून  त्याला शुध्द, पवित्र करणारा हा ‘सविता रविलोचन :’ आहे ! 

९५).       ‘ओम् अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोSग्रज :        ।
               अनिर्विण्ण : सदामर्षी लोकाधिष्ठानम् अद्भुत :     ॥९५॥” 

 विश्वंभर, विश्वनिर्माता  श्रीमहाविष्णु शाश्वत, अनन्त असा ओंकाररूप परमात्मा आहे. यज्ञांत अर्पण केलेल्या आहुती आनंदाने ग्रहण करणारा ‘हुकभुग्भोक्ता’ आहे, तर यज्ञकर्त्याला अतिशय समाधान देणारा ‘सुखदो’ आहे ! 
पृथ्वीतलावर अनेकानेक अवतार घेण्याच्या आधीपासून सूक्ष्मरूपात असलेला ‘अग्रजो’ ‘अनिर्विण्ण’ म्हणजे अलिप्त, निर्विकार प्रसन्नात्मा आहे. 
सदामर्षी चा अर्थ बहुधा सर्व दोषांवर पांघरूण घालत क्षमा करणारा आणि सदाचरणाला उद्युक्त करणारा, तर तीनही लोकांचा आधार असा अद्भुत ईश्वर ! 

क्रमश : 






Best wishes, 
Dr. Rahalkar
 
Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/


This page is powered by Blogger. Isn't yours?