Tuesday, March 27, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पंधरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग पंधरावा)
“अर्जुना, परम सत्याचे यथार्थ स्वरूप समजलेला तत्वज्ञानी पुरूष इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषय-सुखांत रमत नाही. इंद्रियांचे सर्व व्यवहार परस्पर घडत असल्याने कर्तेपणाची भावना त्याच्याकडे नसते.” असे ज्ञानी पुरूष आपला सर्व अहंकार सोडून त्रिगुणांच्या पलीकडचा साक्षीभाव बाळगतात.

जगातले सर्व बरे-वाईट व्यवहार सूर्यप्रकाशात घडत असतात, पण सूर्य त्यांपासून अलिप्त असतो. तसेच, ज्ञानी पुरूष देहधारी असले तरी कर्म-बंधनात गुंतत नाहीत. मात्र  अज्ञानी असणारे पुरूष प्रकृतिजन्य त्रिगुणांच्या आहारी जाऊन इंद्रियाधीन होतात. इंद्रियांचे व्यवहार त्यांच्या वृत्तिनुरूप होत असतात आणि तो अज्ञानी पुरूष जबरदस्तीने ती कर्में आपल्यावर ओढवून घेतो. साहाजिकच तो कर्मबंधनांत अडकणे क्रमप्राप्त ठरते.

म्हणून अर्जुना, तूं उचित तेवढी कर्में करून ती मला अर्पण करावीत. मात्र ते करतानाही तुझ्या चित्तवृत्ति आत्मस्वरूपात स्थिर असल्या पाहिजेत.

‘आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ आतां कोदंड घेउनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देई आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ जगीं कीर्ती रूढवीं । स्वधर्माचा मानू वाढवी । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई । एथ हें वाचुनि कांही । बोलों नये ॥’

किती सुस्पष्ट मार्गदर्शन आहे हे ! भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की त्याने सर्व उचित कर्में करून तीं भगवंताला अर्पण करावी. मात्र हे करतांना अंतस्थ ईश्वराचें सतत स्मरण ठेवावे. ( माम् अनुस्मर युध्द्य च !- Keep remembering Me and Fight !! )

हे सर्व अर्जुनाला सांगत असतानाच अश्रध्द, इंद्रियाधीन नि शंकेखोर लोकांना असे पारमार्थिक ज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडूं नये असे परखडपणे बजावतात.
स्वधर्म-पालनावर पुन्हा भर देतांना भगवंत म्हणतात की याचे पालन करणे कठिण वाटले तरी तोच आचरणे योग्य आहे. परधर्म दिसायला कितीही चांगला नि आचरण्यास सोपा भासत असला तरी स्वधर्म कधीही सोडूं नये.

जे अनुचित, अग्राह्य आहे तें मिळवण्याची मुळात इच्छाच कां करावी ? असे पहा, इतरांची मोठाली सुंदर घरें पाहून आपली राहती गवताची झोपडी पाडून टाकावी काय ? किंवा स्वत:ची बायको कुरूप असली तरी तिच्या बरोबरच प्रपंच करणे योग्य नाही काय ?
तसेच, स्वधर्माचे आचरण करताना कितीही संकटें आली किंवा आचरण करायला कष्टप्रद वाटलीं तरी परलोकात सुखावह असणारे स्वधर्माचरण योग्य आहे. अरे, दूध नि साखर गोड असली तरी कृमीदोषांत ती वर्ज्य नव्हेत काय ?
म्हणून  इतरांना योग्य असलेले आपल्यासाठी अयोग्य असू शकते याचा विचार करावा.
स्वधर्माचे आचरण करताना आयुष्य सरले तरी इह-परलोकीं ते आचरण योग्यच असते असे जेव्हा “समस्त सुरशिरोमणी श्रीशारंगधर” (श्रीकृष्ण) बोलले, तेव्हा अर्जुनाने विनवणी केली की हे देवा तुम्ही जे जे सांगितले ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकले आहे. पण माझ्या मनांत काही शंका आहेत त्या विचारू काय ?
तो विचारतो ,
“अथ केन प्रयुक्तोsयं पापं चरति पुरूष: ।
 अनिच्छन्नपि वार्ष्ण्येय बलादिव नियोजित: ॥३६॥
देवा, ज्ञानियांची देखील मती भ्रष्ट होऊन ते वाट चुकतात असे काय म्हणून घडते? जे सर्व काही जाणतात तेसुध्दा पर-धर्माकडे कोणत्या कारणांनी  आकर्षित होतात ? आंधळ्याला भुसा नि दाण्यांतला फरक कळत नसला तरी डोळस माणूस देखील कधी कधी कां फसतो ? सर्वसंग परित्याग करून रानावनांत स्थिरावलेला पुन्हा काय म्हणून प्रपंचात गुरफटतो ? पापाचरण टाळत आलेला माणूस पाप करायला कशामुळे प्रवृत्त होतो ? कोणाची जबरदस्ती असते तिथे ? हे हृषिकेशा, मला कृपाकरून समजावून सांगा !
त्यावर भगवंत उत्तरले,
“काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव: ।
 महाशनो महापाप्मा विध्द्येनमिह वैरिणम् ॥३७॥”

तेव्हां हृदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरूषोत्तमु  । सांगेन ऐक ॥
अरे, ज्यांना जरासुध्दा दयामाया नाही असे हे ‘काम नि क्रोध’ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत. ते ज्ञानरूपी खजीन्याला वेढून असणारे भुजंग आहेत. इंद्रियसुखाच्या गुहेतले वाघ आणि ईश्वरभक्तीच्या आड येणारे घातक मांग आहेत ! हे देहरूपी गडाचे दगड, इंद्रियरूपी गावांची तटबंदी असून यांच्या विवेकहीनतेचे दडपण साऱ्या विश्वावर पडले आहे. रजोगुणांनी व्यापलेले ते मुळात राक्षसी प्रवृत्तीचे आहेत आणि रजोगुणांपासून निर्माण झाले असले  तरी तमोगुणाचे ते विशेष लाडके आहेत. म्हणून तमोगुणींनी त्यांना प्रमाद आणि मोह बहाल केलेले आहेत. त्यांचे लालन-पालन अविद्या म्हणजेच अज्ञानामुळे घडते. मृत्यूच्या दरबारांत यांना विशेष मान मिळतो कारण हे कामक्रोध आयष्याचे शत्रू आहेत. त्यांची भूक इतकी प्रचंड असते की सगळे जग त्यांच्या एका घासाला अपुरे पडावे आणि भोगवृत्ती तर कधीच शमत नाही. आशा नि भ्रांति त्यांच्या जुळ्या बहिणी होत !
आतां भ्रांति कशी असते ते सांगतात.
 भातुकलीच्या खेळात जसा चट्टामट्टा करतात तशी त्रिभुवनाला ही भ्रांति खाऊन टाकते आणि हिचे दास्यत्व घेतात  इच्छा नि तृष्णा ! मोह आणि अहंकार हिचे निकटचे सवंगडी असून  ते जगाला हवे तसे नाचवतात.
धर्म आणि नीतीच्या पोटातील खरेपणा काढून त्यांत असत्याचा भुसा भरतात हे काम नि क्रोध, दंभाच्या रूपांत !
या कामक्रोधांनी सच्छील पतिव्रता शांतीला जबरीने विवस्त्र केले, तिच्याच वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगिणीला नटवले आणि तिच्याकडून साधू-संतांना भ्रष्ट करवले.
यांनी विचाराचे आश्रयस्थान नाहीसे केले, वैराग्याची कातडी सोलून काढली आणि जीवंतपणीच शम-दमाची म्हणजे निग्रहाची मुंडी मुरगळून टाकली. यांनी संतोष-वनाची नासाडी केली, धैर्याचे बुरूज नेस्तनाबूद केले नि आनंदाची कोंवळी रोपटीं उपटून टाकली. त्यांनी ज्ञानांचे वृक्ष धरासायी केले, सुखाचे शिलालेख पुसून टाकले आणि मानवाच्या हृदयांत त्रितापांचे पेटते निखारे घातले.
माणसाच्या जन्मापासूनच ते अस्तित्वात आले, अंत:करणाला चिकटून बसले ते इतके की ब्रह्मादिकांना सुध्दां त्यांचा ठावठिकाणा कळला नाही ! हे चैतन्याच्या शेजारी नि ज्ञानाच्या पंक्तीला असतात म्हणून एकदा हाहाःकार माजवायला चवताळले की आवरतां आवरत नाहीत.
हे कामक्रोध पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीवाचून जाळतात आणि जीवाला त्याच्या नकळत ग्रासून टाकतात ! ते शस्त्रांवाचून घात करतात, दोरीविना बांधतात आणि ज्ञानी माणसांना पैज लावून मारून टाकतात. हे चिखलाशिवाय रूतवतात, पाशावाचून जखडतात आणि खोलवर दडल्यामुळे कोणालाही वश होत नाहीत.
चंदनाच्या खोडाला नागीण जशी वेढे घालून बसते किंवा गर्भाला नाळ वेष्टून असते; अथवा प्रकाशाविना सूर्य, धूराशिवाय जाळ, धूलिकणांविना आरसा नसतो तसे कामक्रोधांविना निखळ ज्ञान आम्हाला दिसले नाही.

वास्तविक ज्ञान हे ब्रह्मरूप असल्याने अतिशय शुध्द नि पवित्र आहे. मात्र कामक्रोधांनी झाकोळले गेल्यामुळे ते दुर्लभ होऊन बसले आहे. सबब आधीं त्यांचा बंदोबस्त करावा नि मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे असे म्हटले तरी त्यांचा नायनाट करणे खूपच अवघड आहे. तसा प्रयत्न करूं म्हटलें तर ते आगीत तेल ओतण्यासारखे होते ! हे इतके प्रबळ असतात की हठयोग्यांना सुध्दां ते दाद देत नाहीत.

(कसली आक्रमक आणि रौद्र भाषा वापरली आहे ज्ञानदेवांनी इथे ! जस्ट अनलाइक ज्ञानदेव !! पण काम-क्रोधाचे वर्णन हलक्याफुलक्या मवाळ शब्दात करणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले असावे. ) असो.

तरी पण या ‘कामेष क्रोधेषांना’ काबूंत ठेवण्याचा एक उपाय आहे. तू तो आचरणांत आणणार असशील तर मी नक्कीच सांगीन, असे भगवंत आश्वासन देतात.
(क्रमश:…..


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?