Friday, March 23, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तेरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग तेरा)
भगवंत अर्जुनाला सृष्टिच्या निर्मितीची कथा सांगत आहेत.
“सृष्टिकर्त्या ब्रह्म्याने सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती केली आणि त्याचवेळीं प्रत्येकाला नित्ययाग म्हणजेच काही निश्चित अशी कर्में वाटून दिली. परंतु ती सूक्ष्म किंवा आचरण्यास कठीण म्हणून माणसाने तिकडे दुर्लक्ष केले. (खरें तर स्वधर्म-पालनामुळे भविष्यांत चांगलेच घडणार याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती). त्यावेळेस सर्व मानवांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि विचारले की देवा या मृत्युलोकांत मनुष्याचा उध्दार कसा होईल ते कृपा करून सांगावे. तेव्हा तो कमल-जन्मा मानवांना बोलता जाहला कीं, ‘निरनिराळ्या वर्णातील तुम्हा मंडळींसाठी मी वेगवेगळी कर्में योजिली आहेत जीं तुमच्या प्रत्येकाचा स्वधर्म म्हणून ओळखलीं जातील. त्या स्वधर्म पालनाने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. यासाठीं तुम्हाला व्रत वैकल्यें करण्याची गरज नाही, शरीराला कष्ट देण्याची गरज नाही किंवा अंगात बळ नसेल तर दूरदूरची तीर्थाटनेही नको. हटयोगासारखी कठिण तपश्चर्या नको, फलाशेने केलेली आराधने नको किंवा कुठली मंत्रतंत्र-विधानें नकोत. देवदेवतांचं पूजन देखील नको. मात्र तुम्ही स्वधर्मयज्ञ निरंतर करणे पअत्त्यावश्यक आहे. एखादी पतिव्रता स्त्री जशी एकनिष्ठ असते तसे निरपेक्ष बुध्दीने याचे आचरण केले पाहिजे. हा स्वधर्मरूपी यज्ञ आहे हे विसरू नका. प्रजाजनांनो, या स्वधर्माला तुम्ही निष्ठापूर्वक अंगिकाराल तर हा कामधेनूप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करील आणि तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.”

या स्व-धर्म यज्ञाची फलश्रुति सांगतात ज्ञानदेव.
याच्या आचरणाने देवीदेवता संतुष्ट होऊन तुमचा योगक्षेम चालवतील कारण तुमची भक्ति आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे आपसात प्रीति वाढेल नि तुम्ही जे काही करूं म्हणाल ते आपोआप पूर्णत्वाला जाईल. शिवाय मनांतील सर्व चांगल्या इच्छा फलद्रुप होतील. तुम्हाला वाचासिध्दी प्राप्त होईल, तुम्ही आज्ञापक म्हणजे आज्ञा देणारे व्हाल आणि महाऋध्दि ‘काय आज्ञा आहे’ अशी विनंती करतील. ज्याप्रमाणे वसंत ऋतुचे आगमन होतांच सकल वनश्री सुंदर फळाफुलांनी बहरून उठते, तशी सर्व प्रकारच्या सुख-समृध्दीसह सुदैव तुम्हाला शोधत येईल.

मात्र वैभव प्राप्त झाल्यावर जो पुन्हा इंद्रियसुखांच्या नादीं लागेल, किंवा ज्या यज्ञ-देवतेने तें वैभव दिले तिचें ऋण मानणार नाही, अथवा अग्निहोत्रादि सत्कर्में करणार नाही, ब्राह्मणांना भोजनाने संतुष्ट करणार नाही, गुरूभक्ति विसरेल, अतीथिचा उपमर्द करेल आणि जातबांधवांना समाधान देणार नाही असा स्व-धर्मरहित भोगासक्त पुरूष केवळ संकटांचाच धनी होईल.

ज्याप्रमाणे मृत शरीरातून चैतन्य निघून जाते किंवा दैवहीन माणसाजवळ लक्ष्मी टिकत नाही तसे स्वधर्म न पाळणाऱा माणूस सर्व सुखांना पारखा होतो. (जसे दिवा विझतांच प्रकाश नाहीसा होतो). शिवाय स्वधर्म टाळला तर त्याचे स्वातंत्र्य हिरावले जाते ते वेगळेच.
ब्रह्मदेव असेही म्हणाले की  स्वधर्महीन माणसाला काळ मोठी शिक्षा करतो आणि चोर म्हणून त्याचे सर्वस्व हरण करतो. अशा वेळीं स्मशानातल्या भूतांसारखे अनेक दोष त्याला वेढतात. त्रिभुवनांतली सर्व दु:खें, पातकें नि दैन्य त्याच्या वांट्याला येते. कितीही रडला भेकला तरी कल्पांतापर्यंत त्या उन्मत्ताची सुटका नाही.
“म्हणौनि निजवृत्ति हे  न संडावी । इंद्रियें बरळों नेदावी । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥”
म्हणून तुम्हां सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आपले विहित कर्म म्हणजेच स्व-धर्म-कर्म योग्य प्रकारें करत राहा. असे पहा, निर्हेतुक बुध्दीने केलेला आपल्या संपत्तीचा योग्य विनियोग हे विहित कर्म म्हणता येईल. त्याचप्रमाणे गुरू, गोत्र, अग्नि यांचे पूजन आणि समयोचित विप्रपूजन तसेंच पितरांना तिलोदक देऊन वाहिलेली श्रध्दांजलि विहित कर्मांत येते.
अशा प्रकारें केलेली सर्व कर्में यज्ञ म्हणून ओळखावीत. आणि या यज्ञांतील पुरोडाश म्हणजे प्रसाद कुटुंबीयांसोबत आनंदाने ग्रहण करावा.

“म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । ते स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ धर्माचरणाने मिळवलेले धर्मासाठीच वापरावे आणि उरेल तें समाधानाने उपभोगावें. (येथे धर्माचा अर्थ नीति किंवा सन्मार्गाने मिळवलेला असा अभिप्रेत आहे.)
अर्जुना, वरील प्रमाणेच आपले आचरण असायला पाहिजे अशी ही आद्य कथा मुरारी सांगत आहेत. जे स्वत:ला केवळ देह समजतात आणि विषयसुखांना सर्वस्व मानतात त्यांना अशा स्वधर्म-यज्ञाची कल्पनाही नसते. ते अहंकारापोटीं हवे तें बरळत राहतात आणि भोगासक्तीने बरबटलेले आयुष्य जगतात. अवघी संपत्ती यज्ञांत अर्पण करण्याचे हवन-साहित्य असून तें योग्य रीतीने आदिपुरूषाला अर्पण हा स्वधर्म होय. शिवाय यज्ञांत अर्पिलेले अन्नद्रव्य हे काही साधारण अन्न नसून तें ब्रह्मरूप अन्न असते. (अन्नम् ब्रह्मेति).
(उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म !!)

“अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञ: कर्मसमुद्भव:  ॥१४॥
(सर्व प्राण्यांची शरीरें अन्नधान्यावर जगतात; अन्नधान्यें पावसामुळे निर्माण होतात; पाऊस यज्ञांमुळे उत्पन्न होतो; आणि यज्ञ कर्मामुळे म्हणजे स्वधर्मापासून होतात. कर्माचें कारण वेदरूप ब्रह्म होय.)

“कर्म ब्रह्मोद्भवं विध्दि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥१५॥”

मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणोनि हें चराचर । ब्रह्मबध्द ॥     प्रकृती आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो म्हणून हे संपूर्ण विश्व परमात्म्याच्या आज्ञेत आणि परमात्म-तत्वांत बांधलेले आहे. अर्जुना, कर्माचे मूर्त स्वरूप म्हणजे यज्ञ आणि यज्ञांत सर्व वेद कायम सामावले आहेत.

पार्था, स्वधर्मरूप यज्ञाची एकूणच परंपरा तुला या निमित्ताने थोडक्यात सांगितली. हा स्वधर्मरूप यज्ञ करणे अतिशय योग्य होय. मात्र अहंकाराने माजलेला जो कोणी असे यज्ञकर्म करत नाही, तो पातकांचा डोंगर असून भूमीला केवळ भारभूत होऊन जगतो. तो केवळ इंद्रियांच्या तावडींत सापडलेला असतो. अवकाळीं आलेल्या ढगाप्रमाणे त्याचे आयुष्य निष्फळ असते. किंवा शेळीच्या गळ्यावरचे स्तन जसे निरूपयोगी असतात तसे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्याचे जीवन व्यर्थ होय.
आणि म्हणून तुला सांगतो अर्जुना, कीं आपला स्वधर्म कधीही सोडू नये.

परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ (!) अरे अर्जुना (सव्यसाची) ऐक ! मानवी शरीर लाभलेला जो कोणी स्व-धर्म-पालनाचा कंटाळा करतो तो अडाणी, खेडुत, गावंढळ समजावा. (सव्यसाची म्हणजे जो दोन्ही हातांनी बाण मारूं शकतो असा).
भगवान् श्रीकृष्ण स्वधर्माविषयीं, थोडक्यात निष्काम, विहित कर्माबद्दल अर्जुनाला सविस्तरपणें सांगत आहेत. आतां घडलेल्या कर्माचे बंधन कोणाला आहे नि कुणाला नाही ते सांगतील. तो भाग पुढे येईल.
(क्रमश:…..



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?