Monday, March 12, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग दहावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग दहावा)

अर्जुनाने बाकायदा परवानगी घेतली होती श्रीकृष्णाची काही गूढ नि अनाकलनीय प्रश्नांची उत्तरें मिळवण्यासाठीं. आणि श्रीकृष्णानेही अगदी मोकळेपणाने हवे तें विचार, जेणेंकरून तुझ्या मनाचें पूर्ण समाधान होईल असे म्हटले.
खरें तर हा कृष्णार्जुन संवाद आपल्या प्रत्यक्ष नजरेसमोर घडतो आहे असे उत्कृष्ठ, बहारदार नि नाट्यमय वर्णन ज्ञानदेव अतिशय सहजपणे करतात हेच ज्ञानेश्वरीचें वैशिष्टय होय. असो.
अर्जुन विचारतो की हे देवा, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे नि त्याला कसे ओळखावे. ज्याला स्थिर बुध्दीचा असे म्हणतात नि जो अखंड समाधीसुखात रमलेला असतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावें. तो कुठल्या अवस्थेत असतो आणि कसा दिसतो, ते लक्ष्मीपते मला सांगा.
त्यावर, प्रत्यक्ष परब्रह्म अवतार, षड्गुणैश्वर म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या सहा गुणांचे अधिपति भगवान् श्री नारायण काय बोलले ते ऐका.
भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सविस्तर सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले, अर्जुना अंत:करणांत ठाण मांडून बसलेली विषयासक्ती हीच आत्मसुखाच्या आड येते. खरे तर प्रत्येक माणसात ब्रह्मच केवळ ठासून भरलेले असल्याने तो नेहमी संतुष्ट असाच असतो. मात्र कामनेच्या संगतीमुळे तो विषयसुखांत लडबडून जातो. (तीन प्रकारच्या कामना किंवा ‘ईषणा’ सांगितल्या आहेत. दारेषणा (परस्त्रीसुख), वित्तेषणा (दुसऱ्याचे धन) आणि लोकेषणा ( मान सन्मान प्रतिष्ठा वगैरे).
मात्र जेव्हां हा “काम” पूर्णपणे नाहीसा होतो तेव्हा त्याचे चित्त आत्मानंदांत स्थिरावते. असा पुरूष स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावा. वाटेल तितकी दु:खें वाट्याला आली किंवा सुखांचाही अतिरेक झाला तरी त्याचे मन उदास होत नाही की तो हुरळून जात नाही. त्याच्यापाशी काम नि क्रोध दोन्हीही नसल्याने त्याला भीतीची बाधा होत नाही, कारण तो ब्रह्मरूपाने कायम परिपूर्ण असतो. त्याच्या ज्ञानप्राप्तीत नि चिंतनात कसलाही अडथळा येत नाही, म्हणून तो शरीर वगैरे उपाधींत अडकून पडत नाही. तोच तो स्थितप्रज्ञ असे समज.
पूर्णचंद्र कधीं उत्तम, मध्यम, कनिष्ठ असा प्रकाशाचा भेद करत  नाही, तसा स्थितप्रज्ञ सर्वांशी सर्वकाळ समबुध्दीने वागतो. चांगली गोष्ट घडली तर आनंदातिशयाने नाचत नाही किंवा दु:खद् प्रसंगीं अवसान गाळून खिन्न होत नाही. असा हर्ष-शोकापासून अलिप्त पण आत्मबोधाने परिपूर्ण असलेला पुरूष प्रज्ञायुक्त म्हणजेच स्थितप्रज्ञ म्हणून समजावा.

कासव जसे निवांतपणे आपले अवयव पसरते किंवा इच्छावशें आवरून घेते, तशी त्याची इंद्रियें त्याच्या पूर्णपणे ताब्यांत असतात.
अर्जुना, एक विसक्षण लक्षण मात्र ऐक. जे साधक निग्रहाने आपली कर्णेंद्रियें वगैरे आवरतात त्यांना रसना म्हणजे जीभेवर ताबा ठेवतां येत नाही आणि म्हणून अनेक विषय त्यांना चहूबाजूंनी वेढून टाकतात. एखाद्या झाडाची पालवी वरवर ओरबाडावी, पण मूळांना पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होईल ? उलट तो अधिकच फोफावेल ! अगदीं तसेच रसनेंद्रियामुळे विषयवासना अधिकच दृढ होतात.
इतर सर्व इंद्रियें आवरणे शक्य असते पण ही जीभ नव्हे. कारण तिच्याशिवाय माणूस जगूंच शकणार नाही ! तरी पण जे कोणी कठोर निग्रहाने तिच्यावर हुकुमत गाजवतात ते परब्रह्माचा अनुभव घेतात. त्यांचा देहभाव क्षीण होत जातो, इंद्रिये विषयांपासून अलिप्त होऊ लागतात, कारण त्यांना “सोहंभावा”ची प्रतीति येऊ लागते (म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’ हा भाव).

एरव्हीं अर्जुना, ही इंद्रियें कुठल्याच साधनांच्या प्रयत्नाने ताब्यांत येत नाहीत. जे साधक इंद्रियांना आवरण्यासाठी जिवाचा आटापिटा करतात, डोळ्यात तेल घालून अभ्यासाची पराकाष्ठा करतात, यम-नियंमांचे कुंपण घालून मनाला मुठीत ठेवायचा प्रयत्न करतात, त्यांनाही ही इंद्रियें कासावीस करतात. चेटकिणीने मांत्रिकालाच भुरळ घालावी तशी असतात ही इंद्रियें !

साधकांना ही ग्रासणारे हे विषय ऋध्धि-सिध्दींच्या रूपांत येतात. (म्हणूनच सद्गुरू आपल्या शिष्याला या ऋध्दिसिध्दींच्या कचाट्यांत न सापडण्यासाठीं वेळोवेळीं जागृत करत असतात ).
बाह्य स्वरूपातील इंद्रियदमन साधले तरी मनाने सुध्दा विषयांचा समूळ नायनाट करणे अत्यावश्यक ठरते. एक छान उपमा देतात. विषाचा लवलेश देखील संपूर्ण शरीराला तबाह करतो.
खरे तर असाच साधक खरा योगी म्हणतां येईल जो विषयसुखां पासून गंडवला जात नाही नि आत्मबोधामुळें अंतस्थ ईश्वराला कधीही विसरत नाही.

पुढचा श्लोक तर खूपच प्रसिध्द आहे, विशेषत: त्यावरील ज्ञानदेवांचें सुंदर निरूपण. (खरें तर पु.लं.नी त्यांचे संपूर्ण नाटक ‘तुझे आहे तुजपाशीं’ याच थीमवर बेतलेले आहे. असो !)

“ध्यायतो विषयान्पुंस: संगस्तेषूपजायते ।
संगात्संजायते काम: कामातक्रोधोsभिजायते ॥६२॥”
(इंद्रियविषयांचे चिंतन करणाऱ्या पुरूषाला विषय आवडतात. त्या संगामुळे आसक्ती निर्माण होते. त्यातून वासना आणि वासनेला प्रतिबंध केला की क्रोध निर्माण होतो.)
“क्रोधाद्भवति संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद्बुध्दिनाशो बुध्दिनाशात्प्रणश्यति  ॥६३॥
( क्रोधामुळे भ्रांती, भ्रांतीमुळे संशय नि बुध्दिनाश आणि बुध्दिनाशामुळे सर्वनाश संभवतो.)

माऊली सांगतात,
विषयसुखाची नुसती आठवण झाली तरी सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरूषाला तें सुख मिळवण्याची इच्छा होते. जिथे अशी वासना निपजते तिथे क्रोध दबा धरून बसलेला असतो. क्रोध आला की कर्तव्य वगैरे मागे पडून माणूस भ्रांत होतो, म्हणजेच त्याच्याजवळ तारतम्य राहात नाही. माणूस भ्रांतिष्ट झाला की स्मृती पांगळी होते. असा माणूस साहाजिकच केविलवाणा असतो. आंधळ्या सारखा तो सैरभैर होतो. त्याची बुध्दि त्याला दगा देते.

अर्जुना, एक लहानशी ठिणगी ज्वलनशील पदार्थावर पडली तर ती त्याला भस्मसात करते. अगदी तसेच, विषयांचे नुसते चिंतन मोठा अनर्थ घडवून आणते, त्या पुरूषाच्या अध:पतनास कारणीभूत होते.

आणि म्हणून सर्व विषयवासना मनातच येवू देऊं नयेत. त्यायोगें रागद्वेष सहजच नाहीसे होतील. असे पहा, आवड किंवा नावड मनातच नसली तर इंद्रियें विषय सेवन करत असली तरी त्यांत गुंतून पडत नाहीत. आकाशातला सूर्य आपल्या सहस्त्र किरणांनी पृथ्वीला स्पर्ष करतो, पण त्यायोगे तिला चिकटून राहतो काय ? अगदी तसाच जो कुणी विषयभोगां विषयीं उदासीन असतो, आत्मानंदांत मश्गूल आणि काम-क्रोध विरहित असतो अशा मस्तराम पुरूषाची प्रज्ञा सुस्थिर झाली असे समजावे.

ज्ञानेश्वर महाराज योगयुक्त पुरूषाची लक्षणे सांगताना खरोखर अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात. त्याचे मूळ कारण त्यांचा स्वानुभव हेच आहे. ते रंगतदार निरूपण पुढील भागांत पाहूया !
(क्रमश:……



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?