Friday, March 09, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सातवा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सातवा)

भगवंत अर्जुनाला परोपरीने युध्दाला पुन्हा सामोरे होण्यासाठीं प्रवृत्त करताहेत. क्षत्रियांना धर्मयुध्द करणे हे शास्त्रविहीत असून तो तर त्यांचा स्वधर्म असतो, आणि प्रत्येक पुरूषाने त्याच्या वाट्याला आलेले कर्म हे कर्तव्यबुध्दीने केलेच पाहिजे असे आग्रहाने ते अर्जुनाला बजावतात.

मात्र त्याचबरोबर अर्जुनाला कानपिचक्या देण्याचा कार्यक्रम व्यवस्थित चालूं आहेच. ते ठणकावून सांगताहेत की अशा संग्राम समयीं अंत:करण द्रवीभूत होणे सर्वथा अयोग्य आहे. ते म्हणतात की नवज्वर (टायफॉइड) झालेला असतांना गोक्षीर म्हणजे दूध देखील विषाप्रमाणे होते, अगदीं तसेच भलत्या वेळीं भलतेच वागण्याने स्वहितावर गंडांतर येते. तस्मात् अजून तरी सावध हो. आपला स्वधर्म पाळला तर कधींच दोष लागत नसतो. वाट सरळ असेल तर, किंवा हातीं दिवा घेऊन अंधाऱ्या वाटेवर बिनधास्त चालता येते. त्याचप्रमाणें स्वधर्मपालन केले तर सगळी मनोवांछित कर्में सुफलितच होत असतात. तुम्हां क्षत्रियांसाठीं तर युध्दाव्यतिरिक्त अन्य काहीच उचित नाही. मनामधें कोणाविषयींही कपट न बाळगतां तूं समोरासमोर निकराने लढले पाहिजेस. सूज्ञास अधिक सांगणे नलगे, उगाच लांबण कां लावूं ?

अरे, असे युध्द खरें तर तुम्हां क्षत्रियांसाठी दैवी देणगी म्हणून उभे ठाकले आहे, अक्षरश: सर्व धर्माचा हा खजिना उघडलाय् तुमच्यासाठी. प्रत्यक्ष स्वर्ग उतरलाय् तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठीं. अथवा, तुझ्या गुणांवर आसक्त झालेली कीर्ती तुझ्याशीं स्वयंवर लावण्यासाठी आली आहे ! अगणित पुण्य असेल तरच क्षत्रियांना अशा प्रकारच्या युध्दाची संधी लाभते.

पुढे खूपच मनोरंजक उपमा देतात ज्ञानदेव !
सरळ रस्त्यांने चालताना अचानक ‘चिंतामणी’ला अडखळून पडावें नि सर्व मनोकामना सहज पूर्ण व्हाव्यात किंवा जांभई साठी तोंड पसरावें नि अचानक त्यांत अमृत पडावें, तसे हे युध्द तुम्हाला अनायासें प्राप्त झाले आहे.
आणि म्हणूनच, तूं जर आत्तां शस्त्रें टाकून शोक करत बसलास तर स्वहिताचा नाश केल्यासारखे होईल. पूर्वजांनी मिळवलेल्या कीर्तीचा बट्ट्याबोळ होईल. शिवाय तुझी अपकीर्ती होईल, जग तुला लाथाडेल नि महादोष तर तुला शोधत येतील !
जशी एखादी विधवा स्त्री सर्वांकडून अपमानित होत राहते, तशी दशा स्वधर्माचा त्याग केला तर त्या जीवाची होते. किंवा, जंगलांत पडलेल्या प्रेताला गिधाडे जशी फाडून टाकतात तसे स्वधर्मरहित माणसाला महापापें व्यापून टाकतात.

आणि म्हणून अर्जुना, स्वधर्म टाकशील तर पापाचा धनी होशील नि अपकीर्ती युगान्तापर्यंत जाणार नाही.

“”जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ती आंगा न पवे ।””
(जोंवर अपकीर्तीचा कलंक अंगाला लागत नाही तोंवरच शाहाण्यानें जगावें). लोक खूप प्रयत्न करून, कष्ट करून, प्रसंगीं जीव घालवून आपली कीर्ती वाढवतात ते उगाच काय ?

“”म्हणोनियां पार्था । हेतु सांडेनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥””
 “सुखीं संतोषा न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावें । मनामाजी. “
“आपणयां उचिता । स्वधर्मे राहाटतां । जें पावे ते निवांता । साहोनि जावें ॥”
“ऐसिया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावं । निभ्रांत तुवां ॥”

एषा तेsभिहिता सांख्ये बुध्दिर्योगे त्विमां शृणु । बुध्द्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥३९॥
(येथपर्यंत मी तुला आत्मज्ञान विषयक विचार सांगितला, ज्या योगें मनुष्य निष्काम कर्म करतो. त्या योगाची महती ऐक. पार्था, या बुध्दीने युक्त होऊन तू कर्में करशील तर त्यांच्या बंधनांतून मुक्त होशील.)

भगवंतांनी ही ‘सांख्यस्थिति’ अर्जुनाला थोडक्यांत सांगितली. आतां बुध्दियोग विस्तारपूर्वक सांगतील.
(क्रमश:……


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?