Friday, March 30, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सोळावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सोळावा)
अर्जुना, या काम-क्रोधांचे मूळ स्थान इंद्रियें होत. कर्म करण्याची ऊर्मि इंद्रियां पासून  होते, म्हणून सर्वप्रथम या इंद्रियांना ठेचून काढले पाहिजे. तसे झाले तर मन विषयांकडे सैरभैर धावण्याचे थांबेल. त्यामुळें बुध्दि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकेल. इंद्रिय-निग्रहामुळे त्या पापियांचे आश्रयस्थानच कोलमडून पडेल.
मात्र तें अंत:करणातून हद्दपार झाले तरच पूर्णपणे नष्ट झाले असे निश्चितपणें  समज. सूर्यकिरण नसतील तर मृगजळ संभवत नाही ; अगदीं तसेच कामक्रोध नाहीसे झाले की देह-भावाची गुलामी संपून ब्रह्माचें स्वराज्य प्राप्त होईल. आणि मग तो पुरूष आत्मानंदाचे महासुख आपणच भोगील.
अशा रीतीने आदर्श गुरूशिष्यांच्या गोष्टीप्रमाणे जीव नि ब्रह्माचे ऐक्य झाले की मग त्या जीवाला तेथून कुणीही हलवू शकत नाही.

संजय धृतराष्ट्राला म्हणाला की हे राजा, या प्रमाणें सर्व सिध्दांचा बादशहा, देवी लक्ष्मींचा भ्रतार, देवाधिदेव श्रीकृष्ण बोलत राहिला.
श्री ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की आता तो अनंत पुन्हा एक प्राचीन गोष्ट सांगणार आहे नि त्यावर पंडुसुत अर्जुन प्रश्न विचारेल. भगवंताचें ते समयोचित नि योग्य बोलणे अतिशय रसभरित असल्याने श्रोत्याना श्रवणसुखाची परमावधी लाभेल. म्हणून निवृत्तींचे दास ज्ञानदेव विनवतात की आपली ज्ञानलालसा या कृष्णार्जुन संवादाच्या निमित्ताने उत्कट करून घ्यावी.

“आजि श्रवणेंद्रिया पाहलें । जें येणे गीतानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें   ॥” (आज माझ्या कानांचे भाग्य फळफळल्या सारखे वाटते आहे कारण आज मी गीतारूपी खजिना पाहू शकलों. खरोखर स्वप्नवत असलेले आज प्रत्यक्षांत आले आहे !)

“आधीच विवेकाची गोठी (गोष्ट) । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी (जगदीश्वर) । आणि भक्तराजु किरीटी (अर्जुन) । परिसत (ऐकत) असे ॥

“जैसा पंचमालापु (पंचमस्वर) सुगंधु । कीं परिमळु (सुगंध) सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु (मौजेचा) । कथेचा इये ॥” (कोकिळेच्या स्वराप्रमाणे मधुर असा पंचमस्वर सुगंधित देखील असावा, किंवा सुगंध अति मधुर नि स्वादिष्ट असावा, तसे हे गीतारूपी काव्य बहारदार आणि मजेशीर होत चाललें आहे).

“कैसी आगळिक (थोरवी) दैवाची । जे गंगा वोळली (प्रकटली) अमृताची । हो कां (किंबहुना) जपतपें श्रोतयांची । फळा आलीं ॥”

“आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें (वस्तीला यावें) । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हे (गीतेचे आख्यान) ॥”

मात्र धृतराष्ट्राला यांत काहीच रस नसल्याने तो संजयाला खडसावतो की तुझे हे अनाठायी पाल्हाळ पुरे कर नि कृष्णार्जुन आपसात काय बोलत होते तेवढेच सांग.
“ते वेळीं संजयो रायातें म्हणें । अर्जुनु अधिष्ठिला (परिपूर्ण) दैवगुणें । जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे॥”
“जें न सांगे पितया वसुदेवासि । जे न सांगेचि माते देवकीसी । जें न सांगेचि बंधु बळिभद्रासि (बलरामाला) । तें गुह्य अर्जुनेंसि बोलत असे॥”
 “देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेहि न देखे या प्रेमाचे सुख । आजि कृपास्नेहाचे बिक (पात्र) । यातेंचि आथी (आहे) ॥” (आज केवळ अर्जुनच या कृपा नि प्रेमाचा धनी आहे).
इतकेच नव्हे तर सनकादिकांच्या आकांक्षा देखील आजपर्यंत पुरवल्या गेल्या नव्हत्या. अर्जुनाचे परम भाग्यच म्हटले पाहिजे की श्रीकृष्णप्रेमाचे इतके अनुपमेय प्रेम आज सहज दिसते आहे. माझी तर अशी खात्री आहे की केवळ अर्जुनाच्या स्नेहापोटीं हा निर्गुण निराकार परमात्मा मूर्त स्वरूपात अवतरला आहे. एरव्हीं हा योग्यांना सापडत नाही, वेदांना आकलन होत नाही आणि ध्यानाचेहि डोळे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
असा हा अनादि, निश्चल, असीम आणि निजस्वरूपात रमलेला परमात्मा कोणत्या मापदंडाने अर्जुनावर इतका कृपावंत झाला आहे नकळे ! खरं तर हा अवघ्या त्रैलोक्याला गवसणी घालणारा नि एकूणच आकाराच्या पलीकडचा ईश्वर कसा काय याच्या स्वाधीन झाला असेल बरे !

ते असो. आतां भगवंत आपले अतिशय गूढ आणि वास्तव सत्य अर्जुनाला सांगतील.

ते म्हणतात, ‘पंडुसुता, हाच योग मी पूर्वी विवस्वान सूर्याला सांगितला होता. पण त्याला बराच काळ होऊन गेला. नंतर ही योगस्थिति विवस्वानने रवीला कथन केली आणि त्याने मनूला. मनूने ती स्वत: आचरणांत आणली नि ती इक्ष्वाकुला प्रसृत केली. अशा प्रकारें ही जुनी परंपरा चालत राहिली.

पुढे परंपरेनुसार चालत आलेल्या या योगाला राजर्षी, म्हणजे क्षत्रियांतील तत्ववेत्ते जाणून होते. मात्र बराच काळ लोटल्यामुळे तो योग सांप्रत नष्टप्राय झाला. खरे तर प्राणीमात्र विषयवासना आणि शरीरसुखांच्या कचाट्यांत सापडल्यामुळे आत्मबोध विसरून गेले. आत्मनिष्ठा डळमळित झाली की विषयवासनांचा सुळसुळाट होतो, तेंच सर्वस्व वाटू लागते.

“एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं । सांगैं जात्यंधा रवी । काय आथी ?” (नाही तरी कायम नग्न फिरणाऱ्या लोकांच्या गावांत उंची वस्त्रें काय कामाची ? जन्माधाला सूर्य कसा कळणार ?)
किंवा बहिऱ्या माणसापुढे उत्तम गीत गाण्यांत काय हंशील ? कोल्हा चांदणें पसंत करेल काय ? जे कावळे संध्याकाळीं आंधळे होतात त्यांना चंद्रबिंब कसे दिसावे ?
अगदी तसेच, ज्यांना वैराग्य कशाशीं खातात ते माहीत नाही, ज्यांना विवेकाची भाषा समजत नाही असे मूर्ख लोक मला (ईश्वराला) कसे प्राप्त करून घेतील ? कुणास ठाऊक हा मोह कसा वाढत गेला नि बराच काळ व्यर्थ गेला. त्यामुळे या कलियुगात तो योग मात्र बुडाला हे खरे.

“तूं माझा भक्त आणि परम मित्र आहेस म्हणून तोच योग मी तुला पुन्हा सांगितला. हा योग म्हणजे उत्तम रहस्यमय ज्ञान आहे !” हा मी तत्वरूपांत सांगितलाय तुला ; याविषयी संदेह करू नकोस. खरोखर हे माझ्या मनांतले गूढ रहस्य आहे, पण ते माझ्या प्रिय मित्रापासून लपवून ठेवणेही शक्य नव्हतेच. तूं प्रेमाची मूर्ति आहेस नि भक्तीचा जिव्हाळा आणि मैत्रीचा तर जीवप्राण आहेस धनुर्धरा ! त्यातून तूं अतिशय विश्वासार्ह असल्याने या युध्दप्रसंगीं देखील तुझ्यापासून काहीही लपवून ठेवतां येत नाही. म्हणून क्षणभर धीर धर, गडबडून जाऊ नकोस. मात्र त्या आधीं तुझे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे.

अर्जुन अजूनही शंकासुर आहे. श्रीकृष्णाने नुकतिच सांगितलेली कथा त्याच्या मनांतून गेलेली नाही. सबब तो आपली शंका निर्भीडपणे विचारेल.
(क्रमश:…..


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?