Saturday, March 03, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चवथा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग चवथा)
त्या शोकाकुल, रूदन करणाऱ्या अर्जुनाला आता भगवंत बुध्दियोग, ऐश्वर्ययोग किंवा सांख्ययोगाची महती सांगतील. खरें तर आपण सर्व अर्जुनच आहोत हे लक्षात यायला कित्येक दशकें निघून जातात. नि मग अचानक हा ग्रंथ हातीं येतो आणि त्याचबरोबर त्यांतील वैषिष्ठ्यें समजावून सांगणाऱ्या अधिकारी व्यक्ती आपसूक सामोऱ्या येऊं लागतात. या विलक्षण योगायोगांचे खरेच नवल वाटते. असो.

संजय धृतराष्ट्राल् सांगतोय की अर्जुनाचे धैर्य त्या सर्वांना पाहून विरघळून गेले, जसे मीठ पाण्यात पडताच विरघळते किंवा वारा अभ्र पटलांना विरवून टाकतो. चिखलांत रूतलेल्या राजहंसाप्रमाणे तो अर्जुन केविलवाणा झाला. अशा जर्जर झालेल्या अर्जुनाला श्रीशारंगधर म्हणाले की अर्जुना तुझे हे आर्य संस्कृतीला न शोभणारे वर्तन स्वर्गप्राप्तीला बाधा आणणारे आणि अपकीर्ती पसरवणारे आहे. असे अयोग्य विचार या युध्दप्रसंगीं तुझ्या मनांत आलेच कसे? तू तर कधीही अनुचिताला थारा देत नाहीस आणि आपले धैर्य सोडीत नाहीस. अपयश तुझे नाव घेताच कुठल्याकुठे पळून जाते. शूरवृत्ती तुझ्या कह्यात असते नि क्षत्रियांचा तू राजराजेश्वर आहेस. तुझ्या शौर्याचा डंका तिन्ही लोकांत दुमदुमत असतो. ‘तो’ तू आज वीरवृत्तीला सोडून खालीं मान घालून रडत बसला आहेस ! आतां तरी सर्व धीर एकवटून मनाला पुन्हा उभारी येवू देत. हा मूर्खपणा सोडून हातात धनुष्यबाण घे ; युध्दप्रसंगीं असे कारूण्य अजिबात योग्य नाही. तूं जाणता म्हणजे शाहाणा आहेस. युध्दाच्या वेळी असले वागणे अयोग्य असल्याचे तुलासुध्दा माहीत आहे. यामुळे असलेला लौकिक तर जाइलच पण परलोकातही अडथळा निर्माण होईल.  म्हणून अर्जुना, हा अविचार सोड आणि पुन्हा लढाईसाठी सज्ज हो. अरे, हे सगेसोयरे आज अचानक उद्भवलेत काय ? कीं हे युध्द तुझ्यावर आजच लादले गेलेय् ?

अशा रीतीने तो दयाळू ईश्वर अर्जुनाला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करतोय नि म्हणून अर्जुन प्रतिप्रश्न करीत म्हणतो की देवा, ही साधीसुधी झुंज नसून फार मोठी घोडचूक आहे. हे भीष्मद्रोण मातापित्यांसमान वंदनीय आहेत, त्यांचाच वध करूं ? ज्यांनी माझ्यावर अगणित उपकार केले, धनुर्विद्या शिकवली, त्यांनाच मारणारा मी काय भस्मासुर आहे?

असं पहा देवा, समुद्र शांत नि गंभीर असतो हे खरें असले तरी द्रोणाचार्यांना क्षोभ तर माहीतच नाही. ते कायम धीरगंभीरच असतात. एकवेळ अमृत नासेल किंवा कालांतराने वज्रही मोडेल, पण त्यांच्या मन:शांतीमध्ये तसुभरही विकार संभवत नाहीत. ते सर्व सद्गुणांचे नि विद्यांचें आश्रयस्थान आहेत नि माझ्यावर त्यांची आत्यंतिक कृपा आहे. असे असतांना मी त्यांचाच घात चिंतूं ?
अशा थोरथोर व्यक्तींना मारून आपण राज्यसुख भोगावे हे मला अजिबात पटणारे नाही. त्यापरीस हा देश सोडून रानावनांत हिंडत भिक्षा मागून जगणे मला श्रेयस्कर वाटेल !

हे सगळें श्रीकृष्णाने ऐकून न ऐकल्यासारखे केले, म्हणून अर्जुन मनातून चांगलाच भ्यायला. खरंतर मनांतील मळमळ त्याने स्पष्ट शब्दात मांडली होती देवासमक्ष. म्हणून तो पुन्हा अजीजीने बोलू लागला की देवा, उचित-अनुचित तुम्हीच योग्यप्रकारें जाणतां. मी मोहग्रस्त झालोंय् हे मला कळतेंय्, म्हणून हिताहित मला समजत नाही म्हणून श्रीकृष्णा, मला योग्य तें कृपाकरून सांगा. तूच आमचे गुरू बंधू पिता नि इष्टदेवता आहेस नि तूंच आमचे संकटकाळीं रक्षण करीत आला आहेस. गुरू शिष्याचा कधीच अव्हेर करीत नाही, किंवा समुद्र नद्यांना नाकारीत नाही. लहान बाळाला आई सोडून गेली तर त्या बाळाने कसे जगावे बरे ?

आणि म्हणून हे कृष्णा, माझे बोलणे मनावर न घेतां जे काही योग्य असेल नि ज्यायोगें धर्माचरणाला बाधा येणार नाही ते सर्व हे पुरूषोत्तमा, मला त्वरित सांगा !
हे गोत्रज पाहून जो काही मोह निर्माण झालाय् तो तुझ्या बोलण्यावांचून दूर होणार नाही. एरव्हीं पृथ्वी पाण्यात जिरली किंवा इंद्रपद लाभले तरी मनांतील हा मोह काही सुटणार नाही. भाजलेले बीं उत्तम मशागत केलेल्या शेतात पेरले तरी ते काही अंकुरित होत नाही, किंवा अंतसमयीं इतर कुठलेच औषध उपयोगी नसून केवळ परमामृतच तारूं शकते. तद्वत्, तुझे करूणाकर बोल माझ्या मनांतील खळबळ शांत करूं शकतील.

हे सगळे बोलत असतांना क्षणभर असे वाटले की त्याची भ्रान्ती मावळते आहे, पण लगेचच तो त्या उर्मीने पुन्हा झपाटला गेला. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या मतें ती साधीसुधी उर्मी नसून काळसर्पाने दंश केल्यामुळे आलेली ग्लानी असावी, महामोहाच्या रूपांत ! हृदयापर्यंत पोहोचलेल्या त्या विषामुळे अर्जुनाची ग्लानी उतरवण्यासाठी आता तो श्रीहरी नामक गारूडी, ज्याच्या केवळ दृष्टीक्षेपाने भलीभली विषबाधा सहज उतरते, आतां अर्जुनासाठी धावून येईल आणि आपल्या कृपेमुळे त्याचें रक्षण करील.

(माऊलींनी, ‘म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु। जाणोनियां ॥ मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥’ अशी ओवी वापरली आहे. ) !

उन्हाळ्यांत डोंगरचे डोंगर वणव्यामुळे होरपळून निघतात, अगदी तसाच अर्जुन दु:खामुळे जर्जर झाला होता.

पुढे अतिशय सुंदर ओव्या येतात. त्या अशा –
“म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ आतां तो उदार कैसा वर्षेल । तेथ अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणें देखा । निवृत्तिदासु ॥”

(म्हणून स्वाभाविकपणे नीलवर्णाचा नि कृपारूपी जळाने परिपूर्ण असलेला  महामेघरूपी श्रीगोपाळ त्याच्याकडे वळला. त्याचे चमचमणारे पांढरे शुभ्र दात मेघांतून वीज चमकून जावी तसे लखलखत होते नि त्याचा धीरगंभीर आवाज आसमंतांत गर्जना व्हावी तसा दुमदुमत होता. आता हा कृपामेघ उदारपणे अर्जुनावर ज्ञानरूपी कृपेचा वर्षाव करील नि त्यामुळे हा वणवाग्रस्त महामेरू कसा शांत नि तृप्त होईल आणि ज्ञानाचे नवीन कोंभ कसे फुटत राहतील ती कथा लक्षपूर्वक ऐका असे निवृत्तिदास ज्ञानदेव विनवतात. )

वाहवा ! केवळ लाजबाब !!

खरें तर अर्जुनाचा विषाद अजून संपलेला नाही. तो अजूनही काही ना काही मुद्दे काढतो आहे नि ते लक्षात घेऊन आता भगवंत त्याची आधी कानउघाडणी करणार नि मग गहन असे पारमार्थिक सिध्दांत सांगायला सुरूवात करणार. खरा गीतार्थ येथपासून सुरू होतो असे म्हणायला हरकत नसावी. आदि शंकराचार्यांनी गीतार्थ सांगायला पुढच्या श्लोकापासून आरंभ केला, तेच प्रख्यात “शांकर-भाष्य” होय. (क्रमश:……




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?