Friday, March 09, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सहावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग सहावा)

“अविनाशी तु तद्विध्दि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति.  ॥१७॥”
(जें सर्व विश्व व्यापून आहे ते अविनाशी असते हे ध्यानांत असू देत. कारण अविनाशी वस्तूचा कोणीही नाश करू शकत नाही. )

वरील श्लोकाचे विवेचन आपण आधी पाहिले आहेच. याच अनुषंगाने पुढचा श्लोक महत्वाचा ठरतो.

“अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण: ।
 अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत ॥१८॥
(आत्मा अविनाशी, नित्य, अचिन्त्य आहे. त्याचे भौतिक शरीर स्वभावत: नाशवंत, अनित्य आहे. म्हणून हे भारता (अर्जुना), तूं युध्द कर. )

श्लोकार्थ सुध्दा जरा अवघड आहे याची नोंद घेत पुढे जाऊं.

अरे, हे शरीर वगैरे सर्व काही स्वभावत:च नाशवंत आहे. सबब तूं युध्दाला सामोरे जावेस हेच उचित ठरेल. खरे तर निव्वळ देहाभिमानामुळे शरीराकडे पाहण्याची तुझी दृष्टी सीमित झाल्याने “मी मारणारा नि हे मरणारे” असा तुला अहंगंड झाला आहे. मात्र तुझ्या लक्षातच आलेले नाही की तात्विक दृष्ट्या तूं यांना मारणार नाहीस किंवा हे मारले जाणार नाहीत.

स्वप्नांत पाहिलेल्या गोष्टी स्वप्नातच खऱ्या वाटतात, पण जाग आल्यावर त्यांचा मागमूसही राहात नाही. अगदी तसेच ही सगळी माया आहे हे आधी ध्यानांत घे. तूं निष्कारण भ्रमांत वावरतो आहेस. सावलीवर शस्त्राचे घाव घातले तरी मूळ शरीराला काहीच होत नाही. किंवा, पाण्याने भरलेला कुंभ कलंडून सर्व पाणी वाहून गेले की त्यांतील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते. पण म्हणून सूर्य नाहीसा होतो काय ?
अगदीं तसेच, देह नष्ट झाला तरी ‘आत्मरूपा’चा नाश होत नसतो. म्हणून अर्जुना, सत्य स्वरूपावर तुझ्या भ्रामक विचाराचा आरोप करूं नकोस. जुनेर, फाटके वस्त्र टाकून नवीन कपडे चढवावेत, तसा हा चैतन्यनाथ आत्मा जीर्ण शरीर टाकून केवळ नवीन शरीर स्वीकारतो.

पुढच्या दोन श्लोकांवर अगणित भाष्यें आपण अनगिनत वेळां ऐकली आहेत ! “वासांसि जीर्णानि….. आणि “नैनं छिन्द्न्ति” …..!

तरी पण माऊली याचे विवरण करतात एका वेगळ्याच घाटणींत. “आत्मा आत्मा” म्हणतात ती काय चीज आहे ? ते सांगतात की आत्मा हा अनादि, नित्यसिध्द नि अतीव शुध्द असून त्याचा शस्त्रादिकांनी छेद करता येत नाही. हा प्रलयकाळच्या अथांग पाण्यातसुध्दां बुडत नाही की याला आगीत जाळतां येत नाही. मारूताचा म्हणजे महाभयंकर सोसाट्याचा वारादेखील याला सुकवूं शकत नाही. अर्जुना, हा नित्य, शाश्वत, अचल आणि सगळीकडे पूर्णपणे व्यापून असलेला असा आहे.
याला तर्काच्या दृष्टीने पाहू गेले तरी तो दृष्टीपथांत काही केल्या पडत नाही. अगदी ध्यान-धारणेच्या माध्यमातूनही याचे दर्शन दुरापास्त ठरते. मनाने याची कल्पना करता येत नाही. कोणत्याही साधनेद्वारा तो प्राप्त करता येत नाही. अर्जुना, हा अनंत असीम असा उत्तम पुरूष होय. याला त्रिगुणांची बाधा नाही. तो अनादि असून अविकारी आहे. कोणत्याही आकारा पलीकडचा सर्वरूप आहे तो ! अर्जुना, या आत्म्याला केवळ अशाप्रकारें ओळखतां येईल. तो सर्वात्मक असल्याची प्रचीती घ्यावी, म्हणजे मग तुझा विषाद सहजपणे घालवतां येईल.
तथापि, तूं वर सांगितले तसे आत्म्याचा देखील नाश करता येईल असे अजूनही समजत असशील, तरी त्याची खंत बाळगण्याचे काहीच प्रयोजन नाही.

असे पहा, गंगेचा ओघ उगमापासून समुद्रापर्यंत अखंड, अस्खलित, चिरंतन चालू असतो तसाच आत्म्याची उत्पत्ती, स्थिति नि लय असा क्रमप्रवाह अविरत चालूंच असतो. आणि हा जीवनक्रम सर्व प्राणीमात्रांच्या बाबतींत कायम घडत राहतो, त्यांत कोणत्याही काळीं कुठलाच खंड पडत नाही. तुझ्या मनाला हें सर्व पटत नसले तरी प्रत्येकालाच जन्ममृत्यू अटळ आहेत हे मात्र विसरू नकोस.

‘उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमें गा ॥’ घटिकायंत्र म्हणजे वाळूचें घड्याळ. दर तासाला याला फिरवावें लागे. अगदी तसेच जे जे उद्भवते ते ते नाश पावतेच. किंवा, जसे सूर्योदय नि सूर्यास्त आपोआप अव्याहतपणे चालूं असतात, तसेच जन्ममरणाचे राहाटगाडगे या जगात अपरिहार्यपणे फिरत राहते. महाप्रळयाचे वेळीं त्रैलोक्याचा पुन:पुन्हा संहार होतो, पण हा ‘आदि अंतु’ काही केल्या टाळतां येत नाही !  म्हणून, हे सर्व जर तुला पटत असेल तर खेद करायचे काहीच कारण उरत नाही. मात्र तूं जाणूनबुजून वेड पांघरत असशील (तर मात्र माझा नाईलाज आहे )!

आतां पुन्हा एक महत्वाचा श्लोक येतो,
 “अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
 अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिवेदना.    ॥२८॥
(अर्जुना, सर्व प्राणिमात्रांची शरीरें जन्मापूर्वीं अव्यक्त असतात, जन्मानंतर व्यक्त होतात आणि मृत्यूनंतर पुन्हा अव्यक्त होतात. तर मग याचा शोक करण्याची गरज आहे का ?)

सगळे प्राणी जन्म होण्यापूर्वी अमूर्त म्हणजे निराकार किंवा अव्यक्त असतात नि जन्मानंतर मूर्त रूप म्हणजे शरीर धारण करतात. मृत्यूनंतर त्यांचे शरीर नाहीसे होते आणि दुसरे रूप न घेतां ते पुन्हा आपल्या अमूर्त किंवा अव्यक्त अवस्थेंत परत जातात.
आतां, जन्म नि मृत्यूच्या मधील जी स्थिति दिसते ती निजलेल्याच्या स्वप्नासारखी असते. खरें तर मायेच्या प्रभावामुळे सत्य-स्वरूप म्हणजेच निराकार आत्म्यावर लादलेला आकाराचा तो भास आहे. यालाच अध्यास असेही म्हणतात.

“तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रूदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥”    अरे जे मुळात झालेच नाही, त्यासाठीं काय म्हणून रडत बसला आहेस ? त्या ऐवजीं नीट समजून घे की हे निर्विकार चैतन्य अवीट म्हणजे कधीही नाश न पावणारे असे आहे.
याच चैतन्याच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी संतमंडळी सर्व ऐहिक विषयांना बगल देतात, विरक्त मंडळी वनवास पत्करतात.

वरील सर्व विवरण पचायला जरा अवघड आहे याची पूर्ण जाणीव असल्याने तूर्त स्वल्पविराम देतो. मात्र पुढच्या श्लोकांत भगवंत “स्वधर्म” या अतिमहत्वाच्य् विषयाला स्पर्ष करतील आणि ज्ञानदेव त्याचे मर्म आपल्याला समजावून सांगतील. तें वर्णन पुढील भागांत ! (क्रमश:….)


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?