Monday, March 19, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अकरावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग अकरावा )
एक महत्वाचा श्लोक, जो लोकमान्य टिळकांचा विशेष आवडणारा म्हणतां येईल असा-
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।……….
(तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफलावर अजिबात नाही.)

माऊली सांगतात,
 आपण आपले विहित कर्म , म्हणजे नियतीने जें काही आपल्या ललाटावर लिहिलेले आहे ते केलेच पाहिजे. जसें क्षत्रियांसाठी युध्द, ब्राह्मणांसाठी षट्कर्में (यज्ञ, याजन, अध्ययन, अध्यापन, दान नि आदान किंवा प्रतिग्रह), वैश्यांना व्यापार आणि शूद्रांना सेवा नि स्वच्छता.
(खरें तर ही वर्णश्रम व्ववस्था त्या काळाची गरज म्हणून अस्तित्वांत आली. ती कालबाह्य नसली तरी आजच्या काळाशीं सुसंगत म्हणता येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आजची व्ववस्था जन्मसापेक्ष नसून कर्मसापेक्ष आहे. खरें तर आजचा प्रत्येक माणूस वरील चारही वर्ण स्वत:मध्ये अनुस्यूत आहेत असे मानतो. कारण आपले आणि कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो बुध्दिजीवी असल्याने प्रपंचांत ब्राह्मणाची भूमिका घेतो. अर्थार्जन आणि त्याचा विनियोग करत असल्याने वैश्यधर्म आला आणि माता-पिता, गुरुजन, वडीलधारे नि समाजांतील सर्वांची वेळप्रसंगीं करत असलेली सेवा आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेचे ब्रीद घेतल्याने शूद्र-वर्ण देखील !) असो.
माऊली आग्रहाने सांगतात की कर्मफलाची आसक्ती नको, निषिध्द कर्म करूं नकोस आणि निरपेक्ष बुध्दीने सत्कर्मेंच करत राहा.
‘तूं योगयुक्त होउनी । फळाचा संग सांडुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥’ प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे ! आधीं म्हणाले, ‘तूं योगी हो,’ नि मग फलाशा न धरतां,  लक्षपूर्वक (diligently) कर्में कर.
पुढे म्हणतात, आरंभिलेले कार्य सुदैवाने यशस्वीपणे पूर्णत्वास गेले तर हुरळून जाऊं नये किंवा काही कारणाने अडून राहिले तरी त्याचा क्षोभ नसावा. कारण जे जे कार्य घडेल ते सर्व ईश्वरार्पण केले तर माणूस कर्मबंधांत अडकत नसतो.
खरें तर कर्माची फलश्रुती काहीही असली तरी जो माणूस त्याबाबत हर्षशोक मानत नाही तोच योगी होय असे नि:संदेहपणे ठणकावून सांगतात ज्ञानदेव.
“अर्जुना समत्व चित्ताचे । तेंचि सार जाणें योगाचे । जेथ मन आणि बुध्दीचें । ऐक्य आथी ॥”
याच फलनिरपेक्ष कर्माला माऊलींनी “बुध्दियोग” अशी संज्ञा दिली आहे. (निष्काम कर्मयोग म्हणजेच बुध्दियोग)
तरी पण, हे कसे घडावें ? अर्जुना, जेव्हा तूं मोहाचा त्याग करशील, म्हणजेच जेव्हा ‘मी-माझें’ हा भाव निपटून काढशील, तेव्हा तुला वैराग्य आपसूक लाभेल. वैराग्यामुळें निष्कलंक नि गहन असे आत्मज्ञान प्रकट होईल आणि तुझ्या मनांत कसलीच आसक्ती किंवा अभिलाषा राहणार नाही. मग आणखी काही जाणून घेण्याची किंवा मागचे काही उगाळत बसण्याची खोड थांबेल. इंद्रियांचे उपद्व्याप बंद पडून बुध्दि पुन्हा आत्मस्वरूपांत स्थिरावेल. अशा समाधीसुखांत मग्न झालेल्या स्थिरबुध्दीमुळें तुला खरी योगस्थिति लाभेल.

अर्जुनाने विचारलेल्या स्थितप्रज्ञा विषयींच्या प्रश्नांची भगवंताने दिलेली समर्पक स्पष्टीकरणे आपण मागील भागांत पाहिली आहेत. म्हणून पुनरावृत्ती टाळून पुढच्या ओंव्या पाहू.

स्थिरबुध्दीचा साधक कसा असतो त्याचे बहारदार वर्णन करतात.
“देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदु:खां ॥ (जेव्हा प्रसन्नता अखंडपणे चित्त व्यापून असते तिथे कोणत्याही प्रापंचिक उद्वेगाला थारा मिळत नाही). असे पहा, ज्याचे पोटात अमृताचा झरा वाहातो आहे त्याला तहान-भुकेचा त्रास संभवतच नाही. अगदी तसेच हृदयांत आनंद भरलेला असेल तर दु:ख कुणाला नि कसे होईल? अशा पुरूषाची बुध्दी साहाजिकच परमात्म स्वरूपात स्थिर असते. निवाऱ्यांत ठेवलेली दिव्याची ज्योत मुळीसुध्दां कंप पावत नाही ; तसा स्थिरबुध्दीचा पुरूष आपल्या स्व-स्वरूपात मग्न असलेला योगी समजावा.

मात्र ज्याला इंद्रियें, मन, बुध्दी स्थिर ठेवतां येत नाहीत त्याला विषयादिक गुणधर्म जखडून टाकतात. खरें तर अशा अविवेकी पुरूषांना स्थैऱ्याची इच्छाच नसते. मग त्यांना शांती कशी प्राप्त होणार? आणि जिथे शांतीचा जिव्हाळा नाही तिथें सुख कुठून असणार? मग मोक्षाची तर बातच नको! भाजलेले बियाणें शेतात पेरले आणि त्याला कोंभ फुटले असे अशक्य कधीं घडलें तरच अशांत माणूस सुखी झाला असे म्हणतां येईल !!
म्हणून, मनाची अस्थिरता हेच सर्व दु:खांचे मूळ होय. आणि म्हणूनच इंद्रियांवर ताबा मिळवणे अत्यावश्यक ठरतें.
खरोखर, इंद्रियें म्हणतील ते करणारा पुरूष विषयांचा समुद्र लंघून गेला असे वरवर भासते. पण जसे किनारा गाठलेले गलबत अचानक वादळ आले तर पुन्हा समुद्रात भरकटूं शकते तसे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुध्दां जे पुरूष क्षणिक का होईना पुन्हा इंद्रियांधीन झाले तर प्रपंचातील सर्व सुखदु:खे त्यांना घेरल्याशिवाय राहात नाहीत.

“म्हणून महाबाहो (अर्जुना), ज्याची इंद्रियें सर्व बाजूंनी विषयांपासून आवरलेली असतात त्याची बुध्दी निश्चितपणे स्थिर झालेली असते.”
पुन्हा एकदां कासवाचे उदाहरण देवून सांगतात की जसे कासव आपल्या इच्छेप्रमाणे आपले अवयव पसरते किंवा आवरून घेते, तशी स्थितप्रज्ञाची इंद्रियें त्याच्या पूर्णपणें ताब्यांत असतात.

आता ज्ञानदेव पूर्ण पुरूषाचें गहन असे चिन्ह अर्जुनाला सांगतील.
“या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनै: ॥६९॥”
(आत्म-स्वरूपाविषयीं अनभिज्ञ असलेले सर्व प्राणी अज्ञानरूपी रात्रीमध्ये झोपलेले असतात. मात्र मनावर पूर्ण ताबा मिळवलेला स्थितप्रज्ञ त्याच्या ज्ञानामुळें कायम जागृत असतो. त्याचप्रमाणें प्राणी जेव्हा दैनंदिन व्यवहारात जागे असतात तेव्हा तो व्यवहार अज्ञानमूल असल्याने स्थितप्रज्ञासाठी ती रात्रच ठरते !)
असा निरूपाधिक स्थिरबुध्दीचा पुरूष मुनिजनांचा जणूं राजाच होय.
पार्था, स्थितप्रज्ञाचे आणखी एक लक्षण तुला सांगतो. समुद्र कायम धीर गंभीर असतो. असंख्य नाले त्यांत आपले प्रवाह सतत ओतत असतात पण समुद्र आपला पाणीसांठा वाढू देत नाही, किंवा उन्हाळ्यांत सर्व नद्या कोरड्या ठणठणीत पडतात. पण समुद्राची पातळी काही कमी होत नाही. अगदीं तसेच, सिध्दपुरूषाला अनायासें ऋध्दीसिध्दि प्राप्त झाल्या तरी तो हुरळून जात नाही, किंवा नाही मिळाल्या तरी त्याला खंत नसते. मला सांग, सूर्याच्या घरात प्रकाशासाठी दिवा पेटवावा लागतो काय ? आणि दिवा लावला नाही तर तो काय अंधारांत कोंडला जातो ?
त्याचप्रमाणे, ऋध्दीसिध्दि आल्या किंवा गेल्या तरी सिध्दपुरूष तिकडे लक्षच देत नाही कारण तो आत्मानंदांत निमग्न असतो. त्याला स्वर्गसुखही क:पदार्थ असते; मग ऋध्दीसिध्दींची तो कशाला पर्वा करेल? असा आत्मज्ञानाने संतुष्ट पुरूष अहंकार नि सर्व वासनांचा त्याग करून, विश्वरूप होत्साता विश्वांत संचार करतो.

अशी ही परब्रह्म अवस्था अपरंपार आहे, जी प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. मात्र ते सर्व ऐकताना अर्जुनाच्या मनांत असलेले युध्द न करण्याचे प्रयोजन अधिकच बळकट झाले. म्हणून तो अर्जुन भगवंताला एक सुंदर प्रश्न विचारून आपली शंका मांडेल.
तो प्रसंग खरोखर खूप सुंदर, रसपूर्ण, सर्व धर्मांचे सारभूत किंवा विवेकरूपी अमृताचा अमर्याद सागर आहे. सर्वज्ञांचा राजा भगवान् श्रीकृष्ण स्वत: ती कथा सांगतील असे निवृत्तिनाथांचे सेवक श्री ज्ञानदेव म्हणतात.
(क्रमश:……..


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?