Thursday, March 22, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग बारावा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग बारावा)
मागील भागांत स्थितप्रज्ञ अशा योग्याची लक्षणे भगवंताने सांगितली. लाभ-हानी, सुख-दु:ख, जय-पराजय वगैरे सर्व व्दंव्दांत योगी पुरूष समत्वाची भावना जोपासतो असे विविध दाखले देत श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला.
तथापि, या सर्व सांगण्याचा एकच अर्थ अर्जुनाने काढला तो  असा कीं जर कर्म, कर्ता वगैरे व्दंव्दें समबुध्दीला अभिप्रेत नसतील तर त्याला युध्दासारख्या हिंसक कर्मांत काय म्हणून प्रवृत्त केले जात आहे ! एकीकडे समबुध्दि असलेला योगी हो असे सुचवतोस नि दुसऱ्या बाजूस युध्द कर असेही शिकवतोस !! आपली ही भूमिका पटवून देण्यासाठी तो देखील अनेक दाखले देतो नि शेवटीं विनवतो की मज अज्ञानी पामराला  निश्चित असे मार्गदर्शन करा.

आतां भगवंत कर्मयोगावर अतिशय सुंदर आणि निर्णायक निरूपण करतील.
किंचित विस्मय दर्शवीत श्रीकृष्ण म्हणतात की अरे तुला जे आत्तां सांगितले तो तत्वार्थ आहे. बुध्दियोगाची, म्हणजेच निष्काम कर्मयोगाची महती सांगताना मी सांख्य-मताचा देखील सहज उल्लेख केला. तुला ते न कळल्यामुळे विनाकारण बेचैन झालास. मात्र एक लक्षांत ठेव की ही दोन्ही तत्वें माझ्याच पासून निर्माण झालेली आहेत नि तीं चिरंतन आहेत. बरें, ज्याला ज्ञानयोग म्हणतात त्याचे सांख्यमार्गी अनुसरण करतात आणि तो साध्य होताच साधकाचा सिध्द होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होतो.
दुसरा आहे कर्ममार्ग, जो चोखाळतांना थोडा अधिक वेळ लागतो. हे दोन मार्ग वेगळाले दिसत असले तरी दोन्हींचे गंतव्य एकच असते. उदाहरण देतात स्वयंपाक करण्याचे नि भोजन करण्याचे, ज्यांची फलश्रति एकच असते तृप्तीची. किंवा, पूर्व-वाहिनी नदी आणि पश्चिम-वाहिनी नदी  वेगळ्या दिसतात पण अखेर एकाच सागराला जाऊन मिळतात.
अगदी तसेच, कर्मयोग आणि ज्ञानयोग एकाच परमात्म स्वरुपाची भेट घडवतात. केवळ योग्यतेप्रमाणे त्यांचे साधन आणि उपासना मार्ग वेगळे दिसतात.

मला आवडणारी अझून एक ओवी –
“देखैं उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगैं नरू केवीं तैसा । पावे वेगां ? ॥”
(पक्षी मनांत येतांच चट्कन उडतो आणि पिकल्या फळावर चोंच मारतो. मात्र माणूस तितक्या वेगाने फळापर्यंत पोहोचू शकेल काय ?) तो हळूहळूं क्रमाक्रमाने झाडावर चढेल नि ते फळ निश्चितपणे पदरांत पाडून घेईल. अगदीं तसेच अशा विहंगम मार्गाने ज्ञानयोगी शीघ्रगतीने तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात. मात्र कर्मयोगाचा अवलंब करणारे यथोचित आचार आणि निष्काम नि विहित कर्माच्या आधाराने, ज्ञानयुक्त होत मोक्ष मिळवतात.

मात्र एक महत्वाचे तत्व लक्षात ठेव. जोपर्यंत इच्छा, वासना शिल्लक आहेत तोंवर कर्म करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आत्मतृप्ती झाली कीं कर्म आपोआप गळून पडते. म्हणून ज्याला अशा “नैष्कर्म्यपदाची” ओढ आहे त्याने स्वधर्माला साजेसे आपले विहित कर्म कधीही सोडू नये.
केवळ कर्म करणे सोडले की नैष्कर्म्य आले असे म्हणणे मूर्खपणा आहे. असे बोलणे खरोखर अर्थहीन आहे. केवळ कर्माचा त्याग केल्याने कर्मत्याग झाला असे नक्कीच म्हणता येत नाही.

मला सांग, शास्त्रविरोधी नि परमार्थाला बाधक म्हणून कर्म करायचे नाही असे म्हटले तरी इंद्रियांचे व्यापार थांबतात काय ? कान ऐकायचे थांबतील की डोळे पाहायचे आणि नाकाने सुगंध घेणे बंद होईल ? बरे, श्वासोच्छ्वास किंवा बुध्दी विचार करणे सोडेल ? तहान भूक मावळतील की निद्रा नि स्वप्न पडणे बंद पडेल ? जन्म-मृत्यू तरी थांबवतां येतील का ?
या सर्व गोष्टींपैकी काहीच बंद करता येत नसेल तर त्याग कशाचा केला?

मुळांत हे शरीर नि त्याचे सर्व गुणधर्म मायेमुळे भासतात. जोंवर या प्रकृतीचा अर्थात मायेचा संग आहे तोपर्यंत कर्मत्याग अशक्य आहे. (तरीही कर्मत्याग केला असे जे म्हणतात त्यांचा तो निव्वळ अट्टाहास असतो !) कर्मत्यागाचे वरवर ढोंग करणारे लोक खरें तर विषय-वासनेंत बरबटलेले असतात एवढे मात्र नक्की.

अर्जुना, या विषयांच्या अनुषंगाने तुला “नैराष्ये”चे लक्षण सांगतो, ते ऐक.
जो मनाने दृढनिश्चयी आणि परमात्म-स्वरूपाशीं रममाण झालेला परंतु बाह्य स्वरूपांत सामान्य प्रापंचिक माणसांसारखे वागतो ; जो आपल्या इंद्रियांना विषयभोग घेण्याचे स्वातंत्र्य तर देतो पण त्यांविषयीं आसक्तीची भीती बाळगत नाही आणि प्रसंगानुरूप शास्त्रविहित कर्म करायची वेळ आली तर ती टाळत नाही. कोणतेही कार्य सुसूत्रपणे नि कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता, निरपेक्ष बुध्दिने करतो. तो वासना किंवा मोहाला बळी पडत नाही. तो लोकांच्या संगतींत राहून देखील पद्मपत्राप्रमाणे अलिप्त असतो. पाण्यात दिसणारे सूर्यबिंब पाण्यापासून वेगळे राहते तसा लोकात सामान्य भासणारा आत्मज्ञानी पुरूष वरवर सामान्य वाटतो. वास्तविक त्याचे खरे स्वरूप समजणे अवघड आहे.
तथापि, आशापाश रहित आणि वर सांगितलेली लक्षणे असणारा पुरूषच ‘मुक्त’ असतो असे निश्चितपणे समज. अर्जुना, या जगात ज्याच्या श्रेष्ठत्वाचे विशेष वर्णन केले जाते तो कर्मयोगी होय. आणि म्हणूनच मी तुला ‘कर्मयोगी हो’ असे म्हणतोय.
“तूं मानसा नियमु करी । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियेंहीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ( तूं मनाचा निर्धार कर, अंत:करणांत स्थिर हो आणि मग कर्मेंद्रियांना खुशाल आपापलें कर्म करू देत. कारण त्यापासून तुला बाध येण्याचा धोका नाही, मनानें अलिप्त असल्यामुळें )
म्हणून प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत “नैष्कर्म्य स्थिती” प्राप्त करणे संभवतच नाही. शिवाय “निषिध्द कर्म” करणे तुला खरेच जमेल काय ?
आणि म्हणून तुला आग्रहाने सांगतो कीं जे जे उचित नि प्रसंगानुरूप कर्म तुझ्या समोर येईल ते निरपेक्ष बुध्दीने अवश्य कर.
अर्जुना, तुला माहीत नसलेले एक गुपित सांगतो नि ते म्हणजे निष्काम कर्मच कर्मबंधापासून आपोआप मुक्त करत असते !

“देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणे व्यापारें । निश्चित पावे ॥” (असे पहा, जो शास्त्रांच्या आधाराने म्हणजेच सर्वसामान्य समाजाच्या हितासाठी असलेले कार्य आपला स्वधर्म मानून योग्य असे आचरण करतो, तो त्याच कर्मांमुळे निश्चितपणे मोक्ष प्राप्त करतो. )

“स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञ जाण पां । म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारू नाही ॥” (अरे बाबा अर्जुना, जो कोणी आपले विहित कर्म स्वधर्म मानून करतो तें यज्ञकर्मच असते असे खात्रीपूर्वक समजून घे कारण तिथे पाप असण्याचे कारणच नाही. नित्य, नैमित्तिक आणि विशेष अशी कर्में म्हणजेच यज्ञ सांगितले आहेत. असो. )

मात्र आपला निजधर्मच जे कोणी आचरत नाहीत आणि वर कुकर्म म्हणजे निषिध्द कर्मांत रमतात त्यांना प्रपंचाचे बंधन म्हणजे जन्ममृत्यूंच्या पुनरावृत्तीं शिवाय दुसरा पर्याय नसतो.
“म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥”
हे सगळे विश्व कर्माचरणाला बांधील आहे, कर्म करण्यावाचून त्याला पर्याय नाही. पण प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या आवरणाखाली असल्याने लोक स्वधर्म-पालनाचे कर्तव्य विसरले म्हणून त्यांना जन्ममृत्यूच्या बंधनांत पडावे लागले.
अर्जुना, या निमित्ताने तुला एक कथा सांगतो, ज्यांत सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीची रचना कशी केली ते तुला समजेल.
(क्रमश:……


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?