Sunday, March 11, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग नववा)

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें (भाग नववा)

सद्बुध्दि आणि दुर्बुध्दि यांवर सांगताना ज्ञानदेव म्हणाले की जरी मनुष्यप्राणी शास्त्रोक्त पध्दतीने धर्मकार्यें करत असले तरी एक मोठी घोडचूक करतात ती अशी की तीं सर्व कर्में ते स्वर्गसुखाच्या लालसेपोटीं करतात. विविध उदाहरणों देतात. जसे, कापुराचा ढीग रचावा नि तो पेटवून द्यावा ; किंवा गोडधोड पक्वान्नें तयार करून त्यांत विष कालवावे. अथवा, दैवयोगाने लाभलेला अमृतकुंभ लाथेने उलथून टाकावा ! अगदीं तसेच महत्सायासाने मिळवलेले पुण्य संसाराच्या सुखोपभोगात संपवून टाकणाऱ्या अशा लोकांना काय म्हणावें ! उत्तम, सुग्रास अन्न शिजवून पैशांसाठी ते विकून टाकण्यासारखा प्रकार आहे हा. अगदी तसे हे अविवेकी लोक आपले पुण्य व्यर्थ घालवतात.
तात्पर्य असे की वेदवचनांची पोकळ चर्चा करणाऱ्या मंडळींत देखील अशी दुर्बुध्दि असतेच ! असो.

आता अधिक गहन निरूपण करतात ज्ञानदेव.
ते सांगतात, वेद हे त्रिगुणांनी युक्त असे आहेत, मात्र उपनिषदें तेवढीं सात्विक आहेत. अर्जुना, उपनिषदां व्यतिरिक्त वेदांचा जो भाग आहे त्यांत स्वर्गप्राप्ती किंवा ऐहिक सुखांसाठी सकाम उपासना सांगितली आहे. अशा कर्मांकडे तुझे मन वळवू नकोस. तिन्ही गुणांचा त्याग कर ; मी माझे म्हणण्याचा सोस सोड, मात्र अंतर्यामी दडलेल्या आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.
वेदांनी अनेक मार्ग सुचवले असले तरी आपल्या हिताचें तेवढे घ्यावे. सूर्य उगवल्यावर चौफाळ्यावर चार रस्ते दिसले तर आपण चारही वाटा चोखाळतो काय ?  सगळीकडे भरपूर पाणी साठवलेले असले तरी आपण गरजेपुरतेच घेतो ना ?
तसेंच, जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदवांग्मय अभ्यासून केवळ निष्काम कर्म, उपासना नि आत्मज्ञान यांनाच ग्रहण करतात.
म्हणून अर्जुना, प्राप्त परिस्थितींत तुला ‘स्वकर्म’ करणेच श्रेयस्कर आहे. कसेही करून आपले ‘विहित कर्म’ सोडू नकोस. शिवाय, कर्मफळाची आसक्ती नको नि वाईट अर्थात् निषिध्द कर्माची संगत तर नकोच नको.
अर्जुना, तूं समत्वरूपी योग आचरायला हवा. म्हणजेच कर्मफलाची अपेक्षा न धरतां सतत कार्यमग्न राहा. आणि तूं आरंभलेले कर्म जर सुदैवाने ज्ञानप्राप्तीचे फळ देवून गेले तरी त्याचा जल्लोष नसावा. काही कारणाने आरंभ केलेले कार्य अर्धवट राहिले तर त्याचाही क्षोभ नसावा. यालाच म्हणतात चित्ताचें समत्व. (समत्वं योगमुच्यते !)
आरंभ केलेले कार्य सुफलित झाले तर ते सार्थकीं लागले असे समजावे नि अपूर्ण राहिले तरी ते पूर्ण समजावे कारण हातीं घेतलेले कोणतेही कार्य ईश्वरार्पण  केले तर ते पूर्णच ठरते. श्रेष्ठ पुरूष अशा खंत-आनंद विरहीत कर्माची कायम वाखाणणी करतात.

काही सुंदर ओव्या पुन्हा एकदा –
“अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचे ।
जेथ मन आणि बुध्दीचें । ऐक्य आथी.  ॥
(मन नि बुध्दीचे ऐक्य होणे खरोखर विरळाच. एक स्नेही म्हणत, “योग्य कळते पण करत नाही ; अयोग्य पण कळते मात्र केल्यावाचून राहावत नाही.” किंवा, “सोचते हैं वह करते नही, लेकिन करते है बिना सोचे !”) असो.
“ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां   ॥”
( ते कर्मासक्त तर असतातच, पण कर्मफलाची अपेक्षा बाळगत नाहीत. म्हणून ते जन्म-मरणाच्या चक्रातून सुटतात आणि निरामय असे अढक्षपद मिळवतात. त्यांना आम्ही ‘बुध्दियोग युक्त’ असे संबोधतो धनुर्धरा !)

तूं जेव्हा असा होशील तेव्हा सर्व प्रकारच्या मोहबंधांतून सुटशील नि तुझ्यांत खऱ्याखुऱ्या वैराग्याचा संचार होईल. एकदा वैराग्य स्थिरावले की मग निष्कळंक आणि गहन असे ‘आत्मज्ञान’ आपोआप प्रकट होईल. यामुळे तूं साहाजिकच निरीच्छ, विरक्त होशील.
अर्जुना, अशी अवस्था आल्यावर अधिक काही जाणावें किंवा मागचे काही आठवत बसावें हा हव्यास राहणार नाही. इंद्रिय-जनित भोगांना सोकावलेली बुध्दि पुन्हा एकदां निष्काम कर्मांमुळे आपल्या मूळ आत्मस्वरूपांत स्थिर होईल. आत्मज्ञानांत स्थिरावलेली बुध्दि साहाजिकच समाधीसुखांत रमेल नि तुला आत्मानंदाचा, म्हणजेच ब्रह्मानंदाचा निरंतर प्रत्यय येत राहील. तीच खरी योगावस्था होय.

अर्जुनाला हे सर्व तत्वज्ञान ऐकून साहाजिकच अधिक जाणून घ्यायची उत्कंठा निर्माण झाली, म्हणून तो श्रीकृष्णाला विनवतो की याच अनुषंगाने मला काही विचारायचे आहे, त्याविषयीं हे कृपानिधे, तुम्ही मला सांगाल काय ? तेव्हा प्रसन्न होत्साते श्रीअच्युत त्याला म्हणतात होय अवश्य. तुला जे काही विचारायचे आहे ते खुशाल नि:संकोचपणे विचार.

आता अर्जुन भगवंताला “स्थितप्रज्ञ” म्हणजे काय, तो कसा असतो वगैरे खंडीभर प्रश्न विचारेल. तो भाग पुढे येईल.
(क्रमश:……



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?